अगदी लहानपणापासून, काहीही समजायच्या आत, फक्त घरच्यांकडूनच नाही, तर शेजारी आणि संपूर्ण समाजाकडून माझ्या कानावर नेहमी एकच सूर पडला. तो काळ 'का?' हा प्रश्न विचारण्याचा नव्हता; मोठ्यांनी सांगितले तेच अंतिम सत्य. प्रत्येक क्षणी एकच गोष्ट सांगितली जायची: "नीट बस, नीट उठ, सासरी जायचं आहे."
जेवताना, बोलताना, वागताना, प्रत्येक गोष्टीत सतत एकच पालुपद असायचं: "हे सगळे सासरी उपयोगी येईल." माझ्यावरच नव्हे, तर माझ्या सर्व मैत्रिणींवरही हात राखून खर्च केला जात असे. घर आवरणे, स्वयंपाक, रांगोळी, गाणे, बागकाम, पूजा-अर्चा, (ही यादी खूप मोठी होती) अशी सर्व स्तरावर जडणघडण होत होती. जणू आमची जडणघडण फक्त आणि फक्त त्या 'सासर'साठीच होत होती. "हे घर तुझे नाही, ते तुझे खरे घर आहे" असे सतत बिंबवले जायचे. 'काळा दोरा, खोटे दागिने घालायचे नाहीत, मोठ्याने हसायचे नाही, उगाच बोलायचे नाही...' असे संस्कार नकळत कोरले गेले.
हे संस्कार जणू हवेत पसरलेले प्रेम इतके मस्त होते की, आम्हा सगळ्या मैत्रिणींनी ते खूपच उत्साहाने स्वीकारले. आम्ही एका अद्भुत दुनियेत वावरत गेलो, मोठ्या कधी झालो कुणास ठाऊक? एकच उत्कट वाट पाहणं होतं की 'तो' येणार, मग आपण संपूर्ण विश्व जिंकायला मोकळे होऊ! तोच सर्वेसर्वा असेल, तो सर्वकाही करेल; तो म्हणजे काय, याची उपमा देण्यापलीकडे होती.
आज वाटते, इतकी वर्षे घरच्यांनी, शेजाऱ्यांनी आणि समाजाने घेतलेले अतोनात कष्ट व्यर्थ नाही गेले. ते व्यर्थ नव्हतेच, पण वास्तव खूप वेगळे होते. तो प्रेमाचा फुगा फुटला नाही, तो कायमचा विरून गेला. हवेतले ते प्रेम कुठे लुप्त झाले कुणास ठाऊक, गाडले गेले, की पुरात वाहून गेले!
या मागे मला आता दोन कारणे जाणवतात:
पहिले कारण: आमची घोडचूक. मुलींनी एका अदृश्य स्वप्नाची इतकी वाट बघितली, बहुतेक सगळं काही दुसऱ्याने करायचं बाकी ठेवलं, किंवा आहे त्यापेक्षा कैकपटीने सर्वोत्तमच चित्र रंगवलं. अर्थात, 'दुरून डोंगर साजरे' असं झालं.
दुसरे आणि महत्त्वाचे कारण: मुलींच्या मागे लागण्यातच सगळे कष्ट करत होते, वेळ देत होते, त्यांना घडवत राहिले, फक्त आणि फक्त 'ती' ला. पण 'त्या' चे काय? त्याला कोणी सांगितले का तितक्याच प्रेमाने की त्याला एका मुलीचा, तिच्या कुटुंबीयांचा, आणि तिच्या भावनांचा सांभाळ करायचा आहे? जसे तिला सांगितले गेले: 'असा बस, असा उठ, असा खर्च कर,' तसे त्याला शिकवले गेले नाही. 'सांभाळणे म्हणजे काय, मुलगी म्हणजे काय?' हे त्याला सांगितलेच गेले नाही.
बरं, सोशल मीडिया नव्हता, तरी पुस्तके होती, वाचनाला वेळ होता, वाचनालये होती. अनेक मुले आम्ही किती मोठे वाचक आहोत यावर अभिमान बाळगतात, मग समाजात बघून, लेखांकडून किंवा स्वतःच्या बुद्धीने तरी त्यांनी थोडी तयारी का केली नाही? ना स्वभाव पातळीवर, ना सामंजस्य पातळीवर, ना वैचारिक पातळीवर तसूभरही तयारी नसताना त्यांनी जोडीदार आणला. आणि मग, झाले संपले! अपवाद वगळता सर्वत्र चित्र फारच विद्रूप आहे. यामुळे विस्फोट, विद्रोह आणि अनेक स्तरांवर भरकटायला झाले.
अर्थात, आता या सगळ्या गोष्टी सोडून देत देत जीवनप्रवास पुढे सुरू राहिला आहे. आता स्वीकारले आहे, जे होणार होते, तेच झाले, आणि जे झाले तेच सर्वोत्तम होते. 'एकला चालो रे' या वृत्तीने, प्रत्येक क्षणी आनंद शोधत, मनःपूर्वक सर्वांना धन्यवाद देत, कुठलीही ढवळाढवळ न करता मार्गस्थ होणे, बाप्पाने दाखवलेल्या दिशेने जाणे, गोड आठवणींना उजाळा देणे, आणि 'प्रेम सर्वत्र मोठ्या प्रमाणात पसरवणे' हे सगळे मी अत्यानंदाने स्वीकारले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा