२०१८ पासून माझे जसे पाय थांबले पूर्ण शक्तीने काम करण्याचे तसे मी स्वतःला तय्यार करत गेले कि आता मला संपूर्ण वेळ काम करता येणं आव्हानात्मक वाटतंय. मोठा पगार घ्यायचा आणि आधी करत होते त्या पेक्षा कणभर कमी काम करायचं हे मनाला पटत नव्हतंच. त्यामुळे त्या दिशेने वाटचाल सुरु झाली. कठिण होते ते मला सर्वतो परी. अनेक पिढ्या आमच्या कडे फक्त नोकरीच करत आल्या असल्यामुळे मला हे कळत नव्हतं कि पुढे काय? म्हणजे थोडेफार पैसे पण मिळायला हवेत आणि डोक्याला खुराक पण हवीच. त्यामुळे मग विचार, वाचन, मनन, चिंतन, आणि लिखाण सुरु ठेवले. जे जे मार्ग डोळ्यासमोर उभे राहतील ते ते लिहून ठेवले पर्याय म्हणून. शिवाय एक अंदाज घेतला कि प्रत्येक व्यक्ती, किंवा माझ्या एकटीला असे किती पैसे लागतील महिन्याला? अर्थात हे सगळेच अंदाज होते आणि आहेत. कारण प्रत्येक महिना वेगळा उभा ठाकतो आहे माझ्या समोर. त्यामुळे एकच रक्कम खर्च होईल असे मुळीच नाही. मग हळू हळू पूर्णवेळची नोकरी सोडल्यावर एक एक पाऊल टाकायला सुरवात केली. जम बसायला थोडा अवधी निश्चित लागेलच. पण सुरवात खूप मस्त झाली आहे, मालगाडी जागेवर थांबली नाही आहे हे हि नसे थोडके. बराच वेळ हातात असतो सध्या, प्रत्येक रुपया महत्वाचा आहे ह्या घडिला, हिशोब दररोज लिहिला जातोय न चुकता, आणि कमाई पण नमूद केली जाते आहे. अश्या सर्वांची गोळाबेरीज केली. खर्च किती होतो हे समजले. गेल्या ऑक्टोबर पासून ते एप्रिल पर्यंत मिळालेले पैसे भागिले तितके महिने जेव्हा केले तेव्हा काय आश्चर्य? पट्टाकिनी डोळ्यात पाणी उभे राहिलेच. मला महिन्याला लागतात तेवढेच मिळालेत, किंचित कमी पण हे पुन्हा एकदा सिद्ध झाले कि तो आहे. प्रत्येक वेळी माझ्या पाठीशी भक्कम उभा आहे, आधार स्तंभ आहे. त्याची करोडो लेकरे, तरी देखील त्याचे माझ्या कडे किती बारकाईने लक्ष आहे बघा. हे निश्चित कि तो कधीच मला काहीच कमी पडू देणार नाहीच. आज पर्यंत पडू दिले नाही, ह्या पुढे देखील तो सर्व सोय करणार हे नक्की. मनःपूर्वक धन्यवाद त्याला, त्या अपार शक्तीला, त्याच्या निरीक्षणाला. माझ्या कडे शब्द अपुरे आहेत हे सर्व वर्णन करायला.
सोमवार, १३ मे, २०२४
इन टँजिबल
तांत्रिक घडामोडी झाल्या आणि जगभर खूप मोठ्या संगणक तंत्रज्ञानावर आधारित भल्यामोठ्या सिस्टिम्स तय्यार झाल्या. इतक्या मोठ्या प्रमाणात सॉफ्टवेअर बहुतांशी सर्वच जण वापरतात, कारण आता ती काळाची गरज आहे, मग व्यक्ती कुठल्याही क्षेत्रात काम करत असो. अथांग अश्या सॉफ्टवेअर सिस्टिम शिवाय आता पर्याय नाहीच. सर्वत्र ऑटोमेशन / स्वयंचलित यंत्र आणि आज्ञावली निर्माण झाली आहेत. ती डोळ्यांना दिसत नाहीत, स्पर्श करता येत नाही तरी देखील त्यांचे वास्तव्य नाकारता येत नाही कारण आपण सर्व त्यांचा सर्रास उपयोग करतोच म्हणूनच त्यांना इन टँजिबल असे संबोधले जाते. त्या सर्व प्रकारच्या आज्ञावलींपासून आपलं अक्षरशः अडतं, त्याचं महत्व आपण सर्व जाणतो, जणू काही ते आपलं सर्वस्व आहे. दिसत नसले तरी मानतो, आहे ह्याची खात्री बाळगतो अगदी आपल्या बाप्पासारखे नाही का? काल एका लेखिकेने एक बातमी लिहिली आहे "मातृदिन" बद्दल, तिचे थोडक्यात अनुभव. तिच्या म्हणण्या प्रमाणे दुर्दैवाने तिची आई ह्या जगात नाही, मग तिला आपल्या आई साठी हे घ्या, ते घ्या, असा मातृदिन साजरा करा असे इमॆल का येतात आणि माझे दुःख वाढवतात? तर तिला आणि माझ्या सारख्या इतर मुलींना मला हे आवर्जून सांगावेसे वाटते कि आई आहे, तिची शिकवण आहे, तिने सांगितलेले अनुभव आहेत, तिचे बहुमूल्य आशीर्वाद आहेत, किंबहुना आपण तिचाच एक भाग आहोत, किंवा संपूर्ण तीच आहोत. अर्थात सध्या ती इन टँजिबल आहे. पण ह्याचा अर्थ ती नाही किंवा कधीच नव्हती असा नाही. तर तिची शिकवण पुढे नेण्याचे भले मोठे कार्य आता मुलीला जबाबदारीने करायचे आहे, फक्त तिच्याच कुटुंब करता मर्यादित न ठेवता सर्वत्र जमेल तसे पसरवयाचे आहे. एक खूप सुंदर जाहिरात आहे, त्यात असे म्हटले आहे कि प्रत्येकाला आई समान एक जण असतेच, मग ती मावशी असो, शिक्षिका असो, आत्या असो, नाहीतर कोणी. ह्या मातृदिनी किंवा जेव्हा जमेल तेव्हा तिच्या समवेत वेळ घालावा, तिला आवडेल ते करा, गप्पा मारा, फक्त तिच्या शेजारी बसा आणि आठवणी निर्माण करा. इन टँजिबल ला टँजिबल करणे सर्वतोपरी आपल्याच हातात आहे. त्यामुळे उठा आणि लागा कामाला पट्टकिनी. आणि जसे सर्वगुणसंपन्न असे सॉफ्टवेअर सिस्टिम्स तय्यार आहेत, नवीन तय्यार होण्याच्या मार्गावर आहेत, आहेत त्या अजून सुंदर आणि बहुउपयोगी अश्या स्वरुपात नटत आहेत, मग तसेच ह्या दिवसाला बघा. वाईट वाटणे स्वाभाविकच आहे पण त्यावर मात करता यावी ह्यासाठी नतमस्तक व्हा, हात जोडा आणि बघा कसे ह्या पुढील मातृदिन साजरे होतील ते.
रविवार, १२ मे, २०२४
"मी ... झालो तर"
मी पंतप्रधान झालो तर, मी कार झालो तर असे हे निबंधाचे विषय असायचे माझ्या लहानपणी, शाळेत. आज उमगलं ते तसे विषय का होते ते.
