शनिवार, २७ ऑगस्ट, २०२२

चार बाजू

कुठल्याही पलंगाला चार बाजू असतात चढ-उतार करायला सोपे म्हणून असेल कदाचीत. चढउतार फक्त त्यावर लोळण्याऱ्यांसाठी नाही तर बसणाऱ्यांसाठी किंवा तो पलंग वापरणाऱ्यांसाठी सुद्धा. बहुतांशी त्यातली एक बाजु हि उंच आणि भिंतीला टेकवलेली अशीच आढळते, कारण सर्वात महत्वाचं डोकं आणि ते ज्यावर पहुडतं ती उशी किंवा उश्या ठेवाव्या लागतात म्हणून. खूप ठिकाणी मोठी एक बाजू पण भिंतीला सरकवलेली असते, कदाचित जागेअभावी किंवा लहान मुलं असेल तर. त्यामुळे सर्वत्र एक तर दोन मोठ्या किंवा तीन बाजू मोकळ्या असतात येणं जाणं करायला. हवं तेव्हा, लागेल तेव्हा, सोयीचं असेल त्या बाजूने चढा उतरा. सहज माझ्या ध्यानात आलं कि हे असं का केलं गेलं असेल तर सोप्प आहे अगदी माणसाच्या नाते संबंधांसारखे. गरज असेल तेव्हा किंवा ज्या बाजूने चढणे / उतरणे शक्य असेल तसे सल्ले द्या,  हजर राहा, बोला, नका बोलू, फक्त ऐका ई. मला इतकी वर्ष हे का उमगलं नाही ह्याचंच आश्चर्य वाटतं. जशी निकड तशी कृती अगदी पलंगावर केलेले चढ उतार सारखी. तो पलंग जसा मजबूत उभा ठाकलेला असतो, शांत झोप देतो, त्याची सवय झालेली असते प्रत्येकाला तसेच भक्कम उभे ठाका आपल्या लोकांसाठी, मैत्रीसाठी, अगदी शांत वाटायला हवं तुमच्याशी संवाद साधल्यावर. 

श्रावण आणि वाण

माझी आई मला तरी कधीच आठवत नाही कि ती आजारी पडली आहे, लोळत पडली आहे ई. त्याची प्रचंड कृपा तर होतीच तिच्यावर पण ती देखील फार म्हणजे फार जपून, मोजून-मापून, शिस्तबद्ध वागायची त्यामुळे पण तिला सुदृढ प्रकृती लाभली होती. पण सरते शेवटी ते शरीरचं, कधी तरी क्वचित पडसं वगैरे व्हायचं बास. त्यामुळे तिला बघायला, भेटायला आलं आहे कोणी घरी प्रकृती स्वास्थ्यामुळे हे माझ्या खिजगणतीतच नाही हो. हा, पण ती जर कोणाला भेटायला जाणार असली तर घरचं काही तरी साजुकसे करून न्यायची मात्र आवर्जून, हे मला पक्क आठवतं कारण तिची मी शेपूट नाही का, जेथे तेथे तिच्या सोबत सदोदित. सध्या एकाच्या घरी काकू आजारी आहेत, छोटेखानी ऑपेरेशन करावं लागलं आहे, आणि प्रचंड प्रमाणात लोकं भेटायला येणार आहेत म्हणे. त्यात एवढ्यातचं श्रावण महिना सरला आणि ह्या काकूंच्या आजारपणामुळे व्रतवैकल्य करता आले नाहीत त्यामुळे प्रत्येक येणाजाणाऱ्याला म्हणे ब्लाऊजपीस द्यायचं, खायला करायचं, गिफ्ट्स द्यायचे ई. सुनेला भलीमोठी यादीच देण्यात आली आहे. देवा. मी ऐकून उडालेच संपूर्णपणे. काय हे? एकतर आजारी माणसाला भेटायला येणारे गिफ्ट्स आणतात, हो ना? अगदी गिफ्ट गिफ्ट नाही तर फुलं, फळं किंवा अजून एखादं वाचनीय पुस्तक ई. हे काय भलतंच. सेवा करायला फक्त सून, आणि मेवा खायला जनता का? मला माहित नाही नक्की पण कल्पना आहे, कि ह्या सगळ्या मंडळींनी मदत करण्याचं ठरवलं नसेल, कि आपण सगळे वार लावून पदार्थ करवून नेऊ, बसू तेथे म्हणजे घरच्यांना तेवढाच आधार, किंवा हात मोकळा, नाही का? सुनबाई ह्या पिढीतल्या असल्यामुळे त्यांनी सगळं साग्रसंगीत तय्यार ठेवलं आहे, कागदाच्या ताटल्या, वाट्या, चमचे, पेले ई. सहित कोरडा खाऊ आणून ठेवला आहे. अपेक्षा करूयात कि काकू पट्टाकिनी ठणठणीत बऱ्या झाल्या आहेत आणि येणारे समजूतदार आहेत, थोड्या प्रमाणात अवतरले आहेत आणि मोजकेच, सहकुटुंब नाहीत.

