बुधवार, ४ ऑक्टोबर, २०२३

स्वभाव

आज सकाळी माझं आणि माझ्या मावशीचं झालेलं संभाषण मला एक लिहायला कारण देऊन गेलं. त्यांनी डाळीचा कुकर लावला, नेहेमी प्रमाणे शिट्ट्या झाल्या, कुकर थंड झाला, उघडून बघतात तर काय डाळ शिजली नव्हतीच. झालं आधीच आमच्या मावशींना सतत म्हणजे सतत स्वतःशी बडबडण्याची सवय आहे त्यात आता हे कारण मिळालं. त्यांचं पुढचं काम हे समीकरण असतं. मग काय बिच्चारी डाळ, तो गलितगात्र कुकर, गॅस, पाणी, आणि सगळ्या म्हणजे सगळ्यांना लाखोली मिळणार होती, पण माझी तेव्हा नेमकी स्वयंपाक घरात उपस्थिती होती, ती त्यांना जाणवली आणि त्या कश्या तरी नाईलाजाने गप्प राहिल्या. मग त्यावर मी त्यांना म्हटलं, डाळीचा पण एक स्वभाव असतो. तुम्हाला आता ठाऊक आहे कि हि डाळ शिजत नाही, मग तुम्ही काय जास्तीचे प्रयत्न करत आहात? मला तर काहीच दिसत नाही. व्यवस्थित हिंग हळद घाला, थोडसं तेल मीठ घाला, गरम पाणी घाला थंड च्या ऐवजी, गरम पाण्यात तुम्ही आलात कि ५-१० मिनिटे भिजवून ठेवा, त्या डाळीशी धुतांना संवाद साधा आणि तिला सांगा नीट शीज म्हणून, एवढं आलटून पालटून करा आणि बघा ती कशी शिजत नाही ते. गेले ते दिवस जेव्हा फक्त एक वाण्याकडून वर्षानुवर्षे सामान आणलं जायचं. त्यामुळे त्या वाण्याकडच्या डाळीचा स्वभाव माहित झालेला असायचा. आता तसं नाहीच. वैविध्य प्रकारच्या डाळी येतात. एका पुड्यात एकाच शेतकऱ्याची, एकाच शेतात उगवलेली डाळ असेल असं नाहीच. विविध डाळी वैविध्य ठिकाणांहून एकत्र केलेल्या असण्याची दाट शक्यता आहे, कारण सरते शेवटी हा धंदा आहे. 

ह्या पिटुकल्या संवादावरून मग मला अनेक जणांचे स्वभाव आठवले, सगळे सजीव बरं का, पण काहींना दोन पाय, काही चार पायांचे तर काही बिना पायाचे देखील (हि डाळ, सजीवच नाही का? पेरलं कि नवीन डाळ जन्माला येतेच). दिवसागणिक देखील स्वभाव बदलण्याची उदाहरणे देता येतील सहज. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे अर्थात फक्त माझ्या दृष्टीने हो, हवा तो परिणाम साधण्यासाठी आधी स्वभाव जुळावे लागतात. का माहित नाही, पण आज तागायत जेव्हा जेव्हा मी कुकर लावला तेव्हा तेव्हा प्रत्येक वेळी डाळ व्यवस्थित शिजली आहेच. तीच डाळ तोच कुकर तेच स्वयंपाक घर आणि तोच गॅस, पण फरक आहे. गम्मत आहे नाही सगळी स्वभावाची. 

आत्ता पर्यंत असंख्य आधुनिक गुरूंना ऐकलं आहे, ऑनलाईन आणि ऑफलाईन स्वरूपात. ते त्यांच्या अगाध ज्ञानाने, प्रचंड अनुभवानुसार फक्त दोन पायांच्या च स्वभावाबद्दल सूतवाच्य करतात, बाकी सजीव जे आपल्या अवतीभोवती असतात त्यांचं काय? ते पण बोला कि मंडळी कधी. सगळं सुकर होईल.  

