मंगळवार, ८ फेब्रुवारी, २०२२

बदल

ऑफिसला जायच्या तय्यारीचा रोजचा  एक महत्वाचा भाग म्हणजे पिण्याच्या पाण्याची बाटली आणि डब्बा भरणं. अगदी लहानपणीपासून ते माझं चक्क लग्न होईस्तोपर्यंत हे काम माझ्या वाट्याला कधी म्हणजे कधीच आलं नाही. माझे बाबा आणि आई अतिशय उत्साहाने हे माझ्या साठी करत होते, हातात कधी देत होते हे अजिबात जाणवलं नाही. मग आज मी का बोलते आहे ह्या बद्दल हा सहज प्रश्न आला असेलच ना तुमच्या मनात? तर त्याचं असं झालं, आज मी ऑफिस ला जातांना माझी पाण्याची बाटली भरत असतांना हे सगळं आठवलं, मी पट्टाकिनी जुन्या घरात फेरफटका मारून पण आले आणि पोटात गोळा, डबडबलेले डोळे घेऊन वावरू लागले.

सध्या माझ्याच राहत्या घरातून माझ्याच जुन्या घरात राहायला निघालो आहोत आम्ही. हे सगळं अचानक ठरलं जेव्हा मी नागपूरला माझ्या नवीन ऑफिसच्या कामासाठी गेले होते. असो. पण आज प्रकर्षाने जाणवतं आहे कि मला आताच, ह्याच काळात हि नागपूरची सुवर्णसंधी का मिळाली ते, आणि मला परत येऊन देखील आज एक महिना झाला तरी देखील मी परत का आले नाही? मला क्षणो क्षणी का सतत नागपूरची आठवण येते आहे, का तिथलीच माणसं डोळ्यासमोर उभी ठाकत आहेत, काय चाललंय नक्की? दुसऱ्या घरात गेल्यावर जरी ते माझंच जुनं घर असलं, तरी शुन्यापासूनच सुरवात आहे, तेथे सहज पुन्हा स्थिरस्थावर होण्याकरता आणि हे राहतं घर सोडून जातांना होणार त्रास पट्टाकिनी शमून जाण्याकरीता "त्याची" हि नागपूरची मांडणी होती तर? असं आहे तर, आत्ता समजलं / उमगलं थोडं फार. कित्ती विचार करावा "त्याने" माझा आणि का? मी कोण हो त्याची, एक साधी मुलगी? बास, नाही का? महत्वाचं व्यक्तिमत्व वगैरे नाहीच. आणि राहतं घर जरी अगदी थोडे वर्ष आमचं होत तरी देखील इथले पक्षी, हवा, झाड झुडपं, माणसं, इथले रुटीन / रोजनिशी आता अंगवळणी पडली होती. ह्याच घरात मला माझे पाय परत मिळाले, जेथे एक पाऊल टाकता येत नव्हतं तेथे चक्क एक जिना सहज चढता येतोय, ह्याच घराने मुलांची १० वी - १२ वी साजरी केली ई.  अर्थात दुसऱ्या घरात एकदा राहायला गेल्यावर होईल तिथली सवय पण लवकरच. पण हे सगळे बदल सहज सोप्पे नाहीतच पचवायला, आत्मसात करायला, अगदी त्याच्यामुळेच तर नागपूर पेरलं मध्ये. किती आणि कशी उतराई होऊ "त्याची" मला खरंच समजत नाही आहे. 

म्हणून ध्यानी - मनी -स्वप्नी नसतांना मला माहेरी पाठवलं, अनपेक्षित लाड झाले, सगळं म्हणजे सगळं आयतं दिलं गेलं, पुन्हा एकदा दररोज पाण्याची बाटली भरून मिळाली न सांगता, गरमा गरम सरप्राईझ आवडते पदार्थ चारीठाव आणि मग नवीन मार्गक्रमणा करायला पाठवलं भरपूर नवीन नाती आणि आठवणींचा साठा घेऊनच. 