कहर आठवणीचा

मला जर कोणी एखादी आठवण करून द्यायला सांगितली तर मी ती जास्तीत जास्त दोनदा करते, त्या उपर नाहीच. कारण शक्यच होत नाही. पण ह्या वेळी मला कोणीतरी अनेक तास सातत्याने आठवण करून देत आहे, झालं बाबा काम सरतेशेवटी. इतका आठवणींचा पाठपुरावा ते देखील न सांगता म्हणजे आश्चर्य नाही तर महद आश्चर्य आहे. त्याहून परे म्हणजे मला आज समजलं कि आमच्या सोसायटीत कित्ती जास्त फ्लॅट्स आहेत ते आणि प्रत्येकालाच सिलिंडर लागतात. शनिवार असल्यामुळे मी घरी आहे त्यामुळे मला जास्त प्रकर्षाने ते जाणवलं कारण असंख्य सिलिंडर च्या गाड्या एकामागून एक येतंच राहिल्या सकाळपासून. आत्ता थांबल्या त्या कारण सरते शेवटी मी माझं सिलिंडर बुक केलं एकदाचं जे मी गेले कित्येक दिवस विसरते आहे. आज मात्र त्या सिलिंडर च्या गाडयांनीच प्रण घेतला होता कि जो वर हि शहाणी बुकिंग करत नाही तो वर आम्ही येणार सोसायटीत आणि मोठा आवाज करणार म्हणजे तरी हि जागी होईल. आळस, बाकी काही नाही, ढकला ढकली नुसती. बुकिंग करते वेळी कॅप्चा कोड विचारला जातो त्यात देखील END हे अक्षरं होती, कि झालं बाबा कामं हिचं. मज्जाच आहे नाही. कित्ती म्हणजे कित्ती काळजी ती माझी ह्या सिलिंडर च्या गाड्यांना सुद्धा. त्यांना पण ठराविक दिवसांनंतर माझ्याकडे आलं नाही कि करमत नाही असं दिसतंय. त्यामुळे हि सगळे लगीनघाई हो. मस्त म्हणजे मस्तच वाटलं पण मला ह्या त्यांच्या कृती मुळे, इतकी धडपड केल्यामुळे... 

