माझे पाय शाबूत होते तेव्हा देखील मला मॉल मधे फिरतांना शरतेशेवटी पाय दुखायला लागायचेच. मग मी कुठेतरी टेकण्यासाठी जागा शोधायची नेहेमीच. इतके मोठे असतात मॉल, जोश आणि उत्साह इतका असतो, वैविध्यता असते कि त्या नादात खूप पायपीट होतेच. त्या दिवसांत माझी आणि माझ्या सारख्या असंख्य इतर लोकांबद्दल कोणी तरी संशोधन, विचारविनिमय केलेला दिसतोय, प्रकर्षाने. कारण सध्या बऱ्याच ठिकाणी मॉल मधे विविध प्रकारच्या, आकाराच्या, खुर्च्या किंवा खुर्च्यांसारखे काही तरी ठेवले असते, खूप जणांची आणि माझी प्रचंड सोय होते.
आमच्या कॉलेज मधे एक भलामोठं सभागृह आहे, अनेक वर्षांपूर्वी बांधलेलं. त्याचे आता कायापालट झाले आहे. त्या दरम्यान सभागृहातले बेंचेस बाहेर काढले आणि नवीन खुर्च्या मांडल्या त्या ऐवजी. ते बाहेर काढलेले बेंचेस मग संपूर्ण मजल्यावर इकडे तिकडे मांडले आहेत सध्या. माझी काय सोय झाली म्हणून सांगते. मनात आलं टेकायचं कि भन्नाट खुर्ची नव्हे तर अख्खा बेंचच तय्यार, सर्वत्र, हवं तिथे, प्रत्येक मजल्यावर. बघा "त्याला" माझी,माझ्या पायांची कित्ती म्हणजे कित्ती काळजी, तो अगदी बारीक लक्ष ठेवून तर आहेच शिवाय मनापासून जोपासना देखील करतो आहे. उठत बसत का होईना काम होणं महत्वाचं, नाही का? इतकी वर्ष उभं राहून, धावत-पळत कामं केलीत, आता ह्या पद्धतीने सुरु आहेत, किती विविधता लाभली आहे बघा मला. माझ्या सारखी भाग्यवान मीच हो, "त्याच्या" प्रत्येक लेकराकडे तर त्याची कृपादुर्ष्टी असतेच पण माझ्यावर जरा किंचित जास्त आहे हे निश्चित. मॉल मधे, ऑफिस मधे फक्त खुर्च्या मांडल्या असं नाही तर जणू काही त्या फक्त आणि फक्त माझ्याच साठी ठेवल्या आहेत सर्वत्र. "त्याने" कित्ती जणांना हे अमलात आणण्यासाठी सुबुद्धी दिली ते बघा हो. आई गं. "शब्दावाचून कळले सारे शब्दांच्या पलीकडले". "तो" आहे आणि त्याची कृपादुर्ष्टी सातत्याने आहे हे नक्की ध्यानात ठेवा आणि पुढील मार्गक्रमणा करा.