गुरुवार, ३ मार्च, २०२२

अब-नॉर्मल

हा इंग्लिश शब्द आपण म्हणेज सगळेच सातत्याने वापरतोच. एखादी घटना, एखाद्या व्यक्तीच वागणं, वेळ, विचार आणि आचार देखील काय म्हटलं तर ऍबनॉर्मल. नाही का? कळत - नकळत आपण देखील हा शिक्का मारतो स्वतः  एखाद्या परिस्थितीतून जातांना किंवा तशी घटना उभी ठाकली आपल्या समोर तर. प्रत्येकाचा बघण्याचा, सहन करण्याचा आणि प्रतिसाद देण्याचा दृष्टिकोन आणि पद्धत फारच वेगळी असते आणि जेव्हा केव्हा अशी ऍबनॉर्मल गोष्ट घडेल किंवा दिसेल तेव्हा कोण कसं त्यावर उत्तर देईल सांगता येत नाहीच. पण त्यामुळे ती व्यक्ती, ती स्थिती आणि परिस्थिती नॉर्मल होते का? का आणखीन ऍबनॉर्मल भासते कधी कधी अनेक दिवस देखील. 

त्यामुळे प्रयोग म्हणून सगळ्यांनी ह्या शब्दाची फोड करून वापरून बघितलं तर? चला तर मग ऍबनॉर्मल च्या ऐवजी अब-नॉर्मल असं उच्चारूयात, बघुयात आणि त्या पद्धतीनेच वागुया. करून तर बघा, आणि स्वतः फरक अनुभवा. जे घडतंय ते चांगल्यासाठीच हि भावना दृढ करा, किंवा ह्या प्रयोगानंतर हि भावना दृढ होणारच ह्यात शंकाच नाही. उदाहरणार्थ तो / समोरचा  व्यक्ती त्याच्या पद्धतीने नॉर्मल वागतोय, बोलतोय, किंवा जे घडतंय ते सुद्धा "अब सब नॉर्मल है" असंच अनुभवा. बास च. "प्रयोगातून विज्ञान" हा विषय होता आम्हाला शाळेत. हा छोटेखानी प्रयोग करा आणि माणसाच्या वागण्या पाठीमागचे सायन्स समजावून घ्या, किंबहुना समजलं जाईल आपोआप. आणि मग "आनंदी आनंद गडे जिकडे तिकडे चोहिकडे". सब अब-नॉर्मल च अनुभवायला मिळेल, निश्चित अगदी जसे काही बाकीचे शब्द दर्शवतात तस्से 

Impossible = I am possible 

Existence = Exists + essence 

Abnormal = ab normal

लिफ्ट चा सदुपयोग

ह्या नवीन दिवसांनी काय काय म्हणजे काय कायच शिकवावं, कमाल आहे. अहो मला तर माझ्या कॉलेज मधल्या वाचनालयाची लिफ्ट आठवली अचानक, ह्या अद्भुत छोटेखानी प्रसंगामुळे. आणि लिफ्ट मधे असलेल्या स्टील च्या बार / दांडा हो, त्याचा पण एक वेगळा सदुपयोग करता येतो हे देखील समजलं, नव्याने आणि पोटभर म्हणजे पोटभर हसले. म्हटलं एकटीने का हसायचे, सगळे मिळून हसुयात. म्हणून हा पंक्ती प्रपंच. तर त्याचं असं झालं, आम्ही नुकतेच आमच्या जुन्या फ्लॅट मधे पुन्हा राहायला आलोत. सगळेच शेजारी चांगलेच ओळखीचे आणि काळजी करणारे. सगळेच काही ना काही खाऊ घालत आहेतच आल्यापासून. त्यात एक आज्जी राहतात आमच्या वर. त्यांनी आवर्जून मला थांबवून सांगितलं कि लवकरच जेव्हा जमेल तेव्हा मी तुला ना एक पदार्थ खाऊ घालणार आहे. आधी मी नको म्हटलं पण त्या प्रेमळ आजी काही ऐकत नव्हत्या, म्हणून होकार दिला. बास मग काय उत्साही आजी लागल्या कामाला आणि एक दिवस मला फोन आला, "घरी पोचलीस का? मी काही तरी केलं आहे, ते पाठवते. लिफ्ट समोर ये. "मी येते वर घ्यायला" इति मी, "फक्त लिफ्ट समोर ये, बास", आज्जीच त्या, ऐकणार थोडी होत्या. काही मिनिटात लिफ्ट आली आणि पाहते तर काय आरश्याला आणि उभं राहतांना पकडण्यासाठी जो स्टील चा बार दिला आहे त्याला एक छोटीशी पिशवी दिमाखात लटकत होती आणि त्यातून एक डब्बा खुणावत होता. मी ते बघूनच इतकी हसायला सुरवात केली कि ज्याचं नाव ते. मग आजींना फोन केला, तर म्हणतात कश्या "अगं  ह्या नवीन दिवसात आम्हाला वरिष्ठ नागरीकांना एकमेकांकडे जाता येत नव्हतं, पण दुसऱ्याच्या हातची चव पण चाखायची होती, त्यामुळे मग हा असा उपाय / तरणोपाय शोधून काढला आम्ही. तुझ्या शेजारच्या काकू ना किराणा / सामान मी मागवून द्यायची ऑनलाईन आणि त्यांच्या मजल्याचं बटन दाबायचं, त्या उतरवून घ्यायच्या सामान. एक मेकांकडे न जाता, बाहेर न पडता काम सुकर होत होतं". अहाहा म्हणजे अहाहाच. माझ्या वाचनालयात फक्त पुस्तकं जातात-येतात लिफ्ट ने दिमाखात, वा, त्याची प्रकर्षाने आठवण झाली मला. नेहेमीकरता लक्षात राहील असा छोटेखानी प्रसंग म्हणून टिपून ठेवला, एवढंच. सोसायटी मधल्या लिफ्ट चा असा पण उपयोग होऊ शकतो हे माझ्या कधीच डोक्यात नाही आलं, आणि ते मी प्रत्यक्ष अचानक अनुभवलं, भन्नाट. 

बुधवार, २ मार्च, २०२२

मोहोर

संशोधन हा एक माझ्या कामाचा एक अविभाज्य घटक आहे. मी मिशीगन येथे शिकत असतांना माझे गुरु / शिक्षक मला / आम्हाला नेहेमी सांगत असतं कि वर्गात तुमचं संशोधन घेऊनच या, पुस्तकात लिहिलेलं तुम्ही कास अंगिकारला नावीन्याने ते विद्यार्थ्यांना सांगा, ह्याला शिकवणं म्हणतात खरं. आणि phd झाल्यावरचं खरं संशोधन आणि काम सुरु होत अशी त्यांची धारणा होती. तेथे सगळेच शिक्षक phd झाली असली तरी देखील प्रचंड झोकून देऊन सातत्याने काम करायचे आणि नवनवीन शोध लावायचे. ती प्रेरणा घेऊनच मी येथे आले, आणि माझं काम सुरु केलं. ह्या सगळ्या पार्श्ववभूमीमुळे माझे संवेदनाग्र अक्का अँटेना सतत ऑन असतात, चालूच असतात नकळत आणि विषय आपोआप समोर उभे ठाकतात.

त्यातच मला परवा एक माझ्या आधीच्या जुन्या विद्यार्थ्यांशी संबंधित बातमी कळली कि त्याने एक नवीन व्यवसाय / भलंमोठं दुकान सुरु केलं आहे आणि त्यात तो अंतर्देशीय अत्तर विकतो, शिवाय स्वतः नवनवीन प्रकारचे अनोखे अत्तर शोधून काढतो ई. वा, एक तर माझा विद्यार्थी, असा अनोखा व्यवसाय आणि त्यात संशोधन. बास मग काय त्या दिवशीपासून त्या दृष्टीने आपोआप डोकं चालायला लागलं. जेव्हा जेव्हा मी मोहोराचा सुगंध अनुभवते तेव्हा तेव्हा माझ्या मनात येतंच कि घरात खोलीत किंवा स्वयंपाक घरात वापरण्यासाठी मोहोराचा पर्फुम का नाही काढावा. नक्की आवडेल सर्वांना.

आता काहीच दिवसात आपण सर्व जण पिकलेले आंबे यथेश्च उपभोगणार आहेच त्याची निसर्गाने दाद घेतली आहे, तय्यारी सुरु केली आहे आधीच. सगळी आंब्याची झाडं मोहोराने अक्षरशः लगडली आहेत. आणि तो जो सुगंध पसरला आहे म्हणून सांगते, कि ज्याचं नाव ते. माझं अहो भाग्य कि ह्या ऋतूत मला अनेक दिवस हा अनोखा सुगंध अनुभवायला मिळतो कारण माझ्या कचेरीच्या रस्त्यावर दुतर्फा आमराई आहे. दररोज फक्त मी तो सुगंध अनुभवते पण गेले काही दिवस माझं लक्ष वेधलंय ते ज्या संख्येने आणि प्रमाणात मोहोर आला आहे. काही झाडं अगदी छोटी आहेत आकाराने आणि उंचीने पण संपूर्ण आच्छादलयं मोहोराने, पानं पण संपूर्णपणे झाकली गेली आहेत. तर काही झाडं वरिष्ठ नागरिक आहेत आणि थोडेसे मोहोर परिधान केलेले आहेत. काही असे काही तसे. आपण माणसं पण अशीच असतो नाही का? काही वैचारिक पातळीवर उच्च दर्जा गाठलेली, काही सातत्याने सुगंध पसरवणारी, काही ठराविक ऋतूत त्यांचा आभास दर्शवणारी, काही उंची लहान पण कीर्ती महान, काही शांत तर बाकी उग्र ई. पण सगळेच महत्वाचे. प्रत्येक जण आप आपल्या कुवतीप्रमाणे, स्वभावाप्रमाणे आनंद, सुगंध आणि ऊर्जा पसरवण्याचं कार्य करतं राहूया आणि समाधानी राहूया. प्रत्येक जण समाधानी असेल तर मग बघायलाच नको, नाही का. आनंदी आनंद गडे जिकडे तिकडे चोहिकडे....

कवाडं

आज माझ्या घरापासून ते कचेरीपर्यतं पोचताना दुतर्फा जी सिमेंटची जंगलं तय्यार झाली आहेत त्यांच्या कडे सहज लक्ष गेलं आणि प्रकर्षाने सज्जा अक्का बाल्कनी कडे आकर्षित झालं. कारणं ? बरीच आहेत. काही इमारतींना एकावर एक बाल्कनी आहेत, काहींना इकडे तिकडे आहेत. पण आहेत, हे महत्वाचं. खरं पाहिलं तर बाल्कनी का असते घराला, तर माझ्या मते:

  • अंगणाची उणीव थोडक्यात भरून काढायला
  • आकाशाखाली मोकळी आपली जागा असावी म्हणून
  • संपूर्ण घर बंद असतं, तसं बांधलं असतं, पण बाल्कनी हि एक फार सुंदर मोकळी जागा
  • बाल्कनी हि कधीच अडगळीची जागा नसतेच पण .....
  • हिरवळ डोळ्यांना गारवा देते, त्यासाठी हि खास जागा राखीव असते
  • एक छोटेखानी भाग नक्की मोकळा असावा म्हणून
  • आणि अशी बरीच इतर कारणं आहेत


अगदी तस्सेच आयुष्यात प्रत्येकाने एक कवाड मोकळं ठेवलं तर? काय मज्जा येईल त्या व्यक्तीला आणि इतरांना देखील जे त्याच्या सोबत राहतात, काम करतात. सगळं बंद खोल्यांमधे घुसमटत किंवा दबून राहण्यापेक्षा आकाशा खाली मोकळं, आजूबाजूला हिरवळ, स्वच्छ ताजी हवा, असंख्य पक्षी, झाडं, बागडणारी लहान मुलं, आजी-आजोबा, वैविध्य गाड्या-त्यांचे रंग-आकार-प्रकार ई. आणि बरेच काही दिसेल हो. आणि ह्या सगळ्यांमुळे स्पष्ट विचार, आचार, मैत्र, आनंद, परमानंद आणि शांतात लाभेल हे वेगळंच, नाही का. मग तपासून बघा आत, आहे ना एक बाल्कनी आणि उघडी हो.

