गुरुवार, १२ ऑक्टोबर, २०२३

पाठिराखा

हा शब्द आणि त्याचा शब्दप्रयोग मी अगदी शाळेत असतांना शिकले होते. तेव्हा आमच्या मराठीच्या शिक्षिकेने सांगितलेला अर्थ म्हणजे देव. तो जो आपली सर्वांची सातत्याने रक्षण करतो. प्रेत्येकाचा लेखा जोखा त्याच्या कडे असतो आणि तो बारकाईने लक्ष ठेवतो, पाठराखण करतो. आणि हे त्रिवार सत्य आहेच. ह्याचा अनुभव मला इतकी वर्ष सलग आला आहे. पण ह्या पल्याड जाऊन अजून एक पण ह्या शब्दाचा अर्थ असू शकतो किंबहुना ह्या नवीन जमान्यात तो जन्माला येऊ शकतो हे मला ठाऊक नव्हतं. पण मला तो उमगला. "त्याची" तुलना तर कोणाशीच होऊ शकत नाही. त्याच्या ऐवजी पण कोणी नाहीच. फक्त ह्या मराठी शब्दाचा अजून एक जाणवलेला अर्थ / उपयोग आहे. एवढंच. 


पुणे हे दुचाकीचं शहर म्हणून प्रसिद्ध होतं हे म्हणणं सपशेल चुकीचं ठरेल. पुणे हे दुचाकींचे शहर आहे. आताशा काय गेली ५-१० वर्षे जेथे बघावं तेथे सगळे दुचाकी स्वार. पहाट म्हणू नका, दिवस, दुपार, संध्याकाळ आणि हो शनिवार रविवार तर उधाण येतं ह्या सर्वांना. अगदी लहान वयातील, ते मध्यम आणि जेष्ठ देखील. काही दशकांपूर्वी चाकरमाने मजल दरमजल करत कसे तरी कचेरी गाठायचे ह्या दुचाकींवर. आणि आता हजार ते लाख ह्या अश्या किमती आहेत. असो. तर अश्या ह्या भव्य दिव्य, "विनाकारण राजकारण" सायकली चालवायच्या म्हणजे त्याच्या किमतीला शोभेल असे गणवेश, खास कपडे, भारी कपडे आलेच. अर्थात हे असे कपडे अत्यावश्यक हो. बरीच कारणे आहेत त्या मागची. एक म्हणजे कल, शैली अक्का स्टाईल ई. अहो म्हणजे ते तसे कपडे घातलेच पाहिजेत. असो. त्या सदऱ्याला एक खिशा असतो, मोठ्ठा, आडवा आणि त्या खिश्याच तोंड उघडं नसतं. इलास्टिक / स्थितिस्थापक लावलं असतं. तो खिशा खास विचारपूर्वक तय्यार केलेला असतो.  म्हणजे मग त्यात माणसाचा सर्वात महत्वाचा एक अवयव ठेवण्यात येतो. मोबाईल ला व्यवस्थित पहुडता यावं म्हणून राखीव जागा असते ते.  तो आहे ह्याची सतत जाणीव व्हावी म्हणून तो अगदी पाठीला चिकटून स्थापित केला जातो. दुचाकी चालवतांना होणारे अपार कष्ट जे सुदृढता राखण्यास मदत करतात  ते क्षणोक्षणी टिपण्याचे काम हा अवयव करत असतो. त्या दिवशी ठरवलेलं किंवा कुणी निष्णात माणसाने सांगितल्या प्रमाणे लक्ष गाठलं रे गाठलं, दुचाकी वरून उतरल्या उतरल्या आधी दर्शन ह्या अवयवाचे. कदाचित त्याला घाई झाली असते हो शाबासकी द्यायची आणि दुचाकी स्वाराला ती घ्यायची.  आणि मग तेथेच सर्वत्र पसरावयाचं कि आजची घौड दौड. 


तर असा हा पाठिराखा. सदोदित सोबत असणारा असा. "जेथे जातो तेथे तू माझा सांगाती". प्रत्येक अन प्रत्येक गोष्ट स्पष्टपणे नोंद ठेवणारा. स्वतःला माहिती नाही इतकी जास्त माहिती नमूद केलेला, करत राहणारा, आतली बाहेरची सगळी कडची. आहे कि नाही गम्मत आणि नवीन अर्थ शब्दाचा. पाय व्यग्र दुचाकी चालवण्यात, हात ती रस्त्यावर नीट उभी ठेवण्यात व्यस्त, घामासाठी आणि स्टाईल म्हणून बाकी ठिकाणी ठेवता येणं अशक्य म्हणून मग ती पाठीची जागा. 

बुधवार, ११ ऑक्टोबर, २०२३

तो रिकामा रकाना

१९९५ पासून ते २०२३ पर्यंत, मधे साधारण एखाद वर्ष वगळले तर मला दोन रकाने सातत्याने भरलेले दिसायचे. रकान्यातले सगळेच खाणे नाही तरी बहुतांशी ये-जा असायचीच. किंबहुना ह्या सगळ्या खाणे आणि रकान्यांनी एक नकळत सवय लावली मला. भरलेले, बहरलेले रकाने बघायची, अनुभवायची आणि त्यामुळे शांत राहण्याची. शांत म्हणण्यापेक्षा स्थिर. एक भरोसा होता कि ते रकाने भरत राहणार आहेत. हालचाल होत राहणार आहे. ती हालचाल, किंवा त्यातला एखादा देखील रकाना कधी रिकामा होईल हे स्वप्नात देखील अनुभवलं नव्हतं. कधीच होणार नाही हि खात्री होती. तो भरोसा दांडगा होता. मला माझ्यात ती शक्ती त्याने बहाल केली होती. डोकं चालू ठेवलं होतं आणि पराकोटीची त्याची कृपा कि सर्वांपासून तसं बघितलं तर अलिप्त पण ठेवलं होतं. एक स्वच्छंद राहण्याची सवय तरी देखील हात राखून सगळे व्यवहार. 


पाच वर्षांपूर्वी एक दिवस आला आणि मार्ग बदलला. हळू हळू अनपेक्षित बदल घडत गेले, डोळे खाड्कन उघडतं गेले आणि वेगळे ना भूतो ना भविष्यती असे अनुभव, प्रसंग उभे ठाकले. माझे सर्व प्रेमळ सहपाठी, कचेरीतले, घराजवळचे, शाळेतले, इतर मित्र-मैत्रिणी सर्वतोपरी धावून आले, प्रचंड प्रोत्साहन दिलं. त्यामुळे गाडी रुळावर आली पण संथगतीने, संथगतीसोबत. ते देखील पचवायची ताकद दिली त्याने. आणि आता मात्र त्या दोन रकान्यांपैकी एक रिकामा झाला. भरेल संथगतीने ह्यात शंका नाहीच. पण रिकामा रकाना बघायची सवय नाही. रिकामा रकाना बघावा लागेल कधी मला हे माझ्या खिजगणतीत नव्हतंच. अर्थात हे पचवण्याची ताकद देखील तोच देईल ह्या वर २०० टक्के खात्री आहे. मी वाट बघत नाही पण अनेक महिन्यांपासून एक फुलाच्या पाकळी एवढी रक्कम येऊ घातली होती. माझ्या डोक्यातून निघूनच गेली होती. आज लक्षात आलं म्हणून तपासून बघितलं. हा महिना, मागचा महिना, पण नाही, रकाना रिकामा होता. पुढील महिन्यात येईल ह्याची खात्री आहे आणि आता पाकळी पेलायचीच ताकद उरली आहे. त्यामुळे येणार, सातत्य राहणार त्यात आणि गोगलगाई सारखी गती मिळणार हे निश्चित. तो पाठिशी असतांना मी कोण काळजी करणारी हो. पण ह्यातून एक लक्षात आलं कि अगदी जे आपले असतात, अगदी प्रेमाचे, जवळ पेक्षा जवळचे अश्यांचे रकाने रिकामे राहू देऊ नयेत कधी. फुलाची पाकळी द्यावी ताकद असल्यास. आज माझे आई आणि बाबा हयात असते तर त्यांनी हे निश्चित केलं असतं कुठेही गवगवा न करता, आपसूक. माझ्यात देखील त्याने ताकद द्यावी, टिकवावी म्हणजे मला कोणाला तरी रकाने भरायला मदत करता येईल, ताकदीप्रमाणे. "जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे" आज समजला आणि उमगला ह्याचा अर्थ.  

ह्याचा अर्थ असा नाही कि काहीही करून फक्त तो रकाना भरण्यासाठी आटापिटा करायचाच, नावडीचे काम करत आणि जुंपलेले राहायचे. शारीरिक आणि मानसिक क्षमते बाहेर जाऊन गाडी चालू ठेवायची. नाही. त्यामुळे रकाने अजून सपाट्याने रिकामे होऊ शकतात. त्यामुळे सजग राहा आणि योग्य ते कर्म करत राहा. 


स्वानुभवातून आत्मप्रचिती

अगदी ताजी आज सकाळची गोष्ट, अनुभव, पिटुकला पण महत्वाचा. मला आज दुपारी आणि संध्याकाळी बाहेर जायचे आहे काही कामानिमित्य. त्यामुळे सकाळची ताजी हवा खायला, मित्र मैत्रिणी, आप्तस्वकियांशी भेटायला मिळणार नाही, खाली चक्कर मारायला जाता येणार नाही हे त्रिवार सत्य होतं. इतक्यांदा खाली वर करायला आता माझे पाय मला परवानगी देत नाहीत. हरकत नाही. इतकी वर्ष दिली हे खूप झालं. बऱ्याचश्या गोष्टी मार्गी लावल्या त्याने. मग पर्याय काय. सकाळची ताजी हवा तर हवी होती. लांब श्वास, खोल श्वास आणि त्या प्रदूषण-विरहित, शुद्ध हवेशी संवाद साधायचा होता. भली मोठी खिडकी ची जाळी ची बाजू उघडी होती, मी अगदी जाळीजवळ जाऊन खात्री करून घेतली तरी हवा जाणवत नव्हती. म्हटलं काय करावं? मग ती जाळीची बाजू सताड उघडली तर जादूच झाली जणू. ती शुद्ध हवा जशी काय वाटचं पाहत होती कि कधी मी ती जाळी उघडते आणि तिला आत घेते, तिचं स्वागत करते, तिला अनुभवते, पूर्णपणे, मनसोक्त. तो जगावेगळा अनुभव घेण्यात मी इतकी गुंग झाले कि ज्याचं नाव ते. मग विचार केला काय घडलं नक्की. तेव्हा डोक्यात प्रकाश पडला. ती जाळी, इतक्या बारीक आकाराची आहे आणि मी स्वतःच आता घरी असल्यामुळे जमेल तशी साफ करत असते. माझा हात नेहेमीच फिरत असतो त्यामुळे धूळ बसत असली तरी जाळ्या नाहीत किंवा खूप धुळीने माखली नाही ती जाळी. तरी पण बघा ना, साधी हवा यायला तिने अडथळा निर्माण केला. 


थोडक्यात काय माझ्या चार डोळ्यांना ती अतिसुक्ष्म जमलेली धूळ नजरेस पडली नाही. किंवा असे धुळीचे कण देखील जाळीचे चौकोन बंद करू शकतात हे ध्यानात नाही आलं माझ्या. पण बघा जे दिसतं नाही ते उभं असतं प्रत्यक्षात. 


ह्या कथेचा गमक असा कि १. सातत्याने न चुकता जाळे, जळमटं, अतिसुक्ष्म धुळीचे कण, अडथळे दूर करा, दूर सारा. ते दूर सारण्यासाठी देखील वेळ द्या, कष्ट करा. २. हे असं नाही केलं तर तुम्ही शुध्दते पासून दूर राहाल. ३. जगावेगळे स्वानुभव मिळणार नाहीत. जे स्व-प्रगती करता, सुधृढ राहण्याकरता बहुमूल्य ठरतात.  


तर चला उठा आणि लागा कामाला पदर खोचून ताबडतोब.  

रविवार, ८ ऑक्टोबर, २०२३

मस्त बदल

माझी राणी, माझी प्रिय गाडी सध्या फक्त एकाजागी उभी असते. मी इतक्यातच स्वेच्छानिवृत्ती घेतल्यामुळे तिचा पण दिनक्रम बदलला पूर्णपणे. पण तरी देखील मी माझ्या पायांना व्यायाम म्हणून, गाडी चालवायची सवय राहावी म्हणून, गाडी चालवत ठेवावी म्हणून आणि ताजी हवा खाण्यासाठी जमेल तेव्हा तिला बाहेर काढतेच, बहुतांशी सकाळी, कारण रहदारी जराशी कमी असते. कधी देवळात तर कधी बाजारात तर कधी विनाकारण चक्कर असे माझे प्रकार सध्या सुरु आहेत. त्यात मला सर्वांशी पोटभर गप्पा मारायला प्रचंड आवडतात आणि हि माझी राणी तर माझं कित्येक वर्ष ऊन, वारा, पाऊस, थंडी ह्या सर्वांपासून फक्त रक्षणच करत नाही तर मला हवं तेथे हवं तेव्हा नीट ने आण करते आहे सातत्याने गेली कित्येक वर्ष. मग अश्या माझ्या राणीशी मी नाही बोलणार हे अशक्यच ना. सुरवातीला मी फक्त गाडी चालवणं ह्याचा उपभोग घेतला. मग विविध रस्ते न्याहाळले. अनोळखी रस्ते पादाक्रांत केले, नवीन दुकाने, त्यांचे फलक ई. बघण्यात मज्जा आली आणि तदनंतर मग राणीशी संवाद साधणारच इतक्यात जणू काही तिचाच मला फोन आला हो. तिला बोलायचं होतं म्हणे. म्हणते कशी, इतकी वर्ष सतत एकाच मार्गावर आपण जात-येत होतो. तोच रास्ता अगदी क्वचित बदलत होता. पण आता नवनवीन रस्ते, सावकाश आनंदाने आणि कुठलीही घाई न करता चालवणे / चालणे मी पण खूप म्हणजे खूप एन्जॉय करते आहे, थँक यू. 

अगदी तस्सेच आज पुन्हा एकदा घडले. माझी एक मैत्रीण आहे तिने मला एक योगाच्या व्हिडीओ ची लिंक काल पाठवली आणि हक्कने म्हणाली कि बघ आणि कर पण. सलग चौदा दिवसांचे आव्हान आहे, ते नक्की कर. म्हटलं काय हरकत आहे, फायद्याचं आहे, घर बसल्या करायचं आहे आणि इतक्या प्रेमाने सांगितलं आहे, तो शिक्षक प्रचंड लोकप्रिय आहे, मग चला. आणि आज बरोबर साडे सहा ला सकाळी मी योग करायला सुरवात केली. तो म्हणेल तसे पण मला मानवेल तसे देखील, म्हणजे माझ्या पायांना साजेसे बहुतांशी सगळेच प्रकार मी केले. आणि महद आश्चर्य घडलं. पायांचा ताबडतोब फोन आलाच. रोज तेच तेच व्यायाम प्रकार करून आम्ही बदलाची वाटच बघत होतो आणि तो आज तू दिलास, अहाहा च. मज्जा आली. 

तर असे हे माझे सगळे, प्रेमाने आणि ताबडतोब निरोप देतात किंवा धाडतात हो, आणि ते मला ऐकू पण येतात, फ्रिक्वेन्सी किंवा कंप्रता कसली जुळली आहे म्हणून सांगते आमची. 

