गुरुवार, १४ मे, २०२६

२४६१: आमंत्रण


आमच्या सोसायटीत गेल्या काही दिवसांपासून आनंदाचं एक वेगळंच वातावरण आहे जणू.

एक छान चौकोनी कुटुंब. ताईचं लग्न झालेलं, तीही तिच्या कुटुंबासोबत आमच्याच सोसायटीत राहते. तिच्या भावाचं लग्न ठरलं आणि आज ते सुरळीतपणे पारही पडलं.

अनेक वर्षं सगळ्यांनीच ह्या दिवसाची आतुरतेने वाट पाहिली होती.

विशेष म्हणजे सगळं किती पटकन जुळून आलं. मुलगी आणि तिचं कुटुंब अगदी जवळचं निघालं. घरात उत्साह, लगबग, खरेदी, चर्चा… सगळंच अगदी आनंदात पार पडलं.

त्या नववधूला आणि संपूर्ण कुटुंबाला मनःपूर्वक शुभेच्छा.

काकूंनी तर इतक्या उत्साहाने सगळं सांगितलं. तिच्याबद्दल, तिच्या आई आणि बहिणीबद्दल, खरेदीबद्दल, तयारीबद्दल… अगदी फोटोही दाखवला.

बहुतेक त्यांनी अगदी जवळच्या लोकांनाच आमंत्रित केलं असावं. संपूर्ण सोसायटीला बोलावणं शक्यही नसतं अनेकदा. कदाचित काही मर्यादा असतील, बजेट असेल, हॉलची क्षमता असेल, किंवा कमी वेळात ठरलेलं लग्न असल्यामुळे धावपळही खूप झाली असेल.

पण गंमत अशी, जे जाऊन आले तेही विचारत होते… आणि ज्यांना आमंत्रण मिळालं नव्हतं तेही.

का? कुणास ठाऊक.

शेवटी कोणाला आमंत्रित करायचं आणि कोणाला नाही, हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न असतोच.

पण मला आज एका वेगळ्याच गोष्टीचा खूप आनंद झाला.

माझ्या मनात क्षणभरही काही आलं नाही. वाईट वाटणं तर दूरच, उलट मनापासून आनंद झाला.

आणि ते मला फार मोठं वाटलं.

कदाचित वय, अनुभव, आयुष्य, किंवा माणसांकडे बघण्याचा दृष्टिकोन काहीतरी शिकवत असावा.

आमंत्रणाला नेहमी दोन बाजू असतात.

दोन्ही समजून घेतल्या, तर आनंद जास्त पसरतो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

२४६४: तळ गाठणे

आमच्या सोसायटीत चार बोरवेल आहेत. त्यापैकी दोन चालत नाहीत, एक चालू आहे, आणि चौथ्याबद्दल मला फारशी माहिती नाही. त्या बोरवेल खोदताना मोठमोठ्या ...