एक अनोखा आश्रम

माझ्या लहानपणी वर्गमैत्रिणी, खास मैत्रिणी, मैत्रिणीच्या मैत्रिणी, गल्ली मैत्रिणी अश्या अनेकविध पसरलेल्या मैत्रिणी असायच्या. त्यामुळे खूप जणींशी दोस्ती असायची, त्यांची खासियत समजायची, त्यांची साथ संगत लाभायची आणि खूप मज्जा यायची. अशीच एक माझी मैत्रीण. एवढ्यातच पुन्हा संपर्कात आली खूप वर्षांनी. ह्या सोशल मेडिया ची कमाल अजून काय. मग काय विचारात पुन्हा एकदा ऑनलाईन रमलो  जुन्या दिवसात. ती माझ्या पेक्षा बरीच मोठी, लग्न, संसार, मुलंबाळं सगळं आधी झालं, आणि आता स्वेच्छा निवृत्ती पण घ्यावी लागली काही कारणांनी. तिच्या सासूबाईंनी म्हणे तिचं लग्न झाल्यावर आणि त्यांनतर बऱ्याचदा एक वाक्य सांगितलं होतं कि स्वतःच्या पायावर नक्की उभी राहा, माझ्यासारखी राहू नकोस. अर्थात माझ्या नागपूरचं पाणी ते, मागे थोडीच पडणार होतं. घरचं जमेल तस्स सांभाळून चार पैसे पदरात पडतील ह्या कडे पण तिने लक्ष दिलं. आज आहे थोडी जमापुंजी गाठीशी. परवा बोलता बोलता बोलली ती, अर्थात मी काही विचारलं नव्हतं, पण तिनेच आपणहून सांगितलं म्हणून कानावर पडलं. म्हणते कशी, बरं झालं त्या शक्तीने, परमेश्वराने मला शारीरीक आणि मानसिक शक्ती प्रदान केली इतकी वर्ष कि आता मी माझ्या घरी "फुल ना फुलाची पाकळी" खर्च करू शकते, नियमीत कमाई थांबल्यावर देखील. उद्या कोणी म्हणायला नको कि फुकट खाते ते.  त्यापेक्षा आधीच भाडं दिलेलं बरं कुठल्या ना कुठल्या स्वरूपात. सिनियर सिटिझन आश्रमात गेलं तरी पैसे मोजावे लागणार, इतर जणांसोबत सामावून, समजावून घ्यावं लागणार आणि सरते शेवटी व्यवहार म्हणून घर / प्रॉपर्टी कोणाच्या तरी नावावर असावी लागते, उगाचंच का लोक आपलं हे आपलं ते मोजत बसतात कोणास ठाऊक. एवढं सोप्प आहे ते.  मग आपल्या माणसांसाठी किंबहुना स्वतःच्या हात-पायात जोर आहे हे सातत्याने जाणीव होण्यासाठी इथेच राहावे अलिप्त आणि वैविध्य तऱ्हेचे कार्य अखंड चालू ठेवावे "त्याच्या" मर्जीने. 

आत्ता समजलं मला, मुली नोकरी करण्यासाठी बाहेर पडण्याचं अजून एक कारण. 

मंगळवार, ३ ऑक्टोबर, २०२३

आवड निवड

अगदी कळायला लागल्या पासून मी रंगसंगती जगले आहे. आईच्या मागे मागे राहून घरच्या अंगणातल्या बागेतली फुले जगवण्यास मदत केली आहे, हलक्या हाताने काळजीपूर्वक तोडून आणून ती देवाला वाहतांना आधी बघितली, आत्मसात केलं, लक्षात ठेवून मग वाहिली, आजतागायत सगळं म्हणजे सगळं लक्षात आहे, राहिलं आहे. मला बाकीच्यांचं माहिती नाही पण महाराष्ट्रात तरी बाप्पाला लाल फुल + दुर्वा, शंकराला पांढरं आणि बेल, श्री कृष्णाला तुळस, विठ्ठलाला देखील तुळशीचा हार, ई. प्रत्येक फुल हे देवाला वाहतात असे नाही. त्यामुळे ठरावीक फुलं शोधणे हे देखील आलंच. बाप्पाला लाल किंवा लालसर फुलं म्हणजे मग तगर, गुलाब, शेवंतीची एक जात, जास्वंद ई. आणि ह्यातलं कुठलंही. 

अगदी न कळत वयात हे सगळं आपण का शिकलो, का आपल्या दृष्टीने हे सगळं टिपलं, किंवा हे सगळं रंग, आवड निवड, ज्याला जे लागतं किंवा हवं तेच द्यायचं, किंबहुना वाहायचं हे दर दिवशी सकाळी घडलं, सणासुदीला प्रकर्षाने जाणवलं, त्यावेळी सर्वत्र एकसारखं वातावरण असल्यामुळे घरी आणि दारी पण तेच आढळलं हे का? ह्याचा उलगडा आज झाला मला, प्रकर्षाने. देव दिसत नाही, प्रत्येकाच्या डोळ्यासमोर फक्त मूर्ती किंवा फोटो असतो तरी देखील आपण सर्व त्याची आवड निवड जपतो. त्यामागे एक श्रद्धा आहे, जवळीक आहे, आपलेपणा आहे, तो आहे ह्या वर विश्वास आहे, त्याची मनापासून / मनोभावे भक्ती केली कि किंवा यथासांग पूजा केली कि तो नक्की त्याचा आशीर्वाद आपल्या पाठिशी ठेवतो, पाठिशी सदोदित उभा राहतो, सगळ्या इच्छा पूर्ण करतो. 

