माझ्या लहानपणी वर्गमैत्रिणी, खास मैत्रिणी, मैत्रिणीच्या मैत्रिणी, गल्ली मैत्रिणी अश्या अनेकविध पसरलेल्या मैत्रिणी असायच्या. त्यामुळे खूप जणींशी दोस्ती असायची, त्यांची खासियत समजायची, त्यांची साथ संगत लाभायची आणि खूप मज्जा यायची. अशीच एक माझी मैत्रीण. एवढ्यातच पुन्हा संपर्कात आली खूप वर्षांनी. ह्या सोशल मेडिया ची कमाल अजून काय. मग काय विचारात पुन्हा एकदा ऑनलाईन रमलो जुन्या दिवसात. ती माझ्या पेक्षा बरीच मोठी, लग्न, संसार, मुलंबाळं सगळं आधी झालं, आणि आता स्वेच्छा निवृत्ती पण घ्यावी लागली काही कारणांनी. तिच्या सासूबाईंनी म्हणे तिचं लग्न झाल्यावर आणि त्यांनतर बऱ्याचदा एक वाक्य सांगितलं होतं कि स्वतःच्या पायावर नक्की उभी राहा, माझ्यासारखी राहू नकोस. अर्थात माझ्या नागपूरचं पाणी ते, मागे थोडीच पडणार होतं. घरचं जमेल तस्स सांभाळून चार पैसे पदरात पडतील ह्या कडे पण तिने लक्ष दिलं. आज आहे थोडी जमापुंजी गाठीशी. परवा बोलता बोलता बोलली ती, अर्थात मी काही विचारलं नव्हतं, पण तिनेच आपणहून सांगितलं म्हणून कानावर पडलं. म्हणते कशी, बरं झालं त्या शक्तीने, परमेश्वराने मला शारीरीक आणि मानसिक शक्ती प्रदान केली इतकी वर्ष कि आता मी माझ्या घरी "फुल ना फुलाची पाकळी" खर्च करू शकते, नियमीत कमाई थांबल्यावर देखील. उद्या कोणी म्हणायला नको कि फुकट खाते ते. त्यापेक्षा आधीच भाडं दिलेलं बरं कुठल्या ना कुठल्या स्वरूपात. सिनियर सिटिझन आश्रमात गेलं तरी पैसे मोजावे लागणार, इतर जणांसोबत सामावून, समजावून घ्यावं लागणार आणि सरते शेवटी व्यवहार म्हणून घर / प्रॉपर्टी कोणाच्या तरी नावावर असावी लागते, उगाचंच का लोक आपलं हे आपलं ते मोजत बसतात कोणास ठाऊक. एवढं सोप्प आहे ते. मग आपल्या माणसांसाठी किंबहुना स्वतःच्या हात-पायात जोर आहे हे सातत्याने जाणीव होण्यासाठी इथेच राहावे अलिप्त आणि वैविध्य तऱ्हेचे कार्य अखंड चालू ठेवावे "त्याच्या" मर्जीने.
आत्ता समजलं मला, मुली नोकरी करण्यासाठी बाहेर पडण्याचं अजून एक कारण.