रविवार, १० जुलै, २०२२

रंगरंगोटी

मी तशी फारशी दूरदर्शन आणि त्यांच्या कार्यक्रमांची भक्त वगैरे नाही, मनोरंजन म्हणून नक्कीच कधीतरी बघितलं जातं तेवढंच. एकदा सहज विविध उपलब्ध असलेल्या वाहिन्या बदलत होते, बटणं दाबणं चालू होतं आणि फोन आला. म्हणून माझी बोटं थबकली काही क्षण आणि माझ्या चार डोळ्यांनी काही तरी टिपलंच. ते गोड वाटलं मला, म्हणून फोन वर बोलता बोलता ते व्यवस्थित बघितले. त्यात जे दिसलं किंवा दाखावलं त्याबद्दल मग मी माझ्या लेकरांशी बोलले, सहज, चर्चा म्हणून. तर म्हणतात कसे, हे खूप आधीपासून वापरलं जातं ह्यात काही नवीन नाही. पण माझ्या साठी ती नाविन्यपूर्ण गोष्ट होती, ती भावली आणि मग मी पण प्रयोग करायचं ठरवलं. पण मग नवा दागिना परिधान करणं अनिवार्य होतं म्हणून जरा मागे पडलं. आता पुन्हा गाडी रुळावर आली आणि मला ते आठवलं. मग काय ताबडतोब प्रयोग सुरु झाले. सकाळची दररोजची घाई असतांना देखील प्रयोग यशस्वी होत होते. म्हटलं अजून काही नवीन करून बघावं. आणि हा प्रश्न पुढ्यात उभा ठाकला. दोन रंगांच्या साधारण मिळत्याजुळत्या छटा जर वापरायच्या ठरवल्या तर दूरदर्शन च्या कार्यक्रमात दाखवले त्या प्रमाणे वर एक आणि खाली एक. पण दोन छटा मिळून जर वेगळी रंगसंगती करावीशी वाटली तर? मग गडद रंगावर फिकट रंग लावायचा का उलटं? गडद रंगावर फिकट लावायला प्रयोग म्हणून सुरवात केली आणि काही दिवसात फक्त फिकट रंग फिरवला तरी हवा तो परिणाम मिळू लागला. मज्जा येते आहे हे छोटे छोटे प्रयोग करतांना आजकाल मला, का कुणास ठाऊक.

फिकट रंगावर गडद लावला तर गडद छटेला काही म्हणजे काहीच फरक पडला नाही, तो जैसे-थे राहिला, जास्त ताकदवान असल्यासारखा.

मला तरी हे असे आणि अनेक वेगळ्या पद्धतीचे छोटे छोटे प्रयोग फारच जास्त मनापासून आवडू लागलं आहे कारण त्यामुळे मला स्वतःला एक वेगळी ऊर्जा मिळते आहे, दिवस फार म्हणजे फारच वेगळा दिसू लागतो आणि त्यामुळे जातो देखील, कामं विजेच्या वेगाने होतात.

आणि हो, मी ना हे सगळं साग्रसंगीत ओष्ठशलाके बद्दल बोलत होती हो, सांगायचंच राहून गेलं. ओष्ठशलाका अक्का लिप्स्टिक.

सगळेचजण वैविध्य प्रयोग करतंच असतात नकळत पण मला असं वाटतं कि कधी कधी आवर्जून काही करायला काय हरकत आहे, सरते शेवटी "चेंज ऑफ वर्क इज रेस्ट", नाही का?

शनिवार, ९ जुलै, २०२२

सारेगम कारवा

सारेगम नावाच्या विख्यात कंपनीने एक खूप सर्वोपयोगी वस्तू विकसीत केली आहे. बहुतांशी सर्वांनाच जुन्या गाण्यांची आवड असतेच. विविध कॅसेट्स तर आता ठेऊ / बाळगू शकत नाही कारण ते तंत्रज्ञान आता जुनं झालं आणि उपलब्ध पण नाही. रेकॉर्डस्, सीडीज ई. पण खूप जुन्या झाल्या आहेत. ऑनलाइन एक एक गाणं शोधायचं, ऐकायचं म्हणजे वेळखाऊ गोष्ट. त्यामुळे एका छताखाली जर असंख्य, हजारो गाणी उपलब्ध झाली तर? सारेगमने अगदी तेच नेमकं हेरलं आणि घेऊन आले कारवा हे उत्पादन. आधी फक्त हिंदी, मग मराठी, आता लहान मुलांसाठी फक्त ऐकण्याचं ऑपशन, स्क्रीन विरहित मनोरंजन घेऊन आले आहेत सारेगम बाजारात, टप्याटप्याने. फारच विचारपूर्वक केलेली चाल.  अहाहा च. जुने दिवस पुन्हा परत आल्यासारखे वाटते, एकामागून एक अप्रतिम खजाना ऐकू येतो / कानावर पडतो सुमधुर असा, जाहिराती विना हि अजून एक जमेची बाजू. ज्याच्या कोणाच्या सुपीक डोक्यातून हि कल्पना आली आहे त्याचे शतशः धन्यवाद. त्याची अनेक कारणं आहेत, प्रत्येक घरात असावं असं उत्पादन, किंवा भेटवस्तू द्यायला पण उत्तम उपाय, सहज उपलब्ध आणि ऑनलाईन विकत घेऊन देखील पाठवता येतं. फार जास्त हाताळावं लागत नाही त्यामुळे माझ्या मते दुरुस्ती खर्च नसावाच. सर्वात महत्वाचं म्हणजे सगळ्या चमूची मेहेनत उत्कृष्ट, एकामागे एक पेरता येतील अशी निवडक गाणी, आणि त्याचं अर्थपूर्ण नाव कारवा, म्हणजे पक्षांचा थवा, एकत्र दूर प्रवास करणारा असा. आता फक्त डोळ्यासमोर उभं करा असा थवा, कित्ती एकावा लागतो, खूप एकमेकांशी जवळीक असावी लागते, एकमेकांशी संपर्क आणि संभाषण करता आलं पाहिजे, ह्या सगळ्या उत्कृष्ट, विशिष्ठ कलाच आहेत. असे हे सर्वगुणसंपन्न उत्पादन, नवीन पिढीचा रेडिओ जणू.

सुखद अनुभव

आज शनिवार, खरं तर हक्काच्या सुट्टीचा वार पण विद्यापीठाच्या मान्यतेचे काम असल्यामुळे आज देखील भल्या पहाटे उठावंच लागलं मला. थोडीशी लोळालोळी, आळस ह्यातून खाड्कन जागं व्हायला झालं ते एका प्रचंड मोठ्या धमाक्याने. बघतो तर काय वीज गेली होती, काही तरी मोठं झालं होतं हे निश्चित. ते इतकं मोठं होतं कि जनरेटर सुद्धा स्तब्ध झाला, सगळं अंधारमय, सहा पण नव्हते वाजले घड्याळात तेव्हा. जे साधारण जागे होते त्यांना समजलं बाकी सोसायटीच्या अध्यक्ष्यांना सांगण्यात आलं. त्यांनी सर्वप्रथम आढावा घेतला काय झालयं त्याचा. मग विद्युत विभागाला कळवलं तातडीने. आमच्या सोशल मीडिया संघावर पण सूचित केलं आणि त्यांच्या अंदाजानुसार अर्धा दिवस कमीतकमी लागेल वीज यायला असा अंदाज वर्तवला गेला. पाऊस म्हणतो मी, संततधार सुरूच होता आणि त्या हे सगळं. थोड्याश्या वेगळ्या पद्धतीने पण शांतपणे हि सकाळ सुरु झाली आणि अहो आश्चर्यम, दोन तासाच्या आत दिवे आले देखील, जसं कि काही झालंच नाही. कमाल कमाल आहे विद्युत विभागाच्या सर्व कर्मचाऱ्यांची. त्यांच्या कडे सर्व सुविधा आहेत कि नाही माहित नाही पावसात काम सुकर होण्यासाठी पण मी तर पुरती निःशब्द झाले आज. धन्यवाद हा फार खुजा शब्द होईल ज्यांनी काळजीपूर्वक आणि ताबडतोब आमची सोय केली, गैरसोय होऊ दिली नाही त्यांच्यासाठी. मनापासून आभार आणि कळकळीची विनंती कि स्वतःची काळजी घेऊन मगच अशी जोखमीची कामं करा, मार्गी लावा. धन्य ते फोन ऑपरेटर / दूरध्वनी चालक, अभियंते, वायरमन / तारतंत्री, कुठेही आळस न करता, पहाटे देखील ड्युटी / कामावर हजर राहून दुरुस्ती केली, वाह वाह च. सर्वांना सलाम. बहुतांशी माणसांचा स्वभाव दुसऱ्यांनी काय नाही केलं हे टिपतो, आणि सरकारी कामं म्हणजे हळू हे समीकरणच झालं आहे, पण आज हे सगळं खोडलं गेलं. भन्नाटच.  

दरवळणारा सुगंध

कालपासून माझं घर एका अनोख्या सुगंधाने नटले आहे, फारच अनोखा आहे तो सुगंध, कधीही नाही अनुभवलेला असा, वेगळा आणि खास. संपूर्ण घर दरवळतंय / महकतंय त्यामुळे, खिडकीतून / दारातून बाहेर देखील जात असावा इतकी प्रचंड ताकद आहे त्यात.

आमचे १५-१६ वर्षांपासूनचे शेजारी आहेत, त्यांचा थोरला मुलगा थेट अमेरिकेहून येऊन बंगलोरला गेला होता त्याच्या सख्ख्या मित्रांना भेटायला, अनेक वर्षांनी, आणि येतांना म्हैसूर स्पेशल उदबत्ती घेऊन आला माझ्या साठी खास भेट म्हणून. मोगरा सुगंध आहे. ह्या भैयाची कमाल बघा ना अमेरीकेहुन आला, विमान उशीरा पोचलं, त्यात मुंबईची रहदारी, पाऊस म्हणतो मी. त्यात भल्या पहाटे बंगलोरला गेला आणि मित्रांना भेटायचं प्रयोजन असतांना देखील आमची आठवण ठेवली आणि हि सुगंधी अनोखी भेट आणली. अमेरिकेहून आलेली भेट वेगळीच बरं का.

दोन दिवस पोटभर ह्या अनोख्या सुगंधाचा आस्वाद घेतल्यावर मला सुगंधाचं समीकरण नव्याने समजलं. हा सुगंध फक्त त्या उदबत्तीचा नाहीच, तर त्या करणाऱ्याची कमाल, इतक्या वर्षाचे आम्ही शेजारी, खूप दिवस एकमेकांसोबत जगलो, वाढलो, साथ दिली, ह्या सर्वांची ती जाणीव, आणि त्याने ह्या सुवासाला वृद्धिंगत केलं. गोळाबेरीज म्हणजे नात्याचा सुगंध, (नातं, तसं पाहिला गेलं तर नसतांना), आठवणींचा त्यावर साज चढलेला, अनपेक्षित मिळालेली भेट आणि स्मरणात ठेवून इतक्या दुरून उचलून आणलेलं ते ओझं ई. ह्या सगळ्यावरुन निश्चित जाणवतं कि कित्ती प्रेमपूर्वक झाली आहे हि संपूर्ण प्रोसेस भेट वस्तू आणण्याची. आमचे नाते आणि प्रत्येक शेजाऱ्याचे नाते असेच नेहेमी दृढ राहो हि प्रार्थना.  

शुक्रवार, ८ जुलै, २०२२

एकटा

"हिरा है सदा के लिये" हि जाहिरातीची ओळ मला आज आठवली. हिरा हा फारच मोठा, महान आणि अवर्णीय असा खडा आहे, प्रचंड महाग पण भव्य दिव्य असा, थोडक्यात त्याच्या सारखा तोच आणि त्याच्या सारखे दुसरे कोणीच नाही. त्यामुळेच एकतर त्याची किंमत गगनाला भिडलेली अशी असते आणि त्याची तुलना पण तश्याच व्यक्ती बरोबर केली जाते, नेहेमीच, अद्भुत. तसेच बाकी मौल्यवान रत्नाचे पण आहे. सौंदर्याने भरपूर, बहुउपयोगी आणि बहुमूल्य असे. अशी एवढी महान रत्न असून देखील ती एकटी काहीच कामाची नाहीत. त्यांना साज चढतो तो बाकी धातूंमुळे, सोने, चांदी, प्लॅटिनम, सोने-तांबे एकत्र आणि इतर अनेक. बघा म्हणजे दागिना हा कमीतकमी दोन गोष्टीमुळे तय्यार होतो आणि शोभा वाढवतो. एक म्हणजे रत्न आणि दुसरे म्हणजे धातू. हा संगम झाला कि त्याचा उपयोग, नाहीतर नाहीच. तिसरी महत्वाची बाब म्हणजे कसलेला कारागीर आणि सुबक-सुंदर दागिन्यांना शोभा आणणारे गिऱ्हाईक. हे सगळे असले तर त्या रत्नांना खरी किंमत येते, त्याचा खरा उपयोग होतो, नाहीतर नाहीच.

अगदी तसेच मोठ्या व्यक्तींचे पण आहे. ते मोठे एकट्याने होऊच शकत नाही जोवर त्यांना "त्याचे" आशिष, सद्बुद्धी, मित्र, परिवार ई. साथ मिळत नाही. एखादा वृक्ष मोठा होतो कारण त्याला वैविध्य पोषक खाद्य जमिनीतून मिळतं, पाऊसाचे पाणी आणि सूर्याची किरणं मिळतं. मोठ्या आकाराचा पक्षी हवे मुळे भ्रमण करू शकतो, मोठ्या उंच झाडांवर कदाचित विसावा घेतो आणि पुन्हा उंच भरारी मारतो. हे सर्वश्रुत आहेच पण कित्येकदा आपल्या विस्मृतीत जातं नकळत. तेव्हा मनापासून मनातल्यामनात आभार माना सर्वांचे ज्यांच्यामुळे आज आपण जे आहोत ते आहोत, एकट्याने काहीच कधीच होणे नाही. 

आज अचानक ऑफिसला जायला तय्यार होतांना कपाट उघडलं तर जसे कि माझे सगळे विविध धाटणीतले कानातले एकमेकांशी हितगुज करत होते. आणि ते जणू काही मला ऐकू आलं. हिरा ते खोटे खडे, प्लॅटिनम ते साधं ब्लॅक मेटल, कुठलीही घडणावळ असो, साथ लागतेच, प्रत्येक वेळी. असेच काहीसे आपले पण आहे ना?, प्रत्येक वळणावर लागणारा साथीदार वेगळा, उंच-खुजा, गोरा-काळा, शिक्षित-अशिक्षित, आपला-परका कोणीही, पण पराकोटीचा महत्वाचाच आणि राहणार, नेहेमी.  

Exactly like one of the most beautiful advertisement of Airtel, watch n njoy: https://www.youtube.com/watch?v=03wgS6f3vd8


ती धकधक

आपुलकी, जबाबदारी, जिम्मेदारी, जिव्हाळा, काळजी ई. अनेक समानार्थी शब्द आहेत एका इंग्लिश इंटरेस्टींगनेस ह्या वाक्यांशाचे / फ्रेज चे. ह्या  इंटरेस्टींगनेस ला घेऊन मी एक छोटसं संशोधन पण केलं होतं २०१४-१५ साली माझ्या एका खास विद्यार्थिनी सोबत. सुदैवाने किंवा योगायोगाने त्या वेळी देखील हे वाक्यांश चारचाकीशी निगडित होते. आज देखील मी ह्या बद्दलचं लिहिणार आहे. संशोधन करत असतांना हे ध्यानात आलं कि जर गाडीवान हा मालक असेल तर गाडीची सर्वदृष्टीने निगा राखली जाते, सांभाळली जातेच, पण जर भाडोत्री गाडीवान असेल तर मग काही विचारूच नका, हवं तशी गाडी हाकली जाते कारण ती गाडी घेण्याकरता गाडीवानाच्या खिशातली दमडी खर्च झाली नसते ना. असो. आजच नाही पण कित्येकदा मी हे अनुभवलं आहे, आज मी गाडी सोसायटीच्या बाहेर आणली तरी ड्राइवर नजरेस पडला नाही म्हणून मी त्यांना फोन केला, आले काही मिनिटात राव, म्हणून मी चालू गाडीचं त्यांच्या सुपूर्त केली आणि मी मागे जाऊन बसले. गाडीत पंखा चालू होता, रेडिओ चालू होता, सगळे कंट्रोल्स दिवे ई. देखील चालू होते. एकंदरीत काय गाडीचं चालू होती. हे आमचे नाममात्र / म्हणण्यापुरते / फुशारकी मारणारे दिग्गज ड्राइवर स्थानापन्न झाले आणि खटपट / धडपड करत / आवाज करत गाडी चालू करण्याचे प्रयत्न करू लागले. तळ पायाची आग मस्तकाला गेलीच नकळत माझ्या पण बोलून माझ्या तोंडाची वाफ दवडावीशी वाटली नाही मला कारण काहीच अर्थ नव्हता, पालथ्या घड्यावर पाणी. पाच इंद्रिये /ज्ञानेंद्रिय/ संवेदना अवयव सगळे भाड्याने दिलेत असं वाटलं मला त्या वेळी त्या ड्राइवरने. काय हे पोटातलं पाणी हालू देत नाही इतकी आरामदायी सर्वगुणसंपन्न अशी माझी ती राणी आहे, तिचे चालू असलेले सगळे कंट्रोल्स, दिवे, रेडिओचा आवाज आणि तिची हळुवार धकधक ऐकू येऊ नये हे दुर्भाग्यच. म्हणजे किती आपुलकीने कामावर येतो बघा हा माझा ड्राइवर. प्रचंड अवघड आहे. सध्या पायात माझ्या जोर नाही म्हणून अश्याना द्यावी लागते माझी राणी चालवायला. असो दिल्ली दूर नाही, मी लवकरच चालवेल माझी माझी राणी, नकोच असे हे धेडगुजरे लोक. ह्या  छोट्याश्या प्रसंगांवरून हे निश्चित समजलं कि प्रत्येक गोष्ट, कुठलेही काम, कोणाचीही वस्तू प्रेमाने वागवा, वापरा, दुसऱ्यांसाठी नाही स्वतःच्या समाधानासाठी, उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी, ते सुरेख बंध निर्माण होण्यासाठी, अगदी आत्तापासून नेहेमी.

खिचडी

ह्या शब्दाचा जैसे-थे अर्थ बघितला तर साग्रसंगीत, एकत्र, गडबड, गोंधळ, घोळ किंवा असेच तत्सम. ह्या नावाचे दोन प्रकाचे पदार्थ पण आहेत, एक तांदळाची खिचडी आणि एक साबुदाण्याची. तांदूळ डाळ एकत्र करून एका विशिष्ट प्रमाणात, धुवून, भिजवून आणि मग सुंदर तुपात परतवून केलीली अशी. साधी पण करता येते, मसालेदार पण होते, मुगाच्या सालच्या डाळीसकट पण होते, सगळ्या डाळी मिक्स अशी पण होते, कधी थोडीशी मोकळी, काही हदहद (किंचित पातळशी), कधी स्पेशल भाज्या वगैरे घालून तर कधी वेगळ्या प्रांतात करतात तशी.... बाप रे यादी फारच मोठी आहे हो, अबब च किती ते प्रकार खिचडीचे, काही मूड प्रमाणे, काही वातावरणाप्रमाणे, कधी गरजेनुसार होणार, काही वेळेनुसार केलेले असे असंख्यच, प्रत्येक प्रकार प्रचंड चविष्ट, चवदार, पौष्टिक आणि पोटाला हलका असा. इतके गुण का आहेत ह्या खिचडीचे ह्याचं गमक आज मला प्रकर्षाने जाणवलं / उमगलं. खिचडी करण्याच्या सगळ्या टप्प्यांची ती खास कमाल आहे, त्यामुळे ती चव येते कारण सगळे जिन्नस एकत्र असतात पूर्णवेळ, अगदी कच्या स्थिती पासून ते गरगटा शिजेस्तोवर. संपूर्ण प्रोसेस इतकं आनंदाने ते उपभोगतात कि चव येणारच, पौष्टिकता मुरणारच, अगदी मोजमाप, एकत्र शिस्तीत धुणे, भिजवणे, तुपासोबत भाजणे, मसाल्यांसोबत शिजणे ई. म्हणजे पर्वणीच जणू, त्या सर्व जिन्नसांची. म्हणून करणाऱ्याला आणि सेवन करणाऱ्याला देखील मज्जा येतेच.

पण आजची खिचडी फारच भलतीच झाली होती, मूळ शब्दाच्या अर्थानुसार उगाच म्हणावी अशी  खिचडी होती ती. काही तर गडबड होती हे नक्की. मग समजलं कि आमची मावशी कित्ती म्हणजे कित्ती हुषार आहे ते आणि थोडक्यात सगळं पटापट निपटवणारी अशी. आज मला सकाळी वरणभात-तूप-मीठ असं खायचं होतं आणि डब्यात खिचडी. तर ह्या मावशींनी काय केलं कि साधा भात वरण लावला कुकरला, मला थोडासा वरणभात काढून ठेवला आणि बाकी एकत्र करून दिली मला खिचडी म्हणून. काय हा शॉर्टकट, अशी असते का खिचडी? छे छे. असा दोनदा लागोपाठ वेगळ्या प्रकारचा वरण भातचं खाऊन माझं दुखणं तर फारच लांब पळून गेलं आणि मला अचूक, बरोबर, खरी खिचडी कशी व्यवस्थित होते ते उमगलं. खिचडीच्या प्रत्येक टप्प्याचं महत्व पटलं. उगाच नाही ह्या एका शब्दाचे अनेक अर्थ आहेत. असो. पुन्हा एकदा माझं लहानपण, पहिली दुसरी आठवली, यथेच्छ आईच्या हातचा वरणभात-तूप-मीठ भरभरून खायची, सर्वांची प्रकर्षाने आठवण झाली, नागपूरच्या घरची फेरी मारली गेली, अहाहा च.   तर अशी हि खिचडीची साठा उत्तराची कहाणी सफल संपूर्ण.

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...