मंगळवार, १ मार्च, २०२२

झटका

इंग्लिश भाषेत बोलायचं झालं तर शॉक म्हणजे झटका. ह्या झटक्याचे अनेक प्रकार असतात आणि तीव्रता पण कमी जास्त असते किंवा भासते म्हणायला हरकत नाही. समोरचा जसा हा झटका घेईल त्यावर अवलूंबून आहे. आपल्या जरी तो फार छोटा आणि साधा वाटत असला तरी देखील पुढच्याला तो तापदायक ठरू शकतोच, कारण त्याची ताकद, पचवण्याची आणि स्वीकारण्याची पद्धत ई. आणि बरीच कारणं आहेतच. काही जण शॉक देतात कधी तो दिला जातो किंवा मिळतो, कळत - नकळत. काहीही म्हणा छोटीशी उणीव, धक्का किंवा नुकसान देऊन जातो हे निश्चित. तेव्हा आपल्या हातात जेव्हा असतं तेव्हा काळजी घ्या. प्रथेनुसार  शॉक अगदी जवळच्याच व्यक्ती ला बसतो हो, जे तुमच्या आजूबाजूला सतत वावरत असतात, मदत करत असतात, तुमचे असतात, तुम्ही त्यांच्यावर अवलंबून असता कारण त्यांच्याशिवाय जगणं फार मुश्किल असतं, जसे कि ते एक भाग आहेत तुमच्या जीवनाचा, अविभाज्य भाग. मग अश्यांना शॉक देतांना जरा जपा मंडळी. अगदी बरोबर हेरलत, मी पदोपदी आपण जे मोबाईल फोन आणि आपला लॅपटॉप चार्जे करतो ना त्याबद्दल खुणावते आहे तुम्हाला. आधी दोन टोकं आधी जोडा आणि मग तो विजेचा स्वीच दाबा. तुम्हाला जगावेगळी नेहेमीची घाई आहे त्यामुळे त्या बापड्यांना का सततचा झटका. अहो हो, प्लग लावून, मान वाकडी करून एका बाजूला फोन वर बोलता बोलता खटपट करून मग ते दुसरं टोक लॅपटॉप ला जोडायचं सोडा. क्षणभर वेळ ठेवा / काढा त्या महत्वाच्या वस्तू साठी ज्याच्याशिवाय पान देखील हालत नाही कोणाचाच आणि सध्याच्या परिस्थितीत. एक क्षणभर लॅपटॉप च्या ऐवजी तुम्ही आहात त्या जागी आणि सातत्याने तुम्हाला असे छोटेसे झटके अनुभवायला मिळाले तर चालेल? अर्थात नाही, मग हि बाळगलेली सवय का? मोडा आधी, आत्ता आणि बघा हळूहळू कसे आनंदाचे झटके अनुभवायला मिळतात ते.   

लस घेण्याआधी कशी पूर्वतय्यारी करतात, कापसाचा गोळा फिरवतात, म्हणजे मानसिक तय्यारी होते आणि छोटी मुंगी चावते जणू, पण हेच जर न बोळा फिरवता टोचलं तर? जास्त दुखेल शारीरिक आणि मानसिक दृष्टीने. तसेच स्वतःची मुलं जेव्हा १० /१२ ई. अतिमहत्वाच्या उंबरठ्यावर उभी असतात, परीक्षा देतात, नक्की माहित असतं कधी चांगली बातमी कळणार आहे ते, अंदाज असतो बातमीचा, त्यामुळे पूर्वतय्यारी अशी देखील असते, धक्का बसत नाही मोठा हो. जरी लॅपटॉप आणि मोबाईल चार्जे करणं उपयोगी असतं तरी देखील तो करण्याची एक शिस्तबद्ध पद्धत असते हो मंडळी.


आभूषणे

ज्या मुली किंवा महिला लांब केस ठेवणं पसंद करतात किंवा त्यांचे लांब असतात त्या स्क्रनचिस scrunchies किंवा रबर बँड वापरतात, वेणी घातली तर किंवा साधे केस बांधायचे असतील तरी. दोन्ही आभूषणात भरपूर आकार-प्रकार येतात, रंग असतात. अगदी मुळचे साधे स्वस्त रबर बँड असो किंवा सुशोभित केलेले, सजवलेले, कापडी, स्याटिनचे ई. कुठलेही ते सरते शेवटी केस जागेवर टिकवून ठेवण्यास मदत करतात घालणाऱ्याला. पण स्क्रनचिस scrunchies आणि रबर बँड मधे फरक आहे, त्याशिवाय का नवनवीन पद्धतीचे बाजारात उपलब्ध आहेत? गरज पडली म्हणून, किंवा काही कमी दिसली / उणीव जाणवली साध्या रबर बँड्स मधे, उपद्रव होत होता म्हणून विचारपुर्वक प्रयन्त झाले. रबर बँडने त्यांच्या स्वभावानुसार केस फार तुटतात, चांगले दिसत पण नाही, शोभा देत नाही केसांना, तरुण दिसत नाही ते वेगळंच, केसांची घनदाट पणा जाणवत नाही, आजीबाई सारखं दिसतं  आणि बरीच कारणं आहेत. त्या उलट हे स्क्रनचिस scrunchies, अगदी त्या त्या ड्रेस प्रमाणे सुद्धा तय्यार करून घेता येतात हो, मऊ प्रेमळ असतात केसांसॊबत, खूप काळ टिकतात, धुता येतात, ते स्वतः मोठ्या आकाराचे असतात त्यामुळे वेणीची जाडी जपली जाते आणि असंख्य कारणे देता येतील. सुरवातीला मोकळे सोडले केस आणि मग काही कारणासाठी बांधावेसे वाटले तर तोवर हे स्क्रनचिस scrunchies मनगटावर परिधान करता येतात आणि भारी दिसतात, वेगळं हलकं फुलकं आभूषणच जसे. आकार मोठा असल्यामुळे बॅग मधे ठेवले तरी सापडायला सोपे. मऊ असल्यामुळे काढते घालते वेळी केस तडतडत नाहीत. आयुष्य जास्त असतं स्क्रनचिस scrunchies च, काही वापरानंतर तुटत नाहीत. स्क्रनचिस scrunchies सोबती हवा, भरवश्याचा, सुंदर, टिकावू, हलका-फुलका, रंगीबेरंगी, सांभाळायला आणि वापरायला सोप्पा. चला तर मग अशी साथ सोबत नेहेमी करूया सर्वांसोबत, स्क्रनचिस scrunchies थोडेसे गुण अंगीकारूया. काय म्हणताय मंडळी, चालतंय ना?

