रविवार, ११ जून, २०२३

आधारवड

माझ्या मराठीच्या आकलना प्रमाणे वडिल ह्याचं मूळ वडाच्या झाडाशी असावं. जसा वड वृक्ष आणि त्याचे अगणित गुणधर्म अगदी तसेच किंबहुना कणभर जास्त म्हणजे वडिल, संपूर्ण कुटुंबाचे छत्र.

माझे वडिल म्हणजे माझ्यासाठी अक्षरशः एक मूर्त विद्यापीठाचं जणू. त्याची कारणे असंख्य आहेत, जागोजागी, वेळोवेळी त्यांनी केलेली मदत, सुचवलेले पर्याय, दाखवलेली दिशा आणि सातत्याने दर्शविलेले प्रतिबंधात्मक तरणोपाय. मराठी, इंग्लिश, हिंदी भाषेवर प्रचंड प्रभुत्व, म्हणींचा चपराख प्रयोग आणि शाब्दिक फोड / जोड करून उद्बोधक विचार, अहाहाच. जगापल्याड असे.

तीन "" माझ्या पुढ्यात उभे ठाकले इंग्लिश मधले मनी, म्यारेज का M.Tech. माझी नोकरी अर्थार्जन सुरु होते, त्यावेळी लग्नाचे वय झाले होते आणि पुढील शिक्षण पण महत्वाचे होते. M.Tech च्या प्रवेश परीक्षेत मी भारतात पहिली आले होते. प्रवेश घेतला तर नोकरी सोडावी लागणार होती आणि लग्न पण कदाचित ठरलं तर लांबणीवर टाकावं लागणार होतं. बाबांना विचारल्यावर म्हणतात कसे, "सोप्पं आहे, जे सध्या हातात आहे, भविष्यात उपयोगी आहे ते कर, बाकीच्यांचा विचार देखील नको". मी मग पुढील शिक्षणाला प्राध्यान दिले.

माझी जुळी बाळं लहान होती तेव्हा, नोकरीच्या ठिकाणी काही अडचणी आल्या तर, काही तब्बेतीच्या तक्रारी असल्या तर, पैशावरून काही, असं जर बाबांच्या पुढे मांडल तर उत्तर मिळायचं "काळजी करू नये, त्यापेक्षा ईच्छाशक्ती, सामर्थ्य, वैविध्य स्थरावरील कामे करून स्वतःला इतकं शक्तिशाली घडव कि काळाने जी-जी करत तुमच्या समोर उभं ठाकलं आणि विचारलं पाहिजे कि बोल मी कुठल्या दिशेने नेऊ तुला".

अंग गरम वाटलं, ताप आल्यासारखा वाटलं आणि त्यांना सांगितलं तर म्हणत असत "तापच आला आहे ना, गोळी घे जाईल निघून, पण लक्षात ठेव सं-ताप कधीही येऊ देऊ नको त्या करता साधी गोळी घे आणि निघून जाईल असा उपाय नाही".

त्यांच्या सातत्याने काम, कष्ट, विविध्य धाटणीतले उत्कृष्ट विचार, आणि अश्या असंख्य गुणांनी मीच नाही खूप जणांना शिकता आलं ते नेहेमी म्हणायचे "तुमचं काम बोललं पाहिजे तुम्ही नाही".  पुढ्यात मांडलेलं प्रत्येक आव्हान स्वीकारायचंच. हे जमेल कि नाही ह्यात वेळ आणि शक्ती वाया घालवण्या पेक्षा करून बघायचं, जमतं. "केल्याने होत आहे रे...". माझे बाबा मला मुलापेक्षा वरताण म्हणायचे नाही तर तसं घडवलं.  बँकेत आवर्जून घेऊन जायचे, व्यवहार, फॉर्म भरणे समजावून सांगायचे आणि त्यांची कामे होईस्तोवर मला बँकेत आलेल्या ज्यांना लिहिता-वाचता येत नाही अश्यांची मदत करायला लावायचे. 

शुक्रवार, ९ जून, २०२३

ना घर का ना ....