मला आठवतंय ह्या क्षणी मी असंख्य वेळा माझ्या विविध विद्यार्थ्यांना, मुलांना आणि बरेच जणांना हे समजावून सांगितलं आहे कि जर तुम्हाला थोडसं जरी वाईट / उदास वाटलं तर प्रयत्न पूर्वक आधी उपभोगलेले अप्रतिम क्षण / सहली / पदार्थ आणि इतर जे परमानंद / ओठांवर हसू देऊन जातं ते आठवा म्हणजे उत्साहाने पुढची कामं सुरु करता येतील. आज मला हे सगळं करायचं आहे सहज / नकळत. 

प्रत्येक क्षण, दिवस, महिने आणि वर्ष मला फुलासारखं जपलं
"त्याने", त्याबद्दल मनापासून शतश: धन्यवाद.

रविवार, ६ फेब्रुवारी, २०२२

पंगतीच महत्व

जगी-स्थळी-पाषाणी असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही अश्या होत्या जेवणाच्या पंगती माझ्या लहानपणी. सतत पंगती, म्हणजे लग्न, मुंजी सारखे समारंभ असो, नाहीतर सण-वार-पुजा, बसायच्या आणि उठायच्या पंगतीच. पंगती शिवाय घराबाहेर / विविध प्रसंगी जेवतात हे माझ्या वयाच्या लहान पण समजुतदार मुलांना ठाऊकच नव्हतं. पंगती म्हणजे पर्वणीच जणू, शिस्त, वेळ पाळणे, सगळेच एकदम बसणार आणि उठणार, वाढपी, वाढण्याची पद्धत आणि बरेच काही. अर्थात शेवटची पंगत थोडी हटके असायची, गंमत जम्मत व्हायची, उरलं सुरलं संपवायचं हे एक टोक नाही तर खास पदार्थांची रेलचेल हे दुसरं. पण काही का असेना, आश्चर्याची गोष्ट म्हणजे पंगत एकत्र सुरु होत असल्यामुळे सगळ्यांची जेवणाची गती बहुतांशी सारखीच असायची, असावी लागायची, उगाच नखरे चालत नसत, किंवा नसतंच कोणाचे. माझ्या दृष्टीने आज मला खात्रीशीर सांगता येईल एखाद्याला जेवतांना बघून, ऐकून कि हा व्यक्ती पंगतीत कधी जेवला आहे का नाही?, पंगतीचा लाभ त्याला मिळाला आहे का नाही? ते, १००%. तोंड उघडं, जेवतांना आवाज, तक्रारी, हाताला चाळे, लक्ष नाही, आनंद नाही, दुसरे आपल्यासोबत बसले आहेत / नाहीत ह्याची गिनती नाहीच, चमच्याने खाणं, उरवणे पानांत, कसंही बसणं, वेळेचं भान नाही ई. आणि असे अनेक लक्षण आहेत माझ्या दुर्ष्टीने. अर्थात ह्या सगळ्याला काही अंशी जडण-घडण, स्वभाव, बेशिस्त ई. पण जबाबदार आहे, पण तरी पंगती चा अभाव हे कारण सगळ्यात अग्रगणी आहे माझ्या दृष्टीने. पंगती त यथेच्छ जेवणाचा असंख्य वेळा उपभोग घेतलेल्यांना हे नक्की ठाऊक असणार कि पंगतीत वाढावं पण लागतं, बहुतांशी मंडळी वया प्रमाणे, जमेल तसं वाढतातच, न सांगता. म्हणूनही हे सगळे चांगले गुण आपोआप रुजले जातातच.

फेस रिडींग वगैरे नाही पण त्या पल्याड व्यक्तिमत्व चा जाता जाता सहज अभ्यास आणि त्याची पंगती शी सांगड घालता येणं शक्य आहे. नोकरीशिवाय व्यक्ती जाणून घ्यायचा असेल तर हा एक पर्याय माझ्या आज डोक्यात आला म्हटलं लिहावं. 

एखाद्याला नकळत पारखायचं असेल तर त्या व्यक्ती सोबत भोजनाचा आनंद घ्या आणि नीट निरीक्षण करा. पट्टकिनी लक्षात येईलच कि काय दडलंय ते, पुढे जायचं कि नाही, आपल्यात काय बदल करावे लागतील आणि बऱ्याच गोष्टी स्फटिकासारख्या स्पष्ट होतील लगेच. बघा मंडळी पंगतीच महत्व. मानलं बुवा ज्यांनी पंगत हि संकल्पना मांडली.  

पायी - सायकल - बस - दुचाकी - ते चारचाकी - ओला ई., पत्रावळीची पंगत - ताटातली पंगत - जमिनीवर बसून पंगत - टेबलावरची पंगत - बुफे ते स्विग्गी ई., ट्रंक कॉल - साधा लँडलाईन - पेजर - मोबाइल - स्मार्टफोन ते स्मार्ट घड्याळ ई. सगळं आनंदाने हाताळलेल्या पिढीचा विजय असो. 

शनिवार, ५ फेब्रुवारी, २०२२

गैरसमज / फालतूचे निष्कर्ष

आपल्याला अनेकदा असं वाटत कि माझ्या हातून चूक, अशक्यच, ह्या जन्मात नाहीच. आणि मी अनेक मोठ्या माणसांना बघितलं आहे स्वतःची चूक अमान्य करतांना. असो, नाण्याची दुसरी बाजू आणि एक दुसरा वर्ग देखील आहे ज्यात माणसं जशी जशी मोठी होतं जातात तशी तशी फार वेलकमिंग, समजूतदार आणि सर्वांना सामावून घेणारी अशी.

एक दिवस एकाच कचेरीत काम करणारी नवरा बायको विविध मार्गाने / गाड्यानें जातांना बघितलं आणि मला वेगळं वाटलं थोडसं विचित्र देखील. आणि मी घरी येऊन त्याबद्दल उहापोह पण केला. मग दुसऱ्या दिवशी कानावर आलं कि त्या सरांचे आई का वडिल म्हणे शेजारच्या इस्पितळात दाखल आहेत. त्यामुळे कदाचित सर गाडीने आधी इस्पितळ मग घर असं करणार असतील आणि मॅडम थेट घरी. मला हि पार्श्वभूमी अजिबातच ठाऊक नव्हती, तरी पण मला काहीही अधिकार नाही त्यांच्या बद्दल उगाच काही विचार करण्याचा. मला फार म्हणजे फार वाईट वाटलं. मी फार कमी वेळा दुसऱ्यांच्या फंदात पडते, नाहीच बहुतांशी, पण ह्यांच्या बद्दल का झालं हे समजलं नाही. असो. मी मनापासून त्यांची क्षमा मागितली आणि पुढे असं होऊ द्यायचं नाही असं स्वतःला सांगितलं आणि विषय संपवला.  

फालतूचे निष्कर्ष कधीही काढू नयेत, ज्या मुळे आपल्या ज्ञानात भर पडत नाही त्या कडे फिरकू नयेच. उगाच ढवळा ढवळ, दुसऱ्यांबद्दल बोलणं टाळावेच, किंबहुना मनात विचारच येऊ देऊ नये म्हणजे पुढचं सगळं थांबेल आपोआप.

आवडती / नावडती

प्रत्येकाचीच एक आपली अशी आवड निवड असते, मुख्यत्वे काम करण्याच्या क्षेत्राची आणि त्यामुळेच कदाचित शिक्षण क्षेत्राची सुद्धा. प्रत्येकालाच त्याला आवडेल त्या क्षेत्रात शिकायला आणि काम करायला मिळतंच असं नाही. किंबहुना बहुतांशी मिळत नाहीच, आपण नावडत्या किंवा अनोळखी क्षेत्रात सुरवात करतो आणि हळू हळू न कळत कधी ते क्षेत्र आवडायला लागत ते समजत देखील नाही, बरेचदा, किंबहुना खूप जणांना ते आवडून घ्यावं लागतं कारण कदाचित त्या वेळी दुसरा पर्यायच नसतो. किंवा ज्या पद्धतीने शिक्षणाच्या संधी उपलब्ध होतात, काही वाचण्यात येत, ऐकण्यात येत,  त्यामुळे त्या क्षेत्रात काम सुरु होत आणि अनेक वर्ष केलं जातं सातत्याने.

आता माझंच बघा नं, का कुणास ठाऊक अगदी लहानपणी पासून मैत्रिणी, आजूबाजूचं वातावरण, ते दिवस ई. मुळे असेल कदाचित पण स्वयंपाकाची फार आवड निर्माण झाली. खूप आनंदाने आणि मोठ्या प्रमाणात वैविध्य पदार्थ मी कधी करायला सुरवात केली माझं मलाच समजलं नाही. मी नेहेमी आईला म्हणायचे कि मला फक्त दहावी करायचं आहे, पुढे काही नक्को. मला खूप आवडेल रोज घरी सर्वांसाठी स्वयंपाक / पदार्थ करायला. पण कुठे काय, मी फार थोडा वेळ घालवते स्वयंपाक घरात आणि विद्यावाचस्पती पर्यंत मजल-दरमजल करत गेले, कुठे दहावीला थांबण्याची इच्छा आणि कुठे पीचडी. माझं मलाच कधी कधी फार आश्चर्य वाटत ह्याच कि मला अजिबातच लिहायला आवडत नव्हतं, म्हणजे मी खूप रागवून घेतलं आहे ह्या करता. हां, शाळेत / परीक्षेत निबंध, किंवा अगदी अत्यावश्यक एवढंच मी लिहीत असे, कामापुरता मामा. आणि आता बघा, क्षणभर विश्रांती घ्यायची इच्छा होत नाही, कसं का असेना पण टिपावंसं वाटतंच.

दुसरं पण उदाहरण माझ्याच घरातलं, माझी सावली, माझी लेक, साधारणतः दहावी / अकरावीत कोणी विचारलंच कि पुढे काय करणार आहे, तर म्हणायची कशी "काय करणार नाही हे मला पक्के माहित आहे, मला काहीही झालं तरी इंजिनीरिंग आणि त्यातनं संगणक च इंजिनिअर नाही व्हायचं". आणि आता? मॅडम तेच करत आहेत. काय म्हणायचं ह्याला कोणास ठाऊक. असो.

सांगण्याचं तात्पर्य असं कि मला मनापासून गृहिणी व्हायचं होत, फक्त घर उत्साहाने सांभाळायचं होतं आणि मी तितकीच सतत घराबाहेर राहिले कित्येक वर्ष. आवडीचंच क्षेत्र / माणसं / नोकरी / मित्रपरिवार / घर / शेजारी ई. मिळालं तर सोन्याहून पिवळं, पण काही कारणास्तव नाही मिळालं तर काही हरकत नाहीच. माझ्या अनुभवा वरून सांगते थोडे दिवस त्या क्षेत्रात सरले कि आपोआप मनापासून आवडायला लागतं, आपलंस होतंच. मिळालंय ते तुमच्याच साठी आहे, तुमच्या भल्यासाठी आहे, तुमच्या योग्यतेच आहे ह्यावर विश्वास ठेवाच. "श्रद्धा आणि सबुरी" ठेवा म्हणजे मार्गक्रमणा चालू राहिल च.

