गुरुवार, ५ ऑगस्ट, २०२१

गुरुजी एक माणुस च

आज फिजिओथेरपी घेऊन परत येतांना मी माझी ऑटो रिक्षा राईड प्रचंड एन्जॉय करत होते, कारण पोटातलं पाणी देखील हालत नव्हतं. इतकी नव्वी कोरी रिक्षा होती म्हणून सांगते, कि जशी काही आत्ताच माझ्याच साठी शो रूम मधून बाहेर आली आहे. अर्थातच तो चालक पण लै भारी चालवत होता रिक्षा.  

माझ्या घराच्या रस्त्यावर एक भेळ वाला आहे, ठेला आहे आणि तो चालू आहे. स्मार्ट पद्धतीने त्याने एक मराठी पाटी लावली आहे, कि "पार्सल सेवा सुरु" पण प्रत्यक्षात बरीच मंडळी घोळका करून खाणं एन्जॉय करत असतातच. आज पण त्या ठेल्यावर एक जण होते, बिच्चाऱ्याना भूक लागली असेल किंवा काही तरी बदल हवा असेल किंवा अजून काही कारण असेल. पण ते बघून मी पोट धरून हसले हो. खरं तर हसायला नको होत मी, पण... सॉरी. आता लहानपणी पासून माझ्या डोळ्यासमोर एक ठराविक छबी आहे त्या व्यवसायाची, त्यात रस्त्यावरच्या ठेल्यावर उभे राहून खाणं नाही आहे / नव्हतं. पण आता ह्या पुढे नाही हसणार, पक्के प्रॉमिस.

चक्क एक टिपिकल गुरुजी  / पुजारी खात होते हो, आणि अचानक मला दिसले, त्या त्यांच्या पोषाखात. आणि ते माझ्या "गुरुजी" ह्या परिभाषेत नाही, पण असो. शेवटी ते पण एक माणूसच ना, हे मला समजायला हवं होत, आणि काय हरकत आहे. असो.  खूप दिवसांनी / महिन्यांनी गुरुजी ना कामाला जाताना / येतांना बघून फार बरं वाटलं, सुरु झालं वाटतंय त्यांचं रुटीन. गुड.


बुधवार, ४ ऑगस्ट, २०२१

ह्या आवडीचं काय करायचं?

कदाचित मी नागपूरची असल्यामुळे, किंवा घरीच वैविध्य पदार्थ होत असल्यामुळे, आणि आजूबाजूला, मित्र मैत्रिणीच्या परिवारातले सगळे आवडीने / प्रेमाने खाऊ घालण्यात पटाईत असल्यामुळे असेल मी एवढी खवैयि आहे. मला मध्यरात्री उठवून दिल तरी मी पुडाची वडी, वाटली डाळ, इडली, मसाले भात, शेंगोळे, गोळा भात, वडा भात, बिरड्याची उसळ ई. पदार्थ यथेश्च फस्त करीन, नक्कीच.

अजूनही मला खाऊ घालणारे कमी नाहीतच. माझी एक मैत्रीण आहे, तिने परवा कळवलं कि उद्या वाटली डाळ आहे, मी ताबडतोब मागवली, तिने पाठवली पण मी त्यावेळी ऑफिस ला होते.

जशी मला पदार्थांची प्रचंड आवड, तशीच अजून एका उपचार पद्धतीची पण मी भक्त. डॉ. लिना औटी ह्यांनी मला त्या प्रकारच्या उपचाराची फक्त ओळखच नाही करून दिली पण त्याने मला खूप पट्टाकिनी फायदा पण झाला. मॅट्रिक्स थेरपी असं त्याच नाव. हि थेरपी आणि उपचार करण्याकरता खूप वेळ लागतो, त्यामुळे डॉ. लिना ह्यांच्या संयमाची कमाल आहे. कुठेही घाई न करता अचूक उपचार मिळणे हे पण फार महत्वाचं आहेच. मी नेहेमी गेले कि त्यांना विचारातच असते, ह्या करता मॅट्रिक्स वापरता येईल का? कारण त्याचे फायदे. असो.  

काल मी फिजिओथेरपी सेशन करता पोचले तर डॉ. म्हणतात कश्या आज आपण मॅट्रिक्स करू. आणि त्याच वेळी घरी वाटली डाळ वाट बघत होती माझी. आता? मग मी म्हटलं कि मॅट्रिक्स उद्या करू या प्लिज. थोडेसे व्यायाम आणि बाकी उपचार घेऊन मी घरी आले आणि यथेच्छ आनंद उपभोगला उत्कृष्ट चवीच्या आयत्या मिळालेल्या वाटल्या डाळीचा, अहाहा. माझ्या कडे शब्दच नाहीत हा अनुभव वर्णन करण्याकरता. कोण म्हणत वाटली डाळ हि फक्त चटणी एवढी खायची आणि ती पण जेवतांना? अजिबात नाही. मी लहान होते, कुमारिका म्हणून मला सन्मानानी पंगतीत बसवलं जेवायला आणि वाढली चमचाभर डाळ. तेथेच विचारलं मी "कमी आहे का डाळ? नाही ना,मग वाढा कि जास्त" बाप रे, काय हे भर पंक्तीत, छे छे. आता आठवलं पण फार वाईट वाटतंय माझ्या वागण्याचं. तर अशी मी डाळ भक्त.

माझ्या सुगरण मैत्रिणीला, तेजस्विनी मुळे ला शतश: धन्यवाद काल मला डाळ खाऊ घातल्याबद्दल.  


पत्र

 चि. नील, वेद, केदार आणि मानस,

हॅलो. सालबादाप्रमाणे, ह्या वर्षी पण माझं मराठीतलं पत्र तय्यार आहे ह्या राखीच्या निमित्याने. थोडासा बदल केला आहे, कारण "Change is the only constant". तो बदल असा, कि खालील पत्र हे सगळ्या भावांसाठी आहे, एकच पत्र, आणि त्यात प्रत्येकासाठी मुद्दे लिहिले आहेत. दरवर्षी प्रमाणे राखीच्या दिवशी पत्र वाचन होईलच आणि मी पोटधरुन हसणार पण, सॉरी पण मी ह्या दिवसाची वर्षभर वाट बघत असते.

राखण करणारा आणि त्याचं इंद्रधनुषी प्रतीक म्हणजे राखी आणि हा राखीचा सण. तो सण आता उंबरठ्यावर उभा आहे. आज आणि भविष्यात मोठ्या भावाने रक्षण करायचं म्हणजे काय? बहिण थोडीशी गोंधळली, कन्फ्युज वाटली तर तिला थोडीशी मदत करणे, तंत्रज्ञान ची मदत घेऊन किंवा फक्त स्वतःचा वेळ देऊन. त्याला कळणार कसं कि बहिण confused आहे? तिला फोन केला कि तिच्या आवाजावरून, तिच्या स्टेट्स बघून किंवा तिने स्वतःहून सांगितले कि. बास. सोप्प आहे नाही का. मोठ्या भावाने च अश्या प्रकारे मदत का करायची कारण त्याने हे सगळं किंवा तत्सम अनुभवलं असेल कदाचित, किंवा त्याला त्याच्या बद्दल माहित असेल, सभोवतालून कळलं असेल. सध्या सगळं जग व्हर्चुअल पद्धतीने चालू आहे, मग ऑनलाईन मदत च पुरेशी आहे.

भाऊ थोडासा लहान असेल किंवा एकाच वयाचा असेल तर तो रक्षा करू शकतो का? नक्कीच करू शकतो. कसे? बहिणीला थोडं कूल रहा हे सांगून, "चलता है, कॉमन है..." इत्यादी सांगून, किंवा असं नाही होऊ शकत, तू काही तरी गैरसमज केलेला दिसतोय, सोडून दे पट्टाकिनी, असं काहीस. राखण करणं म्हणजे शारीरिक नाही हो, आजकाल सगळं बदललं आहे. तो आधीच सांगू शकतो, सतर्क करू शकतो , त्याला जर काही आढळलं / समजलं,  जे त्याच्या बहिणींना सांगितलं पाहिजे असं,  तर तो सांगणार. नवीन पद्धतीने कश्या गोष्टी करायच्या हे सांगणार, बडबड करणार, त्यामुळे बहिणी सजग होतील आणि शांत पण, जेव्हा  गरज असेल तर.

काही का असेना, दोघे पण महत्वाचे,  लहान किंवा मोठे भाऊ, ते आहेत सदोदित बहिणीसाठी हे दर्शवणे, संपर्कात राहणे, लक्ष ठेवणे, बहिणीच्या मित्र मैत्रीण / follower कोण ह्या बद्दल पण माहिती ठेवणे, सोशल मिडिया कडे दुर्लक्ष न करणे ई.

