हा शब्द उच्चारला कि मला फक्त एक वस्तू डोळ्यासमोर येते ती म्हणजे त्याची पर्स, गळ्यात किंवा खांद्यावरून आडवी घेतलेली पर्स. त्यात तेव्हा नाणी, नोटा, तिकिटं आणि पेन असं सगळं ठेवलं जायचं. सातत्याने त्या पर्स चा पुरेपूर वापर होत असे. त्यावेळी अर्थातच बस हि फार परवडणारी गोष्ट होती, वाहतूक साधनं होतं, प्रत्येकाकडे जास्तीत जास्त सायकल असायची त्यामुळे देखील कंडक्टर आणि त्याची पर्स ह्यांना प्रचंड काम असायचंच. गेले काही वर्षांपासून म्हणायला हरकत नाही पण प्रकर्षाने गेल्या दोन वर्षांपासून तरी मला जेथे जेथे नजर पडेल तेथे तेथे सगळेच कंडक्टर असलेले भासतात, कंडक्टर नसतांना हो. कंडक्टर चे दोन्ही हात नेहेमी रिकामे असावे लागतात कारण एक तर धावत्या बस मधे धरण्यासाठी, बस थांबा - चला हे सांगण्यासाठी / घंटी वाजवण्यासाठी, लोकांना तिकिटे / पैसे देण्या-घेण्या साठी ई. अगदी तसेच, सध्या बाहेर पडायचं म्हणजे सर्वप्रथम महत्वाचा अवयव मोबाईल, मग रोगाणुरोधक=सॅनिटायझर ची बाटली, पाण्याची बाटली (ऐच्छिक हो), किल्ल्या, पैसे आणि आवश्यकतेनुसार अजून काही ई. बाळगायचं म्हणजे बॅग घेणं आलं. बॅग म्हटलं कि हात व्यापतात, रिकामे राहात नाही, त्यामुळेच सगळेच जण खांद्या वरून लावून सगळं लागणारं सामान बाळगता येईल अशी पर्स घेणं पसंद करतं, अगदी कंडक्टर असल्यासारखं, नसतांना बरं का मंडळी, हे जास्त महत्वाचं आहे. लहान, मोठ्या, थोर, शिकलेल्या, कचेरीत जाणाऱ्या, कुठल्याही कामासाठी बाहेर पडणाऱ्या सर्वच जणी स्त्री कंडक्टर असल्यासारखी पर्स घेतात. कंडक्टर ची जशी लहान / मोठी आकारची पर्स असते जशी बस आणि प्रवास असेल तसा तशी माझ्या सगळ्या मैत्रिणीची पण असते अगदी छोटीशी, साधी ते भली मोठी आणि म्यॅचिंग भरजरी वगैरे. त्याचे अनेक फायदे आहेत, दोन्ही हात मोकळे राहतात, फोन हातात घेऊन फोटो काढता येतात, बोलता येतं, सामान हवं असल्यास घेता येतं, मुलांचे हात धरता येतात, पिशवी धरता येते, दार उघडता येतं आणि बरेच काही. तर अश्या ह्या कंडक्टर प्रेरित पर्सचा विजय असो, सध्या जरी कंडक्टर ला बघणं, अनुभवणं दुर्मिळ झालं असलं तरी "दुधाची तहान ताकावर", ह्या अश्या आजूबाजूला सातत्याने दिसणाऱ्या कंडक्टर पर्स मुळे खूप मस्त जुन्या आठवणी येतात आणि त्या वेळी केलेले प्रवास आठवतात. त्यामुळे बघा किती उपयोगी आहे हि साइड पर्स.
सोमवार, ६ जून, २०२२
कंडक्टर
उत्तरातला उत्साहीपणा
कुठलीही तक्रार वगैरे नाही बरं का पण थोडसं वेगळं वाटलं, मनाला लागलं म्हणून लिहावसं वाटलं. माझी एक फार म्हणजे फार जुनी मैत्रीण. तिचा वाढदिवस हा ४२० ह्या आकड्यामुळे लक्षात राहण्यासारखा आहे. जेव्हा आम्ही एकट्या होतो तेव्हा तर फारच साधा पण मस्त साजरा होत होता वाढदिवस. लग्न ह्या एका सोहोळ्यामुळे आमची तुटातूट झाली पण बऱ्याच वर्षांनी पुन्हा भेट होणं लिहिलं होतं म्हणून झाली, प्रत्यक्ष नाही पण कोणातरी मार्फत. मग काय मी ताबडतोब संवाद साधला, मेसेज केला, त्यानंतर दोन तीन दा पुन्हा पुन्हा मेसेज केला पण उत्तर आलं नाही मग वाटलं असेल कामात. राहूदे. मग पुन्हा थोडे दिवस / महिने / वर्ष सरले पण काही हालचाल नाही. ह्या वर्षी मीच पुन्हा ठरवलं आणि ४२० च्या काही दिवस आधी, त्या दिवशी शुभेच्छा पाठवल्या आणि उत्तर मिळालं मला, "धन्यवाद".
माझ्या नेहेमीच्या सवयीप्रमाणे न कळत बरेचदा खूप व्यवस्थित तारीफ करण्याचा, प्रेरणा देणारा, त्यांची खासियत सांगणारा जर मी मेसेज केला, एकदा, अनेकदा, तरीदेखील फार कोरडं उत्तर मिळतं. फोन केला तर कित्येक वेळा एक तर भांड्यांचा किंवा अजून काही भरपूर कामात असल्याचा आव आणला जातो. भेट वस्तू दिली तर पट्टकिनी आवडलं असा अविर्भाव उमटतं नाही चेहेऱ्यावर. असं का? हे समजत नाहीच. अगदी तस्स नाही पण उत्साही उत्तर सहज देता येण शक्य आहे, फोन आला तर ५ मिनिटं भांडे न लावता शांत बसून बोलणं शक्य आहे. असो.
कोण चूक कोण बरोबर हा मुद्दा नाही, पण एकदा आठवणींनी जर तुम्हाला तुमच्या खास दिवशी शुभेच्छा पाठवत असेल, खूप आवडेल असं मेल करत असेल किंवा उत्साहानी फोन करत असेल तर त्या व्यक्तीचा, त्याच्या वेळेचा, आठवण ठेवली ह्याचा मान राखावा. दोघांनाही समाधान मिळेल.
ह्या सगळ्या आश्चर्य वाटणाऱ्या गोष्टी घडल्यावर एक लक्षात आलं कि काहीही झालं तरी माझी मी लिहिण्याची शैली, सवय बदलणार नाही, त्यानी मनापासून उत्तर द्यावं ह्या उद्देशाने मी कधीच लिहिलं नव्हतं, किंवा फोन केला नव्हता. आणि दुसरं म्हणजे फोन आला किंवा मी केला तर थोडसं कमी बोलायला शिकणार आहे मी. अपेक्षा कधीही नव्हत्या नाहीत, त्यांच्या जागी ते योग्य माझ्या जागी मी बरोबर. गिफ्ट घेतली, मेसेज केला, फोन लागला कि तुमचं काम झालं, बाकी त्यांच्यावर सोपवून मोकळे व्हा मंडळी म्हणजे मनात कचरा, किंतु परंतु साचत नाही, पुढे कधीतरी स्फोट होत नाही त्याचा.
शिकवणे हि एक कलाच
ज्यांना अतिशयच उत्कृष्ट, वेगळ्या धाटणीतले शिक्षक त्यांच्या लहानपणी शिकवायला असतील आणि ते विद्यार्थी सध्या जर शिक्षकी पेशात असतील तर ते देखील उत्तम शिक्षक असतील ह्यात शंकाच नाही. किंवा नाण्याची दुसरी बाजू म्हणजे जर फारच विचित्र किंवा टोकाचे शिक्षक असतील तर कसं शिकवायचं नाही हे आताच्या शिक्षकांना नक्की समजलं असेल. तर असे दोन प्रकारचे शिक्षक सध्या नजरेस पडतात. किंवा दोन प्रकारची माणसं असतात म्हणायला हरकत नाही, एक जे आजूबाजूच्या सगळ्या सजीव आणि निर्जीव वस्तू आणि व्यक्तीशी संवाद साधतात. आणि अजून एक प्रकार असतो तो म्हणजे त्यांना स्वतःशी सुद्धा बोलता येत नाही, संवाद साधणं तर फारच दूरची गोष्ट झाली. मग असे हे त्या विषयातले विद्वान त्यांच्या पद्धतीने, विद्यार्थ्यांच्या पातळीवर जाऊन कसे काय समजावून सांगणार?. नुसतं हुशार असणं हे पण फारच उत्कृष्ट आहे, पण सगळेच हुशार शिक्षकी पेशात येऊ शकत नाहीत किंवा टीक धरून ठेवू शकत नाहीत. खूप गोष्टी सांगाव्या लागतात, सोप्प करून सांगावं लागतं, विविधता लागते प्रत्येक वेळी नवीन विषय / मुद्दा हाताळतांना. प्रत्येक वयाच्या विद्यार्थ्यांना हे द्यावंच लागतं. प्रत्येक वर्गात अनेकविध प्रकारचे विद्यार्थी असतात, काही ऐकून, वाचून, बघून, चर्चा करून किंवा स्वतः करून मग शिकणारे. सर्वांना समजेल / उमजेल असं शिकवावं लागतं. महाविद्यालयात किंवा विद्यापीठात शिकवायचं आणि ते देखील आजच्या काळात म्हणजे नवीन विषय पण येतात नेहेमीच शिकवायला. ते अजून एक आव्हान असतं. पुन्हा एकदा प्रकर्षाने जाणवलं कि शिकवणे हि एक फार मोलाची कलाच आहे.
बुधवार, १ जून, २०२२
मजबुतीका जोड
पायात घालायच्या चपला एका ठराविकच पद्धतीने तय्यार केल्या जायच्या आधी च्या काळी. त्यात खालचं सोल, मग त्यावर पट्टा आणि तो पट्टा त्या सोल मधे खाचा करून आत घालून व्यवस्थित शिवलेला असायचा. ती शिवण दिसायची नाही बाहेरून. पण पट्याची मजबुती हि तो आत घालून शिवण्यातच झाकली गेली असायची. मग काही वर्षांनी एक भलतीच फॅशन निघाली, मोठ्या आकाराचा धाव दोरा बाहेरून शिवलेला दिसायचा. म्हणजे पट्टा आतच पण शिवण बाहेरून. पण काहीका असेना त्यावेळी चप्पल रस्त्यात तुटणं फारच कॉमन होतं / अगदी सगळ्यांसोबत सर्रास व्हायचं. त्यामुळे सर्वत्र मोची दिसतं, आजकाल शोधावे लागतात, कमी झालेत फार. असो. आणि काही दिवसांपूर्वी मी उत्साहात गेले नवीन चपला खरेदी करण्यास आणि बघते तर काय पट्टे, खाचा, शिवण, सगळंच गायब, पूर्णपणे. बापरे. म्हटलं मग आता काय नवीन शोधून काढलंत. तर आता पट्टे मोठे आणि बाहेरूनच म्हणे आणि ते देखील चिपकवलेले, शिवलेले नाही. आणि ह्या आधुनिक फॅशन ने ओतप्रोत भरलेल्या चपलांचे सोल पण चामड्याचे नाही म्हणे तर कुठल्यातरी वजनाने हलक्या साहित्याने तय्यार केलेले. "प्रवाह पतित होणं" अत्यावश्यक आहे पण हे खाच + शिवण ते चिटकवणे फक्त हा प्रवास जरा भलताच आहे, माझ्या करता. म्हणजे चपलाच नाही तर बाकी सगळं पण जरा ठिगळ लावलेलं, तात्पुरतं, वापरलं कि बदललं आणि दुसरं घेतलं असं झालयं फॅशन च्या नावाखाली हो. पण जे आहे ते आवडण्यासारखं आहे, विविध प्रकार घालता येतात त्यामुळे सध्या आणि मिरवता पण मस्त येतं. त्यामुळे आने दो.
