सोशल मिडियाचा योग्य वापर आता खरंच सुरू झाला आहे असं म्हणायला हरकत नाही.
सुरुवातीला सोशल मिडिया आणि वापरणारे दोघेही एकमेकांसाठी नवीन होते. त्यामुळे समजून घ्यायला वेळ लागलाच. पण आता एखादी मदतीची पोस्ट टाकली, प्रश्न विचारला, की खरंच उत्तरं मिळतात. उगाच इकडून तिकडे ढकलाढकली कमी झाली आहे.
मी काही निवडक ग्रुप्सवर आहे. तिथे वारंवार दिसणारी एक पोस्ट म्हणजे:
“बाई पाहिजे.”
सुरुवातीला वाटायचं, वेगवेगळ्या कुटुंबांना घरकामासाठी बाई हवी आहे. पण नंतर लक्षात आलं, काही वेळा त्याच कुटुंबाकडून पुन्हा पुन्हा तीच पोस्ट दिसते.
मग विचार सुरू झाला. टाळी दोन हातांनीच वाजते ना?
दोन्ही बाजूंमध्ये प्रचंड बदल झालेले दिसतात. दोघींनाही धावपळ, ताण, वेळेची कमतरता, पैशाचं महत्त्व, patience कमी… अनेक गोष्टी बदलल्या आहेत. स्वयंपाकाचंच उदाहरण घ्या. फक्त स्वयंपाक करून भागत नाही. त्यात स्वच्छता, वेळ पाळणं, चव, विविधता, सातत्य, नवीन पदार्थ, घरच्या सवयी समजून घेणं… कितीतरी पैलू असतात. आणि दुसऱ्या बाजूला अनेक घरांमध्ये काम करत फिरणाऱ्या त्या मावशींचाही विचार करायला हवा. त्यांचंही अक्षरशः भाजून निघत असतं.
माझ्या घरी काम करणाऱ्या व्यक्तीला मी कधी “बाई” म्हटलं नाही. त्या नेहमी “मावशी”च होत्या. त्यामुळे मुलांनाही तसंच वळण लागलं.
नवीन मावशींना घरात सामावून घेणं, त्यांच्या सवयी समजून घेणं, आणि त्यांनी आपल्याला समजून घेणं… ही प्रक्रिया सोपी नसते. मला अजूनही आठवतं, मी जर घरकामासाठी व्यक्ती बदलली तर पूर्ण सोसायटीला त्यावर मत असायचं. दूरून निरीक्षण, अर्धवट माहिती आणि लगेच निष्कर्ष. पुढे तेच बोलणं नातेवाईकांपर्यंत पोहोचायचं. पण आज सोशल मिडियामुळे एक गोष्ट चांगली झाली. लोक आता उघडपणे मदत मागतात. “बाई पाहिजे” असं स्पष्ट लिहितात. त्यात कमीपणा वाटून घेत नाहीत.
शेवटी मालकीण असो किंवा मावशी, दोघींचीही कसरत खरीच असते.
दूरून फक्त मत देणं सोपं असतं. पण खरंच दोघींना समजून घेऊन त्यांचं नातं टिकावं म्हणून प्रयत्न करणं फार अवघड असतं.
माणसं, नातं आणि कष्ट महत्त्वाचे की “किती बायका बदलल्या” ह्याची मोजदाद?
हा प्रश्न मात्र अजूनही मला न सुटलेलं कोडंच वाटतो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा