शनिवार, ११ जून, २०२२

ऐकावे ते नवलंच

चारधाम यात्रेचे महत्व सर्वश्रुत आहेच. आयुष्यात एकदा किंवा एकापेक्षा जास्त वेळा हि यात्रा करावी असे आपले पूर्वज सांगून गेले. ह्या यात्रेला फक्त सामाजिक आणि धार्मिक महत्व नसून वैज्ञानिक दृष्टिकोन पण आहे. हि यात्रा केल्याने यात्रीकरुला मानसिक समाधान मिळतं पण एकंदरीत ह्या यात्रेचा अनुभव गाठीशी असण्यासारखं भाग्य दुसरं नाहीच. बहुतांशी भारतीय हि यात्रा करतात, सफल होतात, मग बाकी मंडळींना उत्साहाने वर्णन कथन करतात, लिखाण करतात, आताशा विडिओ फॉर्म मधे देखील सार्थ वर्णन उपलब्ध आहेच, ह्या त्यांच्या सर्व प्रयत्नांमुळे पुढील पिढीला किंवा त्या घरच्याच नाही पण बाकी सर्व मंडळींना उत्साह येतो हि यात्रा करण्याचा आणि हि श्रृंखला अशीच सुरु राहते. एकदा सफल यात्रा करून आल्यावर ती पुन्हा करण्याची इच्छा होणं ह्यातच सर्व आलं, पण ती पणाने तडीस नेणं ह्या करता आशीर्वाद तर लागतातच पण मानसिक भरारी देखील आणि हे सगळं जर फक्त वय वर्ष ८६ त करायचं ठरवलं तर, डोक्यात आलं तर? "श्री. दत्तगुरूंचे" ज्यांच्यावर भरभरून आशीर्वाद आहेत, असे आमचे बाबा इतक्यातच चार धाम यात्रेला जाण्यास तय्यार आहेत, पुन्हा एकदा. माझ्या मते कुठलेही देवस्थान, यात्रा, ठिकाण, स्थळ काही म्हणजे काही राहील नाही बघायचं त्यांचं. सगळं झालं आहे. प्रचंड उत्साह अगदी प्रत्येक गोष्टीत मग ते खाणंपिणं असो, क्रिकेट असो, देशपरदेशी हिंडणं असो, नाही तर साधना असो, सगळ्यात अग्रक्रम त्यांचाच, नेहेमीच. अर्थात त्यांची साथ देण्याकरता सज्ज झाले आहेत त्यांचे थोरले सुपुत्र, लहान भाऊ आणि वाहिनी देखील. आमच्या बाबांकडून खूप काही शिकण्यासारखं आहेच, शिवाय कृतीतून त्यांनी अनेकदा खूप काही दर्शवलं पण आहे. नवतरुणांना लाजवेल असा सळसळता उत्साह, ताकद, मनाची तय्यारी आणि जिद्द, ह्याच्या जोरावर लवकरच हि यात्रा सफल होणार ह्यात काही शंकाच नाही.  ह्या आमच्या सर्व मंडळींना ह्या यात्रेकरता शुभेच्छा आणि अशीच त्यांची मार्गक्रमणा ह्या पुढे अनेक वर्ष सातत्याने सुरु राहो हि श्री. दत्तचरणी प्रार्थना.   

एकटा

एकटा ह्या शब्दाची परिभाषा आणि एकंदरीत मतितार्थ मजेशीर आहे. एकटं राहणं अजिबातच सोप्प नसतं कुणालाच, मग ते छोटं बाळ असो, किंवा आजी अथवा आजोबा, कोणीही माणूस कोणत्याही वयात. दोन पध्दतीचे एकटेपण नजरेस पडतं ह्या समाजात वावरतांना, एक म्हणजे खरंच त्या व्यक्तीच्या आजूबाजूला कोणीही नसतं अनेक कारणांमुळे (भागीदार / सवंगड्याचं देवाघरी जाणं, नवीन पिढी परदेशी स्थाईक असणं किंवा अजून काही), स्वतः ठरवून आधुनिक अश्या सर्वसोयीनी युक्त ठिकाणी राहणं ई. दुसरं म्हणजे असंख्य मंडळी आजूबाजूला असून देखील एकटेपण अनुभवणं. जर एखादी व्यक्ती गोतावळ्यात राहून एकटी आहे किंवा एकटी झाली आहे, दोन्ही बाबतीत स्वतःला स्वतःच्या स्वाथ्यासाठी तरी अनेकविध कामात व्यग्र ठेवणं अतिशय गरजेचं आहे, आणि ते शारीरिक + मानसिक + थोडसं अध्यात्मिक + सामाजिक + बौद्धिक अश्या स्वरूपाचं असावंच.  आपल्या शारीरिक, मानसिक आणि आर्थिक गणितांना सांभाळून पण गुंतून राहणं अत्यावश्यकच. घरकाम हे सगळ्यात भन्नाट, मग बागकाम घरचं नाहीतर सोसायटीतलं, वाचन, लिखाण, वैविध्य खेळ (बैठे, मैदानी ई.), हटके पदार्थ करणे, व्यायाम, गप्पा, संगीत, वाद्य, सल्ला, मदत, जुन्या लोकांशी भेट, सामाजिक कार्य, शिकवणे, अनुभव कथन आणि उपयोग, कला ई.  एकटेपणा जाणवू लागल्यावर मग त्यावर तरणोपाय शोधून काढण्यापेक्षा आधीच त्यावर काम करा, नियोजन करा आणि पाळा, म्हणजे मग एकटा हि सौंज्ञा शब्दकोशातून नाहीशी होईल.

हि झाली नाण्याची एक बाजू.

ह्याच नाण्याची दुसरी बाजू देखील आहे हो, ती म्हणजे आताशा एक नवीन खूळ तक धरू पाहतंय, ते म्हणजे "मी टाईम" म्हणे. एकटेपण मागून घेतात लोकं, त्यासाठी आदळआपट पण करतात आवश्यक असल्यास, एकट्याने लग्न करू पाहतात आणि आयुष्यभर एकटे राहण्यावर भर देतांना आढळतात, सर्वत्र. आणि हे सर्व करणारी मंडळी आहेत तरुण, ऐन उमेदीच्या काळात हे सगळं. हे जे सगळे मागतात ते खऱ्या अर्थाने एकटेच राहात असतात म्हणजे सतत एकट्याने मोबाईल वर तासंतास डोकं घालून बसायचं, एकट्याने ऑफिस ला जायचं यायचं, खाणंपिणं सगळं एकटंच आणि तरी देखील त्यांना "मी टाईम" पाहिजे, अर्थात अपवाद असतातच सगळीकडे, तसे इथेही सापडतील.

ह्या सध्याच्या पिढी च्या आधी सोशल मिडिया नावाचं खूळ नव्हतं म्हणून लोक एकमेकांशी भेटीगाठी करतं असतं / होत असे, सण समारंभ मोठ्या प्रमाणात, सातत्याने लोकांचे येणंजाणं असायचं त्यामुळे एकटेपण जास्त प्रमाणात जाणवत असेल जर एकट्याने राहायला लागलं तर. असो.

गोळाबेरीज अशी कि तारुण्यात आनंदाने भरपूर पेरा, काम करा आणि जमापुंजी साठवा, आणि उतारवयात ती अत्यानंदाने वापरा म्हणजे वेगळ्या अर्थाने बहरता येईल प्रत्येकाला. एकटेपण, छे छे, ते काय असतं? असं काही असतं का?

सौंदर्याचं गमक

प्रत्येक अनोखा सण / दिवस / क्षण साजरा मग तो वाढदिवस असो, प्रेम-दिवस, बढती, काहीही खास व्यक्त करायचं असेल तर सुगंधी फुलांचा आधार घेतोच. त्या फुलांचा सुगंध तो खास क्षण अजून वृधंगीत करतो, म्हणून जगभर सुगंधी फुलांना प्रचंड मागणी आहे. पण फक्त फुलांचा सुगंधच महत्वाचा का मंडळी? तर त्याचं दिसणं देखील तितकचं भाव खाणारं. आता ट्युलिप्स च्या बगीच्यांचंच घ्या ना, सौंदर्य अगदी मैलोन्मैल पसरलेलं. त्या तुमच्या कॅमेरात न टिपत्या येण्यासारखंच. पुष्पगुच्छा साठी ठराविक फुलं वापरली जातात, गजऱ्यासाठी फारच वेगळी, हारासाठी त्याहून निराळी तर फुलदाणीसाठी भलतीच. माझ्या दृष्टीने गजऱ्याची मुळ शोभा घनदाट आणि काळ्याभोर  वेणी / केसांमुळे, प्रत्येक फुलांची शोभा त्यांच्या आजूबाजूला असलेल्या हिरव्यागार विविध छटांमुळे, पानांच्या आकारांमुळे, करड्या रंगांच्या फांद्यांमुळे, काळ्याशार मातीमुळे, ट्युलिप्स च्या शोभेला आकाशामुळे चारचाँद लागतात... प्रत्येक सुगंधाला आणि सौंदर्याला अवतीभोवतीचे अनेक घटक कारणीभूत असतात. आज नंतर / आज पासून फक्त फुलांना धन्यवाद नाही तर पानांना, फांद्यांना, मातीला, हवेला, सुर्यकिरणांना, प्राणवायुला, प्रत्येकाला द्या. कारण साधं आणि सरळ आहे, जमीन, फांद्या, पानं नसती तर फुलं आलीच नसती हो / त्यांचं अस्तित्वच निर्माण झालं नसतं.  मुळात सुगंध आणि सौंदर्य हे प्रत्येक सजीवाच्या संपूर्ण "लाईफ प्रोसेस" अक्का ठराविक नैसर्गिक प्रक्रियेमुळे आहे, हे नेहेमी ध्यान्यात असू द्या, एकट्याने कदापी काहीही होणे नाही. त्यामुळे कृतज्ञ राहा सदोदित. प्रत्येक अणुरेणू महत्वाचा, मान द्या आणि घ्या, बहरत राहा सदा.

विरुद्ध दिशा

प्रत्येक जण, सजीव व्यक्ती, प्राणी, पक्षी, माणसं अगदी सगळे म्हणजे सगळेच पुढे जात असतात, तसेच प्रयन्त सुरु असतात सतत, नाही का? बाळ आईच्या पोटात कणा कणाने वाढतं, जन्माला आलं कि "जीवन चक्र" सुरु होतं पुढे सरकण्यासाठी च. मग शैक्षणिक क्षेत्रात देखील पहिली ते दुसरी मग तिसरी ... चढता क्रमच, नोकरीत / धंद्यात, कमावण्यात, दोनाचे तीन / चार होणे, एक मजला मग दुसरा, छोटी गाडी नंतर भली मोठी ई. चालूच राहतं सतत, आणि चालू राहणं म्हणजेच "त्याचा" भरभरून आशीर्वाद, नाही का. आधीच्या वर्गातून पुढील वर्गात जाणं म्हणजे बुद्धी शाबूत असण्याचं प्रतीक, शारीरिक समृद्धीची शाश्वती, मोटर स्किल्स शाबूत असण्याची ग्वाही ई. इतकं सगळं ठाऊक आहे, स्वतःला आपण सर्व स्मार्ट आणि जगावेगळे हुशार समजतो, मग सगळ्याच बाबतीत पुढे का नाही जात प्रत्येकजण? विरुद्ध दिशेने का प्रवास आणि थांबा निवडतो बहुतांशी सर्वच जण? इतकं सोप्प नसलं तरी प्रयन्त होतांना का दिसत नाहीत? "रात गई बात गई" इतकं सहज आहे तसं पाहायला गेलं तर, मग "त्याने मला अमक्या वर्षा पूर्वी तमकं म्हटलं", "तो/ती अशी तशी वागली माझ्याशी", "बघून घेईन", ई. विचारांनी सगळे विरुद्ध दिशेला मार्गक्रमणा का करत असतो, घरी दारी प्रत्येकवेळी तेच तेच. सोडा मंडळी, प्रयन्त कराच. प्रत्येक दिवशी नवा सूर्य उगवतो हो, नवीन सुगंध घेऊन फुलं उमलतात, मातीचा सुगंध प्रत्येक वेळी हवाहवासा च वाटतो, नवीन असल्यासारखा, मग सगळं इतकं अप्रतिम नावीन्यानी भरपूर असतांना मनानी मागे का जायचं?  मळभ दूर सारा आणि निरभ्र आकाशाला गवसणी घाला हो, प्रत्येक क्षण / दिवस = सण, तो आनंदाने साजरा करा. 

गाय

माझं भाषेवर अतोनात प्रेम का आहे हे मला अनेकदा जाणवलं होतं पण आज ते समजलं / उमगलं एका वेगळ्या पद्धतीने. सध्या व्हाट्स उप नावाचा सखा सर्वांच्याच परिचयाचा आहे आणि तो सर्वांच्या आवडीचा देखील आहे. ह्या व्हाट्स उप ला वापरून आपण एका व्यक्तीशी किंवा संपूर्ण समुदायाशी संपर्क साधू शकतो, चर्चा करू शकतो वैविध्य विषयावर. ती चर्चा सुरु करण्याआधी ग्रुप मधे मुलं मुली असल्यामुळे आपण अभिवादन करतांना "नमस्कार मंडळी" असं काहीसं संबोधतो सर्वांना. इंग्लिश भाषेत "गुड मॉर्निंग गाईज" असं काहीस. कित्ती विचारपूर्वक लिहिणारा लिहितो बघा, एकाच वेळी सर्वांना दंडवत, ग्रुप मधल्या सर्व तरुण आणि तरुणी, काही भेदभाव नाहीच.. ज्याने कोणी हा शब्द शोधून काढला आहे तो पण कित्ती धन्य बघा हो. तसं पाहायला गेलं तर गाय म्हणजे स्त्रिलिंगी म्हणजे मुली आणि अंग्रेजीतलं गाय म्हणजे तसं पाहायला गेलं तर मुलगा. आहे कि नाही मज्जा. चला तर मग मराठी कट्ट्यावर अंग्रेजीत लिहून देखील सर्वांचं मन जिंकूया, कमी वेळेत गड सर करू यात कारण मजेशीर भाषा आपल्या सोबत आहेत.

बेटा हा पण त्याच पठडीतला अजून एक शब्द, लिंगभेद नाहीच, आणि प्रचंड प्रेरणा देऊन जाणारा, सगळे एक सारखे भासवणारा. मी इतकी नशीबवान आहे कि माझ्या शेजारी पंजाबी, मानलेला भाऊ आणि त्याच अख्ख कुटुंब पंजाबी, आधीचे डायरेक्टर पंजाबी त्यामुळे बेटा हा भिनलाय / इम्युन झाला आहे शब्द अगदी. सगळेच महत्वाचे, प्रत्येक जणच मनापासून कामं करतात पण "जिभेवर मध" पेरणे महत्वाचे, शब्द, उच्चार, भावना, आदर, मान फार महत्वाचा. न होणारी कामं सहजतेने होतील, इतकी ह्या दोन अक्षरी शब्दात ताकद आहे, हो ना गाईज? 

चला तर मग ह्याच नोट वर सर्वांना बाय, आणि टाटा, असेच शुभेच्छांचे मेसेजेस टाकत राहा आणि सर्वांची आठवण ठेवत ग्रुप सजीव ठेवा.

