शनिवार, २९ जून, २०२४

नाटकाच्या तीन घंटा


नाटक हि एक फारच वाखाणण्यासारखी कलाकृती आहे. प्रेक्षकांसमोर प्रत्यक्ष सादरीकरण म्हणजे कस लागत असणारच. प्रचंड पाठांतर तर हवेच शिवाय तो अभिनय प्रेक्षकांपर्यंत पोचवता आला पाहिजे.  त्या करता फक्त कलाकाराचं नाहीत तर अख्खी चमू अतोनात मेहेनत करतेच, नैपथ्य असो, स्टेज ची सजावट, संगीत आणि बरेच काही. असंख्य तालमी, वेशभूषा, केशभूषा, नाटकाचा विषय, तिकिटाचे दर, प्रवास आणि प्रयोगानंतर प्रयोग हे सगळं जेव्हा सादर होते प्रेक्षकांसमोर तेव्हा सगळ्यांनी अत्यादर राखलाच पाहिजे. आधीच्या काळी बरे होते. फोन नव्हते, दर्दी प्रेक्षक होते कारण बाकी खूप मनोरंजनाची साधने नव्हती आणि त्यांना तिकिटावर खर्च केलेल्या पैशांची जाणीव देखील होती. 


पण आता चित्र किंचित बदलले आहे. मोबाईल फोन अगदी सर्वांकडेच असल्यामुळे बऱ्याचदा त्याची घंटी वाजण्याची शक्यता असते. प्रेक्षक फोन घेण्याकरता, किंवा बोलण्याकरता नाट्यगृह सोडून बाहेर जाणं येणं पण करातांना दिसतात. अश्या मुळे मग तो कलाकार विचलित होऊ शकतो पेक्षा निश्चितच त्यांना त्रास होऊ शकतो. नाटकाची लय बिघडू शकते, आणि जे खरंच नाटकाचा आनंद उपभोगायला आले आहेत त्यांना पण मग त्रास होतो. हे सगळं टाळण्यासाठी कदाचित तीनदा घंटी वाजवली जाते. ती फक्त प्रेक्षांसाठीच नाही तर कलाकार आणि चमू साठी पण असते. पण खास करून प्रेक्षकांना सांगण्यासाठी. बाहेर बसलेल्या वडापाव आणि तत्सम पदार्थ तय्यार ठेवण्यासाठी पण. पहिली घंटा कदाचित "तय्यार व्हा" असं दर्शवत असणार, दुसरी म्हणजे "जागी स्थानापन्न व्हा, मोबाईल चा आवाज शांत ठेवा", तिसरीला तर पडदा उघडतोच. 


अगदी ह्याच धरतीवर जरी माझ्या लेकीने कधीही प्रत्यक्ष नाटक बघितले नाही, तिला ह्या तीन घंटा ठाऊक नाहीत तरी ती बहुतांशी दररोज तीच वापर करतेच. इतक्या वर्षांचा अनुभव कथन करते आहे मी. पहिली घंटा म्हणजे "चला पहाट झाली, उठायला पाहिजे" आणि "मी काही वेळेत उभी टाकीन तुझ्या समोर माते" असं दर्शवणारी, दुसरी जी काही वेळानी वाजते "उठायलाच हवं का? काय हे? का उठायचं? इतक्या लवकर?" असं काहीसं आणि त्यानंतर तिसरी च्या वेळी स्वारी हळुवारपणे भानावर येते, बसते / टेकते, उपयुक्त कामे आटोपते अगदी शिस्तीत, शांतपणे ई. अजूनही विद्यार्थी दशेत असल्यामुळे घाई नाही. त्यामुळे तीन घंटा अत्यानंदाने उपभोगणे सुरु आहे. दररोज आधुनिक नाटकाची सुरवात मला अनुभवायला मिळते त्या मुळे हो, मज्जा येतेच. असो, पण जेव्हा काम असते, परीक्षा असते, कुठे वेळेत जायचे असते तेव्हा घंटेची गरज पडत नाही, जबाबदारी डोकं निश्चित वर काढते आणि ताबडतोब कृती होते, हे कित्ती छान आहे बघायला. मस्तच. 

   


फवारा


सध्याच्या आधुनिक जगात प्रत्येक स्नानगृहात शॉवर किंवा फवारा असतोच. त्या फवाऱ्याचे पण अनेकविध प्रकार आहेत. हातात धरण्याचे, भिंतीवर आरूढ झालेले आणि काही तर चक्क डोक्यावर म्हणजेच छतावर विराजमान असतात. ह्या प्रत्येक फवाऱ्याचे आकार वेगवेगळे असतात, काही पिटुकले, गोल, अंडाकृती तर काही फारच भलेमोठे. अगदी धबधब्याखाली उभे आहोत असा अनुभव देणारे. 


माझे एक खास स्नेही होते आधीच्या कचेरीत काम करणारे. त्यांना कोणीही सांगितले नव्हते पण तरी देखील जागरूक नागरिक म्हणून, किंवा पाण्याचे महत्व जाणणारा व्यक्ती, एक सजग माणूस किंवा त्यांची आवड म्हणून त्यांनी एक खास संशोधन केले होते. विविध व्यक्ती, वेगवेगळे वयोगट, भिन्न ठिकाणी काम करणारे, अनुभवी किंवा नवशिखे असे अनेक. बरेच दिवस का महिने हा प्रयोग सुरु होता. त्याला आधीच्या काही संशोधन पत्रांची जोड पण मिळाली आणि मग काय बादलीत पाणी काढून का शॉवर? कोणत्या मार्गाने पाणी कमी लागते? असा काहीसा तो प्रयोग होता. त्यामुळे पण मग मला विविध पेहेलू ध्यानात आले, समजले पहिल्यांदा. 


तर माझ्या घरी पण आहे शॉवर, प्रत्येक स्नानगृहात. इतक्यातच उन्हाळा, किंचितशी पाणी टंचाई, लोकांची वाया घालवण्याची प्रवृत्ती ई. मुळे एक तर दुष्फेन जल / अफेनद पाणी येऊ लागले आमच्या नळांना. त्यामुळे का कुणास ठाऊक एक वेगळा वास होता. पाणी जात होते बऱ्याच दा, त्यामुळे साठा करून ठेवावा लागत होता. कदाचित हे माझ्या बादल्यांना समजले नाही, लक्षात आले नाही आणि आवडले तर नाहीच नाही. त्या कित्ती वर्षांपासून आहेत माझ्या सोबतीला पण ह्या वेळी अगदी खूपच झाले. त्यामुळे त्यांनी त्यांचे रंग ढंग दाखवायला सुरवात केली. बादल्यांवर काही थर साचलेले आढळले. म्हटलं काय होतंय हे? त्यांना मी अंघोळ घालायचा बेत आखला. पण त्यांची गत बघून साधी अंघोळ पुरेशी नव्हतीच मुळी. मग काय विचारात पेशल अंघोळ घातली गेली, चक्क शॉवर खाली. असं कोणी म्हटलंय कि शॉवर हा फक्त माणसांनाच उपयोगी आहे? मुळीच नाही हो. काय अत्यानंद झाला त्यांना म्हणून सांगते. अगदी कात टाकल्यासारख्या चमकू लागल्या आहेत पठ्या. किती नखरे असावेत? कमाल आहे खरंच. असो पण त्यामुळे एक वेगळा उपयोग समजला मला त्या शॉवरचा. 


माझ्या लहानपणी आमच्या घरी पोपट होते. त्यांना उन्हाळ्यात पाईपने शॉवर समान अनुभव देण्याचा मी रोज प्रयत्न करायचे आणि ते त्याचा संपूर्ण आनंद उपभोगायचे. त्या वेळी शॉवर असते तर आणखीनच सोप्पे झाले असते आणि पोपटांना पण मजा आली असती अजून. पाईपने पाणी उडवत बसावे लागले नसतेच. 

शुक्रवार, २८ जून, २०२४

एक अनोखे सौंदर्य


मी नागपूरकर किंवा नागपूर वासी असतांना माझी एक शिस्त होती. शनिवारी कचेरीतुन येतांनाच पेट्रोल भरून यायचं, म्हणजे पुढला आठवडा रांगेत थांबायला नको. सोमवार आणि गुरवार देवासाठी हार आणायचे. घरी मोठ्ठं देवघर होतं, त्यामुळे हार घातले कि पूजा संपन्न झाल्यासारखी वाटायची. घरची फुलं तर होतीच, पण हार महत्वाचे असायचेच. सण वारानुसार, ठराविक रंगांची फुले, पत्री, ई. पण हरवाल्याकडे मिळायचे हमखास. तो इतका मस्त ओळखीचा झाला होता कि त्याला पण माझी रोजनिशी पाठ झाली होती.  


आता माझ्या ह्या घरी पण खूप देव आहेत, मुर्त्या आहेत, फोटो आहेत. त्यांना मस्त स्वच्छ साफ करून, देवघर साफ करून हार घातले, फुलं वाहिली, त्यांचे आसन बदलले कि दृष्ट लागण्यासारखे देखणे दिसतात ते सर्व मला. बघत बसावसं वाटतं, खास करून तेव्हा जेव्हा मोगरा किंवा निशिगंधा विराजमान होतो. क्या बात है. जमेल तशी त्यांची जागा पण मी बदलते, म्हणजे अजून चार चांद लागतात. आज पण अगदी तसेच झाले. त्यांचे आसन बदलले मी. खास माझ्या मैत्रिणींनी जी माझी टेलर आहे तिने शिवून दिले होते मला. खूप विविध प्रकार आहेत. आज म्हटलं ते अंथरावे. का कुणास ठाऊक पण कण भर जास्त गोड दिसू लागले देवघर आज. थोडासा विचार केला तर लक्षात आले कारण. ते असे: मी नागपूरला सिम्बिओसिस च्या एका कॉलेज ची सुरवात करण्या करता गेले होते. तिथल्या वास्तव्यात खूप जणांची ओळख झाली. एक खास अगदी जवळची मैत्रीण देखील लाभली त्या थोडक्या दिवसात हो. परत येते वेळी तिने मला जगातली भारी साडी प्रेमळ  भेट आणि आठवण  म्हणून दिली. ती माहेरची साडी माझ्या साठी काय आणि कित्ती महत्वाची आहे ह्याची कोणालाच माहिती नसणार आणि कळणार पण नाही.  त्यात एक मस्त ब्लाऊज पीस होतं खरं त्या साडीला शोभेसं पण ती साडी आणि तो पीस खूप मोठा होता माझ्यासाठी. त्यामुळे मग टेलर नि तो मला परत केला मस्त झकास शिवून. आज मी तो अंथरला देवघरात आणि म्हणून शोभा प्रचंड वाढली त्या जागेची. एक वेगळी ऊर्जा निर्माण झाल्यासारखं वाटलं मला.  आणि ह्याच सगळं श्रेय माझ्या सखीला, नंदिनीला. काय मस्त साडी पसंत केली आहे, झकास रंग, शाही बाज, उठून दिसणारे त्यावरचे नक्षीकाम... अहाहा च. जणू काही ती फक्त माझ्याच साठी तय्यार केली होती विणकाम करणाऱ्याने, सगळ्या कारागिरांने. "काय वर्णू तव गूण, अल्पमती नारायण", अशी अवस्था झाली आहे माझी. "डोळ्यांचे पारणे फिटले" ह्या म्हणीचा अर्थ समजला मला अजून एकदा आज, आणि असा अर्थ मला माझ्या राहत्या घरी उमगेल हे माहित नव्हतं. असा हा माहेरचा महिमा. 

गुपचूप


माझ्या लहानपणी जसे बैठे घर होते, मोठा बगीचा होता, फुलं आणि फळांची विविध झाडे होती, शिवाय मस्त भाज्या पण लावल्या जायच्या. घराचा बगीचा सांभाळणे हा नित्यनियम होता, माझा आणि माझ्या बाबांचा. आम्हा दोघांना खूप आवड हे सर्व करण्याची. ती बाग बहरली कि काय तृप्त करून जाते, सुखावून जाते म्हणून सांगू. आणि आणखीन एक म्हणजे जागा मोठी होती, खूप वाव होता प्रयोग करत बसायला, सर्वात महत्वाचे म्हणजे बघणाऱ्यांच्या डोळ्यात जे कौतुक दिसायचं ते खूप काही सांगून जायचं. त्यामुळे मस्त जोमाने काम होत असे बगिच्यात. अर्थात तेव्हा हे असे दृश्य सर्वत्रच बघायला मिळत असे. बहुतांशी सर्वांचीच बैठी घरे त्यामुळे अंगण आणि बगीचा असायचाच.  माझ्या सासरी पण उपवाद नव्हताच. बाग मस्त होती, कारण आता ती नाही. नवीन पद्धतीने तेच घर पडून बांधल्यामुळे सगळी झाडे गेली. लावली आहेत थोडीफार पुन्हा. ह्या सगळ्या प्रकारामुळे असेल कदाचित आमच्या छोट्याश्या फ्लॅटच्या बाल्कनीत माझ्या  ह्यांना ते जुने त्यांच्या अंगणातले नंदनवन पुन्हा उभे करावेसे वाटले. त्यामुळे तेव्हा जी जी म्हणून झाडे होती ती ती सर्व आणून कुंडीत लावली. ह्यांची दिनचर्या म्हणजे  सकाळी भरपूर पोटभर व्यायाम, मग नाश्ता, पूजा, कचेरी दिवसभर. संध्याकाळी घरी आल्यावर पुन्हा काही तर तोंडात टाकायला, आणि मग जी मिटींग्स जी सरबत्ती सुरु  व्हायची ती संपण्याचे नावाचं नसायचे. त्यामुळे कित्येक वेळा रात्रीचे जेवण हे कामाच्या टेबलावरच. मी पण संपूर्ण वेळ नोकरी करणारी, मुलं आपल्या क्षेत्रात व्यग्र, आणि बाल्कनीलाच लागून ह्यांची कामाची खोली त्यामुळे त्या बागेकडे दुर्लक्षच झाले खूप म्हणजे खूपच दिवस. अगदी विद्रुप झाली होती एकंदरीत झलक. आताशा हे नाविन्यपूर्ण कामानिमित्य वेगळ्या शहरात गेले आहेत. काही महिने तेथेच मुक्काम करावा लागणार दिसतोय. मी पण स्वेच्छा निवृत्ती घेतली. मग काय विचारात, बाल्कनी आली माझ्या हातात. जी स्वच्छता मोहीम राबवली म्हणून सांगते, कि हात दुखायला लागला, ट्रीटमेंट घ्यावी लागली आणि ८ दिवस लागले. कालच माझ्या मैत्रिणी म्हणतात कश्या मला बघितल्या बघितल्या, बरं झालं गं तू बाल्कनी स्वच्छ केलीस, आता मस्त दिसते आहे. हे सगळं करते वेळी मी आधी माझ्या घरी काय काय झाडं ठेवायची, काय देऊन टाकायची हे आधी ठरवलं, जागा बघून, हालत बघून आणि अक्षरशः तुलशीबाग अवतरली होती ती बघून देखील. एक निरोप धाडला सोसायटीच्या ग्रुप वर आणि बास द्यायची ठरवलेली झाडे, कुंड्या वाटून मोकळी झाले. उरलेल्या किंवा ठेवलेल्या  झाडांना नवं संजिवनी दिली, नवीन वेगळ्या आकाराच्या, बारीक, नावीन्याने भरपूर तरुण दिसणाऱ्या कुंड्यांमधे रवानगी केली. त्यामुळे उत्कृष्ट डिझाईनर फारशी, झाडे, कुंड्या आणि संपूर्ण बाल्कनींनी जणू कात टाकली म्हणायला हरकत नाहीच. पावसाळा संपला कि तेथे मी कृत्रिम गवत पण आणून लावणार आहे. 


हे सगळं मी केलं खरं पण आता एक प्रश्न उभा ठाकला माझ्या समोर. जेव्हा हे नवीन काम संपवून येतील तेव्हा काय? ओरडा बसणार, तो कोण खाणार? मग त्यावर माझ्या डोक्यातून सुपीक कल्पना सुचली. मी ते जेव्हा येणार असे समजेल तेव्हा काही दिवसांकरता देऊन टाकलेली झाडे भाड्याने आणेन आणि सजवून ठेवीन.  बास. मग हळूच सांगून बघू काय होतंय ते? नाहीतर ज्यांना दिली ते माझ्याच आजूबाजूला आहेत, त्यांच्या कडून आणून सजवून ठेवू जसेच्या तसे पण मस्त स्वच्छ हटके पद्धतीने. आहे कि नाही मज्जा? ते येतील तेव्हा बघू. आता तर मोकळा श्वास घेताहेत सगळे. माझ्या कचेरीत जेव्हा काही कार्य असायचं तेव्हा  मी बघितलं आहे, निरीक्षण केले आहे, हवी तशी, हवी त्या आकाराची, प्रकारची झाडे आणून सजवतात. "बदल हाच स्थिर असतो" असं म्हणतात हे कित्ती खरं आहे नाही. 


माझ्या दृष्टीने झाडांना जीव असतो, त्यांना पण मुलांसारखं सांभाळावं लागतं, नुसतं पाणी घालून चालत नाही, मस्त वेळ द्यावा लागतो, गप्पा माराव्या लागतात, वाळलेली पाने, फांद्या काढून टाकाव्या लागतात आणि बरेच काही. आपल्याला असं सांभाळणं जमत नसेल तर त्या भानगडीत पडूच नये आणि काही तरी भलतं करू नयेच. कामाचे स्वरूप बघून, आवड निवड लक्षात घेऊन पावलं उचलावीत माणसाने नेहेमीच. लहानपणीची बाब वेगळी होती, त्यावेळचं वातावरण पण भिन्न स्वरूपाचं होतं, वेळ होता, जागा होती, इतक्या पद्धतीचे अनावश्यक कीड प्रकार उदयास आला नव्हता, क्रतू ठराविक असतं, त्यामुळे शक्य होतं बगीचा असणं, राखणं, सांभाळणं आणि आनंद उपभोगणं. सद्य परिस्थितीत सगळ्यांना जमेलच असे नाही. त्यामुळे प्रत्येक देऊन टाकलेल्या झाडांना क्षमस्व. पण मी त्यांच्या साठी खुश पण आहे एका अर्थी कि त्यांना प्रेम करणारी माणसे मिळाली, नवीन जागा राहायला / बागडायला लाभली, कित्ती मस्त ना? माझ्या बाल्कनीत आता मला सांभाळता येतील एवढीच मोजकी झाडे मी जपली आहेत. त्यांच्याशी गप्पा सुरु आहेत, दररोज सकाळी वेळ घालवणं आणि चहा पिणं देखील. अहाहा च. 

गुरुवार, २७ जून, २०२४

गिऱ्हाईकी


कुठलेही काम किंवा धंदा सोप्पा नाहीच. प्रत्येक ठिकाणी आव्हानं आहेतच, मग तुम्ही कितीही मोठे व्हा. प्रत्येक गिऱ्हाईक नवीन प्रेरणा आणि मागण्या घेऊन येतोच. त्याला पूर्ण करणे इतके सोप्पे नसतेच मुळी.  पण अनेक वर्षांच्या अभ्यासामुळे गिऱ्हाईक आला कि त्याची बोली भाषा, शारीरिक ठेवणं, किंवा हावभाव ह्या सर्वांवरुनच समजत असणार कि हे फक्त वेळ काढू पणा करायला आले आहेत, कि बघायला आले आहे, चाचपडायला किंवा खरंच घ्यायला. फक्त मालकंच नव्हे तर मुरलेला दुकानात काम करणारा पण ओळखत असावा नक्कीच. त्या नुसार मग कित्ती वेळ द्यायचा, काय काय दाखवायचे, कोणी दाखवायचे हे ठरत असणारच. गळ्यात मारायची खुबी जमली पाहिजेच. समोरच्याच्या स्वभावानुसार विविध क्लुप्त्या वापरून त्यांना आनंदाने हाताळणे अत्यावश्यकच आहे. सरते शेवटी अतिथी देवो भव! नाही का? माणूस ओळखता आला पाहिजे, माणूस हाताळता आलाच पाहिजे, बॉडी लँग्वेज वाचता आली पाहिजे, खर्च किती करणार आहेत ह्याचा अंदाज बांधता आला पाहिजे, किती वेळ घेणार का पट्टाकिनी घेऊन मोकळे होणार हे देखील समजले पाहिजे, पुन्हा घेतलेले परत करायला येणार का? हे दिसलं पाहिजे त्यांच्या चालीत आणि असे बरेच काही. एकंदरीत काय एका वेगळ्या प्रकारे गिऱ्हाईकी काय कशी होणार हे जाणवलं पाहिजे. कित्ती प्रकारची माणसे सांभाळतात नाही हे व्यापारी? देवा, कमाल कमाल च आहे सर्वांची. 

चाखणे


माझ्या आई कडे घरी प्रत्येक केलेला पदार्थ हा पहिल्यांदा देवा समोर ठेवला जायचाच, काहीही झालं तरी. जसा पदार्थ तय्यार झाला कि आधी त्याच्या साठी काढून ठेवायचा, नैवेद्य दाखवायचा आणि मग आपण खायला घ्यायचा. इतक्या वर्षाची जुनी सवय म्हणजे काळ्या दगडावरची पांढरी रेष होती माझ्या साठी. किंबहुना तेव्हा मला एवढंच ठाऊक होतं कि हे असंच असतं सगळीकडे, कुठलाही बदल नाहीच, कारण तो आहे, महत्वाचा आहे. मग बदल असणं शक्यच नाही. ह्या अश्या पार्श्वभूमीमधून मी जेव्हा सासरी गेले तेव्हा अगदी म्हणजे अगदी प्रत्येक गोष्ट / पदार्थ होण्याआधीच तो असंख्य वेळा चाखून बघितला जायचा.  उदाहरणार्थ, काकडीची कोशिंबीर करण्याआधी काकडी तुरट किंवा वेगळ्या चवीची आहे का हे तपासलं जायचं. मग दह्याची बारी, मीठ घातल्या घातल्या, फोडणी टाकल्यावर आणि मग कूट घालून, कोथिंबीर पेरून सगळं झालं कि पुन्हा एकदा / दोनदा कमीतकमी. बाप रे, हे काय? इतकं नवल होतं माझ्यासाठी कि ज्याचं नाव ते. हे असं का करायचं हे पण आज पर्यंत समजलं नाहीच मला. भाजी, आमटी, चटणीची पण तीच गत. फक्त पोळी, भाकरी, भात चाखून बघितला नाही जायचा. असो. तेव्हा समजलं कि जैसा देश तैसा भेस. प्रत्येक १० मैलावर म्हणे संस्कृती बदलते तशी ह्यांच्या घरी सुद्धा अशी पद्धत होती, अगदी आदरपूर्वक मी हे सांगते आहे. वावगं नाही काहीच. 


पण आज प्रकर्षाने एक गमक उमगलं. मी आधी भाजी ची चव घेतली, मग आमटीची बारी होती खरी. पण नक्की चव समजण्याकरता मधेच मी कोशिंबीर चाखून पहिली. तेव्हा कुठे आमटी काय म्हणते आहे हे प्रकर्षाने लक्षात आलं माझ्या. बघा म्हणजे घरच्या प्रत्येकाला पानात वाढण्या आधी ते चविष्ट आहे हि खात्री करण्यासाठी चाखून बघणं अत्यावश्यक आहे. "शबरीची बोरं" जशी. मस्त वाटलं मला. 


आणखीन एक. त्या काळी आधी पुरुष मंडळी तटावर बसायची आणि मग शेवटी घरच्या बायकांची बारी यायची. तो वर का पोट रिकामं ठेवायचं ना? म्हणून चवीच्या नावाने पहिल्या वाफेचे थोडेसे तोंडात टाकले तर काय बिघडलं? काहीच नाही. कच्ची काकडी सलाड म्हणून खाऊन टाकायची. म्हणजे जर ४ काकड्यांची कोशिंबीर करायची असल्यास ८ तुकडे कमीतकमी तोंडात जाऊ शकतात. मस्त आहे कि नाही हे सगळं. म्हणजे तब्बेत पण सांभाळली गेली सगळ्यांची, चविष्ट वाढलं पण गेलं आणि उशीर जर झालाच तर भूक लागून त्रास होणार नाहीच. पुरी किंवा काही गोड केलं तरी चाखून बघायला हरकत नाहीच. अगदी मनापासून आवडला मला हा अँगल. हुषार होत्या / आहेत मागील पिढीतील बायका. भन्नाटच. लगे रहो. 

मंगळवार, २५ जून, २०२४

सोय आहे म्हणून


तंत्रज्ञान फारच सुंदर पद्धतीने विकसित झाले आहे. प्रत्येक वयस्कर आई वडिलांना त्यांच्या मुलांना, नातवंडांना पाहण्याची सोय झाली आहे. व्हिडिओ कॉल मुळे अगदी सर्वांना प्रत्यक्ष भेटण्याचा आनंद उपभोगता येतो. स्पर्श नाही आहे अजून पण अनुभवता येतं हे पण खूप सुंदर आहे, एक वेगळी भावना आहे हे निश्चित. आताशा कामामुळे लांब असतात प्रियजन तेव्हा ह्या अश्या सुविधांमुळे मग जवळीक भासते, टिकते ई. सातत्याने रस्त्यावरून जातांना आताशा रस्ते दिसतंच नाहीत, तर सर्वत्र फक्त जुंपल्यासारखी माणसं. ती कशाला जुंपली असतात, किंवा कशाच्या पाठिमागे वेगाने धावत असतात हे एक गूढ आहे. जेथे बघावं तेथे, आणि जेव्हा बघावं तेव्हा फक्त पळापळ. बास. आणि नुसती पळापळ नाही तर एक-हस्ती अशी. कारण दुसरा हात हा व्यग्र असतो ना त्या मोबाईल नामक अवयवाला धरण्यासाठी. मान बोलली असती तर? असा कधी कधी मला प्रश्न पडतोच. एखादा व्यक्ती सोडला तर सगळेच रस्त्यावर गाडी चालवणाच्या आनंद घेण्यासाठी असतात का फोन वर बोलण्यासाठी हे एक गमक आहे. का? घाई, गती, खड्डे, भल्यामोठ्या आकाराच्या गाड्या, तो फोन, वाकडी मान, सतत बडबड, हॉर्न चे आवाज ..... अरेरे. काय हे दृश्य? आणि काय शिकवतो आहोत आपण लहान मुलांना? काय गरज आहे इतकं महत्वाचं आहे का बोलणं आणि अश्या पद्धतीने मल्टि टास्किंग करणं?


आताशा तर बरेचसे महानुभाव विडिओ कॉल वर बोलत बोलत गाडी चालवत असतात. नाहीतर काही तरी बघत बघत, क्रिकेट मॅच, बातम्या असं काहीसं. कशाला? तुम्ही असा आलेला फोन घेताच का? किंवा असं काही लावता का? त्या दुसऱ्या व्यक्तीला काहीच वाटतं नाही का कि रस्त्यावर महागाची, कष्टाच्या पैशानी घेतलेली गाडी चालवत असतांना बोलू नये म्हणून? जरा झोप कमी करा, जेवणाचा वेळ कमी करा आणि मग थोडक्यात बोला. रविवारी बोला, घरी असतांना बोला, गाडी बाजूला घेऊन बोला, कशाला स्वतःचा आणि दुसऱ्याचा जीव धोक्यात? कित्ती त्या कानांना त्रास द्याल? ऑटो मधे असतांना त्या गाडीचाच आधी आवाज, त्यात बाहेरचे आवाज आणि त्यात गप्पा, देवा, वाचाव बाबा. कसं ऐकू येतं ? आणि काय मजा येते कोणास ठाऊक? तंत्रज्ञानाने काही शोध लावले आहेत ते असे कधीही कुठेही वापरायला नाहीच मुळी. उपलब्ध आहे म्हणजे वापरलंच पाहिजे सतत असे नाही? काय दाखवू इच्छिता हे असं वागून? असे एकावेळी अनेक कामे / बिनकामाची कामे नकोत मुळी. तंत्रज्ञानाचा योग्य वापर होऊ द्या. शिस्त लावा स्वतःला वेळेची, बोलायची, सोशल मीडिया वापरायची, व्यायामाची... जितकी जास्त वेळ तुम्ही आताशा देता स्क्रीन ला तेवढा व्यायाम होतो का जास्त? नाही ना? मग? 

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...