अगदी समजायला लागल्या पासून माझ्या वेळी तरी एक वाक्य सारखं कानावर पडायचं मग ते आईने सांगितलं असो, किंवा शेजार पाजारी, मित्र मैत्रीण, नातेवाईक, सणसमारंभात सर्वत्र एकवाक्यातच जणू. "उद्या सासरी जायचं आहे...", खाणं, पिणं, बसणं-उठणं, वागणं-बोलणं अगदी प्रत्येक वेळी. अशी जय्यत तय्यारी करून सासरी पोचले आणि तेथे वेगळंच मांडून ठेवलेलं होतं, अगदी सगळं उपर, अनिश्चित, अनभिन्न असं. दोन दशकं उलटून गेली पण पकड मधे काहीच नाही. म्हटलं असं का? 

काही दिवसांपूर्वी एक लेख वाचनात आला, "ना सासरची ना माहेरची". म्हणजे "घरो घरी मातीच्याच चुली" आहेत तर, हे लक्षात आलं. 

मागे एकदा लिहिल्याप्रमाणे ह्या न्यू-नॉर्मल दिवस सरल्यानंतर आमच्या जुन्या घराचा नक्षा नखशिखान्त बदलला गेला. मुलीची,मुलाची आणि ह्याची स्वतंत्र खोली अभ्यास आणि कामाच्या मस्त टेबल सहीत तय्यार झाली. मी मात्र कधी इथे ठाण मांड, कधी तेथे, आज ह्याच्या खोलीत, तर उद्या त्याच्या, नाहीतर मांडी घालून खाली सगळे विविध प्रकार अनुभवले. मग सहज लक्षात आलं कि मी शिकलेली सवरलेली, नोकरी करणारी असून देखील माझा मेज, माझी खोली कुठे आहे? तर कुठेच नाही. माहेरी पण नाही. अरेच्चा. म्हटलं हे काय. 

मग कोणाचा तरी स्वर सातत्याने कानावर आला, मंत्रमुग्ध व्हायला झालं अक्षरशः. तो आवाज सांगतो मला कि "श्वास तरी आहे का तुझा गं?" हवा, वारा, प्राणवायू हा आपोआप वावरतो आहे म्हणून आणि श्वासोश्वास यंत्रणा सुरळीत सुरु आहे म्हणून खेळ आहे ना, नाही तर. सगळ्या अत्यावश्यक क्रिया जसे के पचन, रक्ताभिसरण, मनन, चिंतन, चलन-वलन ई. सुरु आहे बिनबोभाट मग? आणि "ह्यात तुझं काय आहे?, तू कशाला जबाबदार आहेस? तुझ्या मुळे काही होतंय का?" अर्थात उत्तर "नाही" असेच आहे, मग चिंता कशाला? आपलं जर काहीच नाही ज्यात प्राण आहे, आपला धरून, तर मग प्राणहीन वस्तू किती आहेत, कोणी वापराव्या ह्या करता तय्यार केल्या आहेत हे सगळं डोक्यात आणण्याची गरज नाहीच सपशेल. जागी हो, वेगवेगळी ठिकाणे अनुभवं आणि मार्ग क्रमण सुरु राहू दे. 

हे सगळं घडत होतंच तेवढ्याच माझी एक सख्खी मैत्रीण आहे कचेरीत, तिने सहज विषय काढला. म्हणते कशी, "कचेरीत तरी आपल्याला मान आहे, कामं भरपूर करवून घेतात पण त्याचा मोबदला देखील देतातच ना, पैश्याच्या स्वरूपातच नव्हे तर पाठिवर थाप, प्रशंसा पत्र देतात आणि एक त्यामुळे ओळख निर्माण होते हे वेगळंच, भरपूर शिकायला पण मिळते, वैविध्य लोकांची ओळख होते...". हे सगळं घडण्यासाठी ज्या दिवशी तुम्ही कचेरीत येता तेव्हा तुच्यासाठी खास जागा असते नेमलेली, संगणक दिला जातो, खुर्ची आणि इतर लागणाऱ्या सर्व सोयी सुविधा देखील वेळोवेळी दिल्या जातातच. 

मग त्या लेखात "सासरची ना माहेरची" ह्यात एक टप्पा अजून जोडावासा वाटतो "सासरची ना माहेरची पण ऑफिसची / लोकांची". इथे नाही तर तेथे सगळं व्यवस्थित पार पडतंय, घरचे-दारचे ह्या-ना-त्या निमित्याने फुल-ना-फुलाची पाकळी स्वरूपात सगळं करत आहेत, डोक्यावर छत आहे, तिन्ही त्रिकाळ पोटभर वाढलं जातंय, मुलं आहेत, नातेवाईक, मित्र-मैत्रिणी आहेत, मेंदू जागेवर आहे, समाधान आहे, हेच पुरेसं आहे. कोणी तरी म्हटलं कि "आपल्याला हे शरीर भाड्याने दिलं आहे काही काळा करता, बास, त्याचा सदुपयोग करा, ज्या कार्यासाठी आपली "त्याने" निवड केली आहे ते घडेल निश्चित, हसत खेळत, ह्या नाहीतर त्या जागी बसून, उठून, रांगून का होईना गाडी पुढे जाते त्या बरोबर जा. 

बुधवार, ७ जून, २०२३

कृतज्ञता

वडिल ह्या शब्दाची उत्पत्ती / उगम कुठून झाला हे मला ठाऊक नाही, शोधलं पण खास काही सापडलं नाही. माझ्या मनाला जे पटतंय ते येथे मांडण्याचा हा पिटुकला प्रयत्न. 

वड हा वटवृक्ष. किंवा असं देखील म्हटलं जातं कि वडाच्या एकतर प्रत्येक भागाचा उपयोग होतोच. तो वृक्ष निरपेक्ष रित्या सर्वांना सगळं काही देत राहतो सातत्याने. शिवाय अशी पण आख्यायिका आहे कि त्या वृक्षाखाली बसून, जप-तप करून, साधना करून अथवा न करता देखील मागितलेली ईच्छा पूर्ण होते बहुतांशी प्रत्येकवेळा. अर्थात अजून असे बहू गुणी वृक्ष आहेत. पण एकंदरीत वडाच्या वृक्षाचा महिमा सर्वश्रुत असल्यामुळे मग जाणकारांनी पित्या ला ती उपमा दिली असणार आणि म्हणून वडिल ह्या शब्दाचे मूळ वड असणार. 

