रविवार, ३ जुलै, २०२२

समजावून सांगणे

सहज गम्मत म्हणून सांगते दोन देशातली धमाल. मुलांना एखादी गोष्ट कशी समजावून सांगितली जाते ह्या बद्दल. अजिबात कुठलीही तुलना वगैरे नाहीच, किंवा हे बरोबर ते चूक हे दर्शविण्याचा तर उद्देश अजिबातच नाही. पण मी दोन्ही बाजू अनुभवल्या म्हणून म्हटलं लिहावं.

तर लहान मुलांना किंवा किंबहुना कोणालाही समजावून सांगायचं असल्यास, किंवा एखादी गोष्ट करू नका हे सांगायचं असेल तर इथे म्हणजे भारतात थोडासा रागवण्याचा पवित्रा असतो, नकळत म्हणा किंवा मी कसा मोठा हे सांगण्याची लागलेली सवय म्हणावं त्यामुळे. आणि तेवढं सांगून थांबले तर ते मोठे भारतीय कसले? नाही का? त्यानंतर मोठी गोष्ट पेरली जाते, मी कसा बरोबर हे दर्शवले जाते, ई. परिणाम म्हणजे बहुतेक सगळेच, लहान मुलं ती गोष्ट नक्की करून बघतातच. आणि सरते शेवटी कदाचित समस्या / अडचण उद्भवू शकते. असो.

त्या विरुद्ध अमेरिकेतल्या माझ्या वास्तव्यात माझ्या हे लक्षात आलं कि मुलांनी एखादा प्रश्न विचारला कि पहिल्यांदा मध पेरला जातो, अगदी गोड शब्दात सांगितलं जात कि ह्या ऐवजी ते केलंस किंवा अश्या पद्धतीने केलंस तर जास्त सोईस्कर होईल. बास. काही थोडके शब्द मुलाचे आणि त्याहून थोडे पालकांचे.

हि झाली दोन टोकं. तुम्ही संशोधक असला, शिक्षक किंवा कुठल्याही व्यवसायात, बहुतांशी दरदिवशी किंवा नेहेमीच एक तर अहवाल / लेख लिहावा लागतो आणि त्यातून एक अत्यावश्यक किंवा साजेशी गोष्ट उभी करावी लागतेच. ती उभी करतांना जर वाचक दुसऱ्या देशाचा असला तर त्याला साजेशी ती कथा मांडता यायला हवी. त्या करता थोडासा त्या देशातील वाचकांचा समीक्षक / परीक्षक ह्यांचा अभ्यास करायलाच पाहिजे. म्हणजे परिणाम हवे ते साधता येतील आणि विजय निश्चित होईल ह्यात शंकाच नाही. त्यामुळे ह्या पुढे कोणासाठी लिहीत आहात, कुठल्या देशातील अनुदान मिळण्यासाठी अर्ज करत आहेत हे अभ्यासपूर्वक जाणून घेणं अत्यावश्यकच. चला तर मग सगळे आपल्या माहितीत वाढ करून घेऊ या आणि मस्त आनंदांत / आनंदाने कार्य करू या.

वेगळ्या धाटणीतले असे काही

जवळपास सगळ्याच अत्याधुनिक कचेरीत सध्या काचेच्या केबिन्स असतात, त्याची कारणे अनेक आहेत, जी सर्वश्रुत आहेत. ऑफिस मधे शेजारी शेजारी किंवा आजुबाजुला मांडण्यात आलेल्या अश्या देखील केबिन्स असतात. जागेची बचत, पद्धत, एकमेकांच्या साथीने येणारा कामाचा हुरूप, सुरक्षितता ई. अनेक कारणांमुळे बांधल्या गेलेल्या.

पण, किंतु, परंतु अनेकदा त्या काचेवर प्लास्टिक वजा घटक वापरून साधा, अनलंकृत, असा कागद चिटकवला जातो.

का?

हा भला मोठा अनुत्तरीत प्रश्न आहे माझ्या समोर.

