गुरुवार, १२ मे, २०२२

मोज (फुट)पट्टी

त्या काळी माझ्या लहानपणी च्या वेळी थोडसं वेगळं वाटेल वाचायला पण माझ्या बाबांना चहा करायला, थोडासा स्वयंपाक करायला, स्वयंपाक घरात मदत करायला मनापासून आवडायचं. का कुणास ठाऊक. म्हणायचे कसे, तुम्ही दोघी करू शकता ग, पण मग काय मी आयत बसून खायचं? असो. त्यामुळे मला आई आणि बाबा, जास्त करून बाबाच टिप्स द्यायचे. आई चा प्रखर बाणा, मी शिकवणार नाही, खातांना काय काय घातलं असेल ह्याचा अंदाज घ्यायचा आणि तसे स्वतः पदार्थ करत करत शिकायचं. बास.

पण बाबा नेहेमी म्हणायचे, किंवा आईला अनेकदा मावशींना सांगतांना ऐकलंय मी कि आधी भाजी फोडणीत शिजवायची आणि मग रस्सा करण्याकरता कोमट / गरम करूनच पाणी त्यात घालायचं, थंड नाही, भाजीची चव, पोत / रचना / बांधणी ई. बिघडते आणि मग जिभेला समजतं ते. तेव्हा समजायचं नाही असं का, आता लक्षात येतंय, भाजी शिजतांना / फोडणी घातल्यावर तिचं तापमान गरम असणार. मीठ, साखर / गूळ, चवीला मसाले घातले कि मग शिजण्याची प्रक्रिया सुरु होणार. ती चविष्ठ होण्यासाठी मग थंड पाणी वापरलं तर त्या भाजी ला, फोडींना एक प्रकारची कदाचित शिरशिरी आल्यासारखी वाटणार आणि तो तापमानातील फरक मग त्या भाजीची चव नक्की बदलणार ह्यात शंकाच नाही कारण शिजण्याची प्रक्रिया थोडीशी बदलणारच. त्या भाजीला बोलता आलं असतं तर तिने सांगितलं असतं ह्या बद्दल. थोडासा विषय बदलते आहे पण अगदी बाळांना टब मधे बसून किंवा मांडीवर / पायांवर घेऊन आंघोळ घालतांना सुद्धा पाण्याचं तापमान तपासलं जातच, प्रत्येक वेळा, अनेक वेळा. आई / आजी आधी हात घालून तपासतात आणि मग गाणी गप्पा मारत आंघोळ घातली जाते. माझ्या सारख्या आधुनिक आईला बदकांचा आधार होता. ते बदक रंग बदलायचे जर पाण्याचं तापमान जास्त असेल बाळासाठी तर. अहाहा च. थोडसं गार पाणी अंगावर पडलं किएकदम शिरशिरी येतेच. तसेच जास्त गरम पाणी वापरलं तर चटका बसण्याचा धोका असतो.

आपल्या सर्वच नाते संबंधात अगदी तस्सेच आहे, नाही का? संबंध, बोलणं, भेटणं, वागणं, चौकशी करणं, चांभार चौकशी करणं कसं मर्यादेत मोजूनमापून राखावं / ठेवावं, कमी जास्त प्रमाण झालं कि मग एक तर शिरशिरी येते नाहीतर चटका बसू शकतो, चव गडबडते, तो गोडवा टिकून राहात नाहीच.  त्यामुळे आधीच आणि नेहेमीच काळजी घ्या मंडळी, म्हणजे सगळेच खुश.

बुधवार, ११ मे, २०२२

जिवलगा, राहिले रे दूर घर माझे !