गुरुवार, ९ जून, २०२२

उत्साह कश्यामुळे

गेले अनेक दिवस कचेरीत जरा वेगळं वातावरण आहे, खूप जास्त आणि वेगळं काम आहे, सगळेच जुंपले आहेत. त्यामुळे संध्याकाळी घरी पोचल्यावर देखील डोक्यात कामाचे विचार असतात आणि थोडं थकल्यासारखं वाटतंच. ओळींनी गेले अनेक दिवस असं झाल्यामुळे आणि जरा वाहतूक कोंडी मुळे काल थोडा उशिरच झाला पोचायला आणि त्यामुळे देखील थोडा आणखीन थकवा जाणवला. पण काय महद आश्चर्य घरी पोचले तर आमच्या संपूर्ण मजल्यावर एक भलताच अप्रतिम / जगावेगळा खूप बळ आणि उत्साह देऊन जाणारा असा सुगंध होता, जो मी अनुभवाला. साधारणतः धूप लावल्यावर येतो अगदी तस्सा पण फारच वेगळ्या जातीचा धूप होता तो आणि त्याला एक अध्यात्मिक झालर होती असं म्हणायला हरकत नाही. तो सुगंध माझ्यासाठी आणि माझ्या सारख्या चाकरमान्यांसाठीच होता जणू, कि घरी पाऊल टाकण्या आधी ऊर्जेने भरून जा, असं काहीसं. महत्वाचं म्हणजे माझ्या घरी अश्या पद्धतीचा धूप नाही, शेजारी पाजारी विचारपूस केली तर त्यांच्याकडे पण नाही, मग विचार करण्यासारखी गोष्ट आहे का नाही? मग ठरवलं कि फक्त आनंद लुटायचा, भरभरून तो सुगंध साठवायचा मनात आणि मनापासून त्या श्रेष्ठ उगमस्थानाला हात जोडायचे, बास. संपूर्ण रात्र उलटली मंडळी आणि आज पण मोठी परीक्षाच आहे माझी / आमची कचेरीत, त्याच विचारात घरातून बाहेर पडले सकाळी आणि अहो आश्चर्यम, अगदी कालचा सुगंध जणू माझी वाट बघत थबकला होता माझ्याच साठी फक्त. खूप शुभ संकेत मिळाला फक्त आजच्याच कामासाठी नाही तर एकंदरीत पुढील संपूर्ण वाटचालीसाठी, योग्य मार्गावर आहे हे सांगण्यासाठी, पाठीवरून / डोक्यावरून आशिर्वादात्मक हात फिरवण्यासाठी कदाचित, निश्चित. त्या संपूर्ण अनुभवाला पुन्हा एकदा दंडवत.  कोण म्हणतो परमेश्वर नाही, आई वडिलांचे / थोरामोठ्यांचे आशीर्वाद नाहीत, किंवा "त्याचं" माझ्याकडे लक्षच नाही ई. मग हे काय आहे मंडळी? त्याने फक्त माणसांच्याच रूपात यायचं का? त्याचं अस्तित्व जाणवून देण्याची काय हि अनोखी पद्धत ना? आणि खरंच तो सुगंध अनुभवण्यासारखाच होता. खूप क्षण / दिवस / महिने पुरेल एवढा उत्साहाचा खजिना देऊन गेला तो सुगंध मला. मी भाग्यवानच.

हिरा चमकतोच

गेले अनेक वर्ष मी वैविध्य गोष्टी / कथा / बोधकथा ऐकते आहे झाडांबद्दल, त्यांच्या वाढीबद्दल आणि त्यांना मिळणाऱ्या पोषक खाद्याबद्दल. झाडांची मुळं सर्वदूर पसरतात ह्याची अनेक कारणे आहेत त्यातली काही म्हणजे झाडाला मजबुती येण्याकरता, त्यांना लागणारे पौष्टिक घटक मिळण्याकरता ई. पौष्टिक घटक आणि पाणी मिळवण्यासाठी झाडांच्या मुळांना फारच धडपड करावी लागते आणि ते कष्ट स्पष्ट दिसतात फळं, फुलं, उंची, रुंदी, लांबी, सावली ई. कडे बघून.  चांगलं पाणी, भरपूर प्रमाणात / किंवा लागेल तेवढं पाणी, खत, चांगल्या दर्जाची माती, वेळोवेळी  उकरणे / काळजी घेणे हे सगळं केलं तरच झाडाची मस्त वाढ होते हेच मला ठाऊक होतं. दररोज मी ज्या रस्त्यावरून जाते ऑफिसाला तेथे एक नदी वजा नाला आहे. बोलू नये पण ती नदी / नाला नीट संगोपन केलेला नाही आहे, आजूबाजूला वस्ती आहे, झोपड्या आहेत त्यामुळे बहुतांशी सर्वत्र घाणीचं साम्राज्य आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. काही वर्षांपूर्वीची स्वच्छ नदी आणि आज चा नाला म्हणजे नैसर्गिकरित्या भरपूर झाडं आलीच आजूबाजूला, कारण एक म्हणजे वाहतं पाणी आणि त्यामुळे सुपीक जमीन. पण आता जी दुर्दशा झाली आहे / केली आहे ती बघवत नाही. त्याचमुळे असेल कदाचित कि मी त्या रस्त्याने जातांना वर बघण्याला जास्त प्राध्यान देते. दररोज मला प्रचंड अगदी नव्या नवरीसारखा / अंगात आल्यासारखा जगावेगळा फुललेला गुलमोहोर नजरेस पडतो. अगदी त्या नाल्यात उभं आहे हे गुलमोहोराचं झाड दिमाखात. इतकं बहरलं आहे, कि मी दररोज फक्त त्याचं सौंदर्य निहाळतच बसते, डोळ्यात साठवत राहते, पापणी देखील न हालता. इतकं ते नैसर्गिक सौंदर्य लाभलेलं झाडं आहे. मग मला प्रश्न असा पडला कि २००७-८ पासून मी नदीची झालेली अवस्था बघते आहे, झाडाचं पण वय खूप आहे, वृक्ष आहे तो, मग त्याला नको स्वच्छ पाणी, खतं, संगोपन? ई. सर्वत्र सदानकदा आजूबाजूला फक्त कचरा असतांना इतका दिमाखदार कसा डौलाने उभा आहे हा? मला आढळलेलं उत्तर हे, कि आजूबाजूची परिस्थिती बदलणं हे आपल्या हातात नसतं, ते बदलणं हे आपलं ध्येय पण नसतं, पण असलेल्या परिस्थिती उत्तम कामगिरी करणं, आनंदाने बहरतं पुढील मार्गक्रमणा करणं हे फक्त आपल्या हातात आहे. सध्या सर्वत्रच गुलमोहोराची अनेक झाडं / वृक्ष दृष्टीस पडतात पण ह्याच्या इतकं बहरलेलं, खुश आणि दिमाखदार झाडं हे एकच. हिरा हा नेहेमीच चमकतो हे लक्षात ठेवा. हे झाड खूप काही शिकवतं / खुणावतं आहे सर्वांना, मला, आणि खूपच उत्कृष्ट उदाहरण आहे. माझी गाडी त्या वृक्षाच्या बाजूने जातांना जणू काही आमचं मूक संभाषण होतं दररोज जणू काही. माझे बाबा नेहेमी सांगायचे कि झाडासारखे व्हा, देत राहा, अपेक्षा नकोतच. झाडं फक्त फुलं अथवा फळं, सावली, लाकूड, प्राणवायू ई. देतात हेच फक्त मला माहिती होतं पण बघा हा पठ्ठा काय नवीन देतोय, जगावेगळी  शिकवण, जी कधीही कोणत्याही पुस्तकात कदाचित दिलं नसेल आणि खूपच कमी शाळेत / अभ्यासक्रमात शिकवत असतील.  

हिरा हा नेहेमीच चमकतो, कमळ पण चिखलात उगवतं आणि ह्या गुलमोहोरासारखं सर्व आजूबाजूच्या ना नेत्रसुख देतं, प्राणवायू पुरवत अगदी नकळत आणि अपेक्षा विरहित.

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...