गुरुवार, २३ फेब्रुवारी, २०२३

एक संघ

अगदी शालेय वर्षांपासून प्रत्येक विद्यार्थी प्रकल्प अक्का प्रोजेक्ट वर काम करत असतो. बहुतांशी प्रत्येक विषयाला संलग्न असे प्रोजेक्ट्स असतात. प्रोजेक्ट म्हणजे प्रत्यक्ष एखाद्या विषयावर किंवा संकल्पनेवर स्वतः काम करणे. स्वतःच्या हातून जेव्हा काम होतं तेव्हा त्या विषयाचे कांगोरे जास्त सविस्तरपणे आणि ठळकपणे समजतात, लक्षात राहतात. ह्या साठी फक्त ऐकीव माहिती पेक्षा किंवा माहिती ऐकून त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे देण्यापेक्षा प्रात्यक्षिक आणि प्रयोग करणे जास्त योग्य. हे प्रयोग कधी एकट्याने किंवा एका संघाचा भाग म्हणून करायचे असतात. 

एकट्याने जर प्रोजेक्ट वर काम करायचं ठरवलं तर अतः पासून इती पर्यंत संपूर्ण जबाबदारी त्या एकट्याची असते, कोणावरही विसंबुन राहावे लागत नाही, अगदी स्वतःचं बाळ असल्यासारखं सगळं स्वतः च करावं लागतं. पण ह्या मुळे प्रोजेक्ट वर काम करणाऱ्याला हे ठाऊक असतं कि आपण राजे आहोत, सगळं कार्य पार पाडायला स्वतःच्या विचारणे संपूर्ण मोकळे. त्यामुळे गती मिळते, कोणासाठी थांबून राहायचं नसतंच, त्यामुळे एका डोक्याने काम होते आणि पट्टदिशी संपते देखील, किंबहुना इतकं स्वात्यंत्र मिळालंय म्हटल्यावर वेळेआधी काम व्हायलाच हवं. हे सगळं खरं असलं तरी "एका पेक्षा दो भले", ह्या पद्धतीने प्रोजेक्ट वर काम करतेवेळी चर्चा करायला कोण नसतं. चर्चे दरम्यान काही वेगळी बाजू समजू शकते त्या व्यक्तीला आणि त्यामुळे प्रोजेक्ट अजून उत्तम होऊ शकतो. एकमेकांसोबत काम करतांना कळत, न कळत प्रत्येकजण खूप काही शिकतं. ऐकायला शिकतं, एकमेकांना समजावून घ्यायला शिकतात, संवाद साधला जातो, काम वाटून घेतलं जातं, कधी कोणी एखाद्या अंगाने निष्णात असतं त्यामुळे प्रोजेक्ट ला एक अमूल्य असं रूप येतं. प्रत्येक सजीव हा सामाजिक प्राणी आहे, समाजाचा भाग आहे, अविभाज्य घटक आहे, त्यामुळे एकत्र, लोकांसोबत राहणं हे अत्यावश्यक आहेच. प्रत्येकवेळी किंवा वेळोवेळी एकट्याने जग जिंकणं थोडंस जास्त आव्हानात्मक आहे. त्यामुळे संघात काम करतांना मस्त आनंद लुटा, "हो" म्हणा, आपली मतं मांडा, लवचिक राहा, इतरांनी सुचवलेलं करून तर बघा कदाचित रापचिक बसेल, तुम्हाला आवडेल देखील. चला तर मग, प्रत्येकजण उठा आणि विस्मृतीत गेलं असेल तर पुन्हा आठवा कि आपण एक संघ आहोत. तुम्ही एकटेच पण संघासाठी काम करता. प्रत्येकाला जो प्रोजेक्ट चा भाग दिला असतो काम करायला तो खरं तर एक छोटेखानी प्रोजेक्ट च असतो ना. सगळे तुकडे सरतेशेवटी जोडूनच प्रोजेक्ट पूर्ण होणार ना? 

महाविद्यालयां पर्यंत संकल्पनेच्या रसातळाशी जाऊन शिकण्या करता एकट्याने करा कि बिनधास्त प्रोजेक्ट, पण कॉम्बो ठेवा नेहेमीच. सगळ्याची तय्यारी असावी.  

वॉर्निंग

सहसा मी, माझा संगणक, माझं काम, एवढाच माझा काय तो आवाका आणि दिनचर्येचा भाग. आणि एवढंच पुरून उरतं मला त्यामुळे माझ्याच कचेरीत काय घडामोडी होतात हेच ठाऊक नसतं तर अजून कुठे काय चाललंय हे मला कळण्याचं काही कामंच नाही. पण तरी देखील अवांतर वाचन करतांना एका कामगाराचा अनुभव / सत्यकथा समोर उभी ठाकली, ती मी वाचली आणि गार पडले. अर्थात त्या संस्थेशी / ऑफिसशी / कामगाराशी माझं काही घेणं देणं नाही. खरं खोटं काही माहित नाही मला आणि माहिती करून घायची पण नाही, कारण तो माझा स्वभाव नाही, क्षेत्र नाही आणि मला तसं करून काहीही मिळणार नाही.   

माझे विचार त्या घटनेसंदर्भात मी येथे मांडते आहे. 

एक कर्मचारी एका कंपनीत अनेक वर्ष कामाला होता. त्याने पोटतिकडीने म्हणे वेगवेगळ्या पदावर कामे केली आहेत त्या कंपनीत. काही कामे तर त्याच्या आवाक्या बाहेरची होती, पहिल्यांदा भली मोठी जबाबदारी दिली गेली होती, पण ती त्याने धैर्याने निभावली आणि त्यात उत्तुंग यश प्राप्त केले. अशी नवनवीन कामे आणि टप्पे तो पार पाडत गेला आणि दररोजचे कचेरीचे काम देखील करत राहिला निमूटपणे. 

माणूस म्हटला कि चूक होतेच, तशी त्याच्या हातून पण झाली. त्याने माफी मागितली आणि पुन्हा नव्या जोमाने कामाला लागला. माणूस म्हटला कि त्याचं कुटुंब देखील आलंच आणि ह्याच्या कुटुंबात देखील सर्वांप्रमाणे काही तरी आव्हानं उभी राहिली. ती स्विकारुन पुढे जाणं आवश्यक होतं. हे करतांना त्याची दमछाक होत होती, कारण घर, कचेरी आणि आव्हानं अश्या तीन समांतर गोष्टी सांभाळायच्या होत्या. पुन्हा एकदा कचेरीत चूक झाली आणि त्या व्यक्तीला नोकरी गमवावी लागली.  

मी आधी म्हटल्या प्रमाणे खरं काय झालं हे माहित नाही, हि फक्त छापील गोष्ट आहे. मला एक प्रश्न विचारावासा वाटतो, सध्या जगभरात मानसिक स्वास्थ्याला जास्त महत्व प्राप्त झाले आहे आणि ते महद गरजेचे आहेच. बहुतांशी प्रत्येक मोठ्या लहान कंपनीत मानसिक आरोग्याचे तज्ज्ञ हजर असतातच. मग ह्या कंपनीत नव्हते का? नसतील तर वरिष्ठ काय करत होते? ते ह्यात जातीने लक्ष घालू शकले असते, त्या कर्मचाऱ्यांची बाजू समजावून घेतले असते, आजवर ज्याने इतकं अप्रतिम काम केलं त्याला मदत करू शकले असते, काढून टाकणे ह्या पायरी आधी. आणि हे सगळं जर त्याच्या कंपनीने केलं असेल तर त्यांना साष्टांग नमन. पण नसेल तर मात्र निश्चित करायला हवं. समुपदेशनाची गरज, पाठीवर थाप, कुरवाळणे हि प्रत्येकाचीच गरज आहे, मग तो / ती कुठल्याही हुद्द्यावर असो, कितीही वयाची असो. चला तर मंडळी फक्त वार्निंग न देता, टोकाची भुमिका न बजावता शाब्दिक, मानसिक, सामाजिक, आर्थिक, सर्वार्थीक अशी एक छोटेखानी थाप देऊन बघूया. चांगला परिणाम निश्चित होईल हे खात्रीशीर.  

तिची जागा

मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना माझ्या लहानपणीची सफर घडवणार आहे, अर्थात अगदी थोडक्यात. माझ्या वेळी तरी फक्त आमच्या कडे नाही तर सर्वच कुटुंबात हि पद्धत होती कि मुलीला सारखं "अगं सासरी गेल्यावर...." असं ऐकवलं जायचं, गंमतीने, पण खूपच नेहेमी. आणि खरंच काही वर्षातच सगळ्याच एक एक करून पोचल्या कि सासरी. मानाल तसं जरी असलं तरी वेगळंच, एक खोली ती पण नाममात्र, खरी नवरोबांचीच. मग दोनाचे चार, नवीन पिढी, नवीन गरजा, बदलेले वातावरण आणि अश्या बऱ्याच बाबींमुळे नव्या पाहुण्यांना त्यांची खोली, त्यांच्या आवडीचा रंग, वेगळं टेबल + खुर्ची + कपाट आणि बरंच काही. असेच दिवस / वर्ष सरतात आणि "ती" आणि घर देखील जुनं होतं. मग त्याची डागडुजी केली जाते, आताशा परवडत असो व नसो पण भल्या मोठ्या प्रमाणात. पिल्लांना वाढत्या गरजांनुसार पुन्हा एकदा त्यांची खोली सजवून मिळते, बाकी इतर बरेच काळानुरूप नाविन्यपूर्ण बदल केले जातात आणि तरी देखील हि शोधतच राहते तिची जागा, तिचं टेबल, तिची खुर्ची आणि असे बरेच काही. कधी कधी मला देखील, माझ्या समवयस्क मैत्रिणींना देखील हे जाणवलं तेव्हा किंचित मनापासून फारच वाईट वाटलं. न्यू-नॉर्मल दिवस येऊन गेले तरी देखील, बहुतांशी महिला काम करत असून देखील त्यांचं स्थान वेगळं निर्माण झालं नाही, एका साध्या कोपऱ्यात पण नाही. 

मग मात्र मला देव आठवले आणि एक म्हण देखील. 

देव ह्या करता, कि बहुतांशी घरात जे "त्याने" दिलेलं आहे त्या साठी सुद्धा वेगळी खोली नसते, भारतात, महाराष्ट्रात, काही अपवाद सोडले तर. कुठलीही तुलना नाहीच पण मग आईचं घर सोडून काल आलेल्या हिची काय गत? 

मग एक म्हण अचानक डोळ्यादेखत उभी ठाकली, "हे विश्वची माझे घर", "वसुधैव कुटुंबाकम", हे ठाऊक असून देखील जर माझ्या मनात किंतु परंतू आले म्हणजे बरोबर नाहीच.  हे सगळं घर माझंच आहे. एकच नेमून दिलेलं ठिकाण नाही, हवं तिथे मी बसू शकते. एकाच जागी बसून कंटाळा येऊ नये म्हणून लॅपटॉप नावाचा अत्याधुनिक संगणक आहे, इंटरनेट आहे, पंखा आहे, उजेड आहे मग अजून काय हवं. माझंच तर आहे सगळं तसं पाहिलं गेलं तर, नाही का? मग तक्रारीला वावच नाही मुळी. चला मुलींनो आज इथे बसा, उद्या तिथे, हवं तिथे, मूड असेल तिथे, संपूर्ण घर काय जग आपलं आहे. आपण जाऊ ती, बसू ती आपली जागा, आहे कि नाही मज्जा. काम होण्याशी मतलब सरते शेवटी. आणि हो, मूळ मुद्दा हा आहे कि तुमचं काय आहे हो? "त्याने" बघा ना तुम्हाला कित्ती अलिप्त घडवलं आहे.  आईचं घर तात्पुरतं, सासरचं नाहीच, मुलांच्या नावात नाव नाही का गाडी बंगला नाही, किती मोकळं ठेवलं, स्वच्छंद राहा, हलके फुलके राहा, सांभाळू दे बाकिच्यांना तुम्ही फक्त हसा, खेळा आणि बागडा. "लेस इज ऑल्वेज मोअर". 

मोठे+छोटे मुळाक्षर+टिम्ब

तपश्चर्या नावाचा एक शब्द मी माझ्या लहानपणी पासून कानावर पडला आहे. त्या शब्दाभोवती एक वलय आहे, होतं किंबहुना कारण तपश्चर्या हि फक्त देव देवतांची, ऋषीमुनींची, काही तरी जगावेगळं साध्य करणाऱ्यांसाठीची अशी. जगावेगळं ह्या साठी कि तप म्हणजे अनेक वर्ष, माझ्या दृष्टीने आचर्य म्हणजे सातत्याने आचरणात आणणे पुढे जाण्याकरता, ध्येय साधण्या करता, आचार्यांनी नमूद केलेले असे काही प्रचंड आव्हानात्मक आणि हो अर्थात आश्चर्य वाटण्यासमान देखील. फार मोठी संज्ञा आहे, त्यामुळे भली मोठी शब्दफोड देखील संभव आहेच ह्या शब्दाची. लहानहोते  त्यामुळे असेल कदाचित पण मोठी होईस्तोवर मी ह्या शब्दापासून एक तर दूर राहिले किंवा तो शब्द फक्त माहिती खातीर होता असं मला वाटलं. मला काय करायचं आहे, एक शब्द आहे,त्याचा हा अर्थ आहे आणि तो अमलात आणणारे हे होते किंवा एका हाताच्या बोटावर मोजता येणारे असे एवढेच आहेत, बास. विषय संपला.

 पण नाही मंडळी, काल मला प्रकर्षाने ह्या शब्दाचा आधुनिक अर्थ उमगला अचानक. त्याचं असं झालं, माझी एक सहपाठी काल विद्यावाचस्पती झाली. "Dr." हि उच्च पदवी तिला प्राप्त झाली. मला आता पुसटसं सगळं आठवतं, साधारण २०१५-१६ च्या दरम्यान सुरु झाली हि घौडदौड, तेव्हा एक मूळचे मार्गदर्शक होते, मग तिसऱ्याची भर पडली आणि काळजी घ्यावी लागली, वेळ द्यावा लागला, स्वतःची तब्बेत खाली-वर झाली, ते पुरलं काही महिने सलग आणि वेदनादायक असं, मग माझ्यामते मार्गदर्शक बदलले, त्यामुळे विचार देखील, ह्या सगळ्या प्रवासात प्रचंड वाचन-मनन-चिंतन, संगणकिय भाषेत अंमलबजावणी, लिखाण, जीवघेणी वाट बघणे निकालाची, विविध पद्धतीचं कस लागणारं लिखाण, शिवाय घरचं-दारचं काम . आता मला सांगा हि एक प्रकारची फारच मोठी आणि जगावेगळी तपश्चर्या नाही का? जी फक्त एक मोठे+छोटे मुळाक्षर+टिम्ब हे मिळवण्यासाठी हो. देव प्रत्यक्ष दर्शन देत नाही, वरदान नाही,  प्रगट होत नाही त्या ऐकलेल्या तपश्चर्येसारखा पण

         . वैविध्य रूपात आढळतो तो (गुरु, गुरुसमान, समीक्षक, परीक्षक .)

. दर्शनही देतो (प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष रूपात, जेव्हा गरज भासेल तेव्हा, मित्र, मैत्रीण, स्वतःची ऊर्जा, प्रेरणा देतो .)

. वरदान पण (तुमच्या हातून नवीन ज्ञानात भर पडते, जगाला नवीन दृष्टिकोन कळतो .)

. प्रगट होतो (नाव होतं, बढती मिळते, वाढीव पगार देखील . )

हे फक्त एक उदाहरणं झालं. प्रत्येकजण आपाआपल्या परीने तपश्चर्या करत असतोच, कळत / नकळत.

अजाणतेपणी कोणालाही त्यांच्या तपश्चर्येत भंग पडणार नाही ह्याची काळजी घ्या, जमेल तेवढी मदत नक्की करा, ती तुमच्या तपश्र्चयेंत काही अंशी कामी येईल कदाचित. 