आज न्याहारीला चविष्ट पालक+मुळा पराठा सेवन करते वेळी नेहेमी प्रमाणे माझ्या ताटलीत शेजारी छोट्या प्रमाणात लोणचे होते आणि त्याला खेटून चटणी विराजमान झाली होती. पराठेच मुळी इतके पौष्टिक होते कारण त्यात ज्वारीचे पीठ, तिखट मीठ, धने पूड, ओवा आणि कोथिंबीर यथोचित प्रमाणात घातली होती. आणि हो अर्थातच प्रेमाचा भरपूर मसाला देखील होताच जोडीला. तसे बघायला गेले तर केचअप, चटणी, लोणचे काहीही लागत नाहीच तव्यावरच्या गरमागरम पराठ्या सोबत, पण असो, एक पद्धत, सवय किंवा आवड म्हणून ते वाढलं जातंच पानात. गेली अनेक वर्षे मी पराठे करते आहे आणि सेवन पण करते आहे, आज पर्यंत जे घडले नाही ते आज झाले, पराठा चक्क नाराज झाला माझ्यावर. म्हणतो कसा, कि मी काय चविष्ट नाही म्हणून माझा अपमान केलास? ह्या सगळ्यांना माझ्या शेजारची जागा देऊन? तुझ्या लाटन्याखाली आलो, शेकलो गेलो, भिजलो, भाजलो आणि अत्यानंदाने तुझ्या समोर उभा ठाकलो तर जोडीला आहेतच हि मंडळी. का? माझी चव जास्त वृद्धिंगत होते का ह्या सर्वांसोबत? मी मग उत्तर दिले, कि चव तर वाढतेच, प्रथा पण आहेच, जोडी पण हवी ना? आणि शिवाय ह्या चटणीत सगळ्या डाळी आहेत, मेथी आहे, टमाटर आहे, कढीपत्ता ई. आहे त्यामुळे सकाळच्या न्याहारीची पौष्टिकता वाढते आहे, नाही का? आणि नुसती चटणी कधी कोणी खाऊ शकतं का? नाही ना, पराठे शिवाय मज्जा नाही, परिपूर्णता किंवा महत्व नाही असं म्हणा हवं तर. चटणी केवढी, तू केवढा? कशाला बघतोस इकडे तिकडे, ज्यांना जसं आवडतं तसं खाऊ दे ना. हो कि नाही? तेव्हा कुठे महाराज थोडे नरमले, हाश...
असे काहीसे माझ्या हातून आज लिहिले जायचे होते, असा मला विचार करता यावा म्हणून अनेक दशकां आधी निबंध लिहून घेतले गुरुजनांनी एक शिक्षणाचा, भाषेचा भाग म्हणून. वा क्या बात है? मज्जा आवि गयो.
गणाची सुरवात
पत्रिकेत एक प्रमुख बाब नमूद केलेली असते ती म्हणजे गण. गण कोणी, कधी आणि कसा शोधून काढला माहित नाही, पण त्याला एक अध्यात्मिक, सामाजिक आणि अभ्यासपूर्वक पाय असणार हे निश्चितच. खूप आधी गुरुजनांनी हे तीन गण निश्चित केले असणार.
मी मागे एका अनुदिनीत नमूद केल्याप्रमाणे माझ्या दृष्टीने चौथा गण पण अस्तित्वात आहे. त्यात अशी मंडळी येतात ज्यांना "पुरणपोळी देखील तिखट लागते". असो.