दोन आजुबाजुच्या केबिन मधे एक काच असते. त्या काचेला ह्या बाजूने किंवा त्या बाजूने जर तो अपारदर्शी प्लास्टिक तत्सम कागद चिटकवला तर चालतं कि, दोन्ही बाजूने का लावायचा? उगाचचं तो कागद वाया, वेळ, मेहेनत वाया आणि दोन्ही बाजूचे चिटकवलेले कागद सांभाळायची जबाबदारी ती वेगळीच. माझ्या हे सर्व आकलना बाहेरच आहे, त्यामुळे मी ह्यात न पडलेलंच बरं. पण त्यामुळे सहज लक्षात आलं कि कचेरीत आल्यावर हे विसरून चालणार नाही कि आपण घरात नाही आहोत, त्यामुळे काचाच बऱ्या, पारदर्शकताच आवश्यक. ह्या संगणक युगात तसेही आपण स्वतःला कधीच अर्पण केलं आहे जगाला. सगळ्या सोशल मीडिया या आपल्या सर्वांबद्दल इतकं जास्त माहिती आहे कि स्वतःला माहित नसेल एवढं. मग हा आटापिटा का?

झाकायचंच अशी जर ऑफीसा ची योजना / धोरण असेल तर तेथे बसणाऱ्या व्यक्तीला प्रेरित करा आणि सुचवा कि तुम्ही पुढील एका वर्षात हि काच भरेल इतकं सुंदर कार्य करा आणि त्याची माहिती येथे लावा. एक शिस्तीत आकार ठरवा, एकसारखेपणा पण येईल त्यामुळे, केबिन सुंदर दिसेल,  वैयक्तिक, विशेष आणि हटके दिसेल. अश्या रंगबिरंगी केबिन मधे काम करायला जास्त उत्साह येईल, प्लास्टिक वाचेल, डिंक वाचेल, कष्ट, वेळ आणि पैसा वाचेल तो वेगळाच. त्यामुळे ह्यापुढे केबिन सजवताना त्या क्षेत्रातल्या तज्ञांसोबत तिथे वापरणाऱ्या व्यक्ती साठी काही ठळक योजना आखल्या जाव्यात हि विनंती आणि साधी अपेक्षा देखील.. 

दर्शनीय

अगदी प्रेत्येकाप्रमाणे मी देखील माझ्या आईला, तिच्या सवयींना बघत लहानाची मोठी झाले. खूप खूप शिकण्यासारखं होतं तिच्या काढून, मी काही थेंब आत्मसात करण्याचा प्रयत्न जरूर केला आहे. तिची एक सवय आज प्रकर्षाने आठवली. तो काळ फोनचा नव्हताच, म्हणजे घरोघरी फोन नव्हते. त्यामुळे पाहुणे घरी कधीही येत असतं, न सांगता सवरता. ती पद्धत नव्हती कारण सांगणार कसं ना? त्यामुळे काय व्हायचं कि एक तर ते = पाहुणे खूप वेळ बसायचे, राहायचेच थेट, आणि जेवून, चहा घेऊनच मग निघायचे. आयत्या वेळी सर्वांचं करण्याची तय्यारी सतत ठेवावी लागायचीच आणि ते देखील भन्नाट ताट सजलं पाहिजेच. त्यावेळी असं सर्रास बाहेरून आणणं माहितंच नव्हतं. नव्हतंच, मग काय मागवणार. असो. माझी आई दररोज न चुकता संध्याकाळी ४ वाजता संपूर्ण घराला झाडू मारणार, मग चहा आणि मग उत्कृष्ट तय्यार होणार. घरचीच, सुतीच पण व्यवस्थित साधी साडी, वेणी ई. प्रसन्न आणि दर्शनीय अशी. कधीही म्हणजे कधीही आळस नाहीच. तेव्हा समजायचं नाही हे असं ती का करायची ते. फक्त एक सवय एवढंच वाटायचं.

आज अचानक मला एका विभाग प्रमुखांचा फोन आला आमंत्रण द्यायला कि आमच्या शिक्षक वर्गाशी बोला थोड्या वेळ. खूपच समाधान देणारं सेशन ठरलं ते, मलाच. आमचे संस्थाप्रमुख नेहेमी प्रकर्षाने सांगतात सर्वांना कि

१. आपण काही मिळवलं समजा डिग्री, प्रोमोशन ई. तर त्याचा आनंद थोड्याकाळ टिकतो

२. घर, गाडी, बंगला, दागिने, त्याचं समाधान अजून थोडे महिने / वर्ष टिकतं

३. जेव्हा आपण एकाद्या नवीन स्थळी जातो, विश्रांती घेतो, खातो पितो ई. त्याचा अनुभव पण काही काळच

