सोमवार, ३ एप्रिल, २०२३

डा पा - वही

माझ्या महाविद्यालयाच्या दिवसात बऱ्याचदा फक्त एक वही हातात मिरवत आणणारे दिज्जग होते. त्यामुळेच असेल कदाचित थोडिशी मोठी आकाराची वही / रजिस्टर निघाले ज्यात बरीच पाने असायची. त्या पानांची वरच्या उजव्या कोपऱ्यात मग छोटेसे भाग कापून प्रत्येक विषयाला काही पाने राखून ठेवायची. अर्थात घरी जाऊन, किंवा वाचनालयात बसून त्या टिपून घेतलेल्या मुद्द्यांवर विचार करून नोट्स तय्यार होत असतं. त्यामुळे आधी छोटी वही, एक संपली कि दुसरी मग तिसरी अश्या पद्धतीने, मग मोठे रजिस्टर असे वापरले जायचे. त्या वह्या किंवा रजिस्टर जसे कसेही वापरले जायचे, कुठेही ठेवले जायचे, बऱ्याचदा अवस्था असायची त्याची, हातात पकडलेले अगदी सहज असे, अगदी तसेच आता मला लॅपटॉप किंवा आय पॅड बद्दल होतांना दिसतंय, माझ्या चार डोळ्यांना ते बघवत नाही अजिबातच. तेव्हा जश्या आई वडिलांना हव्या तेवढ्या वह्या घेऊन द्याव्या लागत असतं आता हवा तो लॅपटॉप घेऊन द्यावा लागतोय, फरक इतकाच काय तो. वह्यांच्या किमतीत येत नाही हा पठ्या पण कदाचित त्या वेळची वह्यांची किंमत आणि आताची साध्या लॅपटॉप ची कदाचित विद्यार्थ्यांना सारखीच वाटत असणार. 

दृश्य बघा हं, एका हातात चालता चालता वापरायचा असा तो मोबाईल, पाहिजेच काहीही झालं तरी आणि दुसऱ्या हातात घडी केलेला तो लॅपटॉप. कधीही, कुठल्याही अवस्थेत, घाईत बंद केलेला लॅपटॉप. तो इतका सहजतेने पकडलेला असतो जशी कि वही, किंवा कागदांची फाईल, जी पडली तरी काही होणार नाही, तोडफोड / नुकसान होणार नाही. महाविद्यालयात चालतांना, लक्ष नसतांना, कोणीही कुठेही धडकू शकतं, समोर येऊ शकतं, लक्ष नसल्यामुळे पाणी असू शकतं, काहीही शक्य आहे. इतकी मोठी बॅग दिली असतांना हातात का धरायचा लॅपटॉप? यक्ष प्रश्न आहे. शिस्त का नाही पाळायची, व्यवस्थित बंद करून मग का नाही निघायचं? सरते शेवटी तो प्रचंड महाग लॅपटॉप आहे, नाजूक आहे, काही झालं तर त्यात असलेला डेटा नाहीसा होऊ शकतो, बिघडू शकतो मग काय करायचं? बिघडल्यावर दुरुस्त करून घेण्यापेक्षा किंवा नवीन विकत घेण्यापेक्षा काळजी घेतली तर? आणि शेवटी तो विद्यार्थ्याला सहज मिळाला आहे काहीही न करता, अभ्यासासाठी. मग कमीत कमी चार वर्ष किंवा जेवढा अभ्यासाचा कालावधी आहे तो वर तरी जपला पाहिजे ना? दुसरा लॅपटॉप हा नोकरी लागल्यावर कंपनीने दिला पाहिजे, असं काही का नाही येत मनात विचार? इतका निष्काळजीपणा का? नोकरी लागल्यावर, कमवायला लागल्यावर कोणालातरी इतकं महागडं काही तरी घेऊन द्या, आणि त्याने ते असं-तसं वापरू द्या म्हणजे मग कदाचित कळेल कसं वाटत ते. 

अजून एक म्हणजे फडकं काय मारत नाहीत त्यावर कधी हे बापडे. स्क्रीन काळी ठेवलेली असते, बोलावं तेवढं कमीच आहे. असो. 


रविवार, २ एप्रिल, २०२३

डा पा - वातानुकूलित यंत्रणा

माझा लेक सध्या एका वैद्यकीय महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे. हे महाविद्यालय आधी सरकारी होते आता निमसरकारी आहे. अतिशय जुनं, ८०+ वर्षांपूर्वी स्थापन झालेली हि संस्था असल्यामुळे सगळं बांधकाम पण तसंच जुनं आहे. वैद्यकीय महाविद्यालय सरकारी, निमसरकारी किंवा खाजगी असलं तरी देखील त्याला सलंग्न असलेले रुग्णालय हे बहुतांशी गरजूंसाठी स्थापलेले असते. मोफत उपचार दिले जातात त्यामुळे बऱ्याच जणांना त्याचा फायदा होतो. काही वैद्यकीय महाविद्यालयांसोबत खाजगी किंवा मोफत उपचार न देणारे दुसरे रुग्णालय पण असते पण त्यात फक्त नावाजलेले डॉक्टर्स काम करतात, विद्यार्थी नाही.  महाविद्यालयाची इमारत कशीही असली तरी देखील विद्यार्थी दशेत असतांना अगदी साध्या रुग्णालयातच काम करायला सुरवात करावी लागते, ज्याची इमारतच काय पण सगळ्या सोयी सुविधा देखील साध्याच असतात. बऱ्याचदा रुग्णांची, डॉक्टरांची आणि त्यांची सेवा करणाऱ्या इतर कर्मचाऱ्यांची देखील गैरसोय होते पण काहीही पर्याय नसतो. डॉक्टरांना रुग्ण बरा करायचा असतो, रुग्णाला बरं व्हायचं असतं, विद्यार्थ्यांना शिकायचं असतं, कर्मचाऱ्यांना नोकरी आणि सेवा करायची असते, त्यामुळे साध्या ठिकाणी देखील अविरत कामं सुरुचं राहतात, ठेवावी लागतात. 

माझ्या लहानपणीपासून अर्धशतकी वाटचाल होईपर्यंत वातानुकूलित यंत्रणा घरी कधी बसवली नाही, त्यामुळे वापरली नाही आणि त्याची गरज पण भासली नाही कधीच.  त्यामुळे त्यावर अवलंबून राहणे तर नाहीच. नागपुरात असतांना प्रचंड ऊन असल्यामुळे भले मोठे डेसर्ट कूलर होते घरी, त्यानंतर पुण्यात तर अगदी पिटुकल्या कूलर नि काम भागतं, पंखा पण पुरेसा असतो. 

वातानुकूलित यंत्रणा घेण्याची तय्यारी तर आहे, पण का घेतली नाही ह्याचं खरं कारण मला आज उमगलं. बाकिच्यांच मला माहित नाही पण मी तरी आई म्हणून एक व्यक्ती म्हणून माझा लेक तिकडे वसतिगृहात प्रचंड उन्हात साध्या पंख्यावर भागवतो आहे तर मी कशी AC मधे अराम करणार? त्या करता मला सद्बुद्धी तर झाली नाहीच AC यंत्रणा विकत घेऊन वापरायची. सुर्यबाप्पाने अजून काही वर्ष तरी पुण्यावर अशीच कृपा ठेवावी म्हणजे फक्त मी नाही, बाकी सर्वांना त्याचा फायदा होईल. ज्या लोकांचे काम सतत उन्हात असते, फिरावे लागते त्यांना, पक्षी, प्राणी सर्वांना सुकर होईल. माणसांना पण सुबुद्धी मिळो कि त्यांनी पण सुर्यबाप्पा जास्त तळपणार नाही ह्याची खबरदारी नक्की घ्यावी. झाडं टिकवावी, सिमेंटचे जंगल कमी करावे प्रयत्नपूर्वक, म्हणजे सगळ्यांचा फायदाच फायदा, नाही का?  चला तर मग लागू या कामाला. 

डा पा - खरं कारण विदर्भ

माझ्या बाबांची सरकारी नोकरी आणि त्यामुळे सततच्या बदल्या. ह्या मुळे आम्ही खूप ठिकाणी वास्तव्याला होतो. निवृत्तीच्या आधी बरीच वर्ष म्हणजे अगदी माझ्या शालेय टप्प्याच्या प्रारंभापासून मग नागपुरात राहणं झालं सलग. नागपुरतंच इतकी वर्ष का राहायला मिळालं ह्याच खरं कारण मला आज समजलं, त्या मागचं गमक, त्याची पूर्वतय्यारी, प्लांनिंग म्हणा हवं तर. नागपुरात एक खास पद्धत आहे, पंगतीत किंवा ताट वाढतांना आवर्जून तिखट वाढलं जातं पानात किंवा तिखटाचं तेल.  उदाहरणार्थ पालक किंवा मेथीची पातळ भाजी असली कि त्यावर खाते वेळी तिखटाचं तेल घेण्याची पद्धत, किंवा अलिखित नियम म्हणा हवं तर.  ह्या मागचं फारच सोप्प कारण किंवा विचार असा कि नागपूर म्हणजे प्रचंड तिखट आणि प्रत्येकाच्या चवीप्रमाणे एक भाजी होणे कठिण. म्हणून सर्वसाधारण चवीची भाजी करायची, किंवा पदार्थ करायचं आणि त्यावर ज्यांना हवं त्यांनी जास्तीच तिखट घ्यायचं, तक्रार करायची नाहीच मुळी कि "किती मिळमिळीत भाजी आहे, तिखटाचा पत्ताच नाही, काही करता येत नाही, किंवा आईने काही शिकवलंच नाही...." ई. नकोच. पानात जर यदाकदाचित वाढायचं राहील तर सर्रास मागून घेतलं जातं तिखट तेथे.  मस्त आहेत माणसं. 

आता अनेक वर्ष नागपुराबाहेर राहून देखील हि तिखट तेलाची प्रथा माझ्या घरी सुरूच आहे अविरत. पातळ भाजी करायची ठरली किंवा सरते शेवटी गॅस बंद करण्याआधी तिखटाचं तेल केलं जातंच, हाताला, जिभेला ती सवय लागली आहेच कायमची. अहाहा च. आणि त्यात आता मला माझ्या लेकीची पण साथ, मग काय विचारता. एक तिखट पार्टनर माझी, नेहेमीसाठीची. 

माझ्या ह्यांना एक तर तिखट नकोच, मसालेदार तर नाहीच नाही आणि टाकलंच तर अगदी चिमूटभर तिखट, प्रत्येक पदार्थात. आणि मी म्हणजे दुसरं टोक, प्रचंड तिखट, ठेचा, वरून तिखट नेहेमीच. काही वर्ष चिडचिड झाली, ह्यांना त्रास झाला, मग दोन वेगळे तिखट असलेले पदार्थ पाळले गेले, वेगळे काढले गेले, कधी कधी मला संपूर्ण विसर पडला कि मी माझ्या विदर्भाची आहे, तिखटावर हात असलेली. अश्या वेगवेगळ्या प्रयोगाअंती आता प्रकाश पडला कि अशी वरून तेलाची, ठेच्याची सवय माझ्या लहानपणीपासून का जडली? माझी जडण घडण नागपुरात का झाली? अगदी नकळत वयापासून? कारण मला, माझ्या हाताला हि वरून घ्यायची सवय असावी, हवं तेवढं, नावापुरतं तिखट, मसाले घालून पदार्थ करता यावे ई. अहाहा च. काय म्हणावं त्याला? कित्ती वर्षापूर्वी त्याची तय्यारी सुरु झाली आणि आपण सगळेच उगाचच म्हणतो "देव कुठे आहे? तो काय करतो?". काय करतो? बघा म्हणावं, काय नाही करत, उगाचच दोष द्यायचा "त्याला" इतकं प्लांनिंग करून, सवयी लावून, विचारपूर्वक कृती करून, सातत्याने कार्यरत राहून केवळ तुमच्या प्रत्येकाकरता. मी तर "त्याच्या" प्रेमात होतेच, पण आज प्रकर्षाने ते प्रेम कित्तीतरी प्रमाणात वाढलं. आणि फक्त हेच नाही, अजून बऱ्याच अश्या गोष्टी आता स्फटिकासामान स्पष्ट व्हायला लागल्यात.           


बुधवार, २२ मार्च, २०२३

माझ्या डायरीतलं अजून एक पान

माझ्या संपर्कांत आलेल्या असंख्य लोकांपैकी एक खास, माझी मैत्रीण म्हणायला हरकत नाही, ती तशी वयाने, मानाने, अनुभवाने मोठी होती / आहे माझ्यापेक्षा पण तरीदेखील आमची एकदा जी ओळख झाली आणि अजून टिकून आहे. आमच्या तारा फार पट्टिकिनी जुळल्या तेव्हा. तिचाच एक किस्सा येथे नमूद करावासा वाटतो आहे, थोडक्यात सांगते, मुद्द्यावर येते. 

तर तिला एक गोंडस बाळ झालं, थोडसं उशीरा सामाजिक दृष्टीने, आणि काही कारणास्तव तिने झटकीपट निर्णय घेऊन उपचार घेतले आणि त्याचा परिणाम म्हणून हे बाळ जन्माला आलं. उपचार घेणे हा फक्त तिचा एकटीचा धडाडीचा निर्णय होता आणि स्वप्नात देखील हे तिच्या विचारपल्याड होतं कि तिने ते नवऱ्या व्यतिरिक्त अजून कोणाला सांगावे.  गरजच नव्हती. ती दोघे आणि डॉक्टरची फौज च फक्त सगळं सांभाळत होती. पण एकदा नवरोबांनी नकळत काही वर्षांनी ते जगजाहीर केलं आणि सासरी सांगून टाकलं त्या मुलाच्या जन्माचं रहस्य / कहाणी / प्रोसेस. बास मग काय, वर्षाव सुरु झाला त्या दोघांवर. इति सासरकडचे: "तरीच आम्हाला फरक जाणवतं होताच, फक्त आम्ही तो बोलून दाखवला नाही कधी तुला, तुझा मुलगा अगदी ढ आहे, तो कधीच पुढे येणार नाहीच, काहीही करू शकणार नाही, काय करून ठेवलंस हे तुझं? आयुष्य बरबाद केलंस, आता तुझं कसं होणार?....." आणि हे पाढे सुरूच राहिले सतत, खूप वर्ष. ती भीती मग माझ्या मैत्रिणीच्या पण मनात घर करून बसली कारण खूपच प्रमाणात ते सातत्याने सांगितलं जायचं, कुटुंबातल्या बाकी मुलांसोबत सतत तुलना केली जायची आणि काही विचारू नका. तसं पाहिलं गेलं तर त्या मुलाची वाढ अगदी बाकी कुठल्याही मुलाप्रमाणे होत होती, आहे, म्हणजे शारीरिक, सामाजिक आणि मानसिक ई. पण का कुणास ठाऊक भीती मुळे कदाचित ह्या माउलीने कळत - नकळत थोडीशी जास्त कडक शिस्त बाळगली, सगळं शिक्षण व्यवस्थित पार पडलं, पुढील खास क्षेत्रातलं शिक्षण घेणं सुरु आहे, मित्र मैत्रिणी आहेत, मुलगा जगावेगळा हुशार नाही पण ढ नक्कीच नाही आहे.  जरी ह्या भीतीचा माझ्या मैत्रिणीच्या तब्बेतीवर जगावेगळा परिणाम झालाच, भोगावं लागलं, भोगते आहे, पण मुलगा वेगळा नाही निघाला. जगभर असंख्य पालक वैविध्य कारणास्तव वेगवेगळे उपचार घेतात, बाळं जन्माला येतात आणि सगळं सुरळीत होतं देखील. इतका मोठा काळ मधे सरला, तिने मग गूगल विद्यापीठाला विचारलं, शोधलं, शोध निबंध वाचले / चाळले, ठराविक प्रतिष्ठित डॉक्टर्स शी संवाद साधला आणि फरक जाणून घेतला. हे आधी करायला हवं होतं. असो. पण सरते शेवटी सर्वानुमते दोन ठळक गोष्टी समजल्या  

१. नैसर्गिक पद्धतीने किंवा उपचार घेऊन बाळ जन्माला आलं तरी दोन्ही सारखेच असतात आत बाहेर, काहीही फरक नाहीच 

२. नैसर्गिक पद्धतीने किंवा उपचार घेऊन बाळ जन्माला आलं तरी दोन्ही मधे कुठलीही खात्री नसते कि कुठलं बाळ किती हुशार असणार, ते समाजात कसं मिसळणार, त्याची वैचारिक पातळी काय असणार, त्याची वाढ कशी होणार ई. किंबहुना कधीच कशाचीच कधीच खात्री नसतेच, नाही का?

इतक्या खालच्या पातळीला जाऊन, गरज नसतांना त्रास देणं ते देखील स्वतःच्या मुलाला, सुनेला आणि नातवाला हे शिक्षित लोकांचं लक्षण नाहीच मुळी. अर्थात 

जे होतं ते चांगल्यासाठी एवढंच काय ते खरं. आणि जशी कुठल्याही पद्धतीने बाळ जन्माला आलं तरी काहीही फरक नसतो हे त्या सासरकडच्यांनी सिद्ध केलं, ते स्वतः नैसर्गिकरीत्या जन्माला आले, तरी इतकी साधी वागण्याची पद्धत ज्यांना समजत नाही त्यांचा कायच उपयोग, कोण हे इतक्या अधिकाराने बोलणारे, ना उच्च विद्या विभूषित, ना डॉक्टर्स, ना प्रेमळ आई वडिल. असो, हा न संपणारा विषय आहे. 

सोमवार, २० मार्च, २०२३

तो बदल

माझ्या लहानपणीपासूनच अनुभवलेलं लिहायचा मला अधिकार आहे, त्या आधी काय होत होतं ते नकोच. तर मी नेहेमीच भल्या मोठ्या घरात वावरले. त्या वेळी गगनचुंबी इमारती असतात हे देखील मला ठाऊक नव्हतं. शहरात राहून सुद्धा बैठी घरं, बंगले त्या भोवती सुंदर फुललेला, सुगंधाने बहरलेला, सुशोभित, शानदार बगीचा. त्यात असंख्य फुलझाडं, फळांची झाडं, वेली, वृक्ष, भाज्या, दुर्वा, नक्की एखादं कडुलिंबाचं झाडं, आंब्याचं झाडं ई. लावलेले आणि जपलेले असायचेच. सगळंच घरी, हेच बाळकडू मिळालेलं. सर्वत्र हेच वातावरण आणि हिच प्रथा, एक सारखं सगळं आजूबाजूला, जमीन अस्मानाचा फरक नाहीच मुळी. त्यामुळे प्रत्येक धार्मिक कार्याला सगळं घरीच उपलब्ध असायचं, पत्री, फुलं, पानं, अगदी विड्याची पानं देखील. नसतीलच काही कारणांनी तर शेजार देखील बहरलेला आणि फुललेला. त्यात आई, आजी मंडळी घर उत्कृष्ट सांभाळणारी, त्यामुळे सगळं पुढच्या फाटकापासून ते मागच्या आंगणापर्यंत लखलखीत, सजलेलं, संभाळलेलं असंच. काहीच बघायला नको. प्रत्येक पूजा बहुतांशी घरचेच लोक करायचे, पण गुरुजी आलेच तर ते फक्त स्वतः यायचे, पूजा करायचे, दक्षिणा प्रसाद घेऊन निघून जायचे.  आता फ्लॅट संस्कृती + घरची स्त्री उंबरा ओलांडलेली, त्यामुळे मग गुरुजी हा संदर्भ बदलला, पुरता बदलला. सगळे सामान गुरुजींनी आणणं जास्त सोयीस्कर झालं. आता यजमान फक्त बसतात तय्यार होऊन, बाकी सगळं गुरुजी घेऊन येतात. ३६० अंशाचा असावा हा बदल नाही. अर्थात पूजा होणं महत्वाचं, ते संस्कार, लहरी / तरंग (व्हाईब्ज) निर्माण होणं अत्यावश्यक, पूजेसाठी लागणारी प्रत्येक गोष्ट उपलब्ध होते त्यामुळे, काहीही कमी पडत नाही, सर्वांनाच समाधान आणि सुकर असा हा बदल. 

माझ्या सोसायटीत एक मस्त-मौला काकू राहतात. त्या हाडाच्या शिक्षिका आहेत, एक वेगळं रसायन देखील आहेत आणि आता निवृत्त झाल्या आहेत. त्यांनी काल एक पोस्ट शेअर केली आम्हा सर्व मुलींसोबत. त्यात असं नमूद केलं होतं कि "स्वयंपाकाच्या मावशी सुट्टीवर आहेत? तर स्वीगी नकोच आता. शेफ ला कळवा तो / ती येऊन तुमच्या घरी स्वयंपाक करून खाऊ घालेल". अप्रतिम भन्नाट अशी कल्पना आहे हि. मला तर फारच आवडली. मी अजून त्या संकल्पनेचा व्यवस्थित आढावा घेतला नाही, चौकशी केली नाही किंवा चर्चा देखील. पण करीन म्हणते, लवकरच. असं काही उपलब्ध असेल तर कित्ती छान ना, अमृततुल्य असे घरचं खायला मिळेल, चव बदल आणि शिवाय दिज्जग व्यक्तीच्या हातचं जो ह्यात माहीर आहे, अहाहा च. वर नमूद केलेल्या गुरुंजी सारखा तो पण जर सगळं साहित्य, इंडक्शन कुकर, कुटुंब संख्येनुसार भांडे घेऊन आला तर फक्त घरच्यांनी वीज उपलब्ध करून द्यायची आणि यथेच्छ खायचं, बास. कित्ती मस्त ना, म्हणजे जे शेफ झालेत त्यांना खूप मोठी गुंतवणूक करून त्यांचे रेस्टॉरंट सुरु करायला नको, ते सांभाळायला नको, लोकं येतील कि नाही ह्याची चिंता तर नकोच, जाहिरातीचा खर्च नको, खुर्च्या, टेबल, वाट्या चमचे ई. काहीच पसारा नको. जशी गरज तसे घरोघरी जा मस्त स्वयंपाक करून खाऊ घाला आणि पैसे कमवा.  मी तर अगदी फिदा च झाले हि संकल्पना ऐकून, ज्याच्या कोणाच्या सुपीक डोक्यातून हि आली असेल त्याला साष्टांग नमन. हो अर्थात माझ्या लहानपणीपासून लग्न कार्याला येणारे स्वयंपाकी बघितले आहेत मी, पण ते यायचे जेव्हा फार मोठ्या प्रमाणात आणि काही दिवस भरपूर करावं लागायचं तेव्हा. त्यांची पूर्ण चमू यायची. हे शेफ प्रकरण अत्याधुनिक आहे, एकट्याचा खेळ आहे.   

आमच्या माहितीतले दोन गुरुजी आहेत ज्यांनी पूजा करून भला मोठा बंगला बांधला आहे पुण्यात, दुसरे गुरुजी होंडाची सर्वात मोठी गाडी मधून मिरवतात.  ह्याचा अर्थ सरळ आहे कि हा दिसतो छोटा व्यवसाय, एकाने चालवलेला पण मस्त चालतो. प्रत्येक शेफ चे आपले दुकानचं असावे असं थोडीचं आहे. 

सौंदर्य प्रसाधन गृहाचे पण अगदी तसेच आहे नाही का? भला मोठा खर्च, गुंतवणूक करण्यापेक्षा घरोघरी जाऊन सेवा द्यायची आणि कमवायचं, समाधानाने. 

सरते शेवटी घरच्या खाण्याची सर कुठेच नाही. स्वस्थ खा आणि मस्त राहा. एकदा शेफ ला घरी बोलावून तर बघा, आवडेल तो बदल सर्वांना. 

रविवार, १९ मार्च, २०२३

लेस इज मोअर

 मी ह्या आधी लिहिल्या प्रमाणे, अगदी लहानपणी पासून छोट्या छोट्या गोष्टी वाचायला प्रचंड आवडतात. मोठीच्या मोठी कादंबरी ज्यात लांबलचक कथा सुरूच राहते हे शांतपणे संयम बाळगून वाचत राहणं हे माझं काम नाहीच मुळी. कथा सुरु होऊन, संपून त्याचं तात्पर्य समजलं कि दुसरी कथा, असं मला खूप आवडतं.  हि माझी जुनी सवय आता अत्याधुनिक पद्धतीने गोष्टी सांगतात तेथे पण सुरु राहिली आहे. युट्यूब च्या माध्यमातून सांगितलेल्या पण बऱ्याच अप्रतिम गोष्टी आहेत आणि त्या मी बघत असते, आनंद घेत असते, पण पुन्हा एकदा छोट्या, कमी वेळेच्या. तंत्रज्ञानामुळे खूप सुंदर वाखाणण्यासारखे बदल झाले आहे जाहिरात क्षेत्रात देखील आणि अनेक व्यवसाय त्याचा बखुबी उपयोग करून घेत आहेत. जाहिरातींच्या नावाखाली सुंदर गोष्ट सांगितली जाते, त्या पात्र पण असतात आणि संदेश देखील. मोठ्या मोठ्या व्यवसाय करणाऱ्या कंपन्या उतरल्या आहेत इथे आणि त्यामुळे माझ्यासारखीला ती एक पर्वणीच आहे, पोटभर सुख भोगते मी त्या सगळ्या गोष्टी बघून. भंडार आहे अक्षरशः अश्या गोष्टींचा ऑनलाईन, बघावं तितकं नवलंच आणि न संपणारं असं. 

एक मुलगी एका मुलाशी ऑनलाईन व्हिडीओ चॅट करत आहे असं पाहिलं दृश्य आहे आणि त्याने सुरवात होते. ती किंचितशी नाही पण जरा जास्त वैतागलेली दाखवली आहे कारण मुलगा परदेशी असतो, ३ महिने काम आहे म्हणून जातो आणि आता काही ८ महिने झाले असतात असा संवाद चालू असतो तेवढ्यात दारावरची घंटी वाजते.  तशीच ती दार उघडते तो त्या मुलाचे आई-वडील दारात उभे, ती व्हिडीओ चॅट स्क्रीन तशीच चालू, आधीच गोंधळ त्यात वाढतो. तेवढ्यात त्याची आई एकमेकांना हाय हॅलो करून झाल्यावर विचारते "देऊ का रे? सांगू का एकदाचं?". काही समजायच्या आत मुलाची आई गुढग्यावर बसून सुबक, सुंदर, देखणी, मौल्यवा, तरुण आंगठी पुढे करत म्हणते "करशील माझ्या मुलाशी लग्न?". तिला काय उत्तर द्यावं ह्या बद्दल समजत नाही. सासू (होणारी): "ह्या वयात गुढगे दुखतात गं, जास्त वेळ नाही बसता येणार मला".  

