मला 'सुगंध' ही संकल्पना अतिशय भावते. कदाचित म्हणूनच माझ्या हातून अनेकदा त्याबद्दल कळत-नकळत लिहिलं जातं. आज देखील असंच काहीसं झालं. कामाच्या प्रचंड गडबडीत असूनही एका विशिष्ट सुगंधाने माझं लक्ष वेधून घेतलं तो इतका उत्कृष्ट आणि वेगळा होता की जणू मला एखादा अनपेक्षित खजानाच सापडला!
त्याचं असं झालं की, मी आज काहीतरी वेगळं करण्याच्या हेतूने रताळी विकत आणली, स्वच्छ धुतली आणि कुकरला लावली. नेहमीप्रमाणे मी एकाच वेळी अनेक कामं करण्यात गर्क होते. अशातच कुकर झाला, मी त्याचं झाकण उघडलं आणि एखाद्या पुतळ्यासारखी स्तब्ध उभी राहिले.
काय तो सुगंध! अहाहा... इतका म्हणजे इतका उत्कृष्ट आणि जगावेगळा सुगंध आला की मी तृप्त झाले. जणू एखादी अनपेक्षित भेटच मिळाली! तो सुगंध इतका शुद्ध होता की ती रताळी किती उच्च दर्जाची आणि गोड असणार, हे चाखण्याआधीच समजलं. त्यामुळे त्या रताळ्यांचा पदार्थ तयार करताना एक वेगळाच जोश आला आणि तो पदार्थही तितकाच स्वादिष्ट झाला.
मनात विचार आला ज्या शेतकऱ्याने ती रताळी लावली असतील, ज्या मातीने ती जोपासली असतील, ज्या वाऱ्याने ती वृद्धिंगत केली असतील, त्या सर्व घटकांना माझा शतशः धन्यवाद! तो सुगंध मला त्या मातीच्या आणि कष्टाच्या 'चमू'बद्दल बरंच काही सांगून जात होता. शब्दात न मांडता येणारा तो एक विलक्षण अनुभव होता. एका साध्या रताळ्याचा इतका मस्त सुगंध असू शकतो, हे मला ठाऊकच नव्हतं.
मला आजतागायत निर्मळ ताज्या दुधाच्या उकळण्याचा, विज्ञान प्रयोगशाळेतील / प्रत्यक्ष मातीत पाऊस पडल्यावर येणाऱ्या मृद्गंधाचा, आईच्या हातच्या साध्या आमटीचा आणि गरमागरम पुरणपोळीवर साजूक तूप वितळल्यावर येणाऱ्या सुगंधाचा मनापासून लळा आहे. हे सर्व सुगंध मला एक मोठी प्रेरणा देऊन जातात आणि कोणतीही कृती पूर्णतः 'समरस' होऊन करण्यास भाग पडतात.
मज्जा आली आज!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा