मी शास्त्रीय संगीतात निपुण नाही, ऐकायला, त्याचा आनंद घ्यायला आणि गायकाचे कौतुक करायला मात्र प्रचंड आवडतं मला. पण बोल सुरु व्हायच्या आत बऱ्याच लांबी, रुंदी आणि उंचीच्या आलाप, ताना, सरगम असं काहीसं हि गायक मंडळी का घेतात हे मला आज उमगलं.
मी प्रसूती तज्ज्ञ नाही पण नऊ महिने नऊ दिवस फक्त अनुभवले आहेत. हाच कालावधी का हे मात्र गुपित ना कधी कळले ना कधी जाणून घेण्याचा प्रयत्न केला कारण त्याची गरज भासली नाही, असचं असतं एवढं ठाऊक होतं आणि ते पुरेसं होतं. पण त्याचं देखील रहस्य आज चार डोळ्यांनी बघितले जणू.
थोडासा अनुभव पाठिशी आला, पंखात बळ आलं, एका नोकरी नंतर दुसरीत रुजू व्हायच्या आधी तो तीन महिन्यांचा काळ का? हा देखील माझ्यासाठी एक यक्ष प्रश्नच होता. पण त्या मागचं इंगित स्पष्ट झालं.
"झट मंगनी पट ब्याह" हे फार कमी लोकांच्या बाबतीत घडतं. बहुतांशी साखरपुडा-साक्षगंध आणि लग्न-घटिका ह्या मधला सुवर्णकाळ मोठ्या प्रमाणावर अनुभवतात. "दिवस तुझे हे झुलायचे झोपाळ्यावाचून...." ह्याची प्रचिती घेणे का अत्यावश्यक आहे हे देखील समजलं आज.
माझ्यामते वर नमूद केलेले उदाहरणं स्व ची तय्यारी करण्यासाठी आहे, अर्थात शारीरिक, मानसिक, बौद्धिक, आर्थिक, सामाजिक ई. हो, स्व शिवाय आजूबाजूच्या संपर्कातल्या इतर जणांना पण सवय व्हायला हवी त्या बदलाची. नवीन बाळ येणार म्हणजे घरातल्या मोठ्यांवर पूर्णपणे अवलंबून असलेलं एक व्यक्तिमत्व सांभाळायचं आहे, त्या नवीन कोऱ्या आई मधे झालेल्या बदलासहित तिला जोपासायचे आहे ई. दर्शवणारा तो काळ असतो. अर्थात मनुष्याच्या बाळाची निर्मिती करण्याकरता नैसर्गिक लागणारा तो कालावधी आहेच. माझ्या बघण्यात, वाचण्यात, आणि ऐकण्यात आलेली सर्वच उदाहरणं काही वेगळंच दर्शवतात. असं होतं नाही प्रत्यक्षात. चित्र वेगळंच दिसतं. नाही कोणी ह्या कालावधीचा हवा तास उपयोग करून घेत. आउट लायर्स असतात.
गाणं सुरु व्हायच्या आधी घेतलेल्या ताना गळा तय्यार करतो, समा बांधण्यासाठी मदत करतो, वातावरण निर्मिती करतो, म्हणजे गायक, वादक आणि श्रोत्यांची एकत्र बांधणी करून मग गाण्याला सुरवात होते, म्हणजे मग त्या शब्दांशी एकरूप होता येतं. कवीने, गीतकाराने काय संबोधले आहे हे स्पष्ट होतं, त्यातून शिकता येतं, एखाद्या प्रश्नाचं उत्तर देखील मिळतं. काही मूठभर लोकांना हा गाण्याआधीचा काळ आवडत नाही. असो.
एका नोकरीच्या ठिकाणाहून दुसरीकडे स्थलांतर करणे सोप्पे जावे, स्व, त्या कंपन्या आणि आजूबाजूच्या इतरांना म्हणून दिलेला तो अवधी असतो. इतकं सहज नाही घडत ते, कि आज एका ठिकाणची नोकरी सोडून लगेच उद्या दुसरीकडे रुजू होणे. प्रवासाचे अंतर, कामाचे बदलेले स्वरूप, एकत्र काम करणाऱ्यांची मानसिकता, आणि इतर अनेक मुद्दे असतात. प्रत्येक सुवर्णकाळ अनुभवा, जगा, जगू द्या, "त्याचा" मूळ उद्देश नजरेआड करू नका.