त्या माझ्या मैत्रिणीला, त्या योग गुरूला, यू ट्यूब ला, इंटरनेट ला, मोबाईल ला सर्वांना शतशः मनापासून धन्यवाद. बदल मस्त आहे.  

शुक्रवार, ६ ऑक्टोबर, २०२३

कंपने / लहरी

पुण्यातल्या सोमेश्वरवाडी ह्या भागात माझं वास्तव्य आहे. ह्या भागाला सोमेश्वरवाडी संबोधलं जातं कारण ह्या परिसरात श्री. सोमेश्वरांचं मंदिर आहे, पुरातन असं. त्या मंदिराची एक प्रथा आहे. मी ह्याची साक्षीदार आहे २००५ पासून, तब्बल १८ वर्ष झाली. दररोज न चुकता सकाळी आणि संध्याकाळी ८ वाजता मोठ्या आवाजात ध्वनियंत्रणा लावून आरती केली जाते, ऐकवली जाते. सुंदर उपक्रम आहे, त्यामुळे आजूबाजूच्या सगळ्याच रहिवासांच्या कानावर आरती पडते आणि ती स्पंदने, कंपने, त्या उत्कृष्ट लहरी अनुभवता येतात आपसूक, काहीही न करता, घरी बसून. इतक्यातच मी ते प्रकर्षाने अनुभवायला सुरवात केली. सगळं प्रकर्षाने जाणवायला लागलं, त्या लहरींचे साक्षीदार होता आलं. नाहीतर आधी सकाळची आरती तर कधीच ऐकू यायची नाही कारण बरोबर ८ वाजता किंवा त्या आधीच मी कचेरीत प्रवेश केलेला असायचा. आणि रात्री ८ वाजता कचेरीतुन आल्यावरची रेंगाळलेली कामे, स्वयंपाक किंवा अभ्यास ई. मध्ये तितकसं लक्ष कधीच गेलं नाही आणि त्यामुळे मी त्या स्वानुभवांना मुकले, त्याची प्रचिती घेता आलीच नाही. त्याचं महत्व कधीच पटलं नाही. पण आज तो फरक जाणवतो आहे. मला एक प्रश्न विचारतात आताशा "मग आता काय? काय करता फावल्या वेळात? निवृत्ती नंतर काय?" माझी एक मोठी यादी तय्यार आहेत ज्यात दररोज निर्माण होणाऱ्या ह्या लहरींमधे अक्षरशः नहाणं अग्रगणी आहे. कधी कधी तर मी प्रत्यक्ष अनुभव घेण्यास मंदिरात पण पोचते. अहाहा च. "काय वर्णू तव गूण अल्पमती नारायण". 


गुरुवार, ५ ऑक्टोबर, २०२३

दगडाचे बांधकाम

आदरणीय जिजामातांच्या हातचं एक बांधकाम म्हणजे आमच्या सोमेश्वरवाडीचं देऊळ / संस्थान. अर्थात मी असं ऐकलं आहे त्या संस्थानाबद्दल, कि ते कित्ती पुरातन आहे ते. अनेक वर्षे मी त्या देवळात जाते येते आणि ते संपूर्ण दगडी बांधकाम बघते देखील. म्हणजे भिंती, पायऱ्या, आजूबाजूचा परिसर, वृक्षांभोवती बसण्यासाठी किंवा त्यांच्या संगोपनासाठी बांधलेले कट्टे देखील दगडांचे आहेत. एक एक दगड भला मोठ्या आकाराचा आहे आणि अर्थात जड देखील असणारच. त्यामुळे कदाचित आणि मागे नदी वाहात असल्यामुळे, झाडं झुडपं असल्यामुळे देखील एक अनोखा थंडावा आहे देवळात, गाभाऱ्यात आणि  संपूर्ण परिसरात. आज दर्शनाकरता गेले असतांना एक नवीन अनुभव आला, किंबहुना जागृती झाली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आज नव्याने समजलं मला कि देवळात अनवाणी का जायचं आणि हे देऊळ इतक्या सुंदर संकल्पनेवर का उभारलं आहे ते, म्हणजे दगडांचा सदुपयोग सर्वत्र. माझ्या दृष्टीने अक्युप्रेशर अक्का सर्व मर्मबिंदू यथोचित दाबले जावेत म्हणून. आणि अर्थातच हे घडल्याने मग सगळेच सुदृढ राहणार ह्यात शंकाच नाही. केवढा तो पुढचा विचार, काय ती दूरदृष्टी, अद्भुतच. 

देवाचं वास्तव्य आहे, तेथील लहरी जगावेगळ्या आहेत, एक भक्तिमय वातावरण आहे आणि चुंबकीय परिणाम देखील, ह्या सर्वांच्या परे, आणि जास्तीचे ते विचारपूर्वक केलेले बांधकाम. दररोज किंवा नेहेमी जाऊन, प्रदक्षिणा घालणे स्वास्थ्याचे नक्की ठरणार. त्यावेळी बरं झालं सिमेंट ने जोडणाऱ्या आधुनिक गुळगुळीत  फारश्या नव्हत्या ते. आताशा अंगण नाही, घरी दारी सातत्याने पायात वहाणा, आणि अत्याधुनिक गुळगुळीत फारश्या मग पायांचे काही प्रमाणात आजार होणारच, परिणाम / दुष्परिणाम दिसणारच / दिसत आहेत. म्हणून जमल्यास ह्या आमच्या देवळात या, जेथे कोठे असे दगडी बांधकाम आहे तेथे जा, थोडेसे अनवाणी फिरा, जे देवळाचा परिसर आरशासारखा लख्ख ठेवतात त्यांना मनापासून धन्यवाद द्या, कदाचित फायदा होईल. आणि हो, सोमेश्वरवाडी देवळात तर याचं पण माझ्या घरी गप्पा मारायला / टेकायला यायचं विसरू नका.  

बुधवार, ४ ऑक्टोबर, २०२३

मानवलंय

एक सौंज्ञा कानावर पडायची नेहेमीच "लग्न झाल्यावर मानवलंय", "बाळंतपण मानवलंय", "सासर मानवलंय" ई. मानवलंय म्हणजे जे सर्वश्रुत आहे तेच, वजन वाढलंय, तेज आलंय, आनंदी आनंद आहे चोहीकडे, सगळे खास काळजी घेत आहेत असे बरेच काही. आपलं शरीर म्हणजे प्रचंड हुशार, ताबडतोब व्यक्त होतंच. थोडसं काही चांगलंचुंगलं तोंडात टाकायला मिळालं कि, चार चांगले स्वर कानावर पडले कि, उत्कृष्ट नाही तर आनंदाचे शब्द ऐकायला आले कि, बास. कांती चकाकायला काय लागते, उगाच हसू काय येत, चार घास जास्त काय जातात आणि परिणामी होत्याचं नव्हतं होत, गुटगुटीत दिसणं. वजन काटा नंतर दर्शवतो आधी कपडे बोलायला लागतात. आज हा विषय अतिशय महत्वाचा ठरला माझ्या साठी कारण सध्या मला देखील मानवलंय काही तरी. छे छे, वर दर्शविल्या सारखं काहीच नाही, वेगळ्या धाटणीतलं काही तरी, वेगळ्या पठडीतलं असं. माझ्या बाबतीत घडलंय मग वेगळं असणारच नाही का? तर सध्या मला माझं निवृत्त होणं मानवलंय, खूपच, इतकं कि ज्याचं नाव ते. मस्त गोलमटोल. का सांगू? अहो काही तरी काम हवं का नक्को. आता हे वाढीव प्रकरण कमी करणं हे घरबसल्या मोठं काम. 

चला तर मग, लागते कामाला.  "चल रे भोपळ्या टुणूक टुणूक ची उलटी नवखी बाजू". 

 

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...