शुक्रवार, १८ फेब्रुवारी, २०२२

प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मैत्र्य

स्पर्श हा फक्त एक भल्यामोठ्या शब्दकोशाचाच भाग नाही तर वैविध्य प्रकारे तो अनुभवून वृद्धिंगत होण्यासाठी आहे. तो प्रत्यक्ष असो व अप्रत्यक्ष, सजीव का निर्जीव व्यक्ती, प्रसंग किंवा वस्तूंमुळे अनुभवता आलेला असो. एखाद्याचा फक्त आवाज मनाला भिडतो, सहज वाऱ्याची झुळूक एक वेगळाच स्पर्श देऊन जाते, अगदी कधी काटे येतात अंगावर, झाडावर आनंदाने डोलणाऱ्या आंब्याच्या मोहोराचा जगावेगळा सुगंध देखील वेगळ्या पद्धतीचा स्पर्श देऊन जातो. अकाली जन्मलेल्या बाळांना जशी कांगारू उपचार पद्धत सुचवली जाते, ते स्पर्शाची महती जाणूनच ना.

मला दोन प्रकारची माणसं असतात हे जेव्हा ज्ञात झालं तेव्हा का कुणास ठाऊक पण स्पर्शाबद्दल थोडसं जास्त उमगलं. एक प्रकार म्हणजे जो समोरच्याचा, मित्राचा, मैत्रिणीचा, घरच्यांचा, थोडक्यात म्हणजे आपल्या लोकांचा चेहेरा सहज वाचतो आणि उगाच प्रश्न विचारून भंडावून न टाकता कृती करतो आणि दुसरा कृती न करता प्रश्न विचारण्यास प्राधान्य देतो. समोरच्याकडे बघून थोडक्यात लक्षात आलं कि काही तरी गडबड आहे आणि जो हात हातात घेतो, पाठीवर एक छोटीशी थाप देतो, पाठीवरून हात फिरवतो, जादू की झप्पी देतो त्याचा प्रचंड फायदा होतो आणि परिणाम दिसतो - टिकतो देखील. अगदी तसेच आवाजाचे देखील आहे, समोर व्यक्ती नसेल तर आवाज ऐकल्यावर देखील अंदाज येतो आणि मग काही गोड बोल, प्रेमाने गुंफलेले चार शब्द, काही आठवणी, उत्साह वाढवणारं एखादं वाक्य देखील पुरेसं ठरत.  
 
कोणी तुमच्या पुढ्यात प्रत्यक्ष असतं आधार द्यायला बऱ्याच वेळा तर कोणाचा आवाज फक्त उपलब्ध असतो (दूर देशात असलेले मित्र), काही डोळ्याने जाणीव करून देतात आणि काही एक्सप्रेस करत नाहीत पण माहित असतं कि ते आहेत, किंवा काही कधी प्रत्यक्ष / फोन वर आणि हवे तेव्हा हजर असतात. अश्या वैविध्यतेने नटलेला आपला प्रवास असतो. कायम / शाश्वत आणि टिकाऊ असं काहीच नसतं तरी देखील आपण अपेक्षेवर जगतो कि हे सगळे आपले साथी आणि आपल्यासाठी नेहेमीकरता असणारच आहेत. प्रत्येकाला मात्र फक्त माणसाचीच गरज असते, कधी शारीरिक व्याधी म्हणून कधी मानसिक आधार हवा असतो तर कधी उगाच एखाद्याचा सहवास हवा असतो. पाषाण हृदयी फारच कमी असतात, अगदी बोटावर मोजण्या इतके किंवा काही नसतात खरं पण दिखावा करतात. मोकळे व्हा, स्वछंद जगा, स्वतः हवा तेव्हा मैत्रीचा आधार घ्या आणि दुसऱ्यांना द्या / उपलब्ध व्हा, मोजमाप न करता. आणि मग बघा "गिव्ह अँड टेक" ह्या म्हणीचा अर्थ काय आहे तो / किंबहुना हि म्हण जन्मालाच का आली ते.

३ टिप्पण्या:

  1. अतीशय सुंदर लेख. असेच दर्जेदार लेखन वाचकांना आयुष्याची दिशा ठरविण्यात महत्त्वाची भूमिका बजावते.मनाला भावणारा लेखन प्रपंच.लेखिकेचे मनापासून धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा.

    उत्तर द्याहटवा

२४६४: तळ गाठणे

आमच्या सोसायटीत चार बोरवेल आहेत. त्यापैकी दोन चालत नाहीत, एक चालू आहे, आणि चौथ्याबद्दल मला फारशी माहिती नाही. त्या बोरवेल खोदताना मोठमोठ्या ...