१०८ बेलाची पाने श्री शिव पिंडीवर वाहणे, त्यांचे नामस्मरण करतं हे आपली परंपरा, साधना आणि पूजा, श्रावण सोमवारच्या दिवशी, किंवा मंगळागौरीच्या दिवशी वगैरे. बेलाचे झाड हे एक तर आपोआप येते, त्याचा मोठा वृक्ष होतो आणि तो स्वतःच त्याची काळजी घेतो, फुलांच्या शेतीसारखं काही जपावं लागत नाही किंवा कीड लागली आहे, फवारणी करा, पाणी योग्य प्रमाणात द्या, कमी झालं तरी पंचाईत आणि जास्त झालं तर नुकसान. फुलांचा जीव एवढासा त्यामुळे त्यांचे शेल्फ लाईफ, म्हणजे ताजे तवाने राहण्याची किंवा टिकण्याची क्षमता थोडे दिवस असते. तसे ह्या बेलाच्या पानांचे नाहीच. बेलाची पाने फुलांसोबत किंवा भाजीसोबत एकत्र त्याच टेम्पो मधे येत असतील बहुदा. वेगळे आलेत असं होणे नाही. पैशांचा प्रश्नच नाही, देवासाठी, पूजेसाठी म्हटलं कि त्यानेच दिलेले त्यालाच अर्पण, अश्या प्रकारे सणासुदीचे महाग हार, फुले नेहेमीचेच आहे आणि गिऱ्हाईक पण आहे त्या वाढत्या किमतीला. सोमवारी संध्याकाळी एका बेलाची पुडीची किंमत ऐकून मला वेगळंच कसं तरी झालं. अर्थात माझ्या वेळी मी पाच रुपये दिले होते ते आता कदाचित इतक्या वर्षांनी पन्नास झाले असतील, मान्य आहे मला पण एकशेवीस रुपये एकशेआठ पानांना? अबब, काय हे? कशासाठी? काय म्हणून? आणि तो घ्यायला आला होता तो असेल २० एक वर्षाचा मुलगा. तो आला, बेलपुडी मागितली, किती झाले विचारले, स्कॅन केले आणि निघून गेला, बास. आणि मी माझ्या चार डोळ्यांनी फक्त हे दृश्य बघत राहिले. मी तेथे हार घ्यायला गेले होते, जे आज श्रावण सुरु झाला म्हणून १० रुपयांनी महाग होते. ते ठीक आहे, पण १२०? मला अजूनही धडधडतं आहे. आईने सांगून पाठवलं नसेल का किती पर्यंत येईल पुडी ते? पेरिशेबल म्हणजे शीघ्र नष्ट होणारे किंवा खराब होणारे नाजूक फुलं असतील तर एक वेळा मान्य आहे. पण हे काय? उलट आमच्या जवळपास एक आठवडी बाजार भरतो, साधारण संध्याकाळी ४.३० ला सुरु होतो, आम्ही सगळे ५ पर्यंत पोचतो आणि भाजी घेतो. पण माझ्या सोसायटीतल्या काही मैत्रिणी बरोबर ८.३० वाजता जातात. ते वेळ त्यांची जायची वेळ असल्यामुळे ते अर्ध्या किमतीत बऱ्याच भाज्या देऊन टाकतात. कुठलीही तुलना नाही, पण अगदी तसेच संध्याकाळी ५.३० म्हणजे सोमवार संपला ना, तरी देखील एवढी किंमत? मला फुलांच्या धंद्यातलं काहीच कळत नाही पण बसलेला धक्का मोठा होता. काहीही म्हणा.
सोमवार, ५ ऑगस्ट, २०२४
रविवार, ४ ऑगस्ट, २०२४
१९७१: उपवास
अगदी न कळत्या वयापासून माझं जीवापाड प्रेम जडलं, आणि ते इतकं म्हणजे इतकं घट्ट होतं, इतकं सुंदर होतं, स्वादिष्ट होतं कि कुठल्याही वेळेला मी एका पायावर उभे असायचे माझ्या प्रेमाखातर. श्रावणी सोमवार, गुरवार, शनिवार, मोठी एकादशी, महाशिवरात्र, आणि असे दिवस म्हणजे मेजवानी हे समीकरण ठरलेलं होतं माझ्या साठी. अगदी म्हटलं ना न कळत्या वयापासूनच. स्वच्छ जागेवरून रेती आणायची, बेल पत्री, बाकी पत्री, पांढरी फुलं, माळा वस्त्र, पिंड करायची, पूजा करायची, शिवस्मरण, आणि मग काय जबरदस्त, ताटलीभर, उत्कृष्ट असे उपवासाचे पदार्थ, कित्ती तरी, अहाहा च. सकाळपासून तक धरून ठेवलेले ते माझे पिटुकले मन आणि पोट, सकाळपासूनच आईची तय्यारी सुरु व्हायची, त्यामुळे घर सुगंधाने भरून जायचे, बहरयाचे, पण नियम कि पूजा झाल्याशिवाय काहीही मिळणार नाही. अर्थात मग पूर्णवेळ शाळा सुरु झाली आणि मस्त डब्बा मिळायला लागला किंवा अर्धवेळ शाळा असल्यामुळे घरी गेलं, दप्तर फेकलं कि आयत्या तटावर तुटून पडायचं. तेव्हा मी हे खात नाही, ते आवडत नाही हे असले नखरे नव्हतेच, येऊ द्या अशी स्थिती होती. काय होते ते दिवस, खरंच. आणि आजूबाजूला, सर्वत्र अगदी सारखे वातावरण. म्हणजे कधीच कोणी उपवास केला नाही हे कधीच कानावर पडलं नाहीच. म्हणजे उपवास करायचाच असतो हेच मला ठाऊक तेव्हा पासून.
काही वर्ष हे समीकरण फारच सुंदर पद्धतीने चालू राहील, पण त्यानंतर माझ्याच नोकरी मुळे आई सारखं काही करता आलं नाही मला, खूप मन खात होतं पण पर्याय दिसत नव्हते. आणि माझ्या मुलांना माझ्या एवढी ओढ नाही ह्या सगळ्या साग्रसंगीत विधींची.
माझ्या मुलगा जेव्हा पहाटे लुडबुड करायचं स्वयंपाक घरात आणि सासऱ्या सारखा कंबरेवर हात ठेवून उभा राहायचा विचारायला "आज काय आहे डब्यात मम्मा ?", उपवासाच्या दिवशी जर मी म्हटलं भगर तर त्याचे डोळे लुकलुकयाचे, इतका खुश व्हायचा आणि मग माझ्या हातचा मस्त मार खायचा, कारण त्याला बर्गर असे ऐकू यायचे. देवा, कुठे भगर आणि कुठे ते पाश्चत्य बर्गर, अर्थात तसं पाहिलं गेलं तर त्यांनी आपल्याच वडा पावाची कॉपी केली आहे, इतकंच काय तो फरक, पण तरी देखील.
आणि आता माझ्या संपर्कातले फक्त काहीच, हाताच्या बोटांवर मोजण्या इतकेच काय ते उपवास करतात, अगदी काम करणाऱ्या बायकांना धरून. महद आश्चर्य वाटायचं आधी पण नंतर जेव्हा पित्त, ऍसिडिटी, दोन प्रकारचे खाणे करण्यास वेळ नसणे आणि विविध कामाच्या वेळा, ह्या सगळ्यांमुळे मग बहुतांशी दोन हस्तक आणि एक मस्तक एवढंच उरलंय. ते हि नसे थोडके. हवामान, वातावरण, भेसळ, तब्बेतीच्या तक्रारी, वेळ, अवेळी नोकरी त्यामुळे खान-पानाच्या वेळेत बदल आणि त्यामुळे सगळीच किंचित गडगडलेली गाडी.
माझ्या कडे आणि आजूबाजूच्या फ्लॅट्स मधे स्वयंपाक करणाऱ्या एक मावशी होत्या. त्या खऱ्या उपवास करणाऱ्या. निर्जळी किंवा जास्तीत जास्त एका वेळी काही फळं, बास, नाहीतर मी, जास्त म्हणजे अती खात होते उपवासाच्या दिवशी. असो, "कालाय तस्मै नमः"।।
१९६९: फुलझाडं
अगदी शालेय दिवसांपासून किंवा त्या आधी सुद्धा एकच समीकरण ठाऊक होतं ते म्हणजे झाडाला फुलं येतात. म्हणजे एक रोपटं असतं, ते जमिनीत आपली मुळे पसरवतं, ते मजबूत होता होता त्याची उंची देखील वाढते आणि रुंदी पण. म्हणजे त्या झाडाचा जसा स्वभाव असेल, ते ज्या गटातील आहे त्या नुसार. पण हे निश्चित कि मुळं, झाड, फांद्या, पानं आणि मग कळ्यांची फुलं हाच क्रम आहे, असतो, असायला हवा. पण अहो काय सांगू एवढयात एक चमत्कार झाला. माझ्या खास मैत्रिणीने मला एक खूप सुंदर आणि विचारपूर्वक फुलांचं झाड बक्षीस दिलं. ते मी घरी आणलं, आणि मोठ्या कुंडीत लावलं. त्याला अधे मधे फुलं येत होती, डोकावत होती. पण गेले काही दिवस चमत्कार झाल्यासारखं समजतंच नाही आहे कि झाडांना फुलं येतात कि फक्त फुलांचे झाड असते आणि कुठेतरी अगदी शोधल्या तर एखाद दोन फांद्या आणि पानं नजरेस पडतात. हे म्हणजे ३६० अंश वेगळं चित्र उभं ठाकलं आहे. इतका बहर मी कधीच अनुभवाला नव्हता ह्या आधी. इतकी उत्साहानी फुलं आली आहेत कि ते त्यांचा कुठला आनंद व्यक्त करत आहे हे समजण्या पल्याड आहे. कदाचित आज मैत्री दिन आहे त्यामुळे त्याची त्याने आधीपासूनच तय्यारी केली असणार. म्हणजे इतक्या प्रेमाने दिलेलं आहे कि मैत्रिणीची आठवण झालीच पाहिजे आणि ती प्रकर्षाने, वेगळ्या पद्धतीने, अनोख्या ढंगाने, म्हणून त्याची हि धडपड जी खूप काही दर्शवून गेली. आणि सर्वात महत्वाचे आणि दुर्मिळ म्हणजे त्या पिटुकल्या असंख्य गुलाबांना सुगंध आहे. अहाहा च. क्या बात है? असं दुसऱ्यासाठी शोधून आणणं म्हणजे खूप खास अशी बाब आहेच.
आताशा गेले काही दिवस खूपच शहाण्यासारखा पाऊस पडतोय. म्हणजे संततधार आहे, पण बारीक, भुरभुर असाच आहे, उगाच विजांचा कडकडाट वगैरे नाही. अगदी पुण्याचा ठराविक पद्धतीचा पाऊस. त्यामुळे सुर्यबाप्पाचं दर्शन दुर्मिळ झालं आहे, सर्वत्र फक्त अंधारलेलं असं वातावरण आहे. अर्थात हे खूप महत्वाचं आहे, पाणी साठा वाढण्यासाठी किंवा जमिनीत पाणी मुरण्यासाठी, शेती साठी ई. पण माणसाला थोडसं वेगळं वाटणं स्वाभाविक आहे. अश्या वेळी हे बहरलेले, फुलांनी झाकलेलं, वाकलेलं सुगंधी झाड खूप प्रोत्साहन देऊन जातंय, खूप काही शिकवून जातंय, मस्त रंग छटा पसरवून जातंय आणि खूप सुंदर दृश्य सातत्याने दाखवतंय. ते झाड फक्त फुलांनी नाही तर आश्चर्यकारक पद्धतीने तितक्याच किंबहुना जरा जास्तच प्रमाणात कळ्यांनी देखील बहरलं आहे. म्हणजे ह्या पुढे अनेक दिवस, आठवडे हा नजराणा टिकणार आहे हि खात्री आहेच. "काय वर्णू तव गूण अल्पमती नारायण". त्या झाडाला, फुलांना, कळ्यांना, त्यांच्या कष्टाला, माझ्या मैत्रिणीला श्रद्धाला मनःपूर्वक धन्यवाद.
शनिवार, ३ ऑगस्ट, २०२४
१९६७: गट
सध्या पावसाळा सुरु आहे. काही ठिकाणी घनघोर पाऊस, तर कुठे भिरभिर, आणि बाकी ठिकाणी वेगळाच बरसतो आहे तो. आपण सर्व जण शाळेत असतांना विज्ञान विषयात पाउसाबद्दल शिकलो आहे, त्याची एक शिस्त असते, सायकल असते आणि एक मस्त प्रक्रिया देखील. पाणी, ऊन, बाष्प, ढग, पाऊस वगैरे असे काही टप्पे असतात त्यात. प्रत्येक देशात, त्याच्या राज्यात, शहरात, गावात निसर्गाचे एक वेगळे वरदान लाभले असते. त्यात मग काहींना डोंगर दर्या, जंगल, नद्या, समुद्र, असे खूप काही भरभरून मिळालेले असते. ह्या सगळ्या सभोवतालच्या निसर्गामुळे देखील वेगळी वातावरण निर्मिती होते आणि तश्या पद्धतीने पाऊस पडतो, बरोबर कि नाही? ह्या नैसर्गिक वस्तीला तडा गेला कि मग समतोल राखला जात नाही आणि गडबड व्हायला सुरवात होते.
हे झालं जमिनीवरचं. पण आकाश तर एकच आहे, ढगांची निर्मिती, स्थिती, लय आणि स्वभाव देखील एकच. त्यांचे वास्तव्य पण एकसारखे आणि दिसायला पण अनोखे सारखेच. ह्या सर्व सामान धाग्यांमुळे मग पाऊस देखील एकसमान किंवा अगदी १९-२० इकडेतिकडे पडायला हवा. मग फक्त जमिनीवर काय घडामोडी होत आहेत हा एक भाग आहे, त्याचा ठिकठिकाणी अगदीच वेगळ्या स्वभावाचा पाऊस कसा काय होतो हे मला पडलेले कोडं आहे? किंबहुना मला असं म्हणायचं आहे कि जरी वाऱ्याने ढग इकडून तिकडे जात असतात, त्यांची कायम अशी जागा ठरलेली नसते, काही पिटुकले नवशिखे ढग, तर काही भले मोठे अनुभवी, तर काही आजोबा देखील. हि रचना, बांधणी, मांडणी सारखीच आहे तर मग कोण ठरवतं ढगांचे संघ कसे तय्यार करायचे, कोणी कुठे जायचं, कोणात किती पाणी दडलंय, किती वेळ तेथे वास्तव्य करायचं, कधी परत यायचं, कधी हवेशी संपर्क होणार, ती सुटणार आणि मग ढग पळायला लागणार, हवेशी कोण संपर्क करणार, म्हणजे हवा कोणाचे ऐकणार? मी कलस्टरिंग, क्लासिफिकेशन ई. क्षेत्रात काम करत असल्यामुळे मला हे साधे प्रश्न पडलेत. कि कोणाच्या सांगण्यावरून, किंवा कुठल्या माहितीवरून हे सगळं ठरतं, अमलात आणलं जातं, प्रत्यक्ष घडतं ई. "ढगांशी वारा झुंजला रे, आता तुझी पाळी"... हे सगळं इतकं गतिमान आहे, चैतन्य असलेले आहे, चलनशक्तिविषयक आहे, डायनॅमिक आहे कि प्रत्येक वेळी, प्रत्येक ऋतूत सगळं चित्र वेगळंच असतं. मला ठाऊक आहे कि ह्यालाच निसर्ग म्हणतात, ह्याला "त्याची" शक्ती म्हणतात, पण विज्ञानाच्या संदर्भानुसार नक्की किती पाण्याचा साठा कुठे अर्पण करायचा, किती वेळ बरसायचं हे गणित, समीकरण कळतंय पण वळत नाहीच मला. इतकं सोप्प नसावं ते. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात म्हणतात तसं मल्टि व्हॅरिएट अनालिसिस ह्या पेक्षा मोठे.
१९६६: ऑडिट
अधिकृत तपासणी करणे हा एक महत्वाचा भाग होता शैक्षणिक क्षेत्रातला. शैक्षणिक क्षेत्र म्हणजे फक्त हात हलवत जाऊन, तेच ते शिकवून पुन्हा संध्याकाळी हात हलवत येणं नाही. माझ्या मते साधारणतः २०१७ पासून आमूलाग्र बदल आणि तो देखील खूप म्हणजे खूप झट कि पट झाला, काही उमगायच्या आत. कधी कधी प्रत्येक सहा महिन्यांनी तर कधी संपूर्ण वर्षानंतर अभ्यासक्रमाचे ऑडिट होत असे. मी खूप दा ह्या ऑडिट चमूची मुख्य व्यक्ती म्हणून देखील काम बघितले आहे अत्यंत आनंदाने. खूप मज्जा यायची, कारण आधी माझ्या विद्यापीठाने मला त्या ऑडिट चमूचा भाग केला, मग मुख्य केलं आणि मग चेअर मॅन म्हणून बाकी विविध संस्थांमधे पण पाठवलं.