हे सगळं मंत्रमुग्ध होऊन मी बघत होते आणि मी उडाले, हरवले, एक वेगळीच अनुभूती आली. कित्ती म्हणजे कित्ती ताकद असते ह्या माध्यमांमधे. ते प्रेक्षकांपर्यंत पोचत नाहीत साधे तर काळजाला भिडतात, थेट, आरपार. आणि त्या पल्याड म्हणजे मी ह्या सर्वांकडे फक्त जाहिरात म्हणून नाही तर हे बघितलं कि त्या सातासमुद्रापार असलेल्या त्या मुलाने हि अशी भन्नाट आयडियाची कल्पना आधीच्या पिढीतल्या आई-वडिलांना सांगायची, ती त्यांनी स्विकारायची आणि अमलात आणायची, हि सगळी प्रोसेस कित्ती वेगळी आहे. हे असं कुठेतरी, कोणाबरोबर तरी प्रत्यक्षात घडलं असणार आहे म्हणून ते जाहिरात स्वरूपात माझ्या सारख्या सामान्य प्रेक्षकाला दिसलं आणि समजलं. ज्या कुटुंबात हे बीज पेरलं गेलं त्याच्या बद्दल बोलण्यास माझ्याकडे एकही शब्द नाहीच माझ्या शब्दकोशात. अशी माणसं पण आहेत? ह्या जगात? हे ऐकून, बघून, जाणून धन्य झाल्यासारखं वाटलं. किती तरी पिढ्या ना मस्त पद्धतीने कित्ती आणि काय-काय शिकवून गेलेत बघा काही मिनिटांच्या जाहिराती मधून.  धन्य तो मुलगा ज्याला हे असं सुचलं, त्याहून धन्य ते आईबाबा ज्यांनी फक्त तय्यारी दाखवली नाही तर अत्यानंदाने कृती केली, हो म्हटले, तरुण दिसणारी आवडेल अशी सुंदर आंगठी विकत घेतली, मुलीच्या घरी आले, सरप्राईझ दिलं, अत्याधुनिक पाश्यात्य पद्धतीने गुढग्यावर बसून ऐटीत मागणी घातली, कोणाची बिशाद हो ह्या नंतर नाही म्हणायची? अहाहा च.  

बहुतांशी वर्तमानपत्रात किंवा इथेतिथे ऐकून, वाचून आपण नकळत सैरभैर होतो, कारण वर्तमान पात्रात अगदी पहिल्या पानांपासून भरपूर नकारात्मक बातम्या असतात. कुठंतरी शंका-कुशंका घर करतात. त्यात कामाचा ताण, आणि बरीच बाकीची कारणं. अश्या ह्या दलदल वाटणाऱ्या परिस्थितीत सुगंधी, प्रसन्नता वाढवणारं कमळ उगवावं अशी हि जाहिरात. नकारात्मकता समूळ नष्ट करून सकारात्मकता, उत्साह, ऊर्जा, ताकद निर्माण करणारी अशी हि गोष्ट. हि जाहिरात किंवा अश्या पद्धतीच्या वेगळ्या धाटणीतल्या जाहिराती, शॉर्ट फिल्म्स मोठ्या प्रमाणात जनसमुदायापर्यंत पोचाव्यात हि अपेक्षा. 

वैचार्य आणि जिभभान

देहभान ह्या सदराखाली एक खास लेख इतक्यातच वाचनात आला. त्यात लेखकाने गंभीर नाही पण एका ज्वलंत विषयाला हात घातला आहे. त्या लेखाचा विषय / शीर्षक बघितल्यावर उत्सुकतेने मी तो वाचायला घेतला आणि अगदी शेवटच्या ओळीपर्यंत माझी ती उत्सुकता कायम होती, कारण माझी नजर काहीतरी वेगळं शोधत होती. ते महत्वाचं असं मला आता वाचायला मिळेल, पुढील परिच्छेदात मिळेल असं वाटलं. अनेक पेहेलू, वैविध्य घटक मांडले आहेत लेखकाने, अतिशय खोलात जाऊन, विचार करून असे. असो. माझे काही विचार आहेत हा लेख वाचल्यानंतर किंबहुना ह्या विषयाबद्दल ते आता मी थोडक्यात येथे मांडते आहे. 

"डाय एम्प्टी (Die Empty)" नावाचं एक जगप्रसिद्ध पुस्तक, वाङ्‍‍मय, एक साहित्यातला शिरोमणी असलेलं माझ्या वाचनात आलं, मग आम्ही त्यावर चर्चा देखील केली एकत्र. त्या पुस्तकाचा विषय जरी वेगळा असला तरी तो गाभा कायम टिकवून मी भारतीय कौटुंबिक पार्श्वभूमीवर आधारित लिखाण करावं हा प्रकर्षाने विचार करते आहे. मूळ पुस्तकाचा विषय हा प्रत्येकाच्या डोक्यात येणाऱ्या अप्रतिम, सुंदर, नाविन्यपूर्ण कल्पना आणि त्या बद्दलचा उहापोह हा आहे. लेखकाच्या म्हणण्यानुसार नवीन कल्पनेला मूर्त रूप द्या, चर्चा करा, स्वतःकडे जपून / लपवून ठेवू नका, मोकळेपणाने / उघडपणे सांगा आणि अमलात आणा. सगळ्या अप्रतिम कल्पना उराशी बाळगून, त्याचं जडत्व / ओझं सांभाळत निघून जाऊ नका. मोकळे व्हा. 