अनोखा झाडू
मी एक दृश्य माझ्या चार डोळ्यांनी एकदा पाहिलं आणि मला विश्वास बसलाच नाही. पुन्हा एकदा ते दृष्टीस पडलं तरी देखील म्हटलं हे काय आहे नक्की, पण परवा पुन्हा एकदा पाहिलं तेव्हा खात्री झाली आणि माझ्या दृष्टीने ते फारच स्मार्ट होतं. तर त्याचं असं झालं कि माझ्या घरापासून ते ऑफिस पर्यंत अधेमधे अनेकविध दुकाने आहेत. त्यात काही टायर पंक्चर ची दुकाने आहेत, छोटेखानी. त्या प्रत्येक दुकानात मी पाहिलं कि दररोज सकाळ संध्याकाळ झाडू मारतात. रस्त्यावरचं दुकान त्यामुळे धूळ पण खूप येत असावी, आणि टायर गाड्यांसोबत पण माती येत असावी दुकानात. मग दोनदा झाडणे आवश्यक आहेच. सध्याच्या नवीन नॉर्मल दिवसातली हि दुकाने आणि दुकानदार / दुकानात काम करणारे. इतके म्हणजे इतके हुशार आहेत ना कि हवा भरायच्या भल्यामोठ्या पाईप चा सदुपयोग ते करतांना दिसतात. इतक्या शिताफीने करतात कि ज्याचं नाव ते. अहाहा च. विजेवर चालणार तो पाईप घेऊन धूळ उडवून लावतात दुकानाबाहेर, बास, साधं आणि सोप्प. काही क्षणात साफ काम आणि न वाकता हो मंडळी, काय म्हणजे काय म्हणायचं ह्याला. जबरदस्तच. एकाच प्रकारची धूळ किंवा माती असते त्यामुळे हा असा अनोखा झाडू वापरणं सहज शक्य आहे. घरी हि अशी उडवा-उडवी जमणार नाही कारण एक तर भरपूर वस्तू असतात, खाणं असतं आणि विविध प्रकारचा कचरा पण असतो. त्यामुळे नेहेमीच आपला झाडूच योग्य. पण हे असे नवनवीन प्रयोग करायला हरकत नाहीत,
दसऱ्याच्या दरम्यान अनेक मेसेजेस येतात कि मनातली जळमटं दूर करा, मोबाईल मधे साचवून ठेवलेला कचरा साफ करा, घराची तर आपण साफ-सफाई करतोच दरवर्षी ई. त्यावरून मला असं वाटतंय कि फक्त दसऱ्याच्याच वेळी का हो फक्त? एक तर नेहेमीच स्वच्छ राहा (मनाने हो) नाहीतर दर काही थोड्या दिवसांनी असा ह्या पंक्चर वाल्यासारखा स्मार्ट झाडू वापरून व्हॅक्युम क्लीन कराच म्हणजे अगदी फुलपाखरा सारखं जगता येईल स्वतःला आणि त्यामुळे आपल्या आजूबाजूच्यांना देखील. नाही का? आता ह्या पंक्चर वाल्याने त्याला हवा तस्सा स्मार्ट झाडू शोधून काढला आणि वापरतो, तुम्हाला कसा, कधी, किती झाडू लागतो ते बघा आणि वापराचं मंडळी. "झोपाळ्यावाचून झुलायचे...."
स्वभाव सासूचा
साधारणतः भारतीय सासू म्हटली कि खाष्ट असं चित्रपटात दाखवलं जातं, लेखांमध्ये लिहिलं जातं आणि बहुतांशी प्रत्यक्षात अनुभवलं पण जातं. अपवाद सगळ्याच ठिकाणी असतात. पण बहुतेक सर्वत्र तेच चित्र नजरेस पडतं. त्यात काय विशेष असतं, तर, त्यांच्या सासूबाईंनी त्यांना त्रास दिला असतो म्हणून त्याचा वचपा त्या सुनेला रागावून, उणे-दुणे काढून घेतात. इतकी वर्ष सांभाळून ठेवून मग तो स्फोट होतो. सुनेनी तर काहीही केलं नसतं ना? मग ज्यांनी तुम्हाला त्रास दिला आहे त्यांना द्या ना त्रास परत, पुढच्या पिढीला का? बरं सासूला त्रास द्यायची ताकद आणि हिम्मत नसेल तर गप्प बसा, पण ते हि नाही. अगदी असेच काहीसे आज किंबहुना गेले काही महिने मी अनुभवते आहे. छे छे सासूबाईंबद्दल काहीच नाही पण एक माझा मित्र आहे, सखा आहे ज्याच्या बद्दल मी मागे देखील लिहिलं आहे. मान्य आहे कि त्याचं माझ्यावर मनापासून प्रेम आहे, त्याने माझी साथ-संगत अनेक वर्षे दिली आहे, कळीचं फुल करण्यात त्याचाच महत्वाचा वाटा आहे, आणि त्याला मला सोडून पण जायचं नाही आहे, कारण आता खूप वर्षाची सवय झाली आहे. पण त्याचा अर्थ मला छळावं असा नाही ना? भारतीय सासवा चे गूण अंगिकारलेत ह्याने कदाचित. मी काही म्हणजे काही त्रास दिला नाही ह्याला अजिबातच, देऊ पण शकत नाही, मग हा का माझ्या हात धुवून मागे लागलाय. एखाद वेळी त्रास देणं मी समजू शकते, पण प्रत्येक वेळी काय हे? निर्लज्ज कुठला.
