गेले काही दिवस मी एक नवीन संकल्पना उदयास येताना बघते आहे, ती म्हणजे लहान मुलांसाठी तयार केलेली मोठी खेळण्यातील मोटर कार. ही मोटार मुले (३ वर्ष वयोगटातील मुलांसाठी) स्वतः चालवू शकतात किंवा रिमोटने आई-वडीलही चालवू शकतात; मुलाने फक्त ऐटीत आत बसायचे, बास. बटनांवर चालणारी, बॅटरी असलेली ही गाडी आठवणीने आणि सातत्याने चार्ज करणे आवश्यक असते, अन्यथा ती चालणार नाही. या मोटारीची किंमत ऐकून तर माझी दाही बोटे तोंडात गेली; बापरे, इतकी महाग! आणि त्यात रिमोटचे सेल, बॅटरीची देखभाल, इत्यादी खर्च वेगळेच. आणि हे सगळे कशासाठी?
पालक यामागचे कारण काय देतात? तर तो घरी कंटाळतो, सतत मोबाईल/टीव्ही बघतो, आम्ही कामात असतो, त्याला खेळायला खाली घेऊन गेले की तो नुसता पळतो, रस्त्यावर गाड्या येतात, म्हणून त्याला ह्यात अडकवून ठेवायचे. या गाडीत म्हणे गाणी लागतात, मोठ्यांच्या मोटारीसारखी बहुतांशी सगळी सोय आहे, दिवे आहेत, ती मागे-पुढे होऊ शकते आणि बरेच काही.
फक्त माझ्यामते, तीन आणि पुढील वयाच्या मुलांना भूक कशी लागणार जर ते धावले नाहीत, खेळले नाहीत, आणि त्यांना ऊन मिळाले नाही तर? मैदानी खेळांचे महत्त्व सर्वश्रुत आहेच, मग हे असले निष्क्रिय खेळ सध्या कशाला?
मला अजूनही आठवतंय, माझी मुलं जेव्हा लहान होती, तेव्हा सोसायटीत नवीन असल्यामुळे खेळाचे मैदान तयार नव्हते. माझ्या मते, किमान दोन वर्षे मी त्यांना दररोज ऑफिसमधून आल्यावर गाडीत घालून कुठल्या ना कुठल्या मोठ्या बागेत घेऊन जायचे. माझ्यासोबत त्यांना सांभाळणारी मदतनीस असायची, आणि मग ते मनसोक्त खेळायचे. मुलांच्या योग्य वाढीसाठी काहीतरी करणे भाग आहे.
ती गाडी बघून मला कमालीचं वेगळं वाटतं. त्या मोटारी एकतर खूप मोठ्या आकाराच्या आहेत आणि त्या ठेवायला जागा व्यापतात. मुलांना असं रिमोटने चालवणं किंवा त्या छोट्या मुलाला आत्तापासून अशा गोष्टी दररोज करायला देणं... नकोच! उंची वाढणे, ताकद येणे, भूक लागणे, सगळ्या मित्रांशी मिळून मिसळून खेळण्याची सवय होणे, पडणे, धडपडणे, चढणे, चालणे, पळणे, मातीत खेळणे, जंतूंची ओळख होणे, हे सगळं त्यांच्या वाढीसाठी आवश्यक आहे. मुलांच्या योग्य शारीरिक आणि मानसिक वाढीसाठी खूप काही महत्त्वाचे आहे. नुसती दिवसभर स्क्रीन किंवा एका जागी बसून राहणे पुरेसे नाही.
याऐवजी: व्यायामबद्ध जीवनशैलीसाठी कितीतरी संस्था आहेत; मुलांना तिथे घेऊन जाणे आवश्यक आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा