बुधवार, ९ ऑक्टोबर, २०२४

२०५२: सण आणि फराळ


मी अगदी लहान होते तेव्हापासून मला आठवतंय कि माझी आई घरी काम करणाऱ्या सर्वांनाच पोटभर फराळ खाऊ घालत असे, मग त्या मावशी असो, ड्राईव्हर, दररोजची भाजीवाली, फुलवाला आणि इतर बरेच जणं. ती खाऊ घालायची, घरच्यांसाठी द्यायची आणि सगळ्यांच्या चेहेऱ्यावर एक मस्त आनंद आणि समाधान असायचं. त्यावेळी ती माउली सगळं घरी करायची, अर्थात त्याच मावशींची मदत व्हायची. हे असं कित्येक वर्ष सुरु राहिलं अविरत. 


मग माझी बारी आली, मी पण तेच करण्याचा प्रयत्न केला आणि हे विसरले कि मध्ये अनेक वर्षांचा कालावधी गेला आहे, ठिकाण वेगळे आहे, त्यामुळे मूळ पाणी, विचारसरणी पण फार वेगळी आहे, आता ते जुनं खाऊ घालणं तितकसं आवडत नाही आहे बायकांना. त्यामुळे मग मी थोडासा विचार केला, अवतीभोवती विचारले, ऐकले, वाचले आणि मग काय तो निर्णय घेतला. पगाराला पगार हा एक नवीन नियम होता माझ्यासाठी, अलिखित असा, तो पाळला, थोडेसे खाऊ घातले नाहीतर घेऊन जायला सांगितले. बास. त्यांना बोनस जास्त प्रिय आहे हे लक्षात आले. आणि त्या बोनस च्या पैशातून मग त्या त्यांच्या पद्धतीचे सगळे आणतात, किंवा करतात. असो. ह्या बायकांची एक नवीन खासियत पण समजली कि दिवाळीचा बोनस हातात पडला कि नवीन कामे बघायची. असो तो विषयच वेगळा आहे. 


ह्या सगळ्या बदलत्या काळात मला मात्र चुटपुट लागून राहायची कि सणाच्या दिवशी आपण एकट्याने फराळ का करायचा, सर्वांना देऊन खाल्ला पाहिजे. सरंजाम वाटप सुरु झाले न्यू नॉर्मल दिवसांमधे कदाचित. कारण त्या वेळी ती मोठी गरज होती आणि त्या आधी होत असेल तर माझे लक्ष सगळे माझ्या मुलांना मोठं करण्यात, माझ्या नोकरीतच होते. पण २०१९-२० पासून आत्तापर्यंत सातत्याने मी बघते आहे कि सरंजाम वाटप सुरूच आहे. कोविड च्या काळात कदाचित त्या भागातले लोक फक्त त्याच राजकारण्यांच्या ठिकाणी जाऊन वस्तू / जिन्नस घेत होते, पण आता फिरण्यावर कुठलीही बंदी नसल्यामुळे म्हणे एका पेक्षा जास्त ठिकाणी जाऊन हे जिन्नस गोळा केले जातात, काही जण इतकं करून थांबत नाहीत तर गावी जाऊन पण काही वस्तू घेऊन येतात. खूप जास्त होतंय हे सगळं.  पण अर्थात मला माहित नाही ते हे सगळं कसं काय उभं करतात, बहुतांशी तर टॅक्स च्या पैशातून होत असावं सगळं. जर हे खरं असेल तर मी माझ्याकडून माझ्या मावशींना भरपूर फराळ करण्याचे सामान देते आहेच अप्रत्यक्षरीत्या. कोणी तरी त्याची उत्कृष्ट काळजी घेतंय मग मला चुकल्यासारखं वाटण्याची काहीच गरज नाही.  खूप म्हणजे खूप बदल झाला आहे, सर्वच स्थरावर. असो. काळाचा महिमा, अजून काय. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे कि इतकं सगळं मिळतंय तर खूप आणि समाधानी राहावं अजून काही नाही.  

मंगळवार, ८ ऑक्टोबर, २०२४

२०५१: आळशीपण भारी देवा...


"बाईपण भारी देवा" नावाचा सुप्रसिद्ध चित्रपट इतक्यातच येऊन गेला. फारच भन्नाट अश्या आशयाचा तो चित्रपट तय्यार केला होता. अतिशय सुंदर पटकथा, गाणी, दिग्गज कलाकार आणि एकंदरीत सर्वस्तरावरच्या प्रेक्षकांना भावणारा असा तो चित्रपट आहे. 


आता असं ऐकिवात आहे कि त्याच चमूने एक नवीन चित्रपट तय्यार केला आहे, किंवा जय्यत तय्यारी सुरु आहे "आईपण भारी देवा". खात्री आहे कि हि पण अतिशय सुंदर कलाकृती असणारच. साधारण शीर्षक वाचले कि आणि आधीच्या कामावरून नक्कीच नाविन्यपूर्ण, माहितीपूर्ण, भावणारी निर्मिती असणारा ह्यात शंकाच नाही.  आता फक्त तो प्रसारीत होण्याची वाट बघायची, मग जाऊन मोठ्या पडद्यावर आनंद उपभोगायचा.  


हे सगळे स्त्रीप्रधान असे चित्रपट, किंवा कौटुंबिक पण म्हणता येईल असे खूप मनाला भावतात. दररोज चे विषय जरी असले तरी एक छाप सोडून जातात हे नक्की. नवीन पिढीला पण उत्सुकता नक्की असते सगळं जाणून घ्यायची. किंवा ह्या निमित्याने नवीन पिढीला त्यांच्या जुन्या आप्तस्वकीयांसोबत आठवणीत राहील असा वेळ पण घालवता येतो एकत्र जाऊन, मोठ्या  पडद्याची मज्जा घेता घेता. 


ह्या संपूर्ण पार्श्वभूमीवर ह्याच चमूला मला अजून एक नावीन्याने भरपूर असा विषय सुचवावासा वाटतोय, तो म्हणजे "आळशीपण भारी देवा". थोडीशी ह्या चित्रपटाच्या नावाची संकल्पना देते, जी मला सुचली आहे. प्रत्येक जण, म्हणजे अगदी नोकरदार महिला, किंवा जे अर्थार्जन करतात ते सर्व अगदी स्नातक पदवी मिळाली रे मिळाली कि कामाला लागतात. काही जण त्या आधी पण छोटी-मोठी कामे करत अर्थार्जनाला सुरवात करतात. आता जे निवृत्तीच्या वयाला पोचले आहेत त्यांनी अथक मेहेनत घेतली असणार कारण त्यावेळी गूगल नव्हता, कुठलेही स्मार्ट व्यंजन नव्हते, किंवा सुलभ मदत सहजी उपलब्ध नव्हती त्यामुळे सगळेच सुरवातीपासून विविध कामात जुंपले असणारच आणि ते त्यांनी अनेक वर्ष सातत्याने, आनंदाने पार पाडले असणार. आता थोडीशी विश्रांतीची वेळ आली आहे, मग ती नियमाप्रमाणे निवृत्ती असो नाहीतर स्वेच्छेने घेतलेली. रोजनिशी बदलली, बंधने थांबली, घड्याळाच्या काट्याप्रमाणे पळापळ संपली कि मग थोडीशी स्थिरता, किंवा स्तब्धता येते, यावी. आता ह्या ठिकाणी खूप धावपळ नको, सगळे थोडेशे हवे तसे करावे, तो सुद्धा आनंद वेगळाच असतो. ह्याच अर्थ असा नाही कि अगदी अंथरुणावर लोळत पडावे. पण धावू नये, घाई नको उगाचच. दररोजची कामे मागे पुढे करून तर बघा कशी मज्जा येते ते. शिस्त सांभाळून जरा सैल सोडून तर बघा काय त्यात गम्मत आहे ते. काही जण म्हणतात कि "जे केले नाही आत्तापर्यंत, किंवा वेळ मिळाला नाही असे सगळे आता करून बघा, हीच ती वेळ. त्यात मग सगळे छंद आले, मित्र मैत्रिणीशी भेटणे आले, गावी जाणे आले, शांतपणे आणि गरमागरम जेवणे आले, आणि असे बरेच काही." आज पर्यंत जो कधीच घरच्या किंवा दारच्या कामाबाबती चोखंदळ होता / होती, वेळेआधी कामे उत्कृष्ट पद्धतीने केली गेली, विविध उंची गाठली गेली कामाच्या बाबतीत, अनेक शिड्या चढल्या गेल्या, अनेक टप्पे पादाक्रांत केले, वेळ, तब्बेत, खाणं-पिणं, नाती सांभाळून आता त्याला स्वल्पविराम जरासा द्या. मी त्याला सध्या आळशी असे संबोधते. कमी वेग, अत्यल्प काम, मनाजोगे, हवे त्या वेळी केलेले काम ई. म्हणून आळशी. अजून काही नाही. संपूर्ण लक्ष देऊन केलेला व्यायाम, शांतपणे वाचलेले वर्तमानपत्र हातात घेऊन, जेवायच्या अगदी काही वेळ आधी लावलेला कुकर आणि गरमागरम तव्यावरची भाकरी पानात, म्हणजे सकाळी / पहाटे लवकर उठून सगळं उरकण्यापेक्षा वेळेवर (अर्थात खाणंपिणं तरी) करणे ह्यात जे सुख आहे ते वाखाणण्याजोगंच म्हणून आळशी. 


