एक ज्वलंत प्रश्न पडलाय मला. दोन व्यक्ती आहेत. दोघांना फक्त एक मेकांबद्दल माहित आहे, बोलणं झालयं त्यामुळे हे माहिती आहे कि साधारण विचार जुळताहेत, फोटोत बघितलं आहे, आणि इतरजणांकडून ऐकलं देखील आहे. त्यामुळे पुढील टप्पा म्हणजे प्रत्यक्ष भेट. पण दोघे दोन भिन्न शहरात त्यामुळे सहज शक्य नाही भेट, मनात येईल तेव्हा. आता प्रश्न असा आहे, कि ह्या पैकी फक्त एकाच व्यक्तीला भेटावसं वाटत असेल? किंवा दोघांनाही तितक्याच आतुरतेने भेटायचं असेल, मग ह्या दोन्ही परिस्थितीत नक्की काय होतं? प्रत्येक वेळा "दोनो तरफ आग बराबर लगनी चाहिये" असं काहीतरी का? फक्त एकाची इच्छाशक्ती पुरेशी असते? का वेळ / योग यावा लागतो? किंवा "त्याच्या" मनात असेल तेव्हाच गोष्टी घडतात. एकमेकांना भेटून काही तरी उत्तर मिळणंच नेहेमी अपेक्षित असतं?, मोजण्या एवढं अपेक्षित असतं का प्रत्येक भेटींमधे?, का भेट निष्फळ पण ठरू शकते? काय असतं नक्की? का तुम्ही बघाल तसं असतं?. जसं अनेक आधुनिक संतांच्या पोथीत दिलंय तसं, क्षणभर फक्त नजरेस पडलं तरी पोटभरतं? फोन वर, चॅट वर बोलणं पुरेसं नसतं का, भेटून काय होणार आहे? का ह्या भिन्न गोष्टी आहेत, तुलना होऊच शकत नाही? बरं हे असं वाटणं फक्त कुठलेही बंध / बांध नसलेल्याच लोकांमधे आढळते, घडते का इतर देखील? बघा ना साक्षगंधा आधी आणि नंतरचा पिटुकला काळ आठवा मंडळी, काय असायचे ते दिवस आणि लग्नानंतर थोडासा बदल घडतो. हे फक्त एक उदाहरण झालं, असंच असतं का प्रत्येक वेळी?
मला थोडक्यात मिळालेली उत्तर अशी: एकाची इच्छा शक्ती पुरेशी आहे भेट होण्याकरता. नकळत काय काय मिळत प्रत्येक भेटीत काहीही सांगता येत नाही, पण मिळणार हे नक्की, दोघांना निश्चितच, फक्त तसा बघण्याचा दृष्टिकोन हवा, कोण कुणासाठी काय घेऊन येईल, दिशा दाखवेल हे देखील फार मोठं गुपित असतं, कुठलाही अट्टाहास मात्र नकोच, अपेक्षा तर फार दूर राहिल्या, सहज, सरळ इच्छा फार मोठी जादू करून जातात. सरते शेवटी "त्याची" इच्छा तर आहेच, त्याच्या पुढे, किंवा पलीकडे काहीच नाही. त्यामुळे त्याच्या इच्छेनुसार च जाऊ या, अनेकांना भेटत राहू या, मनापासून इच्छा व्यक्त करणं आपल्या हातात आहे बाकी काही नाहीच. इच्छा पूर्ण झाल्या नाहीत तरी त्या बदल्यात काही तरी "तो" देऊन जातोच मंडळी, जे त्यावेळी आपल्यासाठी योग्य असतं तेच. निराशा कधीच देत नाही, किंबहुना ते त्याच्या दरबारी नाहीच.
सोमवार, ४ एप्रिल, २०२२
भेटण्याची ओढ
नवं प्रेम
मागे लिहिल्यापणाने माझ्या लेकीला सध्या दुचाकीवरचं राहावसं वाटतंय. दर दिवशी नवनवीन रस्ते भ्रमंती सुरु आहे. गेले ३ दिवस सलग पेट्रोल भरलं जातंय, अगदी थोडं थोडं, तो पेट्रोल पंप वाला देखील गालातल्या गालात हसत असेल ह्या वेडीला. काल काय तर अचानक सर्वांना आवडेल असं आईस्क्रीम आणलं गेलं. विचारूच नका. आता घरातच यायचं नसतं पहिल्या ओळीत लिहिल्या प्रमाणे तसंच घरी आलीच तर घराबाहेर पडण्याचे प्रत्येक क्षण टिपले जातात, जास्तीत जास्त उत्साहाने ते क्षण उपभोगले जात आहेत सध्या, कारण गाडी हातात आहे, सत्ता आली आहे असं वाटतंय, फुलपाखरासारखं थोडक्यात. अगदी माझीच साउली ती, मला पुन्हा एकदा जगल्यासारखं वाटतंय फक्त तो खळखळणारा उत्साह बघून, भन्नाटच. त्या माझ्या दिवसात इतकं जगले आहे मी कि तृप्त झाले आहे पूर्णपणे.
आईस्क्रीम आणणं हे इतकं सोप्प नाही हो मंडळी. एक तर ते दुकान कुठे आहे हे स्वतः चालवता चालवता लक्षात आणणं, गाडी वर असतांना तो दुकानाचा बोर्ड बघणं आणि त्याच क्षणी गाडी पार्किंग साठी जागा टिपणं हे लिहितांना, ऐकतांना वाटत तितकं सोप्प नाही च. त्यामुळे हे सगळं ती इतक्या आवडीने, शिताफीने, आपणहून करते आहे हे बघून दाटून आलं. विचारलं तर म्हणते कशी "उन्हाळा आहे, आईस्क्रीम आणण्यासाठी विचारायचं काय? जायचं, आणायचं आणि सगळ्यांनी मिळून फस्त करायचं, बास च". वा म्हणजे वा च. फारच आवडलं मला.
पेट्रोल भरायचं कधी ह्या कडे गाडी चालवता चालवता बघणं, पेट्रोल पंप कुठे आहे, तेथे जाणं, बंद गाडी हातात घेऊन रांगेत उभं राहणं, शुन्याकडे लक्ष देणं, गाडी पुढे घेऊन जी पे, किंवा पैसे मोजून देणं-घेणं हे सगळे टप्पे एकटीने गाठल्याचा आनंद तिला आणि मला शब्दात मांडता येणं फारच अशक्य आणि अवघड. पण जे चेहेऱ्यावर उमटलं ते बघणं म्हणजे माझ्या सारख्या आईला भली मोठी पर्वणीच हो. "सुखं म्हणजे नक्की काय असतं नेमकं", "बोलविणं संवादु", "शब्दांविना भाषा" च जशी. हे असे क्षण उपभोगायला पण अहोभाग्य लागतं मंडळी. इथेच थांबणं नाही, आता तर दुचाकी वापरून रस्त्यावर राज्य करणं चाललंय, आता पुढील टप्पा गियर ची गाडी आणि मग चारचाकी आहे. त्यामुळे माझ्या पुढ्यात अजून अनेक आनंदाचे क्षण रचून ठेवले आहेत, हळूहळू त्याचा आस्वाद घेते आणि चिरतरुण राहण्याचा प्रयन्त करते.
"अश्या लेकी येति आणिक स्मृती ठेवुनी जाती, आनंद देऊनी जाती, भूतकाळात घेऊनि जाती".
भिंतीवरच्या आठवणी
मला समजायला लागल्यापासून मी जेथे जेथे म्हणून भिंतींवर लटकवलेल्या फोटो फ्रेम्स बघितल्या आहेत त्या सर्व एक दोरीवजा वस्तूने खिळ्याला लटकवलेल्या असायच्या. ती दोरी अथवा सुतळी एका विशिस्ट पद्धतीने बांधून लटकावयाचे. त्या दोरीच्या / सुतळीच्या मजबूतीची कमालच होती, वर्षानुवर्षे टिकायची हो. काही घरांमध्ये अगदी शिस्तीत ठेवायचे, जपायचे भिंतींवरचे फोटो / पेंटिंग्स ई. पण बहुतांशी घरात ज्या दिवशी ज्यांनी तो फोटो लावला त्यांनतर त्या कडे संपूर्ण दुर्लक्ष. फोटोवर धूळ काय, सुतळीवर जाळ्या काय विचारू नका. असो. त्या नंतर काळ बदलला, आणि ह्या सुताळ्यांना विश्रांती दिली गेली. एक छोटसं हुक फ्रेम मागे लावलं गेलं साधारणतः मध्यभागी म्हणजे ती फ्रेम शिस्तीत लटकवली जाईल, मजबूत पण आणि दोरी नसल्यमुळे काही दिसणार नाही जास्तीच पण फक्त फोटो / पैंटीग, बास. ज्याने कोणी हि हुक ची संकल्पना शोधून काढली त्याला अनेक धन्यवाद. त्यामुळे फोटो फ्रेम लावणाऱ्याला सोपं आणि बघणाऱ्याला सुबक असं. अगदी असंच आपलं मैत्रीचं किंवा कुठलंही नातं जपलं तर, अदृश्य पण मजबूत आणि टिकाऊ, दोघांसाठी अत्योत्तम, कारण नातं हे कमीतकमी दोघांमधे असतं नाही का. नातं आहे हे दाखवायची गरज काय, आणि दाखवणं हाच जर उद्देश असेल तर मग संभाळतोय हे पण दाखवावं लागेल, नाही का? त्यापेक्षा, झाकली मूठ सव्वा लाखाची हे बरंच बरं.