ह्या बरोबर आपल्याला आई वडिलांनी, शिक्षकांनी, पुस्तकांमधून, थोऱ्या मोठ्यांकडून अजून एक मोलाची शिकवण मिळाली आहे कि सर्वात देव आहे (किंवा सर्वोच्च शक्ती म्हणा हवं तर). तो मानावा, त्याचं अस्तित्व सर्वत्र आहेच आणि कुठल्याही रूपात तो भेटतो, मदत करतो ई. मग जर असं सगळं आहे, तर प्रत्येक जण आपल्या संपर्कातल्या सर्वांना हवं नको ते का पाळत नाही, रंगसंगती का लक्षात ठेवत नाही, ह्या नाहीतर त्या प्रकारे तो रंग आणायचा आणि समर्पित करायचं ह्या कडे भर का नसतो, प्रत्येक वेळी? आणि ते देखील निरपेक्ष. लहानपणीची शिकवण विस्मृतीत जाता कामा नये कधीच. देव पण अडी अडचणीला मानव स्वरुपातच धावून येतो मदतनीस म्हणून. स्वतःच्या समाधानासाठी तरी सातत्याने करत राहिलं आपल्या शक्ती नुसार तर कित्ती सोप्पं होईल ना सगळं ? विचार आणि पटल्यास हळूहळू का होईना पण कृती / "प्रयोग" करून बघूया सगळे जण. काय म्हणताय मंडळी?  

सोमवार, २ ऑक्टोबर, २०२३

What's behind the name?

 I guess our smartest forefathers, with lots of thinking and foresight, suggested various religions. This division could be because of equal classification of work, labour, respect, and to prove that all occupations are important. With due respect to all religions, I am writing this as I heard the most uniquely different experience recently. No one knows who is driving the train, bus, or flying the aircraft; a chef or cook belongs to which religion; food production is done by which category of farmer; who baked bread for you; who milked the cow for the cup of tea in your hand? Above all, we breathe air, which is a mix of everyone's breaths, coming from and going out of the bodies of living beings from different religions. Everyone in India enjoys cricket on extravagant levels; all types of games are played against all different countries, including Pakistan. We cheer on marathon runners too. With all these tiny facts and figures, background, truths, and basic science, I was thrilled to know a resident of a Muslim-led city for ages is objecting to pronouncing a non-Marathi name for kids at home as a pet name or nice name, used very casually. Wow.

सोमवार, ११ सप्टेंबर, २०२३

माझी आवड

अगदी लहानपणीपासून माझ्या स्मृतीपटलावर कोरलेला कार्यक्रम म्हणजे "माझी आवड". रेडिओ हे एक महत्वाचे करमणुकीचे आणि माहितीचे माध्यम होते. मनसोक्त मी बरेच कार्यक्रम ऐकायचे. सीमेवरच्या जवानांसाठी खास आयोजलेला तो कार्यक्रम. त्यांना आवडणारी, भावणारी गीते ऐकवली जात म्हणून हे कार्यक्रमाचे शीर्षक. 

हे शीर्षक आज हि मी जगते आहे एका वेगळ्या अर्थाने आणि आज मी येथे माझी एक आवड नमूद करणार आहे. लहानपणी पासून स्वयंसिद्ध होण्याकडे कल होता आई वडिलांचा, शिक्षकांचा आणि इतर बहुजनांचा. आणि त्यानुसार आम्ही घडलो देखील. सगळी कामे घरी, त्या इस्त्री पण आली. त्यानंतर माझी रवानगी परदेशी झाली आणि घरी इस्त्री हि सवय कामात आली. भारतात परत आल्यावर धोबी नेमला गेला व्याप वाढल्यामुळे म्हणा किंवा अजून काही. पण त्या प्रत्येक दिवशी परिधान करतांना काढलेल्या कपड्यासोबत एक वर्तमानपत्राचे कात्रण / कागद किंवा तुकडा यायचा / येतो अजूनही. तो मनापासून आधी वाचणे, मग जपून ठेवणे किंवा टाकून देणे ठरते. तो वर्तमानपत्राचा तुकडा अगदी छोटासा असतो, जुना असतो पण तरीदेखील माझ्या प्रचंड कामाचा असतो, माझ्या दिवसांची सुरवात प्रचंड ऊर्जेने करून टाकतो. अहाहा च. तोडच नाही त्याला. म्हणजे माझ्या तरी शब्दकोशात कुठलाही शब्द नाही ह्या एकंदरीत कृतिमालिकेला दर्शवण्याला. माझ्या अनेक वैविध्य आवडी आहेत, पण त्यातली हि सगळ्यात जवळची, आवडती अशी. त्या धोब्याच्या चमूला धन्यवाद सातत्याने तो कागद इस्त्री करतांना कपड्यांमध्ये ठेवल्याबद्दल.    