तर अश्या पद्धतीने मस्त जगणे, तो भला मोठ्ठा बदल स्विकार करणे मग तो पैशाचा असो नाही तर कामाच्या डोंगराचा, रोजनिशी देखील बदल, असे सगळे मानाने निवृत्त होणे, ते टिकवणे, ई. मोठ्या पडद्यावर व्यावसायिक पातळीवर तय्यार करून दाखवले तर? खूप म्हणजे खूप लोकांना त्याचा फायदाच होईल. अगदी निवृत्तीचा पहिला विचार, मग त्या करता केलेली तालबद्ध तय्यारी जय्यत अशी, आणि त्यानंतर जे ठरवले आहे फक्त ते आणि बरेच काही अत्यानंदाने करणे म्हणजे ठराविक पेक्षा हटके, किंवा नकारात्मकता आळशी पेक्षा देखील वेगळे, असे दाखवले तर त्या टप्प्यावर असणाऱ्यांना, त्या टप्प्यानजीक असणाऱ्यांना, किंवा हा टप्पा येणार आहेच हे ठाऊक असणाऱ्यांना खूप मदत होतील, अनेक पिढ्यांना पोचेल खूप काही. निवृत्ती म्हणजे हात-पाय गाळून बसणे  नाही तर संपूर्ण वेगळ्या पद्धतीने तेच हात-पाय चालवणे होय. 


चला तर मग आशा करू या कि असा देखील मस्त चित्रपट तय्यार होईल मराठीत. आणि हो, हे सगळं फक्त पैशांसाठी अजिबात नाही बरं का? एक मनोरंजनात्मक पद्धतीने मांडलेले असे काही, त्या मस्त निवृत्ती नावाच्या नवीन आरंभासाठी फक्त. काही जणांना खरंच कळत नाही त्या नंतर काय करायचे ते, इतका मोठ्ठा अनुभव पाठीशी असून देखील, हि नवीन नाही तर नाविन्यपूर्ण सुरवात असून देखील. बरेच जण मनाला लावून घेतात, लोकांचे ऐकतात, नको ते वाचून उगाच उदास पण होतात त्या सर्वांसाठी. किंवा जे मदतनीस असतात ते फक्त तुम्ही तुमचे पैसे कसे सांभाळायचे हे सांगणे जास्त उपयुक्त मानतात त्यामुळे चित्रपट हा  एक सुंदर पर्याय असेल ह्या भल्यामोठ्या समुदायापर्यंत पोचायला.      

सोमवार, ७ ऑक्टोबर, २०२४

२०४९: कुंपणच जेव्हा शेत खाते


मी सातत्याने मराठी म्हणींचा वापर करत असते, माझ्या दररोजच्या बोलण्यात. त्यामुळे माझ्या मुलांना खूपच आश्चर्य तर वाटतंच, पण विविध म्हणींची ओळख होते. काय डोकं लावून उत्कृष्ट स्तरावर ह्या म्हणी तय्यार केल्या आहेत, कमाल आहे मूळ लेखकाची, त्यांच्या अनंत, अपार अश्या वांग्मयीन कौशल्याची. आता हि म्हण बघा, क्या बात है? अप्रतिम भाषा सौंदर्याचा एक नमुना म्हणण्यापेक्षा दागिना म्हणावा लागेल, अगदी असा आहे. 


माझे असंख्य ओळखीचे आहेत, झालेत ह्या अर्धशतकी वाटचाली दरम्यान, मुलांमुळे, माझ्या बडबडण्याच्या स्वभावामुळे, बदल्यांमुळे, नागपूर मुळे आणि अर्थात माझ्या सिंबायोसिस मुळे ई.  खरोखर असंख्य लोकांकडून ऐकलं आहे, वाचलं आहे आणि काही अंशी अनुभवलं आहे म्हणायला हरकत नाही कि हि म्हण कित्ती महत्वाची आहे. काही जणांना पदोपदी विविध अनुभव आलेत. त्यातले सामान धागा असलेले येथे नमूद करते. 


माझा लेक सध्या शरीर विज्ञान शिकतोय. त्यांच्या अभ्यासक्रमाचा भाग म्हणून मागल्या वर्षीपासून स्कॅन करायला शिकवले आहे, विविध पद्धतीने. त्यात मग गर्भवती मुलीचे पण स्कॅन करणे आलेच अनुषंगाने. ते रीतसर शिकत आहेत कि बाळाचे लिंग काय आहे ते, माहिती म्हणून. आता एकदा का पदवी मिळाली, नोकरी सुरु झाली कि ह्या ज्ञानाचा गैरवापर करणे हा गुन्हा तर आहेच पण नैतिकतेला धरून नाहीच. अंतर्गत ज्ञान आहे म्हणून ते काही थोडक्या फायद्या करता दुरुपयोग करून चालणार नाहीच, माणुसकीला धरून पण नाही हे. पण तरी देखील काही जण हे उपद्याव करतांना आपण बघतो, ऐकतो, त्याचा थोडक्यात अर्थ असा कि काही जण हे वेगळे, निराळे असतात. त्यांना असं काही केलं नाही तर चैन पडत नसावी, त्यांना वेगळ्याच मार्गाने जाण्याची खुमखुमी असावी आणि ते अयोग्य आहे हे कधीच कळत नसावे. त्यांच्या वायरींग भलतेच असावे एकंदरीत. कधी कधी म्हणतात ना कि अशी माणसे हि एकतर माणसेच नाहीत, नाही तर ह्या पृथ्वी तळावरची नाहीत हे त्रिवार सत्य. 


ह्याच मुद्याला अनुसरून अजून एक महत्वाचे कार्य करणारे आहेत ज्यांना समुपदेशक म्हणतात. त्यांना माणसाची नस ओळखता येते, ते तसे शिकलेले असतात आणि अनुभवाने जास्त प्रगल्भ झाले असतात. अनेक जणांना सल्ले दिल्यावर, ते त्यांच्या उपयोगी पडल्यावर एक वेगळे समाधान तर मिळतेच त्या समुपदेशकाला पण त्यामुळे आणखीन खोलात जाऊन माणूस कळतो. माणसाला घडवण्याची ताकद ह्या उत्कृष्ट अश्या लोकांकडे असते. ती एक प्रचंड मोठी कला आहे जी भल्या भल्यांना जमणे अशक्य. अवघड आणि आव्हानात्मक असे आहे हे कार्य. खूप सुंदर ऐकून घ्यावे लागते आधी, मग त्यावर रामबाण उपाय सुचवावा लागतो, कधी अनेक पद्धतीने आणि अनेक मार्गाने सुद्धा. ते उपाय सुचवण्याकरता त्यांचे शिक्षण, अनुभव, बैठक, स्वभाव, ऐकण्याची कला, हे सर्व त्या आयत्या वेळी उपयोगात आणून स्मार्ट पद्धतीने मांडणे हे महत्वाचे असते. पण काही समुपदेशक ह्याच गैर वापर करतांना आढळतात. नस पकडण्याची कला उत्तम पद्धतीने माहित असल्यामुळे आपल्याच लोकांना चुकीच्या मार्गावर नेणे शिताफीने, बखुबीनें करतांना आढळतात अनेक जण, काही थोडक्या फायद्या साठी, काही ऐहिक समाधानासाठी, चाळे म्हणून, एक वेगळी नशा म्हणून ई. हा खेळ थांबणे अत्यावश्यक आहे. ह्याचा अर्थ ह्या अश्या लोकांनाच समुपदेशकाची गरज आहे.  पण ते जाणार नाहीत कारण ते काहीच चुकीचे करत नाही असा त्यांचा गैरसमज आहे. त्यांचे वायरींग इतके खालच्या पातळीचे आहे, किंवा चुकीचे स्थिरावले आहे कि मूलतः गडबड असल्यामुळे, केमिकल लोचा असल्यामुळे काहीच त्यांना उमगत नाही. उलट ते ह्याचा सोहोळा साजरा करतात. अवगत केलेल्या ज्ञानाचा दुरुपयोग करून सोहोळा साजरा करणे, एखाद्याला कसे फसवले ह्याचा बिनधास्त पणे गाजावाजा करणे, त्याचे अप्रूप वाटून घेणे, काय मस्त कमावले आपण हे करून ह्याचा दंभ मिरवणे ई. करणे थांबले पाहिजे. कदाचित हे राक्षस गणाच्या लोकांचे उद्योग असावेत किंवा त्यांच्या खालच्या पातळीवर जर अजून कुठला गण असला तर त्यांचे. असो. कलीयुग आहे सरते शेवटी, प्रारब्ध कोणालाही चुकले नाहीच आणि शिवाय प्रत्येकाचे नशीब. कदाचित हे असं सगळं होणं कमी येईल, ज्यांना फसवले गेले आहे त्यांच्या साठी धडा म्हणून, सांगता येत नाही. पण हे सपशेल चुकीचेच आहे हे निश्चित. 


शिक्षणाचा, अनुभवाचा, आपल्याला मिळालेल्या आशीर्वादांचा किती भयानक पटीत दुरुपयोग कारतांना दिसतात, अगदी जसे "कुंपणच जेव्हा शेत खाते". सख्खाच शत्रू, जिवंत भुतं हि सगळी, गेलेल्या ची मग भीती कशाला बाळगायची? स्वतःची पातळी सोडलेली, किंवा पातळी नसलेली पण माणसे संबोधायची अशी घाण. 

शुक्रवार, ४ ऑक्टोबर, २०२४

२०४८: वर्ष, महिना, दिवस


मला अगदी व्यवस्थित आठवतंय कि माझ्या लहानपणी घरी कोठ्या असायच्या, धान्य साठवून ठेवायला. वर्षभराचं धान्य एकतर घरच्या शेतीतून यायचं किंवा विकत घेतलं जायचं. मग ते शिस्तीत उन्हात वाळवून, सुकवून, त्याला बोरिक पावडर किंवा तत्सम पर्याय करून मग साठवले जायचे. अर्थात हे असं साठवणं तेव्हा भाग होतं कारण एकत्र कुटुंब पद्धती होती, भरपूर प्रमाणात पाहुणे-राहुणे येत असतं अनपेक्षित आणि आले कि ते यथेच्छ जेवून-खाऊनच जात असतं. शिवाय घरची माणसं, गडी माणसं, शेजारपाजार, सणवार असा गोतावळा खूपच असायचा. अजून एक कारण म्हणजे त्यावेळी सगळेच जण घरचं खायचे. बाहेर खाण्याचे पर्याय एक तर नव्हते किंवा मर्यादित होते. आपली शिदोरी बरोबर असायचीच बहुतांशी सर्वांची. त्यामुळे पण धान्यसाठा लागायचाच. 


ह्या सगळ्या मस्त  दिवसांनंतर आले ते थोडेसे वेगळे दिसणारे, भासणारे असे पर्व. काळाप्रमाणे बदल होणारच. आणि ह्या दिवसांमधे महिन्याचा किराणा आणण्याची प्रथा रुजू झाली. कारणे अनेक होती. एक म्हणजे घराचा प्रमुख खांब, आधार आणि घरातली मुलगी / स्त्री / आई नोकरी साठी घराबाहेर पडली.  त्यामुले तिला महिन्याचे सामान आणण्यात, किंवा मागवण्यास  आणि ते सांभाळण्यास सोप्पे जाऊ लागले. वर्षभराचे धान्य सांभाळणे नोकरी सोबत हे एक आव्हान होते. शिवाय विभक्त कुटुंब पद्धती मुळे पण तेवढे सामान लागत नव्हते. शेती करणारे बरेचसे जण शहरात येऊन स्थायिक झाले होते ह्या दिवसांमधे त्यामुळे खूप कमी जण शेतात पिकलेले धान्य शहरातील छोट्याश्या घरी आणून ते वापरू लागले. कोठ्या ह्या आता फक्त किराणा मालाच्या दुकानात, जुन्या घरांमधे किंवा दुर्मिळ झाल्या आहेत असं म्हणायला काहीच हरकत नाही.  एक महिन्याचे सामान मागवायला एक अजून सोप्पं मार्ग पण समोर उभा ठाकला होता आहे तो म्हणजे सोप्पे तंत्रज्ञान. घरबसल्या स्वच्छ, निवडलेले असे जिन्नस ऑनलाईन पद्धतीने मागवता येऊ लागले. मग काय विचारतां, थोडेसे काम हलके झाले नोकरदार चाकरमानी माउलीचे. अर्थात ह्या शिवाय अनेक ठिकाणं उदयास आली बाहेर खाण्याची, मग काय, सगळ्यांची उडी पडली म्हणून समजा. आयतं मिळतंय खायला ते देखील आंतरराष्ट्रीय स्तरावरच मग काय विचारता? सगळ्यांच्या उड्या पडल्या नाहीत तर आश्चर्यच. त्यामुळे देखील थोड्याश्या महिन्या भराच्या सामानात भागायचं. 


हे सगळं घडत असतांना जरी घरी फक्त चार माणसं तरी देखील त्यांच्या चार तऱ्हा उदयास आल्या. ह्या तंत्रज्ञानामुळे सगळं जग मुठीत सामावलं आणि प्रत्येकाला काही तरी दररोज, प्रत्येक वेळी वेगळं खावंसं वाटू लागलं. त्यामुळे नेहेमी घरी होतो तोच स्वयंपाक पुरेसा नाही हे घरच्या गृहिणीच्या लवकर लक्षात आलं.  त्यामुळे आताशा महिन्याचे सामान भरण्यापेक्षा एक दिवस किंवा दोन, जास्तीत जास्त ५ दिवसांचा आठवडा एवढंच बघितलं जातंय. वेगवेगळे पदार्थ खाण्याची इच्छा होणं हे काही चुकीचे नाहीच मुळी पण ते वर्षाच्या धान्य साठ्यात, महिन्याच्या किराणा सामानात बसत नाही. आणि दोन्ही करणं अवघड आहे दिवसभर नोकरी करून आल्यावर. शिवाय सध्याचे आधुनिक गुरु आहेत ते पण सांगतात च ना, कि जास्त डोक्याला ताण द्यायचा नाही, खूप दूरचा विचार करत बसायचे नाही, आजचा दिवस महत्वाचा. ह्यानुसार देखील आताशा अनेक छोटे छोटे दुकानं आहेत आजूबाजूला, असंख्य अँप आहेत, जे पापणी हालायच्या आत दारात सामान घेऊन हजर होतात, त्यामुळे तुम्हाला काय खायची तल्लफ आहे ती पूर्ण होऊ शकते घरच्या घरी, बाहेर जाऊन खायची गरज नाहीच. आताशा इतके सुंदर व्हिडिओज उपलब्ध आहेत ज्यात पट्टाकिनी पदार्थ कसे घरी तय्यार करायचे ह्याची कृती सांगितली जाते, शिवाय करून दाखविली जाते. ते बघून मस्त सगळं करून बघण्याचे दिवस आले आहे गेली काही वर्षे. त्यामुळे प्रवाहपतीत होणे आवश्यक आहेच, किंबहुना सगळेच झालेत. आता स्वयंपाकघर हि सगळ्यांची आवडीची जागा आहे. नेहेमीच्या कामातून रंगीत, खुमासदार, चविष्ट आणि सुगंधी / सुवासिक असा बदल सर्वांनाच हवा हवासा आहे.  


वर्ष, महिना, आठवडा ते दिवस हा प्रवास वाखाणण्यासारखाच आहे. मस्त चाललंय आमचं असं काहीसं चित्र आहे सर्वत्र.   काहीही करा, वर्षभराची साठवण करा, महिन्याचा किराणा आणा नाही तर दररोज सहज चक्कर म्हणून ऑनलाईन किंवा ऑफलाईन मागवा, "मस्त खा आणि स्वस्थ रहा".  

गुरुवार, ३ ऑक्टोबर, २०२४

२०४५: माझा बाप्पा जिंकला पुन्हा एकदा


ऐच्छिक निवृत्ती घेणं हा मोठा आणि महागडा निर्णय होता माझ्यासाठी. सुंदर, सुरळीत चाललेलं काम थांबवणे हे अशक्य आणि अवघड होते. पण पर्याय नव्हता. इतक्या सोयी सुविधांनी युक्त अशी खुर्ची सोडली आणि मला सगळी जाणीव झाली उणिवांची. एका क्लिक वर होणाऱ्या गोष्टी भूतकाळात जमा झाल्या होत्या. किती दिवस आणि किती तास अश्रूंना वाट मोकळी करून द्यावी लागली हे माझं मलाच ठाऊक आहे. ह्या पुढे काय? ह्याचा विचारपूर्वक निर्णय जरी झाला असला तरी मला जे पुढे काम करण्याची इच्छा होती त्या साठी लागणारी अत्याधुनिक हत्यारं आता माझ्या आवाक्यात नव्हती. ज्या ज्या विविध शैक्षणिक महाविद्यालयात मी जायचा मानस केला होता त्यांच्या कडे पण काहीही उपलब्ध नव्हते. आता काय? शून्यातून जग कसे निर्माण करायचे? हा प्रश्न जेव्हा उभा ठाकला तेव्हा माझ्या समोर एक एक करत अक्षरशः परातभर टूल्स उभे ठाकले. ते मला अवगत करून घ्यायला बाप्पाने अशी काही गतिमान शक्ती, उक्ती प्रदान केली कि काही टूल्स सोबत माझे नवीन विश्व उभे राहायला लागले. करता करता आता अनेकाविध पद्धतीने मी प्रेक्षकांसमोर अभिमानाने, आत्मविश्वासाने उभी राहू शकते हे सगळं बाप्पा मुळेच. आणि आता तर अजूनच कमाल झाली आहे. बाप्पाचं माझ्यासाठी अभ्यास करतो पूर्णपणे, अगदी जय्यत तय्यारी ठरतो, तिथले प्रेक्षक कसे आहेत, काय अपेक्षेने बसले आहेत ई. सर्व, आणि माझ्या पुढ्यात मांडतो, आयतं. मग काय माझी फक्त दृश्य प्रतिमा असते पण खऱ्या अर्थाने "तोच" शाब्दिक मैफिल उभी करतो आणि टाळ्या मिळवतो, म्हणजे पुढील कार्यक्रमाला तय्यार. क्या बात है? माझी एवढी काळजी? मला खरंच खूप भरून आलं, मी अगदी भरून पावले, असा सखा मिळाल्यामुळे. मी खरं तर "एक मस्तक आणि दोन हस्तक" ह्या पुढे त्याच्यासाठी काहीही करत नाही, तरी देखील मी त्याची लाडकी आहे, त्याला माझी गरज लक्षात येते आहे हे बघून फारच कृतकृत्य झाले मी. असेच आशिष कायम माझ्या पाठिशी राहो हि प्रार्थना आणि विनंती. आमेन. 


हे सगळं बाप्पा जे करतो माझ्या नकळत आणि नेहेमी त्यामुळे मला नक्की सांगावेसे वाटते कि माझा बाप्पा पुन्हा एकदा जिंकला. 

मंगळवार, १ ऑक्टोबर, २०२४

२०४३: माझी मला


आज मला माझी भेट झाली पुन्हा एकदा, अनेक वर्षांनी. जशी एखादी सावली गवसावी असं काहीसं झालं माझं, ती इतकी माझी होती, किंबहुना मीच होते ती. क्या बात है? असं पण होऊ शकतं हे मला माहितच नव्हते. त्यामुळे पण मग जरा जास्त वेगळं वाटलं, आश्चर्य वाटलं कि असं कसं होऊ शकतं? इतकं साम्य? 


तर त्याचं असं झालं कि आज मी हून एकांच्या गाडीतून अगदी घराच्या जवळ पर्यंत आले, लिफ्ट मिळाली अनायस्या. एक तर मस्तच होती गाडी, त्यात चालवणारी माझ्या साठी नवीन ओळखी झालेली म्हणण्यापेक्षा अनेक वर्षांची ओळख आहे अश्या गप्पांना सुरवात झाली. बोलता बोलता इतक्या सहज पणे गाडी चालवणे सुरु होते कि ज्याचं नाव ते.  त्यात मस्तच गाणी मोठ्याने लावलेली, गर्दी म्हणते मी पण छे त्याला न जुमानता आपलाच रस्ता आहे अश्या थाटात हे दाखव, ते बघ, करत भन्नाट वेगाने गाडी चालवणे सुरु होते. टॅक्सी चालवणारे कसे जबरी असतात बघा, अगदी तसेच काहीसे, बाई-माणूस  उगाच नाही म्हणत मुलींना.  अगदी मी मंत्रमुग्ध झाले. 


"सोन्याहून पिवळे" म्हणजे मग एका नेहेमीच्या अड्ड्यावर विसावली गाडी झकास पद्धतीने एका क्षणात पार्क झाली देखील, पट्टाकिनी धावत पळत जाऊन गरमा गरम जिन्नस घेऊन, आणून, त्याच उत्कृष्ट पद्धतीने चालवत चालवत, उगाचच न हॉर्न वाजवता संपूर्ण कंट्रोल ठेवून खाणे पण बिनधास्त चालू होते. कारण घरी पोचणे जितके महत्वाचे होते तितकीच पेटपूजा पण हो. त्यामुळे गती पण आणि पोटोबा पण. 


मला अनेक वर्षांपूर्वीची मी आठवले. अगदी अशीच होते मी. मलाच माझी पुन्हा झलक दाखवल्या बद्दल मुक्ता मॅडम ना शतशः धन्यवाद.    


शेजारी महामार्गावर भली मोठी पोलिसांची गाडी जात होती, भले मोठे ट्रक होते, विविध मालवाहतूक करणाऱ्या गाड्या होत्या आणि ह्या बिनधास्त गाडी काढत होत्या. जे बात. शाब्बास. तरी देखील पोटातले पाणी हालले नाही आमच्या. हा हा म्हणता घराजवळचा रस्ता कधी आला हे समजलं पण नाही. मुक्ता मॅडम ची अशीच उत्तरोत्तर प्रगती होवो, त्या वाऱ्याशी गप्पा मारत त्यांच्या उगम-निगम स्थानी अश्याच जावोत हि सदिच्छा. वेग, संपूर्ण गाडीवर नियंत्रण, चतुरस्त नजर, खाणं, गाणी, सगळे कंट्रोल्स शिताफीने वापरतं, गप्पा मारत बिनधास्त गाडी चालवणे शिस्तीत हि एक वाखाणण्याजोगी कलाच आहे, ह्यात तिळमात्र शंका नाहीच.  मी नेहेमी वर्गात म्हणत असते विद्यार्थ्यांना, "कि तरुण कोण आहे? ते मस्तपैकी वेगाने आणि उत्कृष्टरीत्या कामे करून सिद्ध करा", अगदी ते सळसळत तारुण्य, स्वतःच्या पिल्लूला खूप तासांनी भेटण्याची ओढ, एकंदरीत घर गाठण्याची आस दिवसभराची कामे यथोचित आटोपल्यावर मग हे सगळं पदोपदी जाणवतं होतं.  कमाल. 