मी शाळा कॉलेज मधे असतांना साध्या सुगम संगीताच्या, भक्तिसंगीताच्या क्लास ला जायचे. खूप सुंदर शिकवायच्या त्या मॅडम. मला शास्त्रीय संगीतात रुची नव्हती म्हणण्यापेक्षा बैठक निर्माण करण्याची ताकद नव्हती, त्यामुळे "दुधाची तहान ताकावर", माझी आवड आणि आईची इच्छा म्हणून मनापासून शिकत होते. त्यावेळी मुभा होती, वेळ होता, ऊर्जा तर प्रचंड त्यामुळे खूप गाणी शिकता आली विविध प्रकारची. त्यातलेच हे एक. खूप छान बसवून घेतलं होत हे गाणं माझ्याकडून त्यावेळी आणि आवाज पण चढायचा. किंबहुना आवाजाला धार लागावी म्हणूनच असेल कदाचित हे एक ठेहेराव असलेलं गाणं निवडलं गेलं होत खास, हे आत्ता प्रकर्षाने जाणवतंय.

कदाचित हे सगळ्यांसोबतच होत असेल पण मला थोडंफार समजायला लागल्यापासून ते आजपर्यंत एकच ठाऊक आहे मला कि घर म्हणजे आई बाबा, सर्वस्व म्हणजे आई बाबा, श्वास म्हणजे फक्त ते दोघे, त्यांनीच व्यापलं होतं माझं सगळंच. फार उशीरा कदाचित पुस्तकातून, शिक्षकांकडून उमगलं कि सजीव आणि निर्जीव असे दोन भाग असतात. माझ्या मते घर निर्जीव कधीच नव्हतं माझं, ती वस्तू कधीच नव्हती कारण त्यात मला खूप खूप आधी पासून माझ्या आई वडिलांचे कष्ट, प्रेम, माया, ओलावा ई. हेच भासत, दिसत आणि जाणवत होतं सतत. पुढील शिक्षणासाठी जे मी बाहेर पडले ते कायमचीच. त्यामुळे "ते" घर खूप खूप दूर राहिले हे मात्र निश्चित, का? काय चुकलं माझं? असं का होतं? नको व्हायला हो... हे लिहितांना देखील हृदयाला असंख्य छिद्र पडतांना जाणवतंय मला. ते घर दृष्टीआड झाल्यावर मिळाल्या त्या फक्त भिंती, वस्तू, कोरडे पाषाण बास. त्या घराकरता, त्या माझ्या आईवडिलांकरीता माझ्या हातून मात्र काहीही घडलं नाहीच. मी फक्त घेत राहिले आणि ते देत राहिले सतत. आता खूपच उशीरा ह्या सगळ्यांची जाणीव होते आहे, पण आता वेळ निघून गेली, हातातून वाळू निसटून जावी तशी. हे ओझं घेऊन जगणं अशक्य आहे पण इलाज नाहीच. आणि तसं घर मला उभं करता आलं नाही हि खंत तर आहेच. ह्या सगळ्यातून खूप अनुभवायला मिळालं हे निश्चित.

जीवलगा ह्या करता कि अगदी पहिल्या दिवशीपासून आईबाबा माझे कधी मित्र, शिक्षक, वाटाड्या, गुरु, समवयस्क, भाऊ / बहीण, विद्यालय, शब्दकोश, समुपदेशक ... म्हणूनच राहिले, अलगदपणे न अंतर बाळगता, हे समजलंच नाही.

"सुखसुमनांची सरली माया पाचोळा वाजे", त्या घरात होतं ते सुख, त्या अंगणातल्या फुलांना होता तोच सुगंध आणि आताच्या घरात तर पाचोळा जमा देखील होत नाही, वाजण्याचा प्रश्नच नाही.

"घेशील केव्हा मज हृदयाशी"? हा विनंती वजा प्रश्न आणि "त्याच्या" कडून उत्तराची वाट बघत पुढील मार्गक्रमणा करणार मी, हे निश्चित.