का कुणास ठाऊक पण अगदी पहिल्या पासून, किंवा मी एक सर्टिफाइड reviewer, प्रमाणित समीक्षक असल्यामुळे असेल कदाचित, किंवा मूळ स्वभाव, पण मला त्या बाहेरून येणाऱ्या चमूला काय अपेक्षित आहे हे थोडक्यात माहिती असायचं किंवा मांडता यायचं. माझ्या चमूने मांडलेलं त्यांना भावलं अनेक वर्ष. त्यामुळे एक तर आमचं ऑडिट मस्त आणि पटकीनी होत असे, अगदी दरवेळी. बाप्पा ची कृपाच म्हणायची.
माझ्या असं ऐकण्यात आलं होतं जे माझ्या साठी नव्हतं, पण तरी देखील कानावर पडलं. जर एखाद्या ऑडिट च्या चमूने वेडे वाकडे प्रश्न विचारले किंवा वेगळ्या दिशेने गेले तर त्याच्या संस्थेच्या ऑडिट च्या वेळी गडबड होऊ शकते. कारण ऑडिट चमूचे देवाण घेवाण होत असे, ह्या संस्थेचे त्या संस्थेला पाठवले जाई. "पेराल ते उगवेल" ह्या म्हणीनुसार देखील उणेदुणे उगाचच काढले तर पुढे जाऊन गडबड होऊ शकते, कारण कुठलीच संस्था किंवा काम हे अगदीच १००% नसतं सर्वानुमते. असो. हे आज अश्या अर्थी आठवलं कि एक कार्यक्रम आहे "से एस टू द ड्रेस". होणाऱ्या नवरीचा पांढरा पोशाखाची निवड करण्याकरता लवाजमा घेऊन जातात दुकानात, अगदी जसे आपल्याकडे लग्नाचा बस्ता बांधण्याकरता. "एक मेका साह्य करू अवघे धरू सुपंथ", अगदी जवळचे मित्र, मैत्रिणी, नातेवाईक, तानेवाईक ई. येतात. उणेदुणे काढले जातात, आवडी निवडी सांगितल्या जातात, कधी सोज्वळ पद्धतीने तर कधी वेगळ्या पद्धतीने. असो. मला एवढंच नमूद करायचं आहे कि प्रत्येकाकडे एकदा तरी लग्न समारंभ असणार आहेच. मित्रत्व दोन्ही तर्फे असतं, त्यामुळे पुढल्या वेळी ते जे आज काही बाही ऐकत आहेत नंतर त्यांची बारी येणार. त्यामुळे एक तर विचारलं तर बोला, जमेल तेवढं मृदू असू द्या वाणी, कौतुक करा आणि त्या संपूर्ण प्रक्रियेचा भाग व्हा, आनंद उपभोगा. बास. तुम्ही जेव्हा जेव्हा अश्या ठिकाणी हजर राहाल तेव्हा तेव्हा हे प्रकर्षाने पाळा कारण बहुतेक वेळा तुम्हाला आमंत्रण दिले जाते, सन्मानाने बोलावले जाते, हे लक्षात असू द्या.
गुरुवार, १ ऑगस्ट, २०२४
१९६४: कालावधी
मी जेव्हा पहिल्यांदा आई झाले तेव्हा शास्त्रोक्त मालिश कसं करायचं हे ठाऊक होतंच पण शिकले पण होते, कारण बाळांच्या उत्तोमोत्तम वाढीसाठी, शारीरिक बाळासाठी मालिश सारखा रामबाण ईलाज / उपाय नाहीच. मुलं तर अगदीच लहान होती, ती सांगू शकत नव्हती कि त्यांना कसं वाटतंय. बरं मी शास्त्रोक्त मालिश करायला शिकले तेव्हा तेल कुठले वापरायचे, कसे आणि काय करायचे ई. शिकले पण ते किती वेळ करायचे हे विचारायची विसरले उत्साहाच्या भरात. आणि मग आले कि पिल्लं माझ्या समोर. ओघानेच समजले किंवा होत गेले कि संपूर्ण एक स्तोत्र म्हणे पर्यंत एकाला मालिश करायची. मग ती माझी मोजपट्टी निर्माण झाली, अगदी न कळत किंवा सहजी.
माझे एक खास मित्र आहेत, त्यांची मुलगी आणि नातं आमच्या सोसायटीत राहतात, वास्तव्याला आहेत. ते समोरच्या सोसायटीत राहतात आणि ती फक्त एक छोटी इमारत आहे. त्यामुळे सकाळचे चालणे ते काका आमच्या सोसायटीच्या भल्यामोठ्या प्रांगणात करतात. ते व्यवसायाने नावाजलेले भूल तज्ज्ञ म्हणून निवृत्त झाले अनेक वर्षांआधी. त्यामुळे आता निवांत चालतात सकाळी श्री. विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र लावून, मोठ्याने सुरु असतं. त्यांच्या म्हणण्यानुसार किती वेळ चालायचे हा जेव्हा यक्ष प्रश्न माझ्या समोर उभा ठाकला तेव्हा ह्या स्तोत्राच्या माध्यमातून मस्त उत्तर लाभले. हे स्तोत्र संपे पर्यंत चालायचे, दररोज, न चुकता. किती योग्य उत्तर आहे ना? मला तर खूप भावले.
माझे अजून एक स्नेही आहेत. ते अतिशय उत्साही आहेत, सातत्याने सोसायटीचे काम करतात, खूप जणांना हवी ती मदत करतात, अतिशय स्वतःला गुंतवून ठेवतात, श्री श्री रवी शंकरांची आराधना करतात, सत्संग करतात, दररोज न चुकता एक नवीन भजन गातात, रेकॉर्ड करून सर्वांना पाठवतात ई. असा त्यांचा निवृत्ती नंतरचा भला मोठा उपक्रम आहे. गवती चहा घातलेला सप्तगुणी चहा ते दररोज तय्यार करतात दोघांसाठी सकाळ संध्याकाळ आणि आनंद घेतात त्याचा. त्यांच्या परिसरात आठवड्यातून दोनदा बाजार भरतो आणि ते नित्यनियमाने बाजार करतात, दोनदा दहा रुपयाची एक छोटी जुडी गवती चहाची घेऊन येतात. दररोज दोनदा चहा, अशा पद्धतीने चार दिवसात एक जुडी संपवायची गवती चहाची म्हणजे तब्बेतीला चांगले हे त्यांचे, किंवा त्यांनी ठरवलेले, त्यांना भावलेले मोजमाप. त्या दोघांना यथाशक्ती कामं करण्यासाठी लागणारी ऊर्जा, गाणं म्हणण्यासाठी अत्यावश्यक असे गळ्याचे आरोग्य, श्वासोश्वासावर नियंत्रण, पचन संस्थेचे योजलेले कार्य आणि सर्वगुणसंपन्न अशी प्रकृती टिकवण्यासाठी त्यांचे हे योजलेले किंवा आखलेले किंवा आखले गेलेले समीकरण, आहे कि नाही भन्नाट, आणि किंचित जगावेगळे.
अगदी तसेच आपल्या सर्वांचे देखील आहे, लिखाणा करता किती वेळ द्यायचा, कुठे समाधान मानायचं, कुठे थांबायचं हे सगळं लिहिता लिहिता लक्षात येईल अगदी नक्कीच. फक्त त्या करता लिहिते व्हा, तुमचे उदिष्ट, उदेष्य काय आहे हे निश्चित कराच, म्हणजे "सारी कायनात आपकी मदत करेगी". नाही का? चला तर मग ई-लेखणी उचलाच आणि लागा लिहायला. लिहिते व्हा, व्यक्त व्हा आणि सातत्य टिकवा. बघा मग नकळत कसा अंतर बाह्य बदल घडतो ते.
१९६३: एकमेका साह्य करू
आताशा बाजारात इतके विविध प्रकार मिळतात, त्याच्या दूरदर्शन वर जाहिराती बघायला मिळतात, बरेचसे शेफ देखील त्यांच्या व्हिडिओ मध्ये अनेक जिन्नस ठणकावून सांगतात कि ते चांगलेच आहेत. किंवा मोठ्या मॉल मधे गेल्यावर, बऱ्याचश्या ऑनलाईन किंवा दुकानात विविध प्रकार, वेगवेगळ्या किमतींना मिळतांना बघून ते जिन्नस विकत घेणं होतंच. मी देखील अश्या तूरडाळीच्या जाहिराती बघितल्या, पॉलिश केलेल्या, न केलेल्या, आणि इतर अनेक कंपन्यांनी बाजारात आणलेल्या बघून मस्त वाटलं. काही विकत घेतल्या अगदी कमीत कमी वजनाच्या. घरी येऊन बघतो तर काय शिजायला बऱ्याच त्रास दिला त्या डाळींनी.
नेहेमी प्रमाणे गरम पाणी वापरून बघितले, तेल मीठ घालून पहिले, भिजवून ठेवले काही वेळ, बऱ्याच शिट्ट्या करून बघितल्या, उंच भांडे वापरले म्हणजे डाळींना जरा जास्त जागा मिळेल फुलायला, पण छे. सगळे मुसळ केरात, सगळे प्रयत्न पूर्णपणे वाया गेले. मग जरा म्हटलं अजून वेगळ्या पद्धतीने डोकं चालवूया. शाळेची आठवण झाली "प्रयोगातून विज्ञान" नावाचा विषय आठवला, आणि मग काय कंबर कसलीच.
प्रयोग १: भरडा
प्रयोग २: मिश्र डाळ
त्या डाळींची काय हिम्मत कि त्या शिजत नाहीत? वा, हे बरोबर नाहीच. त्यामुळे मग तूर डाळीसोबत अगदी थोडी मदत म्हणून मूग डाळ घालून बघितली आणि प्रयोग सफल झाला. कदाचित मूग डाळीला शिजतांना बघून तुरीला उत्साह आला बहुतेक. मग काय हा प्रयोग सुरूच ठेवला. कधी मसूर डाळ पण थोडक्यात घातली आणि फारच मज्जा आली, तीच ती तूरडाळ का? असा प्रश्न पडला माझा मलाच. मग मूग आणि मसूर दोन्ही कमी प्रमाणात घातले आणि आमटीला तर मिश्र डाळीची चव आली आणि तूरडाळ पण एकदम झकास शिजली. क्या बात है?
काही प्रसिद्ध खाऊ गल्लीत गेले होते तेव्हा जाणवलं माझ्यातल्या शेफ ला कि हे सांबर काही नुसती डाळ शिजवून केले नाही आहे. काही तर गडबड आहे. मग मी पण डोकं चालवलं, आधी त्याच न शिजणाऱ्या, अखडू तुरडाळीचा भरडा केला आणि तो काही अंशी डाळीत घालून शिट्ट्या केल्या, आणि बघते तर काय इतक्या सहजी ती डाळ शिजली म्हणून सांगते, मस्तच.
बाकी सख्यांच्या साथ संगतीने तूरडाळ उत्साहाने शिजली. सख्यांची मदत मिळाली, थोड्या प्रमाणात हे फार छान झालं. त्या तुरडाळीला आता कोणी म्हणजे कोणीच नावं ठेवणार नाहीच. ह्याची मला खात्री आहे.
चला तर मग आपण पण असेच नकळत, न सांगता कोणाची ना कोणाची मदत करत राहुयात. थोडासा आधार / टेकू / एक ते लागणारं पुश देऊन बघुयात, त्यांची गाडी धावणार ह्यात शंकाच नाही. आणि तुमची, अरे दुप्पट शक्तीने, जोमाने, कारण आंतरीक समाधान लाभल्यामुळे. कुठेही सुतवाच्य न करता हे संभव आहेच, अगदी नक्की. चला तर मग "एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ". बघा म्हणजे, इतक्या त्या पिटुकल्या डाळी, प्रचंड प्रोटीन देणाऱ्या, दररोजच्या वापरातल्या पण कित्ती म्हणजे कित्ती शिकवून गेल्या. प्रयोग करत राहा, अजिबात दोष देण्यात वेळ वाया घालवू नका, आणि दुसऱ्यांची मदत नक्की करा कुठल्या न कुठल्या पद्धतीने नेहेमीच / सातत्याने.
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...