बुधवार, १६ ऑगस्ट, २०२३

दोन दिवस सलग १५ ऑगस्ट

मी खूप दिवसांनी १४ दा ऑगस्ट ला कचेरीत निघाले होते, सोमवार होता. गेले १५ दिवस घरी अनेक घटना घडल्या त्यामुळे लांबलचक सुट्टी झाली होती आणि एकंदरीत गाडीत बसल्याबसल्या भन्नाट, टवटवीत वाटायला लागेलच. त्यात भरीसभर म्हणजे संपूर्ण रस्ताभर खास करून दिड दोन फुटाच्या, अतिशय गोंडस भारतमाता इतस्ततः नजरेस पडल्याच. इतक्या गोजिरवाण्या त्या, नजर हटत नव्हती, कि पालवी, फार गोड नजारा होता. इतक्या सकाळी उठून, मस्त तय्यार होऊन शाळेच्या बस साठी वाट बघत होत्या. सगळ्या लहान गटातल्या वाटत होत्या, त्यामुळे कदाचित शाळेने त्यांना आदल्या दिवशीच बोलावून कार्यक्रम साजरा केला असेल आणि प्रत्यक्ष १५ तारखेला मोठ्या गटाचा. पण काहीका असेना माझा दोन दिवस भरभरून १५ ऑगस्ट साजरा झाला. इतके सुंदर नजरे दृष्टीस पडतात रस्त्यावरून जातांना, मग प्रवासात त्या मोबाईल मधे डोकं घालण्याची आवश्यकता भासातच नाही. सगळ्या पिल्लाना, शाळेला, आई बाबांना शतशः धन्यवाद. असेच सुंदर कार्यक्रम आखत राहा आणि माझ्या डोळ्यांचे पारणे फिटत ठेवा. 

बुधवार, २ ऑगस्ट, २०२३

सुख म्हणजे नक्की काय असतं

सध्याच्या पावसाळ्यात नकळत सगळेच मंदावतात आणि त्यामुळे गती संथ होते. असंच काहीसं गेले काही दिवस घडतंय. सात वाजून तीस मिनिटाला माझी गाडी सुरु होते दररोज, साडेआठ च्या कचेरीची वेळ गाठण्या करता. पावसाळ्याव्यतिरिक्त मी आठच्या आधी पोचायचे कचेरीत पण सध्या उशीर होत असल्यामुळे मी पक्के ठरवून आज सात एकोणवीसला च निघाले आणि काय सांगू क्षणभरही नाही थांबावं लागलं रस्त्यावर. शिवाय कधी नव्हे ते वैविध्य शाळेचे गणवेश बघायला मिळाले, ते रंग, त्या छटा मनमोहक होत्या. विविध वयाची शाळकरी मुलं बघून माझं आणि माझ्या मुलांचं लहानपण डोळ्यासमोर तरळून गेलं झर्रर्रकिनी, माझ्या पुण्यात आणि त्यात माझ्या भागात किती शाळा आहेत हे देखील आज नजरेच्या टप्प्यात आलं अगदी सहज खूप साऱ्या शाळेच्या बसेस बघून. हिरव्या रंगांच्या विविध छटांनी बहरून आलेली झाडं, त्या वरची अप्रतिम फुलं, बऱ्याच ठिकाणी नुकतीच उगवलेली सुगंधित फुलं ह्या सर्वांनी आजच्या दिवसाची बहरलेली मोहक सुरवात झाली. सुख म्हणजे नक्की काय असतं? अहाहा च. 


https://drpreetimulay.blogspot.com/2021/05/blog-post_9.html

https://drpreetimulay.blogspot.com/2021/09/blog-post_59.html

https://drpreetimulay.blogspot.com/2021/04/blog-post.html


माझ्या तरी अवतीभोवती आणि माझ्या सानिध्यात ते सतत असतं. 

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...