अर्थात ज्या आपल्या परंपरा आहेत त्या आपण सांभाळणाराच पण शिवाय नवीन स्वरूप पण महत्वाचे. "एक मेका साह्य करू अवघे धरू सुपंथ" असं हवं आजकाल च्या दिवसात. बहिणीचा पण सिंहिणीचा वाटा आहे हो. त्यामळे मला ह्या क्षणी मी माझ्या आई, बाबा, आणि भावाला अनेक वर्ष छोटी असतांना विचारलेला प्रश्न आठवतो आहे, "मी च का राखी बांधायची दादाला? त्याने आधी मला बांधावी, ती पण मोठी, मग मी त्याला बांधीन", देवा. इतक्या वर्षांनी माझ्या विचारलेल्या प्रश्नाचं महत्व पटलं मला.

येणाऱ्या राखी पौर्णिमेच्या सर्व भाऊ बहिणींना आंनददायी शुभेच्छा. नील, वर्णिका, वेद, केदार, निधी आणि मानस सगळे एकमेकांच्या संपर्कात तुम्ही राहणारच ह्याची खात्री आहे मला, पक्की. खूप मोठे व्हा आणि आकाशाला गवसणी घाला आपल्या कर्तृत्वाने, यशाने, किर्तीने आणि व्यक्तिमत्वाने.  

तुमच्या सर्वांची,
प्रीती. 

तळटिप : चि. नील, केदार आणि मानस हे माझे पुतणे, नवीन पिढी मुळ्यांची आणि निधी पुतणी.
माझी लेक लहान होती तेव्हा पासून मी एक प्रयत्न जपला आहे अनेकवर्ष, तो म्हणजे दरवर्षी राखी बरोबर एक मराठी पत्र पाठवण्याचा आणि मग नील, केदार ते मला फोन वर वाचून दाखवणार. अहाहा. हा संदर्भ ह्या पत्राचा. मनापासून एक इच्छा आहे, एका वर्षी तरी राखी प्रत्यक्ष व्हावी ह्या सगळ्या मुलांची, पत्राने पाठवून नाही आणि मी पत्र वाचन प्रत्यक्ष अनुभवावं.

मंगळवार, ३ ऑगस्ट, २०२१

कालाय तस्मै नमः

ह्या बदलत्या कालानुरूप आपल्या सवयींतला बदल थोडक्यात मांडण्याचा प्रयन्त केला आहे. कुलूप किल्ली, फोन, स्मार्ट फोन आणि आता घर, ई. चा हा प्रवास. 

मी असं ऐकलं आहे कि काही गावात तर कुलूप विकलं पण जात नाही, दाराला कड्या पण नसतात आणि सदोदित दार उघडेच ठेवण्याची प्रथा आहे. आधी बहुतांशी फक्त आतून दाराला कडी लावली जायची. बाहेरून आणि आतून कडी हा प्रकार काही वर्षांपूर्वीच आला, Latch / ल्याच नावाचा प्रकार आला, भरपूर गल्लोगल्ली किल्ली तयार करणारे बसू लागले, प्रथा ३६० अंशानी बदलल्या आणि विविध किस्से ऐकायला येऊ लागले.

म्हणजे दाराला फक्त आतून कडी असतानां कधीच किल्ली विसलरी नाही, किल्ली करणारा असा माणूस असतो ई. ची कल्पना पण नव्हती. आणि आता तर सर्रास झालंय, काय? प्रत्येकाकडे किल्ली चा जोड. म्हणजे माझ्या एका घरी ४ माणसं आहेत, आणि ५ किल्ल्यांचे जोड. प्रत्येकाकडे एक आणि शेजारी एक. सर्रास झालयं आत किल्ली विसरणं, इतके जोड असून देखील. काय म्हणावं ह्याला आता. देवा. आधी किल्ली हातात येणं म्हणजे किती मोठी जबाबदारी असायची. आणि आता रुटीन. 

जेव्हा साधा काळा गोलगोल डायल असलेला डब्बा = फोन घरी आला तेव्हा सगळे नंबर खडान्खडा पाठ असायचे सगळ्यांचेच. मग ती नाळ कापली गेली (टेलेफोन ची वायर हो) आणि स्मार्ट म्हणणारा डब्बा आला हातात. आता स्वतःचा नंबर पाठ असला तरी पुष्कळ झालं. इतकं त्या तंत्रज्ञानाच्या आहारी गेलोत आपण. अगदी ह्या कुलूप किल्ली सारखे.

