आज संकष्टी चतुर्थी पण आहे आणि "करवा चौथ" हा सण पण. आमची सोसायटी म्हणजे विविधतेत एकता, इथे अनेक मराठी अमराठींसोबत अगदी गुण्या गोविंदाने नांदतात. त्यामुळे ह्या सणाची बातमी, जय्यत तय्यारी खूप दिवसांपासून दिसते आहे आणि जाणवते सुद्धा. हा सण सगळ्याजणी एकत्र येऊन साजऱ्या करतात त्यामुळे चर्चेला उधाण आलं होतंच आणि अर्थात ते कानावर पडलं देखील, मज्जा वाटली दरवर्षीप्रमाणे कारण खूप मोठ्या प्रमाणावर हा सण साजरा होतो हे फक्त एक कारण नाही तर दिवसभर निर्जळी उपवास म्हणजे त्या मुलींसमोर नतमस्तक व्हायला होतं आपोआप. गेले कित्येक वर्ष मी / आम्ही हे अनुभवलं आहे काही कुटुंबात कि दोघे एकमेकांसाठी निर्जळी उपवास करतात, एकानेच का करायचे? तिला साथ द्यायला ई. त्या मागच्या भावना, आणि हे सगळं ऑफिस चा कामाचा दिवस असला तरी देखील. खूप गोड वाटतं सगळं बघून.
आज त्यात एक सुंदर भर पडली. काही पिटुकल्या कामानिमित्य आम्ही तनिष्क नावाच्या सराफाच्या दुकानात गेलो होतो. तेथे प्रचंड गर्दी होती. मराठी प्रातांत अमराठी लोकांची सणानिमित्त. अत्यंत उत्साहाने "हिरा है सदा के लिये" असं म्हणत खरेदी सुरु होती. कित्येक जण ताटकळत पण बसले होते कारण त्यांना वस्तू, जिन्नस दाखवायला कोणी उपलब्ध नव्हते. खूप मोठे दुकान आहे ते पण इतस्ततः खरेदीदार पसरले होते. प्रत्येक मुलगी, आई, सून, बायको अतिशय सुंदर दिसत होत्या त्या लालचुटुक वेशभूषेत, उत्कृष्ट रंगलेल्या मेहेन्दीत, आणि एका वेगळ्याच रूपात एकंदरीत. सण आहे म्हणून, निर्जळी राहता आलं म्हणून, घराची सकाळची पूजा आणि संध्याकाळच्या पूजेची जय्यत तय्यारी झाली म्हणून आणि एकंदरीत त्या खास हिऱ्याचा साज चढलाच होता, दृश्य दिसत होता तो, जाणवत होता. अर्थात हिरा / हिरे खरेदी म्हणजे भरभराट, आशीर्वाद, गुंतवणूक आणि अत्यानंद. तो एक फक्त दागिना नाही, किंवा एक वस्तू नाही, तर एक संस्कार आहे, उपलब्धी आहे, समग्र, संपूर्ण समाधान आहे. शब्दात न पेरता येण्यासारखं असं काही आहे. खूप कौतुक वाटलं बघून कारण मी हे पहिल्यांदाच अनुभवत होते, ह्याची देही ह्याची डोळा असे.
वटसावित्री हि पूजा माझ्यामते "करवा चौथ" च्या बरोबरीचीच आहे. आणि बहुतांशी आपले सण भारतभर सारखेच असतात फक्त नावं आणि साजरा करण्याची पद्धत वेगळी असते. माझ्या मते वटसावित्रीच्या दिवशी इतका भाव दिला नाही जाणार त्याच हिऱ्याला जो आज मिळत होता. हा फरक प्रकर्षाने लक्षात आला मात्र. कदाचित प्रत्येकाकडे विविध वेळेला खरेदी होत असावी.
प्रत्येक घर धनधान्य, पशुपक्षी, दागदागिने, प्रकृती स्वस्थाने उत्कृष्ट अश्या स्थितीत सदोदित भरलेले राहो, हि मनःपूर्वक प्रार्थना. "आनंदी आनंद गडे, जिकडे तिकडे चोहिकडे".