शनिवार, १ जानेवारी, २०२२

चकाचका

माझी लेकरं लहान होती तेव्हा, नुकतीच बसायला आणि घन पदार्थ खायला लागली होती तेव्हाची हि एक गोष्ट आहे. एक दररोज च्या वापरातलं सर्वांना प्रिय असं बिस्कीट आहे ज्यात नारळ घातलेला असतो आणि बिस्किटाच्या वरून सुंदर पद्धतीने मांडणी करून साखरेचे कण पेरलेले असतात. माझी आई मुलं लहान होती म्हणून आमच्या कडे होती काही दिवस मुक्कामाला तेव्हा सातत्याने मुलाना व्यस्त / व्यग्र ठेवायचं म्हणून आणि शिवाय थोडीशी स्वतः खाण्याची आवड लागावी म्हणून ती हे नारळ साखर बिस्कीट त्यांना देत असे हातात. खूप खूप वेळ त्या बिस्किटावर चिकटलेले साखरेचे कण काढण्यात त्यांच्या गोऱ्या गोबऱ्या छोट्याश्या बोटांनी (ते अनेक असफल प्रयन्त असायचे त्यांचे) आणि मग तो कुठे तरी पडलेला शोधून खाण्यात मुलांचा बराच वेळ जायचा. आम्हाला / प्रेक्षकांना ते बघण्यात मज्जा यायची ती वेगळीच. आज अनेक वर्षांनी मी जेव्हा त्याच बिस्किटांचा आनंद उपभोगत होते सकाळच्या चहा सोबत तेव्हा एक लक्षात येईल असा बदल दृष्टीपथात पडला माझ्या. तेच बिस्कीट, तीच कंपनी, मी पण तीच पण बिस्किटावरची साखर गायब हो, पूर्णपणे गायब. अर्थात आता माझी मुलं मोठी झालीत, त्यांना वेळ घालवण्याकरता ते साखरेचे कण नकोत, पण प्रकर्षाने जाणवेल असा बदल दिसला म्हणून हा पंक्ती प्रपंच. हा बदल साखरेच्या वाढीव दरामुळे आहे कि कंपनीला काही नवीन करायचं आहे, का अजून काही हे माहित नाही, पण माझ्या खूप गोड, साखरे पेक्षा गोड आठवणी आहेत त्या बिस्किटा सोबत त्या पिटुकल्या साखरेच्या कणांसोबत हे मात्र नक्की आणि त्या आयुष्यभर राहणार हे पण तेवढंच खरं. साखर-साखर हा गोड शब्द किंवा हि गोड संज्ञा त्या वेळी माझ्या मुलांना बोलायला अवघड होती त्यामुळे ते चकाचका = साखर-साखर असं त्यांच्या बोली भाषेत म्हणायचे ते बोल, ती गोंडस मुलं, ती माझी त्यांना सतत व्यग्र ठेवणारी आई माझ्या डोळ्यादेखत उभी ठाकली आज पुन्हा एकदा.  धन्य ती बिस्किटं आणि धन्य त्या आठवणी. 

"नाईस-टाइम" हे खरं त्या बिस्किटांचं नाव, पण आमच्या घरी चका-चका ह्याच नावाने प्रसिद्ध आहे, इतकं कि हि अनुकथा लिहितांना आज मला गुगल वर जाऊन शोधावं लागलं मुळ नाव बिस्किटांचं. काय हे वेड? 

http://britannia.co.in/products/nice-time/nice-biscuits


अँप म्हणजे व्याप

अँप ची सध्या इतकी भाऊगर्दी झाली आहे कि ज्याचं नाव ते. जो उठतो तो एक नवीन अँप घेउनच येतो. अगदी म्हणे तिसरी चौथी च्या विद्यार्थांनी देखील वैविध्य अँप तय्यार केलेत. अहाहा. काय बोलायचं आता. आधीच प्रत्येक कंपनीचा फोन वापरण्याची पद्धत वेगळी, त्यात "करलो दुनिया मुठीमे" अशी स्थिती झाली आहे, मोबाईल म्हणजे सर्वोसर्वच झालाय. प्रत्येकाला तसं पाहिलं गेलं तर प्रत्येकाबद्दल सर्वच ठाऊक आहे, किंबहुना माहिती मिळणं अतिशय सोप्प झालायं. प्रत्येक अँप ला तुमची जन्म कुंडली इतंभूत माहिती आहे, तुमच्या स्वतः पेक्षा कितीतरी पटीने जास्त. प्रत्येक अँप ची आपली एक वेगळीच खास मांडणी. त्यामुळे प्रत्येक अँप गणिक नवीन शिकणं आलंच, ते लक्षात ठेवणं आलं आणि अनेकदा बरेच बदल पण घडतात त्या अँप मधे, ते पुन्हा शिका ई. कधी कधी नको नको होतं, सोय आहे पण किंमत पण मोजावी लागते मोठ्या प्रमाणात. तुमचे खाजगी नंबर अनेकांना दिले जातात / उपलब्ध होतात त्यामुळे नको तेव्हा नको ते भलत्या वेळी फोन येतात, थोडीशी नाही म्हटलं तरी अनाहूत भीती राहते अँप डाउनलोड करते वेळी आणि वापरतांना सुद्धा. सर्वप्रथम तर नक्की अँप कुठला आहे, त्याच चिन्ह दिसत कसं, बरोबर अँप डाउनलोड केला ना इथं पासून सुरवात होते. सोय आणि गैरसोय तराजूत ठेवून मोजले तर गैरसोयीचा परडा भारी दिसतो बहुतांशी वेळा. असो 

"तुझं माझं जमेना, तुझ्या वाचून पण जमेना" अशी अडकत्यात अडकल्यासारखी स्थिती झाली आहे. "बदल हाच सतत स्थिर असतो / Change is the only constant" अश्या पद्धतीने तंत्रज्ञानाला आपलंस करत मार्गक्रमणा करूया पुढे हेच बरं.

बुधवार, २९ डिसेंबर, २०२१

व्यक्तिमत्वाची झलक

हे माझ्या बाबतीत अनेकदा झालंय प्रत्यक्ष / अप्रत्यक्ष रित्या. म्हणजे मी अनुभवलं पण आहे, वाचलं / ऐकलं आहे. माझ्या एका अगदी खास आणि अत्यंत जवळच्या मैत्रिणीचं लग्न ठरलं. अर्थात मी आमच्या काळातली हि पिटुकली गोष्ट सांगते आहे. तेव्हा ते अरेंज्ड केलेलं असं लग्न, होत. लग्न ठरलं, बोलणी झाली, साक्षगंध देखील झालं आणि एक दिवशी होणारे नवरा बायको आले समोरासमोर अतिशय व्यवस्थित ठरवून, वेळ, काळ, स्थळ ई. बूट/ जोडे घराबाहेर काढून आत यायची त्या वेळची पद्धत / अलिखित नियम होता. तसेच केले ह्या नवरदेवाने देखील. पद्धतशीर स्टाईल मधे पायात मोजे आणि एका पायावर दुसरा पाय अश्या पद्धतीने म्हणे तो बसला होता, इति माझी मैत्रीण. आणि मग तिला म्हणजे माझ्या मैत्रिणीला पेचात पडल्यासारखं झालं हसावं का रडावं ते कळत नव्हतं. विचारांचा कल्लोळ माजला तिच्या मनात. आज अगदी तस्साच नाही पण तत्सम प्रसंग माझ्या समोर घडला आणि माझी मैत्रीण अधिक अनेकवेळा वाचलेले / ऐकलेले प्रसंग डोळ्यासमोर झर्रकन उभे ठाकले.

आज मला भेटायला एक अतिशय तरुण, तडफदार, वित्त सल्लागार, भल्या मोठ्या जगविख्यात संस्थेतून शिकलेला ई. असा भेटायला आला, एक नाही, दोन नाही तीनदा विविध वेळा सांगून, ठरवून. आणि पुन्हा तेच, मी काहीही बोलण्याच्या आत एक चांगली सवय म्हणून व्यवस्थित बूट घराबाहेर काढले त्याने, आणि मला माहिती सांगणार तोच माझं लक्ष त्याच्या मोज्या बाहेर डोकावणाऱ्या पायाच्या अंगठ्या कडे सहज नकळत वेधलं गेलं. मग आमचं ठरल्या प्रमाणे बोलणं झालं ज्या करता आम्ही भेटायचं ठरवलं होत. पण मला अनेक वर्षांपासूनचे भरपूर प्रश्न पडले कि 

  • हा वेंधळा आहे का जास्त हुशार
  • कामात इतका झोकून  देत असेल कि मोज्यांकडे लक्षच नाही
  • का कंटाळा
  • का एकटा असेल, वेळ मिळत नसेल, पैसे नसतील, नवीन मोजे घ्यायला वेळ नसेल
  • का नवीन मोजे फाटले असतील....


सरते शेवटी मला काही म्हणजे काहीच पटलं नाही.

वेळ काढलाच पाहिजे, वेळेचं व्यवस्थापन जमलंच पाहिजे, तरुण आहेत तर तरुणांसारखं शिस्तीत वागलं पाहिजे, आणि हि जरी फारच पिटुकली गोष्ट असली तरी व्यक्तिमत्वार घाव घालणारी आहे / ठरू शकते. घराबाहेर पडतांना पहिल्यांदा स्वतःसाठी शिस्तीत बाहेर पडणं अत्यावश्यक आहेच. शिवाय बाकीचे देखील तुमच्याकडे बघतात, शिकतात, प्रेरणा घेतात ई. तर चांगलं उदाहरण म्हणून जगा, नवा रुपाला या. फाटलेला मोजा बरंच काही सांगून जातोय, त्यामुळे हातातून एखादी सुवर्णसंधी निसटू शकते सहज आणि हा स्वभाव जर घडला तर महागात पडेल, अजून अश्या अनेक सवयी / दार्शनिक गोष्टी घडण्याच्या शक्यता नाकारता येत नाही. "असे अंगठे दिसती आणि स्मृती ठेवुनी जाती".

सोमवार, २७ डिसेंबर, २०२१

डॉक्टरांचे हस्ताक्षर

गेले काही महिने मी संपूर्ण एका डॉक्टर चमूला / वर्गाला तंत्रज्ञानाचे महत्व समजावून सांगते आहे, एक विषय शिकवते आहे. तो विषय शिकवायला सुरवातच करते मी एक वाक्य घोषित करून. वैद्यकीय आणि तांत्रिक शात्राचे अनोखे जणू लग्नच म्हणजे हा विषय होय. आणि त्या नंतर जसे शिकवणे सुरु होते तसे वैविध्य नवीन तंत्रज्ञान वैद्यकीय क्षेत्रात कशी उपयोगी ठरू शकते, किंबहुना ठरते आहे हे उलगडून सांगत असते. बरेचसे अवघड आणि थोडेसे लक्षात ठेवायला कठीण असे ते शब्द असतात खरं आणि ते देखील डॉक्टर मंडळींना.

संपूर्ण आनंदात, मजेत आणि हलकंफुलकं शिकवण संपल आणि मग आली परीक्षेची वेळ. परीक्षा पण झाली आणि आले कि माझ्या कडे त्यांच्या उत्तरपत्रिका तपासायला. मी उडालेच अक्षरशः, एक म्हणजे मी बोललेले सगळे च्या सगळे मुलांनी उत्कृष्ट पद्धतीने लक्षात ठेवले आहेत आणि ते उतरवले देखील उत्तरात. आणि इतक्या सुस्पष्ट अक्षरात, अहाहा, डॉक्टर आणि सुवाच्य हस्ताक्षर हे थोडंस पटण्यासारखं नव्हतं मला पण मी हे विसरले होते कि हि डॉक्टर मंडळी  ह्या नवीन पिढीतील आहेत. आता काही अशक्य नाही, हे जुन्या पिढीचं समीकरण बदलले दिसतंय जी फारच चांगली सुरवात आहे. एका क्षेत्रात दिग्गज असलेल्या मंडळींनी नवीन क्षेत्रातले शिकणे म्हणजे फारच कौतुकास्पद आहे माझ्या दृष्टीने. अर्थात कुठल्याच क्षेत्रातल्या मंडळींना नवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्याशिवाय पर्याय नाहीच म्हणावं आता, पण मला संपूर्ण तो विषय शिकवणे ते उत्तर पत्रिका तपासणे हा प्रवास फारच समाधान आणि अत्यानंद देऊन गेला. असेच डॉक्टर्स येती आणि स्मृती ठेवुनी जाती.


