रविवार, २५ सप्टेंबर, २०२२

डोळा बांधणे

जे बागकाम करतात ते देखील खूप वर्षांपासून अनेक प्रयोग करत आले आहेत. एका गुलाबाच्या झाडाला तसं पाहायला गेलं तर एकाच रंगाची फुलं यायला हवीत, पण प्रयोग केल्यामुळे एकाच झाडाला एक फुल अनेक रंगात आणणं शक्य असतं. अर्थात सरते शेवटी हा फक्त एक प्रयोग आहे आणि शिवाय त्या फुलांच्या झाडाला पण जीव आहे, मन आहे, भावना आहेत आणि अर्थात मूड / मनःस्थिती / भावस्थिती आहेच कि. प्रयोग केला माणसाने म्हणजे तो सफलच झाला पाहिजे प्रत्येक फुलागणिक हे कुठे लिहिलं आहे आणि होतं?. त्यामुळेच बहुतांशी प्रत्येक वेळी प्रयोग केलेल्या झाडावर विविध रंगांची / ढंगांची / सुवासाची / आकाराची फुलं येतांना दिसतात. अगदी माणसांसारखंच आहे त्यांचं देखील हे ह्यावरुन स्पष्ट होत. असो.

आमच्या ह्यांनी अत्यंत शिगेला पोचलेल्या उत्साहाने बोगनवेल रोपवाटिकेतून जाऊन आणलं आणि ते देखील उत्कृष्ट हिंदीत शंभरदा खात्री करून घेऊन कि ह्या वेलाला विविध रंगांची फुलं येतील ह्याची हे निश्चित करून. झालं, आले ते बोगनवेल आमच्या घरी वास्तव्याला. अनेक महिने तर त्यांना नवीन मातीत आणि नवीन हवेत रुळायला लागले त्यामुळे कुठलीही हालचाल नव्हती. आताशा बहरलं आहे ते वेल पण फक्त आणि फक्त एकाच रंगांच्या फुलांनी. एक साधी रेश सुद्धा नाही हो दुसऱ्या रंगाची. अर्थात त्या हिरव्या पानांमधे वेलीवर आरूढ झालेली ती फुलं फारच मनमोहक दिसतं आहेत पण ह्यांचा संपूर्ण हिरमोड झाला

सरते शेवटी बागवान हे जे अनेकविध रंग येण्याचे प्रयोग करतात त्याला "डोळा बांधणे" असे संबोधले जाते. पण प्रत्येक फुलझाडं हे त्याच्या मर्जीप्रमाणे, एकंदरीत सभोवतालच्या वातावरणाप्रमाणे, मातीच्या पौष्टिकतेनुसार आणि अनेक अश्या बऱ्याच कारणांनी एक डोळा बांधा नाहीतर अनेक, त्यांना हवं तस्संच वागणार, फुलं देणार, बहरणार, बास. करत बसा प्रयोग. घराच्या आंगणात / बाल्कनीत नैसर्गिकरीत्या फुललेलं सौंदर्य लुटा, आनंद उपभोग ना? मज्जा येईलच. 

पुन्हा एकदा हे सिद्ध झालं कि "आपल्या हातात काहीही नसतं " आणि "कधीही कुठलीही अपेक्षा करूच नये". बास, आहे त्या सौंदर्याचा लाभ घ्या भरभरून.

 

पुन्हा परिभाषित (Redefine)

परिघाबाहेरचा = आऊट लायर (outlier) हि एक संगणक संशोधनातली फ्रेज / वाक्यांश आहे. ह्याचा उपयोग भल्यामोठ्या अंकांमधून गट किंवा संघ तय्यार करतांना होतो. जर एखादी संख्या किंवा डेटा क्रम जर कुठल्याच गटात बसत नसेल तर तो ह्या अश्या परिघाबाहेरचा = आऊट लायरच्या गटात जातो. बास, इतकं ते सोप्प आहे. पण मग संशोधन म्हटलं म्हणजे नाविन्यपण आलचं, ते आम्हाला काम करता करता साध्य देखील झालं आणि माझ्या विद्यार्थी चमूने एक नवीन संकल्पना शोधून काढली ज्याला आम्ही आऊट लायर असं संबोधलं, आणि ते संशोधन जगात काम करणाऱ्यांना देखील खूप आवडलं. नवीन एक अर्थ देणे किंवा अस्तित्वात असलेल्या ज्ञानात भर पाडणे म्हणजेच संशोधन. अगदी तसेच मी आज एका ठिकाणी वाचले कि एक कंपनीची अधिव्याख्याता आहे, अत्यंत तरुण वयात ती CEO / सीईओ झाली आहे आणि तिला घराची, मुलाची आणि एवढ्या मोठ्या पदाची जबाबदारी एकत्र कशी घ्यायची ह्या बद्दल किंचित मनात शंका होती. पण घरून काम करणे ह्या संकल्पनेमुळे / पर्यायामुळे तिने असं लिहिलं आहे, आणि एक फोटो पण ह्या अप्रतिम छोटेखानी लेखाचा भाग आहे, "मी सध्या माझे ट्विन्स खूप शिताफीने सांभाळते आहे". पण त्या फोटोत तर फक्त एकच अत्यंत गोंडस, उत्साही पिल्लू दिसतंय. मग मला जरा शंकाच आली, कि सीईओ हे भलं मोठ्ठ पद आणि त्यात ट्विन्स, बाप रे, साष्टांग नमस्कारचं त्या नवीन आईला. पण मग माझ्या चार डोळ्यांनी मी तो छोटीखानी लेख पुन्हा एकदा वाचला तेव्हा समजलं कारण पुढे तिने असं लिहिलं आहे कि "माझा न्याहारीच्या, जेवणाचा खूप प्रिय पार्टनर आहे हा, दररोजचा, त्यामुळे आणि घरून काम करणं सहज शक्य आल्यामुळे मला हे ट्विन्स सांभाळता येत आहेत, ट्विन्स म्हणजे काम आणि पिल्लू". वा. कारण मी स्वतः ट्विन्सची आई असल्यामुळे मला कल्पना आहे आणि जाणीव पण. त्यामुळे जास्त काळजी वाटली.

मी देखील बऱ्याच किंबहुना प्रत्येकवेळी कोणीही आमंत्रण दिलं कि अजूनही म्हणते कि मी माझ्या टोळीसोबतच येणार, ज्यात माझे तीन मुलं आहेत. सर्वांना खूप आश्चर्य वाटायचं, ह्या जमान्यात तीन मुलं? पण मग खरं समजल्यावर मोठा हशा पिकायचा. तीन मुलं म्हणजे माझे ट्विन्स आणि एक सासूबाईंचा, असे तीन हो.

बघा म्हणजे मीच नाही तर सीईओ मॅडम ज्यांनी तो लेख लिहिला त्या, आणि बाकी सर्वजणच संशोधक आहेतच, नवनवीन अर्थाने शब्द पेरण्याची कला साधली जातेच. मज्जाच आली, खूप खूप ऊर्जा मिळाली तो छोटेखानी लेख वाचून ज्यात मस्त पद्धतीने ट्विन्स हि टर्म वापरली आहे. भन्नाटच.

गंभीर

माझी मुलं ह्या जगात यायच्या आधी आमच्या ऑफिस च्या काही कुटुंबात पिल्लांची चाहूल लागली होती आणि काही कळायच्या आत ती चालायला आणि बोलायला देखील लागली. असेच एकदा आम्ही रविवारी एका ठिकाणी गप्पा मारायला जमलो होतो, गप्पांसोबत खाणंपिणं काही खेळ ई. पण होते. पिल्लं हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच होती आणि मोठी माणसं जास्त होती. त्यामुळे मोठ्यांना हे गप्पा मारूच देऊ नव्हते आणि पिल्लांना कोंडल्यासारखं होत होतं कदाचित. त्यामुळे भारतीय पद्धती प्रमाणे एका बाबाने ठरवलं कि पाटी - पेन्सिल घ्यायची आणि काही तरी भन्नाट करायचे. झालं, बाबा लागला कामाला. पाटीवर पेन्सिल ने मुलं घाबरतील असा राक्षस काढला आणि मुलांना दाखवला. त्याला त्याच्या कलेवर संपूर्ण भरवसा होता कि मुलं नक्की घाबरतील आणि गप्प बसतील. जेव्हा ते चित्र मुलांनी बघितलं तेव्हा ते पोट दुखेपर्यंत हसले, गडाबडा लोळायला लागले, "हे काय काढलंय बाबा, कित्ती फनी आहे, हि त्यांची प्रतिक्रिया होती. तो काढलेला राक्षस त्यांना कार्टून वाटला आणि आवडला. आज त्याची मला प्रकर्षाने आठवण झाली. एक दिग्गज आहे, खूप मोठ्या पदावर असंख्य वर्ष काम करत आहे. त्याचे काही व्हिडीओ बघण्यात आले. तो तसा प्रत्येक व्हिडीओ मधे थोडा फारच हुषार आणि गंभीर वाटलाच मला पण आज हद्द झाली. आजच्या व्हिडिओची सुरवात कधी नव्हे ते एका कार्टून नी केली / झाली. त्या कार्टून चे संवाद ह्या दिग्गजाने वाचून दाखवले आणि ते इतक्या गंभीरपणे वाचले कि ज्याचं नाव ते. इतकी सुंदर हलकी फुलकी वाक्य जर तो इतक्या गंभीर पणे वाचू शकतो तर त्याच खरंच काही खरं नाहीच. काय हे, सातत्याने गंभीर ह्या इतक्या वरच्या ठिकाणी पोचल्यावर देखील? आश्चर्य वाटलं मला, आणि का? हा फार मोठा गहन प्रश्न पडलाच. काय असावं कारण? किंवा कारणं? त्यांच्याशी मग बोलण्याची मला संधी मिळाली एकदा, दोनदा अनेकदा पण छे हो, दगड बरा, ते तर मला पाषाण वाटले. असो, असेल काही पण किंचित बदल करायला हरकत नाही हो, आवाजात, आपले अनुभव कथन करतांना, आपल्या वरिष्ठ किंवा कनिष्ठ लोकांबद्दल बोलतांना, आपल्या अडचणींबद्दल सांगतांना. पण इतकं आवाजातलं स्थैर्य मानण्यासारखं आहे. माझी आधी अशी समजूत होती कि प्रत्येक संगणकाशी संवाद साधणारा, कोडींग करणारा व्यक्ती हा आनंदी, जोशपूर्ण अश्या स्थितीत जगत असेल आणि इतरांना जगू देत असेल त्याचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे सातत्याने कोडींग च्या माध्यमातून समाजाला केलेली मदत, दिलेली उत्तरं, तय्यार केलेल्या विविध बहुउपयोगी सिस्टिम्स ई. जेव्हा तुम्ही दुसऱ्यांसाठी काही तरी सतत करत असता तेव्हा तुमचा उत्साह / आनंद समाधानाने द्विगुणित होतंच. 

शुक्रवार, २३ सप्टेंबर, २०२२

गणपती बाप्पा मोरया

इतक्यातच आपल्या गणपती बाप्पांचे आपण सर्वांनी जंगी स्वागत केले होते तेव्हा सर्वत्र खूप सुबक-सुंदर मुर्ती कलाकारांनी साकारल्या होत्या. बाप्पांची आणि त्यांच्या मुर्त्यांची खासियत अशी आहे कि बाप्पा सगळ्याच आकारात आणि ढंगात आकर्षित च दिसतात. कोणी पारंपरिक पद्धतीने मुर्ती तय्यार करतात, आणतात, कधी मुर्ती फक्त एकाच रंगात गेरू सारख्या रंगात पण बघायला मिळतात, तर आजकाल कधी अत्याधुनिक पद्धतीने सजवलेल्या देखील असतात. पर्यावरणपूर्वक मूर्ती पण बघायला मिळतात. मूर्तीच नाही तर बाप्पांना रेखाटतांना कलाकार विविध्यतेने नटवतात, सजवतात, कधी फक्त बाप्पांची त्यात सोंड महत्वाची ठरते तर कधी लंबोदर तर कधी त्यांच्या वाहनाला महत्त्व दिले जाते तर कधी काय. कलाकार तर खूप वेगवेगळ्या पद्धतीने त्यांची विचारसरणी सादर करतात पण जेव्हा ती कलाकृती बाप्पांचा भक्त बघतो तेव्हा ती प्रत्येकाला वेगळी भासू शकते. कदाचित प्रत्येकाचा बघण्याचा दृष्टिकोन, किंवा भक्ती, किंवा प्रेम किंवा अजून काही. बाप्पांबद्दलच्या अश्या बऱ्याच कथा श्रवण केल्या आहेत, वाचल्या आहेत, आख्यायिका आहेत आणि बऱ्याच जणांना असे दृष्टांत देखील झाले आहेत आणि बाप्पा बऱ्याच ठिकाणी अवतरले आहेत, आपोआप, कधी झाडाच्या बुंध्यातून तर कधी नारळातून, कधी रेतीतून संपूर्ण मूर्ती प्रगट झाली आहे वगैरे. त्यामुळे प्रत्येकजण बघेल तसे दिसते, त्या ठिकाणी मूर्तिरूप प्राप्त होऊ शकते किंवा भासते सहज. आमच्या कचेरीत मागल्या महिन्यात काही थोऱ्यामोठ्यांची व्हिसिट / भेट आखली गेली होती. ते येणारे इतके दिग्गज होते कि त्यांच्या भेटीची तय्यारी खूप मोठ्या प्रमाणात केली गेली होती. त्याचाच एक भाग म्हणून आमच्या संस्थेचा लोगो / चिन्ह ठळकपणे दिसेल अश्या दर्शनी भागात त्रिमितीय आकारात (३ D) असे तय्यार करण्यात आले, फारच अप्रतिम लालसर रंगात. त्या चिन्हाच्या अवतीभोवती खूप साजेशी लाईटिंग पण केली आहे, दिव्यांची न दिसणारी माळ लावली आहे. का कुणास ठाऊक ते चिन्ह ज्या दिवशीपासून त्या ठिकाणी विराजमान झालयं आणि मी ते प्रथमदर्शनी बघितलं मला तर ते बाप्पांसारखंच भासलं, हुबेहूब बाप्पा, अर्थात त्यांच्या खास शैलीत, वेगळ्या ढंगात आणि उठून दिसणारे असे. आणि हो फक्त एकदा नाही वारंवार, लक्ष वेधून घेणारे असे, हात जोडले जातीलच असे. खूप प्रसन्न वाटतं, सकाळची कामाची सुरवात फारच उत्कृष्ट अश्या उत्साहात, स्वरात आणि तालात होते त्यामुळे. अश्या माझ्या ह्या अनोख्या रूपातल्या बाप्पांना माझा मनापासून दंडवत. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया.

सोमवार, १९ सप्टेंबर, २०२२

सा रे ग म कारवा ++

ह्या आधी नमूद केल्याप्रमाणे (https://drpreetimulay.blogspot.com/2022/07/blog-post_63.html) आणि जे सर्वश्रुत आहे "सा रे ग म कारवा" हे एक रेडिओ सारखे दिसणारे यंत्र आहे आणि रेडिओ सारखे थोडेफार चलनवलन पण आहे त्याचे. ह्या कंपनीने आधी फक्त एक रेडिओ सारखी वस्तू बाजारात आणली, ज्यात हजारो गाणी होती जी सदाबहार ह्या गटात मोडतात. दिग्गज संगीतकार, गीतकार, गायक, लेखक / कवी, ह्यांनी शब्दबद्ध, स्वरबद्ध केलेली अशी. भेटवस्तू म्हणून अप्रतिमच, शिवाय ज्यांना अगदी हलक्या आवाजात आपोआप एकामागे एक गाणे वाजावे असे वाटते त्यांच्या सर्वांनासाठी उत्कृष्ट भर हो कुटुंबात. कुठलाही व्यत्यय न येता आणि कुठल्याही जाहिराती शिवाय एका मागोमाग जर गाण्याचा आस्वाद घ्यायचा असेल तर फक्त कारवाचं. मग ह्या कारवा चे अनेकविध प्रकार आले / उपलब्ध झाले बाजारात. आणि आता तर संपूर्ण गीता पण ऐकता येते, एक वेगळे यंत्र फक्त गीतेवर प्रेम करणाऱ्यांसाठी, गीतेच्या मार्गावर चालणाऱ्यांसाठी सहज सोप्प असं. आणि आत्ताचा  टप्पा म्हणजे जवळपास १५०० गाणी असलेला चक्क मोबाईल आणलाय ह्याच कंपनीने. इतकी सारी गाणी, इतकी छोटी वस्तू, शिवाय आधुनिक मोबाईल मधे असलेले बहुतांशी सर्वच गुण देखील.  रोज गम्मत म्हणून ३-४ गाणी ऐकायची म्हटली तरी वर्ष सहज निघून जाईल. आणि हो ह्या मोबाईल ला म्हणजे व्यावसायिक ध्वनिप्रक्षेपक यंत्र असल्यासारखे आहे, म्हणजे पार्टी असेल तर आणि जोरात गाणी ऐकवायची असल्यास ते देखील शक्य आहे. आणि किंमत फारच कमी. 

ह्या कंपनीच्या कारव्यामधले सदस्य वाढतच चालले आहेत, एका मागून एक आणि उपयुक्त असे. आता ह्या पुढील टप्पा काय असेल हे बघण्याची उत्सुकता सर्वांनाच लागली असणार, बघूया काय दडलंय ते. कदाचित खिशात मावेल असा रेडिओ घेऊन येतील, किंवा स्मार्ट घड्याळात काही शेकडो गाणी बसवतील, हेडफोन मधे चिप घालतील, स्वयंपाक घरातील उपकरणं पण आता बहुतांशी स्मार्ट झाली आहेत, ती पण शक्यता नाकारता येत नाही.  वेळच सांगेल ह्याच उत्तर, नाही का?

शनिवार, १७ सप्टेंबर, २०२२

कुटुंब प्रमुख

अगदी मला समजायला लागल्यापासून विविध माध्यमातून कुटुंब-प्रमुख हि संज्ञा ऐकली आहे, त्याबद्दल वाचलं आणि पाहिलं देखील आहे अनेकदा. त्यावेळी कुटुंब-प्रमुख म्हणजे बहुतांशी पुरुष, सर्वात मोठे वयाने, मानाने, अधिकाराने, अनुभवाने ई. ते म्हणतील ती पूर्वदिशा. असो. काही कुटुंबात स्त्रिया देखील ह्या पदावर असायच्या, असतील देखील. कारण कुठल्याही पातळीवर स्त्रिया पुरुषांपेक्षा मागे नाहीतच, कणभर पुढेच आहेत असं म्हणायला हरकत नाही. 

माझ्या शैक्षणिक किंवा कुठल्याही क्षेत्रात वरिष्ठ अधिकारी हे सर्वार्थाने श्रेष्ठ असतात, वयाने मोठे असतात, अनुभवी असतातच. त्यावेळी तसे ढोबळमानाने तसे नियम असायचे. आता आमूलाग्र बदल झालेला आढळतो आहे, दिसतो आहे स्पष्ट. अर्थात कार्यक्षमता, कार्यकुशलता बघून सर्वात तरुण, सळसळते रक्त असणाऱ्या व्यक्तीला भलीमोठी जबाबदारी दिली जाते. हा बदल एकदा, दोनदा आणि अनेकदा झालेला बघितल्यावर मग मी माझ्या लेकीशी खास संवाद साधला आणि विचारलं तिचं मत ह्या बद्दल, एक नवा, ताजा आणि अप्रतिम दृष्टिकोन दिला / सांगितला, ती म्हणते कशी "खूप योग्य पाऊल आहे हे, कारण कामाचा डोंगर एवढा मोठा आहे, त्यात इतके वैविध्य पैलू आहेत कि योग्य तरुणच तारून नेऊ शकणार, हि नय्या पार करणं दिसतं तेवढं सोप्पं नाहीच, त्यामुळे आणि योग्य तरुणाला खूप काही करून दाखवायचं असतं, सळसळता उत्साह असतो, ताज्या कल्पना अमलात आणता येतात न थकता, आणि हे "लांबी रेस का घोडा" अश्या पद्धतीने बघितलं जातं / जावं. अर्थात अनुभवी, थोर, मोठे ई. असतातच जेव्हा लागतील तेव्हा सल्ले द्यायला, देवाण-घेवाण करायला. त्यामुळे हा सध्याचा बदल आहे, हा यशस्वी नक्की होणार ह्याची संपूर्ण खात्री आहेच". 

कचेरी हे देखील एक कुटुंबच नाही का?, मग कचेरीत जर सर्वात तरुण प्रमुख म्हणून काम पाहू शकतो तर आता हा बदल घरी देखील नक्कीच दिसू लागणार ह्यावर माझा विश्वास आहे. बाहेरचे जग जर इतका मन-सन्मान बहाल करतोय, तुम्ही हवेहवेसे आहात त्यांना, तुमची किंमत आहे, त्या साठी फक्त मान देत नाहीत तर त्याचा मोबदला, शाबासकी, प्रमाणपत्र देखील देतात वेळोवेळी, काळजी घेतात ई. हे च चित्र आता घरी देखील दिसायला हवं सर्वत्र. मोबदला नको, शाबासकी आणि प्रमाणपत्र तर नकोच नको पण माणुसकी फक्त हवी. वयानी / शरीराने मोठे होणे म्हणजे सर्व काही नाही ना? नवीन तरुण पिढीच्या कुटुंब प्रमुखांकडे धुरा देऊन तर बघा, त्याचा देखील आनंद चाखा, अर्थात हे सर्व करण्यासाठी "त्याचे" भरभरून आशीर्वाद लागतात, सद्बुद्धी मिळावी लागते आणि सोडून द्यायची वृत्ती, आनंदी / समाधानी राहण्याची, कारण नसतांना ढवळाढवळ न करण्याची सवय असावी लागते नाहीतर अंगीकारावी लागते प्रयत्नपूर्वक. 

