मंगळवार, ५ एप्रिल, २०२२

श्रेय

खूप वर्षांपासून मी फेसबुक वर अधेमधे लिहीत असायचे पण काही ओळीच. पण त्यानंतर सप्टेंबर २०१८ पासून जास्त जोमाने,जोशाने माझ्या हातून लिहिलं गेलं. हळूहळू स्वानुभवांची प्रचिती येत गेली आणि मला सुचेल तसं मी टिपत गेले. २०१३,१४,१५ ची जी स्नातकोत्तर पदवी घेणारी मुलांची बॅच होती त्यात त्या मुलांना प्रकर्षाने जाणवलं कि माझ्या हातून व्यवस्थित प्रत्यक्ष आयुष्यातल्या घटना किंवा गरजा तांत्रिक शिक्षणाशी सांगड घातली जाते आहे. त्यामुळे लिखाणात पण नकळत तात्पर्य येत राहील बरेचदा. फेसबुक वरच आधी लिखाण होत असल्यामुळे मित्र मैत्रिणी त्यांचे अभिप्राय कळवायचे. त्यानंतर मग मी ब्लॉगर, ट्विटर आणि अधेमधे LinkedIn वर पण लिहिलेलं प्रकाशित करायला लागले. मोठा वाचक वर्ग मिळणं किंवा त्यासाठी थांबून राहणं हे माझं ध्येय नव्हतंच आणि असा विसावा घ्यावा इतका वेळ देखील नव्हता, नाही. फेसबुक वर माझ्या ऑफिस च्या अत्यंत प्रिय अश्या मैत्रिणी आहेत काही आणि माझं लिखाण मराठीतून, त्यामुळे त्या नेहेमी मला प्रोत्साहित करायच्या कि इंग्लिश मधे देखील लिहीत जा आणि तो प्रयन्त मी थोडाफार केला पण होता. त्यांचं प्रोत्साहन अगदी वाखाणण्यासारखंच आहे.

माझ्या वाचक वर्गात काही खूप छान अभिप्राय देणाऱ्या माझ्या शेजारणी आहेत, ज्या वयाने, मानाने जेष्ठ आणि श्रेष्ठ आहेत, पण तरीदेखील वाचतात नियमित पणे आणि सूचना देखील करतात, त्यामुळे अजून भन्नाट वाटतं लिहायला पुढे.

"खुपच छान लिहितेस प्रीती तू..." असंच नेहेमी त्यांच्या स्पेशल स्टाईल मधे म्हणणाऱ्या एक नागपूरच्या माझ्या काकू आहेत, आमच्या जुन्या शेजारी. खूप आवडीने त्या वाचतात जे काही मी टिपलं असतं ते, त्यामुळे पण पुढील शब्द पेरले जातात आपोआप.

माझा भला मोठा शाळेचा मित्रपरिवार देखील मला अनेकदा त्यांचे विचार सांगत असतात, माझ्या लिखाणावर उत्तर देत असतात, लाईक करत असतात, त्यामुळे देखील पुढची मार्गक्रमणा सुकर होते.

सध्या माझ्या लेकीला वेळ नाही म्हणून, नाहीतर अगदी बारकाईने लक्ष देऊन वाचते हो. अहाहा च. ती तर माझी सखी, दिशादर्शक, मार्गदर्शक, क्रिटिक आणि मला समजणारी वाचक आहे त्यामुळे ती देखील मला अनेक विषय सुचवत असते.

सगळ्यात नित्य नियमाने मराठी फारसं येत नसतांना वाचणारे म्हणजे माझे चुलत सासरे. ते प्रत्येक लेखाला / गोष्टीला / लिखाणाला अभिप्राय देतात,लाईक करतात ई.

अधेमधे अनेक जण मी लिंक पाठवली तर वाचतात आणि त्यांचे विचार कळवतात, त्यावर आधारित सुधारणा करता येतेच निश्चितच.

माझे PhD चे विद्यार्थी पण मस्त गप्पा मारून विशेष टिप्पणी देतात, वैविध्य प्रकारे कसं लिहिता येईल हे सांगतात, ऐकून घेतात आणि आवडीने वाचून अनेक नवीन विषय सुचवतात देखील.

लिंक पाठवली रे पाठवली कि वाचणारे आणि न चुकता अभिप्राय लिहून कळवणारे माझे ब्रो. आणि काही दिवस जर लिंक नाही पाठवली तर आवर्जून आठवण करून देणारे देखील तेच. किती म्हणजे कित्ती आवड ती, छोटसं काहीतरी लिहिलेलं वाचण्याची. साष्टांग दंडवत च त्यांना.

एका प्रथितयश कंपनीचे तरुण मालक ज्यांनी अनेक अनुकथा चाळून, काय आणि कसं लिहिलं आहे हे अभ्यासून मग माझ्याशी भेटण्याचे नुसते ठरवले नाही, तर स्वतः आले, आणि रिकाम्या हाताने नाही तर माझ्या साठी एक अमूल्य अशी भेट वस्तू घेऊन. तब्बल २-३ तास दिले मला गप्पा मारल्या, सगळं लिहाणामागचं कारण समजावून घेतलं आणि सातत्याने प्रोत्साहित केलं मला १००० अनुकथा लिहायला.

माझे पाय, मला आपोआप सुचणारे शब्द, नजरेस पडणारे विषय, माझे हात जे हे सगळं बिनबोभाट टाईप करतात, डोळे जे मला साथ देतात ह्या सगळ्यात, मोबाईल जो विषय डोक्यात आल्या आल्या सर्वप्रथम ऐकतो किंवा नोट्स सेव्ह करून ठेवतो, माझा बस स्टॉप, आणि बरेच जणं ज्यांनी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष पणे मला लिहायला मदत केली आहे त्या सर्वांना माझा शिरसाष्टांग नमस्कार आणि मनापासून धन्यवाद. आज ह्या सर्वांमुळे माझ्या हातून १००० अनुकथेचा / अनुकथा लिहिण्याचा टप्पा गाठता आला. ह्या सगळ्यांशिवाय हे अशक्य होतं. ह्या पुढे अजून किती लिहायचं आहे, लिहिलं जाणार आहे, वाचक वर्ग मिळणार का नाही, त्यांना उपयोगी पडणार का नाही हे लिहिलेलं हे आणि असे सगळे प्रश्न मला कधीच शिवत नाहीत, "त्याच्या" कृपेने. मी फक्त आज्ञाधारक, "तो" सुचवतो, शक्ती देतो, गती देतो आणि लिहलं जातं. "त्याला" पण नेहेमीच लोटांगण, मला ह्या कामाकरता निवडलंस म्हणून. पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद.   

सरतेशेवटी माझ्या कथेची पात्रं म्हणजे विविध प्रसंग, माणसं ओळखीची आणि अनोळखी देखील, चार पायांचे मित्र, झाडं फुलं, पानं, गाड्या, रस्ते, स्वभाव, कृती, ऋतू, आणि बरेच जणं, ज्या सगळ्यांमुळे ह्या कथा जन्माला आल्या त्यांना विसरून चालणारच नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

२४६४: तळ गाठणे

आमच्या सोसायटीत चार बोरवेल आहेत. त्यापैकी दोन चालत नाहीत, एक चालू आहे, आणि चौथ्याबद्दल मला फारशी माहिती नाही. त्या बोरवेल खोदताना मोठमोठ्या ...