आदरणीय शांताताई शेळकेंचे प्रत्येक शब्द आणि त्यांची गुंफण मला फार भावली, म्हणून त्या बद्दल लिहिलं आणि त्या आधी पुन्हा एकदा वाचलं, तुमच्या करता येथे देते आहे, जरूर वाचा अजून एक अनुभव ह्या गाण्या संदर्भातला. 
https://www.aathavanitli-gani.com/Song/Jivalaga_Rahile_Re_Dur 

 
शब्द + अर्थ = शब्दार्थ, स्वर + अर्थ = स्वरार्थ, भाव + अर्थ = भावार्थ, पण सध्या "ते" घर दृष्टीआड झाल्याचं प्रकर्षांने जाणवल्यामुळे जो अश्रूंचा वाहता प्रवाह आहे त्याला काय म्हणायचं? अश्रू + अर्थ = ?.

अश्रूच अर्थपूर्ण आहेत, असतात आणि म्हणून त्याला वेगळा अर्थ देऊन नवीन शब्द घडवायला नकोच, ह्या बाबतीत तरी, नाही का?

विज्ञान जाऊ दे पण अश्रू इतके खारट का असतात ते उमगलं मला, आज.


उब

माझी स्वयंपाकघरात लुडबुड फारच लवकर सुरु झाली, छोट्या छोट्या पदार्थ करण्यापासून आणि मग ती गाडी फारच वेगात धावली अनेक वर्ष. मला का कुणास ठाऊक फारच स्वारस्य वाटू लागलं, पदार्थ करण्याची एकूण प्रक्रिया मनापासून भावली, चव येऊ लागली, सगळ्यांना आवडू लागले आणि अर्थातच घरच्यांचं प्रोत्साहन म्हणून गोळाबेरीज म्हणजे मज्जा आली. त्या काळात कळत नकळत अनेक टिप्स मिळाल्या, समजल्या आणि वापरल्या देखील. त्यातलीच एक होती ती म्हणजे प्रत्येक भाजी खूप अगदी गाळ होई पर्यंत शिजवायची नाही. शिजत आली कि गॅस बंद केला तरी चालतो कारण तापलेला बर्नर, कढई आणि वरून झाकण ई. मुळे आणि त्या उष्णतेमुळे, उब मिळाल्यामुळे उरलेली, किंवा हवी असलेली राहिलेली शिजण्याची प्रक्रिया पूर्ण होते, भाजी खूप वेळ गरम राहते ती वेगळीच. त्यामुळे हि एक महत्वाची टीप मला मिळाली होती, ती मी वापरली, अनुभवली आणि उपयोगी आली. एक तर संपूर्ण स्वयंपाक शांततेत करण्याची गोष्ट आहे, घाई गडबडीत भाजी झाली रे झाली कि उघडी ठेवणं, दुसऱ्या भांड्यात काढून ठेवणं ई. करू नये. ती अजून थोड्या वेळाची उब, उष्णता आणि प्रक्रिया महत्वाची ठरते, चव पण चांगली येते, कदाचित मसाले अजून थोडे मुरले जातात वगैरे. वेळ काढून घरी स्वतःच्या हातून स्वयंपाक केला कि असे छोटे छोटे पण काही गोष्टी शिकवून जाणारे अनुभव येतात, समाधान वाटतं आणि अत्यानंद होतो तो वेगळाच. अगदी तस्सेच आप्तस्वकियांबरोबर गप्पा मारण्यासाठी आवर्जून थोडा वेळ काढा अधेमधे, घाई गडबडीत नाही, प्रत्यक्ष भेट घडवून आणा, "क्वालिटी टाईम" म्हणतात तसे काहीसे, मग ती घरची पिल्लं असो, आई-बाबा, आजी-आजोबा, मित्र-मैत्रिणी असोत. ती हसी-मजा, स्पर्श, स्पंदन, उब, एकंदरीत सगळ्या पद्धतीचे संभाषण अनुभवा पोटभर, साठवून ठेवा आणि मग बघा हा साठा प्रत्येकाला किती वर्ष सहज घालवायला मदत करतो, पुरतो ते. प्रत्येक नात्यातला गोडवा, चव अजूनच वृद्धिगत होईल ह्यात शंकाच नाही. अगदी जशी त्या कढईतल्या भाजीला हवी हवीशी असते ती आणखी थोड्या वेळाची उब / उष्णता. भाजी बोलून दाखवत नाही माणसांसारखी ह्या बद्दल, पण चवीच्या माध्यमातून समजतं ते अगदी सहज. "वेळ काढला कि मिळतो", तो अधेमधे काढाच. आणि मग अनुभव घ्या एखाद्या आपल्याला मिठी मारल्यावर येतो तसा, पाळीव प्राण्याला, वृक्ष प्रेमी झाडाला आलिंगन दिल्यावर येतो तसा, आणि हो, कढईतली भाजी त्या उबदार मिठीत अनुभवते तसा, तो देखील स्वतःसाठी नाही मंडळी, खाणाऱ्याच्या चवीसाठी.

मंगळवार, १० मे, २०२२

प्रत्यय

"एकदा माणूस पोहायला शिकला कि तो ते कधीच विसरत नाही", किंवा "एकदा गाडी चालवायला शिकला कि......" ई. अशी वाक्य आपण खूपदा ऐकतो आणि वापरतो देखील, नाही का. पण मला ना ह्या अर्धशतकी वळणावर थोडी शंका होती, कसं होणार, सराव महत्वाचा नाही का, एकदा शिकलं कि झालं? पुरेसं आहे? मग ते शालेय किंवा महाविद्यालयीन शिक्षणाच्या बाबतीत का उपयोगी पडत नाही? ते शिकवलेलं तर विसरतो आपण थोड्या फार प्रमाणात. असो.

आज मात्र मला ह्याचा इतका सुंदर अनुभव आणि प्रत्यय आला कि ज्याचं नाव ते, इतकी मज्जा आली कि असं वाटलं आत्ताच्या आत्ता हे विचार उतरवावे, मांडावे, लिहावे, त्या संगणकाशी संवाद साधावा.

तर त्याचं असं झालं कि आज मी घरी आहे, म्हटलं ह्या संधीचा पुरेपूर उपयोग करून घ्यावा आणि गरमागरम भाकरी करून खावी. नाहीतर एरवी थंड भाकरीचा आस्वाद घेतेच मी ऑफिस मधे. अतिशयच ताज पीठ पण अनायस्या दळून आणलं होतं मग काय झाले सुरु मी. आणि ती भाकरी केली, मस्त मनसोक्त तूप लावलं आणि फस्त देखील केली, किंबहुना झाली कधी ते कळलं देखील नाही कारण हे पोहणं, गाडी चालवणं ई. विषयच होते डोक्यात. अगदी तव्यावरची ताटात असल्यामुळे देखील मिनिटात संपली ती. आणि मग मी हे लिहायला घेतलंच कसाबसा हात धुवून. मला तरी असं वाटलं कि गाडी चालवणं काय किंवा पोहणं, किंवा आता हे भाकरी करणं ह्या सगळ्या कला आहेत. त्या रस्त्याशी, पाण्याशी, पिठाशी मनापासून प्रेम असेल, आवड असेल कशाची म्हणताय अहो पोटोबाची / खायची आणि अर्थात करायची तर ह्या सगळ्या मंडळींशी संवाद साधत ह्या गोष्टी नकळत पट्टाकिनी घडतात तुमच्या हातून एक परमानंद देऊन जातात तो वेगळाच हो. कितीही वर्षांनी मग ते तुम्ही करा, तितक्याच ओढीने तो रास्ता तुमची आतुरतेने वाट बघत असतो. त्याला देखील मस्त मजेत चालवणारे चालक हवे हवेसे असतात हो, तो अबोल ओठातून खूप काही सांगून जातो.