सगळी लक्षात ठेवण्याची ताकद गेली कुठे? मला इवलासा अंदाज आहे, सदोदित तो अवयव हातात आणि "खाल मुंडी पाताळ धुंडी" अशी अवस्था, मग काय डोंबल लक्षात राहणार घरातून बाहेर जातांना किल्ली आणि बाकीच्या आवश्यक वस्तू घेऊन बाहेर पडावं ते. अशक्य आणि अवघड सगळं. आणि आता तर काय कुलूप किल्लीचा पण जमाना हळू हळू संपतोय, सगळंच कि-लेस. त्याचे अजून परिणाम / दुष्परिणाम नाही आले समोर एवढे. असो. "कालाय तस्मै नमः". 

Listen to this experience on YouTube: https://youtu.be/Hb94rfjFHgQ

#latch-and-key #two-way-lock #locking-system #no-lock-homes #multiple-keys #forgetfulness #smart-phone #poor-memory #lost-memory-strength #changes #360-degree-change #key-makers 

सोमवार, २ ऑगस्ट, २०२१

दृष्टीपथात माझ्या

काही वर्षांपूर्वी मी एक छोटी कथा ऐकली होती, ज्यात एका कंपनीचा अनुभव नमूद केला होता, एका महत्वाच्या बदला बद्दलचा. मला भावला आणि कदाचित मी त्याबद्दल सुतवाच्य केलं पण होत ह्या आधी.

तर त्या कंपनीत उन्हाळ्याच्या दिवसात एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, एक निरीक्षण होत ते. काय व्हायचं, मोठ्या मोठ्या साहेबांचे वाहनचालक दिवसभर इकडे तिकडे उन्हातान्हात बसले असाचये. दिवसाच्या शेवटी जेव्हा ते ड्राइव्हर वातानुकूलित गाडीत बसायचे साहेबांसोबत तेव्हा घामाचा वास नको वाटायचा दिवसभर भरपूर काम झाल्यावर. ह्या वर उपाय म्हणून मग सगळ्या ड्राइव्हर ना एक छानशी जागा बसण्यास देण्यात आली. म्हणजे ते तेथे गरज असल्यास त्यांचा गणवेश बदलू शकतात, आराम करू शकतात. ई. म्हणजे त्यांच्या कपड्यांना स्वच्छ धुतलेल्याचा सुगंध येईल, गाडीत बसणाऱ्या साहेबांना देखील छान प्रसन्न वाटेल आणि दिसेल. 

तसेच खाजगी ड्राइव्हर जे असतात त्यांच्या बद्दल थोडसं:
मी सध्या ऑटो रिक्षाने ऑफिस मधे येणं जाणं करते, ठरवलेला आहे. सध्याच्या दिवसांनुसार ड्राइव्हर आणि मागे बसलेला / ली मधे पारदर्शक पडदा लावला आहे. 

मी स्वतः अनेक वर्ष गाडी चालवल्यामुळे मला कुठल्याही वाहनात बसलं कि रस्ता दिसला पाहिजे च. हा माझा स्वतःचा नियम. 

सुरवातीचे सगळे दिवस मी जेव्हा ह्या ऑटो ने ये जा करायला लागले तेव्हा माझ्या निदर्शनात आले कि ऑटो काका / भाऊ एकच शर्ट घालत आहेत आणि तो पण थोडासा जुनाच झालेला. 

काही दिवसांपासून माझे "हे" म्हणतच होते माझे कपडे द्यायचे आहेत, मग ह्यांना विचारलं, त्या भाऊंना विचारलं आणि काही कपड्याचे जोड दिले त्यांना. 

आता माझ्या दृष्टीपथात येणारे भाऊ, त्यांचे कपडे आणि मग रास्ता आता चांगले भासू लागले आहेत. आता पुन्हा एकदा हे पक्के झाले कि कपडे / पोशाख दुसऱ्यांसाठी सुद्धा महत्वाचे असतात. 

"एका दगडात तीन पक्षी" असं काहीसं झालाय माझं. ब्रँडेड कपडे दिले गेले, त्या भाऊंच्या कामी आले आणि माझ्या डोळ्यासमोर विविध फ्रेश रंग मांडले गेले. अहाहा.  भन्नाट.

Listen to this story on YouTube: https://youtu.be/5Kc8WJEIias

ऐका - एक अनोखी शाळा

To listen to the story, kindly click on the following YouTube link: 

https://youtu.be/7mV0OlO-40g

https://youtu.be/PC9vqXhicSQ

https://youtu.be/QObIf_7VJKc

 


 

 

 

 

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...