चार डोळे

मी सातवीत होते, आमच्या शाळेत वार्षिक संमेलन सुरु होत आणि घाईत पळत असतांना माझा पाय घसरला भल्यामोठ्या जिन्यातून आणि मी सरळ वर पासून शेवटच्या पायरीवर आदळले. खूप लागलं, डोळा कसाबसा वाचला आणि तेव्हापासून मला दोन नवीन डोळे प्राप्त झाले, दोनाचे चार झाले. तेव्हा पासून तो चार डोळ्यांचा प्रवास खूप काही शिकवून गेला. त्या वेळी डोळे तपासायला जायचे, मग नवीन चष्मा भेट मिळायचा आणि मग तो मिरवायचा हा नियमित उपक्रम होता, पण तो फारच आगळा वेगळा असा होता. का कुणास ठाऊक पण नवीन चष्मा करून आणला आणि तो परिधान केला कि त्या दिवशी किंबहुना दुसऱ्या दिवशी देखील नदीत चालल्यासारखं किंवा तळ्यात पडल्यासारखं च वाटायचं. बाप रे. कशामुळे कोणास ठाऊक. पण ते दोन दिवस इतके मज्जेशीर जायचे ना, वा, पर्वणीच जणू. असं मी का म्हणतेय? सांगते हो. मला निश्चित माहिती नाही पण आज खूप वर्षांनी मला हे प्रकर्षाने जाणवलं. आज देखील मी नवीन चष्मा करून घेतला, तो परिधान केला पण माझी पाऊलं अगदी सरळ पडली हो जमिनीवर, काही वर ना खाली, ना तळ्यात ना मळ्यात. आश्चर्यच आहे नाही? असं काय बदललं असेल? मी तीच, चष्मा तोच, जमीन पण तीच आणि पाऊलं देखील, मग तो अनुभव का बदलला?

असो, बरच आहे, आता जर नदीत पडल्यासारखं जाणवलं असतं तर ते परवडण्यासारखं नव्हतंच. आणि हो, ते जुने दिवस "झोपाळ्यावाचून झुलायचे" असेच होते ना, म्हणून असेल कदाचित. पण एकाच जगण्यात दोनाचे चार होणे, वैविध्य प्रकारचे असंख्य कंदील घालता येणे, नदी ते जमीन ह्या चालण्याची मजा चाखता येणे हे बहुतांशी तंत्रज्ञानामुळे साध्य झाले असावे. अशीच तंत्रज्ञानाची उत्तरोत्तर प्रगती होवो हि सदिच्छा.

२१

एकेवीस हा तर आपल्या गणपती बाप्पांना अत्यंत प्रिय असा आकडा. अर्थात सगळेच आकडे उत्तमच असतात, जसं बघू तसं आहेच, पण आज २१ बद्दलच लिहायचं ठरवलं म्हणून ती सुरवात केली हो. ह्या वर्षा च्या सुरवातीलाच अंदाज बांधला होता कि बाप्पाच्या कृपाशीर्वादाने हे देखील वर्ष भन्नाट जाणारच, आणि तस्सेच झाले. कसे? सांगते ऐका.

आमच्या पहिल्या मालकीच्या घराला नवीन साज चढला आणि लवकरच ते आमच्या आगमनाची वाट बघत आहे. राहतं घर विकण्याचा महत्वाकांक्षी निर्णय घेण्याचं धाडस करता आलं लेकाचे शिक्षण अडथळ्याशिवाय व्हावं म्हणून.

आज तागायत १९९५ पासून शिकवण्याचा सुरु झालेला प्रवास हा फक्त आधीपासून स्थापन झालेल्या संस्थेतच सुरु होता. स्वप्नवत वाटणारी संधी चालून आली आणि सत्यात उतरवता आले असे कधीही न बघितलेले स्वप्न एक अख्ख नवीन तांत्रिक शिक्षण संस्था चालू करण्याचं. सप्टेंबर ते डिसेंबर ह्या अवघ्या काही महिन्यात प्रचंड पाठबळामुळे, उत्कृष्ट अश्या सह पाठ्यांमुळे आणि मुळातच संस्थेचं / विद्यापीठाचं नावच इतकं मोठं आहे कि त्यामुळे मला शक्य झालं. ह्या चार महिन्यांच्या प्रवासात किती म्हणजे कित्ती वैविध्य व्यक्तिमत्व बघता, वाचता आणि समजावून घेता आले. सुवर्ण नव्हे प्लॅटिनम संधी होती माझ्या साठी. एक साधी लेक्चरर ते डेप्युटी डायरेक्टर ह्या पदापर्यंत मजल गाठता आली.

४ महिने सलग पुन्हा एकदा विद्यार्थी दशेत पंचतारांकित वसतिगृहात राहायला मिळालं, चारीठाव आयतं आणि वैविध्य खायला मिळालं, प्रसिद्ध लढाऊ वैमानिक ज्याने आपल्या देशाची तब्बल ३७ वर्ष सेवा केली अश्या व्यक्तिमत्वाशी फक्त ओळखच नाही झाली तर एक जगावेगळं नावीन्याने नटलेलं भाऊ-बहिणीचं नातं निर्माण झालं, माझ्या अगदी अत्यंत प्रिय अश्या नागपूर शहरात पुन्हा एकदा वास्तव्य करता आलं आणि सगळ्या जुन्या मित्र मैत्रिणीची पुन्हा भेट झाली, शेजारी, त्या गल्ल्या, ती शाळा, ते विद्यालय आणि बाकी बऱ्याच आठवणीना उजाळा मिळाला, सोन्याचा अजून एक मुलामा चढवता आला.

जनसंपर्क आणि त्याचा इतक्या वर्षाचा साठा इतका भला मोठा आहे हे माहित होतंच, पण अजूनही नवीन नाती चटकिनी भरभक्कम अशी उभी राहतील असं वाटलंच नव्हतं, पण तसं झालं आणि ते आश्चर्य रित्या संपूर्ण अनभिन्य व्यक्तींशी जोडलं गेलं देखील. एक फारच आगळीवेगळी मैत्रीण लाभली, तिच्या हातचे चविष्ट पदार्थ न मागता चाखायला मिळाले, तब्बल ३ दिवस सलग, कविता + गप्पा चा छोटासा फड रंगला आणि अनेक वर्षांनंतर कचेरीच्या आवारात प्रथमच तुलसी विवाह साजरा झाला.   

माझ्या दोन्ही मुलांची १२ सारखी मौल्यवान पायरी पार झाली आणि ते पुढील दिशेने पदक्रमण करते झाले, दुचाकी अत्यंत शिताफीने चालवायला शिकले, छोटे छोटे पैशाचे व्यवहार स्वतंत्रपणे करायला शिकले. अहाहा, तेच पण नव्याने पुन्हा उमगलेले असे तरुण दोस्त माझे.  

माझ्या मोठ्या दिरांच अनेक वर्षांचं स्वतःच्या भव्य दिव्य घराचं स्वप्न साकारलं ह्या २१ मधे आणि आम्ही सगळे त्या मौल्यवान क्षणांचे साक्षीदार झालो.

माझ्या लाडक्या मोठ्या पुतण्याची फार नावाजलेल्या महाविद्यालयात ऍडमिशन झाली आणि तो फार उत्कृष्टपणे तेथे रुळाला देखील. अगदी बाळ म्हणूनच सातत्याने लक्षात राहिलेला, किंबहुना तसाच बघितलेला आज स्वतंत्रपणे एकटा राहून सगळं सांभाळतो आहे हे बघून उर भरून आल्याशिवाय राहील नाहीच.

थोड्या प्रमाणात पण २ वर्षांपासून थांबून राहिलेले प्रवास सुरु झाले आणि आम्हा सगळ्यांना त्याचा आनंद उपभोगता आला.

माझे दोन अत्यंत हुशार आणि जगावेगळे विद्यार्थी / सहपाठी PhD झाले ते देखील ह्याच २०२१ ला.

अनेक नवीन मंडळी माझ्या कपाटात स्थानापन्न झाली अगदी कपाट दुथडी भरून वाहत आहे. लायकीपेक्षा कैकपटीने "त्याने" कित्ती जास्त देऊ केलं आहे हे बघून डोळे तर दिपलेच, पण फारच वेगळ्या पातळीचं समाधान लाभलं. पाय घट्ट पुन्हा एकदा जमिनीवर स्थिर झाल्याची / असल्याची  जाणीव झाली.