आज अगदी तसंच झालं काहीस माझ्या सोबत, ते पीठ, तो तवा, ते तूप, सगळं म्हणजे सगळं वाट बघत होत जणू माझ्या स्पर्शाची. आणि खरं सांगू, फार आदळ आपट करत, आवाज करत नाही होत माझी भाकरी, शांतते होते, ते कदाचित भावात असेल त्या भाकरीला, मावशीचा खूप च मार खावा लागतो नाहीतर, अगदी वरच्या आणि खालच्या मजल्याला देखील समजतं कि भाकरी होते आहे ह्यांच्या स्वयंपाक घरात म्हणून. फारच अप्रतिम अनुभव होता आज माझ्यासाठी. धन्यवाद पीठ माझ्यावर इतका प्रेमाचा वर्षाव केल्याबद्दल, वाट बघितल्या बद्दल, माझी पद्धत आवडल्या बद्दल. "शब्देविण संवादू ...."

शनिवार, ७ मे, २०२२

मै और मेरे शॉर्ट्स अक्सर ये बाते किया करते है ...

खरं सांगू तर माझी अगदी लहानपणापासून "अर्धी पॅन्ट" ची ओळख झाली ती फक्त खाकी रंग आणि रविवार सकाळ. नंतर नंतर शाखेबद्दल जास्त माहिती मिळाली आणि प्रचंड आदर वाटू लागला. पण पहिली ओळख कधीच पुसली गेली नाही कारण त्या सर्व काकांना सोडलं तर कुणी म्हणजे कुणीच तशी "अर्धी पॅन्ट" मी कधीच घालतांना बघितली नव्हती प्रत्यक्षात, घरी नाही दारी नाही. मग मात्र माझं लग्न झालं, शहर काय राज्यच बदललं आणि बहुतांशी सगळेच अश्या अर्ध्या पॅन्ट मधे वावरतांना दिसू लागले. नागपुरात असतांना मी कधी फुल्ल पॅन्ट घातली नव्हती ते मी अमेरिकेत आणि त्यानंतर आज तागायत नेहेमी असे शॉर्ट्स वापरू लागले सर्रास, अर्थात फक्त घरात. त्यामुळे का कुणास ठाऊक काही दिवसांपासून माझ्याशी कोणी तरी संवाद साधतंय असं मला वाटतंय. आणि त्याच्या भाषेत बोलायचं झालं तर "अगं काय हे किती कमी वेळ मला त्या कपाटातून बाहेर काढतेस, बाहेरची स्वच्छ प्रशस्त हवा तर अनुभता येतंच नाही मला, हो कधी तरी वर्षातून एकदा समुद्रकाठी गेलं कि मोकळा श्वास घेण्याचा अनुभव मिळतो मला, पण हे बरोबर नाही. कित्ती प्रकारात मी उपलब्द आहे, जरा बघ आजूबाजूला, घरी दारी, दुकानात, मला पण मिरवावंसं वाटतं, तुझ्यासोबत खरेदी करावीशी वाटते, बाहेर खायला जावसं वाटतं, अंगावर काही तरी सांडवा तू असं वाटतं, पण नाही. शिक नवीन काही तरी आणि मला थोडसं जास्त वेळा बाहेर फिरवून आण, मला जरा वेगवेगळ्या रंगांचे, आकाराचे, प्रकारचे सवंगडी आण, वाट बघतो आहे, समजलं का?"  

असं हे, माझ्या शॉर्ट्स ने साधलेला संवाद ऐकून, त्याने काढलेली भडास ऐकून, मनोगत कानावर पडल्यामुळे मी अवाकच झाले पुरती. हिम्मत तर नाही त्याचं ऐकायची, बाहेर जाणं अशक्य आणि अवघड, पण नवीन सवंगडी आणण्याचं प्रॉमिस मात्र मी त्याला केलं आहे. म्हणजे तरी शांत होईल  पठ्ठा, वांड कुठला. असं बोलतात का कधी. वा.

ब्लू टिक्स

"पहिली वेळ" हि एक प्रसिद्ध इंग्लिश म्हण आहे. प्रत्येक काम कधी ना कधी आपण पहिल्यांदा करत असतोच. "ना भूतो ना भविष्यती" माहिती असून सुद्धा हे असं काम मला पहिल्यांदा करावं लागेल ह्याची कल्पना पण स्वप्नात देखील केली नव्हती मी. ह्या वर्षी पहिल्यांदा मला माझ्या आईला वर्हच्युअली शुभेच्छा द्याव्या लागणार आणि त्याचं उत्तर देखील मिळणार नाही मला, दोन टिक्स आणि ब्लू टिक्स मिळणार नाहीत पाहायला ज्याची मी आतुरतेने वाट बघिन. अजून तंत्रज्ञानाने तेवढी प्रगती केली नाही आणि कदापि करणार नाहीच. तिच्या पर्यंत पोचतील माझ्या शुभेच्छा हे नक्की. पण नको व्हायला हवं होतं असं.

मला अजूनही आठवतो तो दिवस, माझी अगदी नोकरीची सुरवात होती आणि मी आईसाठी तिचा दिवस म्हणून साडी विकत आणली होती. मी आणि माझी सख्खी मैत्रीण गेलो होतो आणायला. दोघीनींही एकसारख्या साड्या आणल्या होत्या रंग फक्त भिन्न होते. माझ्या आईला "आईचा दिवस" वगैरे संकल्पना तेवढी माहित नव्हती. मग माझा हात धरून बसून सगळं समजावून घेतलं कि हा दिवस खास का आहे, का सेलीब्रेट करायचा ई. तिला एका ठराविक ठिकाणचा मसाला डोसा फारच मनापासून आवडायचा. तसं तिचं सोवळं ओवळं फार कडक, बाहेर कदापि खात नसे पण उपवाद होता तो माझा आनंद ह्या दिवशी एकत्र सेलेब्रेट करण्याचा, केवळ मला आवडतो म्हणून.  मग काय आम्ही दोघी पडायचो बाहेर दादा बाबांसाठी स्वयंपाक करून ठेवून. आधी मस्त डोसा खायचा, भरपूर खरेदी करायची आणि मग पोटभर दिनशा आईस क्रीम खाऊन सायकल रिक्षात रमत-गमत घरी यायचो पोटभर गप्पा मारत. हा उपक्रम बरेच वर्ष चालला. मग फक्त फोन वर शुभेच्छा देणं व्हायचं किंवा कार्ड पाठवायचे आणि भरपूर गप्पा मारायच्या. ह्या वर्षी पासून ते पण शक्य नाही. पण असो. माझी आई नेहेमी सांगायची आणि आम्ही एका कॅडबरी च्या जाहिरातीबद्दल चर्चा करायचो कि तुमच्या आयुष्यात जितक्या जणी आई-समान असतील त्यांना आवर्जून फोन करा, भेटायला जा, त्यांच्या सोबत वेळ घालावा नक्की, जमल्यास / वाटल्यास एखादि छोटेखानी भेटवस्तू घेऊन जा ह्या दिवशी कारण तो त्यांचा हक्कच नाही तर त्यात एक ओलावा आहे तो जपा. आणि म्हणूनच हा दिवस रविवारी येतो मंडळी.  त्यामुळे उठा आणि लागा कामाला आजच, ठरवा उद्या काय काय करायचं ते. मी तर आवर्जून माझ्या प्रत्येक आई झालेल्या मैत्रिणीला तिच्या स्वभावाला साजेश्या शुभेच्छा आजपासूनच पाठवते कारण कोणीच सुटायला नको. खूप जणी आहेत मैत्रिणी, शेजारी, नातेवाईक, ऑफीस च्या सख्या ई. ह्या वर्षी पासून "दुधाची तहान ताकावरच" भागवावी लागणार आणि माझ्या अत्याधुनिक विचाराच्या आईची आठवण करत करत मी हे नक्की करणार ह्यात वादच नाही. "आई असते जन्माची शिदोरी सरतही नाही, उरतही नाही". 

Happy Mother's Day Aai, enjoy to your fullest wherever you are and in whichever form. Miss you not only on your day but every moment. Come back ga. I need you with me forever.

गुरुवार, ५ मे, २०२२

कुरबुरीचं एक कारण

मी स्वःत एक शेतकरी नाही, त्यामुळे मला फक्त थोडक्यात माहिती आहे खरबूज, टरबुज अश्या फळांबद्दल आणि अर्थात त्यांच्या वापराबद्दल. माझ्या लहानपणी पासून ते माझ्यामते मी ९-१० वीत होते तोवर पाटावरवंटा होता वाटण-साटण करायला माझ्या घरी आणि जुना माठ नागपूरच्या भयानक उन्हाळ्यात भाज्या जपून / सांभाळून ठेवायला, बास. मिक्सर, फ्रिज ई. गोष्टीचं फार उशिरा आगमन झालं माझ्या घरात, अर्थात त्याकाळी आमचं घर पहिलंवहिलं होतं ह्या आधुनिक गोष्टी आणण्याकरता. असो.

तर हे बहुउपयोगी फळं खरबूज, टरबूज ई. उन्हात / उष्णतेत, गरम ठिकाणी तय्यार होतात, बहुतांशी समुद्रकाठी, नदीकाठी किंवा इतर ठिकाणी. भरपूर ऊन, ते गरम वातावरण आणि रेती मिश्रित माती फारच उपयोगी ह्या फळांना, त्यांचा आकार, गोडवा, चव, सुगंध आणि बरेच काही मिळण्यासाठी. असो, असे हे उष्णतेच्या सानिध्यात वाढलेले फळ जेव्हा आपण घरी आणून खातो तेव्हा घरातच ठेवावे, नाहीतर तय्यार असतील तर सर्वांनी मिळून मिसळून ताबडतोब फस्त करावे आनंदाने. माणूस हाच एक बुद्धिवान प्राणी असल्यामुळे आपल्याला असं उगाचच वाटतं'कि आपण जगावेगळे स्मार्ट आहोत सर्वच बाबतीत. त्यामुळे अशी फळं आणून किंवा तोडल्या तोडल्या शीतकपाटात ठेवली जातात, टिकवली जातात आणि थंड फळं खाण्याचे चोचले पुरवले जातात. कदाचित त्यामुळेच म्हणजे उष्ण वातावरणात वाढलेले, मग सबंध / पूर्ण
फळं तसेच शीतकपाटात ठेवलेलं, किंवा कापून ठेवलेलं, कापलेल्या फोडी विकत आणलेल्याच सेवन हे घातक ठरतंय माणसाच्या प्रकृतीला. हे एक कारण असू शकतं माझ्या मते. माझ्या लहानपणी बहुतांशी बाबा कचेरीतुन येता येता किंवा आठवडी बाजारातून फळं / पेटी आणली जायची, ती तय्यार झाली कि रात्री सगळे मिळून चिरून संपायची. ते जास्त योग्य होतं. जमल्यास हे असेच सामान्य तापमानातं असलेली फळं खा, प्रत्येक वेळी जूस, मिल्क शेक ई. चा अतिरेक नको, फोडी खाण्यातच / अख्ख फळ खाण्यात वेगळी मज्जा, व्यायाम होतो, जास्त पोषक तत्व मिळतात शरीराला. आपल्या स्वतःच्या आणि घरच्यांच्या तब्येतीच्या कुरबुरीचं एक कारण दूर करण्याचा प्रयन्त करा, ताज्या फळांचं सेवन करा आणि सुदृढ राहा.

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...