बुधवार, १८ मे, २०२२

उत्साही मदतनीस

जसे एक दिवस अचानक ऑनलाईन क्लास ची लाट आली अगदी तशीच कदाचित थोडीफार फरकाने ऑफलाईन क्लास ची गाडी सुरु झाली, असं म्हणायला हरकत नाही. ह्या गेल्या -. वर्षात प्रकर्षाने माझ्या पायांना संगणक वापरून शिकवायची भलतीच सवय लागली, आत्मसात झाली आणि अंगवळणी पडली म्हणायला हरकत नाही. अचानक आलेल्या ऑफलाईन नावाच्या वादळामुळे मग जरा धांदल उडालीच माझ्या पायांची. त्यांना सवय व्हायला थोडा अवधी द्यावा लागेलच. त्यामुळे जरी दिवसातला रोजनिशीनुसार दुसरा वर्ग असला तरी देखील मी त्या वर्गाच्या आजूबाजूला ठाण मांडून बसणे ह्याला प्राधान्य देते. आज देखील अगदी तस्सेच झाले. मी वर्गात म्हणजे बेंच वर बसण्याचा आनंद उपभोगत होते, माझ्या क्लास ची वेळ झाली विद्यार्थी विद्यार्थिनी यायला सुरवात झाली आणि मी ठरवल्याप्रमाणे माझ्या दोन आवडत्या विद्यार्थिनींना एक विनंती केली. मला काही दिवसांपूर्वी झालेल्या परीक्षेचे पेपर दाखवायचे होते. तेव्हा माझ्या केबिन ची किल्ली दिली आणि दोघी गेल्या रमत गमत अत्यानंदात. मी जरा खाली वर करायचं टाळतेच त्यामुळे आणि आल्या कि दोघी काही मिनिटात. बघते तर काय अहो आश्चर्यमय. मला माझ्याच चार डोळ्यांवर विश्वास बसला नाहीच. काहीही बोलता चुपचाप ते पेपर्स माझ्या सुपूर्त केले, किल्ली परत दिली आणि शिवाय काहीतरी. म्हटलं वा वा . फारच म्हणजे फारच जगावेगळ्या हुषार निघाल्या ह्या दोघी, म्हणजे मला खात्री होती, ते त्यांच्या वागणुकीत झळकत होतं पदोपदी पण आज अनुभव पण आलं. मला का कुणास ठाऊक ह्या नवीन पिढीबद्दल अनेकदा मनात विचार आला कि ह्या सर्वांना फक्त आयतं हवं सगळं, फक्त सांगितलेलं कामचं करतात, त्यांच्या डोळ्यांना आजूबाजूचं दुसरं तिसरं काहीच दिसत नाहीच कधीच . . पण नाही हो, मी चुकीचा विचार करत होते, किंबहुना मला चुकीचे विचार शिवून जात होते.

माझा वर्ग होता, त्या वर्गात मी फक्त झालेले पेपर दाखवणार होते आणि त्यावर चर्चा करणार होते कारण माझं सगळं शिकवून झालं आहे आतापर्यंत. वर्ग म्हटला कि हजेरी घेणं आलंच उपस्थित मुलामुलींची, नाही का? आणि सगळंच ऑफलाईन म्हटल्यावर हजेरी पण वहीत नोंदवायची असते. हे मला नाही पण आजच्या माझ्या तरुण विद्यार्थिनींना लक्षात आलं आणि त्या पेपर्स सोबत माझ्या खोलीतून फक्त त्यांच्या वर्गाची हजेरीची वही पण सोबत घेऊन आल्या, मी सांगता सवरता. क्या बात है? वा वा मला इतका आनंद झाला कि जो तोडक्या शब्दात पेरणं अतिशय अवघडच आहे. पण मी हा छोटासा प्रयन्त केला आहे आणि आता मला निश्चित खात्री आहे कि ह्या दोघी मस्त काम करतील नेहेमीच, लोकांना आवडतील ह्यांच्या स्वभावामुळे आणि प्रगती पथावर नक्की मार्गक्रमणा करतीलच नेहेमीच. मला हि कृती फारच भावली आणि ह्या दोन्ही फक्त विद्यार्थिनी नाही तर ज्यांनी ज्यांनी हा छोटेखानी प्रसंग आज अनुभवाला त्या सर्वांना ह्या गोड आठवणी दिल्याबद्दल धन्यवाद आणि त्यांच्या विचारसरणीला दंडवत, आदाब, सलाम, प्रणाम....  मी अनेकदा वर्गात गोष्टींच्या स्वरूपात, कधी काही बातम्या तर कधी अनुभव . सांगून भंडावून सोडते विद्यार्थ्यांना कि सर्वंकष, सर्वांगीण विकास फार महत्वाचा आहे तुमच्या पिढीला, कुठल्याही प्रकारची नोकरी सुरु करण्याआधी. नाविन्यपूर्ण विचार करा, शिकवलेलं लागू करा, वेगवेगळ्या पद्धतीने विचार करण्याची सवय ठेवा, वरिष्ठ आणि ग्राहकाला नेहिमी उत्तमोत्तम आणि नाविन्य गोष्टी देत राहा मागता . आता बहुतेक ह्या सगळ्या वायफळ बडबडीची गरज नाही भासणार असं दिसतंय, हे विद्यार्थी तय्यार आहेत जगाला वेसणी घालण्यासाठी. "अश्या विद्यार्थिनी असती आणि स्मृती देऊनी जाती".    

तसे तर मला माझे सगळेच विद्यार्थी खूप म्हणजे खूपच आवडतात, त्यांच्या कडून खूप काही शिकते मी, ते मला तरुण ठेवतात, पण आज ह्या दोघीनी जी चुणूक दाखवली ती मनापासून आवडली म्हणून हा पंक्ती प्रपंच.

लगोरी

हा शब्द उच्चारला रे उच्चारला कि ते उत्कृष्ट लहानपणीचे दिवस आठवतात जेव्हा आमच्या गल्लीत आम्ही सगळ्या मैत्रिणी तासंतास लगोरी आणि इतर खेळ खेळत असू, दररोज, चूकता. आत्ता असं वाटतंय कि व्हावं सुरु ताबडतोब, लगोरी खेळावी पोटभर, त्या पिटुकल्या बॉल चा मार खावा आणि नेम धरावा पुन्हा एकदा. जगावे ते दिवस पुन्हा एकदा.

तर ह्या शब्दाची का आज अचानक आठवण झाली? सांगते. आज मी खबरदारी म्हणून, कदाचित भूक लागेल म्हणून जरा जास्त गोष्टी आणल्या होत्या डब्यात. दररोज पेक्षा जरा जास्त आणि त्यात माझ्या दोन मैत्रिणींना मी काहीतरी आणून दिलेले डब्बे परत मिळाले आजच. त्यामुळे अक्षरश: माझ्या केबिन मधे आज नव्या प्रकारची लगोरी मांडली गेली आहे, रंगबिरंगी वैविध्य आकाराच्या डब्यांची अशी. अहाहा . सगळं घरचं, इतक्या वेगळ्या चवीचं खायला मिळालं ह्याचा अतिशय आनंद झाला आहे मला. आणि "चेरी ऑन केक" म्हणजे लगोरीची आठवण झाली. फक्त एका बॉल ची आणि त्या माझ्या लहानपणीच्या सवंगड्यांची कमी आहे आज आत्ता. ह्या निमित्याने का होईना आजच पुन्हा एकदा त्या सगळ्याजणींना शोधून काढण्याचा प्रयत्न करते पुन्हा एकदा. ऑनलाईन का होईना भेट झाली तर लगोरी आणि बऱ्याच आठवणी निघतील आणि त्या विश्वात पुन्हा रममाण होता येईल. बघितलं गेलं तर साधे डब्बे, रोज माझ्यासोबत चक्कर मारायला गाडीत बसून येणारे, गरम चटके सहन करणारे, ते फक्त एकावर एक रचले तर हि अनुकथा रचली गेली बघा. शुन्यातून साकार झालेली छोटीशी कलाकृती जशी. असेच नेहेमी इकडे तिकडे बघत राहा, लक्ष ठेवत राहा, कुणास ठाऊक कुठल्या आठवणी खुणावून जातील ते, भूतकाळाची सहज सफर घडवून आणतील ते आणि हवाहवासा वेगळा स्मृतिगंध दरवळून जातील ते वेगळंच.

सुमधुर कारलं

कारलं कडू असतं? छे छे, अजिबातच नाही ह्याचा प्रत्यय मला ह्या आधी पण आला आहे अनेकदा आणि आज तर निश्चितच झालं कि कारलं अतिशय चविष्ट असतं, कडवटपणा फिरकतं पण नाही आजूबाजूला, इतकं भन्नाट आणि उत्तम. पौष्टिक असून थोडसं दुर्लक्षित असं, पण आजपासून तर माझं कारल्यावरचं प्रेम जास्तच वृद्धिंगत झालं आहे. इतकी जेवले आज मी, कि पूर्णपणे तृप्त झाले, कारल्याच्या विश्वात रमले जणू.

तर त्याचं अस्स झालं कि मी थोडसं काहीबाही माझ्या सख्यांसाठी करून आणलं होतं, आणि तो डब्बा माझी मैत्रीण घरी घेऊन गेली. तिला अगदी खात्रीपूर्वक पक्के माहित होते कि मला काय हवं आहे ह्या डब्ब्यात भरून. बघा ना आता साधारण १० एक वर्ष एकत्र काम केल्यामुळे असेल कदाचित पण माझ्यापेक्षा जास्त मला ओळखणारे आहेत आजूबाजूला. हे बघूनच ओतप्रोत व्हायला होतं, एक वेगळी ऊर्जा सतत देऊन जातं. तर आज सकाळ इतकी सुंदर सुरु झाली एका खास सुप्रभात ह्या मेसेज ने आणि त्यानंतर पाऊसच पडला जसा. अजून एक घरचा अप्रतिम चवीचा डब्बा मिळाला, आणि मग हा कारल्याच्या भाजीचा. शिवाय माझे डब्बे होतेच. सोन्याहून पिवळे, स्वर्गाहून सुंदर, ह्या जगापलीकडले असे झाले मला, अनुभवायला मिळाले.

एक छोटासा प्रसंग आठवला मला हे लिहितांना. एक डान्स शो आहे टीव्ही वर फार प्रसिद्ध असा. त्यात एक सुप्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक परिक्षक म्हणून काम बघतात. ते माझ्या दृष्टीने ह्या जगावेगळे आहेत. कारण त्यांचं वागणं, बोलणं, आणि अर्थातच त्याची ख्याती. त्यांचं एक खास वाक्य आहे, ते नृत्य सादर झाल्यावर आणि त्यांना मनापासुन आवडल्यावर असं म्हणतात "अगर मैने आपके साथ स्टेज पर के डान्स नाही किया तो फिर  क्या किया?". आधीच एवढ्या मोठ्या पदावर असलेला, प्रसिद्धीच्या यशशिखरावर यशश्वी रित्या राज्य केलेल्या सुप्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक परिक्षकाकडून हे ऐकणं हि सर्वांसाठीच पर्वणी असते. ह्या परीक्षकानुसार दरवेळी आणि पदोपदी प्रत्येकाकडून खूप काही शिकण्यासारखं आहेच. आणि त्याच मुळे ते नवनवीन स्टेप्स शिकत असतात, नवीन मुलामुलींना प्रोत्साहन देत राहतात सातत्याने.

ह्या नृत्यदिग्दर्शक परिक्षकाच्या वाक्यावरून मला हे सुचतंय सध्या कि "ह्या प्रेमळ माऊलीच्या हातची कारल्याची भाजी नाही खाल्ली तर आयुष्यात काय खाल्लं? काहीच नाही". त्यामुळे नक्की चाखा, मी खात्री देते नेहेमीच ह्या काकुंच्याच हातची चाखत राहाल. ज्याने कारलं कधीच चाखलं नाही त्याला तर निश्चित हे उत्कृष्ट चविष्ठ आणि गोड लागणार ह्यात शंकाच नाही, नेहेमी खावं असेच वाटणार. अन्नपूर्णा प्रसन्न असलेल्या काकूंच्या हातच्या कारल्याचा विजय असो. मनापासून हीच प्रार्थना कि असाच डब्बा नेहेमी मिळत राहो आणि माझ्या जिभेचे चोचले पुरले जावोत ह्या अतिशय वेगळ्या चवीच्या भाजीने कारण त्यात एक प्रेमाचा वेगळा ओलावा आणि मसाला घातला आहे, जो दुर्मिळ आहे, फक्त ह्या काकूंकडे उपलब्ध आहे. शेतकरी तर सर्वोपयोगी कारलं तय्यार करतोच, पण ह्या काकूंच्या हातच्या चवीमुळे त्याला वेगळा साज चढतो, चवीचा, जी कुठल्याही दुसऱ्या ठिकाणी मिळणारच नाही. कारलं आणि कडू, छे छे?

बाकी इतर अनेक कारणं आहेतच पण ह्या कारल्याच्या भाजीमुळे मला श्रुती आणि तिच्या सासूबाई ह्या एकाच घरातल्या दोन डॉक्टर मैत्रिणी लाभल्या आणि जवळपास १० वर्ष आम्ही क्वचित भेटता देखील सानिध्यात आहोत. कमाल आहे कि नाही? "अश्या डॉक्टर मैत्रिणी असती आणि स्मृती देऊनी जाती".

रविवार, १५ मे, २०२२

हिशोब

ह्या शब्दाचा साधा अर्थ म्हणजे उरली सुरली देवाण घेवाण पूर्ण करणे असा होतो, मग तो पैश्याचा व्यवहार असो किंवा अजून काही. ह्या व्यतिरिक्त अजून एक अर्थ पण साजेसा आहे ह्या शब्दाला तो म्हणजे एखाद्याने तुम्हाला भेट म्हणून काही दिले प्रेमाने तर ते त्याला किंवा अजून कोणाला तरी परत करणे. नेहेमी हिशोब साफ ठेवावा असं म्हटलं जातं आणि बहुतांशी सगळेच ठेवतात, अपवाद असतात आणि असावेत. कोणाला कधी कुणाची / कशाची गरज भासेल सांगता येत नाही. कदाचित ह्यामुळेच असेल आपल्या भेटीगाठी ह्या माणसाच्या हातात ठेवल्या नाहीतच "त्याने". प्रत्येक भेटी मागे काही ना काही तरी दडलं असतं हे निश्चित. एकतर कोणाला तरी काहीतरी शिकायचं असतं, द्यायचं किंवा घ्यायचं असतं. हि देवाण घेवाण विचारांची असते, कृतीची असते, गोष्टींची असते किंवा अजून काही. त्या व्यक्तीच्या संपर्कात आलं कि अनाहूतपणे शिकलं किंवा आत्मसात केलं जातं च. ते कदाचित शब्दांच्या पलीकडले असेल, कुठल्याही आकड्यात मांडण्यासारखे नसेल पण निश्चित शिकलं जातंच. प्रत्येक भेट सुनिश्तिच असते, ठरलेली असते, पण कधी कुठे केव्हा हे मात्र गुपित असतं. आणि ती प्रत्येक भेट वृद्धिंगत करून जाते ह्यात शंकाच नाही. बरं भेट हि फक्त दोन व्यक्तिंमधेच होते आणि तीच सर्वोपयोगी असते का? तर नाही मंडळी. भेट हि इतर सर्व सजीव निर्जीव वस्तू, ठिकाणं, पदार्थ, ई. सर्वांशी शक्य आहे आणि जी  नवीन काही तरी शिकण्याला कारणीभूत ठरू शकते, हिशोब चुकता करायला मदत करते आणि स्मृती देऊनी जातेच. ह्या सगळ्याच भेटी बहुतांशी चांगल्याच स्मृती देऊन जातात, चांगलेच शिकवून जातात आणि एक वेगळं समाधान देऊन जातात, कुठेतरी हे जाणवतं भेटीचं खास कारण, त्या भेटीचा उपयोग, त्या भेटीमागचं कारण / अनेक कारणं. कधी कधी अचंबित करणारं घडून जातं अगदी माणसाच्या / बुद्धीच्या आकलनापलीकडचं असं. त्या भेटीच्या स्मृतीचा गंध / सुगंध हा सर्वदूर पसरतो आणि कदाचित त्यामुळे आणि "त्याच्या" हिशोबाप्रमाणे पुढील भेटीचं कारण ठरत असेल. त्या स्पंदनांचा प्रचंड मोठं नेटवर्क असावं असं वाटतंय. त्यामुळे सगळ्याशी होणाऱ्या भेटीगाठी ह्या त्या सर्व श्रेष्ठ ऊर्जेने ठरवलेल्या असतात त्यात शंका न घेता सातत्याने नवनवीन गोष्टी शिका, अनुभवा, पुढे न्या, पसरवा आणि अत्यानंदाचा स्वाद घेत राहा. सरतेशेवटी माणसाने आयुष्यभर शिकायचं च असतं, कळत नकळत तो शिकत असतोच, हे त्रिवार सत्य आहेच. 