एक क्षणोक्षणी अनुभवलेले, अनेक वर्ष झाली किंबहुना तपें लोटली तरी देखील संपूर्ण न उमगलेले, दर दिवशी नवीन भासणारे असे एक वडिल. सुरवंटाचे फुलपाखरू झाले अचानक असे ते, पण येथे ह्या फुलपाखराच्या पंखात प्रचंड बळ आहे, कुठून आली हि शक्ती हे ठाऊक नाही. पण ज्या दिवशी ह्या मुलाचं शिक्षण पूर्ण झालं, नोकरीत रुजू झाल्यापासून प्रचंड जबाबदारी पेलली जी सहसा कोणी निभावत नाही. वरवर जबाबदारी घेतली असं दर्शवणं आणि ती निभावणं अनेक वर्ष सातत्याने हे महाकठिण किंबहुना अशक्य आहे. बरं फक्त अवलंबून असलेल्यांची जबाबदारीच नाही तर स्वतःला नोकरी पेशात पुढे न्यायचं आहे, समाजात स्थान निर्माण करायचं आहे, तब्बेत सांभाळायची आहे, मित्र-मैत्रिणी, नातेवाईक ह्याच्या कडे प्रकर्षाने लक्ष आणि त्यांच्यासाठी वेळ द्यायचा आहे आणि अशी अनेक कार्य करता करता स्वतःच्या कुटुंबासाठी सर्व जबाबदाऱ्या हसत-खेळत पार पडायच्या आहेत, स्वतःच्या लेकरांसमोर आदर्श निर्माण करायचा आहे अनेक स्तरावर. नोकरी करता करता तरुण वय असतांना अगदी तो बाबा होणार ह्याची चाहूल लागली तेव्हापासून ते पुढे वीस वर्ष सगळ्या अमिनिटीज / पंचतारांकीत सोयी सुविधा उपलब्ध करून देणे, मागायच्या आत सगळं हजर करणे, कधी मऊ तर कधी कडक शिस्तीत राहून मार्गदर्शन करणे हे प्रत्येकाच्या बसची बातच नाही आहे. विभक्त कुटुंब पद्धती असल्यामुळे आजी होऊन जन्माच्या आधीच असंख्य गोष्टी ऐकवणे, खूप पौष्टिक खाऊ घालणे, त्याच्या बाळाचं मालिश शास्त्रोक्त पद्धतीने कसं करायचं हे शिकून सातत्याने करणे, जन्मलेल्या बाळाची जिवापाड काळजी घेणे, त्यांची सगळी कामे करणे, शिवाय शेकडो फोटो काढून सगळ्या आठवणी जपणे, शाळेचा अभ्यास, महाविद्यालयाची किचकट प्रवेश प्रक्रिया आणि अशी इतर सगळी कार्य सांभाळत कचेरीत गगनभरारी मारणे, सुधृढ राहणे आणि अशी इतर अनेक आव्हाने सहजी पार पाडणे म्हणजे दिव्यच. तर असे हे माझ्या दोन जुळ्या मुलांचे आदर्श वडिल. वडिल म्हणून मला देखील अभिमान वाटावा असे ते व्यक्तिमत्व. आम्हा तिघांना डोक्यावर आलिशान छत, ऐशोआरामात प्रवासासाठी चार चाकी, उत्कृष्ट खानपानाची ऐश आणि म्हणेल ते सातत्याने पुरवठा करणारे, वडिलांची भुमिका चोख पार पडणारे अश्यांना आंतरराष्ट्रीय फादर्स दे च्या हार्दिक शुभेच्छा आणि मनःपूर्वक शेकडो धन्यवाद.  खूप प्रचंड शिकण्यासारखं आहे ह्या व्यक्तिमत्वाकडून, प्रयत्न जारी आहेत पण ह्या उभ्या आयुष्यात त्यांच्या नखाची पण सर मला येणार नाही हे नक्की.     

  

मंगळवार, ३० मे, २०२३

भिशी

माझी आई कधीच ह्या भिशीच्या भानगडीत पडली नाही, सहज शक्य होतं तिला, पण का कुणास ठाऊक नाही उतरली त्यात. अगदी आदरभावाने, कुठलाही किंतु-परंतु नाहीच, पण मला देखील कधी त्याची आवड निर्माण झाली नाही, किंबहुना घर आणि ऑफिस ह्यातून फुरसत काढली गेली नाही भिशी साठी. कचेरीचे काम संपले नाही तर घरचे सुरु होत असे. असो. भिशी म्हणजे माझ्या दृष्टीने एक तर महिलांची किंवा पुरुषांची असते. भिशी हि एक फार अप्रतिम कल्पना आहे ज्यात एक खास विशिष्ट्य जमापुंजी उभी होते. महिन्यातून एकदा सर्वांची गाठभेट होते, हास्य, गप्पा पेरल्या जातात, उत्कृष्ट चविष्ट विचारपूर्वक केलेलं बहुतांशी घरचं सर्वांसोबत मस्त फस्त केलं जातं. प्रत्येक महिन्यात एक ठराविक विषयावर चर्चा केली जाते किंवा त्या पद्धतीने एकंदरीत संपूर्ण कार्यक्रम पार पडतो आणि तेथेच पुढील महिन्यात कुठे गाठ-भेट हे देखील निश्चित केलं जातं. एक बहुस्मरणीय असा अनुभव भिशी देऊन जाते, उत्साह, ऊर्जा मिळते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे एखाद्याला जर त्या महिन्यात जमापुंजीची गरज भासली तर सगळे जण हिरीरीने मदत करतात. 

