माझे एक शेजारी आहेत. ते काका अगदी दररोज न चुकता, घडाळ्याच्या काट्यावर खाली येतात. थोड्या चकरा मारतात, चालतात हो आणि त्यानंतर ते त्यांची कार उघडतात, फडकं काढून संपूर्ण कार साफ करायला सुरवात करतात, आतून बाहेरून, इकडून तिकडून. खूप वेळ घालवतात दररोज कार सोबत. हे दार उघडणार ते दार उघडणार, झटणार कारण पालापाचोळा पडला असतो. आणि हो हे सगळं व्यवस्थित तय्यार होऊन उत्साहाने. कित्ती छान पूर्ण अगदी जसे कि बाहेर जायचं आहे अश्या तऱ्हेने आटपून सकाळी सकाळी येऊन प्रदक्षिणा सुरु असतात. त्यांच्या सातत्याला सलाम. त्यांना प्रचंड प्रेम आहे त्यांच्या त्या कार वर. त्या प्रदक्षिणा म्हणजे पण एक प्रकारचं चालणंच नाही का, आणि ते देखील प्रसन्न वातावरणात, भरपूर पोपट बडबड करत असतात, वारा असतो, कार ला स्वच्छ बघून आनंद मिळतो हे वेगळंच. दररोज सकाळची त्यांची आणि माझी सुरवात फार छान केल्याबद्दल शतशः धन्यवाद.
गुरुवार, ३१ मार्च, २०२२
झाडू बॅट
आई शपथ, किती महिन्यांनी मला आज एक संधी / मौका मिळाला घर झाडायचा हो, अगदी बरोबर ओळखलंत, आमच्या मावशी त्यांच्या कोणाच्या तरी समारंभाला गेल्या आहेत, सुट्टीवर आहेत. म्हटलं चला माझंच घर आहे आणि कधी तरी झाडू मारणं बनता है ना. पण अहो इतक्या वर्षांनी नसलेली सवय, कोणाला? दोघांना हो, मला पण झाडू पकडण्याची सवय नाही आणि झाडूला माझ्या हाताची. मग काय धमाल झाली. सध्या क्रिकेटचं वारं आहे सगळीकडे, मुलांच्या आणि मुलींच्या म्याचेस सुरु आहेत, ते लक्षात घेऊन मग मी दोन्ही हाताने विविध प्रयोग करत सरते शेवटी आनंदाने सगळं घर चकचकीत केलं. तो झाडू जेव्हा जागेवर स्थानापन्न झाला तेव्हा मला ऐकू आलं "सुटलो एकदाचा बावा, कधी येणार माझ्या प्रिय मावशी" असं काहीतरी. पण अहो असा संवाद साधता साधता, बॅट म्हणून प्रयोग करता करता कधी ते घर कचरा मुक्त झालं हे मला कळलं देखील नाही. आणि थकवा वगैरे पण जाणवला नाही. खूप मज्जा आली. नाही तर आधी माझी फारच चिडचिड होत होती, काय हे मी का घर झाडायचं ई. पण आज नाही हो. आणि मला खात्री आहे हे किंवा असे प्रयोग करत करत काम केलं कि सगळंच साधलं जाईल, मावशींची सुट्टी, काम, स्वच्छता आणि हे सगळे आनंदाने आणि न-थकता. गाणी लावली, दोन हात वापरून, धूळ झटकून काय काय केलं. माझं घर हे मैदान झालं होत थोड्या वेळा करता माझ्या साठी. अहाहा च.
सपाता बऱ्या हो देवा
गवताच्या किंवा गवतासारख्या दिसणाऱ्या काड्या जोडून / बांधून चपला तय्यार केल्या जातात. माझ्या मते त्या नाजूक असाव्यात, किंवा घरी वापरण्यासाठी, किंवा शौक म्हणून विकत घेतल्या जात असतील. मजबूत दिसत नाहीत आणि नसतील पण. त्याचा आकार पण थोडासा मोठा / अती मोठा असतो, पायाच्या आकाराहून भला मोठा. त्यामुळेच सहज व्यक्ती जेव्हा आरामात घरी आहे, त्यावेळी चालणं, गती, कुठेतरी वेळेवर पोचण्याची घाई ई. नसते त्यामुळे ह्या अश्या चपला वापरल्या तर हरकत नाही. माझ्या दृष्टीने खात्री नाही ह्या चपलांची कि त्या किती दिवस टिकतील, किंवा त्यांचं आयुष्य किती असेल. असो. आज हा विषय का?
अहो काय सांगू, कोणाही बद्दल कधीही काहीही बोलायला किंवा उणंदुणं काढायला मला अजिबात आवडत नाही कारण प्रत्येकजण त्यांच्या दृष्टीने विचार करून कृती करतात आणि मी कोण हो त्यांना Judge करणारी. पण काही दिवसांपासून मी एक व्यक्ती अशी चप्पल भल्या मोठ्या ऑफिस मधे घालून जातांना बघते आहे. धनाढ्य व्यक्ती, पैसा अडका इतका कि कुठे ठेऊ आणि कुठे नाही हि स्थिती, घरच्या अंगणात चकचकीत गाड्यांचा ताफा आणि बरेच काही. अशी पार्शवभूमी असतांना देखील त्यांना अगदी साधं राहणीमान आवडतं हे खूपच चांगलं आहे, अहो पण ऑफिस मधे कित्ती चालावं लागत, वेळेचं बंधन असतं, त्यामुळे गती पण जास्त असू शकते. आणि अश्या वेळी जर ह्या चपलेने धोका दिला तर? आजकाल तर चांभार पण जागोजागी दिसत नाहीत बसलेले. आणि शिवाय रंगसंगती पण महत्वाची, फक्त तुम्हालाच / घालणाऱ्यालाच नाही तर समोरच्याला पण, तुमच्याकडे बघणाऱ्याला देखील. नाही का? आपण बाहेर पडलो कि फक्त आपले नसतोच. एक नाही दोन नाही अनेक दिवस सलग हे दृश्य बघून मला जरा पोटात गोळा आला आणि त्यामुळे लिहायचं ठरवलं. साधं पण प्रदर्शनीय असावं माणसाने नेहेमीच, ह्याचा अर्थ महागड्याच वस्तू वापरायच्या असे नाही पण इतक्या टोकाचं तरी वागणं नको. काही आपल्या धुंदीत अनेकदा घरच्या पण व्यवस्थित सपाता घालून इकडे तिकडे दिसतात, ते पण योग्य नाहीच, पण हे तर त्यापल्याड गेलं हो. असो. ह्यातून खूप काही शिकण्यासारखं आहे, काय करू नये हे समजलं, मला आणि वाचकांना, हे हि नसे थोडके.
बुधवार, ३० मार्च, २०२२
पेशल मसाला चाई
आज मला सकाळी आयता चहाचा कप हातात मिळाला. तो फारच पेशल चहा होता, मसालेदार अगदी. भरपूर मसाला, वेगळा अनोखा स्वाद, मज्जा आली. एक एक घोट, अजून एक घोट पिउन बघता बघता चहा कधी संपला ते समजलं देखील नाही हो, कारण प्रत्येक घोट मसाल्याची लज्जत आणखी वृद्धिंगत करत होता. अहाहा च. पहिल्या घोटात समजलं कि आलं मस्त टाकलंय भरपूर आणि ते देखील किसून हो. किसलेलं आलं, ठेचून घातलेलं आलं, वाळलेलं आलं, तुकडा आल्याचा असं अनेकविध प्रकारे चहा तय्यार केला जातो, जशी दिवसाची सुरवात होईल तशी, वेळ असेल तसा, घाई कितपत आहे, आलं कश्या स्थितीत आहे, आणि बरेच काही. काही घोट घेतल्यावर अजुन एक नवीन स्वाद किंवा काहीतरी वेगळं घातलंय हे लक्षात आलं माझ्या जिभेला. खात्री करण्यासाठी पुन्हा एक-दोन घोट घेतले आणि निश्चित उमगलं त्या मागचं रहस्य / गुपित. मग पुन्हा हा रहस्यमय घटक आला कोठून हे विचार करता करता आणखीन दोन घोट उतरले घशा खालून. पण काही उमगेना. मग मी काल काय काय पदार्थ केले गेले होते ते आठवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा लक्षात आलं कि काल कढी करण्यासाठी आलं आणि लसूण किसून ठेवलं होतं मावशींनी. मग मी अगदी जेवायला बसायच्या वेळी कढी फोडणीला टाकली. काल यथेच्छ जेवण झालं आणि आज चहा हातात मिळाला कारण मी थोडीशी आवरासावर करत होते. मावशींची सदाची घाई, पळापळ त्यामुळे त्या किसणीला फक्त पाणी दाखवलं होतं मावशींनी हे स्पष्ट झालं. पण त्यामुळे अस्सल मसालेदार, "ना भूतो ना भविष्यती" असा चाखायला मिळाला ना मला. मस्तच. मज्जा आली, खूप वेगळ्या नोट वर / कौर्ड वर दिवसाची सुरवात झाली आणि ह्या अनुकथेचा जन्म देखील मसालेदार. वा. मावशीचे आभार. "ताक हि फुंकून प्यावे" अगदी तसे आता किसणी पण धुवून घ्यावी लागणार वापरायच्या आधी किंवा वास तरी घ्यावा लागणार अंदाज येण्यासाठी.
दमछाक
माझी एक तरुण सहपाठी आहे. गेले अनेक वर्ष आम्ही एकत्र काम करतो एकाच विभागात. नॉर्मल दिवस होते तेव्हा दररोज न चुकता डब्बा एकत्र खात होतो, अधेमधे कॅन्टीन ला जायचो फडशा पडायला, कधी कधी कोणी काही खास करून आणायचो, गप्पा आणि हशा पिकायचा तो थेट आसमंतालाच भिडायचा. ह्या माझ्या तरुण मैत्रिणीच्या अनेक अद्वितीय आणि असाधारण अश्या खास गोष्टी होत्या. आता होत्याच म्हणायला हव्यात कारण इतक्यात त्या कुठे लोप पावल्यात कोणास ठाऊक, किंबहुना माहिती आहे मला आणि हाच ह्या अनुकथेचा विषय आहे. त्याच्या खास गोष्टींपैकी काही म्हणजे चविष्ट पास्ता आणि केळाच्या पुऱ्या, एकसारखी बडबड आणि असंख्य प्रश्न, इतके कि मला गप्प करायच्या. बघा मंडळी, मला, आणि गप्प म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेलच कि किती प्रश्नांची सरबत्ती असेल. वैविध्य विषयांवर गप्पा मारून आणि हसून पुरेवाट होत असे. हरवले ते दिवस, पण असो कोणीही कधीही असं कचेरीत उत्साहाने एन्जॉय केलं नसेलच. आम्ही भन्नाटच होतो आणि आहोत. चार पाच वर्ष मिळाली आम्हाला सलग एन्जॉय करायला माझ्या मते १३-१७. मी परमेश्वराला मनापासून धन्यवाद देते, कारणं अनेक आहेत. माझी PhD आजच्या मानाने सोप्पी झाली असं आता म्हणता येईल. आता हि माझी तरुण सखी PhD + पूर्ण वेळ झोकून देऊन ऑफिस च काम + घर + पिल्लू + ऍडमिशन च काम + प्रमोशन च्या विविध गोष्टी + पेपर्स लिहिणं + आई-बाबा + सासरचे ई. आणि बरेच काही उत्साहात करतात ना कि दही बोटं तोंडात. ह्याचंच पिल्लू घरी असतं, फक्त इमॅजिन करा तो कित्ती प्रश्न विचारात असेल, शेवटी उतरलं असेलच ना त्यात देखील. म्हणजे मज्जाच मज्जा आणि एक अजून काम. देवा. दमछाक होत असेल पण कधी म्हणजे कधीच त्या दाखवत नाहीत, चेहेऱ्यावर कधीच ते उमटत नाही, पण हो जराशी चाल बदलली आहे सध्या, सतत संशोधनाचाच / कामाचा विचार करत असतात हे दिसतं चालतांना पण, तेवढा देखील वेळ वाया जाऊ देत नाही, किंबहुना सदुपयोगाचं करतात त्या वेळेचा. अहाहा च.
सद्य स्थितीत अवघड झालयं पेपर्स लिहिणं, ते पट्टाकिनी अकॅसेप्ट होणं, त्यात गाईड एका टोकाला, ह्या दुसऱ्या, खरोखर कष्ट आहेत, सचोटी आहे, आणि कमाल आहे खरंच. कसं सगळं करतात कोणास ठाऊक. अगदी मनापासून सलाम, अशीच त्यांची उत्तरोत्तर प्रगती होवो, त्यांना १० हत्तीचं बळं मिळो हि ईशचरणी प्रार्थना. मी ह्या माझ्या चिरतरुण मैत्रिणीला इतक्या वर्षांपासून अगदी जवळून बघितलं आहे, ओळखते त्यामुळे फार प्रकर्षाने जाणवतं. बाकी समस्त तरुण मैत्रिणी ज्या ह्या काळात PhD करत आहेत आणि बाकी डोलारा सांभाळत आहेत त्यांना सुद्धा माझा मानाचा मुजरा. धन्य धन्य आहेत सगळ्याच. "अश्या मैत्रिणी सभोवती असती आणिक स्फूर्ती देऊनी जाती".
थांब ना रे तू
आज पुन्हा एकदा हे बोल, आर्त स्वर कानावर पडले आणि माहित नाही काय झालं. असं का होतं? प्रत्येक दिवशी का? एखाद वेळी आठवण येणं साहजिक आहे, पण मला अजूनही सावरता का येत नाही आहे. त्या घटनेला देखील आज १३ वर्ष झाली, मी स्वतः अर्ध शतक गाठलं, आणि मला हे जगजाहीर सत्य माहित आहे कि आलेला प्रत्येक व्यक्ती एक दिवस दूर जाणार, मग का. हि अपराधी भावना आहे फक्त? का अजून काही? मला उत्तर नाही सापडत आहे. मला हे देखील माहित आहे कि आता वाईट वाटून, डोळ्यात पाणी आणून काय फायदा, जेव्हा वेळ होती तेव्हा का नाही काही सुचलं, का मी स्वतःला घर-ऑफिस ह्या मधेच गुरफटून घेतलं आणि बाकी दुर्लक्षिलं गेलं. माझ्या कडून काहीही न करून घेता का गेलात इतक्या दूर कि त्या ठिकाणाचा न थांग पत्ता ना तुमचा ठावठिकाणा. अपार कष्ट घेतले माझ्या साठी, अगदी लहानपणी पासून, दररोज, न चुकता सातत्याने मोटिव्हेट केलं, पाठीवर थाप आणि तुमची सदोदित साथ दिलीत, सल्ले दिले, मी काहीतरी वाकडं-हेकडं बिनाचविच केलेलं सगळं कौतुकाने खाल्लं विना तक्रार, सहनशक्तीची तर कमालच होती तुमच्या, अपेक्षाविरहित राहणं शिकवलंत पण मी नाही शिकले, दुर्दैव माझं. माझ्या मनाची सल माझ्या सोबतच संपणार बहुतेक. का का गेलात इतक्या लवकर आणि अश्या ठिकाणी जेथून परतावा नाहीच. या ना एकदा, काही दिवसांसाठी, माझ्या साठी प्लीज, पट्टाकिनी, ह्या क्षणी, आत्ता. लहानपणी माझे सगळे "आत्ताच्या आत्ता पाहिजे ..." हट्ट पुरवले, मग हा पण पुरवा बाबा. चातकासारखी वाट बघते आहे.
