माझ्या लहानपणी हा शब्दांश मी अनेकदा ऐकला आहे, अनुभवाला पण हो. मी एकूलती एक कन्या असून सुद्धा हा शब्दांशासहीत मी जगले आहे. लहान मुलं म्हटली कि त्यांची वाढ झपाट्याने होत असते. त्यामुळे माझ्या लहानपणी घरचे सगळं वाढत्या अंगाचं घेण्याकडे कल ठेवायचे, बहुतांशी कपडे, चप्पल, दप्तर ई. म्हणजे जे काही खरेदी करायचं ते थोडसं, कणभर मोठ्या आकाराचं, म्हणजे ती वस्तू फक्त काही वेळ, किंवा फक्त त्या ठराविक काळात उपयोगात येत नाही तर थोडीशी जास्त तक धरून राहते, किंवा जास्त काळ उपयोगी पडते. असो. तेव्हा तसेच सर्वत्र सारखे वातावरण होते, सगळेच आईवडील असेच विचार करत होते आणि त्यात काही चुकीचे नव्हतेच. तेव्हा आर्थिक आणि सामाजिक पद्धती, रीती अश्याच असल्यामुळे ते तस्स पाळलं जायचं.
आता बरेच बदल झालेत कारण सर्वार्थाने एक, दोन, तीन पिढ्यांचा काळ सरला आहे.
पण तरी देखील मला आज हे का आठवलं सगळं? मी का भूतकाळाची सफर करून आले? सांगते. एवढ्यातच माझ्या नातीचा एक महत्वाचा वाढदिवस आहे, एक मैलाचा दगड, पाचवा. आणि अर्थात त्या वाढदिवसाला जाते वेळी मी काय घेऊन जाऊ तिच्यासाठी? ह्याचा मी विचार करू लागले. "वाढत्या अंगाचा" हा पहिल्यांदा विचार आला आणि एक सुंदर, नावीन्याने भरपूर असा ड्रेस घ्यावा असं मनात आलं. ते बघितलं पहिल्यांदा. मग म्हटलं अजून काही विविध प्रकार सध्या उपलब्ध आहेत, ती शाळेत जाते रोज तर वेगळे दप्तर, डब्बा, पाण्याची बाटली किंवा उपयुक्त असं काही? ते बघून झालं ऑनलाईन आणि दुकानात फेर फटका मारून पण जरी खूप सगळंच आवडतं असलं तरी काही घेणं झालं नाही.
त्या नंतर खेळ, गेम्स, पाहायला सुरवात केली आणि खूप काही आवडलं. अर्थात पहिला प्रश्न दुकानदाराने विचारला दोन्ही कडे ऑनलाईन आणि ऑफलाईन, त्याच्या खास शैलीत "कोणासाठी बघताय?", वय सांगितलं तर त्याने फक्त वयानुरूप आणि साधारण मुलींना आवडतील, भावतील असे खेळ दाखवायला सुरवात केली. मग मी मुलं मुली दोघी खेळू शकतील असे काही प्रकार बघितले. शैक्षणिक, बौद्धिक, खिळवून ठेवणारे, वेळ खाऊ, कलात्मक असे, सर्वांनी मिळून खेळणारे असे पहिले तेव्हा ४-५ पसंद पडले. मग साधारण बाकी सगळे पाहुणे असेच वयानुरूप आणतील खेळ, वस्तू, गिफ्ट्स, तेव्हा त्या भरपूर, रकाने भरून ठेवलेल्या वैविध्य गोष्टीतून मी काही निवडले. त्या वर नमूद केलेले वय बघितले, थोडक्यात वाचलं आणि ते घ्यायचं ठरवलं, आणि घेतलं देखील. ती गिफ्ट दोन भागात आहे. एकात साधं सोप्प असं दिलंय आणि दुसरं जरा चित्रमय करण्याचा प्रयत्न केला आहे. एकाला दुसऱ्याची जोड, किंवा भर नक्कीच आहे. शैक्षणिक गटात मोडणारे पण तिला ते सहा एक महिन्यांनी जास्त मस्त खेळता येईल आणि त्यानंतर बरेच दिवस ती ते खेळू शकेल असे "वाढत्या अंगांचे" आहे.
ह्या सगळ्यांत मला माझ्या दोन लहान मुलांचे साजरे केलेले वाढदिवस आठवले. त्यात एकाच घरात एकाच वेळी एकाच वयाची दोन म्हणजे विचार करा दुप्पट भेटवस्तू येत असतं. नेमका त्यांचा वाढदिवस वार्षिक परीक्षेच्या आधी असे, त्यामुळे सगळेच गिफ्ट्स एका वेळी उघडायच्या नाहीत असं मी त्यांना सांगितलं आणि ते त्यांनी पाळलं देखील. कारण मग उन्हाळ्याच्या सुट्टीत काय करायचं हा यक्ष प्रश्न असायचा. त्यामुळे तो साठा सांभाळून ठेऊन एक एक उघडायचा म्हणजे नावीन्य टिकून राहतं, हा माझा आई म्हणून त्या मागचा विचार. मुलांनी ऐकलं आणि सगळं जमलं व्यवस्थित. तसेच माझ्या नातीला पण भरभरून भेटवस्तू येणारंच. तेव्हा माझी भेट जरा काही दिवसांनी, महिन्यांनी उघडली तर जास्त मज्जा येईल सर्वांनाच. एकाच वयोगटातील, फक्त त्याच वेळी कामी येणारी भेट हा एक पर्याय, आणि थोड्या दिवसांनी हा दुसरा. मी ह्या वेळी पण दुसरा निवडला. तिला ह्या खेळाचा निश्चित उपयोग होणार. तिच्या मोठ्या बहिणीसोबत, आई बाबांसोबत, आजी आजोबांना घेऊन खेळावा असा मजेशीर, रंगीत असा साधा खेळ आहे दोन भागात.
म्हणून माझी आई नेहेमी म्हणायची, अर्थात हे मोठ्यांच्या भेटवस्तूंना जास्त उपयुक्त आहे. कि हि जी सगळी भागदौड आहे, विचार आहे, कृती आहे, ऑनलाईन ऑफलाईन जाऊन बघून ठरवणे आहे हि खरी भेट, ती फक्त वस्तू.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा