मंगळवार, ३ जानेवारी, २०२३

दुसरं लग्न

काही अंशी संशोधक एक क्लुप्ती वापरतात, पेपर लिहितात आणि प्रसिद्ध जर्नल ला पाठवतात. ते जर्नल मग पेपर वाचून पोटतिडकीने काही महत्वाचे मुद्दे मांडतात आणि पाठवतात, अर्थात पेपर ऍक्सेप्ट  / accept होत नाही. पण उद्देश अगदी तोच असतो. पेपर ऍक्सेप्ट  / accept होणे हा नाही तर उत्कृष्ट आणि आपल्या डोळ्यांना न दिसलेल्या गोष्टी ती उच्च पदस्थ अधिकारी शोधून काढतात, त्यामुळे मग संशोधकाला त्या सगळ्या गोष्टी वर काम करून त्याचा पेपर उत्कृष्ट दर्जाचा तय्यार करता येतो. खरं पाहिलं गेलं तर असे संशोधन काय कामाचे? पण बाकी इतर असंख्य कामे करता करता छोटेखानी पेपर लिहिता आला तरी चालतं, म्हणून हि प्रथा रुजत चालली आहे. 

का कुणास ठाऊक पण मला ह्यावरून दोन गोष्टी ध्यानात आल्या, १. लिव्ह-इन प्रकार, २. दुसरं लग्न. पहिल्या लग्नात झालेल्या चुका किंवा राहून गेलेल्या गोष्टी मोजून मापून, जपून, दुसरे वेळी साधल्या जातातच, फक्त मुलामुलींकडून नाही तर अक्ख्या कुटुंबियांकडून. हे योग्य नाही, पण असेच घडते आहे लिव्ह-इन मधे नाही का? राहून बघा, पटलं तर ठीक नाही तर टाटा बाय बाय. दुसरी वेळ मग जास्त काळजी पूर्वक घेतली जाते. पहिल्या लग्नात सर्वच नवीन, माणूस म्हटलं कि चुका आल्याचं. हे बरोबर नाही पण प्रवाह पतित होणं आवश्यक आहे. किंवा पहिली वेळ हि दुसरी आहे हे गृहीत धरून वागलं तर? कित्ती सुकर होईल ना लग्नात. मग ते हळूहळू संशोधन पेपर काय किंवा कुठल्याही कामात तसेच घडेल देखील, कोणास ठाऊक. बघा. जो  उपाय पटेल तो आजमावा. पण ह्याला त्याला दोष देत बसू नका, कार्यरत राहा. नेहेमीच.  

सोमवार, २ जानेवारी, २०२३

नवीन वर्ष

आपल्या देशात तरी नववर्ष दोनदा अत्यंत उत्साहाने साजरे केले जाते, एकदा दिनदर्शिकेनुसार आणि दुसऱ्यांदा तिथी नुसार, जसे कि गुढीपाडवा च्या दिवशी. तर मग नववर्ष वर्षातून फक्त दोनदाच साजरे होते का? तर त्याचं उत्तर आता शोधू या. प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगवेगळा आणि त्यामुळे तुम्ही बघाल दिसणार आणि अनुभवणार. काही शैक्षणिक संस्थेमधे सुट्यांसाठी (EL, ML, CL etc.) १ जानेवारी ह्या तारखेला नवीन वर्ष सुरु होते. संस्थेमधे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे मूल्यमापन किंवा मूल्यांकन करण्यासाठी १ एप्रिल ते ३१ मार्च असे वर्ष धरले जाते, म्हणजे मूल्यांकन नववर्ष १ एप्रिल ला सुरु होते. कर दात्यांचे नववर्ष पण १ एप्रिललाच नाही का सुरु होत. अगदी तसे 

  • तुम्ही नवीन घरात राहायला गेलात कि एक नववर्ष सुरु होतं त्या वास्तूत 
  • नवीन लग्न झाल्यावर एक खास आणि वेगळंच नावीन्याने भरपूर असे वर्ष सुरु होते 
  • नवीन बाळ जन्माला आलं, नवीन गाडी / नोकरी, बढती, ई. सुद्धा नवीन वर्ष चालू होतं 
  • नवीन बाळ जन्माला आल्यावर त्या बाळा करता पण आणि नवीन आई वडील म्हणून पण नववर्ष 
  • दसरा दिवाळी, नवीन शेतीचे उत्पन्न, किंवा शेतीतले कोंब / हंगाम = नववर्ष 
  • हि यादी भली मोठी आहेच, शिवाय तुम्ही बघाल तेव्हा, आवडेल तेव्हा, सुचेल तेव्हा, घडेल तेव्हा तुमचं नवीन वर्ष. 
  • शाळा असो, विद्यापीठ असो, विद्यार्थ्यांना नववर्ष असतं, आपल्या देशात साधारणतः जून-जुलै मध्ये नवीन वर्ष सुरु होतं. 

नवीन वर्षाची परिभाषा बदलण्याची आता वेळ नक्कीच आली आहे, किंबहुना आपण ती पाळतो नकळत पण आता त्याला औपचारिक रूप द्यायला पाहिजे. ह्याने इथे जाऊन नवीन वर्षाची पूर्वसंध्या साजरी केली, तो तिकडे गेला होता, त्याने अशी मजा केली त्याने तशी.... काय खात्री? आजकाल तंत्रज्ञानाचा वापर करून काहीही कुठलेही फोटोस तय्यार करता येतात. आणि दुसऱ्याने काय केलं हे बघून नाराज होण्यापेक्षा तुम्ही कशाला महत्व दिलंत ते बघा. ३१ डिसेम्बरला नागरीकांच्या सुरक्षितेसाठी जास्तीचा पोलिस फोर्स तैनात केला गेला होता, दरवर्षी हा आकडा वाढतच चालला आहे. ३१ डिसेंबर असून देखील काही वैद्यकिय व्यक्ती हजर होत्या, हॉटेल मधे मोठ्या प्रमाणात वाढपी आणि स्वयंपाकी होते आणि असे अनेक व्यवसाय आहेत ज्या माणसांना देखील ३१ ला मौज मज्जा करावी वाटणं स्वाभाविक आहे पण ते नाही करू शकले, कधीही करू शकत नसतील मग त्यांनी काय करायचं? 

आमच्या सोसायटी काही जोडपी आहेत ज्यांच्याकडे लहान बाळं आहेत आणि ते बाळ ती दोघे एकट्याने सांभाळतात. मग त्यांनी काय करायचं?

काही जणांकडे वयोवृद्ध आई-वडील असतील ते पण जाऊ शकणार नाहीत खूप तास पार्टीला, ३१ तारखेला, मग? 

त्यामुळे प्रत्येकवेळी, प्रत्येकवर्षी, प्रत्येकाला नाही जमलं ३१ ला बाहेरचं जाऊन हुंदडायला तरी देखील वेगळ्या धाटणीतली पार्टी सहज शक्य आहेच. लावा जोर, ठरवा वेगळं काही तरी आणि करा एन्जॉय. बाहेर गेल्यानेच एन्जॉय होतो असे नाहीच मुळी. निराश होण्यासारखं काहीच नाही ह्यात. निराश वगैरे होण्याचे कारण देखील नाही हे. जागे व्हा, आनंदी राहा, तुमच्या पद्धतीने जगा, दोष देत बसू नका दुसऱ्याला, नशिबाला, काय नाही करता आलं त्याला, त्या ऐवजी जे जमलं आहे आज पर्यंत ते बघा, त्याकडे लक्ष द्या, आपलं जग निर्माण करा, तुलना करण्यात वेळ, ऊर्जा, पैसा वाया घालवून संबंध बिघडण्यापेक्षा नवीन काही तरी सतत करत राहा. 

पिटुकला तरणोपाय

माझ्या कचेरीच्या इमारतीचे ७ मजले आहेत. माझा संगणक विभाग चौथ्या मजल्यावर आहे. आम्ही गेले काही महिने ह्या नवीन बांधलेल्या मजल्यावर आलोत. त्या वेळेपासून मी लिफ्टने जा-ये करते चौथ्या मजल्यावर. इतके महिने सातत्याने लिफ्ट वापरली पण माझ्या एक गोष्ट ध्यानात आली नाही. अगदी पिटुकली आहे ती गोष्ट पण माझ्या साठी महत्वाची अशी. बरीच कामं असतात दिवसभर, खूप गोष्टी ध्यानात ठेवाव्याच लागतात कितीही तंत्रज्ञानाचा वापर वाढला असला तरी. एवढा छोटासा माझा मेंदू, काय काय म्हणून ध्यानात ठेवणार ना, कित्ती पटीने लक्षात ठेवण्या सारख्या गोष्टी वाढल्या आहेत, अमर्यादित जश्या. आता त्यालाच माझी प्रचंड काळजी, आणि नेहेमीच हो, फक्त आताच नाही.  अजून एक माहिती लक्षात ठेवायला नको म्हणून "त्याने" एक पिटुकला तरणोपाय शोधला, केवळ माझ्यासाठी. म्हणजे मी कित्ती महत्वाची आहे त्याच्या करता, त्याच्या इतक्या करोडो भक्तांमधून हे पुन्हा एकदा निश्चित झालं आणि मी पुन्हा एकदा निश्चिन्त झाले.  माझा फ्लॅट चवथ्या मजल्यावर आहे आणि योगायोगाने आमचा विभाग देखील त्याच आकड्याच्या मजल्यावर. म्हणजे दोन ठिकाणी दररोज ये-जा करतांना कणभर पण जास्तीची माहिती लक्षात ठेवायला नको, त्यामुळे चुकामुक नको जर घडलीच तर आणि त्यामुळे वेळ दवडायला नको ई. अहाहा च. कित्ती झकास ना? क्या बात है? ४ / ५ / ६ ह्या मजल्यांवर देखील माझं ऑफिस / माझी बसायची जागा देता आली असती, पण नाही झालं तसं. बाकीच्यांचं मला ठाऊक नाही पण मला तर हि गोष्ट / काळजी फारच भावली. अप्रत्यक्ष रित्या एक वेगळी ऊर्जा मिळते जेव्हा माझ्या साठी कोणी तरी काही तरी मोठ्या प्रमाणात करतात. त्यातली हि एक खास. वेगवेगळे मजले असते तर लक्षात ठेवावं लागलं असतं किंवा ठेवलं गेलं असतं काही दिवसांनी पण ती वेळच येऊ दिली नाही माझ्या बाबतीत त्याने. मानावे तेवढे आभार अपुरेच "त्याचे". अशीच कृपादृष्टी कायम राहू दे हि प्रार्थना. 

मोबाईलला सफर

माझं कॉलेज जरा लवकर सकाळी सुरु होत असल्यामुळे रस्त्यावर प्रचंड प्रमाणात कष्टकरी नजरेस पडतात, कोणी व्यायाम करतं, कोणी धावतं, कोणी वायुवेगाने किंवा जमेल तस्स चालतं आणि इतर बरेच. प्रत्येकाकडे मात्र एक साम्य आढळून आलं. एक दिशादर्शक यंत्र त्यांच्या पुढे पुढे चालत, पळत, धावत असतं. मग मला विचार पडला कुठलेही वय असो, स्त्री / मुलगी/ मुलगा / पुरुष कोणीही म्हणजे कोणीही हे यंत्र प्रत्येकाकडे अग्रगणी का? इतकं महत्व का त्याला? कोण नक्की व्यायाम करतंय? आणि काय, चमत्कार / साक्षात्कार झाला आज, मला सापडलं हो उत्तर, अगदी चपराख असं ते उत्तर. हे जे दिशादर्शक आहे ना ते इतरांसाठी इतके कष्ट घेतं असतं दिवस रात्र सदोदित कार्य चालूच, अथक प्रयत्न आणि कुठलीही विश्रांती म्हणून ठाऊक नाहीच. त्याला बिचाऱ्याला शांतता, स्तभदता, आराम वगैरे माहित नाही, खिजगणतीत नाहीच त्याच्या. अश्या व्यक्तिमत्वाला मग दररोज सकाळी चुकता व्यायाम, ताजी हवा, भटकंती . नको? अतिशय गरजेची आहे, तरच तो पुढचा दिवस रात्र काम करेल ना? त्यामुळे हे सगळे मानवजीव ह्या त्यांच्या दिशादर्शकाला अग्रगणी ठेवतात, आवर्जून भ्रमंती करायला चुकता घेऊन जातात, म्हणजे एका दगडात दोन पक्षी हो, त्या दिशादर्शकाला नेणं पण आणि त्या निमित्याने स्वतः चालणं पण, कित्ती म्हणजे कित्ती तो सुविचार आणि तो देखील दुसऱ्यासाठी, आई गं, डॊळे पाणावले माझे पट्टाकिनी. मी नाही जात कधी व्यायामाला त्यामुळे मी हे अनुभवलं नाही पण नजरेस पडलं आणि शब्दात पेरण्याची गरज भासली.

 हा तो दिशादर्शक सातत्याने मानवी हाताचे प्रेशर पॉईंट्स दाबतो, ऍक्युप्रेशर घडते आपोआप त्यामुळे, अवयवा पुढचे महत्व प्राप्त झाले आहे ह्या मूक जीवाला जणू. "जेथे जातो तेथे तू माझा सांगाती" असं काहीसं, इतकं अनन्य साधारण महत्व आहे ह्याला. हे सगळं जरी मान्य असलं, अगदी दररोजचं जगणं अशक्य झालं असलं ह्या साथीदाराशिवाय तरी तुमच्या स्वतःचं काही अस्तित्व आहे का नाही? एक स्थान? दुसऱ्या सजीव जिवांचं काय जे तुमच्या अवतीभोवती असतात, वावरतात? अहो जागे व्हा आता तरी. ठेवा तो दिशादर्शक बरोबर पण एका प्रश्नाचं उत्तर द्या आधी, कि तुम्ही सकाळची ताजी हवा, सूर्य किरणे . सेवन करायला बाहेर पडता का त्या यंत्राला हवापालट म्हणून? मला खात्री आहे स्वतः साठीच. तर मग एक छोटीशी सुबक सुंदर पर्स किंवा बॅग विकत घ्या ताबडतोब आणि त्यात त्याला ठेवा, निजवा हवं तर, नाही तर सायकलीच्या कप्प्यात स्थानापन्न होऊ द्या आणि तुम्ही हवेशी संवाद साधा, सूर्यकिरणांचा / पक्षांच्या मधुर स्वरांचा भरभरून आस्वाद घ्या, दररोज, नित्यनियमाने. थोडावेळ ऍक्युप्रेशर नाही झालं तर काही बिघडत नाही. तो तुमच्या साठी आहे, फक्त मदतनीस म्हणून, त्यामुळे मोठ्या खिशाची पॅन्ट परिधान करा, दिशादर्शक बंद ठेवा (तरीही तो ऍक्टिव्ह राहतोच) आणि निसर्गाशी, आपल्या अवयवांशी, गुरुत्वाकर्षण शक्तीशी नव्याने नातं जोडा आणि स्वतः सर्वांगसुंदर फरक अनुभवा.

रविवार, १ जानेवारी, २०२३

गोडवा

धंदा ह्या विषयाचं माझं ज्ञान अगाध आहे आणि अगदी तोडकं. तरीदेखील माझ्या चार डोळ्यांना जे दिसतं, जे दररोज / नेहेमी टिपलं जातं ते आज मांडण्याचा प्रयत्न करत आहे. माझ्या कचेरीला घरून पोचण्याकरता साधारण २० मिनिटे लागतात. त्या संपूर्ण रस्ताभर मला लहान मुलासारखं ह्या-त्या बाजूला बघणे  फार म्हणजे फारच भावतं.  ती दररोजची एक पर्वणीच असते. जेव्हा मी गाडी चालवते किंवा बाजूला बसते तेव्हा देखील नवीन काय झालयं हे बघायला फारच आवडतं मला, मनापासून. फक्त माझ्या कचेरीच्याच रस्त्यावर नाही तर इतरत्र सर्वत्र मला सध्या केक चा धंदा बुलेट ट्रेन च्या गतीने फोफावतांना आढळतोय. बरं मी असं ऐकलं होतं बिझनेस च्या गुरूंकडून कि नवीन दुकान थाटण्याआधी एक आढावा घेतला जातो, कि तो धंदा चालेल का, बहरेल का सुरु केला तर? पण सध्याचं दृश्य फारच निराळं आहे. एका बाजूला एक खेटून त्याच धाटणीतली दुकानं दिसतात. ती कशी चालतात देव जाणे. पण चालत असतील असा अंदाज आहे. केक ची दुकानं बघून मला हि निश्चित खात्री पटली कि सर्वत्र सण आणि असंख्य वैविध्य उपक्रम साजरे केले जात आहेत आणि केक हा सर्वांच्या आवडीचा झालेला आहे, किंबहुना प्रत्येक प्रसंगी केकचं स्थान अग्रणी आहे कि काय असं वाटायला लागलं आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात जर केक फस्त केला जातोय सर्वांकडून म्हणजे कित्ती गोडवा पसरतोय बघा नं? अहाहा च. 

मी भल्या मोठ्या विविध दिग्गजांकडून असं ऐकलं आहे कि तुम्ही जे खाता तसे तुम्ही असता, थोडक्यात. 

सध्या लग्न, मुंज, वाढदिवस, नवीन दिवस, नोकरी, बक्षीस समारंभ, कुठलीही गोड बातमी, बढती, नवीन गाडी, घर, स्पर्धा, किंवा इतर अनेक प्रसंगी केक खाऊन तोंड गोड सतत केल्यामुळे मग जिभेवर प्रचंड गोडवा पेरला जाणारच, मन पण विविध प्रकारचे केक खाऊन अगदी तृप्त, संतुष्ट, म्हणजे विचारूच नका. फक्त दुकानं नाही तर घराघरात, गल्ली बोळात, केक तय्यार करून मिळतो किंवा केला जातो. तरीच म्हणते हवेत गारव्याशिवाय गोडवा का इतका पसरला आहे? आणि जाणवतो आहे?. आत्ता समजलं / उमगलं. चालू द्या, भरपूर केक खा, आणि गोडवा पसरत राहा.   

पातळ

साडीच्या लांबीनुसार म्हणजे पाचवारी, सहावारी, नऊवारी ई. त्या साडीला काही ठराविक नावं दिली आहेत. जसं कि नऊवारीला काष्ट्याची साडी, किंवा लुगडं किंवा पातळ असं म्हणतात / संबोधतात. त्या मागची कारणं मला सगळी ठाऊक नाहीत. लुगडं हे जरी सध्या फॅशन मधे आहे, सणावारी नसलं जातं तरी काही पिढ्यांपूर्वी तोच पोषाख होता, बहुतांशी प्रत्येक स्त्रीचा. मग ती स्त्री शेतातल्या कामाला जावो, नृत्य करणारी असो नाही तर इतर काही, काष्टा फारच सोप्पा पडायचा वैविध्य कामं करते वेळी. नऊवारी साडी हि खूप लांबलचक असल्यामुळे तिला नेसणे हि देखील एक खूप उत्कृष्ट कला आहे / होती. त्यावेळी / त्याकाळी सर्वत्र अश्या पद्धतीची साडी नेसलेली दिसायची. खूप लांब असल्यामुळे, सगळी कामे घरीच करावी लागत असल्यामुळे सामान्य स्त्रीला, हि साडी जड असून चालणार नव्हती मुळी.  लग्न / कार्य किंवा काही खास प्रसंगात असायची भरजरी पण दररोज साठी नाही. 

हि साडी नेसायची खास विशिष्ट  पद्धत होती, आहे, आणि ती इकडून तिकडून, इथे खोच तिथे खोच असं सगळं साग्रसंगीत प्रकरण आहे. 

ह्या नववारी साड्या पणजी, आजी, काकी, आई अश्या थोऱ्यामोठ्याच्या अंगावर दिसायची.  शिवाय आपल्या परंपरेनुसार, किंवा आशिर्वादात्मक पुनर्वापर करणं हे देखील फार नियमाने होत असल्यामुळे ह्या अश्या साड्या वापरून झाल्या कि, किंवा वापरतं असतांना देखील नवीन बाळाची दुपटी, लंगोट, कपडे, झबले ई. किंवा इतर गोष्टींसाठी वापरली जायची. जेथे मऊपणा हवा आहे, गरजेचा आहे तेथे ह्या आजी / आई च्या प्रेमाने ओतप्रोत अश्या साड्यांचा पुनर्वापर केला जायचा हमखास. अर्थात त्याकाळी अगदी प्रत्येक गोष्ट बाजारात उपलब्ध नसायची, एकत्र कुटुंब पद्धत होती आणि घरीच सर्व करण्याची प्रथा देखील. ह्या सर्व कारणांमुळे, एकावर एक थर किंवा नेसण्याच्या पद्धतीमुळे असेल कदाचित, कापसाचे धागे (कॉटन) वापरून केलेल्या, सर्वत्र वापरल्या जाणाऱ्या नववारी साडीला पातळ म्हणत असतं. पातळ म्हणजे पारदर्शी नाही तर जी जाड नाही अशी. जाडजूड असेल तर प्रचंड प्रमाणात ना कामं होणार, ना पुनर्वापर होणार ना काहीच. कशी विचारपूर्वक नावं दिली होती ना त्यावेळी. अहाहा च. 

आजी, आई आणि त्या तत्सम असणाऱ्या अगदी सर्वांचे प्रेम, माया, स्पर्श, आठवण, काळजी, आपलेपण, ओलावा ई. असे अनेक / असंख्य अगदी अदृश्य पातळ थर असतात. हळुवार उलगडतात आणि जाणवतात, प्रेरणा आणि शिकवण देऊन जातात, अनेक पिढ्यांना स्पर्शून जातात. कदाचित ह्या सर्व वैशिष्ट्यंमुळे, गुणांमुळे त्यांच्या एकुलत्या, जवळच्या पोशाखाला / आभूषणाला "पातळ" असं संबोधलं जातं. 

अर्थात हा फक्त माझा विचार झाला. ह्या मागे अजून काही कारणं असतील तर मला जाणून घ्यायला खूप आवडतील. कळवा नक्की.  

शॉर्ट्स

सध्याच्या आधुनिक मुलामुलींच्या आवडीचा पोषाख म्हणजे हे शॉर्ट्स. अर्थात हे घालण्याला काहीच बंधनं नाहीत वयाची, कोणीही घालू शकतं आणि घालतात देखील, सर्रास. खूप जण आवड म्हणून, फॅशन च्या नावाखाली तर काही ट्रेंड म्हणून, किंवा मिरवायला घालतात शॉर्ट्स. खूप जणं कधीही, कुठेही, केव्हाही, संबंध नसतांना उगाचच मिरवतात शॉर्ट्स. तुम्ही जर समुद्र सपाटीवर असाल किंवा उन्हाळा आहे, सहन होत नाही आहे, घरी आहेत, तर ठीक आहे हा पेहेराव, पण सर्वत्र आणि ते देखील आपल्या देशात ज्यात वर्षातले बरेचसे दिवस ऊन असतं. त्यामुळे बऱ्यापैकी ड जीवनसत्व मिळतं सर्वांना. ज्या देशात ह्या पोषक तत्वाची कमी भासते, किंवा ज्या देशात वर्षातले अनेक महिने बर्फ पडतो, किंवा ज्या देशात "काय चड्ड्या घालून फिरतात..." अश्या फालतूच्या वाक्यांना सामोरं जावं लागत नाही त्यांनी किंवा त्यांच्यासाठी खरं तर आहेत ह्या शॉर्ट्स. किंवा ज्या देशात थोरामोठ्यांचा आदर आणि सन्मान वेगळ्या ढंगाने केला जातो तेथे ठीक आहे. मला एक सांगा कितीदा उठसूट परदेशात साडी किंवा नव्वार नेसली जाते / धोती घातली जाते? अगदी क्वचितच. मग आपण "आधुनिक" ह्या सदराखाली का हे सगळं सतत करायचं? महत्वाचं म्हणजे प्रत्येक नागरिकाला जरी स्वतंत्र जगायचा अधिकार आहे तरी देखील आजूबाजूचा समाज, नजरा, सुरक्षितता ह्यांचा विचार करावा. आणि मला एक साधं सोप्पं समीकरण सांगा, जर प्रत्येक वेळी प्रत्येक ठिकाणी गरज नसतांना शॉर्ट्स घालून मिरवलं तर बाकी असंख्य पद्धतीचे ड्रेस कधी घालणार हो, जे आपले आहेत, ज्यात आपण उठून / खुलून भारदस्त दिसतो. भारतीय व्यक्तिमत्व इथल्या वातावरणाला, ऋतूला साजेसं असं वैविध्य नटणे विसरतोय हो. असं होऊ देऊ नका, "जैसा देश वैसा भेस" विसरू नका. संपूर्ण कपाटभर गोष्टी आहेत त्या मिरवा, तो बदल तुम्हालाच आनंद देऊन जाईल ह्यात शंकाच नाही. करून तर बघा. फॅशन करा, पण अंधानुकीकरण करून नाही तर तुम्हाला / तुमच्या व्यक्तिमत्वाला / व्यक्तित्वाला साजेसा असा पेहेराव करून, साधा, सोप्पा पण आधुनिक. कृतूप्रमाणे, आपल्या कलाकारांना मदत म्हणून हातमाग किंवा अजून तत्सम असे प्रकार घालून तर बघा? तुम्ही कोणाचे तरी अनुकरण करण्याशिवाय तुमचे लोक ऐकतील. तुमची एक छाप निर्माण करत राहा, त्याचा नक्कीच फायदा होतो नकळत, नेहेमीच.   

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...