शुक्रवार, ४ फेब्रुवारी, २०२२

विश्वास / एकाच्या विचाराचं

अनेकदा माझ्या लिखाणात आलं आहे आज पर्यंत असंख्य वेळा कि "माझे बाबा म्हणजे एक अक्षरश: विद्यापीठ होते". ते फारच सोप्पे आणि साधे वाक्य / शब्द / क्लुप्त्या ई. सहज सांगून जायचे. त्यातलच एक ज्वलंत उदाहरण म्हणजे बाबा नेहेमी सांगायचे कि "घरात शांतता हवी असल्यास एकाच्या विचारानं चालावं, आणि नेहेमीच. विचारलं तरच सल्ला द्यावा". हे वाक्य माझ्यात इतकं भिनलं आहे ना, आधी मला नव्हतं प्रॅक्टिकली नव्हतं जमत पण आता अगदी मनापासून आणि न-कळत जमतंय, शिस्तीत आणि त्याची फळं मला चाखायला मिळताहेत. का आणि कसं झालं हे मला माहित नाही, मला त्यात पडायचं पण नाही, पण जे झालं ते खूप च शांतपणे झालं, आनंदात आणि समाधानाने झालं ह्यात वादच नाही. विश्वास होताच, पण तो प्रत्यक्षात उतरला आणि काम अगदी एकाच्या डोक्याने पट्टाकिनी झालं. ते म्हणतात ना "मोर कूक स्पॉईल द फूड", तस्स काहीस.

माझी बदली झाली होती ५ महिन्यांकरिता. त्याच वेळी राहत्या घराचा विक्रीचा व्यवहार झाला आणि तो होणं अत्यावश्यकच होत मुलाच्या फीची सोय झाली. त्यामुळे आम्हाला आमच्या जुन्या घरात राहायला जाणं आलं. ते अनेक वर्ष भाड्याने देण्यात आलं होत, जुनं झालं होत, त्यामुळे डागडुजी करणं फारच महत्वाचं होत. माझ्या ह्यांनी उचलला विडा आणि लागले कामाला. मी एक गड आणि ते दुसरा सांभाळत सुरु झाली कामं दोन्ही एकदम. संपूर्ण घराचं काम त्यांच्या इच्छे प्रमाणे, त्यांना हवं तस्स, अगदी त्यांच्या आवडीचं सुरु झालं. आणि हो त्यांची आवड सर्वांना माहित आहेच, नाही का?. हो बरोबर ओळखतलं. तर आज आता जवळपास काम संपत आलं आहे. सकाळी हे म्हणतात कसे कि ज्याने आमच्या घरचं काम केलं तो म्हणतो कसा "मॅडम अधेमधे आल्याचं नाहीत, हे जगावेगळं आहे हो, खरं तर हे उलट असतं. मी इतकी वर्ष ह्या व्यवसायात आहे, असं मी कधीच नाही बघितले". अहाहा मला इतका आनंद झाला म्हणून सांगते, मी कधी नव्हे ते पोटभर अगदी आनंदात रमत हासले. अहो आयतं घर मिळतं आहे ह्या पेक्षा अजून काय हवंय मला, जबरदस्तच. माझ्या डोक्याने केलं असतं तरी देखील ते मलाच सांभाळायचं असतं, आता देखील मीच राणी, नाही का? मग... घराला घरपण देण्याचा प्रयन्त अजून मनापासून होणार आता ह्यात काहीच दुमत नाही. पण माझी ढवळाढवळ नसल्यामुळे आणि कटकट कदाचित म्हणता येईल त्यामुळे कामाला वेग आला, कुठलाही गोंधळ न होता. आमच्यातला हा बदल वाखाणण्यासारखा आहे, आमच्यासाठी. अलिप्त राहता आलं, भन्नाट. आवडलं फार मला, त्या डिझाईनर ला देखील.  