शुक्रवार, १३ मे, २०२२

जागतिक मातृ दिन

एवढ्यातच संपूर्ण जगात "मातृदिन" साजरा झाला. जगरहाटीप्रमाणे एका रविवारी हा दिवस खास ठरला. या दिवसाच्या निमित्ताने माझ्या शेजारी राहणाऱ्या एका काकूंशी झालेले माझे हितगुज मी येथे मांडत आहे.

त्यांच्या म्हणण्यानुसार, प्रत्येक मुलाने, मुलीने, भाची-भाच्याने किंवा सुनेने आपल्या आईला किंवा आईसमान व्यक्तीला या दिवशी वर्षातून किमान एकदा तरी नक्की भेटले पाहिजे, फोन केला पाहिजे आणि वेळ घालवला पाहिजे. जमल्यास एखादी भेटवस्तूही दिली पाहिजे; कारण आईने बाळाला जन्म दिला, अनंत यातना सहन केल्या आणि त्याला वाढवले. त्यामुळे आईचे धन्यवाद मानलेच पाहिजेत, असे त्यांचे परखड मत होते. मी देखील त्यांना शुभेच्छा द्यायला गेले होते, म्हणून मग मी त्यांचे सर्व विचार शांतपणे ऐकून घेतले आणि त्यानंतर माझे विचार मांडले.

माझ्या मते, ग. दि. माडगुळकरांच्या या ओळींमध्ये सांगितल्याप्रमाणे: "बाळा होऊ कशी उतराई, तुझ्यामुळे मी झाले आई"

"आई" हे श्रेष्ठ स्थान आपल्याला त्या बाळामुळेच मिळाले आहे ना? मग सर्वात प्रथम धन्यवाद त्या बाळाला द्यायला हवेत असे मला वाटते. ते बाळ जन्माला आले नसते, तर जगातली ही सर्वोच्च "आई" पदवी आपल्याला कधीच मिळाली नसती. त्यामुळे माझ्या दृष्टीने नाण्याची ही दुसरी बाजू देखील तितकीच, किंबहुना कणभर जास्त महत्त्वाची आहे.

म्हणूनच मी या दिवशी माझ्या लेकरांना धन्यवाद देते आणि त्यांची माफी देखील मागते. कारण जेव्हा ते माझ्या पोटी आले, तेव्हा मी सुद्धा "पहिलेच आई" (पेहेलटकरीण) झाले होते. त्यामुळे माझ्याकडून काही चुका होणे अगदी स्वाभाविक होते. माझे हे मनोगत त्या माझ्यापेक्षा वयाने आणि मानाने श्रेष्ठ असणाऱ्या काकूंनी ऐकले आणि त्यांना ते मनापासून पटले. त्या म्हणाल्या, "अगं, मी या विषयाची ही दुसरी बाजू कधीच बघितली नव्हती. बरं झालं तू सांगितलंस, आता मी देखील हा विचार अंगीकारणार आहे."

खरे तर, मी स्वतः आई होण्यापूर्वीपासूनच "शिक्षक दिन" किंवा "गुरुपौर्णिमा" या दिवशी नित्यनियमाने माझ्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत आले आहे. कारण ते नसते तर मी "शिक्षिका" झालेच नसते. सातत्याने मला माझ्या विद्यार्थ्यांकडून जे शिकायला मिळते, ते माझ्यासाठी अमूल्य आहे. कोणत्याही पुस्तकात सापडणार नाही, असे विविध स्तरांवरचे ज्ञान मला त्यांच्यामुळे मिळते. माझे विद्यार्थी मला विचारांनी सदैव तरुण ठेवतात, हे माझ्यासाठी खूप मोठे बक्षीस आहे.

प्रत्येकासमोर मनापासून आणि मनातल्या मनात नतमस्तक व्हावे. नाण्याची दुसरी बाजू असते हे नेहमी लक्षात ठेवा. ती पाहिल्यास जमिनीवर पाय घट्ट रोवून उभे राहण्याचा जो परमानंद मिळतो, तो जगावेगळा असतो. मला हे अनेक वर्षांपासून नकळत जमले आहे. तुम्ही सुद्धा हे करत असालच, पण नसेल तर एकदा प्रयोग म्हणून करून बघा, त्याची गोडी नक्की लागेल.

एकदा खाली दिलेल्या ओळी पुन्हा मनापासून वाचा, तुम्हालाही माझे विचार नक्की पटतील:

बाळा होऊ कशी उतराई तुझ्यामुळे मी झाले आई

गुरुवार, १२ मे, २०२२

मोज (फुट)पट्टी

त्या काळी माझ्या लहानपणी च्या वेळी थोडसं वेगळं वाटेल वाचायला पण माझ्या बाबांना चहा करायला, थोडासा स्वयंपाक करायला, स्वयंपाक घरात मदत करायला मनापासून आवडायचं. का कुणास ठाऊक. म्हणायचे कसे, तुम्ही दोघी करू शकता ग, पण मग काय मी आयत बसून खायचं? असो. त्यामुळे मला आई आणि बाबा, जास्त करून बाबाच टिप्स द्यायचे. आई चा प्रखर बाणा, मी शिकवणार नाही, खातांना काय काय घातलं असेल ह्याचा अंदाज घ्यायचा आणि तसे स्वतः पदार्थ करत करत शिकायचं. बास.

पण बाबा नेहेमी म्हणायचे, किंवा आईला अनेकदा मावशींना सांगतांना ऐकलंय मी कि आधी भाजी फोडणीत शिजवायची आणि मग रस्सा करण्याकरता कोमट / गरम करूनच पाणी त्यात घालायचं, थंड नाही, भाजीची चव, पोत / रचना / बांधणी ई. बिघडते आणि मग जिभेला समजतं ते. तेव्हा समजायचं नाही असं का, आता लक्षात येतंय, भाजी शिजतांना / फोडणी घातल्यावर तिचं तापमान गरम असणार. मीठ, साखर / गूळ, चवीला मसाले घातले कि मग शिजण्याची प्रक्रिया सुरु होणार. ती चविष्ठ होण्यासाठी मग थंड पाणी वापरलं तर त्या भाजी ला, फोडींना एक प्रकारची कदाचित शिरशिरी आल्यासारखी वाटणार आणि तो तापमानातील फरक मग त्या भाजीची चव नक्की बदलणार ह्यात शंकाच नाही कारण शिजण्याची प्रक्रिया थोडीशी बदलणारच. त्या भाजीला बोलता आलं असतं तर तिने सांगितलं असतं ह्या बद्दल. थोडासा विषय बदलते आहे पण अगदी बाळांना टब मधे बसून किंवा मांडीवर / पायांवर घेऊन आंघोळ घालतांना सुद्धा पाण्याचं तापमान तपासलं जातच, प्रत्येक वेळा, अनेक वेळा. आई / आजी आधी हात घालून तपासतात आणि मग गाणी गप्पा मारत आंघोळ घातली जाते. माझ्या सारख्या आधुनिक आईला बदकांचा आधार होता. ते बदक रंग बदलायचे जर पाण्याचं तापमान जास्त असेल बाळासाठी तर. अहाहा च. थोडसं गार पाणी अंगावर पडलं किएकदम शिरशिरी येतेच. तसेच जास्त गरम पाणी वापरलं तर चटका बसण्याचा धोका असतो.

आपल्या सर्वच नाते संबंधात अगदी तस्सेच आहे, नाही का? संबंध, बोलणं, भेटणं, वागणं, चौकशी करणं, चांभार चौकशी करणं कसं मर्यादेत मोजूनमापून राखावं / ठेवावं, कमी जास्त प्रमाण झालं कि मग एक तर शिरशिरी येते नाहीतर चटका बसू शकतो, चव गडबडते, तो गोडवा टिकून राहात नाहीच.  त्यामुळे आधीच आणि नेहेमीच काळजी घ्या मंडळी, म्हणजे सगळेच खुश.

बुधवार, ११ मे, २०२२

जिवलगा, राहिले रे दूर घर माझे !

मी शाळा कॉलेज मधे असतांना साध्या सुगम संगीताच्या, भक्तिसंगीताच्या क्लास ला जायचे. खूप सुंदर शिकवायच्या त्या मॅडम. मला शास्त्रीय संगीतात रुची नव्हती म्हणण्यापेक्षा बैठक निर्माण करण्याची ताकद नव्हती, त्यामुळे "दुधाची तहान ताकावर", माझी आवड आणि आईची इच्छा म्हणून मनापासून शिकत होते. त्यावेळी मुभा होती, वेळ होता, ऊर्जा तर प्रचंड त्यामुळे खूप गाणी शिकता आली विविध प्रकारची. त्यातलेच हे एक. खूप छान बसवून घेतलं होत हे गाणं माझ्याकडून त्यावेळी आणि आवाज पण चढायचा. किंबहुना आवाजाला धार लागावी म्हणूनच असेल कदाचित हे एक ठेहेराव असलेलं गाणं निवडलं गेलं होत खास, हे आत्ता प्रकर्षाने जाणवतंय.

कदाचित हे सगळ्यांसोबतच होत असेल पण मला थोडंफार समजायला लागल्यापासून ते आजपर्यंत एकच ठाऊक आहे मला कि घर म्हणजे आई बाबा, सर्वस्व म्हणजे आई बाबा, श्वास म्हणजे फक्त ते दोघे, त्यांनीच व्यापलं होतं माझं सगळंच. फार उशीरा कदाचित पुस्तकातून, शिक्षकांकडून उमगलं कि सजीव आणि निर्जीव असे दोन भाग असतात. माझ्या मते घर निर्जीव कधीच नव्हतं माझं, ती वस्तू कधीच नव्हती कारण त्यात मला खूप खूप आधी पासून माझ्या आई वडिलांचे कष्ट, प्रेम, माया, ओलावा ई. हेच भासत, दिसत आणि जाणवत होतं सतत. पुढील शिक्षणासाठी जे मी बाहेर पडले ते कायमचीच. त्यामुळे "ते" घर खूप खूप दूर राहिले हे मात्र निश्चित, का? काय चुकलं माझं? असं का होतं? नको व्हायला हो... हे लिहितांना देखील हृदयाला असंख्य छिद्र पडतांना जाणवतंय मला. ते घर दृष्टीआड झाल्यावर मिळाल्या त्या फक्त भिंती, वस्तू, कोरडे पाषाण बास. त्या घराकरता, त्या माझ्या आईवडिलांकरीता माझ्या हातून मात्र काहीही घडलं नाहीच. मी फक्त घेत राहिले आणि ते देत राहिले सतत. आता खूपच उशीरा ह्या सगळ्यांची जाणीव होते आहे, पण आता वेळ निघून गेली, हातातून वाळू निसटून जावी तशी. हे ओझं घेऊन जगणं अशक्य आहे पण इलाज नाहीच. आणि तसं घर मला उभं करता आलं नाही हि खंत तर आहेच. ह्या सगळ्यातून खूप अनुभवायला मिळालं हे निश्चित.

जीवलगा ह्या करता कि अगदी पहिल्या दिवशीपासून आईबाबा माझे कधी मित्र, शिक्षक, वाटाड्या, गुरु, समवयस्क, भाऊ / बहीण, विद्यालय, शब्दकोश, समुपदेशक ... म्हणूनच राहिले, अलगदपणे न अंतर बाळगता, हे समजलंच नाही.

"सुखसुमनांची सरली माया पाचोळा वाजे", त्या घरात होतं ते सुख, त्या अंगणातल्या फुलांना होता तोच सुगंध आणि आताच्या घरात तर पाचोळा जमा देखील होत नाही, वाजण्याचा प्रश्नच नाही.

"घेशील केव्हा मज हृदयाशी"? हा विनंती वजा प्रश्न आणि "त्याच्या" कडून उत्तराची वाट बघत पुढील मार्गक्रमणा करणार मी, हे निश्चित.

आदरणीय शांताताई शेळकेंचे प्रत्येक शब्द आणि त्यांची गुंफण मला फार भावली, म्हणून त्या बद्दल लिहिलं आणि त्या आधी पुन्हा एकदा वाचलं, तुमच्या करता येथे देते आहे, जरूर वाचा अजून एक अनुभव ह्या गाण्या संदर्भातला. 
https://www.aathavanitli-gani.com/Song/Jivalaga_Rahile_Re_Dur 

 
शब्द + अर्थ = शब्दार्थ, स्वर + अर्थ = स्वरार्थ, भाव + अर्थ = भावार्थ, पण सध्या "ते" घर दृष्टीआड झाल्याचं प्रकर्षांने जाणवल्यामुळे जो अश्रूंचा वाहता प्रवाह आहे त्याला काय म्हणायचं? अश्रू + अर्थ = ?.

अश्रूच अर्थपूर्ण आहेत, असतात आणि म्हणून त्याला वेगळा अर्थ देऊन नवीन शब्द घडवायला नकोच, ह्या बाबतीत तरी, नाही का?

विज्ञान जाऊ दे पण अश्रू इतके खारट का असतात ते उमगलं मला, आज.


2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...