फेस

 अगदी फेब्रुवारीतच उन्हाने जीव नकोसा झालायं, दुपारी उन्हात बाहेर पाऊल पडलं तर संपलं. मग विचार करा ऐन उन्हाळ्यात काय होणार? कित्ती वाढणार तापमान? माणसं, प्राणी, पक्षी अगदी सगळेच जीव होरपळून निघतात. गाड्या उन्हात उभ्या राहून तापतात आणि प्रत्येक ठिकाण अगदी भट्टी सारखं भासतं.

 एक नवीन फ्याड आलंय आणि ते सर्वत्र अगदी उधई सारखं पसरतं आहे. प्रत्येक छोट्या मोठ्या रस्त्याच्या दुतर्फा हि रांग दुकानांची, चार पत्रे ठोकले कि झाली दुकानं, थाटला धंदा आणि लोकं देखील पूर येईल अश्या अविर्भावात जातातच तेथे हजेरी लावायला, एकदा नाही उत्सुकता म्हणून तर सतत. माझ्या डोक्याचा पार भुगा होतो हा विचार करून कि बरीचशी दुकानं जी माझ्या दृष्टीपथात येतात ती सर्व गावाजवळ स्थापन झाली आहे. जी आधी गावं शहराबाहेर होती, पण आता फार जवळ आली आहेत त्यामुळे खूपशी दुकानं शहर संपून गाव सुरु होतं तेथे, आणि त्या नंतर संपूर्ण रस्ताभर दिसतात. कित्ती म्हणजे कित्ती गाववाले पण उभे ठाकलेले दिसतात त्या दुकानासमोर. का? बहुतांशी गाववाले घरचंच सगळं नेहेमीच पसंद करतात, प्राधान्य देतात. पण छे हो, येथे तर दृश्य काही भलतंच दिसतं दररोज.  आणि प्रवासाला निघालं तर पाय मोकळे करायला हि अशी पिटुकली, तात्पुरती दुकानं येतात कामाला.

मूळ मुद्दा हा आहे कि हि बरीचशी दुकानं खाण्याचीच आहेत. त्यात सध्या इडली ला भारी दिवस आलेत, उठ सुठ सर्वत्र फक्त इडलीचीच दुकाने.  बाप रे. फक्त कल्पना करा मंडळी इडलीचं पीठ फ़सफ़सलेलं असतं किंवा लागतं अगदी नरम इडली होण्याकरता. ते पीठ प्रक्रिया केलेलं असतं, एक दिवस आणि रात्र भिजलेलं. मग अश्या अवस्थेतील पीठ, त्यात ऊन म्हणतंय मी आणि पत्रे + गॅस ची धग, अहो काय? काय पोटात जातंय तुमच्या? लक्षात घ्या कृपया. त्या पेक्षा जमल्यास घरची भाजी भाकरी परवडली हो. अगदीच पर्याय नसेल तर आणि तरच जा अश्या ठिकाणी, नाहीतर टाळा मंडळी, घरचं ते घरचंच, अगदी सोनं किंवा त्या पेक्षा भारी / उजवं / उपयोगी / पौष्टिक. "हेल्थ इज वेल्थ" मंडळी. कृपया सांभाळा स्वतःच्या प्रकृतीला. बाहेर गावाहून बदली हुन आलेले, घर लागेपर्यंत सोय म्हणून, एकटे आजी-आजोबा मावशी आल्या नाही तर किंवा आजीनं काही आणीबाणीच्या वेळा ठीक आहे पण सातत्याने खाणाऱ्यानो सावध  व्हा. कोणालाही कधीही कुठलीही प्रकृतीची तक्रार यायला नकोच पण आलीच तर मग मूळ शोधून काढणं फार अवघड जातं आणि त्यामुळे मग योग्य उपचार मिळत नाही, डॉक्टरच्या आणि रुग्णाच्या तोंडाला फेस येतो. थेंबे थेंबे तळे साचे. जागे व्हा. घरचं खा. स्वतः करा पण बाहेरचं टाळा. 

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...