परवा माझ्या लेकीने स्क्रनचिस scrunchies आणले आणि ती मिरवत होती त्यामुळे हे मुद्दे लक्षात आले. माझी आई तेव्हा भल्यामोठ्या वैविध्य रंगांच्या, डिझाईनच्या रिबीन वापरात होती, तिला पण साधे रबर कधीच आवडले नाहीत त्यांच्या गुणांमुळे. असो, आईची पण प्रकर्षाने आठवण झाली, कारण दररोज पुन्हा पुन्हा ४ / ६ / ८ पदरी कलात्मक रिबिनचं फुलं बांधायची गरज नाही आता त्याचेच वेगळे शिवलेले पण वेगळ्या धाटणीतले स्वरूप म्हणजे स्क्रनचिस scrunchies. "असे स्क्रनचिस scrunchies येति आणि आठवणींना उजाळा देऊनी जाती".

इंद्रधनुष्य जसे

प्रत्येक व्यक्ती / मनुष्य हा नैसर्गिक रित्याच नटलेला, सजलेला आहेच. बघा ना अगदी डोक्यापासून ते पायाच्या नखापर्यंत वैविध्य रंगछटा परिधान केल्यात आपण, कित्ती अनोखी देणगी दिली आहे निसर्गाने न मागता आपणहून. आणि कधी कधी वेगवेगळ्या कारणामुळे किंवा वयोमानापरत्वे त्या रंगांमधे बदल पण घडतांना दिसतो. म्हणजे एक आयुष्य आणि इतके रंग अनुभवायला मिळतात. शिवाय मानव धर्मानुसार आपण विविध कपडे घालतो, आभूषणं आणि बऱ्याच प्रकारे आणखीन रंग व्यक्तिमत्व वृद्धिंगत करतातच. असो. आज हा विषय का? सांगते. मला एक कावळा परवा नजरेस पडला. अहो आता तुम्ही म्हणाल ह्यात काय, नेहेमीच दिसतो कावळा. पण परवाचा कावळा काही नवीन सांगून गेला मला, कदाचित ते सांगण्याकरताच उभा ठाकला होता जणू. नखशिखान्त काळा हो, अगदी म्हणजे अगदी एक रेष पण नाही वेगळ्या रंगाची, आणि पिल्लं असो किंवा आजोबा कावळा तो काळाचं. वयोमानानुसार पण बदल नाहीच, कपडे वगैरे तर गरजेचे नाहीतच. मज्जा वाटली हा सगळा विचार करून. इतके रंग आपल्याला म्हणजे दोन पायांच्या माणसाला हो फुकट अनुभवायला मिळाले आहेत, तर त्या रंगात रंगून जा, बुडून जा आणि त्याचा सतत आस्वाद घ्या. पक्ष्यांना गरजेचं नसलं तरी माणसांकडे बघून किंवा विविध छटा असलेल्या बाकी पक्षी मित्रांकडे बघून, झाडांकडे बघून, फळांकडे बघून कावळे दादाला मनात कधी तरी चुकून असे विचार येत असणारच ना कि मी फक्त एकाच रंगात का बांधलो गेलो आहे? कुठेच वेगळी छटा का नाही? वगैरे. तर मग निसर्गाला धन्यवाद द्या भरभरून आणि इंद्रधनुष्य रंगांची उधळण करत जगा नेहेमीच. त्या कावळे दादाचे आभार मानावे तेवढे कमीच आहेत त्याने मला निसर्गाच्या कृती बद्दल नतमस्तक होण्याचे अजून एक कारण दाखवले.
तो कावळे दादा एक छोटेखानी पक्षी असून देखील जर हे मान्य करू शकतो, स्वीकारू शकतो त्याचा रंग / आकार आणि इतर गोष्टी मग आपण का नाही? सगळ्या अणुरेणूंना मोकळॆपणाने
स्वीकारा आणि पुढे वाटचाल करा नेहेमीच.

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...