रविवार, १७ नोव्हेंबर, २०२४

२०९५: PRN नंबर


मी जेव्हा पासून स्वेच्छा निवृत्ती घेतली आहे आणि असंख्य संस्थांमधे जाऊन शिकवते आहे, सेशन घेते आहे तेव्हा मला एक मस्त अनुभव येत आहेत. हे आणि असेच अनुभव मी PhD करत होते तेव्हा पण येत होते, ह्या सारखे. तेव्हा पण एक मस्त भावना, फिलिंग यायची आणि आता पण तसेच जाणवते. तर त्याचे असे झाले कि मी PhD ची विद्यार्थिनी होते फक्त, अजून नावासमोर छोटेसे Dr. लागायचे होते, तरी देखील मला मेल मध्ये, कॉन्फेरेंन्सस मधे अनेक जण आधीच Dr. म्हणू लागले होते, अर्थात चुकीने, पण ते ऐकून लै भारी वाटतं होतं तेव्हा, कि कधी अधिकृतपणे मला हे टायटल मिळणार? असे काहीसे. 

नवीन लोकांशी फोन वर बोलतांना, नवीन ठिकाणी वर्गात विद्यार्थ्यांशी चर्चा करतांना अनेक वेळा चुकून मुलं "सर" म्हणून जातात, मॅम च्या ऐवजी, पण ती एक पदवी आहेच आणि वेगळेपण पट्टाकिनी जाणवते. जसे कि "बाई माणूस", "बेटा" ह्या सगळ्यात सामावले आहे तस्सेच. 

एवढ्यातच ह्याचाच एक नवीन मस्त, भन्नाट आणि वैविध्यपूर्ण शब्द वाचला. एका मेसेज मधे मला माझा PRN नंबर विचारण्यात आला, आत्ता, सेवानिवृत्ती नंतर, क्या बात है नाही? अहाहा च, असा तो मोमेन्ट होता माझ्या साठी. पुन्हा एकदा त्या कॉलेज च्या बेंच वर जाऊन बसल्यासारखं तरुणांपेक्षा तरुण झाल्याचा भास झाला, काही क्षण का होईना जगावेगळं वाटलं, दहा हत्तीचे बळ आले हो. त्या मेसेजचं मी हवं असलेले, अपेक्षित उत्तर कळवलं कारण त्यांना माझा पॅन नंबर हवा होता. चुकून त्या गूगल बाबाने तो PRN असा घेतला, कारण तो मेसेज लिहिणाऱ्या एक आदरणीय शिक्षिका आहेत. त्या नेहेमीच PRN वापरत असणार आणि त्याचीच सवय झाली त्यांच्या फोन ला, त्या वरच्या अँप ला. पण त्या एका सुंदर चुकीच्या स्पेलिंग मुळे माझे मस्त बल्ले बल्ले झाले, अत्यांनंद झाला तो वेगळाच आणि माझ्या जुन्या कॉलेज चा फेरफटका मारता आला विर्च्युअली ते वेगळंच, नाही का? त्यामुळे बघा काय काय लाभ झाला ते. आमच्या वेळी रोल नंबर असायचे, मग हळूहळू हे PRN च फॅड आलं. दोन्ही एकच, पण सॉफ्टवेअर आल्यापासून हा बदल झाला असावा कदाचित. 

फक्त फेरफटका नाही तर मला बहुतांशी सर्वांचेच रोल नंबर, ते कुठे बसत होते, कुठल्या शिक्षक शिक्षिका होत्या, लॅब्स कश्या होत्या, वाचनालयात कसे जाऊन रेफेरेंस पुस्तके घेऊन अभ्यास केला जायचा. नोट्स काढल्या जायच्या, आधीच्या वर्षी आलेले वार्षिक परीक्षेचे सगळे प्रश्न सोडवून बघितले जायचे, काय काय करत होतो ते सगळं झर्र्कन डोळ्यासमोर उभे ठाकले, जसा कि एक चित्रपटच.  

अरे हो,परवाचीच गोष्ट. माझ्या हातून देखील असाच एक किस्सा घडला. मला ठाऊक नव्हते त्यामुळे नकळत झाले ते. माझ्या माहितीनुसार आजकाल बहुतांशी सगळीचकडे Dr. झालेलेच प्राध्यापक, शिक्षक असतात. एका भल्यामोठ्या विद्यापीठात एक मॅम शिकवतात. त्यांच्याशी मेल वर माझे बोलणे जेव्हा झाले तेव्हा मी सवयीनुसार Dear Dr. आणि त्यांचे नाव लिहिले आणि मग मजकूर. त्यांचे ताबडतोब उत्तर आले. तो मजकूर आणि त्याचे अपेक्षित उत्तर राहिले बाजूला, मेल मध्ये फक्त एकाच ओळ, मी अजून Dr. झाले नाही, असे लिहू नका. बाप रे. मी घाबरले, त्यांची लिखित माफी मागितली. कसं काय इतकं त्यांना वाटलं माहित नाही पण मला असे मेल येत होते माझ्या वेळी, जेव्हा मी संशोधन पेपर सबमिट करायचे तेव्हा त्याचे उत्तर म्हणून मला Dr. संबोधले जायचे. पण ठीक आहे ना. काय हरकत आहे. आपला त्या साठी प्रवास तर सुरु आहेच ना. का कधी कोणी आक्षेप घेतात कोणास ठाऊक? असो. 

असेच नेहेमी PAN चे PRN, मॅम चे सर आणि विद्यावाचस्पती होण्याआधीच "काय डॉक, कश्या आहात?" असं सगळ्यांना विचारलं जावं म्हणजे तारुण्य पण टिकून राहील शारीरिक, मानसिक आणि संशोधनातले देखील. 

२ टिप्पण्या:

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...