अनेक दिग्गज कवींनी हा प्रश्न विचारला आहे / मांडला आहे त्यांच्या काव्यातून / लेखणीतून "प्रेम म्हणजे नक्की काय?", ते प्रत्यक्ष का अप्रत्यक्ष पणे दिसतं / नजरेस पडतं हे त्या बघणाऱ्यालाच किंवा अनुभवणाऱ्यालाच ठाऊक. आज मला एका प्रेमाची नव्याने अनुभूती आली आणि ती इतकी प्रकर्षाने जाणवली कि मी लेखणी उचलली आणि माझ्या भावना मांडायच्या ठरवल्याचं.
तर त्याच असं झालं कि आज मला माझ्या खानसाम्याने फोन केला कि आज मी तुम्हाला दहीभात पाठवला तर चालेल का? त्या सोबत साधा भात पण देतो ई. म्हटलं दहीभात असेल तर साधा नको आणि शिवाय दहीभात पण थोड्या प्रमाणात पाठव, जास्त नको. पडत्या फळाची आज्ञा जशी त्याने ताबडतोब डब्बा भरून पाठवला. मी आणि माझी एक सखी मिळून आज डब्बा खायला सुरवात केली आणि त्या दहिभाताची जगावेगळी चव चाखून अवाक झालो. आज पर्यंत असंख्य वेळा मी स्वतः दहीभात केला आहे आणि खाल्ला देखील पण आज काही रसायनचं वेगळं होत. तो इतका अप्रतिम चविष्ट झाला होता कि ते शब्दात गुंफण म्हणजे अशक्य आणि अपमानचं जणू. तो आंबेमोहोराचा भन्नाट सुगंध, दह्याचा आगळावेगळा गोडवा, कढीपत्त्याची / फोडणीची खुसखुशीत चव आणि लाल मिरचीचा लालचुटुक ठसकेबाज देखावा. ते साग्रसंगीत दृश्यच इतकं विलोभिनीय होत कि ताबडतोब फडशा पडलाच त्याचा. पण प्रत्येक घासागणिक भातशेतीचा शेतकरी, ती गाय / म्हैस जिच्या दुधाचं ते दही होत, तो इतर मसाला, दहीभात तय्यार करणारे हात ई. च्या कष्टाला आणि आशिर्वादाला नतमस्तक झालेच न-कळत. प्रत्येक घटक जादुई मायेने घडला होता त्यामुळे संमिश्रित प्रेम दृश्य झालं होत. सर्वांना मनापासून धन्यवाद आणि संपूर्ण जीवसृष्टीला असेच प्रेममय पदार्थ नेहेमी चाखायला मिळो हि प्रार्थना. अप्रत्यक्ष्य प्रेमाची परिभाषा नव्याने कळली / उमगली आणि चाखता पण आली आज. माझ्या सारखी भाग्यवान मीच, नाही का मंडळी?
मंगळवार, ७ डिसेंबर, २०२१
प्रेम
रंगीत तालीम
माझं शालेय शिक्षण हे मराठमोळ्या वातावरणात झालं आणि घरी तर इंग्लिश भाषेचा शिरकाव पण झाला नव्हता. असो.
त्यावेळी माझे शाळेचे आदरणीय शिक्षक अतिशय मेहेनत घेऊन विषय तर शिकवायचेच परंतु वैविध्य उपक्रमातून कळत न-कळत माणूस घडवायचे. असंख्य उपक्रम असायचे शाळेत, वर्षाच्या शेवटी गॅदरिंग असायचं, त्यात विविध कलागुण सादर होत असतं. प्रेक्षकांसमोर संपूर्ण कार्यक्रम सादर करण्या आधी त्याची रंगीत तालीम घेतली जात असे. त्यामुळे खूप फायदा व्हायचा, विद्यार्थ्यांना, प्रेक्षकांना, स्टेज ज्यांनी सजवलं आहे त्यांना आणि एक प्रचंड मोठा उत्साह / जोश / आत्मविश्वास निर्माण व्हायचा तो वेगळाच. काही दिवसांपूर्वी अशीच विस्मृतीत गेलेली रंगीत तालीम पुन्हा अनुभवयाला मिळाली आणि हा लेख लिहिता आला. तर त्याच असं झालं कि मला एक अनोखे वोर्कशॉप घेण्याची संधी प्राप्त झाली पण हातात कचेरीच्या कामामुळे अजिबात शांत असा वेळ नव्हता. त्यामुळे माझ्या सोबत संशोधन करत असलेल्या दोन विद्यार्थिनींना मी विनंती केली आणि त्यांनी पण अगदी मनापासून मदत केली देखील त्यांच्या व्यस्त दिवसात देखील. त्यातल्या त्यात एक जण तर इतक्या उत्साहाने आणि हिरीरीने उतरली त्यात आणि वेळेआधी सगळी माहिती मिळवून दिली आणि शिवाय तिच्या घरी घेऊन जाऊन व्यवस्थित वेळ देऊन रंगीत तालीम पण करून घेतली. अहाहा. ह्यालाच प्रेम असे नाव. पुन्हा एकदा रंगीत तालीम कित्ती म्हणजे कित्ती उपयोगी ठरते हे प्रकर्षाने जाणवलं. त्यामुळे उत्साह तर आलाच पण एक वेगळा प्रचंड कॉन्फिडन्स निर्माण झाला आणि ४१ वैविध्य स्तरावरच्या दिग्गज अधिकाऱ्यांना "कृत्रिम बुद्धिमत्ता" चे फायदे त्यांच्या क्षेत्रात काय आहेत ह्या विषयी उस्फुर्तपणे समजावून सांगता आलं. अहाहा, फारच जगावेगळा अनुभव होता तो. मला मज्जा आली. माझी लेक मला लहान असून सतत सांगते "मम्मा तुला आवडतंय ना मग बिनधास्त कर". असेच अनेक अजून छोटेखानी वोर्कशॉप्स करायला मला आवडेल नक्की. नजीकच्या भविष्य काळात संधी मिळेल आणि अजून बरेच जण माझ्या सारखे आनंद घेतील त्या वर्गाचा हि खात्री. आज एका स्थानिक वृत्तपत्रात ह्या वोर्कशॉप विषयी छापून आलं त्यामुळे माझा आनंद गगनात मावेनासा झाला. रंगीत तालीम चे अनोखे रंग असेच उधळत राहोत नेहेमीच.
सोमवार, ६ डिसेंबर, २०२१
गणवेश
मला नक्की आणि पक्की खात्री आहे कि माझ्या सारखेच बहुतेक सगळे विचार करत असणार. शाळेत असतांना कॉलेज ला जायचं एक महत्वपूर्ण कारण म्हणजे गणवेश पासून सुटकारा. रंगीबेरंगी कपडे आपल्या आवडीचे घालणं म्हणजे कॉलेज असं होत माझ्या दुनियेत. नाण्याला नेहेमीच दोन बाजु असतात हे क्षणभर विस्मृतीत गेलं होत माझ्या. आवडते कपडे घालण्याची मुभा मिळणं म्हणजे पण भलं मोठं काम होत. रंगसंगती बघा, काय सध्या फॅशन मधे आहे त्याकडे लक्ष ठेवा, दररोज स्वतः काय घालतोय ते ध्यानात ठेवा, रंग योग्य आहेत का नाही ते बघा आणि बरेच काही, जसे कि त्यांची शिस्तीत देखरेख ई. दर दिवशी काय परिधान करायचं हाच मोठा यक्ष प्रश्न. कितीही जोडी कपडे असले तरी देखील आपल्या कडे काहीच नाही हि भावना. पण कॉलेज हे बाकी इतर कारणांसाठी आवश्यक आहेच, त्यामुळे दररोजचा पोशाख, फॅशन आणि बाकी इतर गोष्टी आत्मसात केल्या / झाल्या ह्या अनेक