सोमवार, १२ फेब्रुवारी, २०२४

तो अद्वितीय अनोखा कळप

 

सर्वांच्या भावनांचा आदर करून मी हा पंक्ती प्रपंच येथे मांडत आहे. पण हा माझा एक पिटुकला दृष्टिकोन आहे ह्या बाबतीत. 


अशी कल्पना करा कि एक माणूस किंवा व्यक्ती किंवा माणसाचे पिल्लू हत्तीच्या कळपात नेऊन ठेवलंय. आणि ते तेथेच मोठं होतंय. हत्ती नक्कीच त्याची जीवापाड काळजी घेतील. कंदमूळ, केळ-फळ ई. खायला आणून देतील, भरभरून प्रेम देतील वगैरे. हे सगळं घडत असतांना त्या माणसाच्या जीवाला मात्र हत्ती हेच सर्वस्व वाटेल कदाचित कारण त्याला माणसांमध्ये राहणं ठाऊकच नाही. तो अनुभव त्याने घेतला नाही, चाखला तर नाहीच. दोघेही जीवित प्राणी आहेत, माणसं आणि हत्ती तरी फरक आहेच ना? असं देखील संभव आहे कि हा बाळ तेथेच मोठा होतोय, सर्व आयुष्य तेथेच व्यतीत करतोय आणि एक दिवस निघून जातोय. कदाचित आपण टीव्ही वर मोगली बघतो तसं काहीस होईल कदाचित. अर्थात त्या व्यक्तीला स्वच्छ वातावरणात राहायला मिळेल, सदा मौन कारण भाषा न शिकल्यामुळे आणि ती न वापरल्यामुळे, शिक्षणाची जबरदस्ती नाहीच, नोकरी, कुटुंब पण नाही. आणि हे मोठ्या प्रमाणात घडायला लागलं तर? म्हणजे काही माणसांची पिल्ले वाघाच्या, हरणाच्या, उंटांच्या आणि इतर प्राण्यांच्या समूहात गेली राहायला तर? 


मी एवढ्यात बघते आहे कि श्वान घरी पाळण्याचा माणसाने जसा ध्यास घेतला आहे. त्या मागची कारणं मला ठाऊक नाहीत. कुत्रांना माणसांच्या बुद्धी प्रमाणे उत्कृष्ट जीवन लाभते, सुरक्षा, खाणं ई. पण त्या पल्याड काही आहे ना? हा अगदीच एखादा रुग्ण एकटा असेल, त्याला उच्च कोटींचा मधुमेह झाला असेल आणि औषध पाणी देण्याकरता अत्यंत हुशार आणि निपुण श्वान हवा आहे तर मान्य आहे. पण उठसुठ काय हे. त्यात माणसंच आधी कुठेतरी लटकलेली आहेत, उंच फ्लॅट मध्ये राहतात आहे. अंगण नाही. मग त्या कुत्र्याने करायचे काय? मला प्रचंड कीव येते अश्यांची खरंच. माणसाचे काम वाढते ते वेगळेच. आपल्या माणसांसाठी करा ना असं काही खास दररोज, न चुकता. त्यांच्या साठी आणा ना उत्कृष्ट दर्जाचं विविध्य खाणं, जा ना त्यांच्या सोबत फिरायला दररोज दिवसातून ४ दा. तुम्ही माणसं आहात तर "माणसाने माणसाशी माणसा सम वागणे" जास्त योग्य नाही का? भलं मोठं आंगण आहे, शेती आहे, कुत्रांना पाळायला धावायला त्यांच्या सख्यांसोबत वेळ घालवायला मिळतोय तर पाळा त्यांना. अवश्य. नाही तर नाही हो.  

तुम्हाला जर फारच लळा असेल तर जा ना एखाद्या श्वान निवाऱ्यात जा, खेळा, वेळ घालावा / सदुपयोगी लावा, त्यांना औषध गोळ्यांचा पुरवठा करा, दानधर्म करा, पण त्यांना त्यांच्याच कळपात राहू द्या. तो पण राजहंस आहे. त्याच्यात अत्यंत वेगळे गूण आहेत. त्यांना जगू द्या. आणि हे सगळ्याच पाळीव पक्षी, प्राणी ह्यांना लागू पडतं. 


अतिथी देवो भव


मध्यम वर्गीय महाराष्ट्रीयन कुटुंबात, बहुतांशी सगळ्यांकडेच पूजा अर्चा, नित्यनेमाने पोथी वाचन, स्तोत्र पठण, व्रत वैकले, उपवास ई. अगदी दररोजच्या रोजनिशीत आहेतच. खूप जण अनुग्रह घेतात, गुरु करतात, त्यामुळे त्यांची ठरवलेली साधना होणे अत्यावश्यक असते. आजी, आजोबा, आई बाबा, काका काकू, मामा मामी ई. सगळेच तन्मयतेने सगळं करतात. एवढ्यातच मी गावी गेले होते, माझ्या माहेरच्या ठिकाणी, आणि एका खास मैत्रिणीकडे उतरले होते. "त्याच्या" कृपेने तिचं घर अगदी भरलेलं आणि बहरलेलं असं आहे, गेली २६ वर्षे, एक नाही दोन नाही. आपली माणसं सभोवताली, अगदी उत्साहाने सगळे सामील होऊन दिनचर्या करणारे असे. काकू, तिच्या सासूबाई, म्हणजे माझी अजून एक लाभलेली खास मैत्रीण देखील अगदी प्रेमाने पूजाविधी ध्यानमग्न होऊन शास्त्रोक्त पद्धतीने, विधिपूर्वक करते. ज्या दिवशी मी पोचले त्या दिवशी गप्पांच्या नादात त्यांचं काही तरी वाचन राहून गेलं असं त्या म्हणाल्या. आम्हा दोघींना वाईट वाटलंच त्याचं.

 

आपल्या संस्कृतीत पाहुण्याला प्रचंड उच्च स्थान आहे. बरोबर ना? ह्यावरून मी सहज बोलून गेले काकूंना कि "अतिथी देवो भव". आज माझ्याशी मनापासून वैविध्य विषयांवर बोलण्यात वेळ गेल्यामुळे वाचन जरी राहून गेलं असलं तरी ते पोचलं त्याला. कदाचित हेच वाचन होणं असेल आज. आमचे विषय देखील पूर्णपणे आध्यात्मिक नसले तरी त्यावर आधारित होते, अगदी श्री राम आरती, अयोध्या, रामदास स्वामी, आधुनिक संतांची शिकवण, हार, फुले, प्रसाद, वाचन, लिखाण, जुन्याचे नवीन मॅपिंग, नवी पिढी, सवयी असे असंख्य होते. म्हटलं झाली तुमची पूजा / वाचन आजचं. असं देखील बघता येईल ना ह्या म्हणीला कधी तरी जर लागलंच तर, चुकीचे काहीच नाही त्यात. मी कधी रोज जाणार त्यांच्याकडे राहायला. किंवा असं जर कधी झालंच तर दृष्टिकोन बदला म्हणजे अपराधी वाटत नाही, किंवा उगाच मनस्ताप होतं नाही. अतिथीला म्हणजे मला अगदी माहेरपणापेक्षा जास्त काळजी घेतली गेली, खाऊ पिऊ घातलं गेलं, मस्त चक्कर झाली, देवदर्शन झालं, अगदी मला जे जे आवडतं ते ते आठवणीने भरपूर केलं. हे सगळं "त्याच्या" चरणाशी रुजू झालं, त्याची नोंद झाली. मग ह्याच अश्या खास अतिथीशी बोलतांना वाचन राहून गेलं असं म्हणण्यापेक्षा त्या दिवशी संभाषण, वैचारिक देवाण घेवाण झाली जी रोजच्या वाचनामुळे, सातत्यामुळे संभव झाली, नाही का? "असे पाहुणे येति आणिक स्मृती ठेवुनी जाती". 

रविवार, ११ फेब्रुवारी, २०२४

तो बहरलेला मोहोर


मी एवढ्यातच एका रस्त्यावरून जात होते आणि माझ्या चार डोळ्यांनी काही अद्भुत टिपलं. म्हटलं काही तरी वेगळं बघितलं, खात्री पटली नाही पहिल्यांदा. त्यानंतर दोन दिवस सलग त्याच रस्त्याने जाणं-येणं झालं आणि ते दृश्य बघून अचंबित व्हायला झालं. अगदी भर चौकात एक आंब्याचं मोहोराने बहरलेलं ते झाडं. त्याच्या आसपास फक्त सातत्याने वाहणारा रस्ता, किंबहुना आऊटर रिंगरोड, जो कधी म्हणजे कधीच शांत किंवा मोकळा नसतो असा. मागे भली मोठी इमारत आणि शेजारी भिंत. आता ह्या सगळ्यात कोठेही मानवी वसाहत नव्हती. त्यामुळे कोण खत पाणी देणार त्या झाडाला, कोण मशागत करणार? तर कोणी म्हणजे कोणीच नाही. चार प्रेमाचे शब्द कानावर पडत नाहीत, कोणीच अंगावरून हात फिरवत नाही. खाली बुंध्याशी माती पण नाही नो, आळ वगैरे तर सोडाच. कसे तरी ते झाडं ठेवलं आहे इमारत बांधते वेळी हे नशीब. तरी पण अश्या ठिकाणी असलेल्या झाडाला मग इतका प्रचंड बहर कसा काय आला? बरं त्याची फळं देखील दगडं मारून अवेळी सतत रस्त्यावरची लोकंच तोडणार, जखमा होणार, त्रास होणार. हे माहिती असून देखील झपाटल्यासारखा तो बहरलेला बघितला आणि फार वेगळं वाटलं मला. मुळे जाऊन जाऊन किती खोल जाणार आणि किती पाणी किंवा आवश्यक घटक शोषून घेणार? फार दुर्मिळ आहे ह्या मानवी सिमेंट च्या जंगलात. तरी देखील फुलांनी आणि सुगंधाने मुसमुसलेला तो बघून परमानंद झाला, खूप शिकवून गेला आणि वेगळी ऊर्जा  देखील तो मोहोरलेला बहर.


आपण मानव स्वतःला भयंकर आणि प्रचंड जगावेगळे हुशार बुद्धिवान समजतो सतत. सगळ्या सुख सोयी पायाशी लोळत असून, सगळे "त्याने" देऊन देखील सातत्याने तक्रारीचा च स्वर, जेथे बघावं तेथे. काय नाही, दुसऱ्याला काय मिळतंय ह्याची यादी तय्यारच असते नेहेमी. आणि हा पठ्या बघा, काहीही म्हणजे काहीही योग्य, उपयुक्त आणि गरजेचा  पुरवठा नसतांना (नैसर्गिक किंवा मानवी) बहरला आहे. प्रत्येकाला छाया, सावली आणि आंबट-गोड फळं देतोय आणि ते देखील निरपेक्ष, शांतचित्ताने, न बोलता. काय बोलावं ह्या बद्दल, मी तर निःशब्द झाले किंबहुना त्या अवलियाने मला निःशब्द केले असं म्हणावं लागेल. जागे व्हा लोकांनो, पुढे चला, देवाण घेवाण असते नेहेमी, मुक्त हस्ताने द्याल तरच मिळेल. इंग्लिश मध्ये सुद्धा गिव्ह अँड टेक आहे, हे कधीही विस्मरणात जाऊ देऊ नकाच.    

काहीच नाही


काही दिवसांपासून मी एक जाहिरात बघते आहे आणि तिच्या प्रेमात पडले आहे. प्रेमात ह्याच्या साठी कि त्यात एक फारच गोड, अतिशय हुशार आणि उत्सुक, चौकस, जिज्ञासू असा मुलगा दाखवला आहे. त्याचे कुरळे केस, चेहेऱ्यावरचे भाव प्रचंड भुरळ पडणारे आहेत. ती जाहिरात फारच मोठा संदेश देऊन जाते, अर्थात माझ्यासाठी, ह्या सगळ्या कारणांमुळे मी तिच्या आणि ज्याने अशी जाहिरात करावी ह्याबद्दल विचार केला त्यांच्या देखील प्रेमात पडले आहे. 


आई डेटॉल चा सर्वत्र वापर करत असते, उपयोगात आणत असते, त्या जाहिराती मध्ये आणि हा पठ्या तिच्या मागे मागे, सतत एक प्रश्न विचारात असतो. "असं डेटॉल सगळीकडे लावल्याने काय होतं?" आणि आई सांगते "काहीच नाही". तो पुन्हा विचारतो आणि आई पुन्हा तेच सांगते. सरते शेवटी आई म्हणते कशी डेटॉल लावल्याने कधीच कोणाला काही होतं नाही, कुटुंबातले सगळे सुरक्षित राहतात, किटाणू निघून जातात ई. आणि मग त्या पठ्ठ्याच्या डोळ्यातील चमक वाखाणण्यासारखी आहे. इतक्या लहान वयात इतकं अप्रतिम काम. क्या बात है?


अजून एक कारण:

मी अगदी न कळत्या वयापासून एक निरीक्षण केलं आहे माझ्या घरी कि आई प्रत्येक तय्यार केलेला पदार्थ देवासमोर आधी ठेवायची आणि मग सर्वांना खायला द्यायची, अगदी न्याहारी सुद्धा. त्यावेळी कधीच विचारलं नाही पण माझ्या हातून पण ते घडत गेलं आपोआप. माझ्या मुलांनी आणि एका सोशल मीडिया वर आलेल्या लेखात विचारलं होतं कि "हे केल्याने काय होतं?" आणि त्यावर अर्थात उत्तर होतं कि "काहीच नाही". देव कुठे खाणार हो फोटो आणि मूर्तीतून बाहेर येऊन. पण त्यामुळे अर्पण करण्याची भावना येते, "तो" सर्वश्रेष्ठ पहिल्यांदा आणि मग सगळे, ज्याने दिलं त्याला आधी समर्पण, सर्व मोठ्यांना आधी देण्याची, त्यांचा मान राखण्याची सवय होते, नतमस्तक व्हायला होते, हात जोडले जातात, त्याच्या समोर काही सेकंद उभे राहिले जाते, त्याचा आशीर्वाद मिळतो सातत्याने, ह्या सगळ्यांमुळे मग स्वस्थता, स्तभता, शांतात लाभते. ह्या सगळ्यांमुळे मग कोणाला काहीच होतं नाही. हो कि नाही. असं आहे त्या मागचं गमक. 


माझी माउली तर नवीन आणलेला प्रत्येक घटक "त्याच्या" समोर ठेवायचीच, मग ते कपडे असोत, फळं, बक्षिसं आणि औषधे सुद्धा. त्यामुळे ह्या सगळ्या संस्काराबद्दल फक्त एवढंच म्हणू शकते "काय वर्णू तव गूण अल्पमती नारायण".  


https://www.youtube.com/watch?v=eKCA5cYx7EM

शुक्रवार, २ फेब्रुवारी, २०२४

जलतरणपटू

 

एका राष्ट्रीय स्तरावर, समुद्रात आणि ओलीम्पिक सारख्या भल्यामोठ्या शर्यतीत तब्बल एक नाही, दोन नाही तर १६ वर्ष वैविध्य स्तरावर जलतरण केलेल्या जलपरीसोबत आज प्रवासाचा योग आला. अहो भाग्य माझे, फार कमी वेळ होता सोबत पण त्यात काही अंशी माहिती मिळाली. जगावेगळे स्वानुभव, प्रशिक्षक, ती प्रचंड शिस्त, ठराविक आहार, आणि "त्याच्यावर" अतोनात श्रद्धा. हे सगळं जमेल तेवढं मी आत्मसात करण्याचा प्रयत्न केला. पण अजून काही भेटी नंतरच जास्त आणि अनोखी माहिती मिळेल. इतक्या तरुण वयात इतक्या संधी उपलब्ध झाल्या आणि त्यांचं ह्या परीने चीज केलं. बरं इतकी वर्ष फक्त स्विमिंग एके स्विमिंग केलं का? तर नाही. चार पिढ्यांची नाती मनापासून सांभाळी, माणसं जोडली, खूप वाचन केलं आणि ते स्पष्ट मी अनुभवलं ज्या पद्धतीने हि परी चपराख आणि अनोखे शब्द प्रयोग करत होती. शेअर मार्केट मध्ये माहीर इतक्या लहान वयाची मुलगी मी आज पर्यंत बघितली नाहीच. मग ते केकचं व्यापार असो, नाही तर भला मोठा मॉल ह्या परीला त्यांचे सगळे आकडे अगदी तोंडपाठ आहेत. इंग्रज आणि बाकी आले, राज्य करून गेले आणि तिथपासून कॅपिटल मार्केट ची कशी नीव बांधली गेली ह्याची सुद्धा इतंभूत माहिती आहे ह्या पिटुकलीला. क्या बात है? हे काय कमी होत म्हणून पौष्टिक आहाराची खडान्खडा माहिती. जेन झी बद्दल संपूर्ण स्वभाव आणि हाताळण्याचे मंत्र मुखोद्गत. "काय वर्णू तव गूण..." असं काहीसं झाला होत मला आज. सर्वात महत्वाचं म्हणजे, इतके काही इतक्या कमी काळात कमावून सुद्धा पाय अगदी जमिनीवर घट्ट रोवलेले असे. माझ्याशी अगदी अदबीने साधेपणाने प्रवास केला. खूप शिकण्यासारखं आहे ह्या जलपरीकडून. पुन्हा मला अवश्य भेटायला आणि भरपूर किस्से ऐकायला खूप आवडेल मला निश्चित.   

मिसेस आनंद जयशेट्टे हे त्यांचं नाव. डॉ. आनंद हे नॅशनल कायदा विश्वविद्यालय औरंगाबाद येथे कार्यरत आहेत. ह्या त्यांच्या अर्धांगिनी. मी एवढ्यातच गेले होते ह्या विश्वविद्यालयात दोन दिवसीय संशोधन वर्कशॉप घ्यायला तेव्हा पुण्याला परत येतांना त्या सोबत होत्या. "चार तास भारावलेले" असा तो अनुभव होता. 

गुरुवार, १ फेब्रुवारी, २०२४

निवड


प्रत्येक टप्प्यावर परीक्षा असते हे फारच लहानपणापासून मी ऐकत आले आहे, शिक्षकांकडून, थोरा मोठ्यानं कडून, आई वडील आणि इतर. त्यावेळी वाटायचं फक्त शाळेत परीक्षा असतात ज्या कठीण असतात. एकदा मोठ्ठं झालं, महाविद्यालयांत गेलं कि सगळं रंगी बेरंगी आणि सोप्पं. अर्थात माझ्या वेळेला खरंच ते थोडसं सोप्पं होताच म्हणावं. 


मध्ये एकदा मला एका संस्थेच्या कुलसचिवांचा दूरध्वनी आला, मला आमंत्रण देण्याकरता होता तो. एक वोर्कशॉप घ्यायचं होतं. तारखा ठरवल्या गेल्या, मग बदलल्या गेल्या आणि मग दिवस, असे अनेक चर्चा सत्र झाले आणि मग थोडीशी शांतता होती. मी म्हटलं नक्की काय होतंय? आणि इतक्या मोठ्या मंडळींना जमेल का मला काही माहिती द्यायला? काय झालं असेल नक्की? होणार ना माझे वोर्कशॉप? ई. 


परवा मी त्या संस्थेत पोचले. ठरल्याप्रमाणे कुलसचिवांना, बाकी मोठ्या मंडळींची भेट घेतली, आणि नंतर व्हाईस चॅन्सेलर सर ह्यांच्या दफ्तारात गेले. अगदी मोजक्या शब्दात त्यांनी ऐकून घेतलं, ते बोलले आणि म्हटले कसे, कुलसचिवांनी तुमचे नाव सुचवले पण मी माझ्या ओळखीच्यांना पण विचारपूस करून, माझा वेळ घेऊन मग परवानगी दिली. तेव्हा समजलं कि जो थोडासा वेळ / अवधी लागत होता सगळं ठरायला तो का ते. व्हाईस चॅन्सेलर सरांची खात्री पटली कि योग्य व्यक्ती येतोय हि माझ्यासाठी खूप मोठी शाबासकी होती. ह्यावर मी पुढचे सगळे क्षण जगेन अत्यानंदाने. ह्या वयात जाणवतंय "दिवस तुझे हे फुलायचे झोपाळ्यावाचून झुलायचे". 

२२ जानेवारी २०२४


"आजी सोनियाचा दिनू..." अशी सर्व भारतीयांची अवस्था झाली होती ह्या दिवशी, हे सर्वश्रुत आहे. एक फक्त ८५ वर्षांचे तरुण व्यक्तिमत्व मला भेटायला त्यांच्या कचेरींतुन बाहेर आले, माझ्याशी बोलले, पोटभर हातरखून नाही तर अगदी मनापासून आशीर्वाद दिले. हि माझी त्यांच्याशी केवळ दुसरी भेट आहे. परवाच अगदी काही मिनिटांसाठी त्यांचा वेळ ठरवून मी भेटायला गेले होते. आज म्हणतात कसे, आज म्हणजे १ फेब्रुवारी ला पुन्हा एकदा २२ जानेवारी चा आनंद उपभोगला. जणू काही माझ्या ह्या विश्वविद्यालयात सोहोळा सुरु होता. जो तो मला संशोधन कार्यशाळेबद्दल सांगत होता, त्यात हजर राहण्यासाठी उत्सुक होता, आणि मला भेटत देखील नव्हता. प्रत्येकाला लगबग होती ह्या कार्यशाळेत सांगितलेल्या गोष्टी आत्मसात करण्याची, अगदी जसे कि अयोध्येत होती. हे म्हणणारे ८५ वर्षांचे तरुण म्हणजे त्या विश्वविद्यालयाचे व्हाइस चॅन्सेलर सर. ह्या पेक्षा जास्त मोठी शाबासकी कोण आणि कधी देणार मला. मी कृतकृत्य झाले. सगळे श्रम कामी आले. पेरलेल्याची फळे दृष्टीस पडत आहेत. आणि हे सर नक्कीच तोंडारवर बोलण्यापुरते कधीच असे म्हणणार नाहीत ह्याची खात्री आहे. प्रत्येक अणूरेणूला शतशः मनःपूर्वक धन्यवाद ज्यांनी माझी जडणघडण केली, विश्वास ठेवला, पाठीवर थाप दिली.  

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...