शुक्रवार, १३ सप्टेंबर, २०२४

२०२७: मातृभाषा आणि तंत्रशिक्षण


'नविन राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२०' हे २१ व्या शतकातील पहिले 'राष्ट्रीय शैक्षणिक धोरण' आहे. ह्या धोरणानुसार शैक्षणिक पातळीवर अनेक बदल झाले आहेत.  त्यातला एक मला भावलेला बदल म्हणजे मातृभाषेचा वापर. म्हणजे अगदी उच्च शिक्षणात सुद्धा मातृभाषा वापरावी, असा सल्ला दिला गेला आहे. ज्या काही महत्वाच्या घडामोडी असतील, किंवा शब्द असतील ते तसेच राखून पण समजावून सांगण्याचे काम मातृभाषेत करावे एवढेच. ते मला प्रचंड भावले आणि पराकोटीची इच्छा जागृत झाली मराठीतून तांत्रिक शिक्षण देण्याची. एका खूप दिग्गज प्राध्यापकांची ओळख देखील झाली त्याच दरम्यान जे हे धोरण येण्याआधीच मराठीतून शिकवत होते आणि त्याचा त्यांना फायदा पण दृश्य होता. मराठीतून समजावून सांगितल्यामुळे मुलांची प्रगती कुठेही खुंटली वगैरे नाहीच. त्यामुळे मला मनापासून वाटले कि मला अशी संधी मिळायला हवी. आणि असे एक महाविद्यालय आहे पुण्यात जेथे एक अख्खा वर्ग खास मातृभाषेतून शिकतो.  त्यांची हि चवथी बॅच / तुकडी आहे जी खूप व्यवस्थित मराठीत मोठी होते आहे, वाढते आहे आणि मज्जा येते आहे. त्यांना काही तास शिकवण्याची सुवर्ण नाही तर प्लॅटिनम संधी मला मिळाली. मराठीवरचं माझं नितांत प्रेम, माझी मातृभाषा, माझं बालपण ज्या भाषेत झालं, अश्या भाषेत शिकवायचं म्हणजे अत्यानंद आहे माझ्यासाठी.  आणि दुधात साखर म्हणजे, फक्त संशोधन कसे करायचं हे सांगायचं आहे विद्यार्थ्यांना, बास. मग काय सोन्याहून पिवळं असं झालाय मला. चार तास दिले होते, दोन पूर्ण झालेत. पुढील दोन तासात मी जागून घेणार आहे, कारण हे पहिल्यांदाच घडतंय. जे शिक्षक तेथे सातत्याने काम करतात त्यांना कित्ती समाधानी वाटत असणार. मुलांना किती सोप्प झालंय कारण मातृभाषेत समजावून सांगणार, कोणालाच उगाच इंग्लिश वापरायला नको आणि शिवाय प्रश्न पत्रिका देखील दोन्ही भाषेत छापली जाते, इंग्लिश मधला जर यदाकदाचित प्रश्न नाही उमगला तर पट्टाकिनी मराठी बघा आणि भन्नाट उत्तर द्या.  आमच्या वेळी का नव्हतं असं मराठमोळं वातावरण महाविद्यालयांत, विद्यापीठात? उगाच तोडकं मोडकं इंग्लिश वापरावं लागलं मला.  असो. आता आहे ना, बास, अजून काय हवंय? 

२०२६: चवळी, तू सुद्धा?


मी अगदी लहानपणापासून "चोर" नावाचा शब्द अनेकदा घरी, स्वयंपाकघरात ऐकला, किंबहुना कानावर पडला. मला खूप जास्त उत्सुकता त्यामुळे मग मी त्याचा अर्थ शोधून काढलाच.  मटकीशी मर्यादित अशी ती गोष्ट होती, जास्तीत जास्त मुगाला लागू पडत होती. मटकीची उसळ करायची म्हणजे चोराचा जप सुरु व्हायचाच. कारण आईला ते दोन-चार दा रोळून घ्यावे लागत असे, निवडावे लागत असे अगदी व्यवस्थित पद्धतीने, मागे पुढे करून. तरी देखील एखादा चोर सापडायचाच, दाताखाली यायचाच. अर्थात हे अगदी क्वचित होत असे, पण खात्री नसायची. तर चोर म्हणजे न भिजलेले, फुगलेले असे दाणे मटकीचे. त्या वेळी सगळं घरीच करावे लागत असे, त्यामुळे भिजवणे, बांधून ठेवणे, मोड आले कि मग उसळ, किंवा वडे होत असतं. आणि अनेक पदार्थ जसे कि भेळ, मिसळ ई. 