प्रियांका चोप्रा ह्यांच्या सुमधुर आवाजातलं, थेट हृदयाला भिडणार असं गीत व्हेंटिलेटर ह्या चित्रपटातलं, ऐका आवर्जून.
https://www.youtube.com/watch?v=KIKWHobV3ZE
नातं
१) सिरीयल मी का बघते टीव्ही वर? हा मला विचारला गेलेला प्रश्न अनेक वेळा अनेक लोकांनी. ह्या न्यू नॉर्मल दिवसात तर स्क्रीन टाइम इतका वाढला आहे कि पुन्हा अजुन एक स्क्रीन नको वाटते. पण आताशा मी फक्त एक सिरीयल आवर्जून बघते / ऐकते १५-२० मिनिट, तेवढंच मला नवीन दागिने दिसतात, नवीन फॅशन समजते, भिंतीवरचे रंग / सजावट बघायला मिळते, काही वेगळे चांगले शब्द / वाक्प्रचार ई. ऐकायला मिळतात ई. अनेक कारणं आहेत.
२) बाबांचे बूट मुलाला यायला लागले कि वडिलांनी मुलाला दोस्त समजावं म्हणे? समजावं? आणि हे फक्त मुलगा आणि वडील ह्यांनाच का लागू हो? आई मुलीला का नाही?
तर त्याचं असं झालं कि परवा मी एक सिरीयल बघत होते त्यात आई आणि मुलीचा संवाद सुरु होता.
मुलगी: "आई मला खूप आवडलं तू माझ्या घरी राहायला आलीस, तू खूप कामं करतेस आणि उगाच म्हणायचं म्हणून नाही बरं का, मला खरंच बरं वाटतंय"
आई : "अगं एकदा का मुलगी मोठी झाली, शाळा कॉलेज ऑफिस ला जायला लागली, बाहेरच्या जगात वावरायला लागली, कि मग सगळे नात्यांचे बंध गळून पडतात आणि मग संवाद सुरु होतो तो फक्त दोन मुलींमधला".
अहाहा च, कित्ती गोड आणि सुंदर मला तर ते वाक्य इतकं म्हणजे इतकं आवडलं कि ज्याचं नाव ते. मित्र समजा / मैत्रिणी समजा कशाला, जरा त्या पुढे जाऊया कि.
मागल्या वर्षी माझी एक विद्यार्थिनी विद्यावाचस्पती झाली. आम्ही सोबत तब्बल ४+ वर्ष घालवली, सूर जुळले, ह्या प्रवासात संशोधन पेपर्स झाले, पेटंट्स झाले, ग्रँट्स मिळाल्या ई. काल आमच्या कामाला अजुन एक अवॉर्ड मिळालं KPIT कडून, त्या साठी अभिनंदन करण्यासाठी मी फोन केला होता तेव्हा मी म्हटलं, आता फक्त दोन मुलींमधला संवाद होणार ह्या पुढे, कुठलेही नात्याचे बंधन नकोच, कुठलेही नाव नको, एकत्र सफर करू या, बास. अगदी तसेच माझ्या लेकी सोबत पण मी प्रकर्षाने सांभाळणार आहे ह्या पुढे, आत्ता पर्यंत मी तिला मैत्रीण ह्या पठडीत बसवत होते पण ह्या नंतर एक पाऊल पुढे जाणार. अर्थात ती माझ्या पेक्षा १०० पाऊलं पुढे आहेच आधीच, पण ही नवी दिशा / नवा दुर्ष्टीकोन प्रचंड आवडला आहे मला. मस्तच फायदा झाला मला ते सिरीयल बघितल्याचा. अहाहा च.
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...
-
मी अनेक वर्षे एकाच संस्थेमध्ये कार्यरत होते. अखेरीस, मला एका नवीन इंजिनिअरिंग महाविद्यालयाची सुरुवात करण्यामध्ये हातभार लावण्याची सुवर्णसंधी...
-
माझ्या मुलाने भारतातील सर्वात आव्हानात्मक अभ्यासक्रम निवडल्यापासून, मला विद्यार्थ्यांसमोरील अडचणींची जाणीव झाली. मला खात्री आहे की अशा अडचणी...
-
परवा एक फोन आला. लहानपणापासून ओळख असलेली व्यक्ती. घरच्यांसारखीच. गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता त्यांनी अचानक विचारलं: “अजूनही लेक्चररच आह...