"कभी कुछ ना कर के भी देखो..." हि अशी कॅडबरी ५-स्टार ची जाहिरात आहे, अगदी त्याचं काटेकोर पालन मी केलं घराच्या पुनः निर्माणाच्या वेळी आणि बहुतांशी त्या नंतर नेहेमीच. गरज असेल तेव्हाच माझी बहुमूल्य ऊर्जा मी खर्चते. कारण माझं असं ठाम मत आहे कि "काहीही न करणं / शांत राहणं / अधेमधे न करणं" देखील खूप महत्वाचं आणि उपयोगी आहे, ती एक फार मोठी मदत आहे. त्यामुळे मंडळी "उचलली जीभ आणि लावली टाळ्याला" अस्स अजिबातच करू नका कधीच. आपल्यापुरतं बघा, जेथे आवश्यक आहे तेथे मदतीचा हात द्या, अत्यानंदाने जगा आणि परमानंदाची अनुभूती घ्या, सदोदित.

गुरुवार, ३ फेब्रुवारी, २०२२

खळबळाट

एक आटपाट नगर होतं / आहे हो, अर्थात २०२२ मधे. त्या नगरात एक सुंदर चौकोनी कुटुंब राहतं, त्यात आई बाबा आणि दोन मुलं. एक महाविद्यालयाच्या शेवटच्या वर्षात आणि हो नोकरी खिशात असलेला आणि दुसरा पहिल्या वर्षाचा विद्यार्थी. दोघेही मोठे, समजूतदार, आई बाबा अर्थातच ऑफिस ला जाणारे आणि प्रचंड व्यग्र कामात. अगदी सुरवातीपासूनच आई नोकरी करणारी आणि मोठ्या कंपनीत मोठ्या हुद्यावर त्यामुळे दोन्ही मुलांना घर कामाची, वाण सामान आणण्याची, निर्णय घ्यायची, आवाक्यात पण पैसे खर्च करण्याची सवय, थोडक्यात म्हणजे घराला /आईला मदत सतत मिळाली आहे मुलांकडून. आता ते कुटुंब एका भल्यामोठ्या घरात जाणार आहेत राहायला, नवीन घेतलंय सर्वानुमते. सध्या सर्व सामान / घर सगळं इतस्त्तः पडलंय आणि ते अर्थात होणारच. कारण चौघांपैकी कोणालाच खूप वेळ नाही पण जेवढा केवढा वेळ आहे त्यातून ते आवरासावर करत आहेत. ह्या सगळ्या घोळत घरी काम करणाऱ्या मावशी जर समजलं नाही कि काय / कुठलं सामान टाकून द्यायचं, कुठलं घेऊन जायचं, कुठलं ठेवायचं ई. म्हणून सध्या राहू देत आहेत जैसे थे, आणि आई कुठे कुठे बघणार म्हणून पसारा चालतोय सध्या सर्वत्र. त्यात काही दिवसांपूर्वी हे सगळं कमी होत म्हणून काय पण आईला नवीन किटाणू ने त्रास दिला आणि ८-१० दिवस घरी दार दडपून जबरदस्ती कोंडून घ्यावं लागलंच. त्या तुरुंगातून बाहेर आल्यावर तिला मुलांच्या चेहेऱ्यावर जरा गंभीरता दिसली आणि ती जवळपास ३-४ दिवस टिकली. ती हैराण पण कामाचा डोंगर इतका होता कि त्याकडे तिचं सहज न-कळत दुर्लक्ष झालं. पण सरते शेवटी दोन टप्प्यात उलगडा झाला, एक म्हणजे घरी म्हणे प्रेग्नन्सी किट सापडली. तिला वाटलं घरी सतत लोकांचं येणं-जाणं-राहणं सुरूच असतं, त्यामुळे असेल कोणाची तरी, राहून गेली असेल, त्यात काय, आजकाल कॉमन आहे फार. आता सगळं सामान बाहेर येतं आहे त्यामुळे असेल. तिच्या साठी तो विषय संपला होता. पण मग धाकट्याने का कुणास ठाऊक नंतर सांगितलं कि "आई अगं काय बघतोय आम्ही सगळे, वापरलेली किट बघून आमच्या पायाखालची जमीन सरकली, आता काय हे नवीन, कसं होणार, का? आणि असे असंख्य प्रश्न आमच्या दोघांच्या डोळ्यासमोर आले. ३-४ दिवस इतके भयानक गेले. आणि अशी वापरलेली का टाकलीस उघड्यावर?" आणि नंतर तोच सांगतो कसा "अगं ती तुझ्या करोना ची टेस्ट केली ना, त्याची किट होती, नीट बघितलं तेव्हा उलगडा झाला". 