मला आज एक उमगलं आहे कि हे गण कसे निर्माण झाले असतील. आताशा आभासी जगात आपण अनेक संघ तय्यार करतो. अगदी शालेय जीवनापासूनच खास मित्र, वर्ग मित्र, शेजारचे मित्र, खेळायचा ग्रुप असे अनेक गट तय्यार होत जातात. अगदी सहज घडतं म्हणा किंवा विचारपूर्वक देखील. निरखून आणि पारखून मग एखाद्याला आपल्या गटात सामील केले जाते. निरखणे आणि पारखणे म्हणजे थोडक्यात त्यांच्या कृतींकडे लक्ष देणे, ते विविध प्रसंगाच्या वेळी कसे वागतात ते टिपणे, त्यांची प्रतिक्रिया काय असते हे बघणे ई. आणि बरेच काही. गहन आहे हा विषय खरं. प्रत्येकवेळी सोज्वळ अशी भूमिका जर घेतली, वयोमान, लहान थोर ह्याचा विचार न करता, न असून राहता जर कार्य करत राहिला, सतत कार्यमग्न राहिला, सगळेच गोड मानून घेतले बहुतेक प्रत्येक वेळी, राग लोभ ह्या पल्याड असा व्यक्ती म्हणजे देव गण. माणसासारखा वागणारा माणूस. आणि ज्याचा कधीच थांग पत्ता लागताच नाही, कुठलीही शाश्वती नाहीच, कधी कुठे कोणाशी काय होईल हे सांगता येत नाही, बिना वातीचा फटाका, गुरगुरण्याचा सातत्य टिकवून ठेवणारा, नको त्यात नाक खुपसणारा, नको तेवढे सल्ले देणारा, नकोसा असा म्हणजे बोलायलाच नको, पत्रिका देखील पाहायला नको. कधीच कुठलेच ग्रह तारे स्थिर दिसणार नाहीतच. अश्यांपासून लांब राहणे अत्त्योत्तमच, ते अशक्य असले तरी. कधीच त्यांच्या कुठल्याच टोकाच्या वागण्यावर जाणे नकोच, चांगले वागले तर वाहून जायला नको आणि वाईट वागले तर दुःख होऊ देऊ नये. त्यांचं यांनाच ठाऊक नसतं ते काय करत आहेत ते, कधीच. सारखे भरकटलेले, गोंधळलेले आणि अक्षम. कधीं आहे फरक लक्षात घेणं "अबसेन्ट माईंडेड प्रोफेसर" आणि ह्यांच्यात पण ते माणूस आणि देवांच्या स्वहिताचे आहे. त्यामुळे पत्रिका बघणाऱ्यांना आणि संगणकाच्या साहाय्याने पत्रिका तय्यार करणाऱ्यांना हात जोडून विनंती आहे कि जरा आपला दृष्टिकोन बदल. तीन गण फक्त नावाला नाहीत, तिसरा भलताच आहे, तिसरा डोळा पापणी रहीत असलेला असा. त्यामुळे तुमच्या हातून कोणाचे ह्या पुढे नुकसान होऊ नये ह्याची खबरदारी घ्या आणि चौथ्या गणाबद्दल समोरच्याला सावध कराच.
शनिवार, ११ मे, २०२४
देऊळ
प्रत्येक देवस्थानचा एक महिमा असतो, एक माहात्म्य असते आणि महत्व पण. बहुतांशी ठिकाणी त्यांच्या स्वरूपाचे तेथे वास्तव्य झाले असते अनेक वर्षांआधी म्हणून त्या स्थानाला अनन्यसाधारण महत्व प्राप्त होते. त्यांचा वास तेथे असतो, त्यांचा आशीर्वाद भक्तांना मिळत राहतो आणि तेथील भक्तिमय वातावरण फारच प्रासादिक असते त्यामुळे ते स्थान तीर्थरूप होते. प्रत्येक देवळाला एक नाव दिलेले असते ते तेथील प्रमुख देवावरून. तरीदेखील प्रत्येक ठिकाणी बाप्पा स्थानापन्न असतोच. मारुतीराया, शनिदेव आणि इतर मूर्ती देखील स्थापलेल्या आढळतात. सर्व देवांना नतमस्तक झाल्याचं पुण्य लाभते एका प्रदक्षिणेच्या म्हणून असेल कदाचित. प्रत्येकाचे श्रद्धा स्थान देखील वेगळे असतेच. त्यामुळे देऊळ हे अनेक मूर्तींनी, अनेक देवांच्या वास्तव्याने भरपूर असे स्थान. तेथील कपूर, उदबत्ती, होम हवं, हार फुले आणि इतर असे प्रासादिक सुगंध एकत्र चाखायला मिळतात. आज एक ह्या जगावेगळा अनुभव मला आला पहाटे / सकाळी. अवघे देऊळ आज माझ्या द्वारी आल्याचा भास झाला मला, किंबहुना अगदी जसे कि मी देवळात नमन करते आहे असा सुगंध अनुभवता आला. प्रत्यक्ष अख्खे देऊळ आले हो मला भेटायला माझ्या साठी प्रासादिक सुगंध घेऊन, एक अनोखी भेट ह्या खास दिवशी. अजून काय हवयं? इतक्या सकाळी फ्लॅट्स मध्ये आजू बाजूला, वर खाली कोणीही देवळात होते तशी पूजा करणे अशक्यच. मग हे काय होते? अद्भुत असे काहीतरी हे निश्चितच. त्याचा मोठे पण तर बघा, मी त्याची भक्त, तर मी त्याच्या दर्शनाला जायचे कि त्याने माझ्या कडे यायचे दर्शन द्यायला? तो कित्ती म्हणजे कित्ती मोठा आहे, तरी देखील माझ्या सारख्या नगण्य, सूक्ष्म अश्या मनुष्याच्या द्वारी पातला प्रत्यक्ष त्याच्या अनोख्या रूपात, कित्ती म्हणजे कित्ती शिकण्यासारखे आहे ह्या कृतीतून. भेट महत्वाची, मग कोणी कोणाकडे जातंय हे महत्वाचे नाहीच. हो ना? अख्खे देऊळ मी आज अनुभवले ह्याची देही ह्याची डोळा. तंत्रज्ञाच्या युगात सिम्युलेशन म्हणतात अगदी तस्से.
गुरुवार, ९ मे, २०२४
अक्षय
आज अक्षयतृतीया, साडेतीन मुहूर्तापैकी एक दिवस, अत्यंत शुभ दिवस. ह्या दिवशी कुठलाही मुहूर्त बघावा लागत नाही कार्य करण्यासाठी. आजचा दिवस जो वर्षातून एकदा येतो तो इतका खास आहे कि ह्या दिवशी प्रत्येक जण काही ना काही नवीन सुरवात करतोच, कोणी नवीन घर घेतो, कोणी गाडी, दागदागिने ई. हे सर्व सुमुहूर्तावर खरेदी करण्या मागचे कारण हे कि हि नवीन केलेली सुरवात अशीच अक्षय राहो, आशिर्वादात्मक झालेली सुरवात अशीच भरभराटीला येऊन टिकून राहो, सदोदित, पिढ्यानपिढ्या. संपन्न अशी सुरवात जी प्रत्येक प्रकारच्या संपत्तीत भर घालताच राहते. घर, गाडी, दागिने ह्याचे मोजमाप आहे, गणना आहे पण जर अगणित असे, सातत्याने जे भरभराटीस येणार आहे, समाजाच्या कामाला येणार आहे असे आज च्या दिवशी घडले तर? ज्यांना स्पर्श करता येतो त्यांना इंग्लिश भाषेत टँजिबल हा शब्द आहे, पण आज च्या दिवशी मला इन टँजिबल अश्या संपत्तीचा अनुभव आला दोन प्रकारे.
आजच्या सुमुहूर्तावर डेक्कन एडुकेशन सोसायटी पुणे विद्यापीठाच्या नवीन इमारतीचा भूमिपूजन सोहोळा होता. मी त्या संस्थेची एक कार्यकारी समिती सदस्य (बोर्ड मेंबर) आहे. त्या मुळे मला आमंत्रण होते आणि मी तो सोहोळा ह्याची देही ह्याची डोळा अनुभवण्या करता उपस्थित होते. आवर्जून गेले होते. जाते वेळी मी कॅब केली होती. त्यात रेडिओ जॉकी ने ह्या दिवसाचे अनन्य साधारण महत्व काय हे नमूद केले. त्या नुसार माझ्या बाबतीत मला असे सुचले कि मी माझ्या वयाच्या १५ व्या वर्षांपासून शैक्षणिक / अध्यापनशास्त्रीय क्षेत्रात कार्यरत आहे. आज च्या दिवशी त्या संदर्भात मला इतक्या अप्रतिम पूजेला हजार राहायला मिळालं आहे हे अहो भाग्यच. मला आज खात्री पटली आणि स्पष्ट झाले कि माझ्या हातून छोटेखानी कार्य सातत्याने सुरु राहणार आहे इन टँजिबल अश्या प्रकारचं, ज्याचे काही मोज माप नाही. खूप भावपूर्ण, अध्यात्मिक, परिपूर्ण आणि सकारात्मकता वृद्धिंगत करणारं असं एकंदरीत वातावरण होतं. ते गुरुजींचे मंत्र, शोडोपचारें झालेली पूजा, उपस्थित असलेले सर्व दिग्गज व्यक्ती, मंडप, सजावट, अथपासून इतिपर्यंत केलेली चोख व्यवस्था आणि सर्वात महत्वाचे म्हणजे जगमान्य, आदरणीय लोकमान्य टिळकांच्या हस्ते सुरु झालेल्या वास्तूत आधुनिकतेचा चढवलेला साज म्हणजे सोन्याहून पिवळे असा अनुभव होता. आत्ता दुकानातून फक्त माझ्याचसाठी आणली आहे इतकी नवीन कोरी कॅब, पोटातील पाणी हलणार नाही असे त्या वाहनचालकांचे सफाईदार गाडी चालवणे, सकाळचे प्रफुल्लित वातावरण अशी झालेली सुरवात, मग अजून काय हवयं? मोठ्या जोमाने, अधिक मेहेनतीने ह्या पुढील वर्षात मी संशोधनाचे काम करणार हे निश्चित, किंबहुना तो ते करून घेणार हे नक्की. क्या बात है!!!
Last but not the least: पुण्यात बसून नागपूरची म्हणजे माझ्या माहेरची चव आज चाखायला मिळाली मला. आज सरतेशेवटी, पूजन झाल्यावर न्याहारीची व्यवस्था केली होती आणि अपेक्षेपेक्षा काही वेगळंच वाढलं गेलं / पुढ्यात आलं. पुण्यात इतके मस्त चविष्ट आणि ठसकेबाज पदार्थ चाखणे हि पर्वणीच होती मला. "अन्नदाता सुखी भव", ते स्वयंपाकी निश्चित मुलाचे नागपूरचे होते ह्यात काहीही दुमत नाहीच. खूप चविष्ट चवदार अशी सुरवात करून दिल्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद.
अथक मेहेनत
आमच्या सोसायटीत एक नवीन पाहून येणार आहे, लवकरच. त्यासाठी इतकी म्हणजे इतकी लगबग सुरु आहे कि ज्याचं नाव ते. म्हणजे माझी दाही बोटे तोंडात अशी परिस्थिती झाली आहे. काय करू काय नाही अशी होणाऱ्या आई वडिलांची स्थिती आहे. इतका उत्साह मी आज तागायत ह्याची देही ह्याची डोळा अनुभवाला नाहीच. मी त्यात इतकी गढून गेले आहे कि माझ्या हातात एक अवयव आहे, खेळणे आहे त्याने मी सगळं रेकॉर्ड करून ठेऊ शकते, लोकांसोबत शेयर करू शकते ह्या कडे माझं पूर्णपणे दुर्लक्षच झालं. वर खाली, इकडून तिकडे, डावीकडून उजवीकडे सारखं भ्रमण सुरु आहे, श्वासही नं घेता, नं खाता पिता, कुठलीही विश्रांती नं घेता, क्या बात है. धडपड सुरु आहे सातत्याने. इतकी सुबक हालचाल, कष्ट आणि ते देखील बाळ येणार आहे हे समजल्यावर? चार पायांच्या पशूंना हे खूप अवघड आहे. इतकी मेहेनत पण ठाऊक नाही घेतील कि नाही, म्हणजे अगदी बोटावर मोजण्या इतके घेतात. ते म्हणतात कि सगळंच पैशानी विकत घेता येतं तर काडी काडी जमवून, कौशल्य वापरून का बांधायचं पहिल्यापासून? अगदी नाविन्यपूर्ण असं?
एक कावळा आणि एक त्याची कावळी ज्या पद्धतीने मेहेनत पल्याड गेले आहेत आज पहाटे पासून ते बघून डोंळ्याचे पारणे फिटले माझ्या. आधी भल्यामोठ्या वृक्षांच्या सुरकुतलेल्या फांद्यांवर चोच घासून सुरवात झाली. मग एक एक काडी, वाळकी बरं का, मग कुठूनतरी मस्त पांढरी शुभ्र दोरी मिळाली त्यांना, मग काय विचारात अहाहा च, अक्षरशः नाचले दोघे ती पायात आणि हातात / चोचीत धरून, फेर धरला चक्क त्यांनी. माझ्या मते होणाऱ्या आईला एक अभूतपूर्व वाळकी भली मोठी फांदी गवसली, ती तिला काही केल्या चोचीत धरून उडून बांधत असलेल्या घरट्यापर्यंत नेता आली नाही, पहिल्या काही प्रयत्नात. ती खाली जमिनीवर पडली. हि खाली आली उडत, ती पुन्हा घेऊन गेली, पण एक भाग राहून गेला. ती जशी ती फांदी घेऊन घरट्यापाशी पोचली ज्याचा मेस्त्री, मेसन ती चा तो होता, त्याने पहिल्यांदा शाबासकी दिली पंखांनी, मग ती काडी नीट ठेवली. ती ने कसं काय त्याच्याशी हितगुज केली कोणास ठाऊक, पण तो खाली आला, आणि उरलेला भाग घेऊन उडाला. सकाळी सहा-सव्वा सहा पासून सुरु केलेली मेहेनत फळाला आली आणि आत्ता अडीच वाजता ते सर्वोत्तम कलेचा नमुना असलेले घरटे तय्यार झाले आहे त्या भल्या मोठ्या वृक्षाच्या एका फांदीवर. लवकरच बाळबोध कावकाव ऐकायला मिळेल असे वाटते आहे. मी ह्या खिडकीतून त्या खिडकीत, अगदी न्याहारी पासून ते जेवण पर्यंत सगळं आज खिडकीत बसून त्यांना बघता बघता झालं. कित्ती म्हणजे कित्ती शिकण्यासारखं आहे ह्या जोडी कडून? आत्ता दोघे बसून त्यांच्या स्वनिर्मित घरात बहुतांशी गादी तय्यार करत आहेत, किंवा एक मस्त पैकी शेवटचा हात फिरवत आहेत.
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...
-
मी अनेक वर्षे एकाच संस्थेमध्ये कार्यरत होते. अखेरीस, मला एका नवीन इंजिनिअरिंग महाविद्यालयाची सुरुवात करण्यामध्ये हातभार लावण्याची सुवर्णसंधी...
-
माझ्या मुलाने भारतातील सर्वात आव्हानात्मक अभ्यासक्रम निवडल्यापासून, मला विद्यार्थ्यांसमोरील अडचणींची जाणीव झाली. मला खात्री आहे की अशा अडचणी...
-
परवा एक फोन आला. लहानपणापासून ओळख असलेली व्यक्ती. घरच्यांसारखीच. गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता त्यांनी अचानक विचारलं: “अजूनही लेक्चररच आह...