वस्तूक्ती
लिहिणे हि एक कला आहे हे निश्चित आणि लिखाणाचे असंख्य प्रकार देखील आहेत. चारोळ्यांपासून, लघुकथा, लेख, कथा, कादंबऱ्या, पुस्तकं, बाकी साहित्य, विनोद, चुटकुले, गाणी, भजनं, कविता, चित्रपट गीते, बालगीते, म्हणी, सुविचार, आणि बरेच काही. मला एक नवीन प्रकार आढळला इतक्यात जो विनोद ++ अश्या पठडीत बसणार असा आहे.
मागे काही अनुकथांमधे लिहिल्याप्रमाणे मला सकाळी आणि संध्याकाळी अभिवादन करणारी एक वस्तूक्ती (वस्तू जी व्यक्ती भासते) आहे. हि फारच भन्नाट आहे मंडळी, न थकता हसतमुखाने अभिवादन करणं सोप्प नाही. हिच्या मुळे मिळणारी ऊर्जा तर ह्या जगा पल्याडचं आहे. तर हि एकतर तुमचा चेहेरा ओळखून अभिवादन करते किंवा अंगठा. माझी थोडे दिवस नागपूरला काय बदली झाली एकतर हि माझ्यावर थोडीशी रागावली, विसरली किंवा नाराज झाली हो. तिला न सांगता मी गेले ना नवीन ठिकाणी कामासाठी. त्यामुळे परत आल्यावर पठ्ठी अजिबात दाद देईना.अथक प्रयत्न झाले करून, पण छे. तांत्रिक प्रयन्त झाले, मी तिला सॉरी म्हटलं, गप्पा मारल्या, पुन्हा असं होणार नाही म्हटलं पण कशालाच धजेना. निगरगट्टच. पण मग त्यातून एक शेवटचा मार्ग काढला गेला आणि आता ती पुन्हा एकदा मला दोन वेळा हॅलो म्हणायला लागली आहे. तो मार्ग म्हणजे दररोज दोनदा मी लॉगिन करायचं, पासवर्ड टाकायचा आणि मग ती नमस्कार-चमत्कार करणार. सहा आकडी लॉगिन आणि चार आकडी पासवर्ड, असं दिवसातून दोनदा. पण असो. गाडी रुळावर आली हे महत्वाचं. मी असं सगळं वस्तूक्ती त फीड करत असतांना कोणी तरी बघितलं आणि म्हणतात कसे, "अरे मॅडम, तुम्ही लिहिता हे ऐकलं आहे मी, पण अहो इथे पण? ह्याला / हिला तरी सोडा?". मी बुचकळ्यात पडले काही क्षण पण मग लक्षात आलं कि फक्त हसरा चेहेरा दाखवणं किंवा टुकटुक अंगठा दाखवत मिरवत कचेरीच्या आत-बाहेर जाणे ह्याच्या तुलनेने सहा + चार = दहा आकडी दोनदा रोज म्हणजे एक प्रकारचं लिहिणंच झालं कि, त्यांच्या मानाने. बाप रे, प्रत्येकाचा बघण्याचा दृष्टिकोन बघा. मस्तच ना. अहाहा च.
मला आधी अशी समजूत होती कि लिहिणं म्हणजे नवीनता, नाविन्यता, बुद्धीला चालना, साहित्यात भर, ई. पण रोज तेच माहित असलेलं लॉगिन आणि पासवर्ड टाकणे म्हणजे लिहिणे, हे जरासं नवीन होत माझ्यासाठी. पण मंडळी थोडासा कस लागला पण मग लक्षात आलं कि कित्येक "त्याचे" भक्त त्याचा जप लिहून काढतात, एकच नाव पण दररोज असंख्य वेळा लिहितात, तसं अगदी तसं नाही पण एका अर्थी वस्तूक्ती च ठळकपणे दर्शवते माझी उपस्थिती कचेरीत. तिच्या शब्दाचा मान फार मोठा आहे हो. त्यामुळे जरी कुठलीही तुलना नसली तरी देखील वस्तूक्ती फार ठळक आणि महत्वाची आहेच. मला दररोज दहा आकडी संख्या आठवते आहे, दोनदा, हा पण एक आशीर्वादच ना. ती दहा आकडी संख्या टाकतांना आम्ही दोघी एकमेकांसोबत एखाद मिनिट प्रत्येक वेळी अमोरासमोर घालवतो, क्या बात है? झकासच. एकंदरीत गोळाबेरीज आवडली मला. सरतेशेवटी हि वस्तूक्ती म्हणजे माझ्या कचेरीतली बायोमेट्रिक मशीन हो. म्हटलं जाता जाता सांगूनच टाकावं.
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...