वर्षात. तसेच मग नोकरी सुरु झाली आणि शिक्षकी पेशात गणवेश नसल्यामुळे पुन्हा रंगांच्या दुनियेचे नव्याने ओळख झाली आणि ती अनेक वर्ष टिकली देखील. आज कचेरीत आले तेव्हा आमच्या दोन मजल्यावर नेमलेल्या गार्ड ताई दिसल्या आणि त्यांचे डोळे सहज वाजता आले. आमच्या कडे गार्ड ताईंना गणवेश घालावा लागतो रोज. त्यांचे डोळे मला असं सांगत होते कि "काय ना सगळ्या मॅडम आणि सरांना दररोज वैविध्य रंगांचे / तर्हेचे कपडे घालून ऑफिस ला यायला मिळत, आम्हाला नाही". आणि कदाचित त्याच मुळे असेल त्या सगळ्या गार्ड ताई फार उत्साहाने त्यांचे फोटो मोबाईल वर काढलेले मला आणि बाकी सगळ्यांना दाखवतात, त्या विषयी सांगतात / बोलतात आणि त्या प्रत्येक फोटोत त्या फारच उत्साहाने तय्यार झालेल्या आढळतात. कारण ते त्यांना अगदीच कधीतरी करायला मिळतं, संपूर्ण आठवडा काम असल्यामुळे किंवा अनेक वेगवेगळ्या वेळेच्या ड्युटीज पण असतात. आणि त्यांच्या गार्ड च्या ड्युटी मुळे त्यांचा शाळेत गणवेश ते अजूनही गणवेश हा प्रवास लांबला आहे, किंबहुना सुरूच आहे त्यामुळे असेल कदाचित. गणवेश रोज परिधान करायचा म्हणजे वैविध्य फॅशन च्या गोष्टींवर खर्च वाचतो, रोज काय घालायचं ह्या वर शक्ती खर्च होत नाही, पण कधी कधी कंटाळा येतो हे मात्र आहे. ह्यालाच पॅकेज म्हणतात, आवडो अथवा ना आवडो. माझे बाबा नेहेमी म्हणायचे चहा ची पावडर विकत घेतांना पुडा पण विकत घ्यावा लागतोच इच्छा असो नसो, पॅकेज शेवटी, नाही का? गणवेश ज्यांना घालावा लागतो कामावर त्यांचं कपाट मात्र फार फार खुश राहत असेल, कारण त्याला मोकळा श्वास घेता येत असणार, प्रचंड कपड्याच्या व्हरायटी नि ओसंडून वाहत नसणार.
बुधवार, १ डिसेंबर, २०२१
अलार्म अक्का गजर
"अलार्म काका सोसायटी सोडून गेले का..." हि जाहिरात
आठवते का मंडळी. माझ्या घरी पण माझे बाबा माझे अलार्म होते. सांगायची गरजच
पडायची नाही वेळेच्या आत यायचे उठवायला स्वतः ची झोप मोड करून, सतत अनेक
वर्ष.
"कोंबडा आरवणे" हा एक अलार्म चा जगप्रसिद्ध प्रकार होता
जुन्या काळी, कारण त्यावेळी आधुनिक घड्याळं अस्तित्वातच नव्हती. त्यामुळे
बऱ्याच वेळी अनेकांची फजिती देखील झालेली बघितली / अनुभवली आहे मी. आमच्या
एका काकांना शेजारच्यांनी पाळलेला कोंबडा आरवला कि उठायची आणि मग फिरायला
जायची सवय होती. एक दिवशी नेहेमीच्या सवयी प्रमाणे आरवला कोंबडा, काका
उठले, फिरायला गेले पण त्यांना काही तरी वेगळंच वाटतं होत सतत. पण अहो
विश्वास त्या कोंबड्यावर. त्या दिवशी तो कोंबडा पहाटे च्या ऐवजी मध्य
रात्री आरवला होता आणि अंधारातच काका फिरून आले देखील.
काही जणांना
वर्षानुवर्षांची एका ठराविक वेळेला उठायची इतकी सवय झाली असते कि त्यांच
शारीरिक + मानसिक घड्याळच त्यांना आपोआप उठवत दररोज. त्यामुळे इतर कुठल्या
गजराची गरजच पडत नाही.
घरच्या कामाचे, शेजारच्या घरातील
स्वयंपाकाचे, रस्त्याच्या / शाळेच्या / देवळाच्या आजूबाजूला घर असेल तर
त्याचे, असे अनेकविध आवाज म्हणजे बऱ्याच जणांचा गजर असतो.
गजर लावून बंद करून पुन्हा लोणणारे अनेक व्यक्तिमत्व देखील असतात, मी त्यातलीच एक बरं का.
