बुधवार, १८ ऑक्टोबर, २०२३

फॅशनच्या नावाखाली

ताज्या हवेचा, कोवळ्या ऊनाचा, सकाळच्या उत्साहाचा आणि ऊर्जेचा आस्वाद घेत आहे मी सध्या, अगदी हमखास दररोज. काही वेगळाच अनुभव आहे तो, शब्दांच्या पलिकडला असा. हे सगळं नैसर्गिक अनुभवत असतांना अनेक जण दिसतात, गप्पा होतात, हश्या पिकतो आणि दिवसाची सुरवात भन्नाट होते. दररोज घाईत बाहेर पडणारे चाकरमाने, शाळेचे विद्यार्थी, महाविद्यालयाचे तरुण तरुणी पण लगबगीत जात असतात. पिटुकल्या, नुकत्याच शाळा नावाचा प्रवास सुरु केलेले छोटे दोस्त आणि त्यांचे पालक देखील नजरेस पडतात. आमच्या सोसायटीत बऱ्याच लहान मुली आहेत. त्यांना जवळपासच्या शाळेत / छोट्या गटात टाकलंय असा माझा अंदाज आहे. शाळा आणि घर ह्याचे अंतर कमी असल्यामुळे मग दुचाकीवर सोडण्याकडे कल दिसतो. मी आपली माझ्या चार डोळ्यांनी टिपते जे सहज नजरेस पडतं ते.


काही वर्षांपासून सर्वत्र, सर्व स्थरावर आणि बहुतांशी प्रत्येकवेळी केस मोकळे सोडणे म्हणजे तरुण होणे, किंवा तरुण दिसणे किंवा काळाबरोबर चालणे हे गृहीत धरले आहे. किंबहुना तशीच कृती झालेली दिसते सदोदित. केस मग कसेही असोत, ते मोकळेच सोडायचे. अनेक तास त्याला मोकळे सोडण्यास योग्य करण्याकरता घरी किंवा दारी (वाया) घालवायचे. केस बांधले म्हणजे जुन्या काळातले किंवा आजीबाईंसारखे म्हणतात म्हणे. असो. हे झालं मोठ्या मुली, बायका, आज्या आणि सगळ्याचं जणींचं. 


शाळेत जायला सुरवात केलेल्या पिटुकल्या कळ्या ज्यांना सगळंच बहुतेक सांभाळायला कोणी ना कोणी लागतं त्या देखील शाळेत, पुन्हा एकदा वाचा मंडळी शाळेत जातांना केस मोकळे सोडून जातात? माझ्या कल्पने पल्याड आहे हे सगळं. का? कश्यासाठी? काय मिळतं हे असं करून, केस मोकळे ठेवून शाळेत? असं शाळेत जाऊ शकतो? अर्थात एक उत्तर मिळालं आहे मला. सध्या सगळेच बहुतांशी विभक्त कुटुंबात राहतात. आई आणि बाबा दोघे पूर्णवेळ कामाला घराबाहेर जातात, वेळ नसतोच कश्याच साठी. मग आई किंवा बाबांनी एक पिटुकला कंगवा फिरवला त्यांच्या आणि पिलूच्या केसांवर कि झालं, काही सेकंदांचं काम. आणि त्यांनतर दुचाकीवर तर स्वार व्हायचं आहे, मग विस्कटणारच केस तसेही, मग काय फरक पडतो? लहान मुलींचे केस खूप मऊ असतात, छानच दिसतात कसेही ठेवले तरी. सारखे मोकळे केस डोळ्यासमोर आले तर ह्या लहान मुली अभ्यास, खेळ, खाणं कसं खातं असतील हो? आमच्या वेळी म्हणायचे, केस डोळ्यावर सारखे आले तर डोळे खराब होतील, वाकडं तिकडं बघायला लागेल मुलं ई. आता तसं काही होतं नाही का? का खेळ, खाणं आणि अभ्यास करतांना सारखे केस आवरणे हे गृहीत धरलंय किंवा रुटीन झालंय? वेगळं काही किंवा चुकीचं तर नाहीच? मला गलबललं हा सातत्याने होत असलेला प्रकार बघून, माझा अर्थाअर्थी काहीही संबंध नसतांना. प्रत्येकवेळी प्रवाह पतित होणे अशक्य आहे मला. फक्त टीव्ही त आणि फक्तच नायिका किंवा सिनेतारकांचेच हवेशी संवाद साधणारे केस का बघायचे मी? हे असे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दिसत असतांना. 


माझ्या लहानपणी सर्वत्र जसे एक सारखे वातावरण होते, आता पण तसेच आहे. सर्वत्र सारखे. गेले बहुतेक ते तेलाचे, दोन वेण्यांचे, रिबिनींचे, जाडजूड गजरा  माळायचे (स्पर्धा जणू), वेण्या ओढून पळण्याचे, असे ते घनदाट केस धुणे-वाळवणे-उन्हात बसणे ई. रविवारच्या उत्सवाचे दिवस. 

ओझं

माझ्यावेळी शाळेत शिकवले होते विज्ञानाच्या संदर्भात आणि त्या नंतर बऱ्याचदा वाचनात देखील आले कि शक्यतो ज्ञानेंद्रिय/ संवेदना अवयवांवर जास्त भार द्यायचा नाही. अनेकवेळा सर्वजण छोटासा  प्रयोग करतात आणि तो खूप उपयोगी ठरतो. ज्यांना सततचा चष्मा आहे त्यांनी तो थोडावेळ काढून ठेवला कि अतिशय हलकं आणि ओझं उतरल्यासारखं वाटतं, हायसं वाटतं. हा अनुभव बहुतांशी सर्वांनीच घेतला असेल कधी ना कधी. चष्मा काढला कि फक्त कानालाच नाही तर नाकाला आणि डोळ्यांना देखील हायसं वाटतं. दररोज वापरात असल्यामुळे आणि सातत्याने कामाकडे लक्ष असल्यामुळे चष्म्याचे वजन जाणवत नाही. पण खूप वेळ काम झाल्यावर किंवा कचेरीतून घरी पोचाल्यावर, म्हणजेच त्या दिवसाचे काम संपल्यावर ते पिटुकले का होईना ओझे जाणवते निश्चित. म्हणूनच असेल कदाचित काही जण एक तर शश्त्रक्रिया करून घेतात, किंवा लेन्स आत घालून घेणे पसंद करतात शक्य असल्यास किंवा लेन्स वापरतात. म्हणजे डोळ्यांना मस्त दिसेल आणि कान + नाकावर भार येणार नाही. बरेच फ्रेम्स आता पिसासारखे हलके पण उपलब्ध आहेत, खूप महागडे पण आहेत.  असो.  


अनेकदा मी छोट्या मुलांना पालक शाळेत सोडतांना बघते. छोटे म्हणजे नुकतीच शाळा सुरु केलेले असे. दुचाकी वर स्वार होऊन जातांना नजरेस पडतात हे पालक आणि मुले. बहुतांशी सर्व मुले देखील काळा चष्मा परिधान केलेले असतात. इतक्या लहान वयात काय गरज आहे चष्म्याची? माझ्या तरी आकलनाच्या पल्याड आहे हे. दररोज ते देखील दुचाकीवर जातांना तो वयाच्या आणि चेहेऱ्याच्या मानाने अवजड चष्मा टाळणे सहज शक्य आहे. रस्त्यावरून जातांना खाच खळगे लागणार, त्यामुळे कदाचित तो चष्मा अजूनच किंचित आपटला जाणार. आणि होऊ नये पण दुखापत होण्याची शक्यता किंवा मार लागण्याची शक्यता नाकारता येणार नाहीच.  कारण नसतांना अवेळी हे उगाच ओझं कश्यासाठी मग? बघा जमल्यास टाळा. नंतर मग सगळे तज्ज्ञ डोक्याचा भुगा करतात कि नक्की कारण काय काही आजार उद्भवले तर. मूळ अनेक वर्षांपूर्वी पण पेरलेले असू शकते अश्या काही कारणांमुळे. 

आमच्या वेळी तर इतकी कडक शिस्त होती म्हणून सांगते कि शाळेत उपयोगी अश्याच गोष्टी दप्तरात किंवा स्वतः सोबत बाळगायच्या, अवांतर नाहीच. अर्थात खूप वर्ष निघून गेलीत मधे. तरी मनाला ते पटत नाही कारण ते अवास्तव आहे, निरूपयोगी आणि उपद्रवी असे आहे म्हणून.   

मंगळवार, १७ ऑक्टोबर, २०२३

हरी योगा

मी अगदी योग्य आदर राखून हे माझे विचार येथे मांडते आहे. 

हरी शिवाय तर पान देखील हलतं नाही, अशक्यच आहे ते आणि हे सर्वश्रुत देखील आहे. मग उगाच लोकं "मी केलं" असं का म्हणतात कोणास ठाऊक. असो. त्यांचं त्यांच्या बरोबर. 

तर गेली अनेक वर्षे मला स्वतःला योगा हा व्यायाम प्रकार जमला करायला. काही दिवस मी गेले क्लास ला कारण असं ऐकिवात होतं कि एकट्याला योगा करणं अशक्यच आहे, कदापि जमणे नाही, त्यामुळे वेळेचे नियोजन झाले आणि मी ग्रुप क्लास केले. हळूहळू अनेकविध गोष्टी घडत गेल्या आणि मी घरीच योगा करणं पसंद केलं कारण योगा होणं महत्वाचं होतं. जमलं एकट्याने करायला कारण तेवढा पण अवधी किंवा उसंत नव्हती विचार करायला कि मी एकटी योगा करते आहे.  तो होतोय आणि त्याचा बहुआयामी उपयोग होतो आहे हे जास्त महत्वाचे ठरले माझ्यासाठी. मी प्रत्येक योगाचा प्रकार करून बघितला, अनुभवला आणि फारच अत्यानंद पण उपभोगला त्याचा. अदृश्य परिणाम जाणवले. त्या सगळ्या प्रकारात होते अष्टांग योगा, अय्यंगार योगा, पतंजलीचे वेगळे मार्ग, क्लास मधे शिकवलेले, माझ्या गुरूंनी करून घेतलेले, खुर्चीवरचे, आणि हि यादी भली मोठी आहे. हे सगळं करतांना मी अजून एक योंग प्रकार करतंच होते पण त्याचं वेगळं नाव असेल किंवा त्याला वेगळ्या नावाने संबोधावं हे कधीच मनात आलं देखील नाही हो. माझ्या हातून सगळं घडत राहील एवढंच. पण आज अचानक पुन्हा एकदा योगसाधना करत असतांना कुठून कोणास ठाऊक एक सौंज्ञा डोळयांसमोर उभी ठाकली, "हरी योगा". दररोज गेली अनेक वर्षे माझ्या हातून घड्याळ्याच्या काट्याकडे लक्ष ठेवून, सतत कोणत्या ना कोणत्या वेळापत्रकाचा विचार डोक्यात आणि डोळ्यासमोर ठेवून हात, पाय, डोकं आणि इतर अवयव हालचाल करत होते. आज फक्त एवढंच, उद्या फक्त तेवढंच, आता पुरे, पळते आता आणि इतर असे अनेक घटक, अत्यंतिक महत्वाचे असायचे. त्यामुळे तो हरी योगा कधी सुरु व्हायचा आणि कधी, कसा संपायचा कोणास ठाऊक. पण तरी देखील समाधान आणि आनंद होताच. 