४. पण जेव्हा आपण दुसऱ्यांसाठी काही करतो, निरपेक्ष भावनेने तेव्हांचच समाधान हे कायमचं टिकतं कारण ते शारीरिक, मानसिक, अध्यात्मिक, आणि बऱ्याच पातळीवर प्रभावी ठरतं

दररोज अर्थातच आपण सर्वचजण ऑफिसला येतांना व्यवस्थित येतोच, पण अधेमधे कधीतरी कंटाळा आलेला पण दिसतो. महागडे अजिबात नाही पण दर्शनीय, आल्हाददायी, मस्त रंगसंगती असलेले, स्वतःला आणि दुसऱ्यांना आनंदायी असे नेहेमी तय्यार असणं किती गरजेचं आहे हे प्रामुख्याने समजलं. आणि हो, हे फक्त वेषभूषेशीच निगडित नाही तर केशभूषा, कार्यभूषा ई. ची तय्यारी असावी.  भरपूर कामं करतं राहिलं कि कधीही प्रस्तुत करता येतंच त्या संदर्भात. नाही का? आणि त्यामुळे मिळणार आनंद हा उत्साह फक्त द्विगुणित नाही तर अनंतगुणीत करणारा असं ठरतोच. चला तर मग सातत्याने कार्यरत राहाच आणि त्यामुळे आपोआप दर्शनीय पण होता येईल साध्याच स्वरूपात.

अंगण / आंगण

खूप खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे हि. त्यावेळी माझ्या मते सर्वांच्याच घरी आंगण होतं. त्या अंगणात म्हणजे घराच्या समोर आणि मागे दोन्ही कडे

- घरची-दारची मुलं खेळायची, छोटेखानी खेळ

- लहान मोठ्या रांगोळ्या काढल्या जायच्या

- प्रत्येकाची गाडी त्यांच्याच घरासमोर उभी राहायची

- सुंदर छोटा बगीचा असायचा, त्यावर भरपूर पक्षी राहायचे

- सडा सारवण होत असे

- उन्हाळ्यात बाहेर अंगणातच बाज / खाट टाकून झोपायची पद्धत होती

- त्यामुळे उन्हाळ्यात संघ्याकाळी त्या खाटांवर बसून पत्त्यांचे डाव रंगात असतं

- मागच्या अंगणात प्रामुख्याने उन्हाळ्यात वाळवणं ठेवलं जायी

- शिवाय लाल कोरड्या मिरच्या सुकल्या जायच्या

- लोणचं करण्यासाठी किंवा पापड लाटण्यासाठी मस्त बैठक बसायची ते आंगणात

- कपडे सूर्याच्या ऊर्जेत वाळले जायचे

- घामोळ्या, आणि बाकीचे विकार होऊ नयेत म्हणून मागील अंगणात गरम पाणी तयार व्हायचं

- पाळीव पक्षी शिस्तीत ठेवले जायचे

- ती दोन्ही अंगणं घराचाच भाग होते, अविभाज्य असा

- अगदी मोजक्या घरांमधे गाई, म्हशी, चुली ई. चं हक्काची जागा म्हणजे आंगण च ना?

- बाळाला मालिश, आंघोळ घालणे, मग कोवळ्या उन्हात थोडसं शेकल्यासारखे करणे हे

- आजी आजोबा जेष्ठ नागरिक मस्त चहाची लज्जत घेत बसायचे, येणा जाणाऱ्यांशी गप्पा / गुजगोष्टी होत असतं

 

सध्या ह्या पैकी काहीच होत नाही,व्हायची गरज नाही आणि त्या करता वेळ नाही, सगळंच विकत मिळत, एका क्लिक मधे मग अंगणाची काय गरज आहे. असलेली पिटुकली बाल्कनी पण काहींच्या घरी अडगळीची जागा म्हणूनच वापरतात, किंवा जास्तीत जास्त कपडे वाळत घालायला किंवा बेशिस्तीत कुंड्या ठेवायला, बास. अर्थात आऊट लायर आहेत. काही बोटावर मोजण्या इतक्या लोकांच्या घरी सगळं जैसे थे, मस्त मांडून ठेवलं असतं. आंगण संस्कृती लोप पावतांना दिसते आहे. जमिनीवर पाय घट्ट रोवून उभं राहण्यापेक्षा गगनभरारी घेणं किंवा त्रिशंकूसारखं अधेमधे लटकून राहणं जेथे जमीन पण आपली नाही आणि छत देखील, हे जास्त सोईस्कर वाटत आहे लोकांना. त्यामुळे आता समोर मागे वर खाली आपलं काहीच नाही, तरी देखील गर्व मात्र सर्वोच्च थराचा. अहाहा च.