तसेच प्रत्येकाला जे दुसऱ्यामधे चांगलं दिसतं, आढळतं ते सांगून मोकळे व्हा. भारतीय लोकांची सवय हि आधी हातभार लांब यादी करायची आणि उणेदुणे काढायची आहे.  न विचारता  लांबलचक यादीच द्यायची काय काय चुकतं ते. खूप क्वचित चांगले उद्गार मुखातून निघतात, पट्टाकिनी. 

माझी सर्वांना मनापासून विनंती आहे कि चांगलं बोला, जे आवडलं आहे ते समोरच्याला सांगा, कृतज्ञता व्यक्त करा, गोड बोला, प्रोत्साहन द्या ई. हे मी काही थोडके शब्द किंवा संज्ञा इथे दिल्या आहेत. आणि हे सर्व प्रथम घरच्या, आपल्या माणसांसाठी निश्चित करा, बाहेरच्यांसाठी तर आपण करतोच. आणि मग बघा प्रत्येक नाती कशी फुलतील, बहरतील आणि टिकतील ते. आपल्या माणसाला गृहीत धरून सारखं घालून पाडून बोललात तर कुठलीही कृती हि मनापासून, आवडीने, उत्साहाने घडणार नाही. घरातलं वातावरण पण मग दूषित होऊ शकतं आणि माझ्या दुर्ष्टीने हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहेच. प्रत्येकजण अगदी प्रत्येकजण चार चांगल्या शब्दांचा भुकेला असतोच. मध पेरा जिभेवर आणि बघा तरी स्वतःला कित्ती म्हणजे कित्ती भन्नाट वाटतं ते. "अती तेथे माती", हे लक्षात ठेवून उगाचच, धरबंध नसल्यासारखं गोड पेरू नका, मधुमेह होईल नाहीतर. पण उगाचच मोठे आहात म्हणून, अधिकारी आहात म्हणून, किंवा तुमची सवय म्हणून रागावू नका, चुकीचे शब्द बोलू नका, भरमसाठ अपेक्षा ठवू नका, पुढच्यांचा विचार करा आणि बघा तुम्हाला किती समाधान वाटेल ते. तुमचा दृष्टिकोन बदलाचं मंडळी, स्वतःसाठी तरी. ह्या अश्या पद्धतीने एक्सिट घ्या, "डाय एम्प्टी (Die Empty)". नाण्याला दुसरी बाजू असतेच हे लक्षात असू द्या, "जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे", फक्त मी काय ते महान बाकीचे नाही हि धारणा चुकून बाळगत असाल तर संबंध बिघडलेच म्हणून समजा. समोरच्याला प्रेम, आपुलकी, काळजी, हवीशी वाटणे होईल ते फक्त मधामुळे. सातत्य महत्वाचं. कोणीही काहीही एकट्याने करूच शकत नाही, आपल्या जवळचा व्यक्ती हि तितक्याच पातळीवर, कणभर जास्त करत असते, ते दिसत असतं पण बोलून दाखवायला जातं नाही सहसा कोणी, आणि मग कुरबुरी सुरु होऊ शकतात, ज्या मग वेगळ्या वळणावर येऊन थांबतात.  तो मार्ग निवडण्यापेक्षा मधाळ रस्ता बरा, नाही का? प्रयोग म्हणून तरी करून बघा, बाकी कश्याची गरज भासणार नाहीच. फुकट आहे उपलब्ध फक्त ते जाणून बुजून नक्की वापरा. जिभेवर साखर पेरण्याकरता समोरच्याचा तसा विचार व्हायला हवा सर्वप्रथम. 

(With due respect to the writer and his deep thought process, giant experience etc behind this article) बाकी लेखात मांडलेले मुद्दे हे गौण ठरतील जर अँप्रिशिएट करण्याची सवय बाळगली तर. "पेराल ते उगवेल" त्या पद्धतीने, अँप्रिशिएट करा आणि ऍप्रिसिएशन मिळवा, करत राहा मिळवत राहा, कुठलीही इच्छा पूर्ण करणे सोप्प आहे कि नाही?

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...