काल साईंनी (Mere Sai on Sony TV) जमिनीवर तीन वर्तुळं काढून स्वतःचं कुटुंब, समाज आणि संपूर्ण जग ह्यांच्यावर प्रेम, माया आणि आदर करायला प्रेरणा दिली. आणि त्याच वेळी मला शिवानी दीदींच्या एका कार्यक्रमातली अतिशय मार्मिक संकल्पना आठवली.
त्या म्हणाल्या, “कृपया डोळे बंद करा. ज्या व्यक्तीसोबत तुम्हाला नातं सुधारायचं आहे, त्या व्यक्तीच्या soul ला समोर येण्यास विनंती करा. चेहरा नको. मग त्या supreme power कडून तुम्हाला जी ऊर्जा, आशीर्वाद आणि सकारात्मकता मिळते आहे, ती तुमच्या माध्यमातून त्या soul पर्यंत पोहोचवा. त्यांच्यासाठी प्रार्थना करा, good wishes पाठवा, धन्यवाद द्या, गोड विचार मनात आणा.” त्यानंतर त्यांनी सांगितलं, “आता हेच आपल्या सभोवतालच्या लोकांसाठी करा. मग आवाका वाढवत संपूर्ण पृथ्वीसाठी करा. त्यातले सगळेच तुम्हाला ओळखीचे असणार नाहीत.”
ह्या दोन्ही अनुभवांनंतर मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली.
आपल्या शरीराच्या प्रत्येक अवयवाला धन्यवाद द्यावेत असं अनेकदा सांगितलं जातं, आणि ते अगदी योग्यच आहे. कारण त्यांच्यामुळेच आपण कार्यरत आहोत. अंतर्बाह्य सर्व अवयवांचा त्यात समावेश व्हायलाच हवा.
रोज किमान एकदा तरी, किंवा सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपताना, त्यांना मनापासून धन्यवाद द्यावेत. पण मी जेव्हा एक पाऊल पुढे विचार केला, तेव्हा असं जाणवलं की फक्त अवयवांनाच नाही, तर त्यांच्या परस्पर सहयोगालाही धन्यवाद द्यायला हवेत. कारण ते सगळे सतत एकमेकांशी संपर्क साधत, समन्वय ठेवत, न कुरकुरता आणि न थकता कार्यरत असतात. आणि इथेच थांबून चालणार नाही.
जर गुरुत्वाकर्षण नसतं, तर हे शरीर चालू, बसू, धावू किंवा उभंही राहू शकलं नसतं. श्वासासाठी हवा, पाण्यासाठी निसर्ग, शरीरासाठी धरती… सगळंच किती एकमेकांशी जोडलेलं आहे. म्हणून शरीर आणि निसर्ग ह्यांच्यातला संवाद, सहयोग आणि समतोल राखणारी प्रक्रिया ह्यांनाही मनःपूर्वक धन्यवाद द्यायला हवेत.
साईंनी सांगितलेली concentric circles म्हणजे भिन्न त्रिज्यांची वर्तुळं, आणि आधुनिक काळातल्या संतांनी सांगितलेले विचार… किती साम्य आहे ह्यात. आणि किती सहज शक्य आहे हे करणं. फक्त काही क्षण लागतात. ज्या निसर्गाने कोणतीही अपेक्षा न ठेवता आपल्याला इतकं काही बहाल केलं, त्याला साधे धन्यवाद देणं इतकं कठीण नसावं.
चला तर मग, आजपासून स्वतःच्या कुटुंबाला प्रेम, आदर आणि सन्मान देऊयात. निसर्गाकडून चांगले vibrations घेऊन इतरांपर्यंत पोहोचवूयात. आपल्या शरीरातील प्रत्येक अवयवाला, त्यांच्या सुंदर सहयोगाला, समतोल राखणाऱ्या प्रक्रियेला आणि ह्या संपूर्ण धरतीमातेला मनापासून धन्यवाद देऊयात.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा