शुक्रवार, ३० सप्टेंबर, २०२२

दरवळ

प्रत्येकाने हा असा अद्वितीय अनुभव अनेकदा घेतला असेल, मी पण घेतला आहे आणि आज पुन्हा त्याचा प्रत्यय आला. पहाटे उठल्यावर, सकाळची ठराविक कामे पार पडल्यावर मला एक सवय आहे. ती म्हणजे मी पुढचं दार, खिडक्या सताड उघडते, म्हणजे हवा खेळती राहते. सकाळची शुद्ध हवा अनुभवता येते आणि प्रसन्न वाटतं, योग आणि ध्यान करायला पूरक वातावरण निर्मिती होते. असो. ह्या व्यतिरिक्त आज खूप खास अनुभवायला मिळालं. आता इतक्या सकाळी / पहाटे तर बहुतांशी कोणी उठलं नसतं त्यामुळे पुजा - अर्चा - धूप - उदबत्ती ई. ची शक्यता नाही. इतक्या लवकर कुणाच्या कचेरीची देखील वेळ नसते त्यामुळे अत्तर कोणी वापरलंय हे पण नाहीच. माझ्या घरी स्वयंपाकाच्या मावशी नुकत्याच आल्या होत्या त्यामुळे त्या नेहेमीच्या ठराविक पदार्थ करण्यात मग्न होत्या. तेथे काही खास नव्हतं. पण तरी देखील मी एक जगावेगळा सुगंध नाही म्हणता येणार, दरवळ पण नाहीच, त्या पल्याड खूप काही भन्नाट अशी अनुभूती घेतली. बऱ्याच वेळ आणि कधीही न अनुभवलेला प्रकार मी जगले अक्षरशः. काय असेल कोणास ठाऊक पण खूप हृदयस्पर्शी जाणीव होती ती. शब्दात मांडता येत नाही आहे मला कारण ते शक्यच नाही, जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. मी ते क्षण मस्त जगले आणि नतमस्तक झाले, त्या शक्ती पुढे, नकळत हात जोडले गेले.

खूप वर्षांपूर्वी आणि अनेकदा त्यानंतर मी आणि माझी आई ह्या किंवा अश्या विषया बद्दल बोललो होतो, चर्चा झाली होती आमची. तिला अनेकवेळा जे जाणवलं होतं, तिची जी बैठक होती त्यानुसार तिने मला सांगितलेले काही आठवले मला. ह्या नवीन पिढीला उमजणार नाही कदाचित. ह्या अश्या जाणिवा जेव्हा होतात तेव्हा हे निश्चित असतं कि कोणी तरी आहे, कोणाचा खास सहवास लाभला आहे आणि तो आशिर्वादात्मकच आहे. त्यामुळे फक्त समर्पित व्हा आणि निश्चित राहा. शब्दाविण कळले सगळे शब्दांच्या पलिकडले किंवा प्रत्यक्ष सजीव आकृती शिवाय असे अनोखे.

अनवाणी

ह्या अर्धशतकी आयुष्यात मी असंख्य वेळा हे अनुभवलं आहे, बघितलं आहे कि एखादी मोठी व्यक्ती किंवा राजकारणी एखाद्या शहरात किंवा कार्यक्रमाला भेट देणार म्हटलं कि विमानतळापासून ते त्या कार्यक्रमाच्या स्थळापर्यंत चकचकीत स्वच्छता होते. इतकी स्वछता होते कि अगदी डोळ्याला न दिसणारे छोटेसे खडे देखील वेचले जातात नकळत किंवा काही त्यांच्या असलेल्या मशीन ने. खूप दिवस आधीपासून जय्यत तय्यारी केली जाते मोठ्या प्रमाणात. अगदी कार्यक्रमादिवशी सुद्धा अनेकदा झाडू / खराटा मारला जातो, हात फिरवला जातो बऱ्याचदा. असो. अर्थात अशी स्वच्छता व्हायलाच हवी पण मग प्रत्येक वेळी. सध्या नवरात्रीचे दिवस सुरु आहेत आणि भारतात किंवा महाराष्ट्रात खूप भक्त अनवाणी ये-जा करतात, घरून - कामावर आणि परत. त्यांची ती नितांत श्रद्धा असते किंवा त्यांना ज्यांनी सांगितलं असतं त्यांच्यावर दृढ विश्वास. आणि हे दरवर्षी होतं. ठिकठिकाणी बघायला मिळतं. ९-१० दिवस अनवाणी ये-जा आव्हानात्मक आहे आणि ती देवी / शक्ती करून घेते सर्व निमूटपणे. मग ह्या नवरात्रीच्या दिवसांआधी सर्वत्र रस्त्यांची स्वछता का नाही केली जात आवर्जून? स्थानिक राजकारणी दिग्गज किंवा त्यांच्या गटातले फलक लावून, विविध सोसायटी जाऊन जनजागृती का नाही करत कि पुढील ९-१० दिवस रस्त्यावर कुठलीही वस्तू टाकू नका, पायाला टोचेल, इजा करेल अशी किंवा स्वछता राखा ई. जे अनवाणी चालत नाहीत, किंवा सत्तेवर आहेत, महानगरपालिका किंवा अजून काही मोठी माणसं, किंबहुना अगदी प्रत्येक व्यक्ती रस्ता साफ ठेवून त्या देवीची सेवा / आराधना एका अर्थाने साधू शकतात सहज. असो. बघा प्रयन्त करा, निघेल मार्ग ह्यातून, देईल ती सर्वांना सद्बुद्धी नक्कीच.

जिंदा हो तुम

दिलों में तुम अपनी
बेताबियाँ लेके चल रहे हो
तोह जिंदा हो तुम
नज़र में ख़्वाबों की
बिजलियाँ लेके चल रहे हो
तोह जिंदा हो तुम

जो अपनी आँखों में
हैरानियाँ लेके चल रहे हो
तोह जिंदा हो तुम
दिलों में तुम अपनी
बेताबियाँ लेके चल रहे हो
तोह जिंदा हो तुम.

"जिंदगी ना मिलेगी दोबारा" ह्या प्रसिद्ध चित्रपटात काही ओळी सादर केल्या आहेत एका दिग्गज कलाकाराने "जिंदा हो तुम ..." ह्या सदराखाली. तो चित्रपट बघतांना आणि त्यानंतर आजतागायत ह्या ओळींनी माझ्यावर खूप मोठी छाप पाडली आणि सोडली देखील. सातत्याने बदल म्हणजेच जीवन, किंबहुना सुखी जीवन. अगदी ह्या धर्तीवर मी जेव्हा जेव्हा विचार, चिंतन आणि मनन करते तेव्हा हे उलगडतं कि काही व्यक्तींना त्यांच्यावर अवलंबून असलेल्या बऱ्याच लोकांना उभं करायचं असतं, देखभाल करायची असते म्हणून त्यांना "जिंदा हो तुम ..." हे ब्रीद वाक्य वाटतं आणि ते त्यावर जगतात. काहींना खूप काही करून दाखवायचं असतं अगदी जगाच्या पातळीवर म्हणून, तर काहींना इतकं भरभरून प्रेम मिळतं त्याकरता त्यांना मनापासून पटतं "जिंदा हो तुम...". पण कदाचित काहींना शारीरिक दुखणं पिच्छाच सोडत नाही, इतक्या आकंठ प्रेमाने तो स्थानापन्न झालेला असतो, विराजमान असतो कि त्या वेदनांमुळे समजतं "जिंदा हो तुम ...". वेदना जर काही क्षण नाहीश्या झाल्या तर चाचपडून बघावं लागतं आणि खात्री करावी लागते कि नक्की आहोत ना जिवंत कि? कारण वेदनारहीत काही क्षण म्हणजे फुलपाखरासारखी अनुभुती येते आणि खात्रीच पटत नाही कि आहोत अजून. प्रेम असावं तर असं, सतत साथ देणारं, अर्धवट नाहीच. क्षणोक्षणी, पदोपदी जवळ असणारं, आयुष्याचा आमूलाग्र भागच होऊन राहिलेलं.  प्रत्येकाच्या वाट्याला असं अनोखं प्रेम येत नाही पण ज्यांना मिळतं त्यांना पुढे वाटचाल तर करावी लागतेच, ते देखील स्मितहास्य ठेवून, ह्या प्रेमळ साथीदारासंगे. असे सातत्याचे प्रेमळ अहोभाग्य लाभलेल्या सर्वांसमोर मी नतमस्तक होते.

मऊसर

आपल्या भारतीय आणि महाराष्ट्रातल्या संस्कृतीत उपवासाला अत्यंत महत्व आहे, अगदी माझ्या लहानपणीपासून मी उपवास आणि त्याच्या संपूर्ण प्रक्रियेला जवळून निरखून पहिले आहे, आत्मसात केले आहे आणि बरेच काही बोधपर त्यातून शिकले देखील आहे. तसे तर भरमसाठ पदार्थ करतात उपवासाच्या दिवशी पण साबुदाणा खिचडी हि त्यातल्या त्यात सगळ्यात नेहेमीची. माझी आई असंख्य पद्धतीने खिचडी करत असे, एक म्हणजे नुसती फोडणी देऊन, त्यात कुठलीही भर घातली जायची नाही, मीठ-साखर-तिखट बास. दुसरी पद्धत म्हणजे हिरवी मिरची भरपूर प्रमाणात घालून पांढरी खिचडी, त्यात बटाटा आणि मस्त कोथिंबीर सुद्धा. तिसरी पद्धत म्हणजे कच्चा बटाटा घालायच्या ऐवजी उकडलेला बटाटा घालायचा. अजून एक प्रकार म्हणजे कच्चा अथवा उकडलेला, हिरवी मिरची अथवा लाल तिखट, पण भरपूर ओलं नारळ घातलेली अशी. मग आईसमान सासूबाईंनी अजून एक प्रकार करून दाखवला ज्यात काकडी घालतात बटाट्या ऐवजी. मला तर काय कुठल्याही पद्धतीची खिचडी द्या, मी थेट स्वर्गसुखच अनुभवते. प्रचंड प्रिय आहे मला, आता समजतंय का ते, इतक्या वैविध्यतेने केल्यावर / करून खाऊ घातल्यावर आवडणारंच ना.

आज माझ्या स्वयंपाकाच्या मावशींना मी समजावून सांगत होते कि उकडून बटाटा घाला खिचडीत म्हणजे ती / खिचडी हो अजून प्रचंड मऊ होते, खायला उत्कृष्टच लागते जशी कि मायेने आजींनी केली आहे जशी. तोच साबुदाणा, तेच सगळे जिन्नस फक्त बटाट्याची स्थिती बदलेली अशी, पण त्यामुळे गरम, थंड, खूप वेळाने जरी ती खिचडी चाखली तरी तितकीच मऊसर लागते हो. थोडीशी पुरते, पट्टकिनी तय्यार होते आणि मऊपणा टिकवते कुठल्याही वयाच्या व्यक्तीला साजेशी अशी बनते.

ह्या छोटेखानी प्रसंगातून, खिचडी + उकडलेला बटाटा ह्या बद्दल समजावून सांगतांना प्रकर्षाने जाणवलं, आपण सर्वांनी असं मऊसर का होऊ नये? आणि वागू नये? जमल्यास प्रत्येक वेळी प्रत्येकासोबत? सहज शक्य आहे असं माझं मत आहे. बघा जमेल तेव्हा, जमेल तेवढा प्रयोग करून, आवडलं ह्या मऊसर खिचडी सारखं स्वादिष्ट तर टिकवा तो मऊपणा प्रत्येक नात्यात देखील. बहुतांशी प्रत्येकचजण त्या मायेच्या मऊ ओलाव्याचा भुकेला असतोच, म्हणून प्रयन्तपूर्वक केलेला हा प्रयोग अत्यंत महत्वाचा ठरू शकतो. 

इतकी वर्ष, असंख्य वेळा ती खिचडी क्षणात फस्त केली आहे मी पण असा अनोखा दृष्टिकोन कधीच नाही समजला / उमगला मला.  

मंगळवार, २७ सप्टेंबर, २०२२

चिंधी

कुर्तडलेलं कापडं किंवा कपडा नजरेस पडला कि आम्हाला उंदिरमामा आठवायचे. आणि असे कुर्तडलेले कपडे परिधान करतं नसतं कोणीही माझ्या लहानपणी अजिबातच. एकतर ते घरच्या कामासाठी वापरायचे, पुसायला वगैरे जुने झाले असतील तर आणि थोडीशी डागडुजी करून वापरता येण्यासारखे असले तर मग बोहारीण / घरी काम करणाऱ्या मावशी घेऊन जायच्या, रफ़ू करायच्या ई. उसवलेले, फाटलेले, ठिगळं लावलेले ई. कपडे घालण्याची देखील माहिती नव्हतीच सर्वसाधारण माणसाला. तेव्हा इस्त्री नावाचं पण खूप फॅड नव्हतं. त्यामुळे स्वच्छ धुतलेले, साधे, सुती बहुतांशी असे निर्मळ दिसणारे कपडे वापरले जायचे सर्वत्र, शिकलेल्या, नोकरदार वर्गाकडून.

तसेच त्याकाळी बहुतांशी प्रत्येकाची तब्बेत अगदी ठणठणीत असायची, डॉक्टर्स पण तुरळक दिसायचे. भरपूर नैसर्गिक व्यायाम, चालणं, घरकाम, कष्टाची कामं, सायकलचा वापर, भरपेट घरचं खाणं, पौष्टिक आहार, दिवसाचं वेळापत्रक, शिस्त ई. कारणे असतील त्यामागची. त्यामुळे यदाकदाचित कुठल्या आजी / आजोबांना श्रवण यंत्र वापरायचा सल्ला दिलाच तर फार पंचाईत होत असे. कारण त्यावेळी श्रवण यंत्र म्हणजे एक डब्बी, त्याला भल्या मोठ्या दोन वायरी आणि एकंदरीत दृश्य जरा गडबडच. अपमान नाही पण नको वाटायचं ते वापरायला. काही जणांना तर लाज वाटायची कारण त्यावेळी लुक आणि फिल तसंच होतं त्याचं. सदुपयोग किती हा विचार दुय्यम होता.  असो.

आणि आता सर्वत्र काहीही गरज नसतांना फक्त फॅशन च्या नावाखाली, दुसरा करतो आहे, दुसऱ्याकडे आहे म्हणून, "लोक काय म्हणतील", जुन्या जमान्याचा समजतील ई. मुळे अगदी प्रत्येकाच्या कानात, मानेभोवती वायरी आहेतच. सातत्याने कानाच्या आत घातलेले, कदाचित संगीत ऐकणं चालू, किती मोठ्या आवाजात ते ठाऊक नाही, पण हेच दृश्य सर्वत्र नजरेस पडतंय, अगदी शिक्षित, अशिक्षित, लहान-मोठे-थोर प्रत्येकाकडे.

तीच गती फाटक्या, ठिगळं लावलेल्या कपड्यांची. सध्याची महागडी फॅशन, अंदाधुंद कारभार सुरु आहे. एकेकाळी ज्याला कदापि घरी स्थान नसायचं तेच आता भरमसाठ किंमत मोजून विकत घेऊन अगदी मोठी शान जशी असं मिरवलं जातं. का? काय हि अधोगती, फक्त माझ्या दृष्टिकोनातून मंडळी. आणि अश्या कपड्याला नवीन म्हणायचं? गम्मत च आहे. असो. अश्या वातावरणात सरळ, साधे पण वयानुरूप, ताजे रंग वापरणारे वेडे का हे असे ठिगळेश्वर? असो. "ओम नमः शिवाय" म्हणायचं, जमल्यास ह्या अश्या नवीन फॅशन ट्रेंड्स ना बघायचं, स्मितहास्य करायचं आणि पुढे वाटचाल करायची.  

चिंटू

गेले अनेक वर्ष चिंटू नावाचं कार्टून मराठी भाषेत माझ्या वाचनात नियमित आहे. तसेही मला सगळेच बाल साहित्य वाचायला प्रचंड आवडते, चंपक, चंदामामा ई. माझ्या लहानपणी हे अशी पुस्तकं म्हणजे मनोरंजनाचं साधनं होतं आणि बोधपर कथा / लघुकथा असायच्या. फारच अप्रतिम मांडणी, विषय फार आवडते असे, त्यामुळे जनमानसांपर्यंत पट्टाकिनी पोचायचे ते. सर्वच वर्गाला भावायची अशी हि पुस्तके होती. चिंटू बहुतांशी मराठी वर्तमानपत्रात येणारं एक सदर होतं माझ्यामते. आणि आता ह्या चिंटूचे असंख्य व्हिडिओ आहेत शिवाय रेडिओ वर दररोज दोनदा तरी मी ह्याच चिंटूच्या पिटुकल्या गोष्टींचा आनंद उपभोगते आजकाल. तो बाल कलाकार कोण आहे कोणास ठाऊक? कारण जेव्हा हि मालिका रेडिओ वर सुरु झाली त्यावेळी मी ऐकलं नाही ह्या बद्दल. आणि आता ऑनलाईन शोधते आहे तर नाव सापडतं नाही आहे. असो, पण कोणी का असेना तो बाल कलाकार आहे फारच भन्नाट. काय उभा केलायं चिंटू, हुबेहूब. काय आवाजाची लकब, फेक, संवाद, उतार-चढाव आणि कला, अप्रतिमच, शब्दात न मांडता येण्यासारखे असे. चिंटूचा सादरीकरण करणारा लहान मुलगा असेल तर खरंच कौतुकास्पद आहे, कारण इतक्या लहान वयात काही क्षणात उत्कृष्ट पणे सगळं समजून मांडता आलं पाहिजे. मोठं आव्हान आहे ते, सोप्प नाहीच. मला तरी छोटा मुलगा आहे असं वाटतं ऐकतांना पण जर मोठ्या एखाद्या कलाकाराने आवाज काढला असेल तर त्याहून भन्नाट. असो, ते काही क्षण सकाळी आणि संध्याकाळी नैसर्गिक हास्य उमटवून जातात. लेखकाची कमाल आहे, असे विषय सुचणं, समाजात बारकाईने लक्ष देणं आणि अर्थात उत्कृष्ट सादरीकरण हे समीकरण मस्त जुळून आलं आहे. कुठल्याही पारंपरिक, ऐतिहासीक किंवा धार्मिक टीव्ही च्या कार्यक्रमात देखील किती उत्तम भुमिका साकारतात, सगळा अभ्यास करून, भुमिकेत पूर्णपणे शिरून, हुबेहूब उभी करतात. पाठांतराची पण कमाल आहेच. करून घेणाऱ्याची देखील. बोलावं तेवढं कमीच आहे ह्या अश्या कलाकारांबद्दल.  साष्टांग दंडवत ह्या उभरत्या आणि दैविक देणगी असलेल्या चिमुकल्यांना. 

सोमवार, २६ सप्टेंबर, २०२२

माणसाची चाचणी

मी फेब्रुवारी महिन्यात "पंगतीच महत्व" ह्या सदराखाली असं नमूद केलं होतं कि पंगत हि एक खास जागा आहे जेथे माणसाची खरी पारख होतेच. मुख्य म्हणजे लग्नायोग्य वधूवरच नाही तरी दोघांचा अख्खा परिवार कसा आहे, चालीरीती कश्या आहेत, एकंदरीत स्वभाव कसा आहे हे सगळं पत्रिका दर्शवत नाहीत अजिबात. संगणक मशीन लर्निंग द्वारे थोडी जास्त माहिती कळते पण संपूर्ण नाहीच. त्यामुळे ज्या परिवारात आयुष्य काढायचं आहे त्यांच्यासोबत पंगतीचा लाभ घ्यावा, एकदा नाही, दोनदा नाही तर शक्य असेल तर थोडे अधिक वेळा, नकळत पारख होईलच.

