"अगं कित्ती वाट पहिली मी ह्या क्षणाची माहिती आहे, अधीर झाले होते मी. कधी एकदा पुन्हा एकदा माझे पाय जमिनीवर लागतात / पळतात असं झालं होतं. नुसतं एका जागी पडून पडून वैताग आला होता. ते आवाज, ते स्पर्श, तो कलकलाट, ते ठराविक वेळी निघणं-येणं परत, ती रोजनिशी, ते ठराविक दिवशी पंपावर जाणं आणि तो अनोखा सुगंध अनुभवणं, ते प्रेम ती माया, क्वचित कधीतरी माझं रुसणं, ती ठराविक वेळी होणारी स्वच्छता, ते एकमेकांशी खेटून उभं राहायचं, वाट बघायची, अहाहा च. कित्ती बोलू आणि कित्ती नाही असं झालयं मला आज. मी कुठल्यातरी दुसऱ्या दुनियेत तर नाही ना असा भास होतोय, ओरडावंसं वाटतंय, धावावंस वाटतंय आणि काय काय करू काय काय नाही हेच समजत नाही आहे आज. सरते शेवटी अनपेक्षित पण तो दिवस आलाच. ती पिटुकली पाउलं, ते बोल, सगळं अनुभवायला मिळालं, खूप खूप वाट बघितल्यावर. पण हे वाट बघण्याचं खूप गोड फळ मिळालं, मला, माझ्या सख्यांना, आणि सर्वानांच. आज कदाचित शेगडी कशी पेटणार, किती दिवस पेटणार असे कुठलेही प्रश्न आता कोणाच्याही मनात येत नाही आहेत. सगळेच आनंदी आहेत. धन्यवाद सर्वांनाच."
असं काहीसं मनोगत आज कानावर आलं माझ्या, कारण अनेक शाळांसमोर खूप उत्साहात सगळ्या पिवळ्या राण्या उभ्या होत्या दिमाखात, खूप महिन्यांनी.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा