शनिवार, २५ ऑक्टोबर, २०२५

२२८४: बदललेल्या वेळेचा निरोप!

 "घाल घाल पिंगा वाऱ्या, माझ्या परसात 

माहेरी जा, सुवासाची कर बरसात!" 

https://www.aathavanitli-gani.com/Song/Ghal_Ghal_Pinga_Varyaa

कमलाकर भागवत यांचे हे गीत, त्यांच्याच सुरात ऐकताना आजही डोळे डबडबतात, सगळ्यांचेच. एका पुरुषाने हे भाव इतक्या उत्कटतेने कसे व्यक्त केले, याचे आजही आश्चर्य वाटते. हे गीत तेव्हा लिहिले गेले, जेव्हा मुलगी सासरी आली की माहेर दुरावयाचे. पत्रव्यवहार, किंवा क्वचित कोणाची ये-जा झाली तरच हालहवाल समजत असे. ती ओढाताण वेगळीच होती, एका बाजूला संसाराची, नवीन लोकांशी आणि पद्धतींशी केलेली नवी सुरुवात; आणि दुसरीकडे जन्मापासूनची माया, आत्मियता.

या गीताचे बोल म्हणजे, सासरी आलेली मुलगी आईसाठी संदेश घेऊन जाण्याची वाऱ्याला केलेली विनवणी होती. संपूर्ण आदराने हे नमूद करावेसे वाटते की, सासरच्या जबाबदाऱ्यांसाठी माहेर सोडून येणे, बाळंतपण, हे सर्व एका मुलीलाच दिले आहे, त्यामागे निर्मात्याची कारणे निश्चितच आहेत. असो.

माझी एक खास मैत्रीण, सध्या काही कारणास्तव एकटी आहे, सर्वांपासून दूर. तिची मुले आता नोकरीच्या विश्वात पाऊल ठेवत आहेत, दुसरे शिकत आहे आणि तिसरीचे लग्न झाले आहे. साहेब अजून एका ठिकाणी त्यांच्या कर्तव्यासाठी आहेत. तिला याच गीताची आठवण झाली.

आणि तिने त्याच 'पिगा घालणाऱ्या वाऱ्याला' सांगितले की, माझ्या लेकरांना जाऊन सांग, 'त्यांची माय एकदम ठणठणीत आहे, व्यवस्थित आहे, काळजी नसावी. तुम्ही तुमच्या-तुमच्या क्षेत्रात लक्ष द्या.'

सध्याच्या युगात हे सगळे नेटाने सांभाळणे हे एक मोठे आव्हान आहे; "जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे!" जरी आता सोशल मीडियाचा जमाना असला, तरी कामाचे व्याप प्रचंड वाढले आहेत, इतके की मागच्या पिढीला ते समजण्यापलीकडचे आहेत.

त्यामुळे ती निरोप पाठवू शकते, फोन करू शकते, पण त्यांना तितका मोकळा वेळ हवा ना? म्हणून मग 'बॅक टू बेसिक्स' या पद्धतीने, नवीन पिढीला डिस्टर्ब न करता, त्यांच्या कामात व्यत्यय न आणता, तिने वाऱ्याची मदत घेण्याचे ठरवले.

तिचा निरोप असा आहे:

"घाल घाल पिंगा वाऱ्या, माझ्या परसात

           पिल्लांघरी / ह्यांच्या निवासी जा, सुवासाची कर बरसात!"

"सर्वांना माझी खुशाली कळव. सगळ्यांना सांग की फक्त कामाकडे लक्ष द्या, पुढे जा, मोठे व्हा, स्वतःची काळजी घ्या आणि तब्बेत सांभाळा. जेव्हा वेळ मिळेल, तेव्हा भेटू आणि नवीन आठवणी निर्माण करू."

मागच्या पिढीला फक्त सोशल मीडिया हेच माध्यम नाही, तर नकळतपणे, मुलांच्या आणि त्यांच्या (पतीच्या) कामात अडथळा न आणता निरोप कसा द्यायचा हे त्यांना ठाऊक आहे. म्हणून हा तिने निवडलेला मार्ग.

कारण, "किती मेसेजेस करते तू? आम्हाला वेळ नसतो त्यांना उत्तर द्यायला," असे कोणी म्हणायला नको, किंवा त्यांना त्याचा / मेसेजेसचा वाढीव ताण नको म्हणूनच हे गीत इतक्या वर्षांपूर्वी बांधले गेले, निर्माण झाले! 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...