गेले काही वर्ष दर महिन्याला आम्ही आवर्जून भेटण्याचा आटोकाट प्रयत्न करतोच. त्या दिवशीची थीम जी असेल त्यावर भाष्य करतो, ऐकतो, त्या पद्धतीने किंवा जसं जमेल तस्स साग्रसंगीत घरच्या पदार्थांचा आस्वाद घेतो, दर महिन्याला वेगवेगळ्या मित्रांच्या / आप्तेष्ठांच्या घरी. समविचारी लोकांशी, मित्र-मैत्रिणींशी गाठ-भेट होते, वैचारिक आदान प्रदान होते. उत्साह, ऊर्जा अगदी महिन्याभर टिकेल इतकी निर्माण होतेच कारण सर्वांनी एकसंघ रितीने, उच्चारातून निर्माण झालेल्या त्या प्रासादिक, आशिर्वादात्मक लहरी असतात. आणि हो ज्यांना जेव्हा ज्याची गरज पडेल तेव्हा अख्खा ग्रुप मदतीसाठी सदोदित तय्यार, सर्वार्थाने, माहिती पुरवणे, प्रार्थना करणे आणि इतर बरेच काही.  किंबहुना ह्या अश्या दर महिन्याला विशेषतः एकादशीच्या दिवशी भेट घडल्यामुळे प्रतिबंधात्मक असा मार्ग साध्य होतो प्रत्येकाला जे तेथे उपस्थित आहेत, त्या वास्तूच्या आजूबाजूला असलेल्या प्रत्येक सजीव निर्जीव घटकांवर, अनेक मैल लांब  आणि टिकतो देखील, बराच काळ. आणि ह्यात उपस्थिती लावणारे महिला आणि पुरुष देखील आहे, विविध्य पातळीवर काम करणारे असे तज्ज्ञ, अगाध ज्ञानाने परिपूर्ण तरी देखील एकत्र.  बघा तर मंडळी आहे कि नाही आमची भिशी खास आणि हटके, असंख्य उपयुक्त लहरी ची जमापुंजी निर्माण करणारी. 

सोमवार, २९ मे, २०२३

"नावात काय आहे?"

श्री विष्णूंची मूर्तिमंत ऊर्जा, देवीचा अवतार, शक्तीचे प्रतीक असे अनेक अर्थ आणि वैशिष्ट्ये असलेली माझी एक खास तरुण मैत्रीण आहे. गेली अनेक वर्ष आम्ही एकत्र काम तर करतो आहेच पण भेटतो देखील एकमेकींना वैविध्य कारणास्तव. माझी तिची ओळख माझ्या महाविद्यालयाच्या संचालकांनी करून दिली, म्हणजे डायरेक्टर सरांनी तिच्या धडाडीची एक गोष्ट कथन केली आणि तशी ओळख झाली. ह्याच मैत्रिणीची लेक अगदी पिल्लू होती त्यावेळी तिने पिल्लू आणि आजीला वसतीगृहात दिवसभर राहायची परवानगी मागितली होती, त्यावरून हे माझ्या नागपूरचं व्यक्तिमत्व भन्नाट आहे, वेगळं रसायन आहे हे लक्षात आलं होतं आणि तीच ऊर्जा, कणभर जास्तच पण कमी नाही, अशी आज तागायत दर्शनीय आहे, हे कौतुक. "नावात काय आहे?" असे दिग्गज म्हणतात, म्हणून गेलेत, पण माझ्या दृष्टीने तर नावातच सगळं काही आहे हे निश्चित आणि ह्या मैत्रिणीच्या नावासारखीच हि आहे ह्यात शंकाच नाही. 

हे आमच्या कचेरीत येणारं पिल्लू मोठं झालं, नेहेमीची नोकरी आणि संलग्न कामे अत्यंत उत्साहाने पार पाडली, दुसरं पिल्लू देखील आलं, घरचं - दारचं अत्यंत शिताफीने सांभाळ गेलं, विद्यावाचस्पती पर्यंत हसत खेळत प्रवास झाला, भाऊजींची लाडकी वाहिनी हा सन्मान पटकावला, अनेक धनुष्य ताकदीने पेलले मग ते पहिल्या वर्षीच्या मुलांचे इंडक्शन असो, नाहीतर सांस्कृतिक वार्षिक कार्यक्रम नाही तर शेवटच्या वर्षाच्या मुलांचा निरोप समारंभ, अहाहा च, अगदी निःशब्द करून टाकले प्रत्येक वेळी, स्मितहास्य आणि पोटभर आनंद उपभोगत पेरलेलं नेहेमीच. 

सगळ्या स्तरावर अगदी अग्रगण्य, माणसं सांभाळणं, ट्रेंडी राहणं, उत्कृष्ट गाडी चालवणं, भन्नाट चविष्ट पदार्थ, नवीनतम गाण्यांची माहिती असणं, ती ऐकवणं, प्रत्येक विद्यार्थ्यांशी मैत्रीने वागणं / बोलणं, प्रत्येकाकडून स्मार्टली कामे करून घेणं ई. आणि बरेच काही, यादी लांबलचक आहे. तर अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर अशी हि आमची वैष्णवी, ऊर्जेचं दुसरं नाव, उत्साहाचा सळसळता झराच जणू, प्रत्येकासाठी फार महत्वाची अशी ऍसेट.  

बुधवार, १७ मे, २०२३

तिला वेळ देऊन तर बघा

माझ्या आंतरराष्ट्रीय विद्यापीठात आणि प्रकर्षाने माझ्या विभागात खूप तरुण मुली आहेत. सध्याच्या नियमांनुसार विद्यावाचस्पती होणं अत्यावश्यक आहे प्रत्येकालाच. त्याच प्रमाणे ह्या सगळ्या नवतरुणी पण संशोधन करत आहेत. सगळ्याजणी घरदार, पूर्णवेळची नोकरी सांभाळून शिवाय जीव तोडून संशोधन पण करत आहेत सातत्याने गेली अनेक वर्ष सलग. इतक्या प्रचंड प्रमाणावर कामं त्यामुळे झपाटल्यासारखे वागणे, घड्याळाच्या काट्यावर. 

इतक्यातच खूप मस्त सप्तरंगी चित्र बदललेलं आढळलं मला, अचानक आणि जसा कि हवेत बदल झालायं, दिशा आणि गती जणू बदलली आहे. म्हटलं कश्यामुळे असेल अचानक? काय असा बदल झाला? कारण कामे तेवढीच आहेत कचेरीत, किंबहुना कणभर वाढलेली आहेत, मग? आणि नखशिखान्त बदल त्यात सगळ्याच्या सगळ्या बदलल्या. आधी पण छान दिसत असतं त्या, पण आता काही चमक वेगळीच आहे, मॅचिंग ची बहार आली आहे, खूप ढिगाने नवनवीन ड्रेस परिधान केले जात आहेत, केशरचना वाखाणण्यासारखी भन्नाट झाली आहे, आणि असे बरेच काही. 

माझ्या पिटुकल्या मेंदूला किंचितसा ताण दिल्यावर लक्षात आलं एक तर ह्या सगळ्या जणी विद्यावाचस्पती नुकत्याच झाल्या आहेत किंवा त्यांचे शोध निबंध सबमिट झाले आहेत. अहाहा च. मोठी जबाबदारी उत्कृष्ट रित्या पार पडल्याचा तो साज सहज चढला आहे सर्व जणींवर. आता हातात राखीव वेळ आहे त्याचा सदुपयोग उत्कृष्ट रित्या केल्या जातोय. त्यामुळे त्यांनाच नाही तर त्यांच्या आजूबाजूच्या सर्वांवरच त्याचा जगावेगळा परिणाम जाणवतो आहे, एक वेगळी ऊर्जा निर्माण झाली आहे. वेचून शोधून दागिने मिरवले जात आहेत. अहाहा. 

हे सगळं दृश्य डोळ्यात साठवणं अवघड आहे मला. त्यावरून आठवलं, शोधनिबंधावर काम सुरु असतांना घरी आणि दारी जरा ह्या माउलींचा / मुलींचा हात मोकळा राहील ह्याकडे लक्ष द्या आवर्जून. मग बघा थोडासा जरी जास्तीचा वेळ मिळाला तर ह्या १० हत्तीची ताकद एकवटून जास्त जोमाने सर्वदृष्टीने कामाला लागतात, झकास दिसतात, प्रसन्न राहतात, बाकीच्यांना उत्साहाचा झरा प्रदान करतात आणि काही दिवसांची कामे काही मिनिटात मार्गी लावतात. थोडासा कामाचा जोर कमी ठेवा, मदत करा सर्वतोपरी आणि बघा त्याचे अगणित फायदेच फायदे. 