नतमस्तक व्हावं असं व्यक्तिमत्व

मी विविध प्रसंगी जमेल त्यांना भेटते, त्यांचं ऐकते, जमेल तेवढं ज्ञान संपादन करण्याचा प्रयत्न करते आणि हे सर्व करण्यासाठी मला खूप संधी उपलब्ध असतात, मिळतात आणि मी जाते. अशीच एक संधी मिळाली आणि ठरवलं कि जायचं कारण ते सहज शक्य होतं, म्हणून गेले. एक सादरीकरण होतं जे कि अनेक वर्षांच्या संशोधनावर आधारीत होतं. मी वेळेआधी पोचले, माझ्या आधी बरीच मंडळी आली होती. सादर करणारे देखील स्थानापन्न झाले होते आधीच आणि संगणकावर सगळं व्यवथित सुस्पष्ट दिसतंय कि नाही, आवाज नीट ऐकू येतोय कि नाही ई. ची चाचणी घेत होते. मी पण शांतपणे बसले आणि जवळपास एक तास लागला त्यांचं सगळं कार्य समजावून सांगायला, प्रश्नांची उत्तरे द्यायला आणि बाकी इतर संबंधित गोष्टींकरता. त्या संपूर्ण एक तासात मला अक्षरशः अमेरिकेत बसून हे सगळं अनुभवते आहे असा भास झाला, कारण संपूर्ण वेळ पाळलेली शिस्त, शांतता आणि सादरीकरण करणाऱ्याची सखोलता. त्यांना इतकं चपराख माहित होतं सगळं, मुद्देसूद, कुठेही घाई नाही, गडबड नाही, अती नाही कि कमी नाही. स्फटिकासम सगळं माहिती होतं आणि स्थिरपणे ते सगळं समजावून सांगत होते मुद्देसुर. मला एक तासानंतर निघावं लागलं काही कामं असल्यामुळे पण कदाचित तीच व्यक्ती पुन्हा पाहण्यात आली काही वेळात पण मला माझ्या चार डोळ्यांवर विश्वासच बसला नाही. त्यांच्या हातात एक पेटी होती, छोटीशी आणि त्या पेटीला आणि ह्यांच्या शरीराला बऱ्याचश्या नळ्या जोडल्या होत्या, ते एक एक पाऊल टाकत चालत होते, इतक्या लहान वयात, असतील ३०-३१ चे, जास्तीतजास्त.  मला काही समजण्याआधी, मी त्यांच्याशी संवाद साधण्याआधी हे सगळं दिसलं आणि माझी बोलती बंद झाली. इतक्या व्याधी, कदाचित वेदना देखील असतांना त्यांनी अस्खलित एक तास जी युद्धभूमी तडफदारपणे सांभाळी त्याला सलाम. कुठेही यत्किंचित समजलं देखील नाही कि ह्यांना काही होतंय जेव्हा ते बोलत होते तेव्हा. कुठून मिळाली असेल अशी दिव्य शक्ती. अगदी नतमस्तक झाले मी. नाही तर आपण सगळेच, नवीन पिढीचा संपूर्ण तरुण वर्ग बहुतांशी फक्त नाराजी व्यक्त करतांना आढळतो, अगदी क्षुल्लक लागलं तरी त्याचा बाऊ करतांना दिसतो, नेहेमी आपल्याकडे "काय नाही" हे दर्शविण्याचा प्रयन्त करतांना आढळतो ई. आणि त्या उपर हि व्यक्ती बघा?. कित्ती शिकण्यासारखं आहे. 

मनापासून सगळ्या देवांना, त्या सर्वोच्च शक्तीला कळकळीची विनंती आणि प्रार्थना कि त्यांना ठणठणीत बरं करा लवकर. 


ॐ सर्वे भवन्तु सुखिनः
सर्वे सन्तु निरामयाः ।
सर्वे भद्राणि पश्यन्तु
मा कश्चिद्दुःखभाग्भवेत् । 

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...