शुक्रवार, १० ऑक्टोबर, २०२५

२२७६: ती

मी तुम्हाला एका साध्या, सरळ पण एका बहुआयामी व्यक्तिमत्त्वाबद्दल माहिती देत आहे. ती एक समर्पित आई आणि गृहिणी आहे. दोन्ही बाजूंनी साध्या घरातून आलेली असूनही, तिला अन्नपूर्णेचा आशीर्वाद लाभलेला आहे, ती उत्कृष्ट चवीचे पदार्थ प्रेमाने वाढते. गृहिणी म्हटल्यावर संपूर्ण घराची जबाबदारी आलीच, आणि ती ती जबाबदारी बखुबीने निभावते आहे. तिची रोजनिशी सकाळ ते रात्र सुरू असते: मुले, शाळा, डबे, गृहपाठ, परीक्षा, शाळेत ने-आण आणि इतर अनेक गोष्टी.

कधीकधी तर तिच्या अहोंच्या कामाच्या ठिकाणी जी चमू (टीम) रंगकाम करते, त्या सर्वांसाठी ती मोठ्या आनंदाने डब्बे देते. माझ्यासारख्या शेजारणीलाही ती हसत-खेळत प्रेमाने जेवण भरवते. जेव्हा बघावे तेव्हा तिच्या चेहऱ्यावर स्मितहास्य कायम असते.

घरची जबाबदारी सांभाळून ती एक उत्कृष्ट 'सौंदर्य प्रसाधन केंद्र' (ब्युटी पार्लर) चालवते, अगदी नखशिखांत सगळ्या सेवा देते. तिला फक्त २४ तास मिळाले आहेत की किंचित जास्त, असा प्रश्न अनेकदा मला पडतोच!

हे सगळे सुरू असताना ती तांत्रिक बाबतीतही अग्रक्रमी आहे. सोशल मीडियाचा ती बखुबीने उपयोग करते आणि त्यावर सातत्याने माहिती देत राहते. तिच्या नेहमीच्या सेवा तर आहेतच, पण जेव्हा मी तिने केलेले रील्स पाहिले, तेव्हा दाही बोटे तोंडात घातली. केलेले काम दाखवताना त्याला गाण्याची जोड देणे आणि गाण्याची नेमकी निवड, बाप रे!

एकदा मी ती ने तय्यार केलेली जाहिरात बघितली ती म्हणे ७-८ पद्धतीने साडी नेसवायला शिकवणार. मुली आल्या, क्लास झाला आणि व्हिडिओ तयार करून लगेच अपलोड! कुठेच कसलाच उशीर नाही. मग अद्भुत केशरचनांचे व्हिडिओ पाहिले. जगावेगळे पेंट केलेली नखे दिसली. एका त्या पिटुकल्या नखावर अगदी बारीक ब्रशने करवा चौथसाठी तयार झालेली मुलगी दाखवली आहे, लाल साडी, सोनेरी किनार, सगळे म्हणजे सगळे बारकावे सुद्धा!

याच सणाच्या निमित्ताने अनेक जणी मेहेंदी काढण्याकरता आल्या होत्या. दोन्ही हात भरून मेहेंदी, ज्यात ढोल, तबला-डग्गा, उत्कृष्ट तयार झालेले नवरा-बायको, एक-दोन मोर, गणपती बाप्पा आणि काय काय चितारले आहे, बघून थक्क व्हायला झाले. आणि हे सगळे अगदी काही वेळात, अनेक तास वगैरे नाहीत हो!

एवढं सगळं असून माझ्यासाठी गप्पांचा वेळ देखील असतो बरं का; शेजारीण आहे ना! असेच एकदा बोलतांना श्री. गजानन महाराजांच्या पोथीचा विषय निघाला. ती म्हणते, "मी दररोज वाचते त्यांची पोथी." नवरात्रीचे नऊ दिवस उपवास, पूजा-अर्चा, कन्या पूजन आणि बरेच काही. शिवाय, शिवण कामात बसलेला तिचा हात इतका जलद आहे की, काही मिनिटांत ब्लाउज तयार.

हे सगळे एका व्यक्तिमत्त्वात आहे? ती याच जगातली आहे, "कमाल" च्या पल्याड आहे. कुठले रसायन पिऊन जन्माला आली आहे कोणास ठाऊक! पण ती ज्या ऊर्जेने आणि सातत्याने काम करते, त्याला माझा सलाम.

प्रत्येक स्त्री खूप विविध स्तरांवर कार्य करतच असते, पण वृषाली ज्या चिकाटीने, परफेक्शनने, गतीने, आनंदाने, अचूकपणे आणि प्रचंड मोठ्या कार्यक्षमतेने हे सर्व करते, यासाठी तिचे खूप अभिनंदन आणि कौतुक. ती माझ्यासाठी एक आदर्श आहे. तिच्याकडून खूप काही शिकण्यासारखे आहे. तिची उत्तमोत्तम अशीच प्रगती होवो, ही प्रार्थना. तिच्या हातून अनेक अजून कलात्मक कार्य घडो, आणि तिच्या परिस-स्पर्शाने अनेकांचे सौंदर्य अधिक खुलून उठो, यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!

आता समजले, तिच्या आई-वडिलांनी तिचे नामकरण 'वृषाली' असे का केले असावे! 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...