असं असतं, त्या निमूट भिंतींवर विराजमान फ्रेम्स सुद्धा अप्रतिम सौंदर्य बहाल करतातच भिंतींना, बघणाऱ्यांच्या डोळ्यांना सुरेख कलाकृती दर्शवतात आणि शिवाय किती म्हणजे कित्ती गोष्टी शिकवतात माणसांना, बघू तसं आहे, नाही का?
योग्य गुरु
"स्वतः पासून सुरवात", "बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले", "कृतीकडे बघून शिका", "शब्द जसे तीर", "शब्दांच्या प्रयोगावरून माणूस ओळखा" ई.
हि अशी सगळी वाक्य, म्हणी म्हणा हवं तर आज मला एखादा चित्रपट बघावा तशी डोळ्यासमोरून झर्र्कन आली-गेली.
मी जेथे योग करायला जाते तो एक बहुउद्देशीय हॉल आहे. त्यात अनेक जण येतात आणि वापरतात असं दिसतंय तो हॉल विविध कारणांसाठी. माझा तास चालूच होता तेव्हा कोणी अजून मंडळी आली, बाकी हळू हळू येत होती. जी मंडळी आली त्यात बऱ्याच जणांनी मॅट उभी अंथरली आणि एकांनीच फक्त आडवी. त्यावरून मला असं समजलं कि त्या शिक्षिका आहेत आणि बाकी विद्यार्थी. तो हॉल बऱ्यापैकी मोठा आहे, खूप साऱ्या खिडक्या आहेत, ६-८ पंखे आहेत, दिवे आहेत ई. हॉल म्हटल्यावर भला मोठा दरवाजा आलाच, नाही का. आणि अहो सकाळची ६.३० ची वेळ, प्रसन्न वातावरण आणि गार वारा, उस्फुर्त वैविध्य पक्षांचे गायन, गप्पा, आवाज, बोल, बडबड ई. आणि शांतता, थंडावा. हि यादी न संपणारी अशी आहे. इतकं सगळं निसर्गाने भरभरून दिलं आहे मुक्तहस्ताने सर्वांनाच, भेदभाव न करता बरं का. त्या हॉल मधे सुद्धा थंडावा जाणवतो कारण आजूबाजूला असंख्य मोठाले वृक्ष आहेत, झाड आहेत, गवत / Lawn आहे, त्यावर फवारे हलकासा पाण्याचा शिडकावा करतात ई. अश्या सगळ्या वातावरणात जेव्हा त्या मॅडम आल्या, आडवी मॅट अंथरली धसड-वसड करत, बसल्या आणि विचारपूस सुरु, "सगळे पंखे चालत नाहीत का? काय हि गर्मी, कसं बसायचं माणसाने..." आणि तोंडाचा पट्टा सुरूच राहिला. मग पुन्हा धसड-वसड करत शेजारी सुरु असलेल्या पंख्याखाली मॅट ओढली आणि बसल्या.
हे सगळं बघून मला महद आश्चर्य वाटल्याशिवाय राहील नाहीच. योग गुरु आहात तुम्ही, तुमचे विद्यार्थी समोर आहेत अथवा नाहीत, तुमचं प्रत्येक वागणं, बोलणं, कृती टिपली जातेच. योग केल्याने, शिकवल्याने एक वेगळा माणूस घडतोच आपोआप. किंबहुना योग शिकवण्याची ती पहिली पायरी आहे, त्या गुरु कडून खूप काही शिकण्यासारखं हवं चांगलं, इतकं कि प्रत्येक वेळी, दर दिवशी काही नवीन, ताज, वेगळं, अकल्पित असं. "गुरु असावा सर्वगुणी आणि महाज्ञानी" नाही का? गुरु इतका अस्वस्थ का? मला हा पडलेला एक ज्वलंत प्रश्न आहे. ह्या सगळ्या शब्दांऐवजी कृती जास्त योग्य ठरली असती. त्यांनी जर शांतपणे मॅट पंख्याखाली हलवली असती तर, पट्टाकिनी खिकड्या उघडल्या असत्या तर, किंवा विजेचं काम करणाऱ्याला निरोप पाठवला असता तर, किंवा त्या थंड गार वातावरणात आहे तेथेच क्लास सुरु केला असता तर जास्त शिकता आलं असतं त्यांच्या कृतींकडे बघून. आदर्श निर्माण करू शकल्या असत्या त्या. पण असो. योग्य गुरु असणं, बनणं आणि मिळणं हे देखील भाग्याचं नाही का? ह्यांच्या कडून कदाचित काय नाही करायचं, कसं नाही वागायचं ई. तरी शिकता आलं, हे हि नसे थोडके.
सिंहासन
मी आज योग क्लास ला गेले होते. माझा क्लास सुरु असतांनाच, संपत आला होता त्या दरम्यान एक मॅडम आल्या, स्थानापन्न झाल्या मॅट वर आणि त्यानंतर एक आबा आले आणि एका खास जागी विराजमान झाले. ते त्या जागेवर इतके मस्ती करत होते जसे कि किती मज्जा येते आहे त्यांना. पाय काय उंच करत होते, पाय लयीत हलवत होते आणि एकंदरीतच आनंद येत होता त्यांना हे सगळं करण्यात. आपल्याच नादात चाललं होत सगळं त्यांचं, जसे कि त्यांच्या अवतीभोवती कोणी म्हणजे कोणी नाहीच, ते राजा आहेत त्या ठिकाणचे असं. अर्थात पाय लयीत हलवणे म्हणजे एक प्रकारचा व्यायामच सुरु होता असं म्हणायला हरकत नाही, किंवा योग करण्याआधी जो शरीराला आवश्यक ताण द्यावा लागतो तो थोड्या प्रमाणात पण महत्वाचं म्हणजे आनंदात. त्यांना अनेक पर्याय होते इथे तिथे बसायचे, पण हुशार तरुण आबांनी बरोबर जागा पकडली होती, लहानपण जसे त्यांचे. ते बघूनच मला इतकं भन्नाट वाटलं म्हणून सांगते कि ज्याचं नाव ते. असं भासत होत कि ते आम्हाला पण मोटिव्हेट करताहेत न चुकता व्यायाम करण्यासाठी आणि अर्थात आनंदी राहण्यासाठी, संधी चा फायदा करून घेण्यासाठी.
जेथे हा योग वर्ग होतो तो एक छान मोठ्ठा हॉल आहे, अनेक जण अनेक उपक्रम राबवतात तेथे माझ्या मते, त्यामुळे एका बाजूला दोन खुर्चीचे गठ्ठे ठेवले आहेत, खुर्च्या एकावर एक रचून ठेवल्या आहेत. एक मनोरा फारच उंच आहे, पण दुसरा छोटासा. त्या छोटेखानी पण ६-७ प्लास्टिक खुर्च्या एकावर एक म्हणजे सिंहासनावर बसल्या सारखेच. आणि त्यावर ते आबा बसले, त्यांचे पाय पण हवेत हो, जमिनीला पुरत नव्हते, पण त्यांच्या चेहेऱ्यावरचे बाळबोध हावभाव, हसू आणि ..... खूप काही सांगून जात होते. अहाहा च.
असेच जेव्हा मोक्का मिळेल तेव्हा "थोड्यात गोडी" पण राजासारखं फील करा आणि उंच उडा फुलपाखरा सारखे, जसे "दिवस तुझे हे फुलायचे, झोपल्या वाचून झुलायचे" वेगळ्या अर्थानी बरं का मंडळी.
कानाच्या आत
माझ्या लहानपणी पासून अगदी क्वचित कधीतरी कानाच्या आत काहीतरी घातलेलं दिसायचं, एक तर कापूस किंवा ऐकू येण्याचं यंत्र. दोन्ही गोष्टी घालतांना थोडीशी लाज वाटायचीच. त्यात कापूस थोडा तरी बरा, प्रवासात वार लागू नये, बाळंतिणीच्या कानाची काळजी म्ह्णून कापूस, पण जगाला सांगायचं उघड पणे कि मला ऐकू येत नाही आणि त्यामुळे कानात मशीन, छे छे, थोडसं अपमानास्पदच. अजुन एक म्हणजे त्या काळी कानाच्या मशीन ची एक तर एक डब्बी यायची आणि त्यासोबत एक भली मोठी वायर, ते पण बाहेरूंन मिरवायला नको वाटायचं. म्हणजे घालणाऱ्याला आणि बघणाऱ्याला सुद्धा. फक्त काही वर्ष लोटली आणि संपूर्ण ३६० अंशाचे बदल घडले. आता कानात घालून फक्त मिरवत नाहीत तर ऐटीत मिरवतात आणि जगजाहीरपणे कानाच्या समस्यांना मी कसं आमंत्रित करतोय हे दर्शवतात. का हा आमूलाग्र बदल आणि ह्याने काय साध्य होणार आहे? एकाने काहीबाही घातलं कानात कि लगेच दुसरा तय्यार, दिव्याखाली अंधार आणि अंधानुकीकरण नुसतं. हा एखाद दिवशी एखाद वेळा अगदी गरज पडली तर वापरलंय असं नाहीच. सदा न कदा कान बंदच. ज्यांना डॉक्टर व्हायची इच्छा आहे त्यांनी बिनधास्त कानाचे डॉक्टर होण्याची तय्यारी सुरु करावी, हे रुग्ण स्वतः मोठ्या प्रमाणात तय्यारी जय्यत तय्यारी करत आहेत.
बाटल्यांचा संच
परवा कॉलेज च्या तय्यारीचा भाग म्हणून माझी लेक पाणी पिण्याच्या बाटल्यांचा संच घेऊन आली नवीन विकत दुकानातून. ती तिच्या साठी फक्त एक लागणारी बाटली विकत आणू शकली असती. पण ती ठरली माझीच लेक, आणल्या अनेक, अर्थात चांगलचं आहे म्हणावं, माझ्यासाठी, तिच्या साठी आणि ह्यांच्यासाठी सुद्धा. कारण ? सांगते सांगते थांबा. अहो तिला, मला आणि ह्यांना सुद्धा. रोज नवीन रंगांची बाटली घेऊन ऑफिसला जाणं, कॉलेज ला जाणं किती मोटिव्हेशनल आहे नाही. ड्रेस सोबत सुद्धा रंग जुळवून देखील बाटली घेऊन जाता येईल. दुसऱ्यांसाठी नाही, दाखवण्यासाठी नाहीच, पण स्वतःला भन्नाट वाटावं म्हणून. शेवटी काय पाणी पिणं आणि उत्साही वाटणं जास्त महत्वाचं आहे. आतापर्यंत एकच बाटली घेऊन जायची पाण्याची हे ठरलेलं असायचं, पण नेहेमीच तसंच करायचं हे कोणी सांगितलं आहे. नाही ना?, मग एक आठवडा आणि रोज नवीन रंगाची बाटली, आणि पुढल्या आठवड्यात पुन्हा रंगांची उधळण. भावलं मला फारच, त्यामुळे उत्साहाने उन्हाळ्यात भरपूर पाणी पिणं होईल, जे फारच आवश्यक आहे. रोज आता सगळेच कुठल्या रंगाची पाण्याची बाटली भरायची ह्या विचारांनी दिवस सुरु करणार. मस्तच आणि मज्जाच मज्जा.
माझ्या लेकीला धन्यवाद तिने सहज म्हणून का असा सगळा विचार करून ह्या पाण्याच्या बाटल्या आणल्या मला ठाऊक नाही, पण मी ह्या सगळ्या प्रकाराकडे असं बघते आहे.
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...
-
मी अनेक वर्षे एकाच संस्थेमध्ये कार्यरत होते. अखेरीस, मला एका नवीन इंजिनिअरिंग महाविद्यालयाची सुरुवात करण्यामध्ये हातभार लावण्याची सुवर्णसंधी...
-
माझ्या मुलाने भारतातील सर्वात आव्हानात्मक अभ्यासक्रम निवडल्यापासून, मला विद्यार्थ्यांसमोरील अडचणींची जाणीव झाली. मला खात्री आहे की अशा अडचणी...
-
परवा एक फोन आला. लहानपणापासून ओळख असलेली व्यक्ती. घरच्यांसारखीच. गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता त्यांनी अचानक विचारलं: “अजूनही लेक्चररच आह...