सगळ्याच जणी आपापल्या ठिकाणी फार मोठे कार्य करत आहेत, धडपड करत आहेत, पेरत आहेत आणि उंची गाठत आहेत. कामं हि प्रत्येकाची जबाबदारी आहे. त्यामुळे एक मेका साह्य करू अवघे धरू सुपंथ.... 


नाकापेक्षा मोती जड - २

माझ्या सगळ्या शिक्षकांना / गुरुजनांना मला धावत पळत जाऊन भेटावसं वाटतंय, मुख्यत्वे मराठीच्या. मागे लिहिल्या प्रमाणे आम्हाला "वाक्यात उपयोग करा" असा एक आव्हानात्मक प्रश्न असायचा. म्हणी देत असतं आणि त्यांचा वाक्यात प्रयोग करायचा, किंबहुना त्यांचा वापर करायचा. तेव्हा प्रचंड अवघड होतं ते, कारण एखादा अर्थ माहिती असायचा, जो गुरुजनांनी सांगितला आहे किंवा कानावर पडला आहे, बास, त्यापुढे काहीही नाहीच. 

गुरुजनांनी पुस्तकाबाहेर जाऊन त्यांच्या दैनंदिन जीवनातले किस्से सांगून आम्हाला अधिक सक्षम करायला हवं होतं. त्यांच्याकडे ढिगाने अनुभव असणार. मग जर त्या गोष्टी सांगितल्या असत्या, कथन केल्या असत्या तर पाठांतर कमी करावं लागलं असतं आणि मस्त प्रयोग / वाक्य झाले असते तय्यार. खैर. आजचा माझा अनुभव ऐकवते. 

मी सकाळचे कोवळे ऊन खायला आणि हवेतला गारवा अनुभवायला सोसायटित खाली जाऊन चक्कर मारून बसले, बराच वेळ, सुट्टीचा सदुपयोग अजून काय. आणि हि मागल्या २-३ दिवसांपासूनची रोजनिशी बरं का. असंख्य गाड्या डोळ्यासमोरून आल्या गेल्या. माझ्या चार डोळ्यांनी काही तरी खास टिपलंच तेवढ्यात. आताशा सगळ्या रणरागिणी कामाला येणाऱ्या मावश्या देखील भल्या मोठ्या गाड्यांवर विराजमान, कानात गाणी आणि मस्ती मस्त. त्या नंतर चा भाला मोठा ताफा म्हणजे स्विगी, बिग बास्केट आणि इतर कंपन्यांचे प्रतिनिधी. ह्या शिवाय अजून बरेच वाहनचालक. सगळ्यांमध्ये एक साम्यता आढळली. अवजड गाड्या आणि त्यावर विराजमान झालेले छोटेसे, बारके, वजनाने अगदी कमी असेच सगळे. का? आपल्या शरीरयष्टी नुसार पण गाड्या मिळतात हो, छोट्या आकाराच्या, कमी वजनाच्या, मग इतक्या न सांभाळता येणाऱ्या का घ्यायच्या? पाठीचं काय होईल काही वर्षांनी? थोडा तरी विचार, सद्सद विवेक नको का? माझाच रक्तदाब वाढला न कळत. एका प्रसिद्ध चित्रपटात घोड्यावर गधा काढलेला दाखवला आहे, तसं काहीस भासलं मला, अतिशयोक्ती नाही पण "हत्तीवर उंदीर जसा", "नाका पेक्षा नक्कीच मोती जड", काही दुमत नाहीच. 

बघा आता, अगदी सहज डोळ्यासमोर आलेले असे प्रसंग सांगत शिकवलं तर कित्ती भन्नाट लक्षात राहील नाही. बघता बघता माझे एक वाक्य नाही तर अख्खा ब्लॉग लिहून झाला.  

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...