अनेक प्रकारे छोटेखानी वाढदिवस साजरे झाले माझ्या ह्यांचे / मुलांच्या वडिलांचे, कारण त्यांनी ह्या वर्षी त्यांचं अर्धशतक पूर्ण केलं आहे. त्यामुळे जगभर विखुरलेल्या ह्यांच्या मित्रांशी - मैत्रिणीशी ऐकता / बघता आलं.

आई गेल्यामुळे जगाकडे बघण्याचा नवीन नजरीया उमगला आणि त्यामुळे भरपूर ताकदिनिशी लढायला नव्याने शिकता आलं, कुठल्याही  छत्राशिवाय. अत्यंत कठीण होत ते, एक दिवस देखील डोळे डबडबल्याशिवाय सरला नाहीच, पण ती आसवे शिताफीने लपवणे पण नव्याने शिकवलं ते ह्याच २१ ने.   जगापुढे दिवस भर स्मितहास्य कायम टिकवून ठेवायचं, भरपूर काम करायचं आणि दिवस मावळला कि न कळत येणाऱ्या तिच्या आठवणीत तासंतास डोळे टिपायचे, हे देखील जमलं, जमवावं लागलं.

२१ च्या पहिल्या दिवशी मी २० ते २१ प्रगितिशील वर्ष असेल असं लिहिलं होत आणि ते फारच उत्कृष्ट रित्या साकारलं गेलं आणि मलाच संपूर्ण एका वर्षाचा आढावा इथेच मांडता आला आज हे समाधान हि जगावेगळं आहेच. https://drpreetimulay.blogspot.com/2021/01/blog-post.html

बेरीज वजाबाकी नेहेमी प्रमाणे चालूच होती ह्या ३६५ दिवसात पण त्यामुळे शिकता आलेले गुणाकार आणि भागाकार ह्या आधी कधीच अनुभवला नव्हता. सगळ्याची गोळाबेरीज म्हणजे पुढील येणारे नववर्ष इतक्या जोशात, आनंदात आणि स्वस्थ असे सुरु होऊ दे माझ्या साठी, माझ्या कुटुंबियांसाठी, माझ्या मित्र-मैत्रिणी, नातेवाईकांसाठी आणि सर्वांसाठी च कि सगळ्या जगवासियांना प्रत्येक दिवस आणि त्यातला प्रत्येक क्षण उपभोगता आला पाहिजे, हीच ईशचरणी प्रार्थना, अगदी मनापासून. 

सोमवार, २० डिसेंबर, २०२१

ऊर्जेचे स्तोत

आपण अनेकदा बघतो कि घरी  छोटी मोठी रिपेअर ची काम करायला जेव्हा एखादा व्यक्ती किंवा चमू येते  आणि त्यांना विजेची आवश्यकता असते तेव्हा ते थेट वायर प्लग मधे घालतात. बास, आणि हे नेहेमीचंच आहे, अनेक वर्षात तसूभरही बदल नाहीच.

देवा पासले दिवे, किंवा छोटेखानी लाईट ची वायर आणि प्लग हा दोन पिन वर चालतो. ज्या वस्तूंना कमी वीज लागते ते छोटे ३ प्लग पिन वर चालतात, आणि चार्जे पण होतात सहज. जास्त ऊर्जा लागते तेव्हा पिन मोठी होते आणि त्याच्या दाताचा आकार देखील. हे झालं आपल्या घरच्या वस्तूंचं. पण कारखान्यात अजून भले मोठे प्लग असतील, नाही का. असाच एक मोठा आणि नवीनतम प्लग सध्या मी टीव्ही च्या एका जाहिरातीत बघते आहे. तो म्हणजे हुंदाई कार चार्ज करण्यास वापरलेला, बाप रे.

वस्तूंचा आकार लहान का मोठा, ऊर्जा तीच, पिन ची जाडी कमी जास्त होते आवश्यकतेनुसार. अगदी सभोवतालच्या नात्यांसारखं नाही? पिन, आकार, ऊर्जेची गरज, वस्तू / नात्यांचे प्रकार, प्रसंग ई. बदल घडवत घडवत पुढे प्रस्थान करायचं. कधी आपण ऊर्जेचं स्तोत व्हायचं नाही तर गरज भासल्यास चार्ज  घ्यायचा, किती गोड संकल्पना आहे नाही. तर मंडळी शोधून आणि जपून / शिंपून ठेवा आपआपले वैविध्य प्लग्ज.  

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...