मी भले मोठे आंगण, झाडं, फळं, फुलं, भाज्या, पक्षी, त्यांची घरटी, त्यांचे सुमधुर संवाद ई. सगळं पोटभरून जगले आहे, अनेक वर्ष, आता फ्लॅट संस्कृती सही.

शांतताभंग

गेले काही वर्ष आपण एक फार मोठा बदल अनुभवाला आहेच समाजात झालेला, अर्थात खूप बदल झाले आहेत, पण गगनचुंबी इमारती हा भला मोठा बदल आहे.. सर्वत्र, जेथे जेथे नजर जाईल तेथे तेथे मोठ्या शहरांमधे तरी निश्चितच ह्या अश्या मोठ्या सोसायटी तय्यार झाल्या आहेत. प्रत्येक सोसायटीचे काही नियम असतात. उदाहरणार्थ दुपारी १-४ कुठलाही आवाज नको, कुठलेही बांधकाम करायचे नाही, कारण त्यावेळी वरिष्ठ नागरिक आणि लहान बाळं आराम करतं असतात त्यामुळे त्यांना त्रास नको. असे अनेक नियम आपल्या सर्वांना ठाऊकच आहेत,जे माणसांनी माणसांसाठी आणि माणसांच्या सोयीसाठी केलेले आहेत. आपली शांताता भंग झालेली अजिबात आवडत नाही कोणालाच, नाही का?. कोणी जर अश्या मोठ्या सोसायटीत हॉर्न वाजवला भलत्या वेळेला, पहाटे, मध्यरात्री ई. तर तो फार मोठा गुन्हा असतो. ह्या वरून आणि अनेकदा आकाशातून भ्रमंती करत असतांना मला असं वाटलं / जाणवलं कि जशी आपली मानव-वस्ती तशी त्या आकाशात ढगांची वस्ती, पक्षांचे वास्तव्य, त्यांच्या वेळा, त्यांची कामं ई. मग केवळ आपल्याला बुद्धी दिलेली आहे त्याचा अर्थ असा नाही कि आपण दुसऱ्यांची शांतता भंग करावी, कोणी हक्क दिला? कधीही मध्यरात्री, भल्या पहाटे आपली विमानं त्या आकाशात वैविध्य पातळीवर भ्रमंती करत असतांना आढळतात, का? फक्त तुमचं एका ठिकाणाहुन दुसऱ्या ठिकाणी पोचणं महत्वाचं नसतं हो, बाकी जीव आहेत ना, बाकी वस्त्या आहेत ना आजूबाजूला, त्यांना नको का शांतता त्यांच्या हक्काची. आणि ह्या सगळ्या चुका करत राहायच्या वर्षानुवर्षे आणि पुन्हा त्या वरुणदेवाला पावसासाठी दोष द्यायचा, ऊन तापतंय म्हणून सुर्यबाप्पाला बोलायचं ई. पण आपण बुद्धिजीवी काय प्रचंड गडबड करतो आहे ते कधीच नाही बघायचं. असं नाही. ज्यांचं कोणाचं त्या आकाशावर राज्य आहे असा त्यांचा गैरसमज आहे,किंवा जे फक्त हे बघतात कि एकावेळी अनेक विमानं नकोत आकाशात एका पातळीवर, पण त्या पुढचं काय? ते ढग पण कदाचित गप्पा मारत असतील, निजली असतील, काहींचा प्रेमळ संवाद सुरु असेल, ई. मग त्यांना एकांत नको का? अवाढ्यव्य विमान, त्यांचे आवाज, धूर ई. मुळे पक्षांची सभा, वस्ती, एकमेकांसोबत हुंदडणं वगैरे मधे नक्की अडथळा येत असणार, तरीदेखील विनातक्रार ते कार्यरत राहतात. ढगांच्या वस्तीची, पक्षांच्या वसाहतीची / भ्रमंती दरम्यानची शांतता भंग करण्याचा आपल्याला हक्क नाहीच. हे चित्र जमल्यास थोडसं बदलायला हवं, माझ्या मते. सद्बुद्धी द्या सर्वांना देवा.

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...