एवढ्यातचं मला दुसऱ्या कोणाच्या गाडीत बसण्याचा लाभ आला, एकदा नाही, दोनदा नाही तर थोडे अधिक वेळा. चारचाकीने गिअर बदलणे, क्लच चे होत असलेले भयानक हाल आणि बाकी यंत्रेणे बद्दल बोलायला नकोच. असो, त्यांची गाडी, मला काय करायचं आहे. मला गाडी चालवता येते त्यामुळे ह्या सगळ्यांकडे नकळत लक्ष जातंच, दोश त्यांचा नाहीच. पण ह्या मुळे एक गम्मत लक्षात आली कि अगदी पंगती प्रमाणे भावी नवरा - बायको / साथीदार निवडायचा असेल तर त्याच्या सोबत गाडीत फेरफटका माराच. काही मिनिटात खरं रूप समजेल.

मी एक नवीन प्रयोग केला, एकदा नाही तर दोनदा आणि त्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांना, विद्यार्थ्यांना शाळेची सफर घडवून आणली पुन्हा एकदा. सर्वांच्या हाती रंगरंगोटीचं सामान दिलं, भला मोठा कागद दिला आणि विषय सांगितलं. प्रत्येकाने इतकं अप्रतिम चित्र रेखाटलं म्हणून सांगते. अहाहा च. प्रत्येकाला एकट्याला ते साकारायचे होते, नियम आणि गुण ह्या बद्दल कल्पना दिली होती आणि ठराविक वेळ दिला गेला होता. मग काय. विचारूनच नका. इतके अप्रतिम अविष्कार साकारले गेले, कागदावर अवतरले कि ज्याचं नाव ते. जगा पल्याड च. काही इतके सुबक आणि माहितीपूर्ण होते कि शब्दात मांडण्या पलिकडले, ज्यांचे विचार, कल्पना आणि बाकी इतर बाबी इतक्या स्पष्ट होत्या कि त्यावरून त्या व्यक्तीची देखील, त्याच्या गुणधर्मांची आणि त्याच्या जडणघडणाची पारख आपोआप झालीच, अगदी नकळत. पंगत आणि गाडी चालवण्याची खुबी ह्या सोबतच  ह्याच्या धाटणीतलं अजून एक उदाहरण माझ्या समोर उभं ठाकलं. बऱ्याच चित्रकला स्पर्धा भरपूर ठिकाणी सातत्याने होतं असतातच. भावी जोडीदारासोबत त्यात भाग घ्यायचा आणि निरीक्षण करायचं. साफ, सरळ, खोडा तोड न करता, अगदी चपराख रंगसंगती, स्पष्ट, दृश्य, तोलामोलाचे, हवी तेवढी माहिती देणारे चित्र रेखाटले म्हणजे एकंदरीत गोळाबेरीज झक्कास आहे ह्यात दुमत नाही. पण दुसऱ्या टोकाचं काढलं म्हणजे, न बोललेलं बरं. असो.

तर मित्र मैत्रिणींनो जागे व्हा. असे आधुनिक आणि अत्यावश्यक सल्ले आमच्या काळी नव्हते उपलब्ध. आता आहेत आणि सगळे सहज जमण्यासारखे आहेत, त्यामुळे वैविध्य रितीने पारख कराच. तत्पश्चात "त्याची" मर्जी. किंबहुना हे सगळं माझ्या हातून "त्याने" मांडून घेणं हे देखील सांकेतिक आहे हो. उपयोग करा आणि अत्यानंदाने जगा.   

पंगतीच महत्व

https://drpreetimulay.blogspot.com/2022/02/blog-post_6.html

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...