मंगळवार, ३० मे, २०२३

भिशी

माझी आई कधीच ह्या भिशीच्या भानगडीत पडली नाही, सहज शक्य होतं तिला, पण का कुणास ठाऊक नाही उतरली त्यात. अगदी आदरभावाने, कुठलाही किंतु-परंतु नाहीच, पण मला देखील कधी त्याची आवड निर्माण झाली नाही, किंबहुना घर आणि ऑफिस ह्यातून फुरसत काढली गेली नाही भिशी साठी. कचेरीचे काम संपले नाही तर घरचे सुरु होत असे. असो. भिशी म्हणजे माझ्या दृष्टीने एक तर महिलांची किंवा पुरुषांची असते. भिशी हि एक फार अप्रतिम कल्पना आहे ज्यात एक खास विशिष्ट्य जमापुंजी उभी होते. महिन्यातून एकदा सर्वांची गाठभेट होते, हास्य, गप्पा पेरल्या जातात, उत्कृष्ट चविष्ट विचारपूर्वक केलेलं बहुतांशी घरचं सर्वांसोबत मस्त फस्त केलं जातं. प्रत्येक महिन्यात एक ठराविक विषयावर चर्चा केली जाते किंवा त्या पद्धतीने एकंदरीत संपूर्ण कार्यक्रम पार पडतो आणि तेथेच पुढील महिन्यात कुठे गाठ-भेट हे देखील निश्चित केलं जातं. एक बहुस्मरणीय असा अनुभव भिशी देऊन जाते, उत्साह, ऊर्जा मिळते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे एखाद्याला जर त्या महिन्यात जमापुंजीची गरज भासली तर सगळे जण हिरीरीने मदत करतात. 

गेले काही वर्ष दर महिन्याला आम्ही आवर्जून भेटण्याचा आटोकाट प्रयत्न करतोच. त्या दिवशीची थीम जी असेल त्यावर भाष्य करतो, ऐकतो, त्या पद्धतीने किंवा जसं जमेल तस्स साग्रसंगीत घरच्या पदार्थांचा आस्वाद घेतो, दर महिन्याला वेगवेगळ्या मित्रांच्या / आप्तेष्ठांच्या घरी. समविचारी लोकांशी, मित्र-मैत्रिणींशी गाठ-भेट होते, वैचारिक आदान प्रदान होते. उत्साह, ऊर्जा अगदी महिन्याभर टिकेल इतकी निर्माण होतेच कारण सर्वांनी एकसंघ रितीने, उच्चारातून निर्माण झालेल्या त्या प्रासादिक, आशिर्वादात्मक लहरी असतात. आणि हो ज्यांना जेव्हा ज्याची गरज पडेल तेव्हा अख्खा ग्रुप मदतीसाठी सदोदित तय्यार, सर्वार्थाने, माहिती पुरवणे, प्रार्थना करणे आणि इतर बरेच काही.  किंबहुना ह्या अश्या दर महिन्याला विशेषतः एकादशीच्या दिवशी भेट घडल्यामुळे प्रतिबंधात्मक असा मार्ग साध्य होतो प्रत्येकाला जे तेथे उपस्थित आहेत, त्या वास्तूच्या आजूबाजूला असलेल्या प्रत्येक सजीव निर्जीव घटकांवर, अनेक मैल लांब  आणि टिकतो देखील, बराच काळ. आणि ह्यात उपस्थिती लावणारे महिला आणि पुरुष देखील आहे, विविध्य पातळीवर काम करणारे असे तज्ज्ञ, अगाध ज्ञानाने परिपूर्ण तरी देखील एकत्र.  बघा तर मंडळी आहे कि नाही आमची भिशी खास आणि हटके, असंख्य उपयुक्त लहरी ची जमापुंजी निर्माण करणारी. 

सोमवार, २९ मे, २०२३

"नावात काय आहे?"

श्री विष्णूंची मूर्तिमंत ऊर्जा, देवीचा अवतार, शक्तीचे प्रतीक असे अनेक अर्थ आणि वैशिष्ट्ये असलेली माझी एक खास तरुण मैत्रीण आहे. गेली अनेक वर्ष आम्ही एकत्र काम तर करतो आहेच पण भेटतो देखील एकमेकींना वैविध्य कारणास्तव. माझी तिची ओळख माझ्या महाविद्यालयाच्या संचालकांनी करून दिली, म्हणजे डायरेक्टर सरांनी तिच्या धडाडीची एक गोष्ट कथन केली आणि तशी ओळख झाली. ह्याच मैत्रिणीची लेक अगदी पिल्लू होती त्यावेळी तिने पिल्लू आणि आजीला वसतीगृहात दिवसभर राहायची परवानगी मागितली होती, त्यावरून हे माझ्या नागपूरचं व्यक्तिमत्व भन्नाट आहे, वेगळं रसायन आहे हे लक्षात आलं होतं आणि तीच ऊर्जा, कणभर जास्तच पण कमी नाही, अशी आज तागायत दर्शनीय आहे, हे कौतुक. "नावात काय आहे?" असे दिग्गज म्हणतात, म्हणून गेलेत, पण माझ्या दृष्टीने तर नावातच सगळं काही आहे हे निश्चित आणि ह्या मैत्रिणीच्या नावासारखीच हि आहे ह्यात शंकाच नाही. 

हे आमच्या कचेरीत येणारं पिल्लू मोठं झालं, नेहेमीची नोकरी आणि संलग्न कामे अत्यंत उत्साहाने पार पाडली, दुसरं पिल्लू देखील आलं, घरचं - दारचं अत्यंत शिताफीने सांभाळ गेलं, विद्यावाचस्पती पर्यंत हसत खेळत प्रवास झाला, भाऊजींची लाडकी वाहिनी हा सन्मान पटकावला, अनेक धनुष्य ताकदीने पेलले मग ते पहिल्या वर्षीच्या मुलांचे इंडक्शन असो, नाहीतर सांस्कृतिक वार्षिक कार्यक्रम नाही तर शेवटच्या वर्षाच्या मुलांचा निरोप समारंभ, अहाहा च, अगदी निःशब्द करून टाकले प्रत्येक वेळी, स्मितहास्य आणि पोटभर आनंद उपभोगत पेरलेलं नेहेमीच. 

सगळ्या स्तरावर अगदी अग्रगण्य, माणसं सांभाळणं, ट्रेंडी राहणं, उत्कृष्ट गाडी चालवणं, भन्नाट चविष्ट पदार्थ, नवीनतम गाण्यांची माहिती असणं, ती ऐकवणं, प्रत्येक विद्यार्थ्यांशी मैत्रीने वागणं / बोलणं, प्रत्येकाकडून स्मार्टली कामे करून घेणं ई. आणि बरेच काही, यादी लांबलचक आहे. तर अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर अशी हि आमची वैष्णवी, ऊर्जेचं दुसरं नाव, उत्साहाचा सळसळता झराच जणू, प्रत्येकासाठी फार महत्वाची अशी ऍसेट.  

बुधवार, १७ मे, २०२३

तिला वेळ देऊन तर बघा

माझ्या आंतरराष्ट्रीय विद्यापीठात आणि प्रकर्षाने माझ्या विभागात खूप तरुण मुली आहेत. सध्याच्या नियमांनुसार विद्यावाचस्पती होणं अत्यावश्यक आहे प्रत्येकालाच. त्याच प्रमाणे ह्या सगळ्या नवतरुणी पण संशोधन करत आहेत. सगळ्याजणी घरदार, पूर्णवेळची नोकरी सांभाळून शिवाय जीव तोडून संशोधन पण करत आहेत सातत्याने गेली अनेक वर्ष सलग. इतक्या प्रचंड प्रमाणावर कामं त्यामुळे झपाटल्यासारखे वागणे, घड्याळाच्या काट्यावर. 

इतक्यातच खूप मस्त सप्तरंगी चित्र बदललेलं आढळलं मला, अचानक आणि जसा कि हवेत बदल झालायं, दिशा आणि गती जणू बदलली आहे. म्हटलं कश्यामुळे असेल अचानक? काय असा बदल झाला? कारण कामे तेवढीच आहेत कचेरीत, किंबहुना कणभर वाढलेली आहेत, मग? आणि नखशिखान्त बदल त्यात सगळ्याच्या सगळ्या बदलल्या. आधी पण छान दिसत असतं त्या, पण आता काही चमक वेगळीच आहे, मॅचिंग ची बहार आली आहे, खूप ढिगाने नवनवीन ड्रेस परिधान केले जात आहेत, केशरचना वाखाणण्यासारखी भन्नाट झाली आहे, आणि असे बरेच काही. 

माझ्या पिटुकल्या मेंदूला किंचितसा ताण दिल्यावर लक्षात आलं एक तर ह्या सगळ्या जणी विद्यावाचस्पती नुकत्याच झाल्या आहेत किंवा त्यांचे शोध निबंध सबमिट झाले आहेत. अहाहा च. मोठी जबाबदारी उत्कृष्ट रित्या पार पडल्याचा तो साज सहज चढला आहे सर्व जणींवर. आता हातात राखीव वेळ आहे त्याचा सदुपयोग उत्कृष्ट रित्या केल्या जातोय. त्यामुळे त्यांनाच नाही तर त्यांच्या आजूबाजूच्या सर्वांवरच त्याचा जगावेगळा परिणाम जाणवतो आहे, एक वेगळी ऊर्जा निर्माण झाली आहे. वेचून शोधून दागिने मिरवले जात आहेत. अहाहा. 

हे सगळं दृश्य डोळ्यात साठवणं अवघड आहे मला. त्यावरून आठवलं, शोधनिबंधावर काम सुरु असतांना घरी आणि दारी जरा ह्या माउलींचा / मुलींचा हात मोकळा राहील ह्याकडे लक्ष द्या आवर्जून. मग बघा थोडासा जरी जास्तीचा वेळ मिळाला तर ह्या १० हत्तीची ताकद एकवटून जास्त जोमाने सर्वदृष्टीने कामाला लागतात, झकास दिसतात, प्रसन्न राहतात, बाकीच्यांना उत्साहाचा झरा प्रदान करतात आणि काही दिवसांची कामे काही मिनिटात मार्गी लावतात. थोडासा कामाचा जोर कमी ठेवा, मदत करा सर्वतोपरी आणि बघा त्याचे अगणित फायदेच फायदे. 

सगळ्याच जणी आपापल्या ठिकाणी फार मोठे कार्य करत आहेत, धडपड करत आहेत, पेरत आहेत आणि उंची गाठत आहेत. कामं हि प्रत्येकाची जबाबदारी आहे. त्यामुळे एक मेका साह्य करू अवघे धरू सुपंथ.... 


नाकापेक्षा मोती जड - २

माझ्या सगळ्या शिक्षकांना / गुरुजनांना मला धावत पळत जाऊन भेटावसं वाटतंय, मुख्यत्वे मराठीच्या. मागे लिहिल्या प्रमाणे आम्हाला "वाक्यात उपयोग करा" असा एक आव्हानात्मक प्रश्न असायचा. म्हणी देत असतं आणि त्यांचा वाक्यात प्रयोग करायचा, किंबहुना त्यांचा वापर करायचा. तेव्हा प्रचंड अवघड होतं ते, कारण एखादा अर्थ माहिती असायचा, जो गुरुजनांनी सांगितला आहे किंवा कानावर पडला आहे, बास, त्यापुढे काहीही नाहीच. 

गुरुजनांनी पुस्तकाबाहेर जाऊन त्यांच्या दैनंदिन जीवनातले किस्से सांगून आम्हाला अधिक सक्षम करायला हवं होतं. त्यांच्याकडे ढिगाने अनुभव असणार. मग जर त्या गोष्टी सांगितल्या असत्या, कथन केल्या असत्या तर पाठांतर कमी करावं लागलं असतं आणि मस्त प्रयोग / वाक्य झाले असते तय्यार. खैर. आजचा माझा अनुभव ऐकवते. 

मी सकाळचे कोवळे ऊन खायला आणि हवेतला गारवा अनुभवायला सोसायटित खाली जाऊन चक्कर मारून बसले, बराच वेळ, सुट्टीचा सदुपयोग अजून काय. आणि हि मागल्या २-३ दिवसांपासूनची रोजनिशी बरं का. असंख्य गाड्या डोळ्यासमोरून आल्या गेल्या. माझ्या चार डोळ्यांनी काही तरी खास टिपलंच तेवढ्यात. आताशा सगळ्या रणरागिणी कामाला येणाऱ्या मावश्या देखील भल्या मोठ्या गाड्यांवर विराजमान, कानात गाणी आणि मस्ती मस्त. त्या नंतर चा भाला मोठा ताफा म्हणजे स्विगी, बिग बास्केट आणि इतर कंपन्यांचे प्रतिनिधी. ह्या शिवाय अजून बरेच वाहनचालक. सगळ्यांमध्ये एक साम्यता आढळली. अवजड गाड्या आणि त्यावर विराजमान झालेले छोटेसे, बारके, वजनाने अगदी कमी असेच सगळे. का? आपल्या शरीरयष्टी नुसार पण गाड्या मिळतात हो, छोट्या आकाराच्या, कमी वजनाच्या, मग इतक्या न सांभाळता येणाऱ्या का घ्यायच्या? पाठीचं काय होईल काही वर्षांनी? थोडा तरी विचार, सद्सद विवेक नको का? माझाच रक्तदाब वाढला न कळत. एका प्रसिद्ध चित्रपटात घोड्यावर गधा काढलेला दाखवला आहे, तसं काहीस भासलं मला, अतिशयोक्ती नाही पण "हत्तीवर उंदीर जसा", "नाका पेक्षा नक्कीच मोती जड", काही दुमत नाहीच. 

बघा आता, अगदी सहज डोळ्यासमोर आलेले असे प्रसंग सांगत शिकवलं तर कित्ती भन्नाट लक्षात राहील नाही. बघता बघता माझे एक वाक्य नाही तर अख्खा ब्लॉग लिहून झाला.  

सोमवार, ३ एप्रिल, २०२३

डा पा - वही

माझ्या महाविद्यालयाच्या दिवसात बऱ्याचदा फक्त एक वही हातात मिरवत आणणारे दिज्जग होते. त्यामुळेच असेल कदाचित थोडिशी मोठी आकाराची वही / रजिस्टर निघाले ज्यात बरीच पाने असायची. त्या पानांची वरच्या उजव्या कोपऱ्यात मग छोटेसे भाग कापून प्रत्येक विषयाला काही पाने राखून ठेवायची. अर्थात घरी जाऊन, किंवा वाचनालयात बसून त्या टिपून घेतलेल्या मुद्द्यांवर विचार करून नोट्स तय्यार होत असतं. त्यामुळे आधी छोटी वही, एक संपली कि दुसरी मग तिसरी अश्या पद्धतीने, मग मोठे रजिस्टर असे वापरले जायचे. त्या वह्या किंवा रजिस्टर जसे कसेही वापरले जायचे, कुठेही ठेवले जायचे, बऱ्याचदा अवस्था असायची त्याची, हातात पकडलेले अगदी सहज असे, अगदी तसेच आता मला लॅपटॉप किंवा आय पॅड बद्दल होतांना दिसतंय, माझ्या चार डोळ्यांना ते बघवत नाही अजिबातच. तेव्हा जश्या आई वडिलांना हव्या तेवढ्या वह्या घेऊन द्याव्या लागत असतं आता हवा तो लॅपटॉप घेऊन द्यावा लागतोय, फरक इतकाच काय तो. वह्यांच्या किमतीत येत नाही हा पठ्या पण कदाचित त्या वेळची वह्यांची किंमत आणि आताची साध्या लॅपटॉप ची कदाचित विद्यार्थ्यांना सारखीच वाटत असणार. 

दृश्य बघा हं, एका हातात चालता चालता वापरायचा असा तो मोबाईल, पाहिजेच काहीही झालं तरी आणि दुसऱ्या हातात घडी केलेला तो लॅपटॉप. कधीही, कुठल्याही अवस्थेत, घाईत बंद केलेला लॅपटॉप. तो इतका सहजतेने पकडलेला असतो जशी कि वही, किंवा कागदांची फाईल, जी पडली तरी काही होणार नाही, तोडफोड / नुकसान होणार नाही. महाविद्यालयात चालतांना, लक्ष नसतांना, कोणीही कुठेही धडकू शकतं, समोर येऊ शकतं, लक्ष नसल्यामुळे पाणी असू शकतं, काहीही शक्य आहे. इतकी मोठी बॅग दिली असतांना हातात का धरायचा लॅपटॉप? यक्ष प्रश्न आहे. शिस्त का नाही पाळायची, व्यवस्थित बंद करून मग का नाही निघायचं? सरते शेवटी तो प्रचंड महाग लॅपटॉप आहे, नाजूक आहे, काही झालं तर त्यात असलेला डेटा नाहीसा होऊ शकतो, बिघडू शकतो मग काय करायचं? बिघडल्यावर दुरुस्त करून घेण्यापेक्षा किंवा नवीन विकत घेण्यापेक्षा काळजी घेतली तर? आणि शेवटी तो विद्यार्थ्याला सहज मिळाला आहे काहीही न करता, अभ्यासासाठी. मग कमीत कमी चार वर्ष किंवा जेवढा अभ्यासाचा कालावधी आहे तो वर तरी जपला पाहिजे ना? दुसरा लॅपटॉप हा नोकरी लागल्यावर कंपनीने दिला पाहिजे, असं काही का नाही येत मनात विचार? इतका निष्काळजीपणा का? नोकरी लागल्यावर, कमवायला लागल्यावर कोणालातरी इतकं महागडं काही तरी घेऊन द्या, आणि त्याने ते असं-तसं वापरू द्या म्हणजे मग कदाचित कळेल कसं वाटत ते. 

अजून एक म्हणजे फडकं काय मारत नाहीत त्यावर कधी हे बापडे. स्क्रीन काळी ठेवलेली असते, बोलावं तेवढं कमीच आहे. असो. 


रविवार, २ एप्रिल, २०२३

डा पा - वातानुकूलित यंत्रणा

माझा लेक सध्या एका वैद्यकीय महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे. हे महाविद्यालय आधी सरकारी होते आता निमसरकारी आहे. अतिशय जुनं, ८०+ वर्षांपूर्वी स्थापन झालेली हि संस्था असल्यामुळे सगळं बांधकाम पण तसंच जुनं आहे. वैद्यकीय महाविद्यालय सरकारी, निमसरकारी किंवा खाजगी असलं तरी देखील त्याला सलंग्न असलेले रुग्णालय हे बहुतांशी गरजूंसाठी स्थापलेले असते. मोफत उपचार दिले जातात त्यामुळे बऱ्याच जणांना त्याचा फायदा होतो. काही वैद्यकीय महाविद्यालयांसोबत खाजगी किंवा मोफत उपचार न देणारे दुसरे रुग्णालय पण असते पण त्यात फक्त नावाजलेले डॉक्टर्स काम करतात, विद्यार्थी नाही.  महाविद्यालयाची इमारत कशीही असली तरी देखील विद्यार्थी दशेत असतांना अगदी साध्या रुग्णालयातच काम करायला सुरवात करावी लागते, ज्याची इमारतच काय पण सगळ्या सोयी सुविधा देखील साध्याच असतात. बऱ्याचदा रुग्णांची, डॉक्टरांची आणि त्यांची सेवा करणाऱ्या इतर कर्मचाऱ्यांची देखील गैरसोय होते पण काहीही पर्याय नसतो. डॉक्टरांना रुग्ण बरा करायचा असतो, रुग्णाला बरं व्हायचं असतं, विद्यार्थ्यांना शिकायचं असतं, कर्मचाऱ्यांना नोकरी आणि सेवा करायची असते, त्यामुळे साध्या ठिकाणी देखील अविरत कामं सुरुचं राहतात, ठेवावी लागतात. 

माझ्या लहानपणीपासून अर्धशतकी वाटचाल होईपर्यंत वातानुकूलित यंत्रणा घरी कधी बसवली नाही, त्यामुळे वापरली नाही आणि त्याची गरज पण भासली नाही कधीच.  त्यामुळे त्यावर अवलंबून राहणे तर नाहीच. नागपुरात असतांना प्रचंड ऊन असल्यामुळे भले मोठे डेसर्ट कूलर होते घरी, त्यानंतर पुण्यात तर अगदी पिटुकल्या कूलर नि काम भागतं, पंखा पण पुरेसा असतो. 

वातानुकूलित यंत्रणा घेण्याची तय्यारी तर आहे, पण का घेतली नाही ह्याचं खरं कारण मला आज उमगलं. बाकिच्यांच मला माहित नाही पण मी तरी आई म्हणून एक व्यक्ती म्हणून माझा लेक तिकडे वसतिगृहात प्रचंड उन्हात साध्या पंख्यावर भागवतो आहे तर मी कशी AC मधे अराम करणार? त्या करता मला सद्बुद्धी तर झाली नाहीच AC यंत्रणा विकत घेऊन वापरायची. सुर्यबाप्पाने अजून काही वर्ष तरी पुण्यावर अशीच कृपा ठेवावी म्हणजे फक्त मी नाही, बाकी सर्वांना त्याचा फायदा होईल. ज्या लोकांचे काम सतत उन्हात असते, फिरावे लागते त्यांना, पक्षी, प्राणी सर्वांना सुकर होईल. माणसांना पण सुबुद्धी मिळो कि त्यांनी पण सुर्यबाप्पा जास्त तळपणार नाही ह्याची खबरदारी नक्की घ्यावी. झाडं टिकवावी, सिमेंटचे जंगल कमी करावे प्रयत्नपूर्वक, म्हणजे सगळ्यांचा फायदाच फायदा, नाही का?  चला तर मग लागू या कामाला. 