अभ्यासासाठी,
व्यायामासाठी, इतर कामांसाठी ठरवून गजर लावला जातो. तो वाजला रे वाजला कि
ताबडतोब उठता यावं आणि अभ्यासाला जोमाने बसता यावं म्हणून माझी एक अत्यंत
प्रिय मैत्रीण तिच्या मैत्रिणीच्या घरी जायची अभ्यासाला. ज्या खोलीत
झोपायच्या त्या खोलीत आणि दूरच्या दुसऱ्या खोलीत देखील त्याच वेळेचा गजर
लावायचा दररोज. म्हणजे उठून दूर चालत गेलं कि झोप मोड होईल हि अपेक्षा.
अर्थात तसं कधीच झालं नाही, झोप आपल्या जागी, गजर त्याच्या आणि माझ्या
मैत्रिणी जैसे थे.
माझे बाबा नेहेमी म्हणायचे "झाडा सारखं व्हावं,
देत राहावं...". अलार्म पण कुठेही कमी नाही हं मंडळी, चावी दिली, वेळ ठरवली
कि त्या वेळी होत्याच नव्हतं होवो तो वाजणारच, उठवणाराच, त्याच काम तो
करणारच, कधीच त्याला वाटत नसेल का थोडं लोळावं, आळस करावा, १० मिनिटांनी
वाजाव, नाही वाजलं तर? पण कदापी नाही हो, नेहेमी त्याच ठोक्यावर शिस्तीत
वाजणार म्हणजे वाजणारच. तो त्याच काम करून मोकळा होतो, अपेक्षा ठेवत नाही,
मी उठवलं हा अभिमान तर नाहीच, मी नाही उठवलं तर ह्यांचं काय होईल असा विचार
देखील त्याला कधीच शिवत नाही. त्यामुळे "अलार्म सारखं व्हावं आणि ठोका
कधीच चुकवू नये".
अस्तर
अगदी अगदी काल पर्यंत मला अस्तर ह्या शब्दाची ओळख फक्त एवढीच होती कि जरीच्या ब्लॉउज च्या कपड्याला, किंवा सुळसुळीत ड्रेस च्या कपड्याला आतून पातळ लावलेलं कापड. बास. त्या व्यतिरिक्त काही माहित नव्हतं. आणि त्या मागचं शास्त्रीय कारण म्हणजे भरजरी किंवा कॉटन सोडून बाकी सगळ्या कपड्यांना शिवण बसत नाही जर अस्तर चा आधार दिला नाही तर. किंवा एखाद कापड फारच पातळ असेल तरी देखील एक जोड असावी मजबूत शिलाई साठी म्हणून अस्तर. अस्तर अगदीच तलमली, मऊ, पातळ कापडाचं असतं जेणे करून तो ड्रेस किंवा ब्लाउज परिधान केल्यावर टोचू नये आणि एक समाधान वाटावं म्हणून, ते भरजरी महागडं कापड जास्त भारदस्त दिसावं आणि टिकावं म्हणून देखील.
अजुन एक महत्वाचा ड्रेस जो घरी सहसा वापरला जातो तो म्हणजे गाऊन / कप्तान. बहुतांशी असं आढळलंय कि गाऊन चा परकर हा एक खास सोबती असतो. पहिल्यांदाच बघण्यात आलं कि गाऊन ला पण अस्तर लावलंय. कदाचित रात्रभर मऊ अस्तराच्या सानिध्यात स्वस्थ झोप लागावी म्हणून असेल, किंवा फक्त एक हलका फुलका गाऊन चढवला कि झालं, अश्या सोयीसाठी असेल. आधी नाही तर फार मोठी यादी असेल हा ड्रेस घालण्या आधी, आणि बऱ्याच घरी दररोज चा मामला. परकर आणि गाऊन हे दोन कपडे वेगळे शोधा, रंगसंगती लक्षात घ्या, घाला, धुवा, बांधा ई. कारणं माहित नाहीत पण मला भावली ती कल्पना. सध्या सगळंच रेड़ीमेड उपलब्ध आहे मग हे का नाही?