आताशा तर सगळेच आयते मिळते मोड आलेली कडधान्य त्याला उपवाद नाहीत. एक टप्पा कमी झाला असला तरी देखील ते कडधान्य नीट निवडावे लागतातच, ह्या चोरांच्या पायी. मुगात माझ्या अनुभवाप्रमाणे जास्त आढळतात लपलेले चोर आणि हे दोन्ही दाणे इतके बारीक असतात कि बराच वेळ लागतो निवडायला.  


आज मी उडालेच. जरा हटके बदल म्हणून चवळी भिजवली. आताशा बारीक आकाराची चवळी मिळायला लागली आहे. जसा बारीक / इन्स्टंट साबुदाणा म्हणे पोटाला त्रासदायक ठरत नाही तशीच हि बारीक चवळी.  बारीक म्हणजे नेहेमीच्या आकारापेक्षा थोडा कमी आकार, भिजवल्यावर बऱ्यापैकी मोठा होतो तो दाणा. ह्या पठ्ठीला इंग्लिश भाषेत "ब्लॅक आय बिन" म्हणजे "डोळा असलेली" ती, असा काहीसा शब्दशः अर्थ. म्हणजे जिला डोळा आहे, सदृश सगळं मटकी किंवा मुगासारखे नाही, अगदी बारीक आणि एक आकार, एक रंग ई. त्यामुळे डोळा आहे, आकार मोठा आहे, मोड येण्याची जरूर नाही, पट्टाकिनी भिजते आणि शिजते देखील. थोडेसे खोबरे घातलेले वाटण-साटंण घातलं कि भलतीच चविष्ट होते. इतकी वर्ष मी ह्या डोळस मैत्रिणीसोबत आहे, तिला वापरते आहे. पण आज अचानक काय वाटलं कुणास ठाऊक पण म्हटलं एक शिट्टी घेण्याआधी, मस्त धुतल्यावर एकदा नजर फिरवावी आणि बघते तर काय, भला मोठ्ठा प्रश्न उभा ठाकला ना माझ्या पुढ्यात, आणि मी विचारलं "अगं चवळी, तू सुद्धा?" हे असं कधीच पहिले झालं नव्हतंच कधीही. चवळीत चोर? बाप रे, अशक्य आणि अवघड.  एक नाही, दोन नाही तर चक्क तीन. हे माझ्या दृष्टीने अशक्यच आहे. ह्या ब्लॅक आय बिन ला, ठळक आणि मोठ्या आकाराच्या डोळस जिन्नसाला विनंती आहे कि जरा अजून मोठे करा डोळे पण चोर शिरू देऊ नका, ते तसेच पडिक राहू देऊ नका तळाशी, करा काही तरी हालचाल. तुम्ही इतर कडधान्यासारख्या नाही आहेत हे लक्षात ठेवा आणि वागा. 

मंगळवार, १० सप्टेंबर, २०२४

२०२३: ताठ मानेने जगणे


अर्धशतकी वाटचाल झाली कि, स्वेच्छा निवृत्ती स्विकारली कि, थोडेसे हात मोकळे झाले कि, मग "ताठ मानेने जगणे" ह्या म्हणीचा, ह्या वाक्यांशाचा अर्थ नीट समजतो, किंबहुना उमगतो, स्पष्टपणे. मला तरी आत्ता जास्त प्रकर्षाने तो कळला. तर त्याचं असं झालं "सारे कळत नकळतच घडले", खूप मोकळेपणाने अनेक आधुनिक गुरूंचे विचार ऐकायला मिळाले, वेळच वेळ हातात असल्यामुळे. अनेक कार्यक्रम बघितले, ऐकले, खूप वाचन झालं आणि त्यामुळे अनेकविध गोष्टी विचार करण्यासारख्या समोर उभ्या ठाकल्या. आपल्या संपर्कात आलेले प्रत्येक जण, हि संपूर्ण सृष्टी, आणि इतर सगळे किती महत्वाचे आहेत, होते, त्यांचं महत्व पुन्हा एकदा प्रकर्षाने जाणवलं मला. अर्थात मी काही दुसऱ्यांचे ऐकून किंवा वाचून गप्प बसणाऱ्यातली नाहीच मुळी. मी माझे ध्यान, योगासन, व्यायाम आणि मनन - चिंतन करत असतांना एक जाणवलं ते म्हणजे मानेचं महत्व. 


