माझ्या मते, या जगातील कोणत्याही सजीवाला किंवा माणसाला रागाचा एक थेंबही आवडत नाही. मग तो कोणीही असो किंवा कुठल्याही कारणास्तव तो राग व्यक्त करत असो. शांत, गोड आणि प्रेमाने बोललेलेच जास्त पटते, समजते आणि मनाला भिडते.
हे पुन्हा एकदा मला प्रकर्षाने जाणवले, की शब्दांनाही वेदना देण्याची ताकद असते. एखादे रागाने ओतप्रोत भरलेले वाक्य बोलण्याआधी, क्षणभर थांबून, तेच वाक्य नव्या विचाराने मांडून बघा. यामुळे समोरच्या व्यक्तीलाच नाही, तर तुम्हालाही एक वेगळे समाधान मिळेल. मनाला, शरीराला, समाजाला एक नवी ऊर्जा मिळेल. जर इतके फायदे असतील, तर ही सवय का नाही लावून घ्यायची? चला, आतापर्यंत जे झाले ते ठीक आहे, पण यापुढे हे नक्की करूया.
काचेचेही अगदी तसेच आहे. तिलाही मार सहन होत नाही. ती तुटते. इथे मी 'शाब्दिक मार' या अर्थाने काचेची तुलना केली आहे. पण आजच्या तंत्रज्ञानामुळे त्याच काचेने प्रचंड आघात सहन करण्याची क्षमता मिळवली आहे. आजच्या 'टफंड ग्लास'मुळे अख्खा ड्रम एका पिशवीत मावतो आणि तो पूर्वीपेक्षाही अधिक सक्षम झाला आहे. हा बदल तिला करावाच लागला, कारण प्रवाहासोबत चालणे आवश्यक होते. पण केवळ पर्याय नाही म्हणून नाही, तर अत्यंत आवडीने हा बदल स्वीकारला गेला आहे.
कोणतीही थेट समानता नसली तरी, मागे वळून पाहताना मला जाणवते की, माझ्या बाबतीतही प्रत्येक जण मला रागावूनच गेला, जणू रागावणे हा त्यांचा अधिकारच होता. याचा अर्थ मी वाईट होते असे नाही, पण ते माझ्या आयुष्याला आकार देण्यासाठी लिहिलेले महत्त्वाचे धडे होते. सुरुवातीला जरी राग आवडला नसला, तरी त्या रागाचे आघात सहन करत मी शांतपणे पुढे जात राहिले. मार खातच मी घडले. आता मात्र, इतरांना अनावश्यक मार खाऊ द्यायचा नाही, हा माझा प्रयत्न आहे.
जे मला आवडले नाही, तेच वारंवार समोर आले आणि मी घडले, अगदी त्या काचेसारखी. जशी काचेत विविधता असते, तशीच माणसांच्या स्वभावात आणि सहनशीलतेतही असते. प्रत्येकजण वेगळा आहे. पण आज, तीच स्मार्ट काच प्रत्येक घरात आहे. तिच्या प्रवासातून, नाजूकतेकडून सक्षमतेकडे जाण्याचा धडा ती आपल्याला शिकवत आहे.