बाप रे. काय हे? अगदी "बधाई हो" सिनेमाची आठवण झालीच हा किस्सा ऐकून.

किट तय्यार करणाऱ्यांनी पण कॉपी करावी पण इतकी हुबेहूब कि काहींच्या घरात त्यामुळे खळबळ माजते / भूकंप येतो आणि बरेच काही. काय हे, काही तरी वेगळं आता तरी करा मंडळी,
दोन्ही किट वेगळ्याच दिसायलाच हव्या, रंग रूप आकार सगळं म्हणजे सगळं संपूर्णच वेगळं हवं, प्लिज, अहो वेळ गेली नाही, अजून काही घरात स्फोट व्हायच्या आत.

पेड - अनपेड

अगदी सुरवाती पासून जेव्हा मी पैसे हाताळणं सुरु केलं तेव्हा पासून कधीच म्हणजे कधीच कोणाचे पैसे द्यायचे राहिले नाहीत, अगदी वेळेवर दिले / दिले गेलेत. उदाहरण सांगायचं झालं तर आताशा तर टॅक्सी वापरली कि ताबडतोब पैसे द्यावेच लागतात, बहुतांशी जर सेटिंग केलं असेल तर तुमच्या खात्यातून परस्पर दिले जातात  किंवा कंपनीला. ह्या संदर्भात मला सध्या सारखे फोन / मेल यायला लागले कि तुमचं बिल due = देय आहे ते लवकरात लवकर चुकतं करा. मी अवाक, म्हटलं हे कसं शक्य आहे. आणि जी किंमत त्या बिलाची होती त्या किमतीची टॅक्सी मी कधी वापरलीच नाही. म्हटलं हे काय अनपेड प्रकरण नवं.

अनपेड ह्या साध्या संज्ञा वरुन आठवलं कि आपण कोणाकोणाचं आणि काय काय देऊ करतो, फक्त पैश्या बद्दलचीच देवाण घेवाण असते का? उदाहरणार्थ वैविध्य प्रकारच्या झाडाझुडपांकडून आपण काय काय घेत असतो ते रिपे = Repay करतो का? मग फक्त घ्यायचं का? द्यायचं केव्हा? कधी? कसं? विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना? ह्याचा अर्थ असा नाही कि उद्याच हातात कुदळ घ्या आणि लागा कामाला, अजिबातच नाही, पण

  • शेतकरी आणि त्याचं कुटुंब जे कष्ट करतात त्याची जाणीव असू द्या
  • अन्न वाया जाऊ देऊ नका
  • झाडं जगवा / वाढवा / लावा
  • आपल्या एका मुळे पर्यावरण / निसर्ग ह्यांना हानी पोचणार नाही हे बघा


एकंदरीत काय तर हिशोब नेहमी क्लिअर ठेवा, मग तो फक्त खाण्यापिण्याशीच संबंधित नाही किंवा फक्त वातावरणाशी नाही, सख्य असो, नाते, मित्र मैत्रिणी, शेजारी-पाजारी आणि बाकी सर्वच पशु, पक्षी, झाडं, फुल, पानं, निर्जीव वस्तू देखील मंडळी. आपण सर्वांचंच देणं लागतो, हे नेहेमी लक्षात ठेवा.  आधुनिकीकरण हवं म्हणजे वातावरणाचा समतोल राखूनच, उध्वस्त करून नाही. जरी पेड-अनपेड हे इंग्लिश भाषेतले शब्द असतील तरी देखील पेड हा मी हिंदीतला एक शब्द धरून जे सुचलं ते मांडलं. 

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...