अपराधी भावना

मी माझ्या मुलांना अनेकविध नावांनी हाका मारते त्यांच्या मूळ नावाशिवाय, का? कुणासठाऊक. आता त्यांनी पण मला एक नाव ठेवलंय आई ह्या उपाधीशिवाय, "गिल्ट मम्मा". मला सदानकदा अपराधी असल्यासारखं वाटतं, कि मी माझ्या लहान लेकरांना सोडून का नोकरी पत्करली? त्यामुळे मग त्यांना मी हवा तसा वेळ देऊ शकले नाही, खाऊ पियू घालू शकले नाही, त्यांना मी हवी होते तेव्हाच नेमकी मी घराबाहेर होते ई. आणि हे सगळं करून गोळाबेरीज काय मिळवलं मी? असो. काल पुन्हा ह्या विचारांनी माझ्या डोक्याचा अगदी भुगा झाला आणि तेव्हाच मला एक माझ्या ओळखीच्या कुटुंबाची आठवण आली. कारण असं कि त्या कुटुंबात एकंदरीत ५ माणसं, दोन मुली, एक मुलगा आणि काका काकू. सर्वात मोठी ताई, मग दादा आणि शेंडेफळ माझ्या वर्गात होतं. आम्ही एक कोर्स एकत्र केला होता, त्यामुळे काही महिने घालवले एकसाथ. त्या काळात समजलेली हि गोष्ट. ह्या कुटुंबाचं एक छोटेखानी पण टुमदार स्वतंत्र घर होत / आहे. आधी एक मजली होतं पण कुटुंब संख्या वाढली तसं ते दोन मजली करावं असं ठरलं आणि त्यानुसार बांधकाम सुरु झालं देखील. तिघंही मुलं लहान होती, काकू व्यवस्थित घर सांभाळायच्या आणि काका कामावर जायचे. वरच्या मजल्याचे छत / स्लॅब बांधून झाले, विटांचा काम झालं आणि कुठलेही कारण नसतांना अचानक काका गेले. त्याचा काकुंवर एवढा परिणाम झाला कि त्या थोड्याश्या भ्रमिष्ट अवस्थेत त्यांनी घर सोडलं. कुठंही त्यांचा थांग पत्ता लागला नाही. मग मोठ्या ताईने पुढाकार घेऊन खालचा मजला भाड्याने दिला आणि हि भावंडं वर राहायला गेली. एकही दार नाही, खिडकी नाही... तरी देखील मोठी ताई खूप मोठी सर्जन झाली, दादा MBA झाला आणि लहान इंजिनिअर. मग इतक्या वर्षांनी काकू एका देवळात / देवस्थानात सापडल्या. मुलं जाऊन त्यांना घेऊन आली आणि तेव्हापासून सगळं सुरळीत सुरु आहे. कुठलीही तुलना नाहीच पण अश्या किंवा काही काही आयांबद्दल ऐकलं वाचलं कि मग मला थोडासा हुरूप येतो. मला स्वतःला समजावता येतं कि तेव्हा जे मला सुचलं ते मी केलं. चुकलं पण आता ते बदलणं शक्य नाही आणि त्यामुळे त्याचा आता विचार करायचा नाहीच. बऱ्याच चांगल्या गोष्टी घडल्या आहेत त्याकडे बघायचं. आता मुलं मोठी झाली आहेत, मार्गी लागली आहेत त्याचा आनंद उपभोगायचा. खूप खूप हलकं फुलकं वाटतंय मला आज. माझ्या त्या मैत्रिणीने आणि सगळ्यांनी खूप त्यावेळी हाल सोसले पण गेले ते दिवस आता. आज आणि उद्या कडे बघुयात, किंबहुना तेच बघणे अत्यावश्यक आहे. "गिल्ट मम्मा" हा खिताब आज पासून मी सोडून दिला आहे, किंवा असं काही होतं हे विस्मृतीत कायमचं गेलं आहे. २३ वर्षांपूर्वी ऐकलेली गोष्ट आज लक्षात आली आणि मोकळं होता आलं.   

तो एक फ्लॅट

प्रत्येक उंच किंवा गगनचुंबी इमारतींमध्ये नियमानुसार आठव्या मजल्यावर एक फ्लॅट रिकामा ठेवावा लागतोच. आणीबाणीचा प्रसंग उद्भवलाच तर सगळ्यांनी त्या ठिकाणी जमावं हा त्यामागचा उद्देश असतो. त्या करता त्या खास फ्लॅटला खिडक्या दरवाजे नसतात तो संपूर्ण मोकळा ठेवला जातो. म्हणजे अग्निशामक दलाच्या लोकांना सहज मदत पुरवता येईल. कुठल्याही सोसायटीत किंवा कोणाच्याही आयुष्यात अशी कुठलीच आणीबाणी कधीही येऊ नये पण आलीच तर सोय केलेली असायची प्रत्येक उंच इमारतीमधे. मी दररोज माझ्या ऑफिसला जातांना बघते एका खास इमारतीकडे आणि ती इमारत माझं लक्ष वेधून घेते, मला खुणावते जशी. पण काय करणार जो वर त्या बांधकामा अंतर्गत / निर्माणाधीन / बांधकाम सुरु असलेल्या इमारतीत लिफ्ट बसवत नाहीत तो वर मी चढून जाऊ शकणार नाही आणि ते देखील आठव्या मजल्यावर, छे छे च. असो. 

तर ती इमारत मला तिची एक नवीन गोष्ट दाखवू इच्छिते. ती नवीन गोष्ट / कल्पना / पद्धत अशी आहे कि एक अख्खा फ्लॅट रिकामा ठेवण्याशिवाय जिन्याच्या बाजूला भलीमोठी मोकळी जागा बांधायची आठव्याच मजल्यावर जेथे आपत्कालीन स्थितीत बरीच मंडळी जमू शकतील, त्याला खिडकी नसेल आणि शिवाय त्या बांधकाम व्यवसायाची भरभराट च नाही का? कारण त्याचा एक अजून फ्लॅट विकला जाणार. मला तर हा बदल खूप खूप भावाला. ज्याच्या कोणाच्या सुपीक डोक्यातून हि संकल्पना उदयास आली आहे त्याला सलाम. मस्तच. मी तर ते बघून निःशब्द झाले. छोटा का असेना पण मस्त वाटला मला बदल. जिन्याला देखील बाल्कनी मिळाली, कित्ती मज्जा ना त्या जिन्याची. आज पर्यंत फक्त फ्लॅट ना बालकनीची सुविधा होती आणि त्याची मज्जा चाखता येत होती, मिरवता येतं होतं. आणि तसं देखील आठव्या मजल्या पर्यंत सगळेच लिफ्ट वापरतात, फक्त मी नाही हो. जिना तसा त्याची स्वतःची कंपनी एन्जॉय करतो नेहेमीच. आता ह्या छोट्याश्या बदलामुळे त्याला एक मोठा दोस्त मिळाला, अहाहा च. मी नक्की ती इमारत पूर्ण झाली कि ह्या नवसंकल्पनेचा आस्वाद घ्यायला जाणारच एकदा, लवकरच.

बुधवार, २४ ऑगस्ट, २०२२

चल रे भोपळ्या टुणुक टुणुक

गेल्या काही वर्षांपासुन एक अलिखित नियम प्रस्थापित झाला आहे ज्या मधे किंवा ज्या नुसार लहानमुलांची जी बडबड गीते असतात किंवा कविता असतात त्यात म्हणे कुठलेही नकारात्मक शब्द वापरले जाऊ नयेत. त्या नकारात्मक शब्दांचा म्हणे लहानमुलांवर वाईट परिणाम होतो. त्यामुळे माझ्या लहानपणी किंवा त्याआधी देखील प्रसिद्ध असलेलं गाणं / गीत / कथा "चल रे भोपळ्या टुणुक टुणुक" जैसेथे वापरू शकत नाही आता. पण मला तर अश्याच आशयाचं गाणं / गोष्ट किंवा अनुभव आला म्हटलं मांडावं इथे.

जिवलगांना आता भेटायचं म्हणजे पहिले मी तूप रोटी खाते, धष्ठ पुष्ट होते आणि मग, अर्थात हे सगळं आधुनिक पद्धतीने बरं का, नाहीतर मी आणि माझं रडगाणं ते नक्कोच. प्रत्येकाला काही ना काही असतं त्यात माझी भर नकोच.

वैविध्य नरभक्षक जंगलाच्या रस्त्यात जेव्हा त्या आजींना विचारतात तेव्हा मूळ कथेत आजी म्हणतात अगदी तस्स नाही, पण मला जेव्हा जेव्हा कोणी म्हणतं कि "मला भेटायला ये किंवा आपण भेटूया किंवा तुझ्या घरी भेटूया ई." तेव्हा मला ऑफिसचं / घरचं / दुसऱ्या दिवशी उभं असलेलं काम नजरेस पडतं, माझ्या वैविध्य अवयवांचं दुखणं उफाळून येतं / आठवतं आणि हिम्मत होतं नाही सहज भेटण्यासाठी "हो" म्हणण्याची. पण मला पूर्ण खात्री आहे कि "हे हि दिवस पट्टदिशी निघून जातील (just a passing cloud" आणि मला उत्साहाने पुन्हा भेटी गाठी नाहीत तर सर्वांना मस्त मस्त खाऊ घालता येईल, सिनेमा नाटक बघता येईल, सहलीला जाता येईल, पोटभर गप्पा मारता येईल, रात्ररात्रभर पत्ते खेळात येतील, खूप मस्त गाडी चालवता येईल. त्यामुळे आता मी अदृश्य भोपळ्यात अजून थोडे दिवस बसणार, मस्त व्यायाम करणार, औषधं घेणार, पौष्टिक खाणार पिणार आणि मग मनसोक्त जगणार. 

सायोनारा सायोनारा
वादा निभाउंगी सायोनारा
इठलाती और बलखाती
 जल्दी मिलूंगी  सायोनारा ||

 

मंगळवार, १६ ऑगस्ट, २०२२

तो एक संवाद

गेले दोन दिवस सुरु आहे हा अनोखा संवाद आणि मंडळी ऐकता ऐकत नाही आहेत, आता काय म्हणावं? कसं समजवावं? अगदीच कळत नाही आहे. पण असो, असा हि संवाद असतो हे एक तर समजलं आणि हा असा संवाद किती गरजेचा आहे हे उमगलं देखील. तर मी समजावलं माझ्या पायांच्या नसांना कि रुसू नका, फुगून बसू नका, नाराज झाल्यावर कोणी म्हणजे कोणी येत नाही हो तुम्हाला आंजारायला-गोंजारायला. किंबहुना त्याही पेक्षा रुसण्याचा तुम्हाला देखील त्रास होत असेल ना?, फक्त मला नाही, तुम्हीच नाही तर आजुबाजुच्या नसा, किंवा अजून मित्रमैत्रिणींना देखील सहन करावं लागत असणारच?. मग कशाला रुसता?, मनवायला कोणाला फुरसत आहे इथे?. त्यापेक्षा शांत राहा नेहेमीच. आता तरी झाली असेल ना माझी सवय?, माझ्या रोजनिशीची सवय?, मी कसे, कितपत शारीरिक आणि मानसिक काम करते ई. मग का हे नवीन वागणं? सोडा आता, कंटाळा नाही येत का सतत फुगून बसायला?, त्याला देखील मर्यादा हव्यात ना? इतकं समजावलं मनापासून तेव्हा कुठे चार शब्द फुटले एकदाचे आणि संवाद सुरु झाला. 

नसांचे म्हणणे असे कि आम्ही फुगलो नाही तर तू थांबत नाहीस आणि ते जाऊ दे, पण आमचं अस्तित्व मग कसं ध्यानात येणार तुझ्या? आम्ही लपून बसलेले व्यक्तिमत्व, नजरेस पडत नाही कोणाच्याच त्यामुळे त्याची दररोज काळजी घेतली जात नाही, हात फिरवला जात नाही, कुठलही वंगण नाही कि गप्पा नाहीत, कारण का? तर आम्ही दडून बसलोत म्हणून? त्यामुळे मग डोकं वर काढतो गं, म्हणजे तुला आणि आम्हाला देखील थोडी विश्रांती आणि अप्रतिम खाद्य मिळतं, आतून-बाहेरून मस्त न्हाहून निघाल्यासारखं होतं. ह्या शिवाय अजून कुठलाच मार्ग नजरेस पडला नाही, त्यामुळे....

आणि बरं का मंडळी ह्या अश्या गप्पा रात्रभर मारल्या पठ्याने, निर्लज्ज कुठला, दुखरा माझा पाय हो.

मी थोडसं कुरवाळलं तर किंचित तीव्रता कमी झाली त्याच्या नाराजीची. त्यानंतर सकाळी / पहाटे जेव्हा स्वयंपाकाच्या मावशी आल्या, त्यांच्या  लक्षात आलं, त्यांनी न सांगता अप्रतिम तूप लावून पराठे करून खाऊ घातले, कडत्त पाण्याने शेकलं तेव्हा कुठे रुसवा सोडला ह्या वेड्याने. 

सगळे वेडे माझ्याच प्रेमात का? हे एक अनुतर्रित समीकरण आहे हे मात्र निश्चित. असो, मागे एकदा लिहिल्या प्रमाणे दर रात्री झोपयाचंच असं कुठे नमूद करून ठेवलंय?, जागून काढावी कि कधी तरी आणि वेगळा अनुभव पण घ्यावा. आज-उद्या अजून एका विषयावर लिहीन म्हणते तो म्हणजे हे जे असे दुखणे-खुपणे असते ना ते का उद्भवते? ह्याचा कधी विचार केला आहेत का तुम्ही? त्यामुळे का होईना माणसं माणसांसोबत काही क्षण घालवतात, बसतात, ऊर्जा देवाण-घेवाण करतात, संवाद साधतात, मधुर बोलण्याचा प्रयत्न करतात, स्पर्श अनुभवतात ई. ज्यामुळे मग हवेच्या माध्यमातून सर्वदूर प्रेम पसरतं. अर्थात प्रेमाचे अनेक प्रकार देखील असतात, ह्या नसांचं एक फारच दृढ प्रेम, ते दाखवण्याची पद्धत त्याहून निराळी आणि आप्तस्वकियांकडून मिळतं ते क्षणिक पण महत्वाचं प्रेम. असो "प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं" आणि ते पसरत राहावं नेहेमी हे महत्वाचं. 

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...