कसं सगळं जुळून येतं बघा, योगायोग का अजून काही हे माहित नाही मला, पण झालयं खरं असं. सध्या माझी सुट्टी सुरु आहे, अर्थात ढिगभर कामं असल्यामुळे फक्त ऑफिसात जाणं होतं नाही आहे, घरून काम चालूच आहे. असो. बरोबर माझ्या स्वयंपाकाच्या मावशींनी सुट्टी घेतली, गावाला गेल्या पण अर्थात माझी सोय करून गेल्या आहेत, दुसरी बदलीची बाई देऊन. नवीन मावशींना परत सगळं समजावून सांगतांना १०८ कोटी देव आठवतात हो. आणि दररोज समजावून सांगून देखील काहीतरी भलतं करून ठेवतात ते वेगळच. म्हणजे माझी मेहेनत संपूर्ण वाया, "पालथ्या घड्यावर पाणी", कदाचित मलाच समजावून सांगता येत नाही असा माझा गैरसमज होता जो आज दूर झाला. त्याचं असं झालं कि आज नवीन मावशींनी भाजी, कांदा आणि सगळंच फार जाडं-भरडं चिरलं, त्यामुळे मज्जा नाही आली खातांना. त्यांना म्हटलं तर उत्तर अगदी ओठांवर तय्यारच होतं. तुमच्याकडचा चाकू बेक्कार आहे, त्यामुळे असं झालं. "नाचता येईना अंगण वाकडे". आणि ह्या स्वयंपाक ह्या व्यवसायात अनेक वर्ष आहेत, देवा, महद आश्चर्यच वाटलं मला.
मग माझ्या डोक्यात भन्नाट कल्पना सुचली, कारण "भारत हा एक अंडर कॅन्स्ट्रुक्शन देश आहे" त्यामुळे सतत आजूबाजूला भरपूर कामं दिसतात होतांना, आणि सगळे कामगार त्यांचे अवजार घेऊन येतात कामाला कारण रिकाम्या प्लॉट वर घरं बांधायची म्हणजे मालकाकडे कशी असणार इतकी मोठी आणि व्यावसायिक अवजारं / हत्यारं वगैरे. अगदी तस्सेच जर माझ्या घराचा चाकू बेक्कार आहे हे आता ह्या नवीन मावशींना समजलं आहे गेले दोन दिवस मग त्यांनी त्यांचा हात बसलेला घरून आणावा चाकू आणि इतर लागणाऱ्या गोष्टी आणि भन्नाट स्वयंपाक करून दाखवावा, बास. सगळेच खुश. आज संध्याकाळी सांगते त्यांना, चाकूला दोश देत बसू नका, मार्ग काढा आणि आवडीने स्वयंपाक करा. कारण माझ्या कडे एक नाही, दोन नाही तर चक्क सहा चाकूंचा अख्खा सेट आहे, एखादा चालत नसेल ह्या मावशींकडून, बाकी?
ह्या छोट्याश्या प्रसंगातून हेच नक्की शिकण्यासारखं आहे कि दोष काढू नका, तक्रार करण्यात वेळ घालवण्यापेक्षा आहे त्यात मस्त कामं करून दाखवा, स्वतः जगावेगळा अनुभव घ्या आणि पुढे मार्गक्रमण करत राहा. कुठलेही काम मनापासून केले, आनंदाने केले तर ते नजरेस पडते सर्वांच्याच, चवीवरून, पदार्थाच्या रंग-रुपावरुन ई.
गुरुवार, ५ मे, २०२२
खुद का बंदर वही नचाये
आधुनिक आंगण
तंत्रज्ञानाच्या मदतीमुळे माझ्या सारख्या नोकरी करणाऱ्या आईचं आणि बाकीच्या सर्वांचं जीवन फारच सुकर झालं आहे. घरची मुलं शाळा कॉलेज साठी बाहेर पडली गाडी घेऊन कि व्यवस्थित घरबसल्या रस्त्याबद्दल, गर्दी बद्दल, गती बद्दल आणि पोचल्या नंतर ची सगळी इतंभूत माहिती मिळते, दिसते आणि बघता देखील येते. त्यामुळेच सध्या माझी लेक कॉलेज मधून घरी यायला निघाली रे निघाली कि मी घरी ठरल्या प्रमाणे तिच्या साठी काही तरी खास तय्यार करायला घेते तिच्या गाडी चालवण्याकडे ऑनलाईन लक्ष ठेवत ठेवत आणि ती पोचता क्षणी गोष्टी तय्यार. मलाच खूप खूप मज्जा येते हे असं सगळं साग्रसंगीत करायला. शिवाय सगळं करून दारं उघडून लिफ्टपाशी जाऊन उभी देखील राहते. ते देखील मला मनापासून प्रिय आहे, कारण
१. नोकरी करणारी आई म्हटली कि दररोजच ह्या मुलांना स्वतःच घर / कुलूप उघडून यावं लागतं, मग काही दिवस मी घरी असतांना त्यांना एका कामापासून सुट्टी का नाही द्यायची? आणि मला माहिती आहे कि दमून-भागून आल्यावर पुन्हा किल्ली काढा दप्तरातून / ब्यागेतून आणि मग दार उघडा ई. नक्को वाटतं,
२. माझे बाबा असे करायचे नेहेमीच, आमचं घर, त्यापुढे भलंमोठं आंगण, आणि त्यापुढे रस्ता होता. ते त्या रस्त्यावर येरझाऱ्या घालत उभे असायचे फक्त / केवळ माझ्या साठी, माझी वाट बघत, मग मधेच आईला हाक मारायचे, "अगं अजून कशी नाही आली हि?" सतत घड्याळ बघत... ई. मी दृष्टीपथात पडेस्तोवर दरवेळी हे असं चालू असायचंच त्यांच. कित्तीदा सांगितलं पण नाही ऐकायचे ते.
प्रत्येक सेमिस्टर नंतर आम्हाला थोडे दिवस सुट्टी घ्यायला मिळते तेव्हा आवर्जून माझ्या मुलांना, सध्या लेकीला हे माझे वेगळेपण अनुभवायला मिळतेच. पहिल्या दिवशी म्हणते कशी "मला अगदी खात्री होती मम्मा कि तू लिफ्ट पाशी माझी वाट बघत उभी असणारच, मग मी कधी का येईना, आणि आता काही तरी खास तय्यार ठेवलं असशीलच माझ्या साठी आणि ते देखील एक गोष्ट नाही दोन तरी किमान". मला माझ्यापेक्षा जास्त ओळखणारी अशी माझी हि लेक.
माझे बाबा स्थापत्य अभियंता अक्का सिव्हिल इंजिनीअर असल्यामुळे मला, माझ्या मित्र मैत्रिणींना अनेकदा त्यांनी काम केलेल्या वैविध्य प्रोजेक्ट्स बद्दल सांगत असायचे. त्या काळी स्वतःची बैठी घरं भारतात आणि नागपुरात जेथे आम्ही राहत होतो तेथे प्रसिद्ध होती. पण बाबांचं वाचन भरपूर असल्यामुळे ते आम्हाला सतत सांगायचे कि फ्लॅट नावाची आधुनिक संस्कृती येणार, "चाळीचा मोठा प्रशस्त भाऊ" आणि बरेच फायदे तोटे रंगवून सांगण्यात त्यांचा हातखंडा होता. आम्ही देखील रमून जायचो, नेहेमीच, कारण इतकी वर्ष सातत्याने भरभरून मनापासून अगदी पहिल्यापासून प्रत्येक प्रोजेक्ट वर काम केल्यामुळे त्यांच्या कडे खूपच भांडार होतं गोष्टीचं. असो. सध्या मी माझ्या फ्लॅट समोरच्या जागेत लिफ्टपाशी लेकीची वाट पाहत उभी राहते म्हणजे बाबांच्या भाषेत आधुनिक-आंगणच, नाही का? का कुणास ठाऊक, कदाचित मी असं आईच्या हातचे गरम गरम पदार्थ (माझ्या साठी खास तय्यार ठेवलेले, घड्याळाकडे लक्ष ठेवून, तंत्रज्ञान हाताशी नसतांना) खाऊन मोठी झाले म्हणून असेल पण मला मनापासून आवडतं मुलांच्या घरी येण्याच्या वेळेला काहीतरी झणझणीत गरम पदार्थ आणि सध्या उन्हाळा असल्यामुळे थंड पेय करून ठेवायला. आणि त्यांच्या सोबत यथेच्छ फस्त करायला दिवसभर काय काय झालं ऐकत. अहाहा च.
सोमवार, २ मे, २०२२
सोशिकपणा, सहनशीलता, चिकाटी ई
आत्ता अर्धशतकी टप्प्यावर कोणी मला विचारलं तर मी नक्की म्हणीन कि अबोली जी फुलं इतकी नाजूक, सुंदर आणि गोजिरवाणी असतात कि ती त्या हिरव्या गर्द पृष्ठभागावरच जास्त खुलून दिसतात. नको त्यांना अमानुशासारखं तोडावं. त्या अबोलीसारखी नाही पण अगदी पिटुकली माझी बोटं होती तेव्हा पासून ते फार उंची नसलेलं झाडं मला खुणावत होतं कारण बहुतांशी सगळ्याच मुलींच्या केसांची शोभा अबोली च्या गजऱ्याने वाढवलेली असायची. दाट गजरा, अबोली रंग, घनदाट काळेभोर केस, मंद सुगंध आणि ते दृश्य, अहाहा च. कोणीही प्रेमात पडेलच असे. मग काय अगदी घरच्या अंगणात ताटवे होते त्यामुळे फारच लवकर गजरा करायला शिकले, भरपूर मैत्रिणी आजूबाजूला, निरीक्षण करून शिकायची सवय, आवड ई. मुळे जमलं आणि कित्येक वर्ष त्यानंतर नचुकता असंख्य गजरे तय्यार झाले माझ्या हातून, स्वतःसाठी, मैत्रिणीसाठी, ज्यांना हवं त्यांच्यासाठी. मोठ्या वर्गात शाळेत जायला लागले तेव्हा सर्वात दाट गजरा कोणाचा हि एक हेल्दी स्पर्धाच असायची आमच्यात. मग काय वायुवेगाने अभ्यास आटोपून हे सगळं करण्यासाठी उत्साहाने वेळ मिळायचा. ते देठासहित न तुटता अबोलीचं फुल तोडायचं एक एक करून म्हणजे फार शांतता लागायची, संयमाने करण्याचं काम होत ते, घाई करून, जाता येता होण्यासारखं नाहीच. आणि फक्त मी नाही पण सगळीच कडे सारखं वातावरण असायचं त्यावेळी त्यामुळे सगळ्याच मुली, शाळेतल्या, आजूबाजूच्या, गल्लीतल्या ई. वैविध्य प्रकारचे गजरे करण्यात माहीर आणि सतत गुंग. बरं फक्त कळ्या किंवा फुलं नाजूक पद्धतीने, सांभाळून तोडून फक्त चालत नसे ना, त्यानंतर पुन्हा वेगळ्या पद्धतीची शांतता दोरा ओवण्यात, गजरा तय्यार करण्यासाठी, मग तो ओल्या फडक्यात गुंडाळून बहुतांशी देवापाशी ठेवायचा, सकाळी शाळेला जातांना माळायचा ई. अहाहा च. काय होते ते दिवस. आज सहज माझ्या खाली राहणाऱ्या मैत्रिणीच्या कुंडीत बहरलेली अबोली बघितली आणि सर्र्कन सगळे दिवस डोळ्यासमोर उभे ठाकले जसे च्या तसे, इतक्या वर्षांनंतर देखील. आणि मग लक्षात आलं कि माझ्या समस्त मैत्रिणी वर्गात एवढा पेशन्स अक्का सोशिकपणा, सहनशीलता, चिकाटी ई आली कोठून, आणि त्याचं मूळ सापडलं. हि अशी छोटीछोटी आणि फारच मनापासून खूप वेळ खाऊ कामं केलीत ना सातत्याने अनेक वर्ष म्हणूनच आज तागायत टिकलाय पेशन्स अक्का सोशिकपणा. त्यामुळे त्या सगळ्या धडपडींना द्यावे तेवढे धन्यवाद कमीच आहेत नाही. काय होती ती सगळी कामं मजेशीर, उत्साह द्विगुणित करणारी आणि कुठलाही थकवा कधीच न जाणवू देणारी. बहरलेलं आंगण, भरलेलं घर आणि फुललेले आम्ही सर्वजण हा मेळ फार वेगळा होता आणि खूप काही संपत्ती देऊन गेला.
अस्वस्थ, नेहेमीचचं
चारचाकी चालवण्याचे काही लिखित-अलिखित नियम आहेत आणि ते पाळले तर उत्तम. अर्थात मी स्वतः गेले अनेक वर्षांपासून गाडी चालवत असल्यामुळे मला हि माहिती तर आहेच शिवाय "स्वानुभवातून आत्मप्रचिती" असं माझी आई म्हणते तिच्या गाण्याच्या बोलातून त्यापद्धतीने आपण शिकत जातो आणि त्या गोष्टी अमलात आणत जातो. त्यातलीच एक येथे मांडण्याचा माझा प्रयन्त आहे. सर्वप्रथम मी तंत्रज्ञानाचा पुरेपूर उपयोग केला आणि SMS च्या दिवसांमधे मोबाईल वर आलेला निरोप वाचून दाखवण्यास सांगितले. जर फारच महत्वाचा निरोप असेल तर गाडी बाजूला घेऊन फोन करायचा, नसेल तर ठिकाणावर पोचल्यावर. त्यानंतर फोन चा आवाज कमी अगदी कमी ठेवायला सुरवात केली आणि जे असतील ते निरोप, फोन घरी पोचल्यावरचं बघायचे हे ठरवलं. जीन्स घातली असली तरी, पॅन्ट ला खिशे असले तरी देखील मोबाईल गाडी चालवतांना बाजूच्या सीट वर किंवा पर्स मधेच ठेवायचा हा नियम. त्यामुळे अचानक गाडी चालवता चालवता फोन वाजलाय आणि तो धडपडत कसाबसा खिशातून काढावा लागलाय असं कदापि झालाच नाही माझ्या बाबतीत. मग मी जर टप्याटप्यात शिकू शकते तर बाकीचे का नाही. माझ्या असं निदर्शनास आलंय कि घट्ट पॅन्ट, त्यात मोबाईल, गाडी चालवता चालवता तो काढण्याचा प्रयन्त आणि पुढे तेच, काही बदल नाही, एकदा, दोनदा, अनेकदा तेच. हिच गत त्या बिचाऱ्या रुमालाची. आता आपल्याला सतत रुमाल लागतो वापरायला मग तो काढून हाताशी ठेवावा ना? इतकं सोप्प कसं काय ह्या शिकलेल्या लोकांना समजत नाही, कधीच. प्रत्येक वेळी इतके ते अस्वस्थ असतात, प्रकाश पडायला हवाच, स्वतःच्या अनुभवातून शिकणं एवढं अवघड आहे का? अस्वस्थतेचं सातत्य कसं पाळू शकतात कोणास ठाऊक. गाडीत बसतांना, बसायच्या आधीच सोय लावा मंडळी म्हणजे चालवणाऱ्याला, मागे पुढे बसणाऱ्याला प्रवास सुखकर होईल.
संस्कार, शिस्त आणि वागणूक
एवढ्यातच एका भल्यामोठ्या नावाजलेल्या ठिकाणी मेजवानीसाठी गेलो होतो आम्ही सर्वजण. व्यवस्थित गर्दी होती आणि वैविध्य प्रकारची माणसं आली असल्यामुळे नजरेस पडली. त्या ठिकाणी बुफे होता, स्वतः आपली थाळी घ्यायची, वेगवेगळे विभाग होते तेथे जायचं आणि हवं ते हवं तेवढं वाढून आणायचं, तुमच्या कुटूंबियाला आखून दिलेल्या स्थानावर बसायचं आणि फडशा पडायचा. त्यात असं सहज आढळलं कि दिसायला शिक्षित, उच्च विद्याविभूषित, उच्च पदावर काम करणारी अशी थाळी घेऊन जात होती, हवं ते वाढून घ्यायचं, हातात थाळी आणि वाढता वाढता / वाढून झाल्या झाल्या तेथेच उभं राहून खायला सुरवात, आणि ते काय कमी होतं म्हणून संपूर्ण रस्त्याभर, जागेवर पोचेपर्यंत पण तोंड हात चालूच. काय म्हणायचं काय ह्याला. हे झालं थोरल्या मोठ्यांचं. काही कुटुंबासोबत लहान मुलं होती ती आई सोबत आली वाढून घ्यायला, मज्जा म्हणून आणि काय विचारता हाताला आलं कि अर्ध थोंडात अर्ध जमिनीवर आणि चालली आहे वरात अशीच. काय म्हणायचं काय, लहान तसेच, थोर तसेच आणि आया आपल्याच धुंदीत, एक चकार शब्द नाही, समजावून सांगणं नाही, कुठे म्हणताय? अहो त्या भोजनालयात नाही हो, घरी सांगून, दाखवून, कृतीतून ई. काय हरकत आहे? स्वतःचा नाही तर त्या परमपूज्य अन्नाचा विचार करा, दुसऱ्यांचा विचार करा, काय हे. संस्कार आणि शिस्त हे कशाशी खातात हे विसरले आहेत हे कदाचित. बाहेर पडल्यावर तुम्ही कसे वागता ह्यावरुन खरं तुमची ओळख होते, प्रवृत्ती समजते. "अजिब दास्ता है ये....". सद्बुद्धी दे बाबा परमेश्वरा ह्या अश्यांना.
अपना टाइम आयेगा
बाकीच्या दिवशी नाही, शाळेच्या दिवशी नाही पण शनिवारी आणि शाळेला सुट्टी असायची त्या वेळी हे प्रकर्षाने घडायचंच. माझी दोन्ही लेकरं त्यांच्या खोलीच्या खिडकीत बसून डोळ्याला दिसेल तिथपर्यंत बघत मला टाटा करत बसून राहायची. हिरमुसली व्हायची आणि फक्त एकच जप असायचा, नक्को जाऊस ना मम्मा तू ऑफिसला. त्यांचे केविलवाणे डोळे, चेहेरे खूप काही सांगून जायचे, पण माझ्या डोक्यात कधीच काहीच प्रकाश का पडला नाही ह्याचं मला राहून राहून आज आश्चर्य वाटतंय. आज हे सगळं आठवण्याचं कारण म्हणजे आज मी घरी होते, सुट्टी होती माझी. दिवसभर जवळपास घरून काम केलं, खूप उशिरा एकटी जेवले, आणि मग माझ्या लेकीला विचारलं कि ती कधी तिच्या कॉलेज मधून निघणार आहे ते. तिने पण ताबडतोब उत्तर पाठवलं आणि १५ मिनिटात निघते असं म्हणाली. मग मी तिला आवडतील असे काही उन्हातून आल्यावर अपेक्षित असे काही करून ठेवायचं ठरवलं, केलं आणि तरी देखील ती आली नाही. मी घड्याळ बघत येरझाऱ्या घालत होते. मग कंटाळून त्याच खिडकीत बसले आणि नकळत सगळं आठवलं, डोळ्यासमोर उभं ठाकलं एखाद्या चित्रपटासारखं. जागा तीच, घर तेच, वाट बघणं पण तेच पण आता भूमिका बदलल्या आहेत. असं असेल का लहानपणी चुकून एखादा विचार मुलांच्या मनात शिवाला गेला असेल का, माझ्या आई बाबांनी पण माझी फार वाट बघितली, त्यांच्या मनात नसेलच आलं पण असेल तर ... माहित नाही पण त्याच प्रत्यंतर मला आलं आज, मी ते अनुभवलं आणि नकोसं झालं मला. पुन्हा एकदा तो च अनुत्तरित प्रश्न उभा ठाकला, का केलं मी असं? आई झाल्यावर चुपचाप मुलांसोबत घरी का नाही राहिले मी? का केली नोकरी? माझ्या रक्तात तर नव्हतं नोकरी करणं, मग आलं कुठून? आणि का? जेव्हा त्यांना माझीच गरज होती तेव्हाच मी नव्हते त्यांच्यापाशी प्रत्यक्ष. "अपना टाइम आयेगा" हे एका अर्थाने कित्ती खरं आहे हे पटलं आज मला पुन्हा एकदा. ज्या माझ्या सगळ्या मैत्रिणी आहेत ज्यांनी मुलं कॉलेज ला जायला लागल्यानंतर नोकरी सुरु केली अश्या समस्त मत्रिणींना माझा नमस्कार. हि सल माझ्या मनात कायमची राहणार हे मात्र खरं.
पूर्ण रात्र झोप
नैसर्गिक रित्याच नवीन बाळचं इतकं पिटुकलं मग त्याचं पोट देखील त्याच्या सारखं पिटुकलं. त्यामुळे बाळांच्या रोजनिशीत दिवसरात्र फक्त मस्त झोप आणि मधे मधे भूक लागली कि उठायचं. त्यामुळे खूप महिने सलग रात्रभर झोप नाहीच, कोणाला म्हणताय? अहो आईला, घरच्यांना ई. बाळ तर काय कदाचित झोपेतच रडतं आणि पुन्हा झोपेच्या स्वाधीन होतं अगदी सहज. पण ते मोठ्यांना इतक्या सहजी शक्य होत नाही. त्यावेळी खरंच संपूर्ण रात्र झोपण्याचं महत्व प्रकर्षाने जाणवतं, मला तर फारच प्रकर्षाने जाणवलं कारण माझ्या कडे तर मस्त खोखो चालू असायचा आणि चालू राहिला अनेक महिने सलग, एक झोपला कि एक जागायचा, देवा. मी तर तहान, भूक, झोप आणि स्वतःला देखील संपूर्णपणे विसरले होते, त्यावेळी. असो. माझी दोघे जेव्हा बसायला लागली, मऊ भात आणि बाकी थोडे थोडे घन पदार्थ सेवन करायला लागली तेव्हा ती आणि मी दोघे परमानंदात रात्रभर शांतपणे झोपण्याचा अनुभव घ्यायला लागलो.
त्यानंतर मुलं मोठी झाली आणि काही वेळा का कुणास ठाऊक पण मी पण आग्रह धरायचे आणि ते देखील खूप आपुलकीने मला थोपटायचे आणि मग जी रात्रभर झोप लागायची म्हणून सांगते, जे शब्दात मांडणं अतिशय अवघड. थोपटणे हि पण माझ्या दृष्टीने एक अनोखी कला आहे. तालात थोपटून सहज झोपवता आलं पाहिजे. दिज्जग असं म्हणतात कि थोपटण्यामुळे जे ऑक्सिटॉक्सिन निर्माण होत त्यामुळे त्या व्यक्तीला जर काही दुखत-खुपत असेल तर ते देखील संपूर्ण पणे विसरायला होतं. आणि दोघांनाही पराकोटीचं समाधान मिळतं ते वेगळंच, जो थोपटतो तो आणि ज्याला तो स्पर्श, स्पंदन अनुभवत कधी झोप लागते ते समजत देखील नाही त्याला पण. अहाहा च, शब्देविण संवादु जणू.
मी मागे एक-दोन अनुकथेत मांडल्याप्रमाणे माझ्या वर एक नवीन कोणीतरी फिदा झालयं सध्या आणि त्याला मी रात्रीच आठवते असं दिसतंय, किंवा मी दिवसभर कामात असल्यामुळे त्याची जाणीव मला फक्त रात्री होते असं म्हणायला हरकत नाही. हॉट फ्लैशेज चं मनापासून प्रेम जडलंय माझ्यावर आणि आता ते खरंच नकोसं झालयं. इतकं मनापासून प्रेम का माझ्यावर? रात्रभर तळमळ, हरवलेली झोप आणि नकोसा वाटणारा इलाज, त्यामुळे मग सरते शेवटी नकळत काल अचानक न मागता पोटभर मिळालेल्या थोपटण्यामुळे खरंच गाढ झोपले मी, खूप दिवसांनी मस्त. त्यामुळे मंडळी जेव्हा जमेल तेव्हा, फक्त बाळांना नाही तर सर्व वयोगटातल्यांना जमेल तेव्हा वेळ काढून थोपटून बघा, तुम्हालाच केवढा परमानंद लाभेल ते आणि त्या व्यक्तीला अगदी रामबाण इलाज ठरेल तो वेगळाच. पुन्हा एकदा रात्रभर झोपेचं महत्व पटलं मला मनापासून.
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...
-
मी अनेक वर्षे एकाच संस्थेमध्ये कार्यरत होते. अखेरीस, मला एका नवीन इंजिनिअरिंग महाविद्यालयाची सुरुवात करण्यामध्ये हातभार लावण्याची सुवर्णसंधी...
-
माझ्या मुलाने भारतातील सर्वात आव्हानात्मक अभ्यासक्रम निवडल्यापासून, मला विद्यार्थ्यांसमोरील अडचणींची जाणीव झाली. मला खात्री आहे की अशा अडचणी...
-
परवा एक फोन आला. लहानपणापासून ओळख असलेली व्यक्ती. घरच्यांसारखीच. गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता त्यांनी अचानक विचारलं: “अजूनही लेक्चररच आह...