आता "दिवस तुझे हे फुलायचे झोपाळ्या वाचून झुलायचे" असं काहीसं झाल्यामुळे मी अगदी हवेत आहे. "आकाशात घिरट्या घालणे" म्हणजे नक्की काय ते मनापासून अनुभवते आहे.  पंख नसतांना उडणे सुरु आहे. कुठलेही आणि कुणाचेही वेळापत्रक मला आता साद घालत नाही आहे.  त्यामुळे मग प्रत्येक नस, अणुरेणू आणि अवयवांशी सुप्त संवाद साधत, तो ताण श्वास - उश्वासावर संपूर्ण भर देत योगसाधना उपभोगते आहे. तेव्हा "नाहरी" योगाची माहिती पटली. "स्वानुभवातून आत्मप्रचिती" म्हणतात ना ते तसं, काहीसं थोडक्यात. 


बघा म्हणजे दोन नवे योगाच्या प्रकारांना नामकरण करण्याकरता मला पंख अनुभवावे लागले, झोका झुलावा लागला आणि टाइम टेबल बाजूला सरावे लागले.  हे आधी पण सहज करता आलं असतं मला पण ते ठाऊक नव्हतं म्हणा किंवा तेवढा देखील वेळ नव्हता विचार करायला. चला तर मग तुम्ही हरी हरी करा मी नाहरी योग (no hurry yoga) अनुभवते. 

गुरुवार, १२ ऑक्टोबर, २०२३

रंगछटा

लहानपणी पासून कानावर पडलेली एक म्हण "पाणी हेच जीवन". ह्या म्हणीला, वाक्यांशाला एक सुंदर आणि गहन अर्थ आहे. अनेक पैलू आहेत ह्या वाक्याचे. मला गवसलेला नावीन्यपूर्ण अर्थ असा. 


थोडक्यात नमूद करायचं झालं तर आज माझे फारच जवळचे जिगरी दोस्त त्यांची उपस्थिती दर्शवत होते, जाणीव करून देत होते. त्यांच्या अस्तित्वाची जाणीव  हे सातत्याने करून देत होते आणि माझी कामं नेहेमी प्रमाणे गोगल गाईच्या संथ गतीने पुढे सरकत होती. प्रत्येक दिवस वेगळा आणि नाविन्याने भरपूर आणि परिपूर्ण असा असतो माझ्यासाठी.  आज देखील होता. इतका मस्त कि ज्याचं नाव ते. माझ्या मार्गावर आज एका भलत्याच ठिकाणी गाडी लावणं होतं. मग एक उंच चढाव चढावा लागला, रॅम्प हो, तदनंतर कोणासाठी तरी खास अशी भेटवस्तू घेण्याची धडपड होती. त्या ठिकाणी पोचण्याकरता १० एक पायऱ्या चढाव्या लागल्या. पट्टदिशी भेटवस्तू घेतल्यावर मग पुन्हा रॅम्प पुन्हा चढून उतरून, भलामोठा वळसा घालून गाडी गाठली. त्या नंतर पुन्हा एक मजला चढावाच लागला कारण उद्वाहक अक्का लिफ्ट बंद होती. मग काय सुरु झाले माझे घट्ट मित्र बोलायला. 


आधी दुपारी लिंबू पाणी सेवन केलं, मग पौष्टिक जेवण, त्यानंतर ताक. संध्याकाळी गवतीचहा युक्त वाफाळलेला चहा. रात्री नारळ पाणी आणि मग कडत पाण्याने शेक असा प्रवास झाला तेव्हा कुठे दोघे जरा नरमले. पाण्याचे महत्व पुन्हा एकदा नजरेस पडले आज. त्याच्या वैविध्य छटांमुळे त्याची उपयुक्तता वाढवली, वृद्धिंगत केली. हे सगळे माझ्या पायांना फार फायदेशीर ठरले आज. सर्वांना शतशः धन्यवाद. 

पाठिराखा

हा शब्द आणि त्याचा शब्दप्रयोग मी अगदी शाळेत असतांना शिकले होते. तेव्हा आमच्या मराठीच्या शिक्षिकेने सांगितलेला अर्थ म्हणजे देव. तो जो आपली सर्वांची सातत्याने रक्षण करतो. प्रेत्येकाचा लेखा जोखा त्याच्या कडे असतो आणि तो बारकाईने लक्ष ठेवतो, पाठराखण करतो. आणि हे त्रिवार सत्य आहेच. ह्याचा अनुभव मला इतकी वर्ष सलग आला आहे. पण ह्या पल्याड जाऊन अजून एक पण ह्या शब्दाचा अर्थ असू शकतो किंबहुना ह्या नवीन जमान्यात तो जन्माला येऊ शकतो हे मला ठाऊक नव्हतं. पण मला तो उमगला. "त्याची" तुलना तर कोणाशीच होऊ शकत नाही. त्याच्या ऐवजी पण कोणी नाहीच. फक्त ह्या मराठी शब्दाचा अजून एक जाणवलेला अर्थ / उपयोग आहे. एवढंच. 


पुणे हे दुचाकीचं शहर म्हणून प्रसिद्ध होतं हे म्हणणं सपशेल चुकीचं ठरेल. पुणे हे दुचाकींचे शहर आहे. आताशा काय गेली ५-१० वर्षे जेथे बघावं तेथे सगळे दुचाकी स्वार. पहाट म्हणू नका, दिवस, दुपार, संध्याकाळ आणि हो शनिवार रविवार तर उधाण येतं ह्या सर्वांना. अगदी लहान वयातील, ते मध्यम आणि जेष्ठ देखील. काही दशकांपूर्वी चाकरमाने मजल दरमजल करत कसे तरी कचेरी गाठायचे ह्या दुचाकींवर. आणि आता हजार ते लाख ह्या अश्या किमती आहेत. असो. तर अश्या ह्या भव्य दिव्य, "विनाकारण राजकारण" सायकली चालवायच्या म्हणजे त्याच्या किमतीला शोभेल असे गणवेश, खास कपडे, भारी कपडे आलेच. अर्थात हे असे कपडे अत्यावश्यक हो. बरीच कारणे आहेत त्या मागची. एक म्हणजे कल, शैली अक्का स्टाईल ई. अहो म्हणजे ते तसे कपडे घातलेच पाहिजेत. असो. त्या सदऱ्याला एक खिशा असतो, मोठ्ठा, आडवा आणि त्या खिश्याच तोंड उघडं नसतं. इलास्टिक / स्थितिस्थापक लावलं असतं. तो खिशा खास विचारपूर्वक तय्यार केलेला असतो.  म्हणजे मग त्यात माणसाचा सर्वात महत्वाचा एक अवयव ठेवण्यात येतो. मोबाईल ला व्यवस्थित पहुडता यावं म्हणून राखीव जागा असते ते.  तो आहे ह्याची सतत जाणीव व्हावी म्हणून तो अगदी पाठीला चिकटून स्थापित केला जातो. दुचाकी चालवतांना होणारे अपार कष्ट जे सुदृढता राखण्यास मदत करतात  ते क्षणोक्षणी टिपण्याचे काम हा अवयव करत असतो. त्या दिवशी ठरवलेलं किंवा कुणी निष्णात माणसाने सांगितल्या प्रमाणे लक्ष गाठलं रे गाठलं, दुचाकी वरून उतरल्या उतरल्या आधी दर्शन ह्या अवयवाचे. कदाचित त्याला घाई झाली असते हो शाबासकी द्यायची आणि दुचाकी स्वाराला ती घ्यायची.  आणि मग तेथेच सर्वत्र पसरावयाचं कि आजची घौड दौड. 


तर असा हा पाठिराखा. सदोदित सोबत असणारा असा. "जेथे जातो तेथे तू माझा सांगाती". प्रत्येक अन प्रत्येक गोष्ट स्पष्टपणे नोंद ठेवणारा. स्वतःला माहिती नाही इतकी जास्त माहिती नमूद केलेला, करत राहणारा, आतली बाहेरची सगळी कडची. आहे कि नाही गम्मत आणि नवीन अर्थ शब्दाचा. पाय व्यग्र दुचाकी चालवण्यात, हात ती रस्त्यावर नीट उभी ठेवण्यात व्यस्त, घामासाठी आणि स्टाईल म्हणून बाकी ठिकाणी ठेवता येणं अशक्य म्हणून मग ती पाठीची जागा. 

बुधवार, ११ ऑक्टोबर, २०२३

तो रिकामा रकाना

१९९५ पासून ते २०२३ पर्यंत, मधे साधारण एखाद वर्ष वगळले तर मला दोन रकाने सातत्याने भरलेले दिसायचे. रकान्यातले सगळेच खाणे नाही तरी बहुतांशी ये-जा असायचीच. किंबहुना ह्या सगळ्या खाणे आणि रकान्यांनी एक नकळत सवय लावली मला. भरलेले, बहरलेले रकाने बघायची, अनुभवायची आणि त्यामुळे शांत राहण्याची. शांत म्हणण्यापेक्षा स्थिर. एक भरोसा होता कि ते रकाने भरत राहणार आहेत. हालचाल होत राहणार आहे. ती हालचाल, किंवा त्यातला एखादा देखील रकाना कधी रिकामा होईल हे स्वप्नात देखील अनुभवलं नव्हतं. कधीच होणार नाही हि खात्री होती. तो भरोसा दांडगा होता. मला माझ्यात ती शक्ती त्याने बहाल केली होती. डोकं चालू ठेवलं होतं आणि पराकोटीची त्याची कृपा कि सर्वांपासून तसं बघितलं तर अलिप्त पण ठेवलं होतं. एक स्वच्छंद राहण्याची सवय तरी देखील हात राखून सगळे व्यवहार. 


पाच वर्षांपूर्वी एक दिवस आला आणि मार्ग बदलला. हळू हळू अनपेक्षित बदल घडत गेले, डोळे खाड्कन उघडतं गेले आणि वेगळे ना भूतो ना भविष्यती असे अनुभव, प्रसंग उभे ठाकले. माझे सर्व प्रेमळ सहपाठी, कचेरीतले, घराजवळचे, शाळेतले, इतर मित्र-मैत्रिणी सर्वतोपरी धावून आले, प्रचंड प्रोत्साहन दिलं. त्यामुळे गाडी रुळावर आली पण संथगतीने, संथगतीसोबत. ते देखील पचवायची ताकद दिली त्याने. आणि आता मात्र त्या दोन रकान्यांपैकी एक रिकामा झाला. भरेल संथगतीने ह्यात शंका नाहीच. पण रिकामा रकाना बघायची सवय नाही. रिकामा रकाना बघावा लागेल कधी मला हे माझ्या खिजगणतीत नव्हतंच. अर्थात हे पचवण्याची ताकद देखील तोच देईल ह्या वर २०० टक्के खात्री आहे. मी वाट बघत नाही पण अनेक महिन्यांपासून एक फुलाच्या पाकळी एवढी रक्कम येऊ घातली होती. माझ्या डोक्यातून निघूनच गेली होती. आज लक्षात आलं म्हणून तपासून बघितलं. हा महिना, मागचा महिना, पण नाही, रकाना रिकामा होता. पुढील महिन्यात येईल ह्याची खात्री आहे आणि आता पाकळी पेलायचीच ताकद उरली आहे. त्यामुळे येणार, सातत्य राहणार त्यात आणि गोगलगाई सारखी गती मिळणार हे निश्चित. तो पाठिशी असतांना मी कोण काळजी करणारी हो. पण ह्यातून एक लक्षात आलं कि अगदी जे आपले असतात, अगदी प्रेमाचे, जवळ पेक्षा जवळचे अश्यांचे रकाने रिकामे राहू देऊ नयेत कधी. फुलाची पाकळी द्यावी ताकद असल्यास. आज माझे आई आणि बाबा हयात असते तर त्यांनी हे निश्चित केलं असतं कुठेही गवगवा न करता, आपसूक. माझ्यात देखील त्याने ताकद द्यावी, टिकवावी म्हणजे मला कोणाला तरी रकाने भरायला मदत करता येईल, ताकदीप्रमाणे. "जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे" आज समजला आणि उमगला ह्याचा अर्थ.  

ह्याचा अर्थ असा नाही कि काहीही करून फक्त तो रकाना भरण्यासाठी आटापिटा करायचाच, नावडीचे काम करत आणि जुंपलेले राहायचे. शारीरिक आणि मानसिक क्षमते बाहेर जाऊन गाडी चालू ठेवायची. नाही. त्यामुळे रकाने अजून सपाट्याने रिकामे होऊ शकतात. त्यामुळे सजग राहा आणि योग्य ते कर्म करत राहा. 


स्वानुभवातून आत्मप्रचिती

अगदी ताजी आज सकाळची गोष्ट, अनुभव, पिटुकला पण महत्वाचा. मला आज दुपारी आणि संध्याकाळी बाहेर जायचे आहे काही कामानिमित्य. त्यामुळे सकाळची ताजी हवा खायला, मित्र मैत्रिणी, आप्तस्वकियांशी भेटायला मिळणार नाही, खाली चक्कर मारायला जाता येणार नाही हे त्रिवार सत्य होतं. इतक्यांदा खाली वर करायला आता माझे पाय मला परवानगी देत नाहीत. हरकत नाही. इतकी वर्ष दिली हे खूप झालं. बऱ्याचश्या गोष्टी मार्गी लावल्या त्याने. मग पर्याय काय. सकाळची ताजी हवा तर हवी होती. लांब श्वास, खोल श्वास आणि त्या प्रदूषण-विरहित, शुद्ध हवेशी संवाद साधायचा होता. भली मोठी खिडकी ची जाळी ची बाजू उघडी होती, मी अगदी जाळीजवळ जाऊन खात्री करून घेतली तरी हवा जाणवत नव्हती. म्हटलं काय करावं? मग ती जाळीची बाजू सताड उघडली तर जादूच झाली जणू. ती शुद्ध हवा जशी काय वाटचं पाहत होती कि कधी मी ती जाळी उघडते आणि तिला आत घेते, तिचं स्वागत करते, तिला अनुभवते, पूर्णपणे, मनसोक्त. तो जगावेगळा अनुभव घेण्यात मी इतकी गुंग झाले कि ज्याचं नाव ते. मग विचार केला काय घडलं नक्की. तेव्हा डोक्यात प्रकाश पडला. ती जाळी, इतक्या बारीक आकाराची आहे आणि मी स्वतःच आता घरी असल्यामुळे जमेल तशी साफ करत असते. माझा हात नेहेमीच फिरत असतो त्यामुळे धूळ बसत असली तरी जाळ्या नाहीत किंवा खूप धुळीने माखली नाही ती जाळी. तरी पण बघा ना, साधी हवा यायला तिने अडथळा निर्माण केला. 


थोडक्यात काय माझ्या चार डोळ्यांना ती अतिसुक्ष्म जमलेली धूळ नजरेस पडली नाही. किंवा असे धुळीचे कण देखील जाळीचे चौकोन बंद करू शकतात हे ध्यानात नाही आलं माझ्या. पण बघा जे दिसतं नाही ते उभं असतं प्रत्यक्षात. 


ह्या कथेचा गमक असा कि १. सातत्याने न चुकता जाळे, जळमटं, अतिसुक्ष्म धुळीचे कण, अडथळे दूर करा, दूर सारा. ते दूर सारण्यासाठी देखील वेळ द्या, कष्ट करा. २. हे असं नाही केलं तर तुम्ही शुध्दते पासून दूर राहाल. ३. जगावेगळे स्वानुभव मिळणार नाहीत. जे स्व-प्रगती करता, सुधृढ राहण्याकरता बहुमूल्य ठरतात.  


तर चला उठा आणि लागा कामाला पदर खोचून ताबडतोब.  

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...