हा असा एक अवयव आहे ज्याच्यामुळे किंवा ज्याच्या मार्फत श्वासाची, अन्न-पाण्याची देवाण-घेवाण होते. नैसर्गिकरीत्या भलं मोठ्ठं डोकं, मेंदू, चेहेऱ्यावरचे सगळे अवयव ह्या सगळ्यांचं वजन पेलण्याची ताकद ह्या मानेत आहे. सर्वदूर बघण्याची कला ह्या मानेच्या हालचालीमुळे शक्य होते. ताठ मानाने जगण्याची कला काय जगणं हिच तर शिकवते, कारण ह्याच तो कक्ष, हीच ती खोली आणि हीच ती पोकळी / जागा जिच्यामुळे बोलणे, विचार पोचवणे शक्य होते, माझ्या मते. अर्थात ह्या कक्षात प्रत्यक्षात काय काय होतं अंतर्गत भागात हे जरी खूप खोलात माहिती नसलं तरी जाणवलेलं फक्त इथे मांडण्याचा प्रयत्न आहे. डोक्यात काय शिजतंय, डोळ्यांनी काय टिपलंय, कानावर काय पडलंय, काय जाणवलं आहे, हे सगळं शब्दात मांडणे ह्या मानेच्या साहाय्याने शक्य होतं. त्यात माझ्यासारख्या आवाजाच्या क्षेत्रात काम करणारीला  तर मानेचे आभार मानावे तेवढे कमीच. 


सगळ्या अवयवांच्या साथीने, मला माझे विचार एखाद्या विषयांबद्दल अनेक वर्ष माझ्या विद्यार्थ्यांसमोर मांडता आले उत्कृष्टपणे, ताठ मानेने जगता आलं, त्यामुळे प्रत्येक अणुरेणूंचे तर मी आभार मानतेच, आणि मानेचे खास, जिच्यामुळे माझ्या नावाला, कार्याला मान प्राप्त झाला. धन्यवाद. 

२०२१: पक्की सँडविच पिढी


सतत शिकणारी अशी अनोखी पिढी म्हणजे जे माझ्यामते, कुठे तरी वाचलंय १९६५-१९७५ का १९७०-१९८० च्या दशकात म्हणे जन्माला आले. अगदी फोन नाही ते स्मार्ट फोन हा प्रवास, सगळं हाताने करणारे ते अत्याधुनीक, सायकल ते सूर्य उर्जेवर चालणाऱ्या गाड्या चालवणारी अशी कित्येक उदाहरणे देता येतील. त्यातलाच अजुनक एक, म्हणजे नवीन मणी त्या माळेतला, दुर्लक्षित पण आत्यंतिक महत्वाचा असा. असो. 


तर ह्याच पिढीतील असंख्य मुलींनी ठराविक सासू-सून नाते बघितले, अनुभवले आणि निभावले देखील. बऱ्याच सुनांनी त्यांच्या सासू-सासऱ्यांची मनःपूर्वक सेवा केली, अगदी मग त्या गृहिणी असोत नाहीतर खिंड लढणाऱ्या, नोकरी करणाऱ्या असोत. जीवाचे रान करून सगळ्या स्तरावर व्यवस्थित कामे निभावली, सगळं आपल्या अंगावर घेतलं, सणवार ते आधुनिक प्रकार सगळं म्हणजे सगळंच. 


पण आता अख्खी पिढी बदलली, वारे वेगळेच वाहू लागलेत. त्यामुळे बहुतांशी मंडळी लग्न नाही अशीच भाषा बोलत आहेत. बरं हो-नाही म्हणत केलंच लग्न तर नक्की जोडीदार कोण येईल हे ठाऊक नाही, खात्री नाही, काही मदत होईल हे देखील माहित नाही. त्यामुळे ह्या सुना ज्यांनी त्यांच्या आधीच्या पिढीचं केलं, त्यांचं सगळं सांभाळलं आणि पुढील पिढीला पण घडवलं त्या जेव्हा थकतील तेव्हा काय? 


सोयी आहेत, जेष्ठ नागरीक ह्यांच्या साठी वेगळी घरे आहेत, घरी परिचारिका ठेवता येईल, असे अनेक पर्याय आहेत, म्हणजे अजून नवीन शिकणं आलंच. नवनवीन गोष्टी शिकणं काही सुटत नाहीच, कंटाळा येऊन चालणार नाहीच. एक तरणोपाय आहे, शेवट प्रयन्त ठणठणीत राहण्याचा प्रयत्न करायचा, शारीरिक, मानसिक आणि सामाजिक स्तरावर नेहेमी.


हे नवीन जुन्या नव्याचं सँडविच, छोट्याश्या हातभर दुकानांपासून सुरु झालेलं आकाशाएवढ्या मॉल कडे वळलं, आणि अखंड शिकत राहिलं आज तागायत. काय मुहुर्तावर जन्माला आले सगळे हे.

२०२०: कंडिशनर


एखादी गोष्ट चांगल्या अवस्थेत ठेवणारे एक द्रव्य, अनुकूलक. माझ्या लहानपणीपासून ते स्नातक पदवी मिळेपर्यन्त शिकेकाई हाच एक प्रकार होता, शाम्पू उदयास आला नव्हता, मग तर कंडिशनर ह्याची गोष्ट सोडाच. पण हो आमच्या केसांना, लांबसडक, कात्री न पहिल्या अश्या सहज सुंदर केसांचे कंडिशनींग नक्की होत असे. कसे? सांगते. मस्त कडत्त पाण्याने (म्हणजे अर्थात सोसेल आमच्या तापमानाचे हो) जेव्हा केस धुतले जातात तेव्हा शांतपणे ते जाडसर टॉवेल ने बांधून ठेवण्याची पद्धत असायची. अगदी अनिवार्य, अपरिहार्य असे होते ते. त्याची कारणे देखील आहेत. एक म्हणजे तेव्हा फक्त आठवड्याच्या आठवड्याला पुरेसे व्हायचे केस धुणे. आणि तो बहुतांशी रविवार असायचा, म्हणजे केस धुवून बाहेर पडल्या पडल्या गाडीवर हवेत, वाऱ्यात जायला नको, सुट्टीचा हक्काचा दिवस असल्यामुळे. त्यामुळे बांधलेले केस सोडायची घाई नसायची. मला अजूनही आठवतंय कि आई कधी कधी सगळं काम झाल्यावरच केस मोकळे करायची, कारण तेव्हाच तीचा हात रिकामा व्हायचा आणि अर्थात केस चुकून इकडे तिकडे पडू नयेत हे एक कारण शिवाय असावं. तेव्हा तसेही केस नेहेमीच बांधून ठेवायची प्रथा होती. म्हणजे बघा ना ती वाफ, केस धुतल्या नंतरची कित्ती वेळ मुरायची, ते केस त्या मस्त वातावरणात कसे पहुडायचे अगदी अनुकूलक परीणाम साधेल तसे किंबहुना कणभर जास्तच मस्त, अर्थात माझ्यामते.  


आपण अनेकवेळा ऐकले आहे, किंवा आपल्या कानावर पडले आहे कि मितभाषी असावे, त्याचे पण खूप फायदे आहेत, अर्थात नेहेमी करता नाही पण अगदीच गरजेचे असेल तर बोलावे. दोन उदाहरणे घेऊ या, म्हणजे मग मुद्दा नीट समजेल. एक म्हणजे खाता पितांना चूप, त्या खाण्यावर लक्ष केंद्रित करा, मग गप्पा मारा. आपल्या भारतात बहुतांशी गरम पदार्थांना जास्त महत्व आहे, पहिल्या वाफेचे हे फार जगावेगळे चविष्ट लागतेच ह्यात दुमत नाहीच. आधी चहा चे उदाहरण घेऊयात. चहा घेते वेळी, घेतल्यानंतर एक प्रयोग हमखास करून बघा. तेव्हा गप्पा नकोच. काही जणांना चहा प्यायला रे प्यायला कि घोटभर का होईना पाणी प्यायची सवय असते. ते पण टाळा, एक प्रयोग म्हणून. आणि मग बघा कसा अनुकूलक परिणाम साधता येतो ते. तो परिणाम फक्त घश्यापुरता मर्यादित न राहता तो संपूर्ण पचन संस्थेपर्यंत लागू पडतो. सगळ्या अंतर्गत भागांना धन्य वाटतेच. एकदा मस्त वाफाळता चहा सेवन केला कि एकटे असतांना डोळे बंद करा, कानांवर हात ठेवा एखाद दोन मिनिटं आणि परिणाम बघाच, अनुभव घ्या. अगदी नाक-कान-घसा ते पोटापर्यंत मस्त वाटतं. हेच जेवतांना सुद्धा होते गरमागरम आमटी ओरपली कि, रस्सा भाजी वर ताव मारला कि ई. बघा तर एकदा अनुभव घेऊन. 


नवीन जन्मलेल्या बाळांना देखील बघा ना मस्त मालिश आणि त्या नंतर आंघोळ झाली कि घट्ट गुंडाळून झोपवतात. थंडी चा मौसम असेल तर धुरी देतात, ई. हे सगळं पण अनुकूलक प्रभावी ठरण्यासाठीच. एवढंच कशाला, मोठ्यांची मालिश झाल्यावर, कडक पाण्याने आंघोळ केल्यावर देखील मस्त पांघरुणात घुसून झोपण्याचा उपदेश दिला जातोच. 


आता नवनवीन औषध उपलब्ध आहेत तरी देखील अगदी लहान बाळांना जर सर्दी झालीच तर न्हाणी घरात सगळीकडे खूपच गरम पाणी, त्यात विक्स घालून अनुकूलक असा उपयोग होतो, चोंदलेले नाक मोकळे होते आणि आई हातात घेऊन उभी राहिलेली असते तिला पण एक संरक्षक असा प्रभावी उपचार सहज घडतो.  


जिभेला जमेल तेवढं गरम दूध हळद घेऊन (अर्थात औषध म्हणून, अर्धा छोटा कप) लगेच डोक्यावरून पांघरुण घेऊन झोपल्यावर अनुकूलक परिणाम साधला जातोच, सर्दी पडसं झालं कि. 


असे अनेक मस्त मस्त रोजच्या रोज बघायला, अनुभवायला मिळणारे किस्से सांगता / मांडता येतील जे अनुकूलक आहेत, कंडिशनर आहेत. त्यामुळे तो कृत्रिम असा  थंडावा सोडा, गारेगार सतत सेवन नकोच, आपले पदार्थ आपल्याला जास्त योग्य आहेत हे लक्षात घ्या आणि अनुकूलक हा फक्त केसांना उपयोगी नसतो हे देखील ध्यानात ठेवा. 

अनेकांचा दिवस गरम पाणी+मध आणि बऱ्याचदा लिंबू असा होतो. मी एका पणजीशी बोलले, संवाद साधला, कुठल्याही बाजूने त्या पणजी वाटल्या नाहीत. त्याचं खास रहस्य म्हणजे त्या कधीच गरम पाण्याशिवाय कुठलेही पेय घेत नाहीत. थंड तर सोडाच, पण साधे पाणी / माठातले ई. पण नाहीच, कटाक्षाने त्यांनी ते पाळले घरच्या जेवणासहित.  त्याच पद्धतीने अनेक जणांचा दिवस गरम पाण्याने, हळद-दूध घेऊन संपतो. त्यामुळे कंडिशनींग कसे करायचे मुळतः हे ठरवा जे संपूर्ण स्वास्थ्य बहाल करेल प्रत्येकाला.  

२०१९: भागिले १२,१६,१७,१८...


काल परवाची गोष्ट. ऐकिव आणि प्रत्यक्ष ह्यातला फरक आणि फिकर मला जाणवली. तर त्याचं असं झालं कि माझ्या ऐच्छिक निवृत्ती नंतर मला "व्यावसायिक कर" भरावा लागणार आहे, माझा माझा, वेगळा. आधी हे पगारातूनच केलं जायचं, म्हणजे कचेरीतले लोक इतकी वर्षे हे सगळे निमूटपणे सांभाळत होते, मला अगदी खरं सांगते त्याची भनक पण नव्हती. हो माहिती होतं कि असा एक कर भरावा लागतो, भरला जातो, मी भरते ई. पण. हा पण इतका मोठा असेल हे समजले नाहीच कधी.  मी सध्या अगदी छोटी-मोठी सेशन घेते इकडे-तिकडे, जसे बोलावतील तसे. जास्त पळापळ नको होते, त्यामुळे ठरावीक तास द्यावे हाच तर खरा उद्देष होता निवृत्तीमागचा. 


एका विद्यापीठाच्या कर-सल्लागाराचा मला फोन आला ह्या "व्यावसायिक करा" संदर्भात. आणि त्याच वेळी त्याने एक साधा-सोप्पा प्रश्न केला मला, "मॅडम तुमचे वार्षिक उत्पन्न किती आहे सध्या?". अर्थातच माझ्याकडे त्याचे उत्तर तय्यार होते कारण मी बघितले होते कि मी ह्या एका वर्षात, नोकरदार ते व्यावसायिक हा बदल टिपतांना किती उत्पन्न मिळवले? तो आकडा सांगतांना अभिमान वाटला कारण तेवढे मला पुरेसे आहेत ह्या क्षणी, माझा महिन्याचा खर्च भागवण्याकरता. कारण देवाच्या आणि ह्यांच्या कृपेने डोक्यावर छत आहे, सर्व सोयी सुविधा आहेत, चारचाकी आहे, मग फक्त महिना उत्कृष्ट रीत्या सरण्यासाठी लागणारी पुंजी आहे. कुठलीही तुलना नाहीच, मीच हे सगळं मागून घेतलं होतं आणि ते मला मिळालं. मी पूर्णवेळ नोकरी करतांना जेवढा महिन्याचा पगार होता  त्याला आता भागिले १२,१४,१७,१८... असा तो आकडा आहे, त्यामुळे ती मीच का? हा एक छोटासा प्रश्न / विचार मात्र मनाला शिवून गेला. अर्थात घर-दार पेक्षाही महत्वाची अशी जबाबदारी पण नाही, त्या मुळे देखील गाडी सुरळीत सुरु आहे, आणि ती अशीच सुरु राहणार ह्याची खात्री आहेच, कारण "त्यांचा" आशीर्वाद आहे. पण तो आकडा सांगतांना जरा कडा ओल्या झाल्या आपसूकच. पण चढता क्रम हा टिकून राहिला आहे हे जास्त मनाला भावणारी बाब आहे.  आधी मी लहान वयाच्या मुलांकडूनच फक्त रोजच्या रोज शिकत होते. आता विविध वयाच्या, अनुभवाच्या आणि वेगळ्या विद्यालयांच्या मंडळींकडून आत्मसात करते आहे, बऱ्याचश्या गोष्टी. मला त्यांना काही क्लुप्ती कथन करता येत आहेत, अनुभवातून शिकलेल्या अश्या. त्यामुळे पैसे किंबहुना पॉकेट मनी तर मिळतो आहेच शिवाय पुणे दर्शन देखील घडतंय. अजून काय हवं? हे खूप आहे, समाधान आहे आणि एकाच कमाईवर दोनदा कर भरायचा का? ह्या प्रश्नाचे उत्तर देखील आता शोधणे सुरु आहे.  एक म्हणजे मिळकत कर आणि दुसरा आता हा व्यावसायिक? एकच माणूस, मिळणारी एकच रक्कम पण कर मात्र दोन. असेल काही त्यावर तरणोपाय, शोधावा लागेल निश्चितच. 


आनंद, समाधान, पायांना आराम, कुठलेही वेळापत्रक नाही, सर्वांशी भेट, कार्यक्रमांना हजेरी निवांतपणे दिलेली असे आणि अनेक विविध गुणाकार पण आहेत हो.  थांबले नाही मी, पण गती कमी केली आहे, प्रचंड प्रमाणात. 

सोमवार, ९ सप्टेंबर, २०२४

२०१८: अनोखी बात


काल नेहेमीप्रमाणे एका विद्यापीठात मला बोलावणं आलं होतं आणि मी संशोधन करण्याचे सोपे उपाय, असं समजावून सांगत होते, ते देखील इंग्लिश भाषेत. ऐकणारे फक्त मराठी नसल्यामुळे आणि शिवाय "क्रुत्रीम बुद्धिमत्ता" वापरून शिकवायचं म्हणजे इंग्लिश भाषा आलीच ओघाने. माझं लक्ष फक्त शिकण्याकडे केंद्रित होतं आणि त्या पुढे माझ्या पुढे बसलेल्या समुदायाकडे. पण जेव्हा मी सगळं त्या दिवशीचे काम आटोपून निघाले तेव्हा मला दोघी जणी काही बोलल्या.  त्यातली एक  लिफ्ट चालवणारी होती. आणि दुसरी शिक्षकेतर कर्मचारी होती एका विभागात. अगदी जेथे माझं सेशन सुरु होतं त्याच्याच दारात, अगदी थोड्याश्या अंतरावर ती लिफ्ट होती. त्यामुळे तिच्या कानावर माझे शब्द पडत असणार. दुसऱ्या मॅडम ज्या होत्या त्या त्याच विभागात काम करणाऱ्या असल्यामुळे त्या येता - जाता ऐकत होत्या, दोन तीनदा म्हणे थोड्याश्या थांबून पण ऐकत होत्या. दोघीही म्हणाल्या कि आम्हाला काहीही समजत नव्हते तुम्ही काय सांगत आहेत पण ज्या पद्धतीने सांगत होतात ते आवडलं आम्हाला. 


हो, मी विसरलेच. ह्या आधी, माझं सेशन जसं संपलं तसं एक जण आल्या कि आणि भरभर खूप काही सांगायला लागल्या. त्यांची बसण्याची जागा म्हणे शेजारच्या लॅब / प्रयोगशाळेत आहे. आणि त्यामुळे त्यांना सगळंच ऐकू येत होतं. त्या नेमक्या माझ्याच विषयाशी संलग्न होत्या त्यामुळे त्यांना म्हणे खूप आवडलं.  हे होत नाही तर कॉरीडॉर मधे मागल्या सेशनला एक मॅडम होत्या. त्यांची गाठ-भेट झाली. त्या म्हणाल्या, मी संशोधनाचे धडे गिरवायला तर सुरवात केली आहेच, पण शिवाय तुमची शिकवण्याची लकब, पद्धत पण अंगिकारली आहे. त्यात काही माझे, माझ्या विद्यार्थ्यांनुसार बदल केले आणि त्यामुळे खूप मज्जा येते आहे.  ह्या मॅडम होत्या ते सेशन मागल्या वर्षी मी घेतले होते.  


म्हणजे बघा, थोडेसे शिकलेल्या लिफ्ट-ताई, शिक्षकेतर कर्मचारी, आणि दोन शिक्षिका, आणि ह्या सगळ्या माझ्यापेक्षा तरुण, ह्या पिढीतल्या, त्यांचे आपले विश्व, पद्धती, विचार आणि आचार. पण त्यांना माझ्या सारख्या मराठमोळ्या वातावरणातून आलेल्या मुलीचे वर्ग आवडले हे ऐकून खूप बरं वाटलं, उत्साह आला, नवनवीन प्रयोग करण्यासाठी कंबर कसली गेली आणि फक्त नवीन नाही तर नावीन्याने परिपूर्ण असे. एकतर माझा आवाज मोठा आहे, त्यात माईक होता, शिक्षकी पेशात राहिल्यामुळे आवाजाला शिकवतांना एक वेगळी धार लागली जातेच, नकळत. 


विविध स्तरावरची मंडळी होती काल वर्गात, प्राध्यापक, मुख्याध्यापक, नवीन शिक्षक, नवीन संशोधक, स्नातक आणि स्नातकोत्तर विद्यार्थी, सगळेच, ७० च्या घरात असतील कदाचित. त्यामुळे सर्वांपर्यंत पोचायचं म्हणजे त्या त्या पद्धतीची उदाहरणे देणे आलेच, गोष्टी सांगितल्या गेल्या, एकंदरीत मज्जा आली, समाधान वाटलं. "त्याचे" मनःपूर्वक आभार हे सगळं घडवून आणल्या बद्दल. शतशः धन्यवाद

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...