ज्याला हि अतिशय उपयुक्त आणि सुबक सुंदर कल्पना सुचली तो कदाचित ह्या अस्तरासारखा असेल, अदृश्य अस्तित्व असलेला, भक्कम साथ देणारा / जोडणारा, हळुवार मऊ स्पर्शाची जाणीव करून देणारा आणि जो बोचरा नाहीच असा. अहाहा. फार पटला मला त्याचा / तिचा स्वभाव आणि कल्पना. असेच जर सगळे जगले तर जग कित्ती सुंदर होईल ना सर्वत्र. साधी कल्पना केली तरी अस्तराचा अनन्य साधारण महत्व जाणवलं प्रकर्षाने. चला तर मग अस्तर रुपी वास्तव ठेवण्याचा प्रयत्न करू या नेहेमीच.
आहे मनोहर तरी
"And Pine for what is not" हे इंग्लिश मधील समानार्थी वाक्य आहे " आहे मनोहर तरी" च, असेल. माझ्या, फक्त माझ्या दृष्टीने ह्या मराठी ओळीचा अर्थ असा आहे कि व्यावसायिक म्हणून एखादा व्यक्ती अतिशय प्रसिद्ध असतो, हवा-हवासा असतो, वेगळी छाप असते पण तोच व्यक्ती कदाचित स्वतःच्या कुटुंबासोबत अगदी वेगळा असू शकतो, कधी कधी असतो देखील. किंवा उलट पण सहज शक्य आहे. सरतेशेवटी व्यक्ती तितक्या प्रकृती, नाही का?
काही कुटुंबामधे मनोहर नावाचा पदार्थ होतो, किंवा त्या पदार्थाचं टोपणनाव मनोहर असं आहे. मनोहर म्हणजे पोळीचा चिवडा, कुटके, तुकडे, आणि बरीच नाव आहेत. मनोहर हे नाव का पडलं असेल, त्यावर सहज सुचलेलं मांडते आहे. पोळीच्या चिवड्याचा परमानंद उपभोगायचा असेल तर आणि मुळात तो शिळ्या पोळ्यांचाच होतो, आदल्या दिवशी च्या उरलेल्या किंवा सकाळच्या उरलेल्या. पोळ्या शिळ्या नसतील तर बारीक तुकडे किंवा चुरा करणं अवघडच. आणि शिवाय फोडणी झाली कि मोकळा पण नरम देखील झाला पाहिजे ना. त्या मुळेच सरते शेवटी ज्यांना आवडतो त्यांना चविष्ट लागत असला तरी तो पदार्थ असतो शिळ्या, उरलेल्याच, कुस्करलेल्याच पोळ्यांचाच, नाही का?. झणझणीत फोडणी, साग्रसंगीत कांदे, दही / लिंबू, साखर, भरपूर कोथिंबीर, आणि चिमूटभर प्रेम हे मसाले मिसळले कि जगावेगळी चव येते, पण........ अगदी चपराख मनोहर सारखं, दोन चेहेरे, लपवा छपवी पण हवी हवी शी.
एकाद्या बड्या संस्थेत काम करणं, एखाद्या दिग्गज कुटुंबात राहणं, उच्च जागी स्थित असलेल्या माणसासोबत काम करणं ई. काहीही किंवा कुठेही "आहे मनोहर तरी" हा अनुभव येतो बरेचदा. अर्थात "दुरून डोंगर साजरे" हे म्हण हि तितकीच योग्य आहे. प्रत्येक माणसाचा दृष्टिकोन वेगळा असतो, त्याने परिधान केलेला चष्मा फक्त त्याचा असतो, त्यामुळे त्यातून त्याला जे जग बघायला मिळत, किंबहुना तो बघू इच्छितो तसंच ते दिसत. त्यामुळे कोणीच शंभर टक्के नेहेमीच बरोबर / योग्य नसतं, आपण बघू / घेऊ तसं आहे. त्यामुळे योग्य चष्मा निवडा आणि निवडत राहा. "घराचा पौष्टिक नाश्ता, आईच्या हातचा" vs "शिळ्या पोळ्यांचे तुकडे" काय निवडायचं ते ठरवा.
आधुनिक लग्न प्रथा
तुम्हाला माहित आहे का मंडळी एक छोटेखानी चॉकलेट आहे आणि ते खाल्याने म्हणे आपण आपोआप हवेत उंच उचलले जातो, अशी जाहिरात आहे. अर्थातच त्या जाहिराती मधे लग्न सोहोळा सुरु असतो. नेहेमी प्रमाणे नवरदेवाला त्याची मित्र मंडळी वरमाला घालायच्या वेळी उंच उचलतात आणि मुलगी चॉकलेट तोंडात टाकताच मुलाच्या वरचढ जाते. थोड्याफार प्रमाणात असं दृश्य अनेक लग्नात प्रत्यक्ष्य देखील बघायला, अनुभवायला मिळतं गेली अनेक वर्षे. असो तो एक गंमतीचा भाग आहे, उत्सुकता असते, एक वेगळीच ऊर्जा असते मित्राच्या लग्नात, थोडीशी ताकद प्रदर्शीत करता येते ई. URL of advertisement : https://youtu.be/pWKAVvMHId4
लग्नाच्या आधीचा टप्पा म्हणजे साखरपुडा / साक्षगंध थोडक्यात तरुण पिढी मागणी घालते तो. माझ्या मते बाहेरील देशातील एक नवीन पद्धत आली आहे येथे, लग्नाची मागणी घालतांना मुलाने गुढग्यावर बसायचं, अंगठी एका विशिष्ट पद्धतीने सरप्राईज अशी द्यायची ई.
आज सहज मला सोबत असावी म्हणून काम करता करता टीव्ही सुरु ठेवला आणि मराठी वाहिनी सुरु होती, कुठली हे आता मला आठवत नाही. लॅपटॉप वर काम करता करता सहज फोन आला आणि टीव्ही कडे लक्ष गेलं. आणि माझं मलाच सुचेना, एक भन्नाट दृश्य बघितलं मी. मला माझ्याच डोळ्यांवर विश्वास बसला नाही. म्हणून सगळं बाजूला टाकून टीव्ही कडेच बघत राहिले आणि काही मिनिटातच ती जाहिरात पुन्हा बघायला मिळाली. अहो त्यात एक लग्नाचा प्रसंग दर्शवला आहे आणि त्यात वरमाला / अंतरपाट ई. नंतर चक्क नवरा मुलगा गुढग्यावर बसतो आणि नवरी मुलगी त्याच्या गळ्यात हार घालते. अहाहा. "सुख म्हणजे नक्की काय असतं" ह्या सिरीयल ची ती जाहिरात होती. माझ्या कल्पने पलिकडलं होत ते दृश्य, साधं पण वेगळं, मला प्रचंड भावलं. ज्याला हे सुचलं त्याला सलाम. एकमेकांना हार घालतांना उंच उचलायची मजा औरच पण गडबड होण्याची शक्यता नाकारता येत नाही, आणि त्यात चढाओढ देखील. पण ह्या जाहिरातीत दाखवल्या प्रमाणे एक शांत, सरप्राईज देणारी, कुठल्याही प्रकारची दुसऱ्याची मदत न घेता, चढाओढ च प्रश्न न उद्भवु देता आणि आधुनिक मागणी घालण्याची फॅशन जपली आहे. अहाहा. "काय वर्णू तव गूण अल्पमती नारायण" असं झालयं थोडक्यात माझं आज. प्रचंड इच्छा आहे त्या प्रसंगा बद्दल ज्याला सुचलं त्याला भेटायची. बघू या योग कधी येतो ते.
नवीन पिढी अश्याच प्रथा आत्मसात करू दे आणि उत्कृष्ट पद्धतीने जुन्या-नव्याचा मेळ सांभाळू दे म्हणजे झालं.
https://youtu.be/WzfXiN0EBwI
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...
-
मी अनेक वर्षे एकाच संस्थेमध्ये कार्यरत होते. अखेरीस, मला एका नवीन इंजिनिअरिंग महाविद्यालयाची सुरुवात करण्यामध्ये हातभार लावण्याची सुवर्णसंधी...
-
माझ्या मुलाने भारतातील सर्वात आव्हानात्मक अभ्यासक्रम निवडल्यापासून, मला विद्यार्थ्यांसमोरील अडचणींची जाणीव झाली. मला खात्री आहे की अशा अडचणी...
-
परवा एक फोन आला. लहानपणापासून ओळख असलेली व्यक्ती. घरच्यांसारखीच. गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता त्यांनी अचानक विचारलं: “अजूनही लेक्चररच आह...