डा पा - खरं कारण विदर्भ

माझ्या बाबांची सरकारी नोकरी आणि त्यामुळे सततच्या बदल्या. ह्या मुळे आम्ही खूप ठिकाणी वास्तव्याला होतो. निवृत्तीच्या आधी बरीच वर्ष म्हणजे अगदी माझ्या शालेय टप्प्याच्या प्रारंभापासून मग नागपुरात राहणं झालं सलग. नागपुरतंच इतकी वर्ष का राहायला मिळालं ह्याच खरं कारण मला आज समजलं, त्या मागचं गमक, त्याची पूर्वतय्यारी, प्लांनिंग म्हणा हवं तर. नागपुरात एक खास पद्धत आहे, पंगतीत किंवा ताट वाढतांना आवर्जून तिखट वाढलं जातं पानात किंवा तिखटाचं तेल.  उदाहरणार्थ पालक किंवा मेथीची पातळ भाजी असली कि त्यावर खाते वेळी तिखटाचं तेल घेण्याची पद्धत, किंवा अलिखित नियम म्हणा हवं तर.  ह्या मागचं फारच सोप्प कारण किंवा विचार असा कि नागपूर म्हणजे प्रचंड तिखट आणि प्रत्येकाच्या चवीप्रमाणे एक भाजी होणे कठिण. म्हणून सर्वसाधारण चवीची भाजी करायची, किंवा पदार्थ करायचं आणि त्यावर ज्यांना हवं त्यांनी जास्तीच तिखट घ्यायचं, तक्रार करायची नाहीच मुळी कि "किती मिळमिळीत भाजी आहे, तिखटाचा पत्ताच नाही, काही करता येत नाही, किंवा आईने काही शिकवलंच नाही...." ई. नकोच. पानात जर यदाकदाचित वाढायचं राहील तर सर्रास मागून घेतलं जातं तिखट तेथे.  मस्त आहेत माणसं. 

आता अनेक वर्ष नागपुराबाहेर राहून देखील हि तिखट तेलाची प्रथा माझ्या घरी सुरूच आहे अविरत. पातळ भाजी करायची ठरली किंवा सरते शेवटी गॅस बंद करण्याआधी तिखटाचं तेल केलं जातंच, हाताला, जिभेला ती सवय लागली आहेच कायमची. अहाहा च. आणि त्यात आता मला माझ्या लेकीची पण साथ, मग काय विचारता. एक तिखट पार्टनर माझी, नेहेमीसाठीची. 

माझ्या ह्यांना एक तर तिखट नकोच, मसालेदार तर नाहीच नाही आणि टाकलंच तर अगदी चिमूटभर तिखट, प्रत्येक पदार्थात. आणि मी म्हणजे दुसरं टोक, प्रचंड तिखट, ठेचा, वरून तिखट नेहेमीच. काही वर्ष चिडचिड झाली, ह्यांना त्रास झाला, मग दोन वेगळे तिखट असलेले पदार्थ पाळले गेले, वेगळे काढले गेले, कधी कधी मला संपूर्ण विसर पडला कि मी माझ्या विदर्भाची आहे, तिखटावर हात असलेली. अश्या वेगवेगळ्या प्रयोगाअंती आता प्रकाश पडला कि अशी वरून तेलाची, ठेच्याची सवय माझ्या लहानपणीपासून का जडली? माझी जडण घडण नागपुरात का झाली? अगदी नकळत वयापासून? कारण मला, माझ्या हाताला हि वरून घ्यायची सवय असावी, हवं तेवढं, नावापुरतं तिखट, मसाले घालून पदार्थ करता यावे ई. अहाहा च. काय म्हणावं त्याला? कित्ती वर्षापूर्वी त्याची तय्यारी सुरु झाली आणि आपण सगळेच उगाचच म्हणतो "देव कुठे आहे? तो काय करतो?". काय करतो? बघा म्हणावं, काय नाही करत, उगाचच दोष द्यायचा "त्याला" इतकं प्लांनिंग करून, सवयी लावून, विचारपूर्वक कृती करून, सातत्याने कार्यरत राहून केवळ तुमच्या प्रत्येकाकरता. मी तर "त्याच्या" प्रेमात होतेच, पण आज प्रकर्षाने ते प्रेम कित्तीतरी प्रमाणात वाढलं. आणि फक्त हेच नाही, अजून बऱ्याच अश्या गोष्टी आता स्फटिकासामान स्पष्ट व्हायला लागल्यात.           


2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...