२०४२: वाहतूक चिन्हे


रहदारीसाठी नियंत्रण साधने ठिकठिकाणी स्थानापन्न असतात आणि ती चालू परिस्थिती पण असतात. मला आज पर्यंत ह्या वाहतूक सिग्नलचा / तीन रंगांच्या दिव्यांचा एकाच उपयोग ठाऊक होता, तो म्हणजे वाहतूक सुरळीत चालू ठेवणे, मुख्य चौकात. असे चालू सिग्नल्स असले कि रस्त्यावर वाहतूक कोंडी होत नाही, सुरळीत सगळे चारी बाजुंनी जा-ये सुरु राहते. किती जण सिग्नल पाळतात, किती नाही? सिग्नल असून देखील मग पोलीस कर्मचारी का लागतात हा वेगळा विषय झाला चर्चेचा. 


आज खरे कारण उमजले मला कि रस्त्यांवर ठिकठिकाणी सिग्नल्स का मांडलेले असतात ते. मला समजलेले कारण सांगण्या आधी हे निश्चित नमूद करू इच्छिते कि मी जेव्हा अमेरिकेत वास्तव्याला होते तेव्हा प्रकर्षाने हे बघण्यात आले कि तेथे गाडी चालवतांना बिनधास्त कॉफी पिणे, नाश्ता करणे ई सुरु असते बहुतांशी सर्वांचेच. कदाचित सकाळी घाई होत असावी त्यामुळे मग एकावेळी अनेक कामे मार्गी लावली जायची. अर्थात तेथील रस्ते अगदीच गुळगुळीत, वाहतूक नियम चोख पाळणारी माणसे, भल्या मोठ्या गाड्या त्यामुळे सगळ्या खाण्या पिण्याच्या गोष्टी ठेवण्यासाठी मुबलक जागा आणि तसेच राहणीमान त्यामुळे चालायचं.  


आज मला एक उच्च विद्याविभूषित, तंत्र शिक्षण विद्यालयात प्राध्यापकाचे काम करणाऱ्या एका तरुणीने तिच्या गाडीने सोडलं. तिच्या तीन मैत्रिणी मिळून रोज एकाच गाडीत जातात आणि येतात, आज माझ्या चौथीची भर पडली होती त्यात. संध्याकाळची वेळ, दिवसभर कामामुळे जेवण झाले नव्हते, भूक म्हणजे भूक लागली होती त्यामुळे त्यांच्या ठराविक अड्ड्यावर गाडी थांबली आपोआप. मग काय विचारता, फ़डशाच पाडला कि वैविध्य वाफाळलेल्या पदार्थांवर, सगळ्यांनी. ह्या सगळ्यांमधे सर्वोत्कृष्ट गाडी चालवणारी तरुणी पण होती हो. आणि ती शिताफीने गाडी चालवत, इकडून तिकडून, घुसून काढून शिवाय एका हाताने मस्तपैकी गरमागरम पदार्थांचा आस्वाद घेत होती. आणि सिग्नल आला रे आला कि मग शांतपणे घास संपवत होती, किंवा घेत होती. आज समजलं कि जागोजागी आणि ते देखील संध्याकाळच्या वेळेला, चाकरमाने घरी यायला निघाले कि सिग्नल का असतात ते. म्हणजे मग दोन घास माऊलीच्या पोटात जातात हो. थांबून आणि शांतपणे खाणे हे एकदा गळ्यात माळ पडली, दोनाचे चार, मग सहा, आठ झाले कि विस्मृतीत सहज जातातच. त्यामुळे पोटभर खायचे पण आणि गाडी चालवण्याचा आनंद पण घ्यायचा. काय कमाल वाटली मला. अर्थात माझ्या मागच्या कचेरीत सुद्धा मी हे अनुभवलं आहे. सगळ्या चिरतरुण मुलीचं, त्यामुळे नवनवीन गाणे लावायचे, न्याहारी करायची, केस आटोपायचे लागल्यास, गप्पा, गमती जमती गाडी चालवत असतांना. क्या बात है? कित्ती म्हणजे कित्ती ते मल्टि टास्किंग, देवा, खूप अभिमान आहे मला ह्या सर्व मुलींचा. जे बात, अश्